मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं,

” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं.

 ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!

काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, ” राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेऊ. तेव्हा द्या.”

थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, ” काका एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “

सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गांवात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”

कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला.

काका म्हणाले,  ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही… तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले  “माझं बाळ…! ” …. हे असं घडल्यापासून. ह्या गावातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो “

कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं– ” पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”

” ते ही केलं पण… जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही “

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, ” काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!”

सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले, ” विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल…  रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय….. विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीये . “

यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली, म्हणाला, ” काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडे जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदलली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले 

” दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “*

कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं, ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “

काकांनी स्मित केलं, ” दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “

हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले..!

काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही … पण त्याला एकाच प्रेमाची गरज .. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” ..  हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!

…. सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले ….. अगदी अनाहूतपणे …!!

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं…

साधा सर्दी खोकला झाला,

की आलं, तुळशीचा काढा घ्यायचो,

पोट दुखलं की ओवा चावत जायचो,

ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो,

ना टेस्ट, ना स्पेशालिस्टचं झंझट,

ना हॉस्पिटलच्या एडमिशनमध्ये अडकत होतो…

निरोगी आयुष्य जगत होतो..

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

राम राम ला राम राम,

सलाम वालेकुम ला, वालेकुम अस्सलाम,

आणि जय भीम ला जय भीमनेच प्रेमाने उत्तर देत होतो,

ना धर्म कळत होता

ना जात कळत होती 

माणूस म्हणून जगत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

सकाळी न्याहारीला दूध भाकरी,

दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि..

रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,

हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू…. लंचचा चोचलेपणा आणि 

डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवसभर भरपेट चरत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो

रामायणात रंगून जात होतो, ‘चित्रहार’सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,

ना वेबसिरीजची आतुरता,

ना सासबहुचा लफडा,

ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो…

खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…

*साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुझे येणे, तुझे जाणे ?… कवी : दिलीमा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

तुझे येणे, तुझे जाणे ?… कवी : दिलीमा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

तुझे येणे, तुझे जाणे ?

आणि आमचे उगा मिरवणे….

 

आम्ही तो आणला….

आम्ही तो बसवला….

आम्ही नैवेद्य दाखवला….

आम्ही तो विसर्जित केला…

अनादी,अनंत तो एक !

त्याला काय कोण बनवेल 

अन् बुडवेल ?

 

अनंत पिढ्या आल्या…

अनंत पिढ्या गेल्या….

तो तरीही उरला…

 

काळ कधी का थांबेल ?

तो कधी न संपेल…

आपल्या आधी तोच एक….

आपल्या नंतरही तोच एक….

त्यास काय कोणाची गरज ?

 

मग काय हा उत्सव 

दहाच दिसांचा ?

का न करावा तो रोजचा ?

 

आपुले येणे, आपुले जाणे,

त्यामधले क्षणभंगुर हे जगणे….

जगण्याचाच या उत्सव करावा….

अन् रोजच तो मनी बसवावा….

 

सजावट करावी विचारांची…

रोषणाई मनातल्या प्रेमाची…

नैवेद्य दाखवावा सत्याचा….

फुले दया, क्षमा, शांतीची….

अन् आरती सुंदर शब्दांची….

 

रोजच क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा….

हिशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण व्हावा…

असा तो रोजच का न पुजावा ?….

 

रोज नव्याने मनी तो

असा जागवावा….

अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा…. 

कवी : दिलीमा

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

‘ चांदण्यांचं खळं ‘  या सदरात श्रीअभिजीत साळुंखे यांनी दिलेले ग्रामीण लेखन. सीतामाईचे वनवासी जीवन हे स्त्री जीवनाच्या त्रासाचे मूळ आहे असे या महिलांना वाटते, हे या शब्दांमधून जाणवते. भाषेचा बाज पूर्ण ग्रामीण, ओवी रचनेत आहे. …. 

न्हवायिळा ग राम  बाई चैताचा गारयीवा

सीता ग मालनीचा रख रख वैशाखी जारयिवा

….. चैत्र पालवीच्या गारव्यात रामाचा जन्म झाला तर वैशाख शुद्ध नवमीला वैशाखाच्या उन्हात सीतामाईचा शेतात शोध लागला

आकाशाचा पाळणा खाली धरती मावली

 नांगराच्या ताशी सीता जई- अभिव्यक्तीनकाला गावली

राम सीतेची जोडी लोक वाङ्मयात जानपद लोक घेतात ती एकरूप झाली आणि बाया बापण्यांनी आपली संसारीक सुख दुःख या भावभावनांची बिरुदं त्यांना लावून आपल्या आयुष्याशी जोडली. 

कवसलीचा राम न्हाय शितंच्या तोलायाचा 

शिता ग हिरकणी राम हलक्या कानायाचा

सीतेला तीन सासवांचा सासुरवास होता हे सांगताना म्हणतात- 

कैकयी सुमती कवसला शितला तीन सासा

 लेक धरतीची सीता त्यांनी धाडला वनवासा

 शितला सासुरवास केला ग केशोकेशी

 सयांस्नी वाटून दिला तिने गं देशोदेशी

बायांचा जाच हा सीतेचाच वाण-वसा असं त्या मानतात. 

वनवास आला शितंसारख्या सतीला 

बारा वर्ष झाली डुई धुतली नहिला

 सासुरवासाचा फास शिते सारख्या सतीला 

घडोघडी परीक्षा बाई जन्माच्या परतीला

रावणाच्या कैदेतून सुटल्यावरही तिला चारित्र्य शुद्धतेसाठी अग्नीपरीक्षा  द्यावी लागली

सतीपणाचं सत्व  दाह आगिनं इजल 

सीता ग मालनिचं मन घडी घडी न झुंजल

गरोदर असतानाही तिच्याबरोबर कोणीही नव्हतं वार्ड चालू होती रडत होती 

आटंग्या वनामध्ये कोण रडत ऐका 

शीतंला समजावती बोरीबाभळी बायका… 

सिता सतीला वनवास असा किती करतील

 लवकुश पोटाला येतील सूड रामाचा घेतील

नंतर लवकुश्यासह सीतेचा स्वीकार केला आणि तिला आणायला लक्ष्मणाला रथ घेऊन पाठवला 

लक्ष्मणदीर रथ सांगाती घेऊन

 वहिनीला न्याया आला मुरळी होऊन 

लक्ष्मण हाका मारी वहिनी चला व घराला 

वाट बघती समधी डोळे लावून दाराला

सीता लव कुश बाळांना त्यांच्याकडे देऊन निश्चयाने म्हणते 

‘आता कशाला जोडू बाई फिरून नातीगोती ‘

वर पडलाय जीव झाली आयुष्याची माती 

वसर वसर माऊली माझे माय धरत्री 

घेई लेकीला पोटात जीव निवू दे अंतरी

…. सीतेचं मातीत सापडणं आणि नंतर कौटुंबिक सुखदुःख भोगून फिरून मातीत जाणं याचा दुवा थेट आपल्या जगण्याबरोबर जोडून या मायमालयांनी मातीच्या लेकीने तिला आपल्या लोकगीतात लोकलयीनं अजरामर केलं. 

लेखक : श्री अभिजित साळुंखे 

माहिती संकलन :   सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भूलोकीचा स्वर्ग… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ भूलोकीचा स्वर्ग… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा

भोगून पहा माहेरपण 

नक्कीच कराल आमचा हेवा ll

 

मनसोक्त काढलेली झोप

आणि तिच्या हातचा गरम चहा

सुख म्हणजे काय असतं ,

देवा एकदा अनुभवून पहा ll

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात ll

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड लोणचे चटण्या

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या ।।

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून ।

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून ll

 

लाख सांगा देवा हा 

तुमच्या मायेचा खेळ l

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून l

मायापती  देवा तुम्ही,

तुम्हीही जाल गहिवरून ll

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते 

सगळे आघात झेलत ll

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाट l

पैज लावून सांगते विसराल

वैकुंठाची वाट ।।

 

माहेरपण हा केवळ 

शब्द नाही पोकळ

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ ll

 

डोळ्यात प्राण आणून 

वाट बघणारी आई l

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा स्वर्ग नाही ll

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अलिप्त होण्यातलं सुख… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ अलिप्त होण्यातलं सुख…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.

एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे ‘मी पणा’ देखील नकळत देवाला अर्पण होत असे.

खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’ , ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!

आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.

वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.

आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.

आयुष्यात ‘सोडणं ‘जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे. 

आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना ‘डिलीट’ करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.

साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.

अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं  मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील. 

रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा… अगदी रोज… कोणत्याही पाशात न अडकता… अलिप्तपणेच !

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अनंत चतुर्दशी …!!!” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “अनंत चतुर्दशी …!!!” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

जेव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

 

थोडा वेळ आहोत इथे

तर थोडं जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडू मोदक खाऊन घेऊया…

 

इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

 

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

 

जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

 

बाप्पा सारखे नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा  दिवसांचे पाहुणे आपण 

असे समजून जगायचे…

 

किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख…

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन  भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला, एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.

“नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.

“अरे भाऊ …, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय.”

” ऱ्हावू द्या, तीनपेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय.” तो पुन्हा बोलला.

आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या, वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला ‘मला कांही खायला द्या’ अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या .

त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या, जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली. जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.

त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही, असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं. तर मग काय भाऊ? तू काय ठरवलंयस ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”

यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या. पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.

विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली.तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.

आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं.

तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं  देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता,याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं.

आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणीव झाली होती.

तर…कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं.

आपल्याजवळ देण्यासारखे काय  आहे  आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही.

ज्याच्याकडे जे आहे , ते त्याने द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही. तर वेळ,मानसिक,भावनिक आधार देऊन एखाद्याचे जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो.

रस्ता ओलांडण्यास केलेली मदत,एखाद्याचं ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची.

आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील, तर तीही एक प्रकारची मदतच.

गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची.

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचं दुकान” ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

“देवाचं दुकान ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एके दिवशी मी रस्त्याने जात होतो. वाटेत एक बोर्ड दिसला, ‘ईश्वरीय किराणा दुकान…’

माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?

हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात. ते उघडावे लागत नाहीत.

मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, “माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे.”

देवदूत पुढे म्हणाला, “जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर.”

आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.

पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले. माझी टोपली भरत राहिली.

पुढे गेलो.पावित्र्य दिसले. विचार केला- कसं सोडू? तेवढ्यात शक्तीची पाटी आली.शक्ती पण घेतली..

हिंमतसुद्धा घेतली.वाटले की हिमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही.

आधी सहिष्णुता घेतली. मग मुक्तीची पेटीही घेतली.

माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली.मी त्याचाही डबा उचलला.

कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली, तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा,मला माफ कर.

आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, “सर.. या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?”

देवदूत म्हणाला, “माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते…”

या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो. जो आत जातो, तो श्रीमंत होतो. तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो.

प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे ‘सत्संगाचे दुकान’….

सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे. रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा.

देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

खूप वर्षांपूर्वी मी पावसाळी दिवसात लोणावळा एसटी स्टँड वर एका खूप गरीब आणि खूप म्हाता-या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटी कडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यात मी त्या म्हाता-या आजीला निरनिराळ्या एसटी बसेस मध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं.

आमच्या एसटीत तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली “भ्येटला रं तू,  लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं की तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.”

एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजा-याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो.

मी तिला विचारलं, ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग. आनी बाजूची म्हतारी हाय की लक्ष ठिवायला”.  मी विचारलं, “आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?”

त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली, ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला का पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यात आपण पुण्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !

एसटी सुटायला अजून वेळ  होता. मी मनात म्हटलं, की अजून जरा आजीकडून काही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला म्हटलं, “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला.” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग.”मी निरुत्तर झालो.

तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.

या घटनेतून मी इतकाच बोध घेतला की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती.

म्हणून मी तत्क्षणी तिला गुरूपदाचा मान दिला.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares