मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घाई — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ घाई — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

फार घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणून…

लगेच गळे काढायची पण घाई…

 

माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

 

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

 

मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

 

विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

 

विचाराचा कोंब फुटता क्षणी,कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

 

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मेमधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई…

 

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…

चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई…

 

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर..

काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

 

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

 

प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…

मुक्कामाला पोहचायची घाई….

कामावरुन निघायची घाई…

सिग्नल संपायची घाई….

 

पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

सगळंच पटकन उरकायची घाई…

 

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

 

महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….

पाच मिनिटांत गोरं व्हायची घाई…

 

पंधरा मिनिटांत केस लांब व्हायची घाई…

 एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

 

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यानां दमवायची घाई…

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमुन जाई…

 

भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

 

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षा ही आहे

काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्री शंकर महाराजांनी सांगितलेला पत्त्यांच्या खेळातील मथितार्थ… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ श्री शंकर महाराजांनी सांगितलेला पत्त्यांच्या खेळातील मथितार्थ… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ⭐

महाराजांना पत्त्यांचा छंद होता. त्यांना खेळायची लहर आली की ते भेटायला आलेल्या माणसाला पत्ते खेळायला बसवीत. असेच एकदा कोराड मास्तर, श्री. भस्मेकाका आणि रघू यांच्याबरोबर महाराजांनी पत्त्यांचा डाव मांडला होता.

खेळता खेळताच रघूच्या मनात आलं, ‘पत्ते खेळणं काही फारसं चांगलं नाही. मग महाराज का खेळतात ?’

महाराज रागावतील म्हणून त्याने हा  प्रश्न मनातच ठेवला. परंतु त्याच वेळी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. ते किंचित हसले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, “हा पत्त्यांचा डाव वाईटच. होय ना रे ? पण तो त्याचा अर्थ न कळणाऱ्यांना.”

‘अर्थ ? पत्त्यांना कसला अर्थ असणार?’ असा विचार रघू करतो आहे,  तोच महाराज पुढे म्हणाले, “अरे बाबा, याचा अर्थ गूढ आहे.”

महाराजांनी एकेक पान समोर ठेवीत म्हटलं –

“ही दुर्री = म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

तिर्री = ब्रह्मा, विष्णू, महेश.

चौकी = चार वेद.

पंजी = पंचप्राण.

छक्की = काम, क्रोध हे सहा विकार.

सत्ती  = सात सागर.

अठ्ठी = आठ सिद्धी.

नव्वी = नऊ ग्रह.

दश्शी = दहा इंद्रिये, पाच कर्मेंद्रिये + पाच ज्ञानेंद्रिये.

गुलाम = आपल्या मनात येणाऱ्या वासना, इच्छा. माणूस त्यांचाच गुलाम होऊन राहतो.

राणी = माया.

राजा = या सर्वांवर स्वार होऊन त्यांना चालवणारा.

आणि एक्का = विवेक. माणसाची सारासार बुद्धी. या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा.

काय रे ? डोक्यात शिरलं का काही?”

आता या लहानग्याला काय कळणार ? त्यानं गोंधळून एकदा होकारार्थी मान हलवली. एकदा नकारार्थी मान हलवली.

महाराज हसले. मास्तरांना म्हणाले, “तुम्ही सांगा याची फोड करून!”

“मला सुद्धा नीटसं नाही सांगता यायचं. पण प्रयत्न करतो. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे, तिच्या नादानं वाहावत जातं ते माणसाचं मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेवू शकतो, त्याला अंकुश लावू शकतो तो विवेक- हुकुमाचा एक्का म्हणजेच सदगुरू!”

“बरोबर.” महाराज म्हणाले, “समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध ! त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहीत नसतात. पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगतो.”

संग्राहिका : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मुलाने काही कमावले तर ४ पैसे घरात येतील

किंवा

४ पैसे मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो.

मग या तथाकथित पैशांमध्ये केवळ ४ पैसे का ?

३ किंवा ५ पैसे का नाहीत हा प्रश्न आहे..?

चला तर मग वडीलधाऱ्यांकडून  तपशील जाणून घेऊन ४ पैसे कमवा ही म्हण समजून घेऊ या.

पहिला पैसा

विहिरीत टाकण्यासाठी.

 दुसऱ्या पैसा

कर्ज फेडणे.

तिसऱ्या पैसा

पुढचे देणे भरणे

चौथा पैसा

भविष्यासाठी जमा करणे

या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊ या.

१.  विहिरीत एक पैसा टाकणे.

म्हणजे – स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटे भरण्यासाठी वापरणे.

२. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा.

 आई-वडिलांच्या सेवेसाठी..,

 ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले.

३. पुढील (मुलांचे) कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे.

तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा.

 (म्हणजे – भविष्यातील कर्ज)

४.  चौथा पैसा पुढील (पुण्य) ठेवीसाठी वापरणे.

म्हणजे – शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने,  गरजवंतांची सेवा करणे आणि असाहाय्यांना मदत करणे, या अर्थाने..!

 तर.. ही ४ पैसे कमावणारी गोष्ट आहे.  आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत..!

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 43 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 43 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७८.

विश्वाची निर्मिती नुकतीच झाली होती.

प्रथम तेजात तारका चमकत होत्या.

तेव्हा आकाशात देवांची सभा भरली आणि

ते गाऊ लागले-

“वा!पूर्णत्वाचं किती सुरेख चित्र! निर्भेळ आनंद!”

 

एकजण एकदम ओरडला,

“प्रकाशमालेत कुठंतरी त्रुटी आहे.

 एक तारा हरवलाय!”

 

त्यांच्या वीणेची एक तार तुटली.गीत थांबले.

ते निराशेनं म्हणू लागले,

” हरवलेली ती तारका सर्वात सुंदर होती.

 स्वर्गाचं वैभव होती.”

त्या दिवसापासून सतत शोध चालू आहे.

आणि प्रत्येकजण दुसऱ्याला सांगतो,

” जगातला एक आनंद नाहीसा झाला आहे.”

रात्रीच्या खोल शांततेत तारका हसतात

आणि आपापसात कुजबुजतात,

“हा शोध व्यर्थ आहे,

एकसंध पूर्णत्व संपलं आहे.

 

७९.

या आयुष्यात तुला भेटायचं माझ्या वाट्याला

येणार नसेल तर, तुझ्या नजरेतून

मी उतरलोय असं मला सतत वाटू दे.

मला क्षणभरही विस्मरण होऊ नये.

जागेपणी व स्वप्नातही या दु:खाची टोचणी

सतत मनात राहो.

 

जगाच्या बाजाराच्या गर्दीत माझे दिवस

जात असताना आणि दोन्ही हातांनी

भरभरून नफा होत असताना

मला सतत असे वाटत राहो की मी

काहीच मिळवत नाही.

या दु:खाची टोचणी मला स्वप्नात व

जागेपणी सतत राहावी.

 

दमून भागून रस्त्याच्या कडेला मी बसेन.

धुळीत माझा बिछाना पसरेन तेव्हा,

दीर्घ प्रवास अजून करायचा आहे याची जाणीव

मी क्षणभरही विसरू नये

आणि या दु:खाची टोचणी मला जागृतीत व

स्वप्नातही रहावी.

 

शृंगारलेल्या माझ्या महालात

गाण्याचे मंजूळ स्वर आणि

हास्याचा गडगडाट असावा.

तेव्हा मात्र मी तुला निमंत्रण दिले नाही या दु:खाणी टोचणी मला जागेपणी

व स्वप्नातही असावी.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

एक आई सोडली

तर

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे

काहीही नाही आणि

भावंडांमध्येही

मी एकटाच.

 

एकदा

थकल्या आवाजात आई म्हणाली होती,

“तुला एखादा भाऊ हवा होता

म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता.”

बस्स इतकेच.

 

मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून

त्याची आई कुठे दिसली नाही घरात

सहज विचारले तर म्हणाला,

“दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी.”

“सहा महिन्यांसाठी म्हणजे ?

म्हणजे काय ?”

“वडील वारले आणि गावाकडच्या

घराची आणि शेतजमिनीची

वाटणी

झाली होती दोघांमध्ये

तेव्हाच ठरले होते –

आईलाही दोघांनी सहा-सहा महिने सांभाळायचे आणि

तसेच काही झाले तर अर्धा-अर्धा खर्चही

वाटून घ्यायचा दोघांनी.”

आईविना पोरक्या घराचा

आणि मित्राचा मी निरोप घेतला.

 

घरी आलो तर

आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी बडबडत असलेली

सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या समुद्रासारखे अथांग

देहाला जाणवणारा, न जाणवणारा हलकासा कंप

घट्ट पदर लपेटून, उजव्या हाताने मांडीवर हलकासा ठेका

एक अपार करूणा समोर

मूर्तिमंत !

 

मी जवळ गेलो तिच्या

बसलो गळून गेल्यासारखा

तर म्हणाली –

“का रे ?

चेहरा का उतरलाय ?

कोठे गेला होतास ? बरे का नाही वाटत ?”

“काही नाही गं,” असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला

घट्ट धरून ठेवला

तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजुनही नाळ न तुटलेला दृष्टांत.

 

उठलो सावकाश गेलो आत

देवघरात

मित्राची आई आठवत राहिलो

समईच्या मंद उजेडात.

 

रात्र झाली असावी खूप आता

मध्येच जाग येते आहे आणि

मी सावकाश येतो आईजवळ तर

ती शांत झोपलेली –

माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा एक कवडसा हलतो आहे

तिच्या चेह-यावर अजुनही.

 

देवा,

मला कोणत्याही जन्मी

लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस

आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस.

 

मी सावकाश उठतो

पाय न वाजवता

सावध फिरत राहतो सगळ्या घरभर

आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून वाहत राहतात

माझे ओठ

रात्रभर कसलीतरी प्रार्थना गुणगुणत राहतात…

 

एक आई सोडली

तर

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही

आणि

भावंडांमध्येही मी

एकटाच….

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायको… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बायको… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाच्या नशिबात

एक बायको असते

आपणास कळतही नसते

डोक्यावर ती केव्हा बसते

 

बायको इतरांशी बोलताना

गोड, मृदू स्वरात बोलते

अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही

नवऱ्याने काय पाप केले असते

 

ज्ञानेश्वराने भिंत चालवली

बायको त्यांचं कौतुक करते

सालं! नवरा अख्खं घर चालवितो

तेव्हा मात्र बायको गप्प असते

 

वस्तू कुठे ठेवली

हे बायको विसरते

दिवसभर नवऱ्यावर

उगीचच डाफरते

 

लग्नात पाचवारी बायकोला

खूप होत होती मोठी

आता नऊवारी गोल नेसताना

बायकोला होतेय खूपच छोटी

 

बायकोच्या प्रेमाची गड्यांनो

तर्‍हाच खूप  न्यारी असते

पाहिजे तेव्हा रेशन लागते

नको तेव्हा उतू जाते

 

वयाच्या साठीनंतर

एक मात्र बरं असतं

बायको ओरडली तरी

नवऱ्याला ऐकू येत नसतं

 

       काट्याकुट्याच्या रस्त्यातून

       नवरा किती मस्तीत चालतो

       याला कारण खरं बायकोचा

       मस्त, धुंद सहवास असतो

 

   बायको गावाला गेली की

  देवाशपथ, करमत नसतं

   क्षणाक्षणाला रुसणारं

   घरात कुणीच नसतं

 

   नवरा-बायकोचं

   वेगळंच नातं असतं

   एकमेकांचं चुकलं तरी

   एकमेकांच्याच मिठीत जातं

 

       बायकोवर रागावलो तरी

       तिचं नेहमी काम पडतं

       थोडावेळ जवळ नसली तर

       आपलं सर्वच काही अडत असतं

 

       अव्यवस्थित संसाराला

       व्यवस्थित वळण लागतं

       त्यासाठी मधूनमधून

       बायकोचं ऐकावंच लागतं

 

       सुना-नातवंडासह आता

       घर चांगलं सजले आहे

       बायको एकटी सापडत नाही

       दुःख मात्र एवढंच आहे.

 

      बायकोशी भांडताना

      मन कलुषित नसावं

      दोघांचं भांडण

      खेळातलंच असावं

 

      नाती असतात पुष्कळ

      पण नसतो कुणी कुणाचा

      खरं फक्त एकच नातं

      असतं नवरा  बायकोचं

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रोज एक टक्का सुधारणा — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रोज एक टक्का सुधारणा — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

रोज तुम्ही स्वतःमध्ये 1 टक्का जरी सुधारणा केलीत, तरी वर्षभरात तुमच्यामध्ये 365 टक्के सुधारणा झालेली असेल.

एअरपोर्टच्या जवळ लिहिलेले एक सुंदर वाक्य: आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारणारे मित्र जमिनीवरच राहतात.

ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते!

आयुष्यात व्यवहार तर खूप  होतात; पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.

आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते. परंतु खाली येणे, ही त्याची हार नसते,तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते.

यशस्वी तर भरपूर जण असतात; परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हा जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो.

जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते, असे काही नाही. मधुर वाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते.

तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते. ती म्हणजे हा आपल्यापुढे निघून जाईल. नातं कोणतंही असू द्या… फक्त इमानदार असलं पाहीजे.

जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते! साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं!

माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो… परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढंच ना…? परंतू मला वाटतं… माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं… जिथं जावं, त्याचं सोनं करून यावं..

प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही…!

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री स्वतःच पूर्णरुप… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले  ?

☆ स्त्री स्वतःच पूर्णरुप… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली.

पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा यशोधरेला समजली, तेव्हा ती उद्ध्वस्त झाली. पण तिने कुणाकडेही तक्रार केली नाही. जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहील, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे, असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली. पण तिने त्यास नकार दिला.

आणि एका सुंदर सकाळी…

ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.

तिने शांतपणे त्यांना विचारले, “आता तुम्हाला लोक ‘बुद्ध’ म्हणून ओळखतात ना ?”

त्यांनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिले, “होय. मी देखील तसे ऐकले आहे.”

तिने पुढे विचारले, “त्याचा अर्थ काय ?”

“जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !” ते म्हणाले.

ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.

काही वेळाने ती म्हणाली, “आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग समृद्ध होईल;पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही.”

बुद्धांनी तिला विचारले, “तू काय धडा शिकलीस ?”

तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या .

“तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते.”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नावात काय आहे?’ … व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘नावात काय आहे?’ … व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

‘नावात काय आहे?’ – हा प्रश्न तसा जगजाहीर.

नावात खरंच तसं काही नाही. ते नाव घेऊन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला, ह्याला जास्त महत्त्व . तुम्हाला कोणते आईवडील लाभले, त्यावर बरंचसं अवलंबून. तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.

पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजूतल्या एका ताटलीतल्या. दुसरी ताटली तुमची स्वत:ची. ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबून.

लेखक – व. पु. काळे

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

“मला नाही जमणार ग ह्यावेळी,”

… हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. काही वेळा ह्या वाक्यामागे खरं कारण असतं, तर काही वेळा ती गोष्ट टाळायची म्हणून घेतलेला हा stance असतो. असं का होतं, ह्याचा विचार केला तर लक्षात येते की आपल्या priorities ठरलेल्या असतात, त्यात जास्त फेरफार आपल्याला झेपत नाही.

माझी आई नेहेमी सांगायची की “बाकी कशाला सवड काढ, नाही तर काढू नकोस, पण आपल्या सणावारांना, देवासमोर निवांत दिवा लावण्यासाठी, मुलांच्या शाळेतील शिक्षक पालक मीटिंगला, कुटुंबीयांच्या वाढदिवसाला, स्वतःच्या तब्येतीसाठी, मैत्रिणींबरोबर मज्जा करण्यासाठी नक्की वेळ काढ.”

मला काही सगळं पटायचं नाही. मी म्हणायचे, “आई कामासाठी वेळ नको का?”
तर आई हसून सांगायची, “महिन्याचा पगार मिळेल, बढती मिळेल म्हणून तू रोजच अगदी नेटाने काम करतेस ग. पण नात्यांचे काय? आपल्या सांस्कृतिक विचारांचे काय? त्यासाठी वेळ काढावाच लागेल. नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा एकटी घरात असशील, तेव्हा कोण असणार आहे?”

नातेवाईकांकडे कधी गेली नाहीस, मैत्रिणींना कधी घरी बोलावले नाहीस, स्वतः गेली नाहीस, मग तुझ्या उतरत्या काळात त्या येतील, अशी अपेक्षा करु नकोस! आपण माणसे इतकी स्वार्थी असतो, की काही न देता आपल्याला समोरच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाला तर वाईटही वाटते.”

आईला म्हटलं, “तू एवढी psychology कधी शिकलीस ग?” … ती हसली आणि म्हणाली, “आयुष्य जेवढं शिकवतं, तेवढं तुमच्या एमबीए मध्ये पण नाही शिकवत.. तेव्हा माणसांना आधी priority दे तरच आयुष्यात सुखी आणि समाधानी राहशील.”

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares