☆ – पॅराशूटस्… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एअर कमांडर विशाल एक जेट पायलट होता. एका मिशन मध्ये त्याचं फायटर विमान मिसाईल ने उडवलं गेलं. तत्पूर्वी त्याने पॅराशूट घेऊन उडी मारली आणि बचावला. सर्वांनी त्याचं फारफार कौतुक केलं.
पाच वर्षांनंतर पत्नीसोबत तो एका रेस्टोरन्टमध्ये बसला असताना बाजूच्या टेबलवरील एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुम्ही कॅप्टन विशाल ना? तुम्ही जेट फायटर चालवायचात आणि ते पाडण्यात आले होते.”
“पण हे तुला कसे माहीत?” विशालने त्याला विचारले.
तो मंद स्मित करीत म्हणाला, “मीच तुमचं पॅराशूट पॅक करून विमानात ठेवत असे”.
विशाल आश्चर्य आणि कृतज्ञतेने आ वासून विचारात पडला की जर पॅराशूट नीट उघडलं नसतं तर मी आज इथे नसतो.
त्या रात्री विशाल त्या व्यक्तीच्या विचाराने झोपू शकला नाही.
त्याला आश्चर्य वाटत राहिलं की त्या व्यक्तीला कितीवेळा पाहिलं असेल, पण साधं शुभप्रभात, तू कसा आहेस? एवढं देखील आपण विचारलं नाही. का तर तो स्वतः फायटर पायलट आहे आणि ती व्यक्ती एक साधी सुरक्षा कामगार.
तर मित्रानो, तुमचं पॅराशूट कोण बरं पॅक करतेय?
प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो.
आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूटची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.
सुरक्षा जोपासण्यासाठी आपण या सर्व आधारांची मदत घेत असतो.
काहीवेळा दैनंदिन आव्हानांना सामोरे जाताना आपण काहीतरी महत्वाचं विसरत असतो.
आपण समोरच्याला हॅल्लो, प्लिज, धन्यवाद, त्याच्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी गोष्टींसाठी अभिनंदन, एखादी छानशी कॉम्प्लिमेंट किंवा त्यांच्यासाठी काहीही कारण नसताना काहीतरी चांगलं करावं हे करायचं राहून गेलं असणारच.
आता जरा आठवून पहा, ह्या वर्षभरात कोणी कोणी तुमचं पॅराशूट पॅक केलं ते.
या वर्षभरात ज्यांनी ज्यांनी शब्दांद्वारे, कृतीद्वारे, प्रार्थनेद्वारे माझं पॅराशूट पॅक केलं आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. कुणालाही गृहीत धरू इच्छित नाही.
अगदी मनःपूर्वक प्रेमपूर्वक मी आपणा सर्वांना 2023 च्या संस्मरणीय अखेरीसाठी आणि 2024 च्या सुंदर प्रारंभासाठी शुभेच्छा देतो
☆
कवी : अज्ञात
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जगी हा खास वेड्यांचा…! लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
हजारो वेड्यांना नाना प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्याचं वेड असतं. नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटं, दिग्गज व्यक्तिंच्या सह्या, पुरातन कालीन वस्तू … आणि नाना प्रकारची पुस्तकं सुद्धा! विशेष म्हणजे ही सारी वेडी मंडळी, आपापले संग्रह झपाटल्यासारखे, अतिशय कष्टाने, स्वतः पदरमोड करून, वैयक्तिक पातळीवर करत असतात.
श्री. अंकेगौडा हा कर्नाटकातील असाच एक पुस्तक वेडा माणूस. गरीब शेतकऱ्याच्या घरांत जन्माला आलेला आणि आता सुमारे पासष्ट वर्षे वय असलेला हा माणूस गेली पन्नास वर्षे पुस्तकांचा संग्रह करतोय. आज मितीला त्याच्या संग्रही किती पुस्तक असावीत असा अंदाज आहे? हजार? पाच हजार? दहा हजार? …. नाही !! आपल्याला अंदाज लावणं कठीण आहे पण आज घडीला त्यांच्या संग्रहामध्ये पंधरा लाखाहून जास्त पुस्तके आहेत !!
आमचा आपला एक व्यावहारिक विचार —
अंकेगौडा यांच्या जिद्दीला, चिकाटीला आणि एवढ्या मोठ्या अवाढव्य कामाला त्रिवार सलाम !!
पण …
हे एवढं मोठं शिवधनुष्य पेलणं आता त्यांनाही खूप कठीण होत चाललं आहे. एवढी पुस्तकं ठेवण्यासाठी लागणारी जागा, कपाटं, स्टॅन्डस् , बुकशेल्फ यांची सोय नसल्यामुळे ढिगावारी पुस्तकं नुसती अस्ताव्यस्त पडली आहेत. त्यांची कुठे कसली यादी नाही, वर्गवारी केलेली नाही, अनुक्रम नाही. वाळवी, कसर हे पुस्तकांचे मोठे शत्रू. त्यांच्या बंदोबस्ताचं काय? एकेकाळी रोज शंभर-दीडशे माणसं संग्रहालय पहायला यायची, आता दोन-तीन माणसं सुद्धा येत नाहीत. कारण हवं असलेलं पुस्तक शोधणार कुठे आणि कसं? समुद्रकाठच्या वाळूतून आपल्याला हवा असलेला कण शोधणार कसा?
आणि त्यामुळे भला मोठा पुस्तक संग्रह, एवढंच कौतुक शिल्लक राहतं ! व्यावहारिक उपयोग काहीच नाही !!
लेखक : अज्ञात
संग्राहक – सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.
आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..
मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.
कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..
” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..
शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..
आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..
सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..
त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून नाकाच्या आत गाठ मारलेली..
याचं नाव सुंकलं..
परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…
मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..
दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…
” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ”
नि ” टिमक्याची चोली बाई ” गाण्यावर मनमुराद नाचायचं..
” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ” अशा गुजराती मारवाडी नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची नि सुरेखशा साखळीनं ही नथनी केसाशी नाहीतर कानातल्याशी संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!
या नथन्या त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत निपचित पडून रहायच्या!
आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं नि महाविद्यालयाचं शहर लागलं..
या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…
कधी रेखाची नाहीतर राखीची नाकातली रिंग तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी मनातल्या मोरपिसाला साद घालायची..
अशी चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..
भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की जीव शांत शांत व्हायचा..
त्या चमकीचा प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..
एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..
चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..
नंतरचे अनेक दिवस औषधाचे नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू डोस गपगुमान गिळावे लागले..
चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…
आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …
कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..
त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..
घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की तिचं अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य स्वर्गीय भासायचं…!!
आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …
नि आपण कधीही नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..
लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..
उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..
” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा मान आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल “
आता ही नथ दागिना राहिली नव्हती..
ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …
आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!
मी अचानक मोठी झाले..
लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!
आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!
सुंदर दिसावं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…
फक्त महाराष्ट्रातच नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…
केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..
मंगळसुत्राखालोखाल सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा मोठा मान…
तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..
या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..
नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..
महिलांच्या शरीराची डावी बाजू ही प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..
म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..
यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..
खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…
मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…
पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..
इतरवेळी जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.
नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी
अगदी उंची साडीवरही दिसू लागलीय…!!
असतो एकेकाचा काळ …
कालाय तस्मै नम: !!
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…” – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.
हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं.
मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो, त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे.
त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात, ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचं राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायचं . की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेन !
ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत.
त्यात कुणी लिहिलेलं असायचं की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन.
– तर कुणी लिहायचं …. माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे.
– कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार
– एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल, तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन.
– निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही.
– एका सासूने लिहिलं होत…. लेक आणि सुनेत मी थोडं डावं-उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !
अशी अनेकांनी त्यांची- त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली.
*
आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटरमध्ये नेत आणि यशस्वीरीत्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो “उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म” त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल, तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर “टिकमार्क” करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?
*
आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, “जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायचं आहे.”
किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायचं आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे.
*
आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत, जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होतं?”
यावर रुग्ण निरुत्तर होत. मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.
डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे, माहीत नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे, ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा.
आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभवातून सांगतोय.
*
पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय. जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं, पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन-अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या, असं सांगितलं होतं,तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय. योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk) आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास! याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच !
*
आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.
कारण… असं म्हणतात की
जो प्राप्त है-पर्याप्त है
जिसका मन मस्त हैtt
उसके पास समस्त है!
लेखक :डॉ. धनंजय देशपांडे
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही दोघं नुकतेच अमेरिकेला राहायला गेलो होतो. तीन-चार महिने झाले असतील. नवरा कामात व्यस्त होता, आठवड्यातून तीन-चार दिवस त्याचा प्रवास चालायचा. घरी मी एकटीच. मला अजून अमेरिका म्हणावी तितकी झेपत नव्हती. सारखी भारताची, घरच्या लोकांची आठवण यायची. त्यात अजून तिथे फार ओळखीही झाल्या नव्हत्या. त्यामुळे एकटेपणा खूप जाणवायचा. त्यात तो सरत्या नोव्हेंबरचा काळ होता. शहरातले सगळे रस्ते, मॉल्स, घरे ख्रिसमसच्या रोषणाईने सजले होते. मला मात्र दिवाळी ह्या वर्षी भारतात साजरी नाही करता आली याचं दुःख होतं आणि त्यामुळे ती रोषणाई बघून अजूनच खिन्न वाटत होतं.
त्यातच आम्ही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाणार होतो. ती सुट्टी ऐन वेळी रद्द करावी लागली होती. कारण नवऱ्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. त्यावरून आमची माफक वादावादीही झाली होती आदल्या दिवशी आणि नवरा सकाळच्या फ्लाईटने त्याच्या प्रोजेक्टच्या ठिकाणी गेलाही होता. घरी मी एकटीच होते, त्यामुळे स्व-अनुकंपेला बऱ्यापैकी वावही होता. सबंध दिवस घरात बसून स्वतःची कीव करून थोडंफार रडूनबिडून झाल्यावर त्याचाही कंटाळा येऊन मी घराबाहेर पडले. तशी माझी जायची ठिकाणं तोपर्यंत दोन-तीनच होती. घराजवळची पब्लिक लायब्ररी, एक मॉल आणि कोपऱ्यावरचं कॉफी शॉप!
मॉलमध्ये जायचं ठरवून तिथे पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथे सगळं उत्सवी वातावरण होतं. मोठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे रोषणाई, ठिकठिकाणी सेल आणि ऑफर्स. बराच वेळ मी निरुद्देश्य भटकले. पण माझं एकटेपण राहून राहून अंगावर येत होतं. शेवटी चालून चालून पाय दुखायला लागले, तेव्हा मी एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शिरले. मला बऱ्याच दिवसांपासून बूट्स घ्यायचे होते, म्हणून बायकांच्या फुटवेअरच्या सेक्शनमध्ये गेले. तिथे एक सत्तरेक वर्षांची कृष्णवर्णीय बाई सेल्सवूमन होती. त्यावेळेला मी एकटीच कस्टमर होते. मला काय हवं ते विचारून ती चपळाईने तिथल्या स्टेप लॅडरवर चढून मला हवे तसे बूट दाखवत होती.
आपल्याला सहसा भारतात इतक्या वयस्कर व्यक्तीकडून सेवा घ्यायची सवय नसते. त्यामुळे तिची लगबग पाहून मला थोडं कानकोंडं होत होतं. बूट दाखवता दाखवता आमचं जुजबी बोलणं सुरु झालं. पॅट्रिस नाव होतं तिचं. ’डू यू नो, आय ऍम सेवेंटी टू?’ ती माझ्या पायात बूट चढवता चढवता म्हणाली. मला अजूनच अवघडल्यासारखं झालं. मी तिला सांगितलं, मीच ट्राय करते. बुटांच्या सात-आठ वेगवेगळ्या जोडया तिने आणल्या होत्या आणि गुडघ्यांवर बसून ती मला ते बूट ट्राय करायला मदत करत होती. उठ-बस करताना तिचे गुडघे दुखत आहेत, हे मला जाणवत होतं आणि म्हणून तिला जास्त त्रास नको म्हणून तिला थँक्स म्हणून मी जायला उठले. तर ती पटकन म्हणाली की तिने विकलेल्या दर जोडीमागे तिला कमीशन मिळतं. ‘यू शुड बाय अ पेअर,’ पॅट म्हणाली.
मी एक बुटांची जोडी पसंत केली. ती पॅक करता करता पॅट बरंच काही बोलत होती. कदाचित माझा एकटेपणा तिला जाणवला होता म्हणून असेल, कदाचित तिलाही बोलायचं होतं म्हणून असेल, पण तिने मला तिची कहाणी सांगितली. तिची पाच मुलं होती, त्यातली शेवटची दोन तिच्याबरोबर रहात होती. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी तिशीची आज मुलगा पस्तिशीचा. दोघेही काही करत नव्हते आणि ही सत्तरीची आई त्यांना सांभाळण्यासाठी दिवसातून दोन-दोन नोकऱ्या करत होती, सकाळी नऊ ते चार एका डॉक्टरच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून आणि संध्याकाळी सहा ते नऊ ह्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्सवूमन म्हणून, आणि सुट्टीच्या दिवशी बेबीसीटिंग! हे सर्व बहात्तर वर्षाच्या वयात!
‘साऊंडस सो डिप्रेसिंग!’ तिचं बोलणं ऐकण्याच्या नादात अनवधानाने मी बोलून गेले. पॅट हसली,म्हणाली, ‘हन, आय डोन्ट हॅव दी बँडविडथ टू बी डिप्रेसड, आय हॅव माय हॅंड्स फुल’!
मला एकदम चटका बसल्यासारखं झालं. सगळं व्यवस्थित असून फक्त एक विकेंडची सुट्टी मनासारखी नाही झाली आणि अमेरिकेत एकटेपणा वाटतोय हे स्वतःचं इवलंसं दुःख कुरवाळत मी स्वतःची कीव करत पूर्ण सकाळ घालवली होती आणि ही बहात्तर वर्षांची बाई मला सांगत होती की निराश होऊन रडत बसायला माझ्याकडे वेळच नाहीये!
पॅटचं ते वाक्य मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आजही कधी छोट्या छोट्या कारणांवरून आपण फार दुःखी वगैरे आहोत असं वाटायला लागतं, तेव्हा मी प्रयत्नपूर्वक पॅटचं हे वाक्य आठवते. आपोआपच चित्त ताळ्यावर येतं.
स्व-अनुकंपा आणि स्वतःचे खरे-खोटे दुःख कुरवाळत बसणे हे कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाने केलेलं आहे. नव्हे, ते अगदी नैसर्गिक आहे. कारण प्रत्येकासाठी त्याच्या किंवा तिच्या अडचणी मोठ्याच असतात आणि त्या त्या वेळेला हतबल वाटू शकतं. ‘हे माझ्याच बाबतीत का होतंय’ असे प्रश्नही पडू शकतात, पण हाताशी असलेला रिकामा वेळ जितका जास्त तितकं ह्या स्व-अनुकंपेमध्ये स्वतःला गुरफटून घेणं जास्त सोपं होतं. जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागणाऱ्या, सतत कामात व्यस्त असणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला वेळच नसतो.
पूर्वी हा स्व-अनुकंपेचा सोहळा खासगी तरी असायचा. केवळ कुटुंब आणि काही मित्र मैत्रिणी ह्यांच्या समोरच हा कार्यक्रम चालायचा. आता सोशल मीडियामुळे दुःख कुरवाळणे हा एक सार्वजनिक इव्हेंट बनत चाललाय. बऱ्याच लोकांसाठी आणि दुर्दैवाने माझ्या पाहण्यात तरी यात स्त्रियांची संख्या जास्त आहे. ’मला घरात कुणी समजून घेत नाही’ इथपासून ते ’सासू/सून/नवरा/मुलं/बॉस ऐकत नाही’ इथपर्यंतची सर्व लहान मोठी, खरी-खोटी दुःखे फेसबुकच्या किंवा इन्स्टाच्या चव्हाट्यावर उगाळली जातात.
अशा पोस्टसवर तोंडदेखल्या, खोटया सहानुभूतीचा रतीब घालणारा एक प्रेक्षकवर्ग आहेच, जो ह्या स्व-अनुकंपेच्या रोपट्याला सतत खतपाणी घालून ते जोपासतो आणि मग त्या दुःख कुरवाळत बसण्याची सुद्धा सवय लागते माणसांना. मग कुणी सोल्यूशन दिलेलेदेखील आवडत नाही. कारण मुळात पडलेले प्रश्न सोडवायचेच नसतात, फक्त त्यांचं भांडवल करत मनावरचं दुःखाचं गळू तसंच ठसठसतं ठेवायचं असतं काही लोकांना.
मी ह्या ट्रॅप मध्ये शिरतेय, अशी शंका जरी मला आली तरी मी पॅटचं हे वाक्य मनाशी परत परत आठवते आणि स्वतःला कसल्या ना कसल्या कामात गुंतवून ठेवते. अगदी काही नाही तर दीड-दोन तास चालायला तरी जाते. आपली बरीचशी दैनंदिन आयुष्यातली दुःखं किंवा अडचणी ह्या फुग्यासारख्या असतात, आपण जितकी हवा देऊ तितकी ती फुगत जातात आणि आपण कामाची टाचणी लावली की विरून पण जातात!
लेखिका : सौ. शेफाली वैद्य
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकाळी सातच्या बॅचला सगळी young generationची गर्दी आणि दहाच्या बॅचला सिनियर सिटीझन मंडळी.या बॅचला येणा-या सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या.योगासने कमी आणि गप्पा टप्पा जास्त.
प्रत्येकीच्या काही ना काही शारीरिक तक्रारी. तरीही मानसीताई सगळ्यांना छान सांभाळून घेऊन प्रत्येकीकडून योगासने करवून घ्यायच्या.आज थंडी जरा जास्तच होती.त्यामुळे ब-याच जणींनी दांडी मारली.
नेहमीच्या सात आठ जणी हजर होत्या.
मानसी ताईंचे घर खालीच होते.
आज सगळ्यांना गरमागरम चहा आणि पॅटीस ची मेजवानी मिळाली.आज गप्पांचा मूड होता.काणे काकू थोड्या अबोल वाटल्या.
“का हो काकू,आज अगदी गप्प गप्प?”मी विचारले.काणे काकू म्हणाल्या, “काय सांगू ?काल घरात पार्टी होती.रात्री जेवायला, झोपायला उशीर झाला.यजमानांना आताशा कलकल सहन होत नाही.तरीही मुलाने आणि सुनेने,आम्हाला कमीतकमी त्रास होईल याची खबरदारी घेतली होती. सगळेच जण बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. संजय स्मिताने आम्हाला आधीच सांगितले होते,’आई बाबा,तुमची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल’.यांचा स्वभाव तिरसट.मी इतकी वर्षे सहन केले.सगळ्या मित्रांसमोर यांनी संजयला विचारले, ‘तुमचा थिल्लरपणा कधी संपणार आहे?मला आवाजाचा त्रास होतोय.’
संजयने शांतपणे सांगितले,’बाबा,अजून एक तासभर.अकराच्या आत सगळे आपापल्या घरी जातील.’ यांची आत धुसफूस सुरूच होती.
मी लक्षच दिले नाही. मला माझ्या मैत्रिणीचे वाक्य आठवले. ती म्हणायची, ‘हे बघ असे प्रसंग येत राहतातच. आपण तोंडाला ‘फॉल-पिको’ करायचे. वादाचा प्रश्नच येत नाही.’
किती छान सांगितले तिने. मला तो शब्द फारच आवडला.
तिच्याही घरी हाच प्रकार आहे. सून चांगली आहे, सास-याचे त-हेवाईक वागणे सहन करते.
कधी तरी शब्दाला शब्द वाढतोच. पण ‘फॉल पिको’मुळे, सारं काही आलबेल आहे.”
काणे काकूंनी सांगिलेला फॉल-पिकोचा मंत्र सगळ्यांना जाम आवडला.
मानसी ताई म्हणाल्या, “हे बघा, घरोघरी कमी अधिक प्रमाणात हे असं असतेच,गोष्टी जेवढ्या ताणल्या जातील तेवढे ताण तणाव वाढत जातात.करोना काळापासून सर्व नोकरदार मंडळी चोवीस तास घरात आहेत,यापूर्वी याची सवय नव्हती.करोनाने प्रत्येकाला माणूसकी आणि नात्यांची किंमत दाखवून दिलीय.
तुझं माझं, हेवे दावे या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा अर्थ चांगलाच समजलाय आपल्याला.तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागा, प्रेम-माया यांची देवाण घेवाण एका रात्रीत होत नसते. तरूण पिढीला मानसिक ताण तणाव, त्यांची टार्गेटस्, बॉस लोकांची मर्जी, किंवा हाताखालील सहकाऱ्यांना, जिभेवर साखर ठेवून संभाळून घेणे इ. ब-याच गोष्टींना सामोरे जावे लागते. तुम्ही सगळ्या बॅचला येता. आपली सुख-दु:ख एकमेकींबरोबर शेअर करता,तासभर नवीन ऊर्जा घेऊन घरी जाता.
घरी देखील असंच खेळीमेळीचे वातावरण ठेवा.या आधीच्या बॅचच्या सगळ्यांना मी नेहमी हेच सांगते.त्यातल्या काही जणींना सुना/जावई येऊ घातल्या आहेत. पेराल तसे उगवते,म्हणतात ते अगदी बरोबर आहे.जीभेवर साखर ठेवा.योग्य वेळी संसारातून अलिप्त व्हा,पण वेळेला त्यांना समज,सल्ला अवश्य द्या.
आणि क्षमाचा फॉल-पिकोचा मंत्र, मला पण खूप आवडला.
तेव्हा काणे काकू,घरी गेल्यावर हा मंत्र जपा.” सगळ्यांनी मानसी ताईंच्या बोलण्याला खळखळून हसत दाद दिली.
लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रविवारची आळसावलेली सकाळ. सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला.
“तुमचं होऊ द्या. मी नंतर वाचतो.” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले.
मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेलं सिनेमे. सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे, सातवीपर्यन्त हा सिलसिला चालू होता परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळं झालं. वाद नव्हता, पण संवाद नक्कीच कमी झाला. आतातर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.
मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो.
शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं, की आज २ ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.
“फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय.” नाना फक्त हसले.
“संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी कार्यक्रमाला तू आणि रिया जा.” नाश्ता करताना मी म्हणालो, तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.
“राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो.
“मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवसंय.”
आठशे चाळीस व्हॉल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो.
“काय रे, काही पाहिजे का?”
“वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा!” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली, तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मीसुद्धा खूप भावुक झालो.
“दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो. ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली.
सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी? प्रचंड गिल्ट आला.
“आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना.”
“हो, स्वयंपाक करून जाते.”
“नको.”
“का?”
“आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!”
“आम्हांला !!” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या.
“नक्कीच! पण नंतर आज दोघंच जातो.प्लीज!” दोघींनी समजुतीने घेतलं.
“उगीच खर्च कशाला? बाहेर नको.” सवयीने नानांनी नकार दिला. पण मी हट्ट सोडला नाही.
संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल, याची कल्पना आली.
पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता. आता मी.
काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा.
हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्याचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती.
“टेंशन घेऊ नका.रिलॅक्स.”
“फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले.
“किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय.”
“तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यानंतर आजच..”
“बापरे!एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट!” नाना काहीच बोलले नाहीत.
“नाना, सॉरी!माफ करा.”
“अरे, होतं असं आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक!”
“वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”
“अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”
“आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात . स्वतःवर बंधनं घालून घेतलीत आणि तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये मात्र तुम्ही नव्हताच.”
“हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना
“तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं. ” मी हात जोडले. एकदम आवाज कापरा झाला. तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण शांततेचे होते.
“उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकांचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतंच.”
“खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.
“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली.
“यापुढे काळजी घेईन”
“अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”
“तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं.”
नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच.बॅकलॉग भरायचा होता. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.
“काय झालं? हसताय का?”
“इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही.” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं.
“खरं सांगू? बोलायची खूप इच्छा व्हायची. पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते.”
“पर्याय नाही”
“मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचं,याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही, तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”
“नक्कीच.”
“आजचा दिवस कायम लक्षात राहील.”
“माझ्याही.”
“सर्वात महत्त्वाचं, आज माझा उपास नाहीये. ” नाना मिष्किलपणे म्हणाले.
बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती.
“आयला, हो की….” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले. तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली.
“चायनीज खाऊ,” नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळे भरून आले.
बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच दोघांची नजर आभाळाकडे गेली.
घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व “बाप”माणसांना समर्पित…
एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता.
दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोंबामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या- फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबात काही फराक दिसत नव्हता.
तो माणूस आता विचार करू लागला होता की , हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते, तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोंबाकडे गेला. पाहतो तर काय, त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता आशेने त्या कोंबाला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबाने अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.
असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेव्हा त्या आंब्या- फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली, तेव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.
तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल, तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येऊन कितीही पुढे गेले, तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करावा. जेव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते, तेव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.
ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल?
📍बोध :
इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.
लेखक : अज्ञात
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आमच्या संयुक्त कौटुंबिक घरात आम्ही ५ ते ९५ वयोगटातील १४ जण राहायचो.
माझ्या आईचा रोज वावर असलेली दोन्ही घरे आता निर्वासित आहेत आणि आता त्यांचा व त्यांच्या बागांचा निसर्गाने ताबा घेतलेला मी पाहतो. जांभूळ, शेवगा, काही अशोक, कडुनिंब आणि पिंपळ टिकून आहेत.
परंतु आता असंख्य रंगांची मनमोहक फुलं गेली. एकूणच सर्व सौंदर्य क्षणिक आणि नाजूक आहे आणि एन्ट्रॉपीचा नियम शक्तिशाली आहे, हेच सत्य.
माझ्या आईच्या हातातून रोज दाणे टिपणाऱ्या मोराच्या कुटुंबाचे काय झाले असेल, हा मला पडलेला एक अगम्य प्रश्न आहे. बुलबुल, चिमण्या, पोपट, स्पॉट फ्लायकॅचर, कोकिळा, माकडांची एक मोठी टोळी जी महिन्यातून एकदातरी त्या ठिकाणाचा विध्वंस करायची – हे सगळे कुठे आहेत?
माणसे निघून गेली की वास्तू एक घर बनते. सुरुवातीला मला वास्तू विकाविशी वाटली नाही. पण आता तेथे जावेसेदेखील वाटत नाही. एक तर काळ आमच्या चौदापैकी दहा जणांना घेऊन गेला आहे.
मी आमच्या वास्तुच्या आजूबाजूला फिरतो आणि शेजारील वास्तू बघतो. जवळपास माझ्या घरासारखे चित्र मला दिसते. कधी एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांचे नशीब आता फिरले आहे, बदलले आहे किंवा ते घरच आता पडलेले आहे.
आपण घरे बांधण्यासाठी एवढे कष्ट का घेतो?
बऱ्याचदा, आपल्या मुलांना त्याची गरज भासणार नाही किंवा त्याहूनही वाईट, ते त्यासाठी भांडणे करतील.
हा कोणता मानवी मूर्खपणा आहे, की या अनिश्चित कार्यकाळ असलेल्या भाडेतत्त्वावरील आपल्या जीवनासाठी आपण एक कायमस्वरूपी मालकी स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो?
हे आयुष्य आपल्याला मिळाले आहे. त्याच्या कालखंडाबद्दल आपल्याला काहीच अधिकार नाही. त्याच्या अटी- शर्तीवर आपले नियंत्रण शक्य नाही आणि त्याविरुद्ध कोठेही दाद मागणे शक्य नाही. त्यावर अपील नाही त्यासाठी.कुठले न्यायालयदेखील नाही.
एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व विश्व आणि मासिक हफ्ते भरून उभ्या केलेल्या वास्तू, एकतर उद्ध्वस्त होतील किंवा त्यासाठी भांडण केली जातील किंवा त्या विकल्या जातील किंवा नष्ट होतील.
प्रत्येक वेळी मी एखादा फॉर्म भरतो, तेव्हा ‘कायम पत्ता’ विचारणारा रकाना भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाबद्दल हसू येते.
झेनची एक कथा आहे, एकदा एक वृद्ध भिक्षू एका राजवाड्यात गेला आणि रक्षकाला विचारले की तो या विश्रांती गृहामध्ये एक रात्र घालवू शकतो का? रक्षकांनी त्यावर त्याला खडसावले, “काय विश्रांती गृह?तुला हा राजवाडा आहे, हे दिसत नाही का?”. साधू म्हणाला, “मी काही दशकांपूर्वी इथे आलो. तिथे कोणीतरी राज्य करीत होते. काही वर्षांनी, त्याच्याकडून त्याचे राज्य कोणीतरी घेतले, नंतर कोणीतरी. कोणतीही जागा जिथे रहिवासी सतत बदलत राहतो, ती जागा एक विश्रांती गृह आहे.”
जॉर्ज कार्लिन म्हणतात, “घर हे फक्त एक ठिकाण आहे जिथे बाहेर जाताना तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि परत येताना अधिक सामग्री घेऊन येता.”
जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात अनेक रहिवासी सदस्य असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घरटे रिकामे होते, तेव्हा आपल्याला सहवास हवा असतो.
आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जगणे सोडून देणाऱ्या आणि शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून समजलेल्या विश्रांती गृहामधून निघून जाणाऱ्या माणसांवर पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील.
मानवी इच्छेचा वृत्तीचा खरा फोलपणा!
प्रस्तुती: सौ. राधा पै.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈