☆ टिंकूकाका आणि काकू – लेखक : डॉ. श्यामराव महाजन ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
“बाहेर घाटपांडे आले आहेत,” कंपाउंडरने वर्दी दिली.
घाटपांडे म्हणजे शेजारच्या बिल्डिंगमधलं वृद्ध कपल.
गेली 10-12वर्षे त्यांची दोन्ही मुलं आपल्या बायकामुलांसह अमेरिकेत राहतात.
इथे प्रशस्त घरी म्हातारा म्हातारी दोघेच. अधूनमधून दोघेही तिकडे जाऊन येतात, Skype वर रोज गप्पाही होतात.
पण म्हाता-यांचा जीव मुलांना मिठीत घेण्यासाठी, नातवंडांना मांडीवर घेऊन चिऊकाऊचे घास भरवण्यासाठी तहानलेला असतो.
मग डोकेदुखी, चिडचिड, छातीत धडधड, चक्कर असे नसलेले आजार घेऊन दवाखान्यात यांची नियमाने भेट असते.
पण दोन तीन महिन्यात त्यांची फेरी झाली नव्हती. दार उघडून दोघेही आत आले अन् मी तोंड वासून पाहतच राहिलो. अंगभर पदर घेऊन चापूनचोपून साडी नेसण्या-या काकू आज चक्क ट्रँकपँट आणि टी शर्ट मधे! काकाही तसेच.
“तोंड मिटा डॉक्टर, मी तुमची घाटपांडे काकूच आहे. डायरेक्ट जॉगिंग करून येतोय म्हणून हा ड्रेस.”
“वा! व्यायाम सुरू केला वाटतं ? “
गेले कितीतरी दिवस ‘Morning walk ला जात जा, नाना नानी पार्क मध्ये जा’, म्हणून मी यांच्या मागे लागलो होतो आता यांनी मनावर घेतलेलं दिसतंय. दोघांच्याही चेह-यावर, डोळ्यांमधे तजेला दिसत होता. फरक निश्चित होता.
“नाना नानी पार्क चांगलंच मानवलेलं दिसतंय तुम्हाला.” मी म्हटलं
“कसलं नाना नानी पार्क? जेमतेम आठ दिवस गेलो आम्ही तिथं. आता शेजारच्या मैदानात जातो आम्ही morning walk साठी.
तिथेच हा ‘टिंकू’ धडपडला. पायाला खरचटलंय थोडं , काही injection वगैरे लागतंय का बघा जरा.”
“कुठे आहे टिंकू?” मी विचारलं.
कुणीतरी गुदगुल्या करीत असल्यासारखे घाटपांडे हसायला लागले.
“आजकाल ही मला टिंकू च म्हणते. माझं शाळेपासूनचं टोपणनाव! “
या वेळी माझे वासलेले तोंड बंद करायला मला बरेच परिश्रम पडले. त्र्यंबकराव घाटपांडेंना काकूनी कधी नावानेसुद्धा हाक मारली नसेल अन् आज एकदम टिंकू?
“याला गेली चाळीस वर्षे मी अहो, अहो ऐकलंत का? म्हणून हाक मारायची. याचचं उत्तर एकतर गुरकावणं किंवा खेकसणं ! वाघ म्हणाले तरी खातो, वाघोबा म्हणाले तरी खातो. मग सरळ एक दिवस याला टिंकू म्हणायला लागले.”
“मलाही मस्त वाटतं , पुन्हा शाळेत गेल्या सारखं! “
काकांच्या जखमेवर मलमपट्टी करता करता मी विचारलं “पण नाना नानी पार्क का बंद केलंत? “
“वाटलं होतं, तिथे सारे समवयस्क भेटतील, छान गप्पागोष्टी, हास्यविनोद, आध्यात्मिक चर्चा होतील. पण कसचं काय! माझं दुःख तुझ्यापेक्षा कसं जास्त आहे, हे सांगण्याची चढाओढ असते तिथे. आपली दुःख कुरवाळत बसण्यातच त्यांना आनंद असतो. तिथून निघाल्यावर जास्तीच depress झाल्यासारखं वाटायचं.. “
“हो ना, “काकू म्हणाल्या, “म्हणून एक दिवस तिकडे जायचं बंद केलं . संध्याकाळी हे जॉगिंगचे कपडे आणले आणि सकाळपासून शेजारच्या मैदानात जायला लागलो morning walk साठी. तिथे तरुणाईचा नुसता बगिचा फुललेला असतो. सुरवातीला साडीऐवजी हा ड्रेस घालायला जरा अवघड वाटलं , पण आता सवय झाली. “
“आणि तिथं फिरण्यात, त्या पोरांशी गप्पा मारण्यात 2-3तास कसे गेले कळतच नाही. “
तरुण पोरांशी 2-3तास गप्पा! हे जरा आश्चर्यकारकच वाटलं. घरोघरी तरुण पोरं वृद्धांशी कशी वागतात, बोलतात हे मी पाहतोच आहे. म्हाता-यांजवळ बसून गप्पा मारायला कुणाकडे वेळही नसतो आणि कुणी उत्सुकही नसतो.
“पण ती पोरं बरी गप्पा मारतात तुमच्याशी? “
“अहो हा मोबाईल! “
“म्हणजे? “
“हा स्मार्ट फोन म्हणजे आजकाल प्रत्येकाचा जिवाभावाचा अन् आवडता दोस्त आहे. आणि आमच्याकडे तर मुलांनी पाठवलेला latest फोन आहे. आम्हाला येतं तरी गेल्या दोन महिन्यांत 15-20जणांकडून selfie काढायला, what’s app वर मेसेज पाठवायला शिकलो आम्ही. मग ती पोरंही उत्साहाने मदत करतात. त्यातूनच ओळख होते. “
मोबाईलचा हा उपयोग माझ्यासाठी नवीनच होता.
“त्यांच्या पळण्याचं , स्टँमिनाचं , sports shoesचं कौतुक करतो. पोर खूश असतात. “
“आणि हो, आम्ही दोघांनीही एक पथ्य पाळलंय, त्यांची एखादी गोष्ट आवडली नाही तरी नाकं मुरडायची नाहीत, नावं ठेवायची नाहीत आणि विचारल्याशिवाय कुणालाही सल्ला द्यायचा नाही. “
“वा! छान! “मी आपलं काही तरी बोलायचं म्हणून बोललो. “पण या मुलांशी गप्पा तरी काय मारता? “
“काहीही. पण विशेषतः आमच्या वेळचं कॉलेज, फुटबॉल, क्रिकेट गाणी. रोज त्या serials सोडून Sports Channels बघतो. “
“अजूनही ही कधीकधी धोनीला गोलकीपर म्हणते किंवा मेस्सीला off side ऐवजी run out म्हणते. पण पोरं तेही enjoy करतात.”
“या पोरांना नवीन गाण्यांबरोबर आपल्या वेळची जुनी गाणीदेखील तेवढीच आवडतात. “
“आता आमचा 10-12जणांचा W.A.चा ग्रुपही झाला आहे. पोर नवीन नवीन vdo गाणी, jokes पाठवत असतात. मजा येते. “
“गेल्या आठवड्यात हिच्या वाढदिवसाला पोरं केक घेऊन आली होती! अंताक्षरी, दमशिराज, जेवण, मस्त मजा आली! “
“हो, आणि दुस-या दिवशी यांच्या बहिणीचा फोनही आला, ‘काय चाललय तुझं? या वयात मुलांबरोबर पार्ट्या करणं शोभतं का तुला? आपल्या वयाचा तरी विचार करायचा!’ पण मी चक्क दुर्लक्ष केलं . आता स्वतःला आनंद मिळवण्यासाठी आणखी कुठल्या वयाची वाट बघायची? टिंकूचाही मला पूर्ण support आहे. “
“हो ना! आता हे फिरणं, गप्पागोष्टी, देवपूजा, मेडिटेशन, sports, whats app या मधे वेळ कसा गेला समजतच नाही. रात्री शांत झोप लागते. आमच्या B.P.च्या गोळी खेरीज गेल्या दोन महिन्यात दुसरी गोळीही घ्यावी लागली नाही. इतके दिवस आम्ही दुस-यांना बदलण्याचा प्रयत्न करत होतो. पण या वयात स्वतःला बदलण्याची, जीवनात आनंद मिळवण्याची बुद्धी दिली, म्हणून मी देवाचा अत्यंत आभारी आहे. “
काही क्षण मी दोघांकडे नुसताच पहात राहिलो अन् मग न रहावून दवाखान्यातल्या सर्व पेशंट समोर मी टिंकूकाका आणि काकूना पायाला हात लावून नमस्कार केला.
लेखक :डॉ. श्यामराज महाजन
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बसमध्ये चढलो तर खरं.. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला.
बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली. पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता… पण त्याने ती सीट मला दिली.
पुढच्या स्टाॕप वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली.
आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला.
बरं हा माणूस अगदी सामान्य दिसत होता. म्हणजे कुठेतरी मजुरी करून घरी परत जात असावा.
आता शेवटच्या स्टाॕपवर आम्ही सर्वच उतरलो.
तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो… विचारले,
“ प्रत्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होता?? “
तेव्हा त्याने दिलेले उत्तर….
“ मी शिकलेला नाही हो. अशिक्षित आहे मी. एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो, आणि माझ्याजवळ कोणाला द्यायला काहीच नाही… ज्ञान नाही, पैसा नाही. तेव्हा मी हे असे रोज करतो. हे मी सहज करू शकतो ना..! दिवसभर काम केल्यानंतर अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमते. मी तुम्हाला माझी जागा दिली, तुम्ही धन्यवाद म्हणालात, यातच मला खूप समाधान मिळाले. मी कोणाच्या तरी कामी आलो ना?
…. असं मी रोज करतो. माझा नियमच झाला आहे हा.. आणि रोज मी आनंदाने घरी जातो.”
त्याचे उत्तर ऐकून मी थक्कच झालो.
त्याचे विचार व समज बघून, याला अशिक्षित म्हणायचे का? हा विचार आला.
कोणासाठी, काहीतरी करायची इच्छा, ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना !
मी कशा रीतीने मदत करू शकतो, यावर शोधलेला हा उपाय बघून देव सुध्दा आपल्या या निर्मितीवर खूष झाला असेल ! माझ्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल !
त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या…..
स्वतः ला हुषार, शिक्षित समजणारा मी, त्याच्यासमोर खाली मान घालून स्वतःचे परिक्षण करू लागलो.
किती सहज, त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.
देव त्याला नक्कीच पावला असणार..
मदत ही खूप महाग गोष्ट आहे. कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात..!
सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षित का ? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर, मोठी कार, म्हणजेच श्रीमंती का ??
कोण तुम्हाला केव्हा काय शिकवून जाईल, आणि तुमची धुंदी उतरवेल सांगता येत नाही !
या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले..!
म्हणतात ना……
“कर्म से पहचान होती है इंसानों की।
वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में”।
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘मराठी भाषेचे सौंदर्य ::: पाऊल व पाय‘… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..
पाऊल नाजूक ..व मुलायम.. तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो..!
पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे …!!
पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!
पाऊल जपून टाकायचे असते; पण पाय हा रोवायचा असतो.. !!
काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी ” कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही ” असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही..!!
नको त्या ठिकाणी पाऊल घसरते तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो !
पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !
जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणार्या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट ही अटळ व गरजेची असते… …!
बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही……..
जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण ,…परत जातानादेखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत साम्य आहे…!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भेट एका वाढदिवसाची… लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
मी सुचेता. आज माझा वाढदिवस. सचिन सकाळीच म्हणाला, “आज काही करू नकोस, मी लंचला बाहेर घेऊन जातोय तुला एक वेगळीच ट्रीट आहे.”
लग्नाला दहा वर्षे झालीत, सचिनला मी चांगलीच ओळखते. काहीतरी जगावेगळे अनुभव देण्यात किंवा मजेशीर प्रसंग उभे करण्यात तो माहीर होता. मुले चार वाजल्यानंतर शाळेतून येणार म्हणजे आमची लंच फक्त दोघांचीच असणार होती.
दोघेही बारा वाजता बाहेर पडलो. सचिनने गाडी भरधाव सोडली होती. मधेच विचारात मग्न झाला की गाडी स्लो होत होती. मी मनात समजून गेले की हा आज एक वेगळाच अनुभव किंवा रोमांचक प्रसंग घडवणार.
गाडी एका नवीन मॉलच्या पार्कींग मधे उभी करून आम्ही लिफ्टमधे शिरलो. सचिनने पाचव्या मजल्याचे बटण दाबलेले मी पाहीले. एकदम वरचा मजला.. तिथे तर मल्टीप्लेक्स असणार, क्वीक बाईट्सचे स्टॉल असणार. तिथे काय वाढदिवस करायचा.. एवढ्यात पाचवा मजला आला. खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल दोन्ही बाजूनी सजले होते. सचिन कुठेही न पहाता भरभर चालत होता. शेवटी एका बंद दारासमोर आलो वर पाटी होती, “Dialogue in the dark” आश्चर्यात पडले. अंधारातील संभाषण? खाण्याच्या स्टॉलचे नाव विचित्र वाटले. दार उघडून आत गेलो तर फक्त एक काऊंटर व त्या मागे टाय सूट मधला एक माणूस. टेबल खुर्च्या वगेरे कांहीच दिसत नव्हते आम्हाला पहाताच तो लगबगीने पुढे आला, “वेलकम सचिन सर, हॅप्पी बर्थ डे टू यू मॅडम” याचा अर्थ सचिन अगोदरच याला भेटून सर्व ठरवून आला होता. “सर, मॅडम यु आर अवर स्पेशल गेस्टस टुडे काय घेणार ते ठरवा.” त्याने काऊंटर वर नेत आमच्या समोर मेनू कार्ड ठेवले. सचिनने ते माझ्याकडे सरकवले.
मी गोंधळले होते. टेबलवर बसण्या आधीच ऑर्डर द्यायची प्रथा पहिल्यांदाच अनुभवत होते. काहीतरी विचित्र वाटत होते. हसऱ्या मुद्रेने सचिन माझी मजा पहात होता. मी ऑर्डर दिली आणि तो माणूस आम्हाला घेऊन निघाला. एक दरवाजा उघडला समोर एक छोटासा बोळकंडी सारखा रस्ता दिसला. दोघे किंवा तिघेच जातील एवढाच रुंद. आम्ही त्याच्या मागोमाग निघालो. पहिले वळण आले आणि बाहेरून येणारा उजेड खूपच कमी झाला. त्या पॅसेजमधे दिवे अजिबात नव्हते. आणखी एक दोन वळणांनंतर अंधार खूपच वाढला. मी सचिनचा हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने भिंतीला स्पर्शत चाचपडत चालले होते. सचिन माझ्या हातावर थोपटत मला धीर देत होता. पुढच्या वळणानंतर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता पण हवा मोकळी व थंड येवू लागली होती. बहुदा आम्ही एका हॉल मधे पोचलो होतो.
“संपत” त्या माणसाने हाक मारली.
“येस सर,” अंधारातच उत्तर आले. कुणीतरी जवळ आल्याची चाहूल लागली.
“हे आपले आजचे स्पेशल गेस्ट, मॅडमचा बर्थडे आहे. गीव्ह देम स्पेशल ट्रीट. ऑर्डर मी घेतलीच आहे. त्याना टेबलवर ने.”
“येस सर,” अंधारातच आवाज आला. आता संपत आमचे हात धरून त्या अंधारातून नेत होता. खुर्ची ओढल्याचा आवाज आला त्याने माझा हात खुर्चीच्या पाठीवर ठेवला. तसाच सचिनचाही ठेवला असावा. आम्ही बसलो. मी समोरच्या टेबलवर हात फिरवून अंदाज घेतला. या मिट्ट काळोखात जेवण दिसणार कसे आम्ही जेवणार कसे ही कसली सचिनची जगावेगळी पार्टी असे कितीतरी प्रश्नांचे काहूर मनात उठले होते. असा कधी बर्थडे असतो का?
पण त्याच्यावर माझा विश्वास होता. काहीतरी निश्चित वेगळेपणा जाणवणार व मला अतिशय आश्चर्यात तो टाकणार याची खात्री वाटत होती.
पुढ्यात प्लेटस् मांडल्याचे आवाजावरून समजले. वेटर्सचे येणे जाणे चाहुलीने समजत होते. संपतने हात पकडून दोन्ही डिश कुठे आहेत ते दाखवले. चमचा हातात दिला. एवढ्यात मागवलेले पदार्थ आल्याचे त्यांच्या घमघमाटाने माहीत पडले. “वाढतो” म्हणत संपत एक एक पदार्थ डिश मधे वाढू लागला. सर्व झाल्यावर म्हणाला “मी वाढले आहे. आपल्याला कांही दिसणार नाही पण वास आणि स्पर्शाचा उपयोग करून जेवायची एक वेगळीच मजा येईल व तुम्हाला आनंद देईल याची खात्री देतो.”
त्या अंधारात मी चाचपडत रोटी तोडली, अंदाजाने एका भाजीत हात घातला पहिला घास तोंडात गेला. मग चार पाच घास असेच अंदाज घेण्यात गेले. डाव्या हाताने मी प्लेट पकडली होती. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जागा उजव्या हाताला समजू लागली होती. आणि अहो आश्चर्यम् आता त्या अंधारात देखील जेवण मी सहज जेवू शकत होते. हा आगळा अनुभव पदार्थांची मजा तर देतच होता पण या खेळाचा आगळा आनंद आम्ही दोघे पुरेपूर अनुभवत होतो. सचिन कोणत्या पदार्थाचा घास घेतोय हे मी विचारले की तोही विचारायचा. केंव्हा केंहा आमचे उत्तर एकच असायचे केव्हा वेगळे असायचे हा खेळ खरच जाम मजा देत होता. त्या मिट्ट काळोखात स्पर्श, वास आणि आवाज हेच काम करत होते. मधुनच संपत भाज्या वाढत होता. आम्हाला त्या संपल्या की आहेत हे समजत नव्हते पण त्याला दिव्य दृष्टी असल्या सारखा तो आमची बडदास्त ठेवत होता,
शेवटी स्वीटडिश आली ती मात्र त्याने आमच्या हातात दिली. माझा वाढदिवस, अंधारातील जेवणाचा, तो ही मजा देऊन गेला. कदाचित कँडल लाईट डिनर पेक्षाही मजा आली होती.
“आपण जाणार असाल तेव्हा सांगा, मी आपल्याला बाहेर घेऊन जाईन.” संपतने सांगीतले तसा सचिन म्हणाला, “अरे बिल तर बाहेरच द्यावे लागणार, चल निघू आपण.”
संपतने माझी खुर्ची हळुवार सरकवली. माझा हात पकडला. तसाच सचिनचाही पकडला असावा. तो आम्हाला घेऊन सराईता सारखा तो काळोख कापत बाहेर निघाला. पॅसेजमधे आल्याचे सहज समजले. हात आपोआप पॅसेजच्या भिंतीवर गेला. दोन वळणानंतर अंधुक प्रकाश दिसू लागला आणि संपतचा हात सोडून आता आम्ही चालू शकत होतो.
काउंटरच्या दालनात पोचलो. सचिन बिल देण्यासाठी गेला. आमची काळजी घेणाऱ्या संपतचे आभार मानण्या साठी पाठमोऱ्या संपतला मी हाक मारली. संपत वळला. त्याच्याकडे पहाताच मी जागच्या जागीच थिजले. संपतच्या डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होत्या. तो ठार आंधळा होता.
“येस मॅडम,” काय बोलू तेच समजेना. पण सहानभूतीने भरलेले शब्द निघालेच, “संपत या स्थितीतही तू छान आदरातिथ्य केलेस. कायम लक्षात राहील.”
“मॅडम तुम्ही जो अंधार आज अनुभवलात तो आम्हाला रोजचाच आहे. पण आम्ही त्याच्यावर विजय मिळवलाय We are not disabled, we are differently able people. We can lead our life without any problem with all joy and happiness as you enjoy.”
माझ्या सहानुभूतीने भरलेल्या बोलण्याची मलाच लाज वाटली. सहानभुतीची गरज नसलेला एक सशक्त माणूस मला सचिनने भेटवला होता. असा वाढदिवस होणे नाही. सचिन तुझा मला अभिमान वाटतो.
सचिन बिल देऊन माझ्याकडे आला. बिल माझ्या हातात दिले. नेहमी सचिनच्या खर्चावर पाळत ठेवणारी मी बिल पहायला गेले तो तळटिपेवर लक्ष गेले.
We do not accept tips, Please think of donating your eyes, which will bring light to somebody’s life.
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈