सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 3 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
५.
तुझ्या चरणकमळाजवळ निवांत बसावे
असे आज मला वाटते
हातात असलेली कामं नंतर करता येतील
किनारा नसलेल्या सागरासारखी असंख्य
निरर्थक कामं मी करीत राहतो
पण तुझ्या दर्शनावाचून माझ्या मनाला
ना विश्रांती ना आराम
गाणी गात वसंत ॠतू माझ्या गवाक्षाशी
रुंजी घालतो आहे.
फुलपाखरं बागडणारी आणि
पुष्पगुच्छांचा सुवास हवेत दरवळत आहे
जीवन समर्पणाचं गीत गात,
शांत मनानं तुझ्या समोर
विसावा घ्यावा असा हा क्षण आहे
६.
कोमेजून आणि धुळीत मिसळून जाण्याअगोदर
हे छोटेसे फूल तू खुडून घे l आता विलंब नको
तुझ्या गळ्यातल्या हारात त्याला स्थान नसेलही,
पण तू ते खुडताना त्याला होणाऱ्या
यातना त्याचे गौरवगीत आहेत.
मला समजण्याअगोदरच समर्पणाचा
हा दिवस कधीच निघून गेला असेल.
फिकट रंगाचे आणि मंद वासाचे हे फूल
तुझ्या चरणसेवेतच यावे.
अजून वेळ आहे, तोवर ते खुडून घे.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈