श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
कोणीतरी त्यादिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर ‘हॅपी बर्थडे अनिल ‘ अशा शुभेच्छा दिल्या. तेव्हा ‘आज अनिल चा वाढदिवस आहे’ हे ग्रृपमधील इतरांना समजले. लगेचच ग्रृपवर शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला.
प्रत्येकाने त्वरित आपापले कर्तव्य पूर्ण केले. काहींनी मराठीत, काहींनी हिंदीत, काहींनी इंग्रजीत, काहींनी संस्कृतमध्ये तर काहींनी स्टिकर, GIF इत्यादी टाकून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. काही क्षणातच ग्रुप ला उत्सवाचे वातावरण आले. यापैकी अनेक जणांना तर अनिल तो काळा की गोरा हे ही माहीत नव्हते.
दुपारी त्याच ग्रुपवर बातमी आली की ‘सदानंदच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. लगेच ग्रुपवर दुःखाचा महापूर आला. ‘आर आय पी’ पासून ‘आम्ही सदानंदच्या दुःखात कसे सहभागी आहोत’ याचे मेसेज येऊन आदळू लागले.
आता मध्येच अनिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात की नाही या संभ्रमात काही सदस्य पडले. पण यातूनही मार्ग निघाला.
जरा वेळाने वाढदिवस असलेल्या अनिलला शुभेच्छा आणि सदानंदच्या वडिलांना श्रद्धांजली असा ऊन – पावसाचा दुहेरी खेळ चालू झाला.
बघता बघता संध्याकाळ झाली आणि अनेकांच्या ‘दिवे लागणीची’ वेळ झाली.
त्यामुळे त्यातल्या एका दिवट्याने चुकून आज दुःखात असलेल्या सदानंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनिलच्या (हयात असलेल्या) वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
पुढे ज्यांनी नुकताच ग्रुप उघडला होता त्यांनी (नेहमीप्रमाणे मागचे मेसेज न वाचता) आपापली अलौकिक प्रतिभा वापरून वाढदिवस असलेल्या अनिलचे (हयात असलेल्या) वडिलांच्या मृत्यूबद्दल मनापासून सांत्वन केले तर सदानंदला (आजच ज्याचे वडील मयत झाले होते त्याला) ‘हा अतीव आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात अनेक वर्षे येवो’ असे म्हणत अभिष्टचिंतन आणि निरोगी दीर्घायुष्य चिंतिले.
भरीस भर म्हणून एका महाभागाने अनिलच्या वडिलांच्या मृत्यू करता दुखवट्याचे दोन मिनिटांचे शब्द रेकॉर्ड करून पाठवले, आणि सदस्यांना दोन मिनिटे मौन पाळायची विनंती ही केली.
काहींनी तर सदानंद कडून ‘भावा.. आज पार्टी पाहिजे’ अशी मागणी देखील केली.
सरतेशेवटी त्या संध्याकाळी ‘अनिल’ आणि ‘सदानंद’ दोघेही अचानक ग्रुपमधून लेफ्ट का झाले हे मात्र बऱ्याच जणांना आजतागायत समजलेले नाही. 😂
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com