☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.
दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
‘साहेब, जरा काम होतं.’
‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’
‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’
‘अरे व्वा ! या. आत या.’
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी ‘नको नको’ म्हणाला. आग्रह केला, तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
‘किती मार्क मिळाले मुलाला ?’
‘बासट टक्के.’
‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूश दिसत होता.
‘साहेब, मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’
‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,
‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हां, काय चुकीचं बोललो असेन तर.
माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा,
‘आनंद एकट्याने खाऊ
नको सगल्य्यांना वाट !’
हे नुसते पेढे नाय साहेब
हा माझा आनंद आहे !’
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय ?’
‘विशाल.’ बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं – ‘प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात राहा – तुझ्या बाबांसारखा !’
‘शिवराम हे घ्या.’
‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्टं बोल्लात, यात आलं सगलं.’
‘हे विशालसाठी आहे ! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.’
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
‘चहा वगैरे घेणार का ?’
‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल ? मला वाचता येत नाही. म्हनून…’
‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.
माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद, पंच्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.
आपल्या मुलाला / मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसूया. कारण आपण सगळेच असे झालोय- आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !
माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे. मस्त चिंब भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?
माणूस जन्म घेतो, त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं.
आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
वयाच्या पंचेचाळीशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे…. emotional independance… म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे…
प्रेम द्यावं, care घ्यावी… पण मला कुणी प्रेम द्या, तर मी खूश, मला कुणी काही बोलाल तर मी रडणार, मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटं feel करणार, कुणी नीट बोललं नाही, की माझं मन वरखाली होणार आणि मी विचार करत बसणार की काय झालं असेल?… हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे…हे थांबवायला हवं…
आपल्या खूश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो … तो आपण लावतो.. बेसिकली, जग इकडचं तिकडे होवो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला manange करत राहणार… हा एक निश्चय असतो, तो करायला शिकलं पाहिजे….
याने काय होईल?
1)लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.
2) गॉसिप पासून आपण लांब राहतो.
3) आपल्याला खूश करण्यासाठी wrong कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो.
4) कुणी कसंही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते.
5) मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते.
6) आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय, हे आपण मनातून ठरवतो.
7) यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात, स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात.
8) कुणी कसही वागो, ती जबाबदारी त्यांची असते. त्यापायी आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो.
9)मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त active आणि creative होतो, आनंदी राहून काम करतो.
10)एकटे आलो, एकटेच जाणार आहोत, या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो…
कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही detachment जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो(mostly).मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं. त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात ढवळाढवळ कमी करावी….
सगळ्यात महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं.
यासाठी emotionally independent असणं हे फायद्याचं ठरतं…. देवाघरी जाण्याआधी मन साफ करत जावं. ती process या वयात सुरू करावी… आपण स्वतःला माफ करावं, इतरांना माफ करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं…. मदतीला तयार राहावं मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदृढ बनवावं मन आणि शरीराने…
याचा फायदा हा की चाळीशीपर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका… किमान त्या नंतर आपण करणार नाही आणि एक stable शांत आणि समाधानी life जगण्यात एक पाऊल पुढे जाईल.
लेखिका :श्रीमती मृदुल मृदू
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
बरेच ज्येष्ठ नागरिक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!
स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना त्यांनी कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक- सिनेमा सुद्धा वर्षातून दोन- तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असतील तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.
परिणाम काय झाले? तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले, जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे. कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी, सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्यवसाय नसून धंदा या दृष्टीने पाहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हींमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत. इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही. मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र त्यांना इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक- दीड महिन्याची रजा मिळते. हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणातदेखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस- पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.
हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.
नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काहीही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजेनुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले , कमी पडत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. आपण गरीब आहोत, की मध्यमवर्गीय, हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कारने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला- परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला.आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे, अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहिक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!
वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये, असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.
ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे,तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे.
आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे, q की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा.
जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषपणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून.पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहिलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!
साठ- पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा. समजा, तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस- पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल.पुरे झाले आता इतरांसाठी जगणे. “आता आपले काय राहिलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबूनराहत काढावी लागतील, हे लक्षात ठेवा.
दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!
लेखक :अज्ञात
प्रस्तुती :सौ.शशी नाडकर्णी – नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वंगण…” – लेखिका: श्रीमती मनस्वी समीक्षा ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆
सकाळच्या गडबडीत नेमकी ट्राँली बाहेर ओढताना अडकली.
धड ना आत धड ना बाहेर.
वैतागच!
नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले!
आतल्याआत चडफड नुसती. आता सुतार बोलवावा लागणार.
एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार. नाहीतर बजेट वाढवून
या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार. ‘आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय. माझी इकडे कामं आणि तिकडं कामं… ‘ सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.
जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने.
लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर. सरकेल. तात्पुरते तरी निभावेल.
चांगली आयडिया! मी पटकन तेलाचं बोट फिरवलं.
दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली. कसलं भारी काम झालं एकदम!
मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हटलं, ” बरं झालं बाई वेळेत आलीस. नाहीतर
चहा पावडर विकत आणावी लागली असती. “
ती हसली, “वंगण लागतंय, ताई. थेंबभर पुरतं. पण लागतं कधीमधी. ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात!”
खरंच. वंगण लागतं!
फक्त मशीन, वस्तूंनाच नाही, तर माणसालाही.
त्याच्या देहाइतकंच मनालाही. अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.
चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा-भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं!
की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येउन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पुर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.
लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची.
प्यायचं म्हणजे प्यायचं.
कितीही आदळाआपट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट- आतड्याचं ते वंगणच आहे. महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं. आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे.
कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुधलीभर कोमट तेल शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला.
रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची. शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.
खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं.
आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.
जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण, गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.
हा (स्व)भावच आहे वंगणाचा!
क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळुवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याच्याशी शांतपणे बोलणं, हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.
वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं.
जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल.
आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होउन जातं!त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे आणि प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे.
निर्जीव मशीनसामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं तिथं तुमच्याआमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे. त्याचं जतन केलंच पाहिजे.
तरच जगणं लयीत, सुसह्य होत राहील! हो ना?
लेखिका : श्रीमती मनस्वी समीक्षा
प्रस्तुती :श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “स्वप्न जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
साल 2004.माझे पती योगेश.नोकरी निमित्त इंग्लडमध्ये रहात असताना मीही काही महिने त्याच्यासोबत तिथे होते. माझे वय तेव्हा साधारण 25 च्या आसपास असावे. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. पॅटचा जोडीदार एरिक आणि अजून एक इंग्रज जोडी असे आम्ही सहाजण या छोट्याशा पार्टीसाठी एकत्र आलो होतो
टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारलं, “तू काय काम करतोस ?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणलं . तो म्हणाला, “मी स्टेशनवर झेंडा दाखवतो.” मी आणि योगेश नि:शब्द. कारण पॅट योगेशची उच्चपदस्थ अधिकारी.
माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा मला शांत राहू देईना. मी पुढे परत विचारले, “सुरवातीपासून तिथेच आहेस का?” योगेश थोडा अस्वस्थ झाला आणि त्याने माझ्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. मी थोडं दुर्लक्ष केलं. तो qम्हणाला, “Nope, चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत मीही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अधिकारी होतो. 20 ते 40 या वीस वर्षात खूप काम केलं. प्रचंड पैसे साठवले. फिक्स केले. आणि आता.. आता मी माझं जुनं स्वप्न जगतोय.” “स्वप्न म्हणजे?” मी विचारलं.
“मी लहानपणी जेव्हा जेव्हा माझ्या माॅमबरोबर स्टेशनवर जायचो,तेव्हा मला हा सिग्नलमॅन खूप भुरळ घालायचा. वाटायचं,किती लकी आहे हा! अख्खी ट्रेन थांबवू शकतो. आणि त्याच्या हातातले ते दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग जसजसा मोठा होत गेलो, तसं हा सिग्नलमॅन मागे राहिला. मीही चारचौघांसारखा खूप शिकलो. एक्झिकेटिव्ह पोस्टवर आलो आणि रुटीनमधे अडकलो. पण..
माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले. आता या बिग मॅन एरिकने स्मॉल किड एरीकचे स्वप्न पूर्ण करायचं . आणि दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो. ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे.”
एरीक मस्त छोट्या एरीकसारखा हसला. आणि मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.पार्टी संपली.
हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देऊन गेला. आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात, काही ना काही देऊन जातात.पॅटने त्यादिवशी.. चाळीशीतही कसं मस्त तरुण आयुष्य जगायचं, आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत कसं जगायचं हे शिकवलं. ही जोडी विलक्षण आवडली मला.
मी आणि योगेश घरी आलो तेव्हा आम्ही दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो.
भूतकाळात मागे टाकलेले, हरवलेले, विसरलेले आपापले हिरवे, लाल झेंडे आठवले. माझी डायरीत राहिलेली कविता, अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणं, योगेशची एखादे वाद्य शिकण्याची अपूर्ण इच्छा, असं……. बरंच काही…
मीही माझ्या चाळीसाव्या वाढदिवसाला आवडता झेंडा हातात घेतलाय. कवितेचा,गाण्याचा, जगण्याचा.
आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला.
1.पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी.
2.महत्त्वाकांक्षा, पैसा यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी.
3.चाळीशीनंतर आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी.
मित्रांनो,एरिकने जे चाळीशीत केलं,ते आपण किमान साठीत करू शकणार नाही का?वयाचा टप्पा कोणताही असो. स्वतःसाठी जगणं कधीपासून सुरु करायचं, याची एक क्रॉस लाईन आपण ठरवून घ्यायलाच हवी. अगदी चाळीशीमध्ये शक्य नसलं तरी, किमान पन्नाशीनंतरच आयुष्य आपण आपल्या स्वतःसाठी जगायला हवं.
आपण आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल – अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक धावत असतात. पन्नाशी , साठी , सत्तरी गाठली, तरीही त्यांचं धावणं कमी होत नाही.वयानुसार शरीराला, मनाला, बुद्धीला, विश्रांती दिली नाही, तर एक दिवस धावता धावताच आपण जगाचा निरोप घेणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
मित्रांनो,जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोवरच शोधायला हवा आपण आपला आवडता झेंडा!
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील, हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.
अशीच एक सिरीयल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून, शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती.
मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यातपण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेतसुद्धा सुरू असेल.
तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली, पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए, तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस. तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही.”
यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही. कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं.
आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते. मुलांनी भरलेलं घर हे पसारायुक्तच असणार. चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला. पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहाससुद्धा नव्हता. त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा.”
पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.
का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?
जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळीसुद्धा तरतरीत आणि केससुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्याऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात.
ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे.मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही. चित्रातल्यासारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं.
स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की पंचविसावा. नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?.
तब्येत सांभाळावी हे ठीक, पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक, पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे, हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात. टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्या हाय हील कशासाठी. टाच महत्वाची आहे की फोटो?
मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?
ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडियाला नेमके का आणि कधी दिले?
एक माणूस दुसर्या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?
करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम. होऊ देत घराचं गोकुळ. अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्याशी. मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा. सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈