☆ येऊ द्या नवीन लाsssट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक ” लाटा ” उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात… त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात…
पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती…
प्रत्येक बाल्कनी – टेरेस – अंगणात गव्हांकूर पिकू- डोलू लागले…
कॅन्सर, डायबेटीस.. बी. पी… गायब होणार होते
आणि आपण एकदम तंदुरुस्त होणार होतो..
कैक टन गव्हांकूर संपले… मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही
व लाट ओसरली !
अल्कली WATER ची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती….
म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार होता…
२० हजार – ३० हजार मशीनची किंमत…
मशीन्स धूळ खात पडली…
आणि लाट ओसरली ! !
सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
वजन घटणार…
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले…
हजार मिलीग्राम पण वजन नाही घटले…
लाट ओसरली ! ! !
मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नाना – नानी आठवले
पण
तरीही नानी-नाना पार्कमधून काही मंडळी वैकुंठाला गेली….
अलोव्हेरा ज्यूस… !
सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी. पी. एकदम नॉर्मल होणार..
हजारो बाटल्या खपल्या… विशेष काही बदलले नाही… तीही लाट ओसरली ! ! ! !
मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
५००० करोडचा व्यवसाय झाला…. बाबा उद्योगपती झाले..
आणि इथे…. आमची आरोग्यस्थिती होती तशीच….
मग माधवबागवाले आले.
तेल मसाज पंचकर्म करा.. हृदयाचे ब्लॉक घालवा म्हणाले..
राहता ब्लॉक विकायला लागला.. पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो. )
मग आली दिवेकर लाट….
मग आली दीक्षित लहर…
… ही लाट आता उसळ्या घेतेय….. ओसरेल लवकरच ! ! ! ! !
लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही. पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय
विचार करा.. आणि…..
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.
आणखी थोडा विचार करा..
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद.. म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे साधे घरगुती जेवण.. पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोड आलेली कडधान्ये, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहू, ज्वारी, बाजरी, मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम.. पहा काय फरक पडतो
आम्हाला शिस्त नकोय..
पैसा बोलतोय…
जीभ चटावलीय..
” घरचा स्वयंपाक नकोय… “
आता तर … पंधरा मिनीटात… ओला.. स्विगी… दारात…
….. आली लाट मारा उड्या
एवढे टाळूया…
हसत खेळत जगूया,…..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम…….. बस्स ! ! !
सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम सातत्याने करणे आवश्यक आहे
आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे ?
दीर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
याकरिता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.
आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात….. तसेच व्यायामात नियमितता व सातत्य असावं.
आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल….
बघा पटलं तर घ्या..
नाहीतर…… चला.. येऊ द्या नवीन लाsssट……
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ न सांगितले गेलेले छत्रपती…!!! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाहीस्तेखानाची बोटे आणि
3.आग्र्याहुन हून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….!
आपल्या आईला जिजाऊ मॉसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज”सामाजिक क्रांती” करणारे होते…!
रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे”लोकपालक” राजे होते…!
सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे”उत्तम प्रशासक” होते…!
विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे”पर्यावरण रक्षक” होते…!
समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे”स्व-धर्मचिकित्सक” होते …!
मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून “अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारेचिकीत्सक राजे”
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे !”जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय!!
३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे१०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते,”उत्तम अभियंते राजे”
सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
परस्त्री मातेसमान मानत महिलांनासन्मानाने वागवाणारे”मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय
संपुर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तीका नाचवली गेली नाही की मद्याचे प्याले ही रिचवले गेले नाहीत
खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती…..!
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक क्षण पुरेसा आहे,कोणाचं आयुष्य बदलून टाकायला. एखाद्या रस्त्यावरच्या भुभू च्या अंगावरून प्रेमाने,मायेने हात फिरवा…त्याचं प्रेम ते भुभु नक्की व्यक्त करेल.
झाडं,पानं,फुलं सगळ्यांना प्रेमाची भाषा व्यवस्थित समजते. मोकळ्या वातावरणात,मुक्तपणे वाढणारी झाडं आणि फुलं अधिक सुंदर, तेजस्वी भासतात…त्यांना वाढायला पूर्ण मोकळेपणा असतो.कोणाचं बंधन नसतं..निसर्गाचं चक्र त्यांना अधिक तेजस्वी,अधिक बलवान बनवतं.निसर्गाचं प्रेमचं आहे तसं…हे ऋतुचक्र तसचं तर ठरवल गेलं आहे की.
खायला अन्न,प्यायला पाणी, सूर्यप्रकाश,सुखावणारा वारा, पक्षांचं गोड कुजन,फुलांचे वेगवेगळे आकार आणि सुगंध, गवताची…पानांची…वेलींची घनदाट सुखद अशी हिरवाई, पाण्याचं फेसळण…कड्या वरून झेप घेणं..किनाऱ्यावर नक्षी काढणं…एखाद्या लहानग्याप्रमाणे खिदळत, अवखळपणाने पुढचं मार्गक्रमण करणं…
…असं आणि किती अगणित रुपात निसर्ग आपल प्रेम व्यक्त करत असतो.
सगळ्या संतांनी पण सांगून ठेवलं आहे…भगवंत प्रेमाचा भुकेला आहे…त्याला मोठे समारंभ नकोत,फुलांची आरास नको, उदबत्यांचा गुच्छ नको,अवडंबर नकोच…एक क्षण त्याला द्यावा, ज्यात फक्त त्याची आठवण…त्याचेच विचार असतील. खूप मिळतंय आपल्याला…एक क्षण पुरे आहे ते सगळ अनुभवण्याचा आणि व्यक्त होऊन देण्याचा.
तुमचा पैसा,शिक्षण,बुद्धिमत्ता प्रदर्शन कोणाला नको असतो…एक क्षण द्या तुमच्या प्रेमाचा…एक हसू, एखादा संदेश, एखादी मदतीची कृती…व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी…पण माझ्या पद्धतीने झालं नाही तर ते कसल व्यक्त होणं…अस नसत हो.ही निसर्गाची, भगवंताची ….प्रेमाची हाक त्यांच्याच पद्धतीने होत असते…ती ऐकून घेण्याची संवेदनशीलता आपल्यात शोधून वाढवायला हवी.
आपल्यातील हे प्रेम वाढवायला हवं…भगवंताची देणगी आहे ही.!
हे आपल्यातलं प्रेम वाढलं ना…भगवंताबद्दल, निसर्गाबद्दल…जी प्रत्येक आत्म्याची गरज आहे…की आपण नक्की बदलायला लागू…स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला सुरुवात करू, अहंकार मुक्त होऊ,स्वच्छ सात्विक होऊ,प्रेम मय,आनंदमय होऊ…या जगाला त्याची खूप गरज आहे
आपल्याबरोबर…
फक्त रोज एक क्षण हवा.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ असाही व्हॅलेंटाईन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
मित्राची घट्ट मिठी
तोंडातून कच्चकन शिवी
आणि पाठीवर बुक्की
गच्च दोस्ती, घट्ट प्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
बाबांची घट्ट मिठी
ऐकायचे त्यांचे काळीज ठोके
न बोलताही ऐकू येते ते प्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
संध्याकाळी दिवेलागणीला
ओसरीवर आज्जीसोबत
करुणाष्टके म्हणून झाल्यावर
तिला नमस्कार करताना
तिचा खरबरीत सुरुकुतलेला हात
माझ्या डोक्यावर विसावतो
केसांमधून फिरतो
दाट मऊसर ते कापूसप्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
आईची साद येते
मी कुठे तरी आपल्याच तंद्रीत
लक्षातच येत नाही आईची साद
घरी पोहोचायला उशीर होतो
पेंगुळल्या डोळ्यांची
आई असते उंबरठ्यावर बसलेली
पेंगुळल्या आवाजातच म्हणते,
आलास तू. किती वाट बघायला लावतोस रे, काळजी वाटते बघ
पेंगुळल्या डोळ्यातले प्रेम
उंबरठ्यावर सडा पसरलेले.
व्हॅलेंटाईन … ❤️
बहिणीचा फोन
दादा, कुठे आहेस ? अरे गाढवा काल येतो म्हणालायस आणि अजून येतोयस ? बावळट आहेस तू. झरझरुन फोनवर तिचे हसणे. मी मारलेल्या थापा ओळखणे. आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यावर घट्ट मिठीत घेऊन, दाद्या, तू आहेस म्हणून मी आहे रे … पाणावलेले डोळे हळूच पुसत हसताना माझ्या अंगभर पसरणारे तिचे प्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
मुलाशी भांडण
मग न बोलता जेवण पान लावून सुम्म बसणं बातम्या संपल्या की झोपायला जाणं झोपल्यावर रात्री कधीतरी जाग येते. अंगावर शाल पसरलेली असते. पायावर कुणाचा तरी हात असतो. उठून बघतो तर मुलगा तसाच बसून माझ्या अंगावर हात ठेवून गाढ झोपलेला असतो. डोळ्यातले पाणी गालावर सुकलेले. मी त्याच्या केसांत हात फिरवून त्याला जागं करतो. तो जागा होतो. आणि घट्ट मला मिठी मारतो. हुंदक्यांना आवरत तो म्हणतो,” बाबा, आय ॲम सॉरी. माझ्याकडून परत असं होणार नाही. पण बोल रे माझ्याशी ” मी ही त्याला म्हणतो, “आय ॲम सॉरी मित्रा. माझंही जरा चुकलंच रे ” घट्ट मिठीत आश्वासक प्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
मुलीचा कॉलेजमधे कसला तरी सत्कार असतो. बाबा, तू यायलाच हवायस हं ” मी आणि बायको जातो. मुलगी तिच्या तिच्या मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यात असते. आमच्याकडे बघते आणि तिच्या नजरेत हसरी चमक उठते. कार्यक्रम सुरु होतो. ती स्टेजवर असते. बक्षिस मिळते. ती माईक हातात घेते. “माझ्या या बक्षिसाचे खरे मानकरी आहेत माझे आई-बाबा.” आमच्याकडे खूण करते. सगळे अॉडिटोरियम आम्हां दोघांकडे बघायला लागते. टाळ्यांचा आवाज वाढत असतो. स्टेजवर असलेली ती आमच्याकडे बघत आपले डोळे पुसत असते. आमचेही डोळे भरलेले. भरुन भरुन ओसंडणारे प्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
सिग्नलला गाडी थांबलेली… सोनचाफ्याची फुले विकणारी ती झिप्र्या केसांनी विस्कटलेली गाडीच्या काचेजवळ. मी गाडी बाजूला घेऊन थांबवतो. बाहेर येऊन तिच्याकडून दोन पाकिटे फुले घेतो. पन्नासच्या ऐवजी शंभर देतो. आणि फुलांची पाकिटे उघडून ती सगळी फुले तिच्याच ओंजळीत ओततो. ती श्वास भरुन गंधाळली होते. सोनचाफी गंधाळ हसत हसत निघून जाते. ती गेलेल्या वाटेवर पसरलेले असते ते सोनचाफी गंधाचे निर्व्याज अनामिक प्रेम.
व्हॅलेंटाईन … ❤️
वृध्द ओणव्या झालेल्या वडाच्या पारावर संध्याकाळी ती काळपट म्हातारी बसून असते. काळ्याशार अंधारात मिसळलेली. डोळ्यांतले दिवे मंदावलेले. गार वाऱ्यात थरथरणारी. रात्री तिच्यासाठी पारावर जेवणाचे ताट येते. ताट विस्कटत ती कशीबशी चार घास खाते आणि तशीच लवंडते. कुणीतरी तिच्या अंगावर धाबळी ठेवतंय. ती झोपेतच गालातल्या गालात हसते. सकाळी पारावरुनच ती अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली असते. रात्रीचे हसू तिथेच पारावर त्या वृध्द ओणव्या झालेल्या वडाला भेट देऊन व्हॅलेंटाईन डे ची.
व्हॅलेंटाईन असा ही….
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला , मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं…मग ते घरचं असो नाहीतर दारचं…. बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात…
75 वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….ही सत्य परिस्थिती आहे…..आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……
त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो…ती मरेपर्यंत करावी लागणार…
ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार….
” मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खूप शिकल्यावर त्याच्याकडे खूप पैसे येतील .. मग माझे कष्ट कमी होतील ” * ही *खोटी स्वप्न आहेत….
मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी ..” आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तूच बनव..”
असं म्हटलं की झालं… पुन्हा सगळं चक्र चालू ..
आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यी….,
पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल… जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का ??
तर नाही…..
परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं…..
मी हे स्वीकारले आहे …. खुप अंतरंगातून आणि आनंदाने….
माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते….. खुप उर्जा आणि उर्मीनी भरलेली……
सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलू शकते आणि रात्री दहा वाजता ही….. आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत….दुसरा दिवस हा नवाच असतो….
काहीच नाही लागत हो… हे सगळं करायला…..
रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा… छान आपल्या छोट्याश्या टेरेसवर डोकावुन थंड हवा घ्या..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा….आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या..
इतकं भारी वाटतं ना….
अहाहा…..
सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला….ग्लास भरुन पाणी प्यायलं आणि मस्त…आल्याचा चहा पीतपीत खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं …..
रोज मस्त तयार व्हा….
आलटुन पालटुन स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा ….
कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले…..कधी ड्रेस…कधी साडी…. कधी केस मोकळे…कधी बांधलेले….
कधी ही टिकली तर कधी ती…. रोज नवनवीन साड्या … एक दिवसाआड केस मोकळे सोडलेले….स्वत:ला बदला…. जगाशी काय करायचं आहे…दुनीयासे हमे क्या लेना …. तुम्ही कसेही रहा .. जग बोंबलणारच……
सगळं ट्राय करत रहा….नवं नवं नवं नवं….. रोज नवं…..रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे….
☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
स्वतःची सहीसुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा..
A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा..
मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ..
आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा..
व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ ‘कंटाळा येतो म्हणून’ विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा..
फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी (‘काळजी घे’ चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा…
टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?.. त्यांनाही आज शुभेच्छा..
सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यांत, बँकेत किंवा इतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, ‘मराठीचा किमान एका संधीसाठीही’ वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा…
वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा..
फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा…
मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा…
जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून द्या ;पण केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका.