मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोमलतेतील ताकद… लेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ कोमलतेतील ताकद… लेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

कोमलतेत  ताकद  असते. पावसाचं पाणी आकाशातून  पडतं.

माती वाहून जाते.

नद्यांना पूर येतात.

भले भले खडक झिजतात.

पाणी वाहतच रहातं.

 

फुलं  ही पाण्यासारखीच कोमल  असतात.

एक दगड भिरकावला तर  दहाबारा फुलं खाली पडतात.

ज्या दगडामुळं फुलं  वेचायला मिळाली तो दगड  कुणी घरी आणत नाही . आपण फुलंच घरी आणतो.

ती कोमेजतात पण  एवढ्याश्या जीवनात तुम्हाला सुगंधच देतात.

 

पाण्याचं सामर्थ्य त्याच्या सातत्यात असतं.

प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही . 

बाजूने वाट काढून निघून जातं.

या वाहण्याच्या सातत्याने खडक लहान होत जातो.

प्रवाह रुंदावत जातो.

सातत्य म्हणजे काळ.

काळाचे सामर्थ्य मोजता येणार नाही.

अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते.

कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या शब्दाचं गीतात रूपांतर करण्याचं सामर्थ्य  असणारी स्त्री जलधारा असते.

साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणे चांगलं.

कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं.

जलधारा हो, वाहत राहा.

लेखक : व.पु.काळे

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लग्नविधीमध्ये दडलंय काय? ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लग्नविधीमध्ये दडलंय काय? ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?

१) लग्नात मांडव कशासाठी ???

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी?

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !

३) नवरदेवाची कानपिळी वधूच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी?

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !

४) मुलीच्या मागं मामाच उभा राहतो,हे कशासाठी?

= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !

५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी?

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नये हे सांगण्यासाठी !

६) लग्नात सप्तपदी माहीत आहे का कशासाठी???

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं ही केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !

७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी?

= तांदळाची अक्षता याच्या साठी की तांदळाचे बीज लावताना आपण एका जागी लावतो.ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते, त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते. तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदळाच्या अक्षता टाकतात *

पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

बघा ना..

शिक्षण घेत असताना  ‘विद्या ‘

नोकरी उद्योग करताना  ‘लक्ष्मी ‘

अंतसमयी ‘ शांती’!

 

सकाळ सुरु होते तेव्हा  ‘उषा ‘

दिवस संपताना ‘ संध्या ‘!

 

झोपी जाताना ‘ निशा ‘

झोप लागली तर ‘सपना’!

 

मंत्रोच्चार करताना ‘गायत्री’

ग्रंथ वाचन करताना   ‘गीता ‘!

 

मंदिरात ‘ दर्शना ‘, ‘वंदना ‘, ‘ पूजा’,’आरती’,अर्चना’

शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच!

 

वृद्धपणी  ‘ करूणा ‘

पण ‘ ममता’सह बरं

आणि राग आलाच तर  ‘क्षमा ‘!

 

जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला’

आनंद मिळविण्यासाठी  ‘कविता’

अाणि 

कविता करण्यासाठी ‘प्रतिभा’!

आणि सर्वात महत्वाचं

प्रश्न सोडवायचा असेल तर,

सुचली पाहिजे ती ‘कल्पना’

अशा कविता रचण्यासाठी असावी लागते जवळ ती ‘प्रज्ञा’!

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वेच्छानिवृत्ती… लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्वेच्छानिवृत्ती… लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

निवृत्ती शब्द येताच कुणी म्हणाले..

आताच का?अचानक का?

कुणी दबाव आणला का तुझा निर्णय तू घेतला?

निवृत्त होवून पुढे काय करणार?

घरचा कोंबडा बनणार? का जंगलात जाणार?

रोजची गाडी चुकणार, दुपारच्या विविध चवीला तू मुकणार.

 

हे काय वय आहे?

पोट भरण्याचे साधन काय आहे?

तू काय ठरवलं आहेस?

मनात काय घेवून दूर जात आहेस?

 

 किती प्रश्न!किती व्यथा!

 निवृत्ती ही का नवी आहे कथा?

 

अहो! थांबायचं कुठे आणि कधी हेच तर ठरवलं.

जगण्याच्या धडपडीत हवं ते कुठं मिळवलं?

 

वृत्त म्हणजे बातमी वार्ता.

गोतावळ्याच्या परिघात अडकलेला कर्ता.

कवितेच्या अक्षरांचा छंद.

तर वर्तनात अडकलेला बंध.

 

    यातून मुक्त होणे म्हणजे निवृत्त.

    मोकळ्या हवेत श्वास घेणे म्हणजे निवृत्त.

    मनाप्रमाणे धावणे, वागणे म्हणजे निवृत्त.

    निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे निवृत्त.

    स्वतःला वेळ देत ओळखणं म्हणजे निवृत्त.

    छंद जोपसण्यासाठी जगणं म्हणजे निवृत्त.

 

खरंच का सोप्पं असतं? का निवृत्त हे मृगजळ ठरतं?

एकटेपण खायला येतं का? एकांतात मन दुबळ बनतं?

 

म्हटलं तर असंच असतं. ठरवलं तर मात्र वेगळं होतं.

मुक्त होऊन मन आनंदात विहरतं

हवं तसं, हवं तेव्हा जगण्याचं स्वातंत्र्य मिळवतं.

 

बेभान झालं तर मी पणात फुगतं.

जगण्याच्या निखळ आनंदाला मुकतं.

मुक्त होऊन जगताना इतरांच्या मदतीला जे धावतं तेच निवृत्तपण

विश्वप्रार्थनेच्या स्मरणात जगण्याचं नवं तंत्र शिकवतं.

 

शुभप्रभाती येऊन तोही सायंकाळी निवृत्त होतो..

पुन्हा सकाळी शुभेच्छारुपी वृत्त आपल्या हाती देतो..

लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डोळा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ डोळा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

डोळा लागणे (झोप लागणे)

डोळा मारणे (इशारा करणे)

डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

डोळे येणे (नेत्रविकार होणे)

डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

डोळे खिळणे (एकटक पाहणे)

डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

डोळे दिपणे (थक्क होणे)

डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

डोळे भरून येणे (रडू येणे)

डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले.  “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती  म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”

‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.

“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.  किती सुरेख कल्पना आहे!  केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं. 

“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..

चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न

उदात्त हेतू  मनी  ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारूसारखा आहे.

जशी गोव्याची दारू भरपूर पितात, पण चढतच नाही.

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही.

 

कोल्हापूरचा पाऊस. घरजावयासारखा.

घुसला की मुक्कामच.

राहा म्हणायची पंचाईत आणि

जा म्हणायचीपण पंचाईत…

 

अन मुंबईचा पाऊस

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल

धो धो आपल्याला धुऊन निघून जाईल सांगता येत नाही.

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा.

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत.

नुसती दिवसभर पिरपिर चालू .

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग!

 

कोकण चा पाऊस

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा

एकदा सुरवात झाली की शेवटपर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

 

खानदेशातील पाऊस म्हणजे लफडं!

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं !     

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायको सारखा…!

प्रेमाची रिमझिम, आपुलकीच्या धारा

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पसारा आवरू या…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पसारा आवरू या…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत, त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्‍याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्‍याच गोष्टी.

कधीतरी त्या हव्या होत्या, पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला.

सगळं उरकल्यावर ती वस्तु सापडली. पण मग काय उपयोग?

आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…

आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.

माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.

 पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं, ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं, असं वाटून गेलं.

ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही.

खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार, हे समजायला लागतं.

एक ओळखीच्या आजी होत्या, मुलं-बाळं काही नव्हती. एकट्या राहायच्या. एका वाड्यात.

पुतणे वगैरे होते, पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात.

गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या, ‘नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून.’ असंही उदाहरण आहे.

एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं.

जी बाई जाईपर्यंत  त्यांची सेवा सुश्रुषा  करत होती, तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या.

साड्या, बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.

देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.

नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण.

तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फिडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.

चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी.

असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर.

खूप पाहुणे येतील कधी, म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले. पण पाहुणे येतच नाहीत. आले तरी एक दिवस मुक्काम.

घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल, खूप भांडी पडली तर, म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको.

पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही.

 कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला  आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही.

पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात.

असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून.

एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे.

पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतःमध्ये पण.

रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.आपण काही सुधारणार नाही.

दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तु पुन्हा काढायच्या, पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.

खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी …

पण मन ऐकत नाही..

ये मोह मोह के धागे…….

मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही.

निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.

पण आम्ही नाही शिकत .

थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं. आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात.आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा. दिसू द्यावा तो आपल्या माघारी. आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रुंच्या बांधात.

जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आज सोसायटीच्या हॉलमध्ये “गुरुपौर्णिमा”साजरी करायला लेडीज स्पेशल जमल्या होत्या.

साहजिकच देवांचे फोटो, समई, बॅनर—-सगळं तयार होतं.”गुरुब्रम्हां गुरू विष्णू”म्हणत सुरवात झाली.थोडीफार टिपिकल भाषणं झाली.

आज सगळ्यात जेष्ठ अशा गोखले काकू प्रमुख पाहुण्या म्हणून बोलणार होत्या.सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न मुली,बायका जरा चुळबुळतच होत्या.

काकू उठल्या, म्हणाल्या, मी आज तुम्हाला माझ्या गुरुबद्दल सांगणार आहे.

माझं लग्न अगदी कांदेपोहे पद्धतीने झालं. कोकणातून इथे मुंबईत आले.माहेरी सर्व कामांची सवय होती,पण इथे चाळीत दोन खोल्यात आठ माणसं ,हे गणित काही पचनी पडत नव्हतं. टॉयलेट घरातच होतं ही जमेची बाजू.पहिल्या दिवसापासून सासूबाई कमी बोलून पण मला निरखून काही सूचना करायच्या.कोकणातला अघळपघळपणा इथे का चालणार नाही हे त्यांनी समजावून सांगितलं. नारळ घालून रसभाज्या करणारी मी,डब्यासाठी कोरडी भाजी करायला शिकले.कोणतेही व्रत वैकल्य त्यांनी लादले नाही.जे पटते,जे झेपते आणि खिशाला परवडते ते करावं असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यांनीच बीएड करायला लावलं, शाळेत नोकरी घ्यायला लावली.बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे.

माझ्या मिस्टरांना त्या स्वतःच मागे लागून नाटक-सिनेमाची तिकिटं काढायला लावायच्या.त्या काळात पण आम्हाला क्वालिटी टाइम मिळावा हे त्या बघायच्या.

माझे दीर वेगळे झाले,आम्ही दोघे, आमची दोन मुले आणि सासूबाई असेच राहिलो.

चाळीची रिडेवलपमेंट होणार म्हंटल्यावर मीच धाय मोकलून रडले.पण त्या म्हणाल्या,”बदल हे होणारच,कशात गुंतून पडायचं नाही”

नऊवारीतून पाचवारीत आणि पुढे चक्क गाऊन मध्ये माझ्या सासूबाईंचं स्थित्यंतर झालं.केस सुध्दा स्वतःहून छोटे केले,मला त्रास नको म्हणून!

जातानाही प्रसन्नपणे गेल्या.नातसुनेला म्हणाल्या,”ही चांगली सासू होते की नाही,ती परीक्षा तू घे हो.”

परिस्थितीचं भान ठेवा,काटकसर करा पण सतत सर्वांची मनं मारून नाही,पैसे कमवा पण पाय जमिनीवर ठेवा, काळानुसार बदला, जे बदल पचणार नाहीत, त्याबद्दल मोकळेपणी बोला,transparancy महत्वाची.लोकांना हक्क दाखवत,धाक दाखवत बांधून ठेवू नका.प्रेमाने दुसऱ्यापर्यंत पूल बांधा, त्याने त्याच पुलावरून तुमच्याकडे यायचं का नाही हे त्याला ठरवू द्या.एकावेळी तुम्ही सर्वांना खुश नाही ठेवू शकत;पण म्हणून स्वतः खूश होणं विसरू नका.नियमांवर जास्त बोट ठेवलं की वर्मावर लागतं. आपल्या वागणुकीतून दुसऱ्याला आदर्श घालून द्या.पतंगाचा मांजा ढील दिल्यावरच पतंगाला उंच नेऊ शकतो.

नवीन पिढीला टोचून दूषणं देण्यापेक्षा नवीन शिकून घ्यावं. घरात भांडणं होणारच,पण”रात गई बात गई”. एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र केले पाहिजे. बाहेरचं frustration, चिडचिड घरात बोलून शांत झाली पाहिजे.प्रत्येकाने आपला दिवस कसा गेला सांगितलं तरी खूप संवाद घडेल.

विश्वास,प्रेम घरात मिळालं तर बाहेरच्या चुकीच्या व्यक्तीकडून फसवणूक होणार नाही.

जेमतेम अक्षरओळख असणाऱ्या माझ्या सासूबाई टॉप कॉलेजातल्या MBA लाही लाजवतील अशा काटेकोर होत्या.त्या माझ्या गुरू,माझी मैत्रीण होत्या.

आज मुद्दाम हे सांगण्याचं कारण की गुरू म्हणजे कोणी फेमस व्यक्ती असायची गरज नसते.तिने सतत बरोबर राहून हात धरून चालवायचीही गरज नसते.ती आपल्या आजूबाजूच्या माणसांमधीलच एक असते.तिला सन्मान, फोटो, गिफ्ट याची अपेक्षा नसते.तिच्यातल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण झाले,पुढे नेले गेले की बास!

माझ्यातले चांगले माझ्या सुनेपर्यंत पोचवू शकले की माझ्या सासूबाईंना गुरुदक्षिणा मिळेल.

तुम्ही काही यातून घेतलं तर काही प्रमाणात आनंदाची शिंपडणी तुमच्याही घरात होईल

धन्यवाद!

एकमेकांच्या कागाळ्या करणाऱ्या, गॉसिप करत पराचा कावळा करणाऱ्या आणि खोटे फॉरवर्ड असल्याचे मुखवटे घालणाऱ्या आणि कुरघोडी करत राहणाऱ्या ,आम्हा सर्वांसाठी हे अंतर्मुख करणारं होतं, हे नक्की!

लेखिका :डॉ युगंधरा रणदिवे

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थोडं जगलं पाहिजे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  थोडं जगलं पाहिजे…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फोटो असतात,

आणखी एक कॉपी काढायला

निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

 

गजर तर रोजचाच आहे

आळसाने झोपले पाहिजे,

गोडसर चहाचा घोट घेत

Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

 

आंघोळ फक्त दहा मिनिटे?

एखाद्या दिवशी तास घ्या,

आरशासमोर स्वतःला

सुंदर म्हणता आलं पाहिजे.

 

भसाडा का असेना

आपल्याच सुरात रमलं पाहिजे,

वेडेवाकडे अंग हलवत

नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

 

गीतेचा रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,

रामायण मालिका नैतिक थोर

“बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

 

कधी तरी एकटे

उगाचच फिरले पाहिजे,

तलावाच्या काठावर

उताणे पडले पाहिजे.

 

संध्याकाळी मंदिराबरोबरच

बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,

“फुलपाखराच्या” सौंदर्याला

कधीतरी भुललं पाहिजे.

 

द्यायला कोणी नसलं

म्हणून काय झालं?

एक गजरा विकत घ्या

ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

 

रात्री झोपताना मात्र

दोन मिनिटे देवाला द्या,

एवढया सुंदर जगण्यासाठी

नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

प्रस्तुती : सुश्री प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares