मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

थंडी सुरु होऊन तापमान २१..२२..२३ असं रूंजी घालू लागलं की बाजारात हिरव्यागार भाज्यांचे दर्शन व्हायला लागतं. ताज्या ताज्या पालेभाज्या तर दिसतातच, पण रसरशीत फळभाज्यांचे पण ढीग दिसू लागतात… या ढिगांवरून फक्त नजर जरी फिरली ना तरीही मनाला शांती मिळते.

आणि

नेहमीच्या फळभाज्या तर मिळतातच पण अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या जसे की वेगवेगळ्या प्रकारचे घेवडा, वालपापडी,डबल बिन्स.

अगदी हिरव्या हिरव्या गार रूपात आपल्याला दिसतात.

आज आमच्या घरी हंगामाची पहिली डबल बिन्स आणली आणि सोलायला सुरुवात केली. सुंदर गुलाबी रंग पाहून डोळे निवले. मनाला तरतरी आली.

आणि

एका शेंगे मधून “ती” सळसळत बाहेर आली.

एक क्षण दचकायला झालं.पण “तिचा” उत्साह बघून थक्क व्हायला झालं.

“तिचं” नजाकतीने चालणं, नव्हे नव्हे, वळवळणं.एकदम लाजवाब.

मी पहातच राहिले. दोन क्षण.

भानावर येताच लक्षात आलं की “ती” टेबलाच्या टोकाला पोचली आहे.

पटकन दोन पानं आणली आणि “तिला” आसन करून दिलं.

आता “ती” छान आसनस्थ झाली.

नवीन आसनाचा अदमास घेऊ लागली.

आणि लगेचच तिथे रूळली पण !

आनंदाने पानं खाऊ लागली.

“तिचा” आनंद मी डोळे भरून पहात होते.

आणि

मनात आलं.

खरंतर “तिचा” आनंद क्षणभंगुरही ठरला असता. कारण तो आनंद माझ्या हातात होता.

तरीही आनंदाचे क्षण किती, हा विचार न करता आनंद आहे, हा विचार करून “तिने” पानं खायला सुरुवात केली होती.

आणि

मी “तिच्या”कडे पाहतच बसले.

आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला केवढा वेळ लावतो. किंबहुना बाहेर यायला उत्सुक नसतोच.

आणि

अगदी बाहेर आलो तरी नवीन ठिकाणी,नवीन परिस्थितीत रुजायला कित्येक दिवस,महिने लागतात. नाही का ?

“ती” एवढीशी “अळी” मला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊन गेली.

कुठल्याही परिस्थितीत आनंदी रहा ग.न कुरकुरता.

आनंद किती मोठा आहे, याचा विचार न करता, आनंद मिळाला आहे, याचा विचार करून तो मस्त उपभोगून घे.

आणि

कुठल्याही परिस्थितीत सगळीच दुःखं नसतात. त्या दुःखाच्या पलीकडे असलेल्या चिमूटभर सुखाला शोधायचा प्रयत्न कर.

बघ कसा आनंद मिळतो ते.

लेखिका : सुश्री  माधुरी संजीव कामत

संग्रहिका : सौ. स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझं घर… लेखिका – सुश्री वीणा घाटपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझं घर… लेखिका – सुश्री वीणा घाटपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

शेजारच्या सिंधूताई परवा खूप दिवसांनी भेटल्या. अमेरिकेला दोन्ही मुलांकडे गेल्या होत्या, म्हणाल्या. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी अगदी व्यवस्थित आदरातिथ्य केलं. जवळपासची सगळी ठिकाणे दाखवली. अमेरिकन व इतर वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. दर शनिवार – रविवार कुठे ना कुठे जात होत्या. कुठे काही कमी पडू दिले नाही, पण चार महिने तेथे राहिल्यावर मलाच कंटाळा आला. घरचे विचार मनात येऊ लागले. सकाळ झाली की मॅार्निंग वॅाकचा रस्ता मला बोलावू लागला. घरची साफसफाई, वाणसामान भरायचे मला डोळ्यांसमोर दिसू लागले, काही म्हणा पण आपलं घर ते आपलं!

सिंधूताईंचे बोलणे मला १००%. पटले.खरंच प्रत्येकालाआपलं घर किती प्रिय असतं! आपण ८-१० दिवस  बाहेर राहिल्यावर आपल्याला लगेच कंटाळा येतो.कधी एकदा घरी जाऊ असं होतं. २-४ दिवस बाहेरचे खाल्ले की कधी एकदा वरण भात का होईना, तो घरचा खाऊ असे होऊन जातं.

घरातील प्रत्येक वस्तूवर आपलं अधिराज्य असतं .काही वस्तूंशी आपल्या आठवणी निगडीत असतात.हा इतकी वर्षं चाललेला कुकर, मला मीनामावशीने माझ्या लग्नात प्रेझेंट दिलेला.उषामामीने मंगळागौरीला पुरण यंत्र दिले होते. मला मोत्याचे दागिने आवडतात म्हणून पाडव्याची ओवाळणी म्हणून नवऱ्याने मोत्याचा तन्मणी व बांगड्या घेतलेल्या. वाचनाची आवड म्हणून साठवलेल्या पैशांतून चांगल्या कादंबऱ्या, आत्मचरित्रे आपण घेतली होती. काश्मीरहून आणलेल्या शाली,बेंगलोर सिल्क, आग्र्याहून अगदी जपून आणलेली ताजमहालाची छोटी प्रतिकृती अशा एक ना अनेक वस्तूंच्या आठवणी आपल्या मनात पिंगा घालत असतात आणि न कळत त्या वस्तू आपल्या होऊन जातात.

आपले स्टीलचे कटोरे, ताटल्या, वाट्या भांडी, पोळपाट लाटणे इतके ओळखीचे झालेले असतात व त्यांची इतकी सवय झाली असते की नवीन पोळपाटावर पोळी लाटायला त्रास होतो. बऱ्याचजणांना जागा बदलली, कॅाट बदलली की झोप लागत नाही.

आपल्या घरात आपण free bird असतो. आपल्यावर कुणाचे बंधन नसते.एखादे वेळेस बरे वाटत नसेल, तर आपण आपल्या घरात दिवसभर झोपून राहू शकतो. दुसरीकडे आपल्याला संकोच वाटेल.

प्रत्येकाला आपले घर देवाने लावून दिले आहे.पक्षीसुद्धा संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परततात. गुरेढोरे, गायी वासरे आपापल्या घरी परततात. तर असं हे आपलं ते आपल्याचे महत्त्व आहे. घर कसेही असो, ते आपले असते.

लेखिका : सुश्री वीणा घाटपांडे

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चारचौघातला नवरोबा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चारचौघातला नवरोबा… लेखक : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नातेवाईक जमलेले असतात. गप्पाटप्पा , खेचाखेची करता करता कोणीतरी बहिणाबाई ‘काडी टाकते’. आपल्या बंधुराजांबाबत म्हणते,

“सुनील आमचा साधा आहे बिचारा.” हेच स्टेटमेंट मित्रमंडळी जमलेली असली तर त्या सुनीलच्या मित्राने केलेले असते.

हे किंवा याच टाईपची इतर केली जातात जी स्टेटमेंटस्, ती म्हणजे..

आमचा सुनील कसा शांत आहे,

न चिडणारा आहे,

कसल्याही खोड्या नसलेला आहे.

वगैरे वगैरे.

झालं. हे अस जर कोणी बोललं की सुनीलची बायको सरसावून बसते.

अन सुरू करते अटॅक-

“काय म्हणालात? आमचे हे अन साधे बिचारे? एकदा या घरी चार दिवस राहायला. मग कळेल.”

अन मग वहिनी पाढा वाचतात. त्यांच्या ह्यांचा.

हे आमचे कसे साधे बिचारे नाहीत,पक्के ‘हे’ आहेत,

त्यांच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नका,

लांबून तसं वाटत असेल. मी रोज सोबत असते. खरं काय ते माझं मलाच माहीत,न बोलून शहाणे आहेत, आपल्याला हवं तेच करतात,जेवणाच्या बाबतीत पक्के खोड्याळ आहेत,जरा म्हणून चालवून घेणार नाहीत, हे असं हवं..म्हणजे तस्संच हवं”….अन काय काय.

वहिनी हा पाढा वाचत असतात, तेव्हा त्या नवरोबाचा चेहेरा अगदी पाहाण्यासारखा असतो, बरं का. गालातल्या गालात हसून तो बायकोच्या बोलण्याला जणू मूक संमतीच देत असतो. दुसरा पर्यायच नसतो त्याच्यापुढे. ‘बायकोदाक्षिण्य’. ते दाखवायलाच लागते.

एकूणच, “हे आमचे कसे साधेसुधे नाहीत. मी म्हणून कशी चालवून घेते”, असा टोन असतो. म्हणजे …’पहा, माझ्यावर कसे अत्याचार, जबरदस्ती,… हालाची परिस्थिती आहे’ असले काही गंभीर सांगायचं नसतं बरं का.

घरात दोघांचं छान चाललेलं असतं . खरंतर ‘तिचंच’ घरात चालत असतं . हे सगळं लटक्या रागात चालू असतं. गमतीत. अन हे युनिव्हर्सल असतं बरं का.

पण…‘नवरोबा’ म्हटला की तो असाच हवा, चारचौघांसमोर त्याचं रूप असंच ‘कडक’ असायला हवं, असंच सगळ्या बायकांना वाटत असतं. त्यासाठी ही धडपड. हे सारं ‘तिचं’ ‘त्याला’ बोलणं हे काणेकर म्हणतात त्या प्रमाणे ‘थापा’ या शब्दात मोडणारं.  निरुपद्रवी. गमतीगमतीतलं.

पण हे स्वातंत्र्य नवरोबांना मात्र नसते बरं का. तो म्हणू शकतो का चारचौघात, अगदी गंमत म्हणून देखील? “ही? साधी बिचारी? चांगली पक्की आहे. घरी पहा येऊन कधी!”

चुकून म्हटलं त्याने, तर त्याचं घरी गेल्यावर काही खरं नसतं!

लेखक : श्री अनंत गद्रे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विन्टेज – लेखक : श्री सौरभ साठे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ विन्टेज – लेखक : श्री सौरभ साठे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळसं धरायला सुरुवात केली आहे.

5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खरं तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली. एकटीच.

आता मी माझं रुटीन सेट करुन घेतलंय. सकाळी जरा लवकरच उठतो. त्याचं काय आहे, मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. यायला जरा उशीरच होतो त्यांना. म्हणून सकाळी चहाबरोबर जरा गप्पा पण होतील, असं मला वाटायचं. हो, मला वाटायचं. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत. नाही, नाही. गैरसमज करुन घेऊ नका. सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात, तसे काही माझे मुलगा किंवा सून नाहियेत. वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात. माझी तक्रार काही नाही. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली, म्हणून चहा करायला घेतला. पण नेमकं दूध उतू गेलं. सगळा ओटा खराब झाला. सून नाराज झाली. मला काही बोलली नाही, पण तिच्या हालचालीमधून ते स्पष्ट जाणवत होतं. त्या दिवशी मुलाने लगेच फर्मान काढलं,”बाबा, उद्यापासून आमचं आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रुममध्ये.”

असाच एकदा नातवाला म्हणालो, “चल तुला स्कूल बसपर्यंत येतो सोडायला.” तर म्हणतो कसा,”आबा, मी मोठा झालोय आता. मी एकटा जाऊ शकतो. तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल, मी घाबरतो एकटा यायला. हसतील मला सगळे.”

म्हणून सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मध्ये येतो. मला कळून चुकलंय, की मी त्यांच्या आयुष्यातला फक्त्त एक भाग आहे, कदाचित थोडासा दुर्लक्षित.

आता मी संध्याकाळी फिरायला जातो. तेवढाच माझाही वेळ जातो. रोजचा मार्ग ठरलाय माझा. Agricultural College च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी. त्या मार्गावर एक दोन शोरुम आहेत चार-चाकी गाड्यांच्या. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. म्हणून मग येता जाता त्या शोरुममधल्या गाड्या बघत बघत जायचो. अर्थात बाहेरुनच.

पण एक दिवस त्या शोरुममध्ये एक वेगळीच गाडी दिसली.काहीशी जुनी होती, पण त्या गाडीला वेगळी जागा होती. तिला वेगळ्या पद्धतीने सजवलं होतं. कुतुहल वाटलं म्हणून आत गेलो. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला. “Yes Sir, कुठली गाडी बघताय?”

“नाही. म्हणजे हो.बघतोय, पण विकत नाही घ्यायची मला. ही एव्हढी जुनी गाडी तुमच्या शोरुममधे कशी काय, हा विचार करतोय. “सर ही Vintage Car आहे. 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”

“का हो? सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे. या गाडीवर मात्र तो नाही.”

“सर ही विंटेज कार आहे, हिची किंमत ठरवता येत नाही. ज्याला या गाडीचं मोल कळेल, तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”

मी शोरुममधून बाहेर पडलो. कसला तरी विचार येत होता मनामध्ये , पण नक्की कळत नव्हतं काय ते.

असेच मध्ये काही दिवस गेले, रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते. ही गेल्यानंतरचा पहिलाच गुढी पाडवा. जरा उदासच होतो मी, पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.

“आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते. रोड वायडनिंगमध्ये ते पाडणार होते. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं. आमच्या टीचरनी सांगितलं, ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देतं,म्हणून ते महत्त्वाचं आहे.”

त्या गाड्यांच्या शोरुम मधून बाहेर पडल्यावर जसं वाटलं होतं, तसंच काहीसं वाटून गेलं.

सुनबाई म्हणाली, “बाबा, तुम्ही पूजा कराल का गुढीची? इतकी वर्षे आई करायच्या. म्हणून वाटतं, आज तुम्ही करावी.” मी पण तयार झालो.

आम्ही सगळे जेवायला बसलो. सूनबाईने छान तयारी केली होती. जेवायला तांब्याची ताटं काढली. मुलगा म्हणाला, “अगं, आज तो काचेचा सेट काढायचा ना.”

“अरे, असू दे. आईने पहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट. त्या सेटमधली आता फक्त्त ताटंच उरली आहेत. म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी, आईची आठवण म्हणून.” आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.

अचानक मला त्या शोरुममधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता, त्याचा अर्थ कळायला लागला. मौल्यवान या शब्दाचा. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड, काही तरी इशारा करत होते.

आता माझे मला समजले होते, मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो.

आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने. कारण मला माहितीये, त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कारसारखं आहे. एकदम स्पेशल.

लेखक : श्री सौरभ साठे

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलगी” – लेखक :श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मुलगी” – लेखक :श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरा मुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता.वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झालं होतं.

एक दिवस लग्नाआधी मुलांकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलांकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आलं होतं. परंतु पहिल्यांदाच लग्नापूर्वी, मुलीच्या होणाऱ्या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला. चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले!

चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्यासारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण. तेसुद्धा घरच्या सारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा, म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. आरामपश्चात त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं.

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढताना वडिलांना त्यांच्या आदरतिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलांकडच्यांना याविषयी विचारले, “मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ?”

यावर मुलीच्या होणा-या सासू म्हणाल्या, “काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली- माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी, ही विनंती.”

हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते.

वडील जेव्हा घरी पोहचले, तेव्हा घराच्या भिंतीवर समोर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तस्बीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, “हे आपण काय करता आहात ?”

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, “माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे. ती कुठेच गेलेली नाही. ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते.एक दिवस ती सोडून जाईलच. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की,मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते, तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘मुलीचा बाप’ आहे!”

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छोटीशी कृती… — लेखक : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छोटीशी कृती… — लेखक : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

छोटीशीच गोष्ट असते एखादी. सहज शक्य आहे म्हणून कोणीतरी काहीतरी करून जातं आणि त्यातून दुसऱ्या शक्यता निघत जातात आणि अंतिमतः जो परिणाम असतो तो कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठा आणि सुखद धक्का देऊन जाणारा असतो. दिवाळीची पणती छोटीशीच असते, पण ती लावण्याची छोटीशी कृती आजूबाजूचा प्रत्येक अंधारा कोपरा उजळवून टाकणारी असते!

तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या साड्या पिकोला द्यायला म्हणून माझ्या नेहमीच्या दुकानात गेले होते.तिथे एका दुपट्यावर एक छोटंसं बाळ होतं. खूप मोठ्याने रडत होतं. मुलगी होती. आकारावरून तीन-चार महिन्यांची वाटत होती. तिच्या हातात दुधाची बाटली होती. पण मुलीचा वरचा ओठ दुभंगलेला असल्यामुळे तिला दूध नीट पिता येत नव्हतं.

‘कोणाची मुलगी आहे?’ मी विचारलं, तर प्रतिभा म्हणाली, ‘तिचे आई-बाबा मोठ्या भावंडांना घेऊन समोर डॉक्टरकडे आलेत. मोठ्याला ताप आहे आणि ही इतकी रडत होती की  आईला काहीच करता येत नव्हतं, म्हणून मीच तिला इथे ठेवायला सांगितलं. भूक लागली असेल म्हणून शेजारून बाटली आणि दूध आणलं, पण तिच्या ओठांमुळे तिला पिता येत नाहीये.’बाळ रडतच होतं, आम्ही दोघीही तिला गप्प करू पहात होतो. पण ती काही ऐकत नव्हती.

तेव्हढ्यात त्या बाळाची आई दोन जरा मोठ्या मुलांचा हात धरून रस्ता क्रॉस करून आलीच. मोठा पाचेक वर्षांचा, दुसरा अडीच-तीन वर्षांचा असावा. धाकटा आजारी असावा, कारण त्याचा चेहरा अगदी मलूल होता. दुकानात आल्या आल्या तिने मुलीला मांडीवर घेतलं आणि नीट दूध पाजायचा प्रयत्न करायला लागली. तापाने आजारी मुलगा अगदी तिला बिलगून उभा होता तर मोठा मुलगा पलीकडेच उभा होता. बाळाचं रडणं काही थांबत नव्हतं. उत्तरेतलं कुटुंब होतं. बिहारमधलं.

‘कितने महिने की है’? मी विचारलं. त्या बाईचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. मला जे बाळ तीन-चार महिन्यांचं वाटलं होतं, ते चक्क आठ महिन्यांचं होतं! पण बाळाच्या क्लेफ्ट लिप मुळे ती नीट गिळू शकत नसल्यामुळे तिची वाढ खुंटली होती.

‘इसका ऑपरेशन हो सकता है, बच्ची बिलकुल ठीक हो जायेगी, पता है ना’? मी विचारलं. तर ती बाई म्हणाली, ‘पता है, डाक्टरने बोला है. पर खर्चा बहुत होगा ना, इसलिये पैसे जमा कर रहें हैं.’

तिचा नवरा एका सोसायटीत वॉचमन होता आणि पदरात तीन मुलं! तिच्याकडे सर्जरीच्या खर्चाला पैसे जमा होईपर्यंत अजून बराच काळ उलटून गेला असता! त्या बाईला मी अजून काही सांगणार तर ती म्हणाली ‘इनको आने दिजिये’. आता तिचे ‘इनको’ कुठे तरी कामाला गेले होते. ते परत येईपर्यंत ह्या केसमध्ये आपण काय मदत करू शकतो, ह्याचा मी विचार करत होते.

एकदम मला आठवलं, की माझ्या एका मित्राचा भाऊ आग्र्यामध्ये कॉस्मेटिक सर्जन आहे, तो अशा

 प्रकारच्या सर्जरी करतो, हे मला माहिती होतं. म्हणून मी लगेच त्याला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली. तो म्हणाला की स्माईल ट्रेन नावाची संस्था अशा सर्जरी करायला मदत करते. त्याने मला त्याच्या ओळखीच्या स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाचा नंबर दिला. मी त्याला फोन करून त्याच्याकडून पुण्याचा नंबर मिळवला. माझ्या डॉक्टर मित्रातर्फे कॉल गेल्यामुळे त्यांनी लगोलग पेशंटची सर्व माहिती लिहून घेऊन मला पुण्याच्या लोकमान्य इस्पितळाचा नंबर दिला.

स्माईल ट्रेनतर्फे होणाऱ्या पुण्यातल्या सर्व क्लेफ्ट लीप सर्जरी तिथे होतात. मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली, तोपर्यंत त्या बाळांचे बाबाही तिथे आले होते. त्यांना मी सर्व माहिती दिली. ते म्हणाले की त्यांची आठवड्याची सुट्टी बुधवारी असते. परत लोकमान्य मध्ये फोन करून बुधवारच्या ओपीडीची वेळ, हॉस्पिटलचा पत्ता, कुणाला भेटायचं, बरोबर कुठले केसपेपर आणायचे वगैरे सगळी माहिती काढून त्या जोडप्याला दिली. त्या मुलीच्या बाबांचा नंबर घेतला आणि मी माझ्या कामाला निघून गेले.

त्यानंतर फॉलो-अप करायला म्हणून दोन-तीन आठवड्यांनी मुलीच्या बाबांना फोन केला, तर त्यांनी उचललाच नाही. मग एकदा प्रतिभाला विचारलं तर ती म्हणाली की त्यानंतर ते आलेच नाहीत. पुढे काय झालं ते कळलं नाही म्हणून मला उगाचच चुटपुट लागून राहिली. स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाला फोन केला तर तो म्हणाला पुण्याची माहिती त्याच्याकडे नाहीये. मला काही दिवस ती मुलगी, तिचा तो दुभंगलेला ओठ आणि तिचं केविलवाणं रडणं आठवत राहिलं. पण नंतर माझ्या कामाच्या, प्रवासाच्या व्यापात मी विसरून गेले.

परवा अचानक दिवाळीच्या दिवशी प्रतिभाचा फोन आला. कामात होते म्हणून मी तो घेतला नाही. आज परत तिच्याकडे साड्या घ्यायला गेले होते, तर ती म्हणाली, खूप आनंदून की ‘त्या दिवशी त्या बाळाचे आई-बाबा आले होते, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. त्या बाळाचं ऑपरेशन झालं. आता ती व्यवस्थित दूध पिते, अंगाने पण भरलीये. ऑपरेशन एकदम फ्री मध्ये झालं, छान झालं म्हणून ते लोक सांगत होते’.

मलाही ऐकून खूपच आनंद झाला. न राहवून मी लगेच परत त्या मुलीच्या बाबांना फोन लावला. परत कोणी उचलला नाही. पण थोड्या वेळाने त्या मुलीच्या आईचाच फोन आला. ’कैसी है बेटी?’ विचारल्याबरोबर ती धो-धो बोलत सुटली. मुलगी आता व्यवस्थित होती, नीट दूध पीत होती, सॉलिड खाणंही आता हळू हळू सुरु केलं होतं त्यामुळे अंगा-पिंडाने सुधारली होती. दिवाळीसाठी ते पूर्ण कुटुंब आता गावी बिहारला गेलं होतं. ‘तीस तारीख को आयेंगे ना दीदी तब आपसे मिलने जरूर आयेंगे, बहुत बहुत धन्यवाद आपका’. आनंद नुसता निथळत होता तिच्या स्वरातून.

मीही तिच्या आनंदात उजळून निघाले होते. रस्त्यावर चालता चालता माझ्या चेहऱ्यावर इतकं मोठं हास्य होतं की येणारे जाणारे थबकून बघत होते. खरंतर मी खूप मोठं असं केलं काहीच नव्हतं. मी फक्त माझा थोडा वेळ आणि माझा शब्द वापरला होता.

ऑपरेशन लोकमान्यच्या डॉक्टरांनी केलं होतं, खर्च स्माईल ट्रेनने केला होता. पणती वेगळ्याच कुणाची होती, तेल कुणी दुसऱ्याने टाकलं होतं, ज्योत पेटवणारे हात तिसऱ्याचे होते, फक्त ज्योत पेटवणासाठी लागणाऱ्या काडीचं काम माझ्या हातून झालं होतं. पण त्या पणतीचा प्रकाश मात्र आमची साऱ्यांचीच मनं उजळवून गेला होता.  यंदाच्या दिवाळीची ही मला मिळालेली  सर्वोत्तम भेट!

लेखिका:सौ. शेफाली वैद्य

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्मृतिगंध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्मृतिगंध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला आठवतंय,

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपणसुद्धा !

भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची.

    

आता तसं नाही.

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !

खूप महाग झालंय बालपण !

   

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती.

फुल टाईम ‘आईच’ असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय.

जॉबला जातेय हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते!

मित्रसुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं ‘बट्टी’ म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी !

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”

मैत्री बरीच महाग झालीय आता.

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते !सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय.

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

  

एवढंच काय, तेव्हाचे

आमचे संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडले.

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात,पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची.

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं !

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय, मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं !

  

कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं.

पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

   

म्हणून म्हणतोय, आहोत तोवर आठवत रहायचं.

नाहीतरी ह्या स्मृतीगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मी २०१३ पासून एकटी राहते. म्हणजे वयाच्या ७६व्या वर्षांपासून. आज माझे वय ८७+ आहे. हे एकटे राहणे मी मनापासून निवडले आणि त्याचा मला कधीच पश्चात्ताप करावा लागला नाही. कारणानिमित्ताने मी मुलाकडे जाते पण तेथे राहत नाही २ दिवसाच्या वर. मला तेथे करमतच नाही. ना काम ना धाम. वाचन आणि टीवी ह्यात वेळ घालवायचा. शिवाय प्रत्येकाची खोली वेगवेगळी. ते मला झेपतच नाही.

आत्ताच काही दिवसापूर्वी तब्येतीच्या कारणाने दीड महिना मुलाकडे राहिले..तर ढगांचे आकार बघण्याचा छंद  लागला… खिडकीतून फक्त तेच दिसतात ना? त्यातही मजा असते बरे का.  मुलगा आणि सून बाई कायम आग्रह करतात की आता येथेच राहा. मुलगा म्हणतो “आई फक्त बरे नसले तरच येतेस”..  मी त्यांना म्हणते, “अजून माझे हातपाय चालू आहेत. ते थकले की तुमच्याकडेच तर यायचे आहे.”

दिवसा गुड मॉर्निंगचा संदेश आणि रात्री गुड नाईटचा संदेश नेमाने पाठवते. विशेष काही घडले की फोन करतो एकमेकांना. शिवाय आजकाल विडिओ कॉलचीही सोय असतेच. म्हणजे तसे आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. शिवाय माझ्या एक असे लक्षात आले आहे की मी समोर असले की दोघांना माझी जास्तच काळजी वाटायची. ते बाहेर जाताना हजार सूचना केल्या जायच्या. माझ्यात दोघे अडकून पडायचे. तेव्हाच ठरवले की आता घरी परतलेच पाहिजे. परंतु माझ्या अशा एकटे राहण्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. प्रथम प्रथम बरे – वाईट तर्क – कुतर्क  आपापल्या मगदूराप्रमाणे लोकांनी केले. पण आता बहुतेक वृध्दांना माझी राहणी पटू लागलीये.

अनेकांना  जागेची दुसरी सोय नसल्याने जीव मारून एकत्र राहावे लागते. सर्वांचीच त्यामुळे मानसिक कोंडी होते आणि चिडचिड वाढते. कोणी आर्थिकदृष्टया मुलांवर अवलंबून असतात.  त्यामुळे एकत्र राहावेच लागते. काही वेळा तब्येत चांगली नसते आणि कोणाच्या तरी आधाराची सतत गरज भासते. देवदयेने अजूनपर्यंत मला ह्या परिस्थितीतून जावे लागले नाही. म्हणून उगीचच मुलाच्या संसारात गुंतून राहणे मला पटले नाही. तसे अडीअडचणीला सून आणि मुलगा फोन केल्याबरोबर धावून येतात.   हे पुरेसे नाही का? लांब राहून गोडी टिकवणे मी जास्त पसंत करते.

आता दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे एकटे राहिले की दुखणे येऊ नये म्हणून मी  माझ्या आरोग्याची नियमित काळजी घेते. व्यायाम/आहार / विश्रांती सर्व वेळच्यावेळी करते. दिनक्रम व्यवस्थित आखून घेतल्यामुळे उगीच आळसात वेळ घालवत नाही. कालपर्यंत घरातील सर्व कामे मीच करत होते. आता काही लोक ह्याला कंजुषी म्हणतील. पण ह्यात खूप फायदे आहेत. पैसे वाचवणे, हा हेतू नाहीच आहे. पण मन कामात व्यग्र राहते, वेळ चांगला जातो, आपोआप शरीराला व्यायाम होतो हे फायदे महत्त्वाचे आहेत. मला पहिल्यापासून व्यायामाची  आवड आहे. पहाटे  ४ वाजता उठून ६ पर्यंत त्यात वेळ जातो आणि मग घराकडे बघायचे. पूर्वी  मॉर्निंग वॉक घेत असे. आता घरातल्या घरात एकाच जागेवर तसेच अगदी थोड्या जागेत इंग्लिश 8 च्या आकड्याबरहुकूम चालून चांगला व्यायाम होतो, हे शिकले आहे. यु ट्युबवर पाहून.. शिवाय बाहेरची सर्व कामेही मी करते. (आता एक मदतनीस आहे. ) मुलाची शक्यतोवर मदत घ्यायची नाही, असा नियम केला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आपण पेलू शकतो, हा आत्मविश्वास मिळतो आणि त्यातून जगण्याची ऊर्जा मिळते. माझे छंद मला त्यामुळेच आजपर्यंत जोपासता आले.

आतापर्यंत व्यवस्थित चालले आहे. उद्याचा विचार मी करतच नाही. रोज देवाचे आभार मानते, ज्याने मला सुजाण आईवडील,प्रेमळ भाऊबहिणी,आनंदी लहानपण,उत्तम शिक्षण,चांगले नातेवाईक आणि  प्रेमळ कुटुंब दिले. आता एकटे राहण्यामुळे जुन्या आठवणी  मनात जागवताना मनाला निरलस शांतता मिळते. आज तरी एकटे राहणेच मला आवडते. ना कसली इच्छा ना कसली अपेक्षा.. उद्या काय होईल, त्याचा विचार मी करतच नाही. तब्येतीने साथ देणे सोडले की आहेतच मुलगा आणि सूनबाई..!

लेखिका : श्रीमती नीला शरद ठोसर

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..

मला हे थोडंफार पटलंही….

एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….

या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….

माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..

मला हे थोडंफार पटलंही….

एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतीली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….

या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….

लेखक – अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…

संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय

कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका 

यात नेहेमीच अंतर राहतं…

 

लाखो मनांच्या 

समुद्रातून योगायोगाने 

२ मनं अगदी एकमेकांसारखी 

समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, 

हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

 

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे 

असतीलच कसे?

 

सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं 

हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

 

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. 

या न देण्याचंच ‘देणं’ 

स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

 

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर 

तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा 

असणार कसा?. 

त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. 

त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, 

त्याचं माणूस म्हणून 

वेगळेपण आहे, 

हे मान्य करणार असाल 

तरच संसारात पाऊल टाकावं.

 

अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

 

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. 

बघण्याच्या समारंभात 

गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, 

श्रद्धा-अंधश्रद्धा असे 

तेलकट प्रश्न विचारा..  

या प्रश्नांची उत्तरं ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या 

सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

 

लग्नानंतर मग 

खरं काय ते एकमेकांना कळत जातं. 

 

तेव्हा म्हणाली होती …. ‘वाचनाचा छंद आहे’ 

पण नंतर साधं वर्तमानपत्र 

एकदाही उघडलं नाही बयेनं…

जाब विचारू शकतो आपण?

किंवा

 तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; 

जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’

पण

प्रत्यक्षात कळतं; 

कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं…

 

प्रवासाची आवड कसली?

कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब… 

वर्षभर सांगतेय .. माथेरानला जाऊ 

तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…

 

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे.

उरलेले न जुळलेले ४ कुठले 

ते कळले असते तर…

 

मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच 

खरं तर लग्न होत असतं आपलं.

 

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, 

तीच व्यक्ती टिकली…

 नाही जमलं की विस्कटली.

 

अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला… 

पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन, 

नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता  दोघांमध्ये हवी.

 

पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;

 

आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; 

पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं 

हेच खरं वास्तव आहे.

 

धुमसत राहणाऱ्या राखेत

 कसली फुलं फुलणार ?..

 

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, 

ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन 

मगच संसार मांडायला हवा.

 

आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं 

… हे या वाटेवरच पाहिलं पाऊल…

 

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की मग … 

इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..

हेच संसाराचं खरं मर्म आहे.

हरीॐ

“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत…. 

… होत जातात…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares