मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

माझे वडील रोज पूजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधी कधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुदा एकच असते. मला पण छान वाटतं, असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते. त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

‘अनायासेन मरणं’: मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा, तर अनायासेन – सहज.

‘विनादैन्येन जीवनं’ : जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

‘देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर’:  मृत्यू नंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा, तुझे’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

हेचि दान देगा देवा

 तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना!रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कार वर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते, दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड असते,तोच विषय आमचापण होता. हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, आता काय ग आपली मुलं मोठी झाली, संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली. आता ती घडली, आता परिवर्तन होणार नाही. मला तेव्हा सांगावंसं वाटलं तिला, संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीसारखं  नाही ग, आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही. ती तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते.

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे, पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तोपर्यंत तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील. आज कदाचित त्याच महत्त्व तिला कळणार नाही, पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडतांना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार मानणे’ ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती.  आपल्या जीवनाची जो पर्यंत ‘जबाबदारी’ आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध’ शक्ती सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण त्याची जबाबदारी घेतो त्या क्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

‘अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्। देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।’

लेखिका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

ईशा :-  “आजी काय शिवतेयस? ” 

आजी :-  “अगं! विशेष काही नाही.  नेहमीचेच आपले! उसवलेले  शिवणे.  पण बरं झालं  आलीस.  जरा सुई ओवून दे ग राणी.  “

ईशा  :- “हो  , देते.  आण.  “

आजी :-  ” ईशा! खरंतर मला असे एवढ्या- तेवढ्यासाठी तुला कामाला लावायला आवडत नाही.  पण….. काय करणार! वय झाले की परावलंबन येतेच! “

ईशा :-  “ परावलंबन म्हणजे काय ग आजी? “

आजी  :- “अगं! म्हणजे  काही कामांसाठी दुसऱ्यावर अवलंबून  राहणे.  dependence  ग! “

ईशा  :- ” हं…. आजी तू  74 वर्षांची आहेस न? मग 74  व्या वर्षी म्हणतात का? वय झालंय असं?  मी आत्ता  आठव्या वर्षी  नाही म्हणू शकत का? माझं  वय झालंय म्हणून? 🤔 “

आजी :-  ” 😃! अगं  बाळा, असं नाही.   एका वया नंतर म्हाताऱ्या माणसांना सर्व कामे  पूर्वीसारखी  जमेनाशी होतात.  तेव्हा  वय झालंय म्हणतात.  तुझे वय तर आत्ता  नवनवीन कामे , कौशल्ये  म्हणजे  skills   शिकण्याचे वय आहे.  “

ईशा  : – ” अगं पण आजी तू मोदक , पुरणपोळ्या,  गुळाच्या  पोळ्या  वगैरे  करतेस की अजूनही  पहिल्यासारख्याच.  मग? “

आजी  :-  ” अगं सोने! त्यात डोळ्यांचे काम नसते न फारसे! “

ईशा :-  ” अच्छा! मग असे म्हण  ना की तुझ्या  डोळ्यांचे वय झालेय.  जसे  आजोबांच्या  गुडघ्यांचे  वय झालेय  तसे.  बरोबर ना?  “

बडबड अक्का  बडबड करून पळून गेली.  पण आजी मात्र विचारांच्या भोवऱ्यात जणू  फिरतच राहिली.  

ईशा पटकन बोलून गेली   ‘डोळ्यांचे  वय  ‘.  नकळत किती बरोबर बोलली होती ती.  

अलिकडे 2/3 वर्षे मंदाताईंनाही असे काहीसे जाणवत होते की काही गोष्टी  अगदी  पूर्वीसारख्या  पूर्ण  आत्मविश्वासाने आपण अजूनही करतो आणि काही बाबतीत मात्र वय झालेय असे  पुन्हा पुन्हा वाटते.  मालिकांची नावे आठवत नाहीत; पण शेजारची अनू  वीण विचारायला आली की अगदी सहज आठवून सांगते.  स्मार्ट फोन वापरताना बोटे भलतीचकडे पडतात पण वाती करताना ,  मोदक करताना हीच बोटे  किती शिताफीने  भराभर  फिरतात.  

याचा अर्थ असा की आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे वय वेगवेगळ्या वयात होते.   मंदाताईंना आता नादच लागला , कोणती कामे  पूर्वीसारखी  होतात व कोणती  होत नाहीत हे पहाण्याचा.  

एक दिवस त्यांनी सरळ 50 कामांची यादीच  केली.  त्यातली काही कामे  दैनंदिन तर काही कामे  कौशल्याशी निगडीत.  यादी पूर्ण झाली आणि त्यावर टिकमार्कही झाले.  

मंदाताईंना खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला  कारण त्यांना त्यातली  41 कामे अजूनही जशीच्या तशी करायला जमतात  हा शोध लागला.   म्हणजे 82% कामे जमतातच की! 👍👍

अरेच्चा! मग आपण दिवसाकाठी इतक्या वेळा  ‘ वय झालेय ‘ असे का बरे म्हणतो? 🤔🤔 खरंतर आपल्या एखाद्या अवयवाने असहकार पुकारणे म्हणजे वय होणे  नव्हे.   जी कामे माझ्या आवडीची आहेत ती मी अजूनही छान करू शकते कारण ती पुन्हा पुन्हा करते  म्हणून सराव आणि आत्मविश्वास दोन्ही खूप असतो.   म्हणजेच सरावाने  आत्मविश्वास टिकवता येतो.  

याच विचारातून  मंदाताईंना एक समाधानकारक शोध लागला.  तो म्हणजे…… वय होण्याचे वय थांबवणे  हे थोडेफार का होईना, आपल्या हातात आहे.  

त्या लगेच उठल्या  , खोलीत गेल्या  आणि पेटीतून जुनी , जपून ठेवलेली  लोकर आणि सुया काढल्या.  छान एकसारखे  टाके घालू लागल्या.  त्या स्वतःवरच खूप खूश होत्या. प्रत्येक टाका जणू  सांगत होता ‘मनाचे आणि मेंदूचे वय  अजून झालेले नाही  मंदाताई. ‘ 😊

लेखिका :सुश्री सुजाता भडभडे

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

मी कधी कधी अंधाऱ्या रात्री

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

आणि खात्री करतो त्याचा श्वासोच्छवास सुरु असल्याची

कारण मला शंका आहे की . .

तो रोज थोडाथोडा मरू लागलाय

 

तारांकित हॉटेलात मी जेवणाचं बिल भरतो

मला दिसतो जवळच उभा असलेला द्वारपाल

त्याचा महिन्याचा पगार या बिलाइतका तरी असेल काय?

कॉलरवर बसलेल्या नाकतोड्यासारखा,

हा विचार मी बोटाच्या टिचकीने झटकतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी रस्त्याकडेच्या भाजीवालीकडून भाजी घेतो

तिचा मुलगा छोटू, कांदे निवडून देतो

छोटू शाळेत का जात नसेल?

फुकट घेतलेल्या कढीपत्त्या बरोबर

हा प्रश्नही मी पिशवीतल्या भाजीखाली कोंबतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

डिझायनर कपडे चढवून मी गाडीतून जात असतो

बसल्या बसल्या गुटखा खात असतो

सिग्नलवर मळक्या, फाटक्या वस्त्रातली भिकारीण दिसते

थुकण्यासाठी खाली केलेल्या काचेतून ती हात पुढे करते

खिशात चिल्लर न सापडल्याने मी गाडीची काच वर करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी मुलींसाठी महागडी खेळणी घेऊन येत असतो

खपाटीला गेलेल्या पोटाचा अन मलूल चेहऱ्याचा

एक पोरगा रस्त्यात खेळणी विकताना दिसतो

सद्सदविवेकाच्या टोचणीपायी

एक खेळणे त्याच्याकडूनही घेतले जाते, तरीही ..

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मोलकरणीच्या ऐवजी एक दिवस तिची शाळकरी मुलगी येते

माझ्या घरच्या कामासाठी तिने शाळा बुडविलेली असते

तिला शाळेत पाठवावं असं क्षणभर माझ्या मनात येते

मग मला उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक दिसतं

एकदोन दिवसाचा तर मामला आहे, मी मलाच समजावतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

रोज सकाळी एखादी ब्रेकिंग न्यूज येते

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची किंवा हत्येची

वाईट वाटते खूप, तरीही मी देवाचे आभार मानतो

कि ती अभागी अत्याचारग्रस्त,

माझी मुलगी नाहीये

आरशामध्ये स्वतःच्या नजरेला नजर द्यायलाही मी घाबरतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

जातीपातीवरून, आरक्षणावरून होणारे झगडे रोजचेच

अधूनमधून होणाऱ्या दंगलींनी मी अस्वस्थ होतो

कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी उद्वेगाने म्हणतो

सर्व दोष राजकारण्यांवर टाकून, हात झटकून मी मोकळा होतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

प्रदूषित हवा शहराचा गळा घोटत असताना

विकासाचा भार शहराला सोसत नसताना

मी रोज कार घेऊन ऑफिसला जातो

बस, ट्रेन, मेट्रो, कारपूल हे पर्याय असतीलही कदाचित,

एका कारने काय फरक पडतो असा विचार मी करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

किट्ट काळोख्या रात्री जेव्हा मी

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

त्याचा श्वासोच्छवास सुरु पाहून मलाच आश्चर्य वाटतं

 

मग मी नव्याने, स्वतःच्या हाताने, नवनव्या मार्गाने

त्याला रोज थोडंथोडं मारू लागतो, पुरु लागतो

मूळ इंग्रजी कविता : It dies a little.

कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी

मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४८.

  पाखरांच्या मंजुळ स्वरांनी

  प्रभातसमयीचा शांत सागर उचंबळला,

  रस्त्याकडे ची फुलं आनंदानं नाचू लागली.

  ढगाढगांच्या पोकळीमधून परमेश्वराची

  दौलत पसरू लागली.

 

 मात्र या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून

आम्ही आमच्या उद्योगाला लागलो.

आनंदगीतं आम्ही गायली नाहीत की

खेळलो- बागडलो नाही.

बाजारहाट करायला आम्ही गावात गेलो नाही.

 

एकही शब्द आम्ही बोललो नाही,

हसलो नाही की वाटेवर रेंगाळलो नाही.

 

जसजसा समय जाऊ लागला तसतसा

आमच्या चालण्याचा वेग वाढत गेला.

 

सूर्य माथ्यावर आला.

बदकं सावलीत जाऊन गाऊ लागली.

दुपारच्या उन्हात गिरकी खात

पिकली पानं नाचू लागली.

केळीच्या झाडाखाली बसून

मेंढपाळांची पोरं पेंगू लागली,

स्वप्नात हरवून गेली

आणि मी जलाशयाशेजारच्या गवतावर

थकलेली गात्रं पसरली.

 

माझे सोबती उपहासानं मला हसून

ताठ मानेनं न थांबता घाईघाईनं निघून गेले.

विसाव्यासाठी ते विसावले नाहीत.

दूरच्या निळाईत ते दिसेनासे झाले.

त्यांनी किती कुरणं पार केली,

किती टेकड्या पार केल्या,

दूरचे किती मुलूख पादाक्रांत केले!

 

हे शूरवीरांनो, अनिर्बंध पथाच्या प्रवाशांनो,

तुमचा जयजयकार असो!

 

तुमची चेष्टा- मस्करी ऐकून,

त्वेषाने मला उठावेसे वाटले,

पण माझ्यात उभारी नव्हती.

 

अंधूक आनंदाच्या सावलीत

सुखी अवमानाच्या गहराईत मी लुप्त झालो.

सूर्यवलयांकित पोपटी निराशेनं

माझ्यावर पखरण घातली.

 

मी कशासाठी प्रवासास

निघालो होतो कुणास ठाऊक?

विनासायास माझं मन मात्र

छाया आणि संगीत यांना शरण गेलं.

 

आणि शेवटी, जाग आल्यावर मी डोळे उघडले, तेव्हा तू माझ्या बाजूला उभा होतास.

माझी निद्रा तुझ्या स्मितानं

काठोकाठ भरून टाकत होतास.

 

मात्र मला भिती वाटली होती. . .

तुझ्याकडे नेणारा हा प्रवास. . .

किती दीर्घ पल्ल्याचा,

कंटाळवाणा आणि कठीण असेल?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन फंडा… सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन फंडा… सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली.  आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने  सुखावली.

सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून, ‘ये बस’ म्हणाली. ‘नाश्त्याला काय करायचं, हे विचारायला आले होते’, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया, असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली.

लेखिका :सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

बहुतेक वेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते. पण कोणाचेही घर एकट्या स्त्रीमुळे फुटत नाही, तर ते फक्त स्वार्थामुळे फुटत असते, आणि तो स्वार्थ कुटुंबातील स्त्री , पुरुष यापैकी कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो . 

मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते. मग पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते.  आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्री अतिउत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येते. खरेतर हा फक्त धूर असतो, स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते. माणसाला दुरुन धूर दिसतो ,आग दिसत नाही .

स्त्रीने कितीही प्रयत्न केला, तरी  घरातील पुरूष निःस्वार्थी आणि खंबीर असेल, तर तिला घर कधीच फोडता येत नाही. 

कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, पण दशरथ निःस्वार्थी होते. त्यांनी जीवन संपवले, पण घर फुटू दिले नाही.  

वडिलांच्या आज्ञेनुसार स्वतःची काहीच चूक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वडलांच्या वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला, पण भरतानेही त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले, कारण हे सर्व पुरुष निःस्वार्थी होते. कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. उलट तिलाच घरात एकटे रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली.

पुरुष निःस्वार्थी असेल तर जगातील कोणत्याही स्त्रीला घर फोडता येत नाही.  पण जर पुरुष स्वार्थी बनला तर कोणत्याच स्त्रीला घर एकत्रित ठेवता येत नाही हेही तितकेच खरे आहे. 

धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला. गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता. या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. पण त्यांनाच काय,  भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरीसुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही. पुरुषाच्या मनात स्वार्थ निर्माण झाला तर देवालासुध्दा घर वाचवता येत नाही.  यात स्त्रियांना दोष देऊ नका.

एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय, हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानाचा क्षण असतो आणि आईवडील हयात असताना घराच्या  वाटणीचा दिवस हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .

याबाबतीत त्यांना सुख द्यायचे की दुःख द्यायचे हे सर्वस्वी मुलांच्या हातात– म्हणजेच त्यांच्या मनातील स्वार्थावर अवलंबून असते.

म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी उगीचच फक्त घरातील स्त्रीला बदनाम करू नका. 

घर कधीच फक्त स्त्रियांमुळे फुटत नाही, तर ते एका कुणाच्या स्वार्थामुळे फुटते. आपल्या घराचे घरपण हे बहुतांशी स्त्रीमुळे टिकून असते.  ज्या घरातील पुरुष आणि स्त्री दोघेही खंबीर व निस्वार्थी असतात , त्यांचे घर कधीही फुटू शकत नाही हे नक्की. 

 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. कसे ते बघा—-

१ ) चर्च मधे दिल्यास—त्याला ऑफरींग म्हणतात.

२) शाळेत दिले— तर त्याला फी म्हणतात.

३) लग्नात दिले=== तर त्याला हुंडा म्हणतात.

४) घटस्फोटात दिले— तर त्यालापोटगी म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले— तर त्याला उसने दिले म्हणतात.

६) शासनास दिले— तर त्याला कर म्हणतात.

७) न्यायालयात दिले— तर त्याला दंड म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले– तर त्याला पेन्शन म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले— तर त्याला पगार म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले— तर त्याला बोनस म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास— त्याला कर्ज म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना—त्यास हप्ता म्हणतात.

(१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास— त्याला टिप म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास— त्याला खंडणी म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास— त्याला लाच म्हणतात..

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास—त्याला भाडे म्हणतात.

१७) सामाजिक / धार्मिक कार्यास दिल्यास— त्याला देणगी म्हणतात.

(१८) देवालयास/ मंदिरास दिले—- तर नवस म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले— तर त्याला आहेर म्हणतात.

आता प्रश्न असा आहे की —–

२०) पतीने पत्नीस पैसे दिल्यास—- त्याला काय म्हणावे ?

      अहो सोपं आहे— एवढंही माहीत नाही का ?

— त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एवढे जमले पाहिजे — ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ एवढे जमले पाहिजे — ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण असते. कालचा दिवस हा अनुभव असतो, आजचा दिवस हा प्रयोग असतो, तर उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.

जो सर्वात आधी क्षमा मागतो, तो धाडसी असतो, जो सर्वात आधी माफ करतो, तो पराक्रमी असतो, आणि जो सर्वात आधी दुःख विसरून जातो, तो सुखी असतो.

जगात येताना आपल्याकडे देह असतो पण नाव नसते, जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असले तरी देह उरलेला नसतो.  मिळालेल्या देहाचे, नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आपले आयुष्य असते.

जिनकी आँखे आँसू से नम नही, इसका अर्थ ऐसा नही की उन्हे कोई गम नहीं । 

कोई तडप कर रो लेते है, तो कोई अपना गम छुपाके हँसते हैं ।

मुस्कुराने की वजह ना ढूंढो, वरना जिंदगी यूही कट जायेगी, 

कभी बेवजह भी मुस्कुराके देखो, आपके साथसाथ जिंदगीभी मुस्कुरायेगी ।

A person’s most valuable asset is not a brain loaded with knowledge, but a heart full of love, with an ear open to listen, and a hand willing to help.

वेळ संभाळायला, वचन पाळायला, हृदय जोडायला जमले, की परकी माणसेपण नकळत आपली होतात.

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पितृपक्ष… — ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ पितृपक्ष — ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

भाद्रपदातल्या पौर्णिमेच्या रात्री

चंद्र आपलं पूर्ण चांदणं पसरतो धरतीवर

नंतर एक लांब शिडी उतरते चंद्रावरुन

थेट जमिनीवर—-

आणि उतरतात आपले सारे पूर्वज

जमिनीवर—

आपल्या सर्वांना आशिर्वाद द्यायला–

 

काही मागत नाहीत ते –बस बघायला येतात

आपल्या फुलबागेला बघून खूष होतात 

कुणी आठवण आपली ठेवतंय—

 

तृप्त होतात छोट्याशा कर्मानी आणि निघतात सर्वपित्रीला

जायला परत आपल्या स्थानी—-

 

पितरं नेहमी आपल्याला आशिर्वादच देतात—

तरीही लोकं पितृपक्षात शुभ कार्य करायला कचरतात—

 

खरोखरच ही एक विचार करण्याची गोष्ट आहे—

पितरांचा आशिर्वाद मिळणं नक्कीच शुभ कार्य आहे—

…अशोक

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 30 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 30 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४४.

छाया प्रकाशाचा लपंडाव जिथं चालला आहे,

वसंतामागोमाग वर्षाऋतूंच आगमन जिथं होतंय

त्या ठिकाणी बसावं,

तो लपंडाव, ते आगमन पहावं,

यात मला आनंद आहे.

 

 अज्ञात आकाशातून

 शुभवार्ता आणणाऱ्या दूतांनो. . . !

 रस्त्यावरून वेगानं जाण्यापूर्वी मला दर्शन द्या.

 

माझं ऱ्हदय भरून आलंय..

वाहणाऱ्या वाऱ्याचा श्वास किती मधुर आहे!

 

पहाट प्रहरापासून संध्यासमयापर्यंत

मी माझ्या दाराशी वाट पहात बसलो आहे,

तुझ्या दर्शनाचा सुखद क्षण

अचानक येणार आहे, हे मला ठाऊक आहे.

 

तोपर्यंत मी एकटाच स्वतः साठी हसत, गात राहणार आहे.

तुझ्या आश्वासनाचा मधुर गंध

आसमंतात दरवळून राहणार आहे.

 

४५.

तो येईल, तो येईल, तो येईलच. . . . .

त्याच्या पावलांचा नि:शब्द आवाज

तुला ऐकू येत नाही?

 

क्षणाक्षणाला आणि प्रत्येक युगात,

दिवसा – रात्री तो येतच असतो.

 

मनाच्या कोपऱ्यात एका भावावस्थेत

मी किती गीतं गायली

प्रत्येक गीतामधून एकच स्वर उमटतो –

‘ तो येत आहे, तो येत आहे, तो येतच आहे. . . ‘

 

सूर्यप्रकाशाच्या स्वच्छ एप्रिल महिन्यातल्या

सुगंधीत दिवसांत,रानावनातून,

‘तो येतो,तो येतो, तो येतच असतो. . . . ‘

 

जूलै महिन्याच्या पावसाळ्या रात्रीच्या

उदासीनतेत गडगडणाऱ्या मेघांच्या रथातून

‘तो येतो, तो येतो, तो येतच असतो. . . . ‘

 

एकामागून एक येणाऱ्या

त्याच्या पावलांचा ठसा

माझ्या ऱ्हदयावर उमटत राहतो

आणि त्याच्या सुवर्णमय पदस्पर्शाने

माझा आनंद पुलकित होत राहतो.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares