सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ दुसरी बाजू… — लेखिका : स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
( १ )
आदित्य…आमच्या Society मधला एक उमदा, हरहुन्नरी तरुण…घरच्या उत्तम संस्कारात वाढलेला….
सहा महिन्यापासून अचानक केस वाढवायला लागला.. साहजिकच लोकांच्या चर्चेला विषय….
हल्लीं मुलेही मुलींसरखे केस वाढवतात… छान Bow बांधतात… नवी Fashion आहे… असे काहीबाही कानावर पडत असेच..
परवा अगदी रात्री उशिरा भेटला…
“Hello काकू, कशी आहेस ?
” मी ठीक.. पण तुला मात्र पटकन ओळखले नाही. .. नव्या रुपात..”
” हो.. सध्या एका संस्थेशी जोडला गेलो आहे… केस दर सहा महिन्यांनी कॅन्सर रुग्णांना दान करतो.. ..अजून खूप कमावता नसल्याने आर्थिक लगेच शक्य नाही….. तर जे शक्य आहे तेवढे तरी !!
( २ )
परवा मी बस मधून गावात निघाले होते…
बसला तुफान गर्दी होती… अगदीं खचाखच भरलेल्या बसमध्ये नीट उभेही राहता येत नव्हते…
अशातच एक आजोबा S.N.D.T. ला चढले… साहजिकच ते उभेच होते….दहाच मिनिटे झाली आणि एक बाई उठल्या… एका College युवकापाशी गेल्या आणि जोरात भांडायला लागल्या..
“काय रे, काही समजते का…हे आजोबा उभे आहेत आणि तू आरामात बसला आहेस?… कॉलेज, घरात हेच शिकवतात का तुला ? तुला नाही का उभे राहता येत? … झालं…सगळी बस त्याच्यावर तुटून पडली…बसच्या वेगापेक्षा लोकांच्या फटकाऱ्याचा वेग खूप जास्त होता!
तो बिचारा निमूटपणे उभा राहिला
थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला व जाता जाता त्या बाईंना म्हणाला, ” काकू , पंधरा दिवसांपूर्वी माझे Appendix चे Operation झालेय… आज माझी महत्वाची परिक्षा होती की जी बुडली असती तर माझे पूर्ण Semester वाया गेले असते… सहज उभारणे शक्य नव्हते म्हणुन बसून होतो!”
एवढे बोलून झरकन उतरुन गेला….
( ३ )
तिच्या आईच्या मते ही पिढीच काहीशी अलिप्त… स्वतः मध्येच गुंग, थोडीशी मतलबी अशीच…
तिचा नवीन नोकरीचा पाहिला पगार हातात आला… आज ती घरी आली ती थिरकात्या पायानेच !!
” मावशी, रविवारी सगळया कामावर सुट्टी सांगा.”
” का ग बयो? काय आहे रविवारी?”
” अहो माझा पाहिला पगार झालाय…. तुम्ही , आई आणि मी मिळून मस्त आख्खा दिवसभर लोणावळा फिरून , धमाल करून येऊ यात माझ्या या यशात तुमच्या दोघींचीही खूप मोठा वाटा आहे!!”
( ४ )
तो पक्का नास्तिक… त्यामूळेच ‘ देवपूजेशी ‘ त्याचा दुरान्वयेही संबध नाही….
ती ३०…३२ वर्षांची तरुण विधवा…एक ३-४ वर्षांचे छोटे बाळ पदरात… रोज एका ठराविक ठिकाणी ‘फुलंविक्रिचा’ धंदा करत असे..
रोज बाजारातून फुलांची खरेदी करणे, आणलेल्या वेगवेगळ्या फुलांचे ढीग, फुलांचे हार, गजरे करणे. सोबतच बाळालाही सांभाळणे या सर्वात गुंतलेली असे….
तिचा रोजचा ‘ One Woman Show ‘ चालू असे…..संध्याकाळी गिऱ्हाईक येत असत.. पण हिची जरा सुकलेली, मरगळलेली, तजेला नसलेली अशी फुले, हार बघून दुसरीकडे जात असत… हिला बरेचदा गिऱ्हाईकांकडून फक्त सहानभूती, चुचकारे मिळत असे… शेवटी तिचा फुलविक्रीचा धंदा हा तिच्या रोजी-रोटीचा प्रश्न होता!
त्या दिवशी तो तिच्या स्टॉलवर आला… उगीचच थोडी फुले विकत घेतली…. जरासा रेंगाळला आणि पिशवीतून एक स्प्रे बॉटल काढून तिला देत म्हणाला ,”मावशी, यातील थोडे थोडे पाणी दर दोन तासांनी फुलांवर, हारांवर मारत जा म्हणजे फुले छान टवटवीत राहतील…. सुकणार नाहीत !!”
आता तिला विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो…
लेखिका : स्मिता कुलकर्णी, पुणे.
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈