मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.

रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.

परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले, “आजची वेळ संपली आहे, उद्या या.”

मी त्याला विनंती केली,  “आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.”

क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला, याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.”

माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, “चल. आता उद्या परत येऊ.” मी त्याला थांबवले व म्हणालो, ” मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.”

क्लार्कने आपली पिशवी उचलली व तो चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला. त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.

मी त्याच्या समोरच्या  बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, “तुम्हाला तर खूप काम आहे. तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.”

नंतर मी त्याला म्हणालो, “तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का?” तो “हो” म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.

मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, “तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.” त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवलं.

मी त्याला म्हणालो,

” तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.”

तो मला म्हणाला, “तुम्ही असं कसं  म्हणू शकता ?”

मी म्हणालो, ” तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.

बघा. तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.

बाहेरगावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,’सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा.’

अरे! जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.

आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.

पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची… ती संधी तुम्ही घालवलीत.

मी म्हणालो, “तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.

काय करणार पैशांचं ? तुमच्या रुक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.”

माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, “साहेब, आपण खरं बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?”

मी त्याला शांतपणे सांगितलं, “लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा. बघा. इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.”

तो उठला व म्हणाला, “या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.” त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.

मध्ये कित्येक वर्षे गेली….

अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला…

“साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशांऐवजी नातेसंबंध जोडा. “

“हां हां ,चौधरी साहेब, आठवलं.बोला, कसे आहात तुम्ही?”

खुश होऊन तो म्हणाला, “साहेब, त्यादिवशी आपण निघून गेलात. मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती. तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो,’ मला पण खाऊ घालशील का?’

ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.

साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.

साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.

पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.”

तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.

मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अरुण दातेंनी सांगितलेली एक हृद्य आठवण-

“मला एकदा अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, “मी एक नवीन कोरं गाणं लिहिलं आहे. अजून कागदावरची शाईसुद्धा वाळलेली नाही. मी तुला फोन करण्याच्या पाच मिनिटं आधी देवसाहेबांशी बोललो आणि त्यांना गाणं ऐकवलं. आम्ही दोघांनीही हे ठरवलं आहे की, या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस.”ते गाणं म्हणजे, ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’! हे गाणं गाऊन माझी प्रसिद्धी तर वाढलीच, पण माझ्या चाहत्यांप्रमाणे मलाही हे गाणं बरंच काही शिकवून गेलं.

या गाण्याची एक आठवण फारच हृद्य आहे. तो विलक्षण अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो.

माझ्या नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये मध्यंतरात माझा बालपणीचा मित्र आणि साहित्यिक वसंत पोतदार मला भेटायला आला. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगाही होता. त्याला पुढे करून वसंता मला म्हणाला, ‘‘या मुलाला दोन मिनिटे स्टेजवर काही बोलायचे आहे.’’ त्यावर मी त्याला म्हणालो की, ‘‘मी याला ओळखत नाही आणि तो काय बोलणार आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी परवानगी कशी देऊ?’’ यावर वसंता मला पुन्हा म्हणाला, ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, त्याला जे बोलायचे आहे, ते फार विलक्षण आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावे अशी माझी इच्छा आहे.’’ मी म्हटले, ‘‘ठीक आहे, मी त्याला पाच मिनिटे देतो. कारण रसिक गाणी ऐकायला थांबले आहेत.’’

वसंता त्याला घेऊन स्टेजवर गेला आणि त्या मुलाने बोलणे सुरू केले. ‘‘जवळपास एक ते दीड महिन्यांपूर्वीपर्यंत मी पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेलेला मुलगा होतो. ड्रग्जशिवाय मला कुठलेही आकर्षण उरले नव्हते. अगदी आयुष्याचेसुद्धा! असाच एकदा कासावीस होऊन एके सकाळी मी ड्रग्जच्या शोधात एका पानाच्या दुकानाशी आलो. तेव्हा माझ्या कानावर एका गाण्याचे शब्द पडले. ते संपूर्ण गाणे मी तसेच तेथेच उभे राहून ऐकले आणि ड्रग्ज न घेता किंवा त्याची विचारपूसही न करता तिथून निघालो. एका कॅसेटच्या दुकानाशी येऊन दुकान उघडण्याची वाट बघत राहिलो. दुकान उघडताक्षणी मी पाच मिनिटांपूर्वी ऐकलेल्या गाण्याची कॅसेट विकत घेतली. दिवसभरात तेच गाणे किमान ५० वेळा ऐकले आणि पुढचे १०-१२ दिवस हेच करत राहिलो. त्यानंतर वसंत काकांकडे गेलो आणि त्यांना म्हटले की, ‘कुठल्याही परिस्थितीत या गाण्याचे गायक अरुण दाते साहेबांना मला भेटायचे आहे.’ काका म्हणाले, ‘अजिबात चिंता करू नकोस. पुढल्या महिन्यात अरुणचा कार्यक्रम नाशिकमध्ये आहे. आपण त्याला भेटायला जाऊ.’ ज्या गाण्याने माझे संपूर्ण आयुष्य पालटले आणि मी स्वत:चे माणूसपण शोधायला लागलो, ते गाणे आहे,  ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि त्याकरिताच मी सर्वांसमोर दाते साहेबांचे मुद्दाम आभार मानायला आलो आहे.’’

त्या मुलाचे बोलणे झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशीची सगळ्यात मोठी दाद त्या मुलाच्या बोलण्याला मिळाली होती.

मला वसंताने स्टेजवर बोलावले आणि त्या मुलाने अक्षरश: माझ्या पायावर लोटांगण घातले. मी त्याला उठवून प्रेमाने जवळ घेतले आणि माईक हातात घेऊन रसिकांना आणि त्याला म्हणालो, ‘‘जे श्रेय तू मला देतो आहेस त्याचे खरे हकदार कविवर्य मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव आहेत. मी तर या गाण्याचा फक्त गायक आहे. म्हणून मी मुंबईला गेल्यावर तुझे हे धन्यवाद त्या दोघांपर्यंत नक्की पोहोचवीन.’’

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन डोळे आणि तीस म्हणी… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ दोन डोळे आणि तीस म्हणी… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

दोन डोळे आणि तीस म्हणी … 

पहा माय मराठीची समृद्धी …. 

१.डोळा लागणे (झोप लागणे)

२.डोळा मारणे (इशारा करणे)

३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४.डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

८.डोळे खिळणे (एकटक पाहणे)

९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

१० डोळे दिपणे (थक्क होणे)

११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

१२.डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

१३.डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

१४.डोळे भरून येणे (रडू येणे)

१५.डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

१६.डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

१७.डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

१८.डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

१९.डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

२०.डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

२१.डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

२२.डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

२३.डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

२४.डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

२५.डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

२६.डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

२७.डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

२८.डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

२९.डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

३०.दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आईनं रबरबॅन्डमध्ये रोल केललं कालनिर्णय कपाटातून बाहेर काढलं… देवासमोर ठेऊन त्याला हळद कुंकू वाहत नमस्कार केला आणि दरवर्षीप्रमाणं ते फ्रिजजवळच्या भिंतीवर लटकवलं. आई दरवर्षी हे असं करते… मनात प्रश्न आला… काय आहे या साध्या बारा कागदांमध्ये… म्हणून गेल्या वर्षीचं कालनिर्णय चाळत बसलो…

आईनं गॅस सिलेंडर लावलेली तारीख, बाबांच्या पगाराची तारीख, ताईची पाळी, किराणा भरल्याची तारीख व पैसे, दादाची परिक्षा, बचत गटात पैसे भरलेली तारीख, भिशी, दूध, पेपर व लाईट बिल भरल्याची तारीख, ईएमआयची तारीख, घरकाम करणा-या ताईंचे खाडे यासारख्या ब-याच गोष्टींच्या नोंदी होत्या या कालनिर्णयमध्ये… अगदी मावशीच्या मुलाच्या लग्नतारखेपर्यंत…

डिजीटल कॅलक्युलेटर जरी आकडेमोड करत असलं तरी महिनाभराचं आर्थिक नियोजन याच कागदी कालनिर्णयवर उमटत असतं. गरोदर महिलेच्या चेकींगची तारीख, नंतर तिच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याची तारीख ते अगदी बाळंतीण झाल्याचा दिवसही या कालनिर्णयमध्ये लिहून ठेवला जातो…

दहावी बारावी बोर्डाचं टाईमटेबल शाळेतून मिळाल्यावर ते घरी आल्या आल्या या कालनिर्णयवर नोंदवण्याची आमच्यात प्रथा असे… अगदी शाळेत दांडी ज्या दिवशी मारली ती तारीख ते लायब्ररीतून घेतलेलं पुस्तक परत करण्याची तारीख याची नोंद आर्वजून या कालनिर्णयवर व्हायची. सहकुटूंब बाहेर फिरायला जायचं म्हटलं तरी बिचा-या या कालनिर्णयला एक तास चर्चा ऐकावी लागे…

काही घरांमध्ये आजी आजोबांच्या औषधाच्या वेळाही कालनिर्णयवर पाहायला मिळतात. गंमत म्हणजे नवं कालनिर्णय आल्यावर घरातल्यांचे वाढदिवस कोणत्या वारी आलेत, हे पाहण्याचा एक जणू इव्हेंटच असतो. श्रावण, मार्गशीर्षातले उपवास यांचं एक वेगळंच स्थान या कालनिर्णयवर असतं. का कुणास ठाऊक पण संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत यासारखे दिवस व सण कालनिर्णयमध्ये एकदा पाहूनही मन भरत नाही, ते पुन्हा पुन्हा पाहण्यात एक वेगळंच समाधान वाटतं.

हातात स्मार्टफोन, एक चांगली डायरी घरी असूनही गृहिणी अशा कालनिर्णय का लिहीत असतील बरं… कालनिर्णयचं निरीक्षण केल्यावर उत्तर मिळतं… डोळ्यांसमोर राहणारं शाश्वत असतं म्हणतात, तसंच काही गोष्टी परंपरागत आहेत… गृहिणी घरात ज्या ठिकाणी जास्त असते त्या स्वयंपाकगृहातच अधिककरून हे कालनिर्णय लावलं जातं. याच कालनिर्णयकडं पाहत एकीकडे बाईच्या मनात आठवड्याभराचं सारीपाट मांडणं सुरु असतं आणि दुसरीकडे तितकाच चोख स्वयंपाक सुरु असतो… या दोन्हीमध्ये गल्लत मुळीच होत नाही…

या कालनिर्णयकडे पाहिल्यावर असं वाटतं घरातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखाची, चांगल्या वाईट परिस्थीतीची नोंद घेण्याची जबाबदारीच जणू या कॅलेंडरनं आपल्याकडे घेतलीये. कदाचित काही महिलांना या कालनिर्णयकडे पाहिल्यावर काहीसा आधारही वाटत असेल… इवल्याशा हुकवर वर्षभर लटकणारं हे कालनिर्णय पाहिल्यावर कदाचित अनेकांना बळही मिळत असेल…

इतक्यात आतून आईचा आवाज आला, “कालनिर्णय टाकून नको रे देऊ ते… इतक्यात नसतं टाकायचं… ” मला हसू आलं… पण खऱं सागू… ज्या कालनिर्णयवर वर्षभराच्या सुख दुःखाच्या, प्रत्येक घटनेच्या नोंदी झाल्या त्या कालनिर्णयविषयी आईच्या मनात हा जिव्हाळा निर्माण होणं स्वाभाविक आहे…

२०२३ चं कालनिर्णय पुन्हा रोल करून त्याला रबरबॅन्ड लावला. त्यावेळी जाणीव झाली आपल्या हातात आहेत, ते फक्त साधे बारा कागद नव्हे तर, बाईचा न दिसणारा संसार आहे… 

लेखिका : अनामिक

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुमचं नातं कितीही जवळचं असो….

जाणं येणं कमी झालं .. गाठीभेटी कमी झाल्या .. संवाद होईनासा झाला की प्रेमाला , आपुलकीला ओहटी लागणारच !

शेअरिंग झाल्याशिवाय , दुःख सांगून रडल्याशिवाय कुणीही कुणाचं होऊच शकत नाही !

 

आणि हल्ली हेच होईनासे झाले आहे

किंवा कमी कमी होत होत बंद होण्याच्या मार्गावर आहे !

आपल्याच हाताने आपल्या जवळच्या नात्याला जर तुम्ही अग्नी देणार असाल तर जगण्यामध्ये उदासीनता , डिप्रेशन , भकास वाटणे हे होणारच !

नको तितकी आर्थिक संपन्नता आणि प्रमाणाच्या बाहेर प्रॉपर्टी गोळा करण्याच्या विळख्यात माणूस सापडला की जगण्यातला आनंद , मजा संपणारच !

 

म्हणून Hi , Hello वाली मंडळी जमा करण्यापेक्षा माणसं जपा , नाती जगा !

सुखदुःखात साथ देणारे दोन चार मित्र , हाकेला धावून येणारे सख्खे शेजारी आणि वेळ प्रसंगी धाऊन येणारी चार रक्ताची नाती जर आपल्या जवळ असतील , तर आणि तरच आपले जगणे सुसह्य होऊ 

शकते , नसता मनोरुग्णाच्या कुंभमेळ्यातले आपणही एक मनोरुग्ण व्हायला वेळ लागणार नाही !

 

मी आणि माझं कुटुंब इतक्या छोट्या वर्तुळात आपण ” सुख मिळवण्याचा ” प्रयत्न करत असाल तर आपल्या प्रयत्नांना तडे जाऊ शकतात !

एखाद्या विषयातलं जबरदस्त टॅलेंट , त्याच्या पोटी मिळणारे गलेलठ्ठ पॅकेज ,उच्चभ्रू  सोसायटीतला वेल फर्निशड् फ्लॅट आणि पार्किंग मध्ये असलेली चकचकीत गाडी म्हणजे सुख , या भ्रमातून बाहेर पडा !

काही नाती तरी जपा .. कुणाकडे तरी जात जा .. कोणाला तरी बोलवत जा

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यक्त न होता , दुःख न सांगता कुढण्यापेक्षा जे आहे ते सांगून मस्तपैकी मोकळं रडा !

…. लक्षात घ्या खळखळून हासल्याशिवाय आणि मोकळं रडल्याशिवाय तुम्ही तणावमुक्त होऊच शकत नाही . भावनांचा निचरा झाल्याशिवाय टेन्शन कमी होणारच नाही आणि त्याशिवाय माणूस आनंदी राहूच शकणार नाही .

 

आणि दुसरी महत्वाची गोष्ट …

…. आपलं समजून तुमच्याजवळ जर कुणी मन मोकळं केलं तर त्याचे गॉसिपिंग करू नका , पाठ वळली की त्या व्यक्तीला हसू नका !

…. इतरांना कुत्सितपणे हसण्याची आणि पदोपदी दुसऱ्याला टोमणे मारण्याची सवय लागली की आपल्या मनाला झालेला कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे , असे समजण्यास काहीच हरकत नाही.

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर

मो 94 20 92 93 89

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गावठी !!!! –” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “गावठी !!!! —” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आम्ही मातीच्या भिंती 

आणि शेणाने सारवलेल्या 

जमिनीच्या घरात रहायचो…

 

‘ते’ सिमेंटच्या भिंती आणि 

चकचकीत टाईल्स लावलेल्या 

घरात रहायचे… 

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळून 

त्या पावडरने दात घासायचो…

‘ते’ चकाचक वेष्टणात मिळणाऱ्या 

पांढऱ्या टूथपेस्टने दात घासायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही जात्यावर धान्य दळायचो 

आणि पाट्यावरवंट्यावर 

चटण्या वाटायचो…

‘ते’ आयतं किंवा गिरणीवरुन 

पीठ दळून आणायचे,

मिक्सरात चटण्या वाटायचे…

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही तांब्यापितळेच्या 

कल्हई लावलेल्या भांड्यातून 

चुलीवर शिजवलेलं जरा धुरकट वासाचं अन्न खायचो…

 

‘ते’ गॅसवर स्टीलच्या 

चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही हातसडीच्या तांदळाचा भात 

आणि नाचणीची भाकरी …. लसणीच्या चटणीबरोबर हाणायचो…

‘ते’ शुभ्र पांढऱ्या तांदुळाचा भात अन् गव्हाची पोळी 

तुपसाखरेबरोबर खायचे ……

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही घाण्यावरुन काढून आणलेलं 

तेल वापरायचो…

‘ते’ डबल रिफाइंड तेल वापरायचे ……

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही साधे सुती कपडे वापरायचो…

‘ते’ टेरिलीन टेरिकाॅट वापरायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आमच्या घरी न्हावी यायचा,

मागीलदारच्या पडवीत पाटावर बसून 

थोरापोरांचे केस कापायचा…

‘ते’ मागेपुढे आरसेवाल्या सलुनात 

खुर्चीत बसून केस कापून घ्यायचे…

आणि

*आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

काळ बदलला…

 

‘ते’ करायचे त्या सगळ्या गोष्टी 

सोसासोसाने आम्ही पण करु लागलो…

 

आता ‘ते’ दामदुप्पट रकमा मोजून 

मन्थेंडांना आणि वीकेन्डांना 

मुद्दाम मातीच्या घरात 

रहाण्याची चैन करतात…

 

चुलीवर शिजवलेलं 

धुरकट वासाचं .. (साॅरी स्मोकी फ्लेवरचं)

अन्न आवडीने खातात…

घरी रिफाइंड तेलाऐवजी 

‘कोल्ड प्रेस’वर काढलेलं 

महागडं तेल वापरतात…

 

हौसेने नाचणीची बिस्कीटं खातात…

नमकवाल्या टूथपेस्टा वापरतात…

महागड्या ब्रॅन्डांचे 

सुती कपडे वापरतात…

आणि 

आणि आम्हाला गावठी म्हणतात…!!!

 

लेखिका :  संध्या साठे-जोशी, चिपळूण. 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा संसार व मी…… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

माझा संसार व मी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…

आपल्या नवयुवकाना याची फार मदत होईल नक्की वाचा…

— संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय

कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात  अंतर राहतं…

लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ 

अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले  २ जीव, एकमेकांसारखे  असतीलच कसे?

सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच ‘देणं’ स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा 

असणार कसा?. 

त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.

—- अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, 

श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा..  या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या 

सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं…..  

तेव्हा म्हणाली होती, ‘वाचनाचा छंद आहे’  पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं…

जाब विचारू शकतो आपण?

किंवा — 

तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’

पण – 

प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं. जेवायला वाढलंय.. 

हे ही चारदा सांगावं लागतं…

प्रवासाची आवड कसली? कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब… 

वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे… उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर…

मनापासून सांगतो, त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली… नाही जमलं की विस्कटली.

अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला… 

पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी….. 

…. पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;

आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; 

पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.

धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..‘ एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?’–या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन मगच संसार मांडायला हवा.

आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच 

पहिलं पाऊल…

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..

हेच संसाराचं खरं मर्म आहे.

हरीॐ

“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत… होत जातात…

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर… लेखक : श्री दीपक राऊत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर… लेखक : श्री दीपक राऊत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

कारण ..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की …

” देवाधिदेवा… भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी , दुर्योधनाला आणी दु:शासनाला सांगितली असतीस् तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?

इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ? 

भग्वद्गीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे , युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस ईतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली. 

आणि …एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला. 

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठावूक होते. 

थेट स्वर्गातून , पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे , खुप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला .

“ वत्सा , कशाला ईतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले.”

“देवा , हा आखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले नसते ..हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का ?”

“मला उपदेश करू नकोस ”   ………. श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा , माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची “ ….मी गयावया केली.

“ वत्सा …अरे तुला नाही म्हणालो.”

…मला हायसे वाटले.

“ मला उपदेश करू नका …असे दुर्योधन मला म्हणाला होता.

….तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी  दुर्योधनाकडे गेलो नसेन ? 

भग्वद्गीतेमधील न्याय अन्याय , नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”

“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश  करू नका म्हणाला ?”

“ वत्सा , अगदी असेच घडले बघ.

दुर्योधन म्हणाला …..मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणी दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो , त्याचा उपदेश मला करू नका “. 

“ वत्सा , पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता ..पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन ही अन् तुम्ही ही ओळखता, पण टाळत नाही.

तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता , पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.

.

.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .

.

.

“ मला उपदेश करू नका“……वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन. 

मित्रांबरोबर उनाडक्या करणे , चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना “ उपदेश करू नका” असे सांगत होतो. 

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणी “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला , “ उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीचं होतो.

“तंबाखू खाऊ नका , दारू पिऊ नका , मांसाहार करू नका “ , हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही . कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत: चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले… 

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय ….याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या .

कधीतरी स्वत: च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा ……तरच भग्वदगीता वर्तनात येईल…वाचण्याची इच्छा होईल.

इच्छा होईल तोच  सूर्योदय.

सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे ….

.तुम्ही? ….. 

लेखक : श्री दीपक  राऊत

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचा फंडा… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्याचा फंडा… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

दृष्टिकोन किती महत्वाचा पहा.

गणित तर समजून घ्या. “मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित” पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.

आपण असे मानू या की.

A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 असे

मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.

आपण असे म्हणतो की, आयुष्यात “कठोर मेहनत / HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.

आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =

8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे “ज्ञान” किंवा ‘Knowledge’. याचे मार्क्स पाहु या

K+N+O+W+L+E+D+G+E =

11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.

काही लोक म्हणतात “नशिब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.

L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, “नशिब” तर एकदमच काठावर पास.

काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी “पैसा /MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स ?

13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

बराच मोठा समुदाय असे मानतो की, “नेतृत्वगुण / LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =

12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो ? 

काही कल्पना करू शकता ?

नाही जमत ?

मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन / ATTITUDE” 

आता एटिट्यूड” चे आपल्या कोष्टकानुसार गुण तपासू… 

A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य  १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.

दृष्टिकोन बदला …  आयुष्य बदलेल

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्रियांच्या मनातली बडबड — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ स्त्रियांच्या मनातली बडबड — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

आपण जेवढी बडबड लोकांशी दिवसभर करतो ना त्यापेक्षा कितीतरी जास्त मनातल्या मनात करतो..

बघा हं… 

(सकाळचा अलार्म झाल्यावर)

याऽऽऽऽऽऽऽर झाली लगेच सकाळ..

आत्ता तर डोळा लागला होता..

(ब्रश करताना)

काय भाजी बनवु आता..?

(गॅस जवळ आल्यावर)

एवढीच झाली भाजी… पोरं खातील कि नाही देवजाणे… 

(आंघोळीला जाताना) 

कोणता ड्रेस घालु याऽऽऽऽऽऽऽर… सापडत एक काही नाही जागेवर… निळ्यानी गरमी होईल.. काळा कालच घातला.. पांढरा पावसाने खराब होईल… जाऊ दे पिवळा अडकवते…त्यात एखादा कपडा अंगावर पडतो… तेव्हा कपड्यांनाही आपण बोलतो.. 

या… या.. आता माझ्या अंगावर पडा एकदाचे..नाही या ना या कितीही आवरा पुन्हा तेच

(घरातुन निघताना) 

च्यायला काय घड्याळ पळतय… कितीही लवकर उठा तीच बोंब…

(रेडिओ बंद करताना, भीमसेन जोशींचा अभंग चालु असतो)

पंडितजी तुम्ही कसलं भारी गाताय पण माफ करा मला जावं लागेल आता.. सात वाजलेत.. 

(गाडी चालवताना) 

एखादा ओव्हरटेक करत असेल तर.. 

नाही ये ना ये… घाल माझ्या अंगावर एकदाचा… तूच राहिला होतास.. कुठं झेंडे गाडायचेत देव जाणे…. तु ही यमसदनी जा आणि मला ही ने…. 

(खूप जण बॅक मिरर मधुन मागे बघत असतात….तेव्हा) 

अरे बाबा काय बघतोस मागे दोन दोन पोरांची आई आहे मी… चल नीघ पुढं… 

(Office पोचल्यावर) 

हुऽऽऽऽऽऽऽश…. झालं एकदाचं टाईम मधे इन.. झालं… देव पावला.. 

(लिफ्ट बंद असेल तर) 

नाही बरोबर आहे देवा…. माझ्या वेळीच तु लिफ्ट बंद करणार… घे अजुन काबाडकष्ट करुन घे माझ्या कडुन… हाडं मोडून जाऊ दे माझी… 

(जेवताना) 

किती लवकर ब्रेक संपतो.…..निदान जेवायला तरी नीट वेळ द्यावा.. 

(दुपारी पाठ टेकवताना) 

च्यायला कंबरडं मोडतं का काय देव जाणे एखादं दिवशी…. टेकली एकदाची पाठ बाबा….. देवा.. 

(चहाच्या वेळी) 

कोणी एखादा कप चहा करुन दिल तर शपथ…….. वॉकिंग करावं लागेल..ढिगभर वजन वाढतय… या वजनाचं एक काय करावं.. देव जाणे… 

(वॉक करताना) 

आताच फोन उरकुन घ्यावेत वॉकिंग टाईम पण लवकर संपतो….. 

एखादी बाई फास्ट वॉक करत असेल तर.. 

नाही जा अजुन जोरजोरात करा वॉकिंग मला काही फरक पडत नाही… कुणाकुणाला माधुरी दीक्षित बनायचय बना मला काही फरक पडत नाही 

(संध्याकाळी स्वयंपाक करताना) 

एखाद्या दिवशी पण कुणी म्हणत नाही.. 

आज काऽऽऽऽऽऽऽही करु नको.. 

अजिबात भुक नाही…. एवढी भुक लागतेच कशी माणसाला 

(किचन आवरताना) 

नाही आवरतेना… मीच आवरते… सगळं मीच करते…. कुणी काही करु नका.. बसा सगळे सोफावर….. सिंहासन आणुन देऊ का…?? 

(झोपताना) 

आता कुणीही माझ्या खोलीत टपकु नका तासभर….. जरा बघु द्या मोबाईल मला.. ईतके मॅसेज येतात एक धड वाचुन होत नाही…. 

(दुसऱ्याचे स्टेटस बघुन) 

यांना बरा भटकायला वेळ मिळतो.. इथं मला मरायला फुरसत नाही….

काय बाबा हल्ली तर कुणी काहीपण कपडे घालतं…. 

(झोप आली असताना) 

झोपा बाबा आता…. पुन्हा पाचला उठायचं आहे….. सुट्टी नाहीये उद्या… परिक्षा चालु आहेत वेळेच्या आधी तडमडावं लागेल….. 

(आणि मध्यरात्री जाग आल्यावर) 

बापरे तीन वाजले… दोन तासात उठायचय झोपा पटकन थोडावेळ..

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares