मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

कबाल– कबीराचा मुलगा.  एकदा काशीतून फिरत असता त्याला एका घराचे दार उघडे दिसले. त्याने आत डोकावून पाहिले तर तिथे एक बाई दळण दळत  होती. 

कबाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता. दाणे जातात कुठे ???

त्याला रडू आले. त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले. 

त्याने विचार  केला, ‘ आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत.’

कबाल घरी आला, वडलांजवळ जाऊन रडू लागला— 

कबीर महाराज विचारताहेत—-” कबाल अरे काय झाले  रे ? “

कबाल सर्व पाहिलेलं सांगतो, आणि म्हणतो—” जात्यामध्ये सर्व दाणे  मेले . “

कबीर कबालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले.  जात्याची वरची पाळी बाजूला करुन  दाखविली. 

खुंट्याजवळ २ , ४ दाणे तसेच चिकटलेले होते—–

ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते. कबालच्या भाषेत ‘ ते वाचले..’.

 —-आपल्याही संसाराच्या जात्याला एक खुंटा आहे.–

       तो म्हणजे “ सदगुरु.” —-

       त्यांना धरुन ठेवावे — 

        त्यांचा आधार घ्यावा — 

        जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते —

 —- विनाशाची भिती टाळायची असेल तर अविनाशी खूंटा सदगुरु—

     त्यांचा आधार घ्यावा—-

     तो घट्ट धरुन ठेवावा — 

—-जीवाला निर्भय करणारी एकच विभूति —-

     “ती म्हणजे सदगुरु होय .”

 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

( ——असे होणार का कधी भारतात..??? ) 

नुकताच मकरंद अनासपुरेने आय.बी.एन.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला.

तो काही वर्षांपूर्वी सिडनीला गेला होता, तेव्हाची गोष्ट.—

(खरं तर छोटी पण डोंगराएवढी)—-

एअरपोर्टवर ठरल्याप्रमाणे त्याला घ्यायला जोशी आडनावाचा त्याचा एक मित्र गाडी घेऊन आला होता. तो मित्र मूळचा ठाण्यातला. पण गेल्या २५  वर्षांपासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेला.

रस्त्याने गाडीतून जात असताना मकरंद म्हणाला,

“अरे कसले सुंदर रस्ते आहेत यार इथले. एक खड्डा लागला नाही आतापर्यंत.

नाही झेपणार रे असला प्रवास मला, थोडी तरी आदळआपट झाली पाहीजे राव.”

यावर त्याचा मित्र हसला म्हणाला,

“तुला माहीत आहे हे रस्ते कोणी बनवले?”

मकरंदने विचारलं,

“कोणी?”

“या तुझ्या ड्रायव्हर ने!”

“काय???” मकरंदला खूप आश्चर्य वाटलं.

” तू  बनवलेस हे रस्ते ?—-अरे मग भारतात राहून का नाही बनवलेस असे रस्ते?”

यावर मित्र हसला, आणि फक्त एवढंच म्हणाला पुढे—–

“अरे भारतात रस्ते ‘इंजिनिअर’ नाही तर ‘राजकारणी’ बनवतात.” राजकारण्यांच्या तावडीतून विकासाला मुक्त करा.” 

विजय जोशी हे ठाण्याचे असून त्यांना order of Australia हा भारतरत्नच्या तोडीचा पुरस्कार तेथील सरकारने दिला आहे… कडू आहे पण सत्य आहे. 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कावळ्याची जणू कावळी ! ☆ संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

⭐ कावळ्याची जणू कावळी ! ⭐ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित  ⭐

कावळ्याची जणू कावळी !

कावळी : चला पुढचे पंधरा दिवस स्वयंपाकाला सुट्टी.

कावळा: हो जसा काही रोजच पुरणपोळीचा घाट घालतेस.

कावळी: देह सुटला पण तुमच्या वासना काही सुटल्या नाहीत. मनुष्य देहात असताना सगळं खाऊ घातलंय तुम्हाला, तरी तुमचं रडगाणं सुरूच

कावळा: मग कशाला आलीस माझ्या पाठोपाठ ?

कावळी: एवढ्या वटपौर्णिमा केल्या, तेव्हा बोलला असतात, तर आता तरी आपले मार्ग  वेगळे झाले असते. आता भोगा आणखी सात जन्म.

कावळा: असो,आता उगाच वाद घालू नको.लोक काय म्हणतील ? 

कावळी: आता कोणाला कळणारे आपली भाषा ?

कावळा: तेही खरंय म्हणा. मग कुठे जेवायला जायचं म्हणतेस ?

कावळी: अहो बऱ्याच जणांनी बोलावलंय. मलाच कळत नाहीये कोणाचं आमंत्रण स्वीकारावं. मी नुसतंच तोंडदेखल्या काव काव करून आलीये.

कावळा: पण आता पोटात काव- काव सुरू झालीये. वेळेत निघायला हवं, नाहीतर दुसरी  जोडपी येऊन कट्ट्यावर बसतील.

कावळी: म्हणून अनोळखी लोकांकडे जायचंच नाही. जे आपली मनापासून आठवण काढतात  ना तिथेच जाऊया.

कावळा: म्हणजे कुठे ?

कावळी: आपल्या मुलांकडे.

कावळा: अजिबात नाही. जिवंत असताना त्यांनी किती आठवण काढली ते पाहिलंय मी.  प्रॉपर्टीची विभागणी काय केली, दोघांनी माझा आप्पासाहेब बेलवलकर करून टाकला.

कावळी: मुलगीही तशीच नलूसारखी आणि तुम्ही ?

कावळा: हो शेवटी मीच तुमचा सरकार— काव काव.

कावळी: हसू नका. आवरा आता. तुमच्या मित्राकडे जाऊ. त्याने पारावर आपलं ताट नक्कीच आठवणीने वाढून ठेवलं असेल.

कावळा: नको मेल्याने पेल्यात बुडवून माझं आयुष्य कमी केलं, नाहीतर आणखी काही वर्ष जगलो असतो मी. त्याचं काही खरं नाही, ताटाभोवती पाणी फिरवायचं सोडून मद्याचे थेंब  टाकले असतील मला आकर्षून घ्यायला. पुन्हा अडकायच नाहीये मला व्यसनात. असले मित्र नकोच.

कावळी: मग माझ्या जिवलग मैत्रिणीकडे जाऊ.

कावळा: तिथेही नको तुमच्या गप्पा सुरू झाल्या तर मी उपाशी राहीन.

कावळी: अहो गप्पा मारायला आता आपण काही मनुष्य नाही, विसरलात का ?

कावळा: लक्षात आहे.  पण तुम्ही बायका भिंतीशी सुद्धा बोलू शकता. तू तरी कावळी आहेस.

कावळी: खबरदार मला कावळी म्हणाल तर. किमान या पंधरा दिवसात तरी मला खूपच मानाने  वागवतात लोक.

कावळा: ठीक आहे बाई– नाही म्हणत कावळी. तू तर डोमकावळी.( तू तर चाफेकळी चालीवर)

कावळी: पुरे आता. कुठे जायचं ते ठरवा पटकन. कधीची छान तयार होऊन बसलेय.

कावळा: मी काय म्हणतो, आपण घरीच जेऊया का ? आता आपुलकीने बोलावणारी माणसं राहिली नाहीत. राहिलाय तो फक्त सोपस्कार. लोक आपल्या नावाने स्वयंपाक करणार, छोट्याशा ताटात नैवेद्य दाखवणार. आपण खातोय की नाही हे सुद्धा नाही पाहणार. आणि स्वतः मात्र खीर-वड्याच्या जेवणावर आडवा हात मारणार. ज्यांनी जिवंतपणी आपल्याला नीट नाही वागवलं त्यांच्याकडून मेल्यानंतर चांगल्या वागणुकीची काय अपेक्षा करणार ?– त्यापेक्षा तू खिचडी टाक.

कावळी: झाsss लं. सगळंच बारगळलं. तेव्हाही हॉटेलला नेतो म्हणायचात आणि शेवटी असंच   काहीतरी सांगून घरी खिचडी करायला लावायचात—पण तुमचं म्हणणं पटतय.  –शेवटी कोणी नाही आपलं. आपणच जगतो एकमेकांसाठी, म्हणूनच तर भगवंताने बांधल्या आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी.

कावळा: सरकार माझं ते आवडतं गाणं म्हणा नं, फक्त थोडं एडिट करून—

कावळी: आता पूर्वीसारखा कोकीळकंठी आवाज लागणार नाही बरं.

कावळा: हरकत नाही दोघांचा रंग तर सारखाच ना. घेईन मी ऍडजस्ट करून.थोडं खर्जात गाशील.

कावळी: सांज ये गोकुळी, कावळी कावळी. कावळ्याची जणू कावळी ——-

जिवंतपणी नातीगोती जपा. 

संग्राहक : – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नि:शब्द — ☆ संग्राहिका – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

⭐ नि:शब्द —  ⭐  संग्राहिका –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

नि:शब्द— 

काल एक धक्का बसला. अजून सावरलो नाही.

एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष  आठ) एका कोपर्‍यात बसून इतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.

कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता.

मी त्याला विचारले…

” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?”

त्याने खेळावरील नजर न हटवता मला उत्तर दिले .

” आय नको म्हनत्या ….”

” आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील ! “

त्याने उत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.

मलाच त्याला चिडवण्याची खुमखुमी गप्प बसू देईना….

” मला माहिती आहे, आई तुला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !! “

माझा टोमणा त्याला बरोबर  बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्‍यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले…

” आई म्हनत्या…खेळू नको….खेळून भुक लागल….मग खायला मागशील “

त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा उठून तो कुठेतरी निघून गेला.

मी अजूनही बेचैन आहे. आणि गेल्या वर्षभरात भूक लागावी, अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो.

 

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३१ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३१– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

माझं सर्वस्व

अगदी मनापासून

उधळून दिलं मी खुशीनं

असेल ते फक्त

ओंजळभरून पाण्याएवढं

पण

एका तरी तृषार्ताची

जळती तहान

थंड केली त्यानं

 

[2]

माझ्या मद्याचा घोट

माझ्याच प्याल्यातून

घे मित्रा

दुसर्‍या प्याल्यात ओतल्यावर

विस्कटून… विरून जाते

फेसाची माळ

 

[3]

वास्तवाचा  पोशाख

फारच घट्ट होतो

सत्याला…

कल्पनेच्या पायघोळ झग्यात

कसं स्वैर फिरता येतं त्याला.

 

[4]

किती इवली इवली

तुझी पावले

चिमुकल्या गवता

पण

त्यांच्या खाली

अफाट पसरलेल्या

आक्षितिज भूमीवर

तुझाच तर असतो

मालकी  हक्क ….

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

सकाळपासून घरामध्ये  एखाद्या सणासारखं वातावरण होतं. सासूबाईंच्या चेहर्‍यावरील उत्साह आणि स्वयंपाकघरातून येणारा खाद्यपदार्थांचा घमघमाट या दोन्ही गोष्टींचं कारण एकच होतं – आज घरी दुपारच्या जेवणासाठी त्यांची एक मैत्रीण येणार होती. म्हणून घर पूर्णपणे सुशोभित केलं होतं.

काल संध्याकाळीच त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की उद्या त्यांची एक मैत्रीण जेवायला घरी येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी, आम्ही बाजारात गेलो आणि सासू- -बाईंनी एक छानशी, किंमती साडी आपल्या मैत्रिणीसाठी विकत घेतली.

आज तर त्या जणू काही वेगळ्याच पातळीवर होत्या. उत्साहाच्या भरात, त्या सकाळी माझ्या अगोदरच उठल्या होत्या. माझ्याआधीच स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी स्वतःच तयार केलेल्या यादीमधील एक एक पदार्थ, मनापासून व मोठ्या प्रेमाने बनवायला सुरुवातही केली होती.

त्या आज खूपच आनंदी दिसत होत्या.  पण मी… मी मात्र खोट्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याने आणि जड अंत:करणाने त्यांना मदत करत होते.

आज माझ्या आईचा वाढदिवस होता. माझ्या लग्नानंतरचा आईचा हा पहिलाच वाढदिवस होता. आणि ती एकटीच असणार होती. मी इथं सासरी, बाबा ऑफीसच्या कामासाठी बाहेरगावी आणि भाऊ तर आधीच परदेशात गेलेला होता.

काल मी माझे मन घट्ट करून माहेरी जाण्याचे ठरवले होते. मी याबाबत माझ्या सासूबाईंशी काही बोलणार, तेवढ्यात त्यांनीच त्यांच्या येणाऱ्या मैत्रिणीबद्दल व उद्याच्या ठरवलेल्या बेताबद्दल सांगितले. दुपारचे भोजन आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या मैत्रिणीबरोबर, फन सिटीला जाण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता.

ह्यावर मी आता काय बोलणार होते? मी गप्पच राहिले आणि कामाला लागले. सर्व घर व्यवस्थितपणे आवरले आणि स्वतःही जरा नाराजीनेच तयार झाले. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सासूबाईंनी मलाच पाठवलं.

दरवाजा उघडल्यावर भल्या मोठ्या पुष्पगुच्छाच्या मागे लपलेला चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि मी ‘आ ‘ वासून बघतच राहिले ! कारण समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे, माझी आई  होती. आई मला पुष्पगुच्छ  देत म्हणाली, ” सरप्राईज! “

आश्चर्याने आणि आनंदाने, मी तिथे उभी राहून आपल्या आईकडे एकटक बघत होते. 

” वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही का देणार माझ्या मैत्रिणीला? ” मागे उभ्या असलेल्या सासूबाईंनी विचारले.

“माझी आई… तुमची मैत्रीण?” मी मोठ्या आश्चर्याने विचारले.

“अग, हो ! मी खोटं नाही बोलत ! कोण म्हणतं की विहीणी-विहीणी मैत्रिणी होऊ शकत नाहीत? ” सासूबाई म्हणाल्या.

“ नक्कीच होऊ शकतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सासू आपल्या सुनेचे, मुलीसारखे लाड करू शकते आणि तीच विहिणीला पण मैत्रीण बनवू शकते.” असे म्हणून माझ्या आईने पुढे होऊन सासू- बाईंना मिठीच मारली.

आनंदाने माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले होते. मी सासूबाईंचे हात हातात घेऊन डोळ्यांना लावले आणि त्यांच्या हाताच्या तळव्यांचे मुके घेतले व त्यांना मिठी मारली. आम्हा दोघींना बघून, माझ्या आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या व तिने स्मित हास्य केले.

नात्यांचा हा उत्सव, अत्यंत प्रेमाने साजरा करत असताना, एका बाजूला माझी आई होती, जिने मला नात्यांचं महत्त्व शिकवलं, तर दुसरीकडे माझ्या सासूबाईं- ज्यांनी नातं हृदयापासून कसं जपायचं हे शिकवलं.

दोघीजणी माझ्याकडे बघून हसत होत्या आणि त्या दोघींच्यामधे उभी राहून, मी माझ्या नशिबावर खूष होत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर मात्र हसू फुलले होते.

स्वतःला महत्त्व कसे मिळेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांना “मान” कसा देता येईल याविषयी आपण विचार केला पाहिजे, हे मनापासून पटलं मला. 

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटची सुट्टी ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

 

? वाचताना वेचलेले ?

☆ शेवटची सुट्टी…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

असाच एक English picture बघितलेला…

‘Last Holiday’—‘ आयुष्याची शेवटची सुट्टी ‘— जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं… 

त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरुणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. 

मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजूनपर्यंत जी ‘सुट्टी घेणं’ परवडत  नव्हतं,  त्या ‘ मोठ्ठ्या सुट्टी ‘ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. 

ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये… आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत,  उच्चभ्रू वर्तुळात वावरते. 

तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो…पण ती देवाला विचारते….

” why now…? आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास? “

पण आता तिला कशाचंच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता ‘ आणखी काही ‘ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा ‘ दांभिक सभ्यतेचा ‘ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते… वागतेे… बोलते.

आणि तिला जाणवतं—– 

“ आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही.  केवळ ‘ भविष्य ‘ आणि ‘ लोकं काय म्हणतील ‘….याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं.”

” I have wasted too much of time on assumptions…..now I have time only for reality! ” 

—–ती राहिलेलं दोन आठवड्यांचं  आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरुवात करते. तिच्या departmental store owner लाही खरी खोटी सुनावते… त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.

—–आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत… तिला कसलाही आजार नाही… ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच  विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात—–

फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता. 

आपणही… आजचा – आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही… मनात कायम उद्याची चिंता ! काही तरी अशाश्वत मिळवण्यासाठी… कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो—इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. 

सगळा आनंद, सगळी मजा, एखाद्या ‘ सुट्टीत ‘ उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो….आणि —-आणि हे सगळं व्यर्थ आहे… जे खरच हवं होतं… तो आनंद, ते  समाधान… हे या कशात नव्हतंच… हेे कळायच्या आतच…   ‘ शेवटची सुट्टी लागते ‘. 

शिलकीतली ‘ पुंजी ‘ तशीच राहून जाते… न वापरलेली… कोरीच्या कोरी… पण आता निरूपयोगी  ! 

या ‘ शेवटच्या सुट्टी ‘ पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर?—-

—तर प्रत्येक क्षण त्या ‘सुट्टी’ इतकाच आनंद देईल. 

संग्राहक :  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलका कठीण नसतोच मुळी !! ☆ संग्रहिका – सुश्री प्रतिभा तळेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फुलका कठीण नसतोच मुळी !! ☆ संग्राहिका – सुश्री प्रतिभा तळेकर ☆

त्या दिवशी रात्री मी स्वैपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. 

मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला, आणि एकदा परतून भाजून घेतला. 

तोवर दुसरा लाटून तयार होताच. एका हातात पकड घेऊन तवा उचलला, आणि फुलका चिमट्याने त्यावर धरला, लगेच तो फुगून आला. 

मुलगा आश्चर्याने म्हणाला  “झाला पण फुलका? इतका सोप्पा ??”

मी म्हणाले,  “हो, कठीण नसतोच मुळी फुलका.” 

खरं तर सगळा स्वैपाकच मुळी सोप्पा असतो . कठीण असतं ते—-

तो रोज रोज करणे, ^दिवसातून^ अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे, आपल्या मूडचा, मनःस्थितीचा ,आजारपणाचा, दुखण्याचा कशाकशाचा विचार न करता अचूक आपली भूमिका निभावत, भयंकर उकाड्यात देखील शेगडीजवळ न कंटाळता लढत देणे .

सगळे संपले असे वाटत असतानाच,  ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून चार पोळ्या जास्त कराव्या लागणे. स्वैपाकघर आवरून ठेवल्यावर ‘ संपली एकदाची दगदग आतापुरती ‘ असे वाटत असतानाच… बैठकीतून ”आज जेवूनच जा “चा पुरुष मंडळींनी पाहुण्यांना केलेला आग्रह हसून साजरा करणे आणि तडक बिनपगारी overtime करणे आणि हे करीत असताना प्रत्येकाची भाजी, तिखट, चटणीची ^वेगळी आवड^,  आणि ^तर्‍हा^ समजून घेऊन, त्यानुसार जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे. 

बरे एवढे करून भागेल तर कसले स्वैपाकघर?  म्हणून सगळा जीव निघून गेल्यावरही ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून पुन्हा लख्ख करून ठेवणे आणि –  इतक्या मेहनतीला साधा कुणी thank you चा उच्चार ही न करता,  साधी पुढली ताट देखील न उचलता निघून जाणे.  

भरीस भर म्हणून ‘ ह्यात कोणते जग जिंकले??  स्त्रिया असतातच स्वैपाक आणि घरकाम करण्यासाठी टाइप ‘ अशी सामाजिक मान्यता असणे.. 

आणि हे सगळे, शिकल्यासवरल्या स्त्रिया आहात म्हणून बँक, शाळा, नोकर्‍या, उद्योग, असे उत्पन्नाचे मार्ग अवलंबत राहून, आणि  मीठ- मसाला, नातेवाईक, सण समारंभ अशा इतर अनेक जास्तीच्या गोष्टी सांभाळून,  फिरून ओट्याशी दोन हात करीत न कुरकुरता उभे राहणे. 

^कामवाल्या बाईला^ निदान पगार तरी देतात, ^घरच्या बाईला^ तर तेवढीही किंमत नसते. 

अरे —-

 * फुलका कठीण नसतोच मुळी—-

——————– कठीण असतो तो स्त्री जन्म .*

(खूप साऱ्या स्त्रियांचे मनोगत …)

संग्राहिका – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३०– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३०– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

इतिहासातून

प्रगट होत नाही माणूस

झगडून वर येत रहातो तो

इतिहातून —

 

[2]

मन लावून ऐकणार्‍या

या पाईन वृक्षांमधून

गुरफटत राहावी

समुद्राची गाज

तसा तुझा आवाज

प्रिय, माझ्यामधून

 

[3]

रात्र म्हणाली सूर्याला,

‘तू पाठवलीस मला

तुझी प्रेमपत्र

चादण्यांच्या अक्षरात

मी माझी उत्तरं

आसवांच्या अक्षरात

गवतावर पसरून

निघून जाते रे….’

 

[4]

पराभूत माणसाच्या

विजयाची

सोशीक प्रतीक्षा करणारा

हा मानवी इतिहास

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१]

माझीच सावली

पसरतो मी माझ्या रस्त्यावर

कारणदिवा आहे माझ्याकडे

पण न पेटवलेला….

 

[२]

चवच सारी

हरवून बसलास

आणि आता

अन्नाला

दोष देतोस?

 

[३]

नम्रतेचा शिखर

गाठता आलं

तरच जवळ जाता येतं

शिखराच्या

 

[४]

समृद्ध अन यशस्वी लोक

फुशारकी मारतात जेव्हा

ईश्वरी कृपेची

तेव्हा

किती शरमून जातो ईश्वर

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print