मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवन… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ जीवन… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. 

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, ” काही त्रास नाही ना झाला ?”

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

… काही क्षण असेच गेले…

… आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, ” झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ? “

म्लान पाकळ्यांवर मंद स्मित झळकलं. 

… फुल म्हणालं, ” निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं….  

… पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा…. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. 

… पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो, त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “

” तू आता स्वतंत्र झालास खरा. पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, ” आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असेतोवर जमेल तितके जग पाहून घेईन….. मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन…. पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन. त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेनच !”

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली… 

आपलं आयुष्यही असंच आहे.

… संसार, कुटुंब, आप्तेष्ट, मित्र, ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं… 

… मग सुरु होते एका जीवाची एकाकी सफर, जी आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देते. 

… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, कारण इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.

… नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो ! 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती …’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

“दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती”….

… कोथरूड पुणे येथे घडलेली ही एक सत्यघटना ! 

कोथरूडच्या रोटरी क्लब मध्ये ‘ब्लड डोनर्स’ ची लिस्ट तयार केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन येतो, ” एका मुलाचा accident झालाय. खूप bleeding झालंय. O- blood group असलेले कुणी डोनर असतील तर त्यांचे नाव व पत्ता मिळेल का? ” … लिस्ट चेक केली जाते व त्या व्यक्तिचे नाव व पत्ता त्या फोन करणाऱ्या व्यक्तिला दिला जातो. ते कार्यकर्ते गाडी घेऊन त्या पत्त्यावर जायला निघतात. 

घराच्या जवळ गाडी येते. बघतात तर काय, एक गृहस्थ रस्त्यावर येऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखे उभे असतात. ते गाडीला हात करून थांबवतात. “… हाँस्पिटल मधून आलात ना ? 

मीच आहे डोनर. हे माझे कार्ड “. कार्यकर्ते झटकन गाडीचे दार उघडून त्यांना गाडीत घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह असतं. काका खुलासा करतात..” मलाही फोन आला होता, काही कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील म्हणून. तुम्हाला घर शोधायला अडचण येऊ नये म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो.”…

हाँस्पिटल येते. काका ब्लड डोनेट करतात. त्या जखमी मुलाला ते रक्त दिले जाते. त्याचा जीव वाचतो. कार्यकर्ते परत काकांना घरी सोडायला निघतात. त्यांच्या घराच्या गल्लीत गाडी वळते. लांबूनच काका म्हणतात,  “ इथेच सोडा मला. जातो मी पुढे माझा माझा “.  ती मुले गाडीतून बघत असतात काकांच्या घराकडे. ती म्हणतात,” काका, तुमच्या घरापुढे एव्हढी गर्दी कसली दिसतीये? काय झालंय? Anything serious? आम्ही येऊ का आत? “…… 

काका शांत होते. मग उत्तरले, ” आता सांगायला हरकत नाही. सकाळी तुम्ही आलात तेव्हा माझ्या एकुलत्या एक मुलाचे निधन झालेले होते. त्याचे पार्थिव घरात आणलेले होते. इतक्यात क्लबमधून रक्ताची गरज असल्याचा फोन आला. माझा रेअर ग्रूप आहे. मी एक क्षण विचार केला, माझा मुलगा आता काही केले तरी परत येणार नाही. पण कुणाच्या तरी मुलाचे प्राण मी वाचवू शकतो. मी निर्णय घेतला. पहिले ब्लड डोनेशन करून यायचे. मग अंत्यसंस्कार !. पण तुम्हाला हे समजलं असतं तर तुम्ही मला घेऊन गेला नसता. म्हणून मी घरापर्यंत तुम्हाला येऊच दिलं नाही व मी बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो. पण आता शेवटी ते तुम्हाला समजलंच “….. 

कार्यकर्ते सुन्न झाले. डोळे फाडून ते काकांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. गाडी वळवायचे भान ही त्यांना राहिले नाही. नकळत त्यांचे हात जोडले गेले..

 वंद्य वंदे मातरम्

 राष्ट्रहित सर्वोपरी 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाणं आणि कविता… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ गाणं आणि कविता… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मित्राने आज विचारलं..

असा काय फरक आहे रे गाणं आणि कवितेमधला ??

 

मी म्हणालो…

मित्रा..

शब्दांचे अर्थ कळले.. तर गाणं

आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले.. तर कविता

 

‘कर्म’ म्हणून यमक जुळवलंस.. तर गाणं

आणि ‘मर्म’ म्हणून यमक जुळवलंस.. तर कविता 

 

‘पान’ भरण्यासाठी लिहिलंस.. तर गाणं 

आणि ‘मन’ भरण्यासाठी लिहिलंस.. तर कविता

 

पुरस्कार मिळावा म्हणून लिहिलंस.. तर गाणं

आणि लिहिल्यावर पुरस्कार मिळाला असं वाटलं.. तर कविता

 

काहीतरी ‘सुचलं’ म्हणून लिहिलंस.. तर गाणं

आणि काहीतरी ‘साचलं’ म्हणून लिहिलंस.. तर कविता

 

थोडक्यात ‘जगण्यासाठी’ लिहिलंस.. तर गाणं 

आणि ‘मरण्यासाठी’ लिहिलंस.. तर कविता 

 

आता.. 

तळहातावर घे सप्तरंग.. मग डोळे मिट आणि उधळून टाक दाही दिशांना.. मग डोळे उघड..

 

तळहाताच्या रेषांवर ‘उरलेल्या’ रंगांची नक्षी.. म्हणजे गाणं

आणि.. दिशांवर उधळलेल्या रंगांची ‘बदलत जाणारी’ नक्षी.. म्हणजे कविता

 

पण.. याही पलीकडे.. एखाद्या क्षितिजाच्या पार..

‘सहज’ म्हणून एखादं ‘गाणं’ लिहिता लिहिताच ‘अचानक’ डोळ्यात पाणी आलं.. तर समज.. झालं आहे एका अस्सल ‘कवितेचं’ गाणं…

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री आणि पर्स… ☆ सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्त्री आणि पर्स… ☆ सुश्री सुनीता जोशी ☆

स्त्रीच्या आयुष्यात “पर्स” म्हणजे एक अविभाज्य घटक आहे !

कुठेही जायचे तर “पर्स” हवीच !!

.

काहीही विकत घ्यायचे नसेल तरी पर्स हवीच !!

.

ह्या मागची कारणमीमांसा थोडक्यात —-.

#सखी …. स्त्रीची एक जिवाभावाची सखीे….. तिच्याशिवाय ती अजिबात राहू शकत नाही,… जिथे ती तिथे पर्स आणि … ही सखी म्हणजे तिची पर्स

.

इतर सगळ्या बायकांच्यासारखं तिची पर्स म्हणजे एक अखंड जग आहे….

.

नको त्या वस्तू लगेच सापडणार आणि

हवी ती वस्तू नको झाल्यावरच सापडणार .

.

मोबाईल ची रिंग पूर्ण वाजून गेल्यावर ,

मिस कॉल पडल्यावर फोन सापडणार

.

गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधताना मात्र हाच फोन दर दोन सेकंदला हातात येणार*.

.

*अचानक येणारी शिंक लपवायला रुमाल शोधावा

तर कंगवा न चुकता हातात येणार……

.

सुटे पैसे हवे असतील तेव्हा नोटा आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार….

.

… या गोंधळातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्री बरेच उपाय करते,अनेक कप्पे असलेली पर्स आणते.

आणल्या आणल्या प्रत्येक कप्प्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचं हे ठरवते.

.

पण हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही….आईच्या मायेने सगळ्या चित्रविचित्र वस्तू पोटात घेऊन ती पुन्हा गोंधळ घालायचा तो घालतेच…….

.

त्यानंतर मग स्त्री एक कप्पा असलेली मोठी ,सुटसुटीत पर्स आणते,मग काय विचारता..

पर्समधे ठेवलेल्या वस्तू “तुझ्या गळा,माझ्या गळा” गाणं गात अगदी गळ्यात गळे, पायात पाय घालून एकजीव होतात…. आणि त्यांना वेगळं करण्याचं महापातक करताना स्त्रीचा जीव निघतो..

.

महत्वाच्या वस्तू, कार्ड्स ठेवायला स्त्री चोरकप्पे असलेली पर्स आणते. पण हा कप्पा कार्डांना आपल्यात कधीच सामावून घेत नाही. ती बिचारी अशीच इकडे तिकडे पडून राहतात, आणि ह्या चोरकप्प्याला रबर, पीन्स, टिकल्या, टुथपिक्स असल्या गोष्टीच आवडून जातात.

.

*एखादं पुस्तक नेहमी बॅग मध्ये ठेवत असते स्त्री, पण ते वाचायला वेळ असा मिळत नाहीच. म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते, नेमकं कुठंतरी वाट बघत बसायची वेळ येते.*

.

.नेहमी लागणारी औषध, वेलदोडा, चणे फुटाणे, चॉकलेट्स, पेन्सिल, लाल आणि निळ्या रंगाची पेन्स,

लिपस्टिक, पावडर कॉम्पॅक्ट, घरच्या किल्या, अशी न संपणारी वस्तूची यादी असते तिच्या पर्समध्ये ..

.

.त्या शिवाय हिशेब लिहायला एक छोटी वही (जिच्यात नंतर हिशोब लिहू असं ठरवून काही हिशोब लिहिलेला नसतो). .

.

अनेक लोकांची कार्डस (जी कधीच उपयोगी पडत नाहीत,आणि नेमक्या वेळेस सापडत नाहीत),अशा चिक्कार गोष्टी असतात.

.

.तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र फार गॅरेंटी नसते.

.

…… पण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे हे नक्की…तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाही, कारण तिला फार एकट आणि असुरक्षित वाटतं.

.

*जुनी पर्स बदलणे म्हणजे तिच्यासाठी एक दिव्य असते, “जा मुली जा”अशी भावूक अवस्था असते तिची..*.

नवीन पर्स रूळे पर्यंत जुनी पर्स किती छान होती, हिच्यात काही अर्थ नाही असं म्हणून नव्या पर्सला नावं  ठेवता ठेवता तिच्यावर अवलंबून राहायला सुरु होणे ….. या सगळ्या चक्रात ना स्त्री व्यवस्थित पर्स लावते ना ती व्यवस्थित राहते.

.

….. अशीच स्त्रीची व पर्सची जोडगोळी भटकत राहते, मजा करत, मजा लुटत……

© सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

” हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे .”… नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज 

म्हणाली . आणि सासुबाईंचे डोळे भरून आले .

” मला कशाला ग एवढे लागतात ? “

” अहो , दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून . दारावर भाजी , फळवाले येतात . कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते . शिवाय तुमची भिशी असते. राहू द्या तुमच्याजवळ .”

” अग , पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची .ते असतांना त्यांच्याकडे मागत असे , आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते .” .. सासू हसून म्हणाली .

” तुम्ही भिशीच्या ग्रुपबरोबर सिनेमा , भेळ पार्टी , एखादं नाटक, असे कार्यक्रम ठरवत जा . जरा मोकळं व्हा आई . ह्यांनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते . मोठे दादा तर वेगळे 

झालेत , ताई सासरी खूष आहेत . मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा .मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात … आता जगा स्वतःसाठी . “

” इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”

” मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती. आईने पटकन सहाशे रुपये काढून 

हातावर ठेवले . म्हणाली , ‘ तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा , ‘आजी कडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला , खेळणी घेऊन द्या ….’ आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती . ‘ एवढे पैसे कधी 

मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग ‘  असे म्हणाली होती … तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ……आई , मला माहितेय , घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न ? किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ….शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील … तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ……….तुमची पेन्शन राहू द्या आई .मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन . ” 

” अग , सगळं आजच बोलणार आहेस का ? जा आता तुला उशीर होईल. “

“मला बोलू द्या आई .हे मी माझ्या समाधानासाठी करतेय  . आई म्हणते , की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर , प्रेमच उगवेल . “

…. सासूने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले . ती दिसेनाशी होईपर्यंत दारात उभी असतांना 

तिच्या मनात आले … 

‘ सून आल्यावर मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते. तू उलट  कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस ….. ‘ 

…… ज्या घरात लेकी सुना सासूचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतोच मुळी. 

जेथे असेल आपुलकी .. प्रेम .. जिव्हाळ्याचे अस्र … 

….. तेथे फिके पडते वास्तुशास्त्र. 

खरंच ,,,,,,, सासू अन सुनेमधे असा बदल झाला तर …. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परवा अचानक…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “परवा अचानक…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

परवा अचानक….  

शाळेतला जुना बाक भेटला..

शरीर तुटकं पाय बारीक,

थोडा म्हाताराच वाटला…

 

“ओळखलसं का मला?”,

विचारलं त्याने हसून…

वेळ असेल तुला तर,

बोलू या थोडं बसुन…

 

गाडी पाहताच आनंदला,

हलवली तुटकी मान…

” खुप मोठा झालासं रे,

पैसा कमावलास छान “.. 

 

“ओळखल्यास का बघ ह्या,

माझ्यावरच्या रेघा…

भांडण करुन मिळवलेली,

दोन बोट जागा…

 

अजूनही भेटतात का रे, 

पक्या, मन्या, बंटी…?

टाळ्या देत करत असाल,

मनमोकळ्या गोष्टी…

 

डबा रोज खाता का रे,

एकमेकांचा चोरुन?

निसरड्या वाटा चालता का,

हाती हात धरुन..?… 

 

टचकन् डोळ्यात पाणी आलं,

कंठ आला भरुन…

मित्र सुटले, भेटी सरल्या,

सोबत गेली सरुन…

 

धावता धावता सुखामागे,

वळून जेव्हा पाह्यलं…

एकटाच पुढे आलो मी,

आयुष्य मागे राह्यलं…

 

त्राण गेलं, आवेश संपला,

करावं तरी काय..?

कोरड पडली घशाला,

थरथरले तरणे पाय…

 

तेव्हढ्यात आला शेजारी,

अन् घेतलं मला कुशीत…

बस म्हणाला क्षणभर जवळ,

नक्की येशील खुशीत…

 

“अरे वेड्या पैश्यापाठी,

फिरतोस वणवण…

कधी तरी थांबून बघ,

फिरव मागे मन…”

 

मित्र सगळे जमव पुन्हा,

जेव्हा येईल वीट…

वंगण लागतं रे चाकांना,

मग गाडी चालते नीट…

 

शाळेतल्या त्या सोबत्याचा,

खूप आधार वाटला…

परवा अचानक शाळेतला,

जुना बाक भेटला…

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

कबूल आहे तिचंच असतं घर

पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

 

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी

पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी 

नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी

फार नाही, पुरेल तिला मदत जराशी

लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून

सांगावं मनातलं काही जवळ बसून

ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

आई राहून सासरी लेकीला माहेर देते

पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?

जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण

मग आईला कुठलं माहेरपण?

 

तिला ओळखणारं तिचंच अंगण

समजूतदारपणावर विश्वासलेलं मोकळेपण

शरीर मनाला विसाव्याचे क्षण

आईलाही हवं असेल का माहेरपण?

 

आईलाही हवा असेल कधी विसावा

वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा

ज्या हातांना तिनेच लावलंय वळण

आईलाही द्यावं कधी माहेरपण…… 

 

 देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला.

… .’ तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले…आणि विचारलं दुसरं काही मागा….  तर तुम्ही काय मागणार..?? ‘ 

….त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

” माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार …. कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही. “ 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त भेट…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “फक्त भेट…” 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा 

काय चाललंय मनात तुझ्या 

भेटून फक्त बोलत जा 

मोकळं सोड स्वतःला जरा 

कधीतरी मोकळं होत जा 

हलकं वाटेल तुझंच तुला 

मन रिकामं करत जा 

जुन्या आठवणी गप्पागोष्टी 

आमच्यात सुद्धा रमत जा 

आलेच कधी वाईट विचार 

बिनधास्त फोन करत जा 

काय आहे आयुष्य अजून 

निदान मनातले वाटत जा 

पहा किती फरक पडतो 

आनंद तेव्हढा लुटत जा 

पन्नाशीला आलोय आपण 

संपर्कात तेव्हढं रहात जा 

काय हवं काय नको तुला 

कुणाला तरी सांगत जा 

मित्र असतात कशासाठी 

मैत्री तेव्हढीच जपत जा 

आम्ही फक्त मस्त जगतो 

तसाच मस्त जगत जा 

पैसा नाही लागत त्याला 

मनातले मात्र सांगत जा 

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा …… 

           येवून फक्त भेटत जा …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा कॅन्सर… भाग-२ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा कॅन्सर… भाग-२ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.) इथून पुढे —- 

आता मला अधिक जोरदार केमो दिली गेली. यावेळी ती इंजेक्शने घ्यायला ‘टीएमएच’मध्ये जाण्याचे ठरले. सुहास माझ्याबरोबर येत असे. प्रत्येक इंजेक्शननंतर चोवीस तास सतत उलट्या होत, मग पूर्ण थांबत. अशक्तपणा खूप असे. या वेळी मी दोन दिवस माहेरी राहून विश्रांती घेत असे. दुसऱ्या इंजेक्शननंतर खूप केस गळले, तिसऱ्यानंतर सगळेच केस गेले. एक लांब केसांचा टोप किंवा विग माझ्या भावाने कुणाकडून तरी करून आणला. एवढा मोठा विग मला फार जड होता, त्याने भारी उकडत असे. मग त्या विगचे केस कापून, आटोपशीर पोनी टेल बनवून घेतली. बाहेर जाताना मी तो लावत असे, घरात एक स्कार्फ पुरे. जानेवारी १९८९नंतर दुसरी केमो संपली, अशक्तपणा खूप होता; पण आता टामोक्सिफेनच्या गोळ्यांव्यतिरिक्त काही औषधे नव्हती. पुढे पाच-सहा महिन्यांनी बऱ्यापैकी केस आले.

आम्ही १९८९च्या जूनमध्ये पुण्यात राहायला गेलो. ‘आयुका’ची स्थापना होत होती. पुणे हे आयुर्वेद वैद्यकीचे माहेरघर. माझ्या आईचे वैद्यकीय शिक्षण आणि काम तिथेच झाले. पुण्यातील वैद्यांचे औषध घ्यावे, म्हणून मी आईचे सहकारी वैद्य भा. पु. नानल यांच्याकडे गेले. त्यांना स्पष्ट विचारले, ‘आयुर्वेदात कॅन्सरसाठी औषध दिले आहे का?’ त्यांनीही तेवढ्याच स्पष्टपणे सांगितले, की तसे औषध नाही. आयुर्वेदाची रचना झाली, तेव्हा या रोगाची आता आहे तशी माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘मी कॅन्सरसाठी औषध देणार नाही; पण या रोगाचे भयावह रूप त्याच्या शरीरात इतरत्र पसरण्यात किंवा सेकंडरीजमध्ये असते. तुझ्या शरीरात अशा सेकंडरीजना थारा मिळू नये, महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण व्हावे, म्हणून तुझे एकूण शरीर चांगले सुदृढ, टणक करण्याचा प्रयत्न करणार.’ मला त्यांचे म्हणणे पटले. मी त्यांची औषधे चार-पाच वर्षे घेतली, एकंदरीत प्रकृती चांगली झाली. नंतर त्यांच्या परवानगीने हळूहळू औषधे बंद केली. त्यानंतर २०२१च्या सप्टेंबरपर्यंत, म्हणजे १९८८च्या सेकंडरी प्रादुर्भावानंतर ३३ वर्षे मी निरोगी राहिले, त्याचे काही श्रेय मी स्ट्राँग केमोथेरपीला, काही आयुर्वेदिक औषधयोजनेला, काही माझ्या नैसर्गिक प्रकृतीला, तर थोडे श्रेय भाग्य या सर्वस्वी अज्ञात गोष्टीसाठी देते. कॅन्सरची प्रथम गाठ पडली, तेव्हा आणखी १५-२० वर्षे आयुष्य मिळेल तर बरे होईल, असे वाटत होते. नियती त्यापेक्षा बरीच दयाळू निघाली.

आपल्याला लवकरच मृत्यू येऊ शकतो, याची पहिल्या ऑपरेशननंतर जाणीव झाली. त्यानंतर माझ्या विचारांत आणि विविध गोष्टींचा अग्रक्रम लावण्यात फरक झाला. लोक काय म्हणतील, यापेक्षा मीच विचार करून काय अधिक महत्त्वाचे, अधिक चांगले ते ठरवू लागले. मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आधी करण्याचे ठरवू लागले. आधीपासून बुद्धिवादी होतेच, आता अधिक बुद्धिवादी झाले. एखाद्या गोष्टीवर माझे मत वेगळे असले, तरी ते स्पष्टपणे मांडू लागले. इंग्रजीमधील ‘आय बेग टु डिफर’ हे विधान मला आवडते. त्याचा जास्त वेळा उपयोग करू लागले. एखाद्याने चांगली गोष्ट केली, तर वेळ न घालवता, शक्य तेवढ्या लवकर शाबासकी किंवा स्तुती पोहोचवू लागले. स्वत: बुद्धिवादी असले, तरी अनेक प्रेमाच्या माणसांच्या अंधश्रद्धांकडे जास्त सहानुभूतीने पाहू लागले. ही इतकी चांगली माणसे, अंधश्रद्धांवर विश्वास का ठेवत असतील, याचे मानसशास्त्रात उत्तर मिळते का, हे पाहू लागले. लहानशा गोष्टींचा फार बाऊ करू नये, असे वाटू लागले. पूर्वीपासून मी सूर्यनमस्कार व काही योगासने करीत होते, आता हे व्यायाम अधिक नियमित करू लागले; त्यामुळे शरीर लवचिक व निरोगी राहण्यास मदत झाली.

कॅन्सरच्या पहिल्या प्रादुर्भावानंतर ३५ वर्षांची मोठी लीज मिळाली, असे मी मानते. मागे वळून पाहताना, ती चांगली वापरली गेली याचे समाधान वाटते.

तिन्ही मुलींना मोठ्या होताना, जबाबदार नागरिक म्हणून काम करताना, आपापले संसार समर्थपणे सांभाळताना पाहिले. आता नातवंडांची प्रगती पाहत आहे. जयंतच्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धपणात आम्ही आधार देऊ शकलो. जयंतचे वडील त्यांच्या आयुष्याची अखेरची १८, तर आई २४ वर्षे आमच्या घरी निवास करीत होते. घरातील जबाबदाऱ्या कमी झाल्यावर मी जयंतबरोबर अनेक देशांचा प्रवास केला, तेथील संस्कृती पाहिल्या; त्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. विविध देशांच्या अनुभवावर लहानसे पुस्तक लिहिले. माझा आवडता विषय गणित, तो जमेल तेव्हा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवला. लोकांमध्ये त्याची आवड निर्माण व्हावी, निदान भीती कमी व्हावी, म्हणून लेखन केले. पुढे ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांवर काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा शाळेतील मुलांना गणित सोपे व रोचक वाटेल असा प्रयत्न केला. ही सगळी कामे आनंद आणि समाधान देणारी होती, म्हणून मिळालेली लीज चांगली वापरली गेली असे वाटते.

आता २०२१मध्ये दुसऱ्या स्तनातही लहानशी गाठ आली, बायोप्सीमध्ये ती कॅन्सरची निघाली. मग दुसऱ्या बाजूची मास्टॅक्टोमी ३५ वर्षांनी करावी लागली. त्या वेळी पेटस्कॅनमध्ये इतरत्र कॅन्सरचा प्रादुर्भाव नाही, असे समजले होते; पण २०२२च्या जूनमध्ये सतत बारीक ताप का येतो यासाठी चिकित्सा करताना, फुप्फुसाचा कॅन्सर दिसला. त्यासाठी अर्थात केमो चालू केली. एकूण पाच इंजेक्शने दिली. सुदैवाची गोष्ट म्हणजे, १३ डिसेंबरला केलेल्या पेट स्कॅनमध्ये, आता कॅन्सरचा शरीरात प्रादुर्भाव दिसत नाही, असा अभिप्राय आला. म्हणजे पुन्हा एकदा लीज मिळाली आहे. किती मोठी, हे माहीत नाही; पण हा रोग फसवा आहे, केव्हाही परत हल्ला करू शकतो, हे माहीत आहे. आयुष्य जेवढे आहे, तेवढे त्यातल्या त्यात सुखाचे, शांतीचे असावे, असा प्रयत्न करते. पुन्हा एकदा अग्रक्रम पाहते आहे. खरोखर काय जास्त महत्त्वाचे, ते ठरवते आहे.

आयुष्यात नेहमी काही ना काही आनंद वेचता येतो, आपल्याला आशा आणि उमेद देतो, असा माझा विश्वास आहे. मंगेश पाडगावकर यांची ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी’ ही कविता आठवावी. निसर्गातील अनेक लहान लहान गोष्टींत कवीला ईश्वराची खूण दिसते, मला त्यातला जीवनानंद दिसतो. कधी कधी एखाद्या परिस्थितीत अनपेक्षित विनोद दिसतो, तो टिपला पाहिजे. विनोद हे ताण कमी करण्याचे, हसून आनंदी राहण्याचे चांगले साधन आहे. कोणी सजीव अमर नसतोच. अखेरच्या वेळी मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना फार त्रास होऊ नये, ही मनापासून इच्छा आहे. माझ्या देहाचे काही भाग कुणा व्यक्तीचे जीवन सुखाचे करणार असतील, तर तसे जरूर व्हावे, मला त्यात आनंद आहे.

— समाप्त — 

लेखिका : सुश्री मंगला नारळीकर

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा कॅन्सर… भाग-१ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा कॅन्सर… भाग-१ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मला १९८६मध्ये पहिल्यांदा कॅन्सर झाला. त्याचा सेकंडरी प्रादुर्भाव १९८८मध्ये झाला. आता २०२१ आणि पुन्हा २०२२मध्ये कॅन्सरने परत डोके वर काढले. पहिल्या वेळेपासून आतापर्यंत मोठा अवधी मिळाला, असे मला वाटते. या काळातील हे माझे अनुभव…माझा कॅन्सर

– मंगला नारळीकर

जून १९८६च्या शेवटच्या आठवड्यात माझ्या डाव्या स्तनात दोन-तीन लहान गाठी आढळल्या, तपासणीत त्या कॅन्सरच्या असाव्यात असे ठरले, म्हणून पाच जुलै रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्या वेळचे उत्तम सर्जन डॉ. प्रफुल देसाई यांनी ऑपरेशन केले. फ्रोजन सेक्शनमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव स्पष्ट होता. तसे असेल, तर पूर्ण स्तन काढावा, की फक्त त्यातील गाठी काढून उपचार करावेत, हे सर्जननी मला आधी विचारून ठेवले होते. माझे उत्तर होते, ‘आरोग्यासाठी जे अधिक सुरक्षित असेल ते करा, रूप किंवा बांधा यांना मी फार महत्त्व देत नाही.’ सर्जननी सर्व बाजूंचे मिळून १२ नोड्स काढून तपासले. काही कॅन्सरग्रस्त, तर काही निरोगी होते. त्या वेळच्या वैद्यकीय ज्ञानाप्रमाणे केमोथेरपी, रेडीएशन आणि पोटात घेण्याच्या गोळ्या असे तिन्ही उपाय करण्याचे ठरले. ऑपरेशनच्या वेळी जवळचे नातेवाइक काळजीने हॉस्पिटलमध्ये हजर होते. त्या वेळी माझ्या आईने जयंत आणि सर्वांना समजावले, की पेशंटसमोर कुणी धीर सोडायचा नाही, रडणे वगैरे करायचे नाही. पेशंट बरी होणारच, अशी धारणा ठेवायची. ती डॉक्टर आणि वैद्य होती. तिचा हा सल्ला सगळ्यांनी मानला.

हळूहळू माझ्या कॅन्सरची बातमी इतर नातेवाइकांत पसरली. नारळीकरांच्या घरी माझे सासरे तात्यासाहेबांनी बुद्धिवादी वातावरण जोपासले होते. माझ्या माहेरी, राजवाडेघरी किंवा आजोळच्या चितळेघरी अनेक लोक फलज्योतिषावर विश्वास ठेवत. कुणी तरी नारळीकरांच्या कुळात लघुरुद्राची पूजा करावी असे सुचवले. यावेळी माझी आई म्हणत होती, की हाही उपाय करावा. ज्यामुळे रोग बरा होऊ शकतो, तो कोणताही उपाय करावा, असे तिचे म्हणणे. तिचे समाधान व्हावे म्हणून मी सुचवले, की नारळीकरांच्या कोल्हापूरच्या घरी ही पूजा करता येईल, तिथले नातेवाइक अशा पूजा करतात. आता जयंत धर्मसंकटात पडला. त्याने तात्यासाहेबांना विचारले. ते शांतपणे म्हणाले, ‘आपण लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगतो आणि आपणच असे अवैज्ञानिक उपाय करायचे, हे योग्य नाही.’ मलाही ते पटले. फलज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुण्याहून मामेभाऊ आला, त्याने एका पूजेचा नारळ व फुले आणली होती. ते सामान माझ्या हस्ते समुद्रात सोडायचे होते. मी त्याला सांगितले, ‘आम्ही असे उपाय करीत नाही. केवळ तुझ्या समाधानासाठी आपण आत्ता हे जवळच्या समुद्रात सोडू; पण असले उपाय पुन्हा सांगू नका.’ मी लवकर बरे व्हावे हे जसे माझ्या माहेरच्या लोकांना वाटत होते, तसे सासरच्या लोकांना वाटत नव्हते का? निश्चित तसे वाटत होते. तात्यासाहेबांनी त्या वेळी त्यांचे एक महिन्याचे पेन्शन, सुमारे ११०० रुपये, एका चेकने गरीब कॅन्सर पेशंटना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थेला दिले, ते मी बरी व्हावे या सदिच्छेनेच. ती सदिच्छा कशी फलद्रूप होऊ शकेल, यासाठी लोकांचे तर्क मात्र वेगवेगळे होते.

माझे वय होते ४३, मुलींची वये होती, गीता १६, गिरीजा १४ आणि लीलावती पाच वर्षे अशी. मला आणखी १५-२० वर्षांचे आयुष्य मिळाले, तर बरे होईल, मुली जबाबदार झालेल्या असतील, असे वाटत होते. घरचे सगळे लोक अगदी हादरून गेले होते. सन १९७७-७८मध्ये माझी नागपूरची मावशी लीला ठाकूर हिचे असेच ऑपरेशन झाले होते. वर्षभरात तिचा कॅन्सर लिव्हरपर्यंत पोहोचला आणि तिचे १९८०मध्ये निधन झाले. तिची नुकतीच पन्नाशी झाली होती. हा ताजा इतिहास सर्वांच्या लक्षात होता. तसाही कॅन्सर जीवघेणा असतो, हे माहीत होते, तरी आता काही जमेच्या बाजू होत्या. आम्ही मुंबईत राहत होतो आणि सगळ्या उपलब्ध वैद्यकीय उपायांचा फायदा घेता येत होता.

एकदा माझी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मैत्रीण भेटली, तिला माझा आजार समजला होता. ‘हे कसं तुला झालं बाई! तुझ्या एवढ्या हुशार आणि सज्जन नवऱ्यावर केवढी ही आफत!’ आजारी मी आणि सहानुभूती माझ्या नवऱ्याला! ती मैत्रीण चांगलीच होती; पण मनात आलेला विचार असा लगेच उघड करण्यातला विनोद मला जाणवला, तिचा राग नाही आला.माझी ‘टीआयएफआर’मध्ये राहणारी एक मैत्रीण कमला ही होमिओपॅथीची औषधे देत असे. माझ्या मुलींना आणि सासू-सासऱ्यांना तिच्या औषधांनी अनेकदा गुण आला होता. ऑपरेशननंतर काही दिवसांनी मी तिच्याकडे गेले. ती म्हणाली, की माझ्या आजाराबद्दल तिला ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच समजले; कारण माझ्या सासूबाई सकाळी तिच्याकडे गेल्या व म्हणाल्या, ‘मंगलाला कॅन्सर झालाय. आता आमचं कसं होणार, याची मला फार काळजी वाटतेय. मला बरं वाटावं म्हणून माझ्यासाठी औषध द्या.’ मी कमलाला विचारले, ‘होमिओपॅथीमध्ये कॅन्सरसाठी औषध आहे का?’ ती म्हणाली, ‘तशी औषधे सांगितलेली आहेत; पण होमिओपॅथीच्या औषधांनी अनेकदा आजार थोडा वाढतो, मग बरा होतो. तुझ्या एवढ्या गंभीर आजाराबाबत मला तो धोका पत्करायचा नाही. मी तुला कॅन्सरसाठी औषध देणार नाही.’ कमलाचा तिच्या शास्त्राबद्दल विश्वास आणि प्रामाणिकपणा, दोन्ही लक्षात राहिले.

केमोथेरपीचा शरीरावर फार परिणाम होतो, रक्तातील लाल व पांढऱ्या पेशी कमी होतात, हे ऐकले होते. अशक्तपणा येतो. पुढच्या केमोआधी रक्त भरून आले नाही, तर ती केमो देता येता नाही, पुढे ढकलावी लागते, म्हणून पेशंटला पौष्टिक अन्न दिले पाहिजे, हे समजले होते. माझी आई डॉक्टर असली, तरी तिचा जास्त अनुभव गरोदर स्त्री आणि बाळ-बाळंतीण यांचे आरोग्य सांभाळण्याचा होता. तिने मला पौष्टिक अन्न म्हणून केमोच्या दुसऱ्या दिवशी डिंकाचे लाडू दिले आणि माझे पोट बिघडले. केमोमधील औषधांचे पचनसंस्थेवर परिणाम होतात व ती एक-दोन दिवस चांगलीच बिघडलेली असते. त्या वेळी सरबत, नारळपाणी, ताक अशी पेये; त्यानंतर प्रथम मऊ भात, खिचडी अशा क्रमाने अन्नसेवन करावे. नंतर पचेल आणि रुचेल ते पौष्टिक अन्न खावे, हे मी अनुभवाने शिकले.

उपचार पूर्ण झाले. केमोची १२ इंजेक्शन झाली. मळमळणे आणि क्वचित उलटी, अशक्तपणा यांपेक्षा फार त्रास नव्हता. एक दिवस पूर्ण विश्रांतीची गरज असे. मी प्रत्येक केमोला नेव्हीनगरहून दादरला माहेरी जात असे. काकू आणि सुहासच्या देखरेखीखाली विश्रांती घेणे सुलभ होते. जवळच्या डॉ. श्रीखंडे यांच्या क्लिनिकमध्ये अनेकदा इंजेक्शन घेत असे. उपचार पूर्ण झाले, त्यानंतर चेकअपच्या वेळी डॉ. देसाई म्हणाले, ‘आता तुम्ही कॅन्सरला विसरून जा. त्याचा विचार करू नका. तुम्ही फ्री झालात गणिताचा अभ्यास करायला आणि तुमचे सगळे उद्योग करायला.’ पण, तसे व्हायचे नव्हते.

आम्ही १९८८मध्ये पॅरिस व केम्ब्रिजचा दोन महिने प्रवास करून आलो. परतल्यावर ऑगस्टमध्ये मला गळ्याच्या डाव्या बाजूला खाली, अन्ननलिकेवर हाताला दोन-तीन लहान गाठी जाणवल्या. त्यांचा गंभीरपणा जाणून लगेच मी ‘टीएमएच’मध्ये दाखवायला गेले. डॉ देसाईंच्या सहायकाने त्या लोकल भूल देऊन काढल्या व तपासायला दिल्या. त्या कॅन्सरग्रस्त होत्या. पुन्हा डॉ. देसाईंची भेट झाली, तेव्हा मी आठवण करून दिली, की त्यांनी मला कॅन्सरला विसरून जायला सांगितले होते. एवढा मोठा सर्जन खाली मान घालून म्हणाला, ‘सॉरी दॅट, अवर सायन्स इज नॉट एक्झॅक्ट लाइक युवर्स.’ मी मात्र धडा शिकले, की हा रोग फार फसवा आहे, अनेक दिवस लपून राहू शकतो आणि आपले गुणधर्म किंवा रूप बदलू शकतो. पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.

– क्रमशः भाग पहिला… 

लेखिका : सुश्री मंगला नारळीकर

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print