वाचताना वेचलेले
☆ फक्त एक ‘इव्हेंट’…..अनामिक ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆
अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा एक मोठा झोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला. तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले …
कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … “ सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची …” पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. “आधी वाटणी ठरवायची कान्हा …” कान्हाला काही कळेना … तो म्हणाला ..
“ माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक ..”
पेंद्या म्हणाला …” काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? “ कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. “ मग काय हवं तुम्हाला .. ?” पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला …” बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईटची संधी … आणि अपघाती विमा …” कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … “ इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. “
कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. “ प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पनाही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता फक्त एक “ इव्हेंट “ बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. “ आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. “ पण कान्हा …”
कान्हा शांत स्वरात म्हणाला .. “ अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हाशिवाय हा सण असाच साजरा करत रहातील ..” असं म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..
लेखक : अनामिक
संग्राहिका : उषा आपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈