मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काॅम्बिनेशन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ काॅम्बिनेशन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

जेवणा खाण्याचं सांगतो,

एक कॉम्बिनेशन असतं.

कशाहीबरोबर संगतीला घेऊन

काही खायचं नसतं.

 

कांदेपोह्याच्या बाजुला

सजतो फक्कड चहाच,

उपमा तिखट सांज्यावर

भुरभुरते बारीक शेवच,

साबुदाणा खिचडी खाताना

कवडी दहीच रास्त,

जेवणा खाण्याचं सांगतो

एक  कॉम्बिनेशन असतं.

 

डाळीची आमटी, गरम भात

जोडीला बटाट्याची काचरी,

वरणभात लोणकढं तूप

अन लिंबाची फोड साजरी

दोघांच्या बदलल्या जागा

की जेवणच सगळं बिनसतं,

जेवणा खाण्याचं सांगतो

एक कॉम्बिनेशन  असतं.

 

लुसलुशीत पुरणपोळी,

सोबत वाटी दुधाची.

खुसखुशीत गुळपोळीबरोबर

साथ रवाळ तुपाची,

गोडाच्या शिऱ्याची सांजोरी

साथीला आंब्याचं लोणचं मस्त.

जेवणा खाण्याचं सांगतो

एक  कॉम्बिनेशन असतं.

 

तिखट तिखट मिसळीसंगती

हवा बेकरी पाव,

गोडुस स्लाईस ब्रेडला,

जराही इथे ना वाव.

मिसळ-कांदा-लिंबू,

नाकातून पाणी वहातं नुसतं

जेवणा खाण्याचं सांगतो एक -कॉम्बिनेशन

 असतं.

 

थालीपीठ भाजणीचं,

ताजं लोणी त्यावर,

असेल कातळी खोबऱ्यांची

मग कसा घालावा जिभेला आवर.

पंचपक्वान्नही यापुढे

अगदी मिळमिळीत भासतं,

जेवणा खाण्याचं सांगतो

एक कॉम्बिनेशन  असतं.

 

भाकरी ज्वारीची टम्म,

येऊन ताटात पडते,

लसणाची चटणी

भुकेला सणसणून चाळवते.

झणझणीत झुणका साथीला

शरीर होतं सुस्त,

जेवणा खाण्याचं सांगतो

एक  कॉम्बिनेशन असतं.

 

आमरसाचा टोप,

रसभरली वाटी ताटात,

डब्यात चवड पोळ्यांची,

सटासट पोटी उतरतात.

या दोघांच्या जोडीला मात्र

कुणीच लागत नसतं,

जेवणा खाण्याचं सांगतो

एक कॉम्बिनेशन  असतं.

 

कशाहीबरोबर संगतीला घेऊन

काही खायचं नसतं.

चुकलं चारचौघात

सांगा किती वाईट दिसतं,

जेवणा खाण्याचं सांगतो

एक  कॉम्बिनेशन असतं.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डोळ्यांची काळजी घ्या… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ डोळ्यांची काळजी घ्या ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

माझ्या मित्राच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. त्याला डॉक्टरांनी सांगितलेली पथ्यं …

1) डोळा मारायचा नाही,

2) कशावरही डोळा ठेवायचा नाही,

3) डोळ्यात डोळा घालून पहायचं नाही,

4) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ पाहायचं नाही, वर डोळे करायचे नाहीत.

5) दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचं नाही,

6) डोळे भरून पहायचं नाही,

7) कानाडोळा करायचा नाही,

8) डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत,

9) डोळे वटरायचे नाहीत, आणि सर्वात महत्वाचं

10) बायकोने डोळे वटारून पाहिलं तर तिच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही,

नाही तर परिणाम वाईट होऊ शकतात व पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येईल.

तेव्हा

नेत्रदान संकल्प करा

आणि

मृत्यू पश्चात नेत्रदान करा

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पन्नाशीच्या पुढचा म्हातारा ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पन्नाशीच्या पुढचा म्हातारा  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खूप टिकाऊ मासा जसा

चवीला नेहमीच खारट असतो,

तसाच

पन्नाशीच्या पुढचा  म्हातारा

थोडा जास्तच चावट असतो!

 

उजेडाचा त्रास होतो

म्हणून गॅागल वापरत असतो,

काळ्याभोर काचेमागून

“निसर्गसौंदर्य” न्याहाळीत असतो!

शेजारीण आली घरी की

आनंदाने हसत असतो,

बायकोला चहा करायला लावून

स्वत: गप्पा मारत बसतो

कारण

  पन्नाशीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच चावट असतो!

 

पाय सतत दुखतात म्हणत

घरच्या घरी थांबत असतो,

बाकी सगळ्या दिवशी मात्र

मित्रांबरोबर भटकत असतो!

चार घास कमीच खातो

असं घरात सांगत रहातो

भजी समोसे मिसळपाव

बाहेर खुशाल चापत असतो

कारण

पन्नाशीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच चावट असतो!

 

औषधाचा डोस गिळताना

घशामध्ये अडकत असतो,

पार्टीत चकणा खाता खाता

चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या

चारचौघात झोडत असतो

मैत्रीणींच्या घोळक्यात मात्र

रंगेल काव्य ऐकवत असतो

कारण

पन्नाशीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच चावट असतो!

 

पन्नाशीच्या पुढचा म्हातारा आता

निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या जुन्या

आठवणीत रमत असतो

म्हटलं तर ज्येष्ठ असतो

तरी बराच तरुण असतो

संपून गेलेलं तारुण्य

पुन्हा आणू पहात असतो

 

कारण

खूप टिकाऊ मासा जसा

चवीला नेहेमीच खारट असतो

तसाच

पन्नाशीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच चावट असतो!

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चहा वरुन स्वभाव ओळखूया ! ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  चहा वरुन स्वभाव ओळखूया ! ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बर्‍यापैकी अंदाज घेता येतो. आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा.

चहा घ्यायचा का? चला चहा घेऊ, स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. यांचा फारसा कुणाशी वाद नसतो.

चहाला प्रथमदर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात.

मोठा भुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा बाळगत नाहीत. जे योग्य वाटेल ते करून मोकळे होतात.

गरम चहा पटकन पिऊन टाकणारे सतत गंभीर विचार करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेचे टेन्शन घेतात.

चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेऊन पिणारे महत्त्वाच्या ठिकाणी उशिरा पोहोचतात.

चहाचा ग्लास अथवा कप हाताने पूर्ण कव्हर करून पिणारे केअरिंग असतात. आजारी व्यक्तीची जरा अधिक चौकशी करतात.

चहा गार अथवा गरम याचा फारसा विचार न करता पिणारे व्यवहार कुशल असतात.

विशिष्ट प्रकारच्या चहाची ऑर्डर देणारे फारसे कुणात मिसळत नाहीत.

विशिष्ट ठिकाणीच चहा घेणारे पटकन गैरसमज करून घेऊ शकतात.

चहा पिता पिता एखादा विनोदी किस्सा सांगणारे थोडेसे बेफिकीर असतात.

ग्लास अथवा कप विशिष्ट पद्धतीने धरूनच चहा पिणारे एखाद्या विषयात तज्ञ असतात.

सर्वांसाठी चहा सांगतात, पण स्वतः घेत नाहीत, असे चांगले सल्लागार असतात. क्षणात परिस्थिती ओळखतात.

नियमित प्रकारातला चहा न घेता विशिष्ट पद्धतीचा चहा घेणारे अबोल अनप्रेडिक्टेबल असतात.

चहा शिवाय ज्यांची बॅटरी चार्ज होत नाही, अशी मंडळी महत्वाच्या निर्णयांची बऱ्याच ठिकाणी खात्री करूनच ठरवतात.

बसूनच शांतपणे चहाचा आस्वाद घेणारे कमी लाभाची परंतु खात्रीशीर गुंतवणूक करतात.

बशीतून चहा घेणारे कोणत्याही बाबतीत लवकर कन्व्हिन्स होत नाहीत.

चहा घ्यायचा म्हणून घेणारे गाव मित्र असतात.

चहा गार करून पिणारे कलाकार असतात. बोलताना अचूक शब्दच वापरण्याकडे कल असतो.

चहाची वेळ अजिबात न चुकवणारे, प्रसंगी एकटा चहा पिणारे सहजपणे शब्दात अडकू शकतात.

अधून-मधून चहा घेणारे नर्मविनोदी असतात.

चहा संपेपर्यंत अजिबात न बोलणारे चिडखोर असू शकतात.

चहासोबत बिस्किट खारी अथवा पाव खाणारे कोणत्याही परिस्थितीत मध्यम मार्ग स्वीकारतात.

कोणत्याही प्रकारचा चहा बिलकुल वर्ज्य असणारे लोक स्वतःच करून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत राहत असतात.

चला तर मग येताय ना चहा घ्यायला?

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुलना थांबवा… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तुलना थांबवा… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

स्वतःची इतरांशी,

आपल्या मुलांची इतर मुलांशी,

आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी,

 आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्यांशी,

आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी

तुलना थांबवा…

 

एक छोटीशी गोष्ट…

एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो. त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात. त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो, याचा अभिमान असतो.

एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते, “हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही?”

तो पोपटाला जाऊन तसे सांगतोदेखील. पोपट म्हणतो, “जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते, तोपर्यंत मलासुद्धा असेच वाटायचे, की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.”

मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो,” तू किती सुंदर आहेस आणि नशीबवानसुद्धा. तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला.”

तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, “मला तर वाटते, सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तूच असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेऊ शकत नाही. तू स्वतंत्र आहेस.” हे ऐकून कावळ्याला कळते, तो किती नशीबवान आहे ते.

असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. पाच लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्र- मैत्रीण बारा लाख कमावतात, त्यांची असूया वाटते. बारा लाख कमावणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो, ‘पैसा तर खूप मिळतोय. पण शरीर साथ देत नाही. यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमावला असता, तर शरीर चांगल असतं.’ ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे.

 

एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल.

कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते.  पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते, याचं कौतुक त्याला वाटत नसतं.

मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला, यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असतं, पण आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो, याचा विचार ती कधी करतच नसावी.

 

तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात.

 

थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं,की ‘तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आम्ही शाळेतून त्याच नाव कमी करत आहोत.’

दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले, “मी शाळेत का जाऊ शकत नाही?” तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की , “तुझ्याएवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही. म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तो ही स्वतःच करावा लागेल.” आणि हे उत्तर ऐकल्या पासून एडिसन स्वतः ला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले.

जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती, तर ते एवढे महान झाले नसते.

 

जे आपल्याला मिळतं, त्याला काहीतरी कारण नक्की असतं. ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही. पण जे मिळालंय, त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.

इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात. खूप त्रास होत असतो.

आपण दिसायला सुंदर नसू, पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल.

आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू.

आपण लाखात कमवत नसू,पण आपलं आरोग्य उत्तम असेल.

आपण बाहेर देशात नसू, पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू.

आपल्याकडे खूप पैसा नसेल, पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील.

जे त्याला मिळालं, ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा, ‘हे मला का मिळालंय? यातून मी काय उत्तम करू शकतो?’ याचा विचार करा.

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरेदी…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरेदी…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

“तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”

“होय आहे.”

“कधी घेतलात?”

“झाली की १५-२० वर्षे.”

“व्वा! शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता  बहुतेक.”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुधा . हिला माहीत आहे.”

“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”

“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो!”

“पण मग घेतला कशाला?”

“अहो, एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.

चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला होता. मेव्हणी म्हणाली- जाळ्या, जळमटे फार छान निघतात.”

“काय सांगता! मग नसतील जाळ्या, जळमटे तुमच्या घरात?”

“नाही हो . कोणीही तो वापरायला नको म्हणतात. फार उस्तवार करावी लागते त्याची. सुरुवातीला मुलं भांडायची तो वापरायला. ..मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी, ‘अहो, तो व्हॅक्युम क्लिनर लावून जाळ्या काढून द्या ना.’

मी म्हणतो,’तिला तूच कर.’ तर म्हणते कशी… ‘हे पुरुषांचं काम आहे.’ “

“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”

“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा  आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.”

“मेव्हणी वापरते का?”

“नाही विचारलं कधी…. तिला काही विचारायची सोय नाही. …तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”

 

“बरं… आता ते जाऊन द्यात. ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे. रोज करता की नाही व्यायाम?”

“नाही हो… टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.”

“काढूयात का त्यावरचा टॉवेल?… अरेच्या! टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो सायकल…

“अहो, मुलांसाठी आणली, पण १५ दिवसांनंतर वापरतील तर शपथ.”

“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षांचा होता?”

“होता ५-६ वर्षांचा. अहो, तेव्हा मीच वापरणार होतो. हीपण म्हणाली होती की मी पण करीन व्यायाम. पण राहूनच गेले.”

“आता वापरून बघू यात का?”

“अहो, तिची चेनपण तुटलीय. ती बसवलीच नाही.”

 

“बरं ते जाऊ द्यात. हे काय आहे?”

“रोनाॅल्डचा फूड प्रोसेसर.”

“त्याचं काय करता?”

“यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात. अजून काय काय बरंच होतं.”

“अरे व्वा! वहिनींचा त्रास कमी झाला असेल नाही.”

“ नाही अहो, आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरुवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा परातीत कणीक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे, पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.”

“मग घेताना लक्षात आले नाही?”

“अहो, तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला. तिने फार कौतुक केले. मग आम्हीपण घेतला.”

“ती मैत्रीण वापरते का?”

“काय की बुवा?… हे बघा, ही म्हणाली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. मी विचारत नाही- का? कशाला?”

 

“बरं ते जाऊन द्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”

“हो. आहे ना.”

“शेवटचा कधी घातलात?”

“आमच्या लग्नात.”

“म्हणजे किती वर्षे झाली.”

“दहा.पंधरा”

“मधे कधी घालून बघितलात?”

“पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”

“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.”

“नाही. नंतर एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बस इतकाच.”

“काय किंमत होती?”

“त्या काळात दहा हजार असेल.”

“मग वहिनींचा लग्नातला शालू त्या अजून वापरतात?”

“नाही. तो शालू प्रत्येक वेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”

“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?”

“ हो ! म्हणजे वापरला, पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना, दर वेळी तोच तोच शालू वापरला, तर इतर बायका हसतील, असे तिला वाटते.”

“शालू आणि कोट कुठे आहेत?”

“वॉर्डरोब मध्ये. जागा अडवतायत.”

“बरं ते जाऊ द्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. कधी घेतला?”

“फार वर्षे झाली.”

“कधी वापरला जातो?”

“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. ३६ पीस होता. आता ३५ पीस राहिलेत.”   

“मग दुसरा बाउल आणायचा ना!”

“अहो, तसाच मिळत नाही ना… मग ही म्हणाली, मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.”

“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”

“हो ना. तो प्रश्नच आहे. ही म्हणते, क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरणीचा भरवसा नाही, कधी फोडतील ती. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.”

“शोकेसमध्ये छान दिसतो पण.”

“हो ना. आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.”

“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”

“ बरेच !…खूप आहे की . राईस कुकर, कॉफी मशीन, शिवणाचं मशीन आणि अजूनही बरंच काही.”

उगाच हसू नका. तुमच्या घरात काही वेगळे नाही. तुम्हांला विचारले तर तुमची उत्तरेदेखील अशीच, हीच असणार.

पण तुम्हांला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी. काही लोक सेकंड होमदेखील असेच उगाच नाशिक , पुना, मुंबई,तळेगावला घेतात. काही लोक फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षांत एकदाच जातात,तर रस्ताच विसरलेले असतात. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात.

 तुम्ही फार बरे आहात. थोडक्यात आहे अजून.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉलमध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली, की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे.सासू, सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे. पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी.मुलांची बस येणार नव्हती.सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती.तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येताना मुलांना घेऊन येऊ.”

नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं. लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे.त्यानंतर बहुधा पहिल्यांदाच दोघे बाहेर जात होते.एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना.

तिने छानपैकी तयारी केली.  दोघेही निघाले. मुलांना शाळेत सोडलं. तिला खूप वेगळं वाटत होतं.स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागली , पण मग सासू सासरे घरात नाहीत,असं आठवलं नि परत निर्धास्त झाली.

त्याने मॉलकडे गाडी वळवली. मॉलमधले मोठमोठे शॉप्स बघत दोघे चालत होते.ती तिथल्या बायकाही बघत होती.

वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस.मेकप मध्ये असलेल्या तिच्याहून अधिक वयाच्या बायका. एकदम मॉडर्न.अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती.जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती. पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…

एका दुकानापाशी थांबली.होम डेकोरचं साहित्य होतं तिथे. ती हात लावून एकेक बघत असताना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे. काही कामाचं नाही. चल इथून.” दुसरीकडे प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं  मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”

“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं.तू चल इथून.”

ती निघाली,

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,

चांगल्या धातूच्या सुंदर कढया बघू लागली,

पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला.

तो म्हणाला, “जड आहे खूप.”

“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून.”

“असं काही नसतं.तुला नाही कळत त्यातलं.चल.”

तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली.

नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले.

ती म्हणाली, ” मी मुलं खातात, तसा पिझ्झा खाणार.”

तो म्हणाला, “मी ऑर्डर देऊन येतो.”

“मी जाऊ का? तुम्ही बसा.”

तो हसला,”तुला नाही जमणार.मॉल मध्ये आहोत आपण.कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही.”

तीही हसली.तिनेही आपलं ‘न जमणं’ मान्यच केलेलं.

तो काउंटर वर गेला.गर्दी होती तिथे.

ती आजूबाजूला बघू लागली.

एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता.

मॉलमध्ये त्या फ्लोरच्या मधोमध एक छोटासा स्टेज होता. आजूबाजूला बरीच गर्दी होती.माईकवरुन आवाज येत होता.

काय असेल? तिला कुतूहल वाटलं.

नवरा लाईनमध्ये उभा होता. त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली.

“Now next contestant? Please step forward.”

तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते. सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरिरीने भाग घेत होत्या. ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली, तिला नाही.तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला.

अरे देवा, हे कुठलं संकट…!

ती मागे फिरू बघत होती, पण तो मुलगा ओरडला,

“ओह मॅडम, तिकडे कुठे? इकडे या.”

ते ऐकून ती अजूनच घाबरली.

स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली. तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं.

त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता.

 

इंग्रजीमधले अवघड स्पेलिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते. ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता.

तिला दरदरून घाम फुटला.

सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, तिला कुठे काय येत होतं?

त्यांना पहिला शब्द दिला-

लेफ्टनंट.

सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं.

तिला आठवलं,

सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता.त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली.तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं.

तिने बरोबर स्पेलिंग लिहिलं.

बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,

पुढचं स्पेलिंग- बुके.

तिला आठवलं, मुलांचे तपासलेले पेपर घरी आलेले, तेव्हा मुलाने हे स्पेलिंग चुकवलं होतं. टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलं.ते तिच्या लक्षात होतं.

एक बाई आऊट झाली.

आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली.

पुढचं स्पेलिंग- रेस्टरन्ट.

तिच्या डोक्याला मुंग्या आल्या.सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं.डोळ्यात पाणी जमू लागलं.

नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोलून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात.

फक्त नजर तीक्ष्ण हवी.”

तिला येईना. तिने आजूबाजूला पाहिलं.

लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,

“कॉंटिनेंटल रेस्टोरेंट.”

तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं.

दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,

ती जिंकली.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,

माईकवर तिचं नाव ऐकलं, तसा तो ट्रे टेबलवर ठेवून तिकडे पळाला.

त्याला सगळं समजलं. तो हैराण झाला.

सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती. मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…

ती आनंदाने त्याच्यापाशी आली,”तू आणि इंग्रजी स्पेलिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेलिंग विचारलेली की काय? हा हा हा.” तो या गोष्टीकडे गंमत  म्हणून बघून हसत होता.

“अशी स्पेलिंग होती, जी तुम्हालाही जमली नसती.”

“मग तुला कशी जमली?”

“कसं आहे ना,

आजवर तुला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही, हेच ऐकत होते. आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला.तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी.पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले.कदाचित, उशिराच…”

तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..

नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला.सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला. काही जमेना..

तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,

“सोडा, तुम्हाला नाही जमणार.”

जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, आधिपत्य गाजवणं म्हणतात.

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

पण महत्वाचा, अनुभवल्याशिवाय न समजणारा

 ‘मी’ आणि’ तू’ यांचा मिळून बनतो शब्द ‘मैत्र’

हे मैत्र ज्यांच्यात असतं, ती भावना म्हणजे ‘मैत्री’

 सर्व भेदांना छेदून जाते ती ‘मैत्री’

एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास म्हणजे ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट करताना झालेली आठवण म्हणजे ‘मैत्री’

दोन आत्म्यांना जोडणारे, तरीही मुक्त असणारे बंधन म्हणजे ‘मैत्री’

असे बंधन जे स्थळ, काळ, वेळ, स्त्री, पुरूष सर्वांच्या पलिकडचे..

बंध असूनही बंधनात न ठेवणारे…

सर्व नाती जपूनही नात्यांच्या पलिकडचे…. कोणतेच नाते नसूनही सर्व नाती जपणारे-

कोणतीही गोष्ट हक्काने केव्हाही शेअर करावीशी वाटणे म्हणजे ‘मैत्री’

एकमेकांना समजून घेते, समजावते ती ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट लपवावीशी वाटत नाही ती ‘मैत्री’

षडरिपुंच्या पलीकडे जाऊन आदर करते ती ‘मैत्री’

एकमेकांच्या उणिवांसहित केलेला स्वीकार म्हणजे ‘मैत्री’

मनातले न सांगताच समजून घेते ती ‘मैत्री’

एकमेकांचा आदर करते आणि हक्कही गाजवते ती ‘मैत्री’

नशीबवान माणसांनाच लाभते अशी ‘मैत्री’

खरंच किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

लेखिका – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छापा की काटा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छापा की काटा…? ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

दोघांचीही निवृत्ती झाली होती,

साठी कधीच ओलांडली होती,

अजूनही परिस्थिती ठीक होती, 

हातात हात घालून ती चालत होती —

 

तो राजा ती राणी होती

जीवन गाणे गात होती

झुल्यावरती झुलत होती

कृतार्थ आयुष्य जगत होती —-

 

अचानक त्याची तब्बेत बिघडते,

मग मात्र पंचायत होते,

तिची खूपच धावपळ होते,

पण कशीबशी ती पार पडते,—-

 

आता तो सावध होतो,

लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,

वारसाची पुन्हा खात्री करतो,

मृत्यूपत्राची तयारी करतो —- 

           

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,

पासबुक तिच्या हातात ठेवतो,

डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,

तिलाच पैसे काढायला लावतो, —-           

 

पुन्हा तिला सोबत घेतो,

वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो, 

तिलाच रांगेत उभं करतो,

बिल भरायचं समजाऊन सांगतो,—- 

 

अचानक तिला सरप्राईज देतो,

टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो,

वाय-फाय नेटची गंमत सांगतो,

ऑन लाईन बॅकींग समजाऊन देतो,—-

 

तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,

नवा सोबती जोडून देतो

बाहेरच्या जगात ती वावरू लागते,

प्रत्येक व्यवहार पाहू लागते,—- 

 

कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो,

निश्चिंत होत तो हळूच हसतो,     

बदल त्याच्यातला ती पहात असते,

मनातलं त्याच्या ओळखतं असते,—-

 

थोडं थोडं समजतं असते,

काळजी त्याचीच करत राहते,

एक दिवस वेगळेचं घडते,

ती थोडी गंमत करते,—-

 

आजारपणाचा बहाणा करते,

अंथरूणाला खिळून राहते,

भल्या पहाटे ती चहा मागते,

अन् किचनमध्ये धांदल उडते,—-

 

चहात साखर कमी पडते,

तरीही त्याचे ती कौतुक करते,

नाष्ट्यासाठी उपमा होतो,

पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,—-

 

दिवसा मागून दिवस जातो,

अन् किचनमधला तो मास्टर होतो,

कोणीतरी आधी जाणार असतं,

कोणीतरी मागं रहाणार असतं,—-

 

पण …… 

पण मागच्याचं आता अडणार नसतं,

अन् काळजीच कारण उरणार नसतं,

सह-जीवनाचं नाणं उडत असतं,

जमीनीवर ते पडणार असतं,

 

आधी काटा बसतो की छापा दिसतो,

प्रश्न एकच छळत असतो……. 

                             प्रश्न एकच छळत असतो……. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य? – ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

‘मुलांना एका विशिष्ट उंचीवरून सुरूवात करता आली तर आकाशाला हात लावणं सोपं होईल का? आपण दिलेल्या सोयींचा, वस्तूंचा देतानाच जर महत्त्व समजावून दिले तर मुलं त्याचा गैरवापर करत नाहीत असं माझं मत. नक्की सांगा तुमचे अनुभव, तुमची मतं.

प्रत्येकानेच शून्यापासून सुरूवात केली तरच ते यशस्वी होतात हे पटतं का तुम्हाला? की मुलांनाही पालकांच्या कष्टाची जाणीव असते ?

नक्की सांगा काय वाटतं?’ 

 – ॲड. ऋचा मायी

सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?

“बाबा मला बाईक हवी आहे. आजूबाजूला जायला बरी पडते, ऑटोमधे उगाच सारखे पैसे फार लागतात. ” कार्तिक बाबांना म्हणाला.

“अरे मग चाल की जरा, जवळपास जायला बाईक कशाला हवी? तुझे आजोबा दहा दहा मैल चालायचे रोज आणि तुझ्या बाबाला पण आम्ही बाईक दिली नव्हती, बसने जायचं किंवा सरळ चालत.

हे आजकाल नुसती चावी फिरवायची की निघायचं, ह्यामुळेच आजार वाढत चालले आहेत. तुम्ही आजकालची पिढी म्हणजे कठीण आहे. कॉलेजात पाय ठेवत नाही तर मागण्या सुरू. ” जुन्या काळात काटकसरीने, निगुतीने संसार केलेली आजी नातवाची कानउघाडणी करत होती.

“अगं आजी माझं कॉलेज बघ किती मोठं आहे! नुसतं हॉस्टेलपासून क्लासमधे जायचं तर भरपूर चाललं जातं. परत सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं ठरतं मित्रांचं, मग सगळ्यांकडे वाहन असतं, फक्त माझ्याकडे नाही. मग ह्याला गळ घाल, त्याला गळ घाल करावं लागतं उगाच. बाबाला घेणं शक्य आहे म्हणूनच मागितली बाईक. ”

कार्तिक जरा वैतागला होता पण आजीशी आवाज वाढवून बोलायचा रिवाज नव्हता देशपांडेंकडे, थोडं ठसक्यात तो आपला मुद्दा सोडत नव्हता इतकंच.

“तुम्ही ते हायफाय कॉलेज निवडलं ना तेव्हाच खरं तर मला पटलं नव्हतं, मी बोलले पण होते बाबाला. आता सगळे चोचले पुरवावे लागतील देखादेखीमधे. आज बाईक, उद्या ब्रँडेड कपडे, परवा अजून काही, अभ्यास करायला गेला आहात एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. ” 

आजीच्या बोलण्यात नातवाबद्दल धाकधूक दिसत होती. आपण खर्चाला मोकळीक दिली म्हणजे मुलं बिघडतात, हा एक साधा हिशोब पिढ्यानुपिढ्या ऐकत आली होती ती.

नातवावर प्रचंड जीव होता, त्यामुळेच त्याचं पाऊल कुठेच घसरता कामा नये ह्यासाठी तिला काहीही विचारलेलं नसताना तिचे सल्ले सुरूच होते.

“मुलांना जितकं आपण तावून सुलाखून वाढवतो तितके ते तयार होतात, जितके जास्त त्यांचे नखरे पुरवाल तितके अंगाशी येईल महेश, अनुभवाचे बोल आहेत हे. नका त्यांच्या सवयी बिघडवू.

आजोबा जर करू शकतात मेहनत, बाप जर करू शकतो तर मुलगाही करूच शकतो ना?”

आजी जरा आता ताणते आहे हे दिसल्यावर कार्तिक ने तिथून मी क्रिकेट खेळायला जात आहे सांगून पळ काढला.

“आई, अगं हे सगळं त्याच्यासमोर बोलायची काय आवश्यकता होती? मी काही लगेच बाईक देणार नव्हतोच पण जरा त्याच्या कलाने घेऊन समजावलं असतं ना. सगळ्या मित्रांकडे आहे तर वाटतं मुलांना. ” बाबांनी कार्तिकची बाजू घेत म्हणलं.

“पालकांना आपलं मूल बरोबर माहित असतं, कार्तिक अत्यंत विचारी मुलगा आहे आणि त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीच, सुखसोयींचं तो सोनंच करेल ह्या आजोबाचे पण अनुभवाचे बोल आहेत.

हजारो मुलं गेली आहेत डोळ्याखालून इतके वर्षाच्या शिक्षकी पेशात नजर तयार आहे माझी. वाहीयात मुलं एका नजरेत ओळखू येतात. “

“आजोबा थॅन्क यू” म्हणत क्रिकेट खेळून घरात शिरणाऱ्या कार्तिकने पळत येऊन आजोबांना मिठी मारली.

आजोबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बळ तर मिळालं होतं पण एक जबाबदारी पडली होती खांद्यावर, मेहनत करून शून्यापासून पन्नास पर्यंत पोहोचलेली देशपांड्यांची गादी लवकरात लवकर शंभरी पार न्यायची.

लाखाचे बारा हजार करणारी आमची पिढी नाही हे आता सिद्ध करायचं ठरवलं होतं त्याने.

बाबा म्हणाले, ”आई ऑफिसहून आली की जाऊ बाईक बघायला, मग पुण्याला पोहोचलास की तिथेच डिलीवरी मागवू. ”

आजीने बटव्यातून पैसे काढून नातवाच्या हातात ठेवत म्हणलं, ”बाईकच्या आधी हेलमेट घ्यायचं कार्तिक, त्याच्याशिवाय चालवली ना तर आजीशी गाठ आहे. ”

कार्तिकला आजीचा विरोध मावळलेला बघून मनापासून आनंद झाला होता. आता एक डगर आई आल्यावर लढावी लागणार होतीच. कारण बाईक म्हणलं की आईचा विरोध असणार होता. लाड म्हणून नसला तरी सुरक्षिततेसाठी नक्कीच असणार होता. पण आई घरी यायच्या आधी आजी तयार झाली असल्याने आईला मनवणे सोपे जाणार होतं आणि नाहीतर आजोबा होतेच, हुकमी एक्का!

लेखिका – सुश्री ऋचा मायी

दिल्ली

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print