मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे,” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “ Coordination cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

 हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला, “Duty manager , please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना, की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार, तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मैं तुम को जमीन में जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले, “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मैं आपकी मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी में ठीक तरह  से बातचीत करने नहीं आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उनकी तरफ से माफी मांगता हूं . ”

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली, पण चढ्या आवाजांत म्हणाली, “मेरे दांत में बहोत दर्द है . मैं सफर नहीं कर सकुंगी. बस इतना मैंने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये हैं ? मैं उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार, पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”

यावर बनर्जीने जे उत्तर दिले, ते ऐकून मला हसावे की रडावे, ते कळेना.

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मैं वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैंने लेडी को बोला: टांग उपर करो,” असं म्हणून बॅनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग,’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी, तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिट में दोर्द गायब होता है.”

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जिभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

देवाला पण मानलं पाहिजे.

तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो.

 

एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहीत असतं म्हणून तो

मित्रांच्या, प्रेमाच्या

अगदी

नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना

दोन अशा व्यक्तिमत्त्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील.

 

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो,

गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो,

भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो

आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते,

ज्या योगे त्यांचं  कुठे अडणार नाही…

 

खरं तर

दोन व्यक्तींमध्ये फरक हा असणारच.

 

परंतु हा जो फरक आहे, तो ओळखून, तुम्ही कसे निभावता, हे जास्त महत्त्वाचं असतं.

 

कधी कधी आपण हतबल होतो..

कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही..

पण कोण चुकतं, त्यापेक्षा काय चुकतं

हे एकदा कळलं, की उत्तरं सोपी होतात.

 

अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन हाच एक मोठा अडथळा असतो.

 

आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल,

तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो.

 

पण आपणही समोरच्याच्या * *अपेक्षांमध्ये उतरतो का, हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.

वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे..

 

सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे,

नीरस होईल ?

 

उदास व्यक्तीच्या

सोबत उदास माणूस

कसं वाटतं ?

 

प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा,

एकटं राहू नये ह्यासाठी

मैत्री, जोडीदार, सहचर

अशा गोष्टी उदयास आल्या,

 

पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगूल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही.

 

आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे,

वेगळं आहे पण

गोड आणि प्रिय आहे, असा विचार करायला सुरुवात केली,

की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं .

 

‘अनुरूप’ शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही नं ?

 

एकमेकांना अनुरूप म्हणजेच

जिथे एक कमी, तिथे त्याची कमतरता दुसरा भरुन काढतो.

कधी गुणांनी,

कधी स्वभावाने,

कधी विचारांनी….

 

म्हणूनच विविधतेत एकता असते.

 

ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं. जे आपल्याला जपते

आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ……

 

जीवन सुंदर आहे।

सदा आनंदी रहा

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

तो म्हणाला – दिसायला देखणी, गोरीपान, मनमिळाऊ , मला व माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी, उत्तम स्वयंपाक बनवणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा सर्व अभ्यास घेणारी, कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठी न लावणारी, ऐकून घेणारी, नेहेमी आनंदी आणि समाधानी असावी एवढंच !

 

त्याला समजावले. . .

पोरा, एकाच झाडाला गुलाब, मोगरा, जाई, जुई, कमळ, रातराणी, निशिगंध, चाफा लागत नसतात रे !

 

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराया मात्र देवळाबाहेर लोकांच्या चपलांचा ढीग होता, त्यावर बसले होते. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं , “असे का चपलांवर बसलात ?”

तेव्हा रामराया म्हणाले, “जाता जाता देवळातून मला ऐकू आलं , ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ,

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

सगळ्यांचं मन बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे बसलोय !”

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘स्वतःत शोधून पहा…’ – लेखक – श्री गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्वतःत शोधून पहा…’ – लेखक – श्री गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

नेहमीच नसतं अचूक कुणी,

घड्याळ देखील चुकतं राव.

जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता

निसटून जातो हातून डाव.

 

पडत जातात उलटे फासे

घरासोबत फिरतात वासे,

अश्या वेळी मोडू नये

धीर कधी सोडू नये.

 

नशिबाच्या नावानेही

उगीच बोटं मोडू नये.

भरवश्याचे  करतात दावे,

आठवू नये त्यांची नावे.

 

सगळी दारं मिटतात तेव्हा

आपणच आपला मित्र व्हावे…

 

मग अचूक दिसते वाट,

बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत

झेलता येते प्रत्येक लाट,

 

ज्याला हे जमलं त्याला

सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी

वाट सोडून वाहतील वारे,

 

म्हणून म्हणतो इतकं तरी

फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार,

स्वतःत शोधून पहा.…!

 

कवी : श्री गुरु ठाकूर

प्रस्तुती – सुश्री श्रेया साने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधुनिक भूपाळी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आधुनिक भूपाळी… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

लिसन माझ्या सोन्या बाळा

केव्हाच झाली मॉर्निंग

वेक अप फ्रॉम द बेड आता 

शेवटची ही वॉर्निंग

 

छानपैकी ब्रश कर

चमकव तुझे टीथ

स्मॉल थिंग समजू नकोस

त्यातच तुझं हित

 

हॉट हॉट मिल्क केलंय

घालून बोर्नव्हीटा

या ड्रिंकने सहज फोडशील

हाताने तू विटा

 

वन ग्लास ट्वाईस घेताच

व्हीटामीन्स मिळतील मेनी

थोड्याच दिवसात तूही

होशील महेंद्रसिंग धोनी

 

मॅथ्सवाल्या टीचरला त्या

विचार सगळ्या क्वेरी

पाठ कर लंच ब्रेकला

मराठी लॅंग्वेज स्टोरी

 

स्कूल फिनिश करून इव्हला

होम झटपट गाठ

येता येता बसमध्येच

फ्रेझेस होऊ दे पाठ

 

ग्रॅंडपाच्या बर्थ डेची

आहे नाईट ला पार्टी

असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये

ग्रो होतात कार्टी !

 

मराठी च्या स्पीकिंगचेही लावू तुला कोर्स,

शोधलं खूप टाईम्स मध्ये पण सापडला नाही सोर्स.

 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचे थांबणे… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचे थांबणे… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

असं म्हणतात, की  वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही…पण वेळेचं गणित साधणाऱ्या ‘ती’ ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात ! –उदाहरणार्थ साध्या-साध्या गोष्टी–

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद …

पण ‘ती’ तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही…

कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते… तरीही

सगळी कामे आटोपल्यावरही,ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून , वाया जाऊ नये म्हणून.

तशीच,

जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , ‘ती’ थांबते.

शी-शू सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलाबाळांसाठी, कधी सोबतीला…. बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.

मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत ‘ती’ थांबते.

मुलं लहान असोत,नाहीतर मोठी…परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं…. सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते

तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण , शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत… कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत… ‘ती’ थांबते, जेवायची.

सगळ्यांच्या पाठीशी ‘ती’, थांबते.

खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय….व्यवस्थित.

काय हरकत आहे हे मान्य करायला…

तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे …त्या ऊर्जेमुळेच वेळ चांगली चालली आहे.

गेले जवळजवळ 2 वर्षे महाकठीण  प्रसंगाला सगळं जग तोंड देतंय,

पण इथे वेळ भराभर निघून जातेय.

अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी ‘थांबून’ आहे ….अगदी स्ट्रॉंग…

एकही दिवस kitchen  बंद नाहीये,

कंटाळा येतो, थकवाही… तरीही

रोजच्या-रोज सगळी स्वछता,

extra काळजी,

कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही, असं तिने मनाशी पक्कं ठरवलंय.

म्हणूनच म्हटलं , तिच्या या थांबण्यातही एक ऊर्जा आहे…त्या उर्जेमुळेच ही अशी कठीण वेळही निघून जाईल…!!!

प्रत्येक घरातील ‘तिला’ सादर नमन.

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्टी युक्तीच्या चार… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पै ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ गोष्टी युक्तीच्या चार… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पै⭐

जी गोष्ट मनात आहे,

 ती बोलण्याची हिम्मत ठेवा,आणि…

जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,

ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

 

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून, उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकात राहून,आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.

 

*परिस्थितीप्रमाणे

बदलणारी माणसे, सांभाळण्यापेक्षा, परीस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा.

आयुष्यात कधीही अपयश, अनुभवायला मिळणार नाही.*

 

माणूस कोणत्याही वस्तूला, फक्त दोनच वेळा महत्त्व देत असतो. एक तर ती मिळायच्या अगोदर, किंवा ती गमावल्याच्या नंतर.

कोणी तुमचा सन्मान करो, अथवा ना करो,

तुम्ही तुमचे कर्तव्य करत, चांगले काम करत रहा.

 

नेहमी लक्षात ठेवा…

करोडो लोक झोपेत असतात, म्हणून सूर्य आपला विचार, कधीही बदलत नाही. सूर्योदय हा होतोच…

 

बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाखी करता की, इमानदारी, हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं…

 

चलाखी चार दिवस चमकते,

आणि इमानदारी,

आयुष्यभर…

 

दुसऱ्याच्या मनात, निर्माण केलेली निर्मळ व स्वच्छ जागा, हीच खरी सर्वात महाग व अनमोल जागा…कारण…

तिचा भाव तर करता येत नाहीच,

पण एकदा जर का ती गमावली,

तर पुन्हा प्रस्थापित करता येत नाही…!!

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हिशोब काय ठेवायचा” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “हिशोब काय ठेवायचा ” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..

आपल्या थोड्या वर्षांचा..

हिशोब काय ठेवायचा ..!!

 

आयुष्याने भरभरून दिले असताना..

जे नाही मिळाले त्याचा..

हिशोब काय ठेवायचा..!!

 

मित्रांनी दिले आहे,

अलोट प्रेम इथे…

तर शत्रूंच्या बोलण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!

 

येणारा प्रत्येक दिवस,

आहे प्रकाशमान इथे..

तर रात्रीच्या अंधाराचा,

हिशोब काय ठेवायचा..!!

 

आनंदाचे दोन क्षण ही, पुरेसे आहेत जगण्याला..

तर मग उदासिनतेच्या क्षणांचा..

हिशोब काय ठेवायचा..!!

 

मधुर आठवणींचे क्षण,

इतके आहेत आयुष्यात..

तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..

हिशोब काय ठेवायचा..!!

 

मिळाली आहेत फुले इथे, कित्येक सहृदा कडून..

मग काट्यांच्या टोचणीचा..

हिशोब काय ठेवायचा..!!

 

चंद्राचा प्रकाश आहे, जर इतका आल्हाददायक..

तर त्यावरील डागाचा..

हिशोब काय ठेवायचा..!!

 

जर आठवणीनेच होत असेल, मन प्रफुल्लित..

तर भेटण्या न भेटण्याचा..

हिशोब काय ठेवायचा..!!

 

काही तरी नक्कीच..खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..

मग थोड्याशा वाईटपणाचा,

हिशोब काय ठेवायचा..!!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झाकली मूठ सव्वालाखाची…अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ झाकली मूठ सव्वालाखाची…अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले… त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.

*

राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली… आता या चवन्नी छाप राजाला अद्दल घडवायचीच.

*

पुजारी हुशार होता… राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला…

“राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा.”

आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का… ? पहिलीच बोली दहा हजार पासून… सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच ‘नाही परवडत’ असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.

*

तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, “महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय…”

*

राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, “हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको….”

*

तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली….

*….झाकली मूठ सव्वालाखाची….*

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares