मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रारब्धाचा हिशेब ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रारब्धाचा हिशेब ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

एक दिवस एक माणूस पूर्वसूचना न देता कामावर गेला नाही.

मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल ….

म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराव्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ….

तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले ….

काही महिन्यानंतर परत तसंच घडलं—तो पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला …

मालकाला त्याचा खूप राग आला , आणि त्याने विचार केला की ,

याचा पगार वाढवून काय फायदा झाला ??? हा काही सुधारणार नाही …..

पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला ….

त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला …

मालकाला खूप आश्चर्य वाटलं.

अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , ” मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास, तरी तुझा पगार वाढवला—तेव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेससुद्धा तू पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलास,  म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला. तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ??? ” 

त्यावर त्याने दिलेलं उत्तर मनाला भिडणारं होतं—-

तो म्हणाला ,“ मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहिलो त्यावेळी मला मुलगा झाला होता …

तुम्ही माझा पगार वाढवलात, तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला …. दुस-यांदा जेव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते. 

आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात —- मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली . मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू, ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे … ?

तात्पर्य –

जीवनात काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणी विचारलं तर,

बेशक सांगा,

जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.

?.

”खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ….”

“जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही … ?

यालाच प्रारब्ध म्हणतात…

जीवन खूप सुदंर आहे, कष्ट करा अन आनंदाने जगा …. ?

 

प्रस्तुति –  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारीची मस्त गोष्ट…  विठ्ठलराव गाडगीळ  ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ म्हातारीची मस्त गोष्ट…  विठ्ठलराव गाडगीळ  ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

 

दिवंगत नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी एक गोष्ट सांगितली होती. 

ती गोष्ट अशी..——-

“एक म्हातारी होती. 

ती झोपडीत राहत असे. 

ती अत्यंत गरीब होती. 

तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. 

त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतू तिथे शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. 

ती आणखी गरीब झाली. 

एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे,  मला काहीतरी खायला दे. 

म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. 

साधूने अर्धी भाकरी खाल्ली,  पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. 

तो तिला म्हणाला. 

“म्हातारे तू गरीब असशील,  

परंतू तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस- 

मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग. 

म्हातारी म्हणाली,  

“मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले की त्यांनी झाडाला हात लावल्याबरोबर ते झाडाला चिटकून लटकत जातील आणि मी आज्ञा केल्याशिवाय सुटणार नाहीत” 

साधू म्हणाला ‘तथास्तू’

दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. 

सर्व ओरडत होते,  “म्हातारे सोडव!,  म्हातारे सोडव!” पुन्हा हात लावणार नाही असे त्यांनी कबूल केल्यावर तिने त्यांना सोडून दिले.

“आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. 

तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. 

ती यमराजाला म्हणाली,  

मला आणखी काही वर्षे जगू द्या. यमराज म्हणाले,  

“नाही,  ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. 

परंतू तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.

“म्हातारी म्हणाली,  

“माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” 

आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिटकले आणि ओरडू लागले,  

“म्हातारे सोडव,  म्हातारे सोडव” 

म्हातारी म्हणाली,  

“एका अटीवर सोडवीन. 

मी इच्छा करेल त्याच वेळी मरेन. 

मला इच्छामरणी करशील तर सोडवेन.” 

यमराज म्हणाले. “तथास्तु!” 

त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधी मरणार नाही. 

तिचे नाव आहे “भारतीय लोकशाही!!”

( संसदमार्ग-लोकशाहीचा राजमार्ग- ले. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पुस्तकातून साभार. ) 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार मिळणे म्हणजे लक्झरी नाही. 

—— लक्झरी म्हणजे निरोगी असणे.

लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे नाही आणि प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नाही.

—— लक्झरी म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगणात उगवलेले ताजे सेंद्रिय अन्न खाणे.

लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे नाही.

——- लक्झरी म्हणजे अडचणीशिवाय 3-4 मजले चढण्याची क्षमता.

 लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता नाही.

——- लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची क्षमता.

लक्झरीमध्ये होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.

——– लक्झरी हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेणे आहे.

 60 च्या दशकात एक कार एक लक्झरी होती.

 70 च्या दशकात टेलिव्हिजन ही लक्झरी होती.

 80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.

 90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती …

 मग आता लक्झरी म्हणजे नेमके काय ?

—— निरोगी असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवनात असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांसोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहणे, — या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. 

—- आणि हीच खरी” लक्झरी” आहे.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 18 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 18 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८९]

‘आम्ही कोण?

आम्ही का?

आम्ही कुठून?’

म्हणत

मला खिजवणारे

हे माझे उदास विचार…

 

[९०]

कातर विचारांनो,

भिऊ नका ना मला

कवी आहे मी.

 

[९१]

राखेच्या लाटांनी

आणि

धुराच्या लोटांनी

पुन्हा पुन्हा बजावलं

धरतीला –

‘आम्ही सख्खे भाऊ

अग्नीनारायणाचे …’

 

[९२]

गजबजून गेलेला

माझा ओसंडता दिवस

त्याच्या ग्ल्ब्ल्यातून

तूच  आणलंस मला 

इथपर्यंत

जिथं माझी

विषण्ण संध्याकाळ

मिनवत राहते

एकटेपणाचं काहूर

पोरक्या प्राणांमधून….

काय अर्थ असतो

या सगळ्याचा?

पाहीन मी वाट

उत्तरासाठी

सोबतीला घेऊन

माझी दीर्घ रात्र

गूढ… शांत… निश्चल…

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर

? वाचताना वेचलेले ?

 ☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆ 

#प्रिय_आईस,

वर्ष झाले ना …. मी घरापासून लांब राहतोय …

खरं सांगायचं तर मला सुरुवातीला सगळं समजून घ्यायला म्हणजे कॉलेज, हॉस्टेल ,नवीन शहर ,नवे सोबती…. वेळ लागला…. त्यामुळे घरची आठवण येत नव्हती असं काही नाही. पण बाकीच्या उठाठेवीच खूप होत्या. 

खरंच खूप चांगले आहे इथे.. अभ्यास आहे… वातावरण छान आहे मित्रांच्या पण अजून जवळून ओळखी होतात. 

तू मला नक्कीच खूप मिस करत असशील ना…. आणि बाबा पण…. 

तू कशी आहेस?  मलाच हसू येतंय…. की मी हा प्रश्न विचारतोय !  तुझ्यावर हसणारा.. काहीवेळा ओरडणारा … चिडणारा… 

पण आज खरंच मनापासून वाटलं म्हणून विचारलं गं…. बरी आहेस ना तू…. 

परवा काय झालं अगं….  रूमवरच्या मित्राला जरा बरं वाटतं नव्हतं… म्हणून त्याला इंडक्शनवर मस्त गरम पाण्यात आलं उकळून लिंबू मीठ घालून गरमच प्यायला सांगितले….त्याच्यापुरती थोडी तुपावर डाळतांदुळाची खिचडी केली… त्याला खूप बरं वाटलं…. तरतरीत झाला तो.. 

सगळ्या नव्या मित्रांच्यामध्ये मी एकदम हिट झालो….. तेव्हा माझी कॉलर टाईट…. तेव्हा तू हवी होतीस….मला घरी तू सगळं करायला शिकवायचीस…. कधी कंटाळा करत तर कधी उत्साहात मी पण शिकलो.  पण त्याचा असा कोणाला कधी उपयोग होईल वाटलंच नव्हतं… केलेलं कधी वाया जात नाही, तू म्हणतेस ना…. पटलंच एकदम… 

कामावी तो सामावी असं तू म्हणतेस ना…. सगळ्या मित्रांना मदत पण करतो …… 

घरी किती ओरडायची गं मला …. पण त्याचा उपयोग इथे होतो…. कसा माहीतेय…… माझं लवकर आवरून होतं…. कपाट नीट असतं….  अगदी वापरलेले सॉक्सपण रात्रीच भिजवून सकाळी आंघोळ करताना धुवून टाकतो…..  बाकीचे मित्र म्हणतात … अरे आम्हाला पण आठवण करत जा ना….. तेव्हा तू आठवतेस…… 

मी चिडायचो तुझ्यावर सारखी भुणभुण करते म्हणून.  पण तू म्हणायचीस….. बाहेरच्यांनी कोणी तुला  बोललेलं  मला चालणार नाही…… अगदी त्या श्यामची आई पुस्तकातल्या प्रमाणे….  

फोनवर इतकं बोलता आलं नसतं गं… ..म्हणून आज हे पत्र….. 

आज पासून घरून आणलेले पांघरुण मी वापरणार आहे…. इतके दिवस बाकीचे हसतील , मला कमकुवत समजतील म्हणून वापरत नव्हतो…. पण आता नाही… परिक्षा संपली की येईनच…. तू आतापासून तयारीला लागू नको काय….. मी परत फोन करेन….

अभ्यास करतोच आहे….. 

आता घरी आल्यावर इथल्यासारखं वागायचा प्रयत्न करीन….. पण मग तुझा ओरडायचा कोटा पूर्ण कसा होणार….. ?  

ओरडण्याचा आवाजच तर मला परत येताना साठवून ठेवायचा आहे …. कानात, मनात, ह्रदयात….. 

बाबांना सांग….. 

दोघे भांडू नका…..

मी आल्यावर काय करशील खायला?……

त्याची लिस्ट व्हाट्सअप करतो?

ए आई, आणि व्हिडिओ कॉल लावू नको गं….. 

चल बाय– खूपच सेंटी होतोय मी…… 

काळजी करु नकोस….. 

 

फक्त तुझाच

(अजून तरी??)

ले.: नेहा बोरकर देशपांडे 

(नव्याने बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा. आईला तर  वाटणारचं…. पण आज मुलाची बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे. ) 

…. कशी वाटली जरूर सांगा….

संग्राहक : संजय जोगळेकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तक्रार पेटी – कवी प्रा.विजय पोहनेरकर☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ तक्रार पेटी – कवी प्रा.विजय पोहनेरकर☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆ 

 

हजारो मिळोत का लाखो, किंवा मिळोत कोटी

काही काही माणसं म्हणजे निव्वळ तक्रार पेटी—-

 

हेच वाईट तेच वाईट, घोकत बसतात पाढे

समजतात मी सोडून सारे जगच वेडे—-

 

काही धरायचं काही सोडायचं कळत कसं नाही

किरकीऱ्या माणसाला सुख मिळतच नाही—-

 

नेहमीच तक्रारी केल्या की लोकं तुम्हाला टाळतात

नको रे बाबा म्हणून लांब लांब पळतात—-

 

याला त्याला नावं ठेऊन काही मिळत नाही

नकारात्मकता वाढत जाते कसं कळत नाही—–

 

Negativity वाढली की हाती काय येतं ?

शारीरिक व्याधी वाढून मन कलुषित होतं—-

 

मन कलुषित झालं की, सगळेच नकोसे वाटतात

त्यामुळेच जवळची नाती उसवतात आणि फाटतात—–

 

वेळीच सावध होऊन Adjust करायला शिका

पुन्हा पुन्हा त्याच त्याच करू नका चुका —–

 

माकड म्हणतं माझीच लाल, हा Concept सोडून द्या 

चांगल्याला चांगलं म्हणा, जीवनाचा आनंद घ्या —–

 

लोकं कशी जगतात जरा उघडून बघा डोळे

सोन्याचा घास असून करू नका वाट्टोळे—–

 

कुठल्याही परिस्थितीत मन प्रसन्न ठेवायचे

तक्रार पेटी होण्या पासून स्वतःला वाचवायचे—-

 

चेहरा पाडून बसू नका, उत्सव होऊ द्या जगण्याचा

इतरांना आनंद वाटू द्या तुमच्याकडे बघण्याचा —–

—– कवी प्रा.विजय पोहनेरकर

       9420929389

 

संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हणून मी नेहमी आनंदात असतो ☆ प्रस्तुती – श्री रवी साठे

? वाचताना वेचलेले ?

☆ म्हणून मी नेहमी आनंदात असतो ☆ प्रस्तुती – श्री रवी साठे ☆ 

मी भूतकाळ चघळत नाही

मी भविष्याची चिंता करत नाही नियोजन करतो

मी वर्तमानात जगतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो ☺️

 

मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही,

मी कुणाबद्दल राग मनात धरत नाही,

मी लगेच सगळ्यांना माफ करतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही,

आपुलकीची आणि मैत्रीची किंमत नसणाऱ्यासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही,

साधं राहून आपल्या माणसांत सुखानं रमतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही,

कोणी काहीही बोलल तरी पुन्हा मी ते स्मरत नाही,

माझे जीवन स्वछंदी आहे, ते मी मजेत जगतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

मला ना पदाचा ना ज्ञानाचा अहंकार, 

तुच्छतेचा विचार कधी मनाला  नाही भावला,

पाय जमिनीवर ठेवून,  प्रसंगी अनवाणी चालतो, 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

जगायला काहीच भौतिक सुख लागत नाही,

म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही,

सगळ्यांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, ही जाणीव आहे, 

माझ्यातही दोष आहेत आणि काहीतरी नक्कीच उणीव आहे,

माझे दोष मी रोजच पाहून सुधारण्याचा प्रयत्न करतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

                      

 आपले आनंदी रहाणे हाच आपल्या निरोगी जीवनाचा  मूलमंत्र आहे” ?

प्रस्तुती – श्री रवी साठे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या नक्षत्रांचे लक्ष दिवें…

निळ्या नभावर रांगोळीसम उडती चंचल पक्षि-थवें…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

वेलींवरती फुलें उमलती रोज लेउनी रंग नवे…

वृक्ष बहरती, फळें लगडती गंध घेउनी नवे नवे…

हरिततृणांच्या गालीच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

डोळयांमधली जाग देतसे नव-दिवसाचे भान नवे..

अमृतभरल्या जीवनातले मनी उगवती भाव नवे…

प्रसन्न होउन निद्रादेवी स्वप्न रंगवी नवे नवे …

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

कोण आप्त तर कोणी परका उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे, नाम तयाचे नित ध्यावे…

नको अपेक्षा, नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

जय गजानन, गण गण गणात बोते,

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 17 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 17 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८५]

जळणार्‍या ओंडक्याची

धडधडती ज्वाळा बनली.

’हा माझा फुलण्याचा क्षण

आणि हाच मृत्यूचाही…’

 

[८६]

तुझा साधेपणा पोरी

किती आरस्पानी

निळ्याशार तळ्यासारखा

तुझ्या सच्चेपणाचा तळ

स्वच्छ दाखवणारा.

 

[८७]

तुझ्या दिवसाची गाणी

गात गातच तर इथवर आलो.

आता या कातर सांजवेळी

वादळ घोंगावणार्‍या

या भयद रस्त्यावर

वाहू देशील का मला

तुझाच दीप

 

[८८]

दुनियेचं काळीज

पुरं वेढलस तू

दाईते,

आपल्या आसवानं

जसं

समुद्रानं पृथ्वीला

कवळून असावं

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये.

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.

बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली  की  उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना  स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले की उत्तर मना-जोगते येते.

आणि हो,  मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचा हातचा एक समजू नये, त्यांना कंसात घ्यावे ! कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही.

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print