मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉश किचन… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ पाॅश किचन…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

रिमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली. जुने डबे, प्लास्टिकचे डबे,जुन्या वाट्या, पेले, ताटं …सगळं इतकं जुनं झालं होतं.

सगळं तिने एका कोपऱ्यात ठेवलं. आणि नवीन आणलेली भांडी तिने छान मांडली..

छान पॉश वाटत होतं आता किचन…

 

आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम.

इतक्यात रिमाची कामवाली सखू आली.

पदर खोचून ती लादी पुसणार इतक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली.  “बापरे !!  आज घासायला इतकी भांडीकुंडी काढली का ताई ?”…तिचा चेहरा जरा त्रासिक झाला.

रिमा म्हणाली “अग नाही. भंगारवाल्याला द्यायचीत.”

सखूने हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेने चमकले.

“ताई,तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं मी घेऊ का?” सखूच्या डोळ्यासमोर तिचं तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलतं एक पातेलं सारखं येऊ लागलं.

रीमा म्हणाली, “अग एक का?काय आहे ते सगळं घेऊन जा. तेवढाच माझा पसारा कमी होईल.”

“सगळं!”सखूचे डोळे विस्फारले… तिला जणू अलिबाबाची गुहाच सापडली.

तिने तिचं काम पटापट आटपलं.सगळी पातेली,डबे-डूबे, पेले… सगळं पिशवीत भरलं आणि उत्साहात घरी निघाली.आज जणू तिला चार पाय फुटले होते.

 

घरी येताच अगदी पाणीही न पिता तिने तिचं जुनं तुटकं पातेलं.. वाकडा चमचा… सगळं एका कोपऱ्यात जमा केलं .

आणि नुकताच आणलेला खजिना नीट मांडला. आज तिचा एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता.

इतक्यात तिची नजर तिच्या जुन्या भांड्यांवर पडली आणि ती स्वतःशी पुटपुटली,”आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं, की झालं काम.”

 

इतक्यात दारावर एक भिकारीण पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली.

“माय, पाणी दे.”

सखू तिच्या हातावर पाणी ओतणार, इतक्यात सखूला तिचं पातळ झालेलं पातेलं दिसलं. तिने त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं.पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांडं परत करायला गेली.

सखू म्हणाली,”दे टाकून.”

ती भिकारीण म्हणाली “तुले नको?मग मला घेऊ?”

सखू म्हणाली” घे की आणि हे बाकीचं पण ने,”

असं म्हणत तिने तिचा भंगार त्या बाईच्या झोळीत रिकामा केला.

 

ती भिकारीण सुखावून गेली.

पाणी प्यायला पातेलं… कोणी दिलं तर भात, भाजी, डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी…आणि वाटलंच चमच्याने खावं तर एक वाकडा चमचा पण होता….

आज तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती. .!

 

“पॉश” या शब्दाची व्याख्या,

सुख कशात मानायचं, हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फुलवणारे/सुकवणारे…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फुलवणारे/सुकवणारे…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले, म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे, तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि ‘नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण?’म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

‘बाल्कनीतुन किती छान दिसतंय इंद्रधनुष्य!’ म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि ‘कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं’, म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता, म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंब ही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेन्शनमध्ये ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी, मिळेल ते झणझणीत, चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘काही नाही होत यार’, म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं; पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार?

संकलक:प्रा. माधव सावळे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थना… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ प्रार्थना… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

प्रार्थना म्हणजे ती नाही,

जी आपण हात जोडून,

गुडघ्यावर बसून देवाकडे काहीतरी

मागण्यासाठी केलेली असते.

 

 सकारात्मक विचार करून,

लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं,

ही खरी प्रार्थना!

 

जेव्हा तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी,

अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता,

ती प्रार्थना असते!

 

जेव्हा आपण लोकांना निरोप देताना,

त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो,

ती प्रार्थना असते!

 

जेव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो,

ती प्रार्थना असते!!

 

जेव्हा आपण कोणाला तरी,

मनापासून माफ करतो,

ती प्रार्थना असते!!

 

प्रार्थना म्हणजे कंपनं असतात.

एक भाव असतो.

एक भावना असते.

एक विचार असतो.

प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो,

मैत्री, निखळ नाती, हे सगळं

म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!

 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे माझे -तुझे तुझे…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझे माझे -तुझे तुझे…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

        माझे   माझे  चे   गाठोडे    

        तुझ्या  चरणाशी  वाहिले

        तुझे      तुझे    म्हणताना

        किती मोकळी  मी  झाले ।।

 

        माझे    माझे    गणगोत

        चिंता    सर्वांची   वाहिली

        तुझे      तुझे    म्हणताना

        गुंतागुंत   ती      सुटली   ।।

 

        माझा   माझा  रे   संसार

        करिता   आयुष्य हे  गेले

        तुझे     तुझे     म्हणताना

        मुक्त    मनोमनी    झाले. ।।

 

        माझी  माझी    मुलेबाळे

        मोह    सुटता      सुटेना

        तुझे     तुझे      म्हणताना

        चिंता    काहीच    वाटेना ।।

 

        माझे   माझे    हे    वैभव

        हाच    ध्यास    जीवनात

        तुझे    तुझे      म्हणताना

        मन     झाले   हे  निवांत  ।।

 

        माझे   माझे   हे   चातुर्य

        करी    सदा   रे    विवाद

        तुझे    तुझे      म्हणताना

        ऐकू    येई      अंतर्नाद    ।।

 

        माझे   माझे    म्हणताना

        मोह   माया  ताप   जाळी

        तुझे    तुझे      म्हणताना

        लागे   ब्रह्मानंदी     टाळी ।।

 

        माझे   माझे    मी    पण

        तुझ्या    चरणी    वाहिले

        तुझे    तुझे      म्हणताना

        तुझ्यातच        विलोपले  ।।

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहीत नाही. मी आमोर फाती  असा करतोय.

याचा अर्थ आहे नशिबाचा स्वीकार.

आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली, तरीही ती तशी घडणे आवश्यक होते. अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्वीकारणे. ती गोष्ट आवडली नाही, तरीही ती स्वीकारणे. अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्वीकारणे.

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल, असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला “अरे, तुझ्या आईला आधी बोलाव. तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला “आग लागली, हे बरं झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाती  म्हणजे काय, याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल – आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी खऱ्या स्वरूपात आनंदाने स्वीकारणे.

६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाती  कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशीब स्वीकारण्यातली ताकद मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकद आहे, की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारणे हे तुमच्या हातात असते.

  • कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,
  • कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
  • कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,
  • कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणूक दिली असेल,
  • कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल, ज्यातून तुमची सुटका नाही.

तुम्ही हे सगळं हसत स्वीकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता, याला आमोर फाती  म्हणतात.

तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच, तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगलं वाटावं, हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्वीकारावं हा उद्देश आहे.

जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा, हा उद्देश आहे.

एखादी आपत्ती आली असताना शांत रहाणं, हे अनैसर्गिक वाटतं. पण तेव्हा शांत रहा.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नवीन उर्जा देणारं ठरेल.

बस आता, झालं तेवढं खुप झालं, असं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल.

सगळं विपरीत घडत असताना ते शांत रहाणं  थिंक बिग सांगणारं ठरेल.

हताशा आली असताना ते शांत रहाणं, तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल.

 

आमोर फाती  हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करण्याचा पहिला टप्पा आहे.

कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोप्पं होतं.

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरं सुख ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ खरं सुख ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप!

महिनाअखेर अचानक कपड्यांच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ!

कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं-भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी!

कोणत्याही गोष्टीचे अप्रूप असतांना अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव!

आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी तृप्ती!

रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख!

ह्या जगण्यावर, ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे!

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पक्ष्यांपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे :

१. ते रात्री काही  खात नाहीत.

२. रात्री फिरत नाहीत.

३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.

४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात….बरोबर घेऊन जात नाहीत..!

५. अंधार पडल्यावर झोपून जातात आणि पहाटेच गाणी  गात उठतात.

६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

७. आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात.  बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.

८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात,स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती घेत नाहीत.

९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.

१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व त्यांची काळजी घेतात.

११. आपापसात मिळूनमिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

१२. निसर्गनियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

१३. आपलं घर इको-फ्रेंडलीच बनवतात.

१४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोट भरण्याइतकी मोठी झाली की त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत.

 

खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..!

त्यांच्या या सवयी अंगीकारून आपल्याला आपलं जीवन पण

सुखी व निरोगी ठेवता येईल…

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले. बोट सुटायला अजून अवकाश होता, तोच त्यांना त्यांच्या गुरू रामकृष्णांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. ते विवेकानंदाना सांगत होते की “तू लगेच खाली उतर. ह्या बोटीने जावू नकोस .”

गुरूचीच आज्ञा ती, विवेकानंद लगेच खाली उतरले आणि बोट सुटली. त्यांना समजेना,गुरूजींनी त्यांना कां उतरवलं त्या बोटीतून? पुढे जाऊन ती बोट त्या प्रवासात बुडाली व सर्व प्रवाशांचा अंत झाला. विवेकानंदाना अतिशय वाईट वाटले. प्रवास संपवून ते जेव्हा रामकृष्णाना परत भेटले तेव्हा ते म्हणाले, “गुरुजी, तुम्ही मला वेळीच सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे, पण ते इतर प्रवासीही माणसंच होती की. तुम्ही तर विश्वरूप आहात.

मग तेच प्रेम सर्व प्रवासी व तो बोटवाला ह्यांच्या बाबतीत का नाही दाखवलेत…?   का नाही त्याना हाक मारलीत…?    का नाही त्यांना सावध केलंत आणि वाचवलंत… ? “

रामकृष्ण म्हणाले,  “अरे मी असं करीन का..?   तेही माझेच होते. मी त्यांना पण ओरडून सांगत होतो, पण त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. ते आपल्या अहंकारात मदमस्त होते. तुझं अंत:करण शुद्ध आहे, म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला.’ “

परमेश्वर काय किंवा सद्गुरू काय, आपल्या हृदयातच असतात. ते सतत आपल्याला योग्य काय, अयोग्य काय सांगत असतात. पण आपण आपल्याच मस्तीत एवढे दंग असतो, ह्या विषयवस्तूंच्या संसारात एवढे व्यस्त असतो, की त्यांचा आवाज ऐकूच येत नाही व मग त्याची बरीवाईट फळंही भोगावीच लागतात.

आपल्या अंत:करणशुद्धीसाठीच तर सेवा, सत्संग व साधना असते.

हे ऐकताच विवेकानंदांनी रामकृष्णांना साष्टांग प्रणाम केला.

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दृष्टीकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ दृष्टिकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवऱ्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’

बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो.पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो…

अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो… त्यावर माणसे ठाम असतात… खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते… विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे… म्हणजे मग तो विकसित होतो… जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात… ‘माणूस समजणे सोपे जाते…दृष्टिकोन म्हणजे नकाशा.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्याबद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!  हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘आहे हे असं आहे’,

‘माझा आवाजच मोठा आहे’,

‘मला अशीच सवय आहे’

असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.

बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.

‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल तर हा आवाज अभ्यासायलाच हवा. आवाजाची, बोलण्याची साधना, तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही, हे हळूहळू कळत जातं.

शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो, त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.

बोलण्याचा आवाज हा आतून येतो!  माणसाच्या चेतनेला स्पर्श करून, त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.

आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.

एक प्रयोग केला होता.,

सुंदर शब्दांची यादी वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी मोठ्याने वाचायची. वाढवत जायचे हे शब्द. हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते.

आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!

सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.

वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचं ठरतं .

कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.

या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती  असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?

फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.

बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडेच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.

वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसामाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.  मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात; पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.

बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य :  ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस  अशक्य गोष्टी शक्य होतात..

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares