मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तीन शब्दांची कविता….स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ तीन शब्दांची कविता….स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

इंदिरा संतांची  वाक्यागणिक तीन शब्दांची  कविता…..???

अक्कु बक्कुची दिवाळी – ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा 

अक्कु बक्कुला पाठवा

आली जवळ दिवाळी   

दोघी येतील आजोळी

घरी मोटार आणेन      

घेऊन दोघींना जाईना

दोघी आनंदाने फुलल्या 

आईभोवती नाचल्या

दारी मोटार येणार         

मामा घेवुन जाणार

मामा आम्हांला नेणार  

आम्ही आजोळी जाणार

आई मुळीच बोलेना       

काम हातचं सोडेना

अक्कु सुजाण थांबली   

मिठी आईला घातली

का गं मुळी ना बोलशी   

सांग धाडते तुम्हाशी

घेवुन दोघींना जवळ      

आई बोलली प्रेमळ

तुम्ही दोघीही जाणार     

कशी तयारी होणार

बरे कपडे रोजला          

कोरे चांगले सणाला

खण रेशमी मामीला       

एक खेळणे बाळाला

नाही पगार अजुन         

कसे यावे हे जमुन

दोघी मुळी न रुसल्या     

दोघी निमुट उठल्या

काचा कवड्या खेळत    

दोघी क्षणात रंगल्या

उद्यापासुन दिवाळी        

घरी नाहीत चाहुली

नाही फटाके सामान       

नाही खमंग तळण

दोन पणत्या दारात         

दोन बहिणी घरात

बक्कु जराशी रुसली       

अक्कु निमुट राहिली

दोघी बसल्या दारात         

रस्ता उधळी दिवाळी

आली मामाची मोटार       

आली मामाची मोटार

अक्कु सांगते कानात        

बक्कु ऐकते शहाणी         

दोघी करिती स्वागत          

मामा बसले चहाला          

दोघी गळ्यात पडल्या        

आत्या उद्याला येणार        

आम्ही येथेच राहणार         

आम्ही येथेच राहणार        

नाही येणार येणार

शब्द ऐकोनी दोघींचे          

डोळे स्तिमित आईचे

किती किती ते सामान        

मामा आणती काढुन

खोकी दारुच्या कामाची     

खोकी परकर झग्याची

एक रेशमी पातळ              

दोन डब्यात फराळ

नाही येणार म्हणुनी              

आहे दिलेले मामीने

तुम्ही ताईच्या माळणी         

दोघी गुणाच्या गवळणी

तुमचे गुपीत कळाले           

डोळे मामाचे भरले

आला मामाला गहिवर         

घेता दोघींंना जवळ

मामा जाताच निघुन            

आली दिवाळी धावुन

नव्या झग्याच्या झोकात       

दारु शोभेची बरसात

नव्या झग्याच्या झोकात       

दारु शोभेची बरसात

सरसर कारंजे उडाली           

तारामंडळे फिरली

 

-इंदिरा संत

?????

अप्रतिम कविता, आपल्या पिढीतल्या अनेकांच्या घरातली कथा (की व्यथा), कितीही ओळखीची असली तरीही डोळे पाणावतातच

हो ना?

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ म्हणजे दिवाळी ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

सिग्नलला सोनचाफ्याची फुले विकणाऱ्या त्या मुलीला पैसे देऊन तोच सोनचाफा तिलाच भेट दिल्यावर तिच्या मळलेल्या डोळ्यात उठलेली आनंदाची चमक म्हणजे दिवाळी…

केरसुणीचा फडा घेताना त्या आज्जीशी किंमतीची घासाघीस न करता दोन केरसुण्या घ्यायच्या आणि वर दहा वीस रुपये जास्त दिल्यावर, त्या आज्जीच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्यांमधून झिरपणारे मंद हसू म्हणजे दिवाळी…

दुकानात गेल्यावर जे आवडते ते घेण्यासाठी आपल्याजवळ पैसे आहेत याची ज्या दिवशी पहिल्यांदा जाणीव होते तो क्षण म्हणजे दिवाळी…

दमलेल्या तिला, “दमलीस ना ? बस जरा वेळ… मी तुला मस्तपैकी चहा देतो…” ही दिवाळी…

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घामाघूम होऊन आवराआवरी केल्यावर लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या डब्यातून भरताना तिच्या मनांत ओतप्रोत झिरपत जाणारा तो खमंग आपलेपणा म्हणजे दिवाळी…

ऑफीसला निघालेलो असताना, तिने समोर यावं आणि हातांमधे चार पाच मोगऱ्याची फुलं ठेवावीत… हा मोगऱ्याचा गंध म्हणजे दिवाळी…

आपला मुलगा मोठा, समजूतदार झाल्याचा क्षण म्हणजे दिवाळी….

“बाबा, यंदा तुम्हांला आणि आईला मी नवीन कपडे घेणारेय…” हे ऐकायला येण्याचा क्षण म्हणजे दिवाळी…

“आज्जी, आजोबा, चला आज लाँग ड्राईव्हला घेऊन जातो तुम्हांला…” हे शब्द ऐकणं म्हणजे दिवाळी…

आपल्याला ऑफीसचा बोनस कधी मिळतोय याची वाट न बघता, मावशींना पूर्ण पगार आणि बोनस दिल्यावर, त्या फरशी पुसणाऱ्या मावशींच्या डोळ्यातला आनंद म्हणजे दिवाळी… 

परस्परांतील हेवेदाव्यांची, झाल्यागेल्या मतभेदांची जळमटं दूर करुन, ते सगळं विसरुन एकत्र येणं म्हणजे दिवाळी…

अशी दिवाळी आपणा सर्वांच्याच आयुष्यात आनंदाचे, सुखा – समाधानाचे दीप पाजळत येवो.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

“परमेश्वरही संकटाच्या वेळी कुणाला ना कुणाला आपल्यासाठी प्रसादच म्हणून पाठवत असतो, फक्त तो प्रसाद आपण व्यवस्थित ग्रहण करायला हवा. त्या प्रसादाची किंमत करता यायला हवी.”

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे. 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ येत्या १० वर्षात हे बदल होतील ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ येत्या १० वर्षात हे बदल होतील ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

तज्ञांच्या अंदाजानुसार येत्या १० वर्षात हे बदल होतील —–

पूर्णवेळ कार्यालये पध्दत बंद होईल. त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील. फुड होम डिलिव्हरी वाढेल व रेस्टॉरंटचा धंदा ६०% कमी होईल, ब्युटीपार्लर ही घरपोच सेवा होईल. 

घरपोच ऑनलाईन हेल्थ सेवा देणाऱ्या कंपन्या निघतील व मोठी फी घेणारे डॉक्टर व टोलेजंग हॉस्पिटलचे दिवाळं निघेल. 

शिक्षण ऑनलाईन होईल. भव्य इमारती असणाऱ्या शिक्षण संस्था खंडहर बनतील. त्यामुळे बहुसंख्य शिक्षकांच्या नोकऱ्या जातील किंवा कित्येक महिने पगारच मिळणार नाहीत. 

कोचिंगची पध्दती पूर्ण बदलून ती ऑनलाईन होईल. प्रायव्हेट ट्यूटर व इन्स्ट्रक्टर यांचे काम खूप वाढेल. शॉर्ट व कमी खर्चातील व उपयोगी शिक्षणाला महत्व येईल. 

सर्व राजकीय प्रचार-प्रसार ऑनलाईनच असेल, रस्त्यावर भाषण, सभा, आंदोलने, मोर्चे इत्यादी मागास व खुळे समजले जातील. लोकांना उल्लू बनवायचा धंदा बंद होईल. 

बँकेचे सर्व व्यवहार मोबाईलवर होतील. तुम्हाला केव्हाही बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. मागास, सहकारी बँका पूर्ण बंद होतील. 

चित्रपट हे मल्टिप्लेक्समध्ये पाहणे खूप कमी होईल. नवीन चित्रपटसुध्दा ऑनलाईन रिलीज होतील. टीव्ही पाहणे कमी होऊन सर्वजण मोबाईलवरच पाहतील. त्यामुळे टीव्ही चॅनेल तोट्यात जाऊन बरीच चॅनेल बंद होतील.

जात, धर्म, वंश ह्या संकल्पना १५ वर्षात संपतील, पैसा व गुण ह्या आधारेच विवाह ठरतील. फक्त पैसे कमविणार्‍याचेच विवाह ठरतील.  बाकीचे वरातीत नाचायला व  मिरवणुकीलाच कामी येतील. 

नोकर्‍या हा प्रकार झपाट्याने कमी 0होईल, फक्त प्रोफेशनल असतील. ९०% कंपन्या आपली कामे आऊटसोर्स करतील, ह्या धंद्याला चांगले दिवस येतील. ९०% पेट्रोल, डिझेल गाड्या बंद होतील. इलेक्ट्रीक चार्जिंग गाड्या धावतील- तेही तातडीची गरज असेल तरच.

हे पुढील १५-२० वर्षात नक्कीच घडेल.  या आव्हानासाठी आपण तयार आहात का?

…………..

काळानुरूप स्वतः ला बदला… नाहीतर काळ तुम्हाला बदलवून टाकेल.

 

संग्राहक : सुनीत मुळे 

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 19 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 19 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[९३]

हळूच फुलं फुलवते रात्र

आणि

खुशाल घेऊ देते

श्रेयांचे नजराणे

दिवसाला.

 

[९४]

ओसरून…. सरून गेलेलं यौवन

त्याचीच स्वप्नं

सळसळत रहावीत

तशी ही पावसाची सरसर

गडद अंधारातून

 

[९५]  

माझ्या मनातली

गहन नीरवता

झांजर… झांजर… झाली

आणि

ध्वनींचा संधीप्रकाश

हलकेच हेलावत जावा

तसे गुणगुणत राहिले

रातकिडे   

 

[९६]

जुईच्या थरथर पाकळीशी

पावसाचा थेंब

हलकेच रिमझिमला,

‘रहायचं आहे ग मला

तुझ्याच जवळ

अगदी सदैव…’

सुस्कारली जुई

आणि

गळून पडली भूईवर

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगातला सर्वात श्रीमंत माणूस…!!! ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ जगातला सर्वात श्रीमंत माणूस…!!! ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं,” ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का…? ”

बिल् गेट्स म्हणाले, ” हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.” 

समोरच्या व्यक्तीनं विचारलं,” कोण…!!! “ 

बिल् गेट्स म्हणाले, ” एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला.  तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं.  सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला…! व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं. –समोरच्या त्या पेपर विकणा-या  मुलानं माझ्याकडं बघून तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं…!!!

तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला.  परंतु त्याहीवेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला–

पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला…!

पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत…!!!

यावर त्या मुलानं सांगितलं की “ तुम्ही हा न्यूज पेपर  घ्या.  कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे. ” त्यानंतर मी तो घेतला…!!!

१९ वर्षानंतर, मी जगातला श्रीमंत माणूस झाल्यानंतर,  मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली—मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.  तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!

मी त्याला विचारले, ” तू  मला ओळखतोस का ?” 

तो म्हणाला, ” हो तुम्ही बिल् गेट्स आहात…! “ 

मी म्हटलं, “ तुला आठवतंय का, की कधीकाळी तू मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस…! “ 

तो म्हणाला, ” हो…दोनदा…!”

मी म्हणालो, ” मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग…! मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो…!!! “ 

यावर तो नम्रपणे म्हणाला, ” सर पण तुम्हाला असं वाटत नाही का की  तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही…!”

मी विचारले,” का…??? “ 

तो मुलगा म्हणाला, ” मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातून मदत करत होतो.  तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात…! म्हणून तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही…!!! “ 

बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहून श्रीमंत आहे,  कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली…!!!

श्रीमंती पैश्यांची नसते, तर मनाची असते. कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे…!!!

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रारब्धाचा हिशेब ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रारब्धाचा हिशेब ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

एक दिवस एक माणूस पूर्वसूचना न देता कामावर गेला नाही.

मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल ….

म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराव्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ….

तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले ….

काही महिन्यानंतर परत तसंच घडलं—तो पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला …

मालकाला त्याचा खूप राग आला , आणि त्याने विचार केला की ,

याचा पगार वाढवून काय फायदा झाला ??? हा काही सुधारणार नाही …..

पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला ….

त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला …

मालकाला खूप आश्चर्य वाटलं.

अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , ” मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास, तरी तुझा पगार वाढवला—तेव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेससुद्धा तू पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलास,  म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला. तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ??? ” 

त्यावर त्याने दिलेलं उत्तर मनाला भिडणारं होतं—-

तो म्हणाला ,“ मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहिलो त्यावेळी मला मुलगा झाला होता …

तुम्ही माझा पगार वाढवलात, तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला …. दुस-यांदा जेव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते. 

आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात —- मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली . मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू, ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे … ?

तात्पर्य –

जीवनात काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणी विचारलं तर,

बेशक सांगा,

जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.

?.

”खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ….”

“जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही … ?

यालाच प्रारब्ध म्हणतात…

जीवन खूप सुदंर आहे, कष्ट करा अन आनंदाने जगा …. ?

 

प्रस्तुति –  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारीची मस्त गोष्ट…  विठ्ठलराव गाडगीळ  ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ म्हातारीची मस्त गोष्ट…  विठ्ठलराव गाडगीळ  ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

 

दिवंगत नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी एक गोष्ट सांगितली होती. 

ती गोष्ट अशी..——-

“एक म्हातारी होती. 

ती झोपडीत राहत असे. 

ती अत्यंत गरीब होती. 

तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. 

त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतू तिथे शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. 

ती आणखी गरीब झाली. 

एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे,  मला काहीतरी खायला दे. 

म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. 

साधूने अर्धी भाकरी खाल्ली,  पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. 

तो तिला म्हणाला. 

“म्हातारे तू गरीब असशील,  

परंतू तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस- 

मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग. 

म्हातारी म्हणाली,  

“मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले की त्यांनी झाडाला हात लावल्याबरोबर ते झाडाला चिटकून लटकत जातील आणि मी आज्ञा केल्याशिवाय सुटणार नाहीत” 

साधू म्हणाला ‘तथास्तू’

दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. 

सर्व ओरडत होते,  “म्हातारे सोडव!,  म्हातारे सोडव!” पुन्हा हात लावणार नाही असे त्यांनी कबूल केल्यावर तिने त्यांना सोडून दिले.

“आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. 

तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. 

ती यमराजाला म्हणाली,  

मला आणखी काही वर्षे जगू द्या. यमराज म्हणाले,  

“नाही,  ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. 

परंतू तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.

“म्हातारी म्हणाली,  

“माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” 

आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिटकले आणि ओरडू लागले,  

“म्हातारे सोडव,  म्हातारे सोडव” 

म्हातारी म्हणाली,  

“एका अटीवर सोडवीन. 

मी इच्छा करेल त्याच वेळी मरेन. 

मला इच्छामरणी करशील तर सोडवेन.” 

यमराज म्हणाले. “तथास्तु!” 

त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधी मरणार नाही. 

तिचे नाव आहे “भारतीय लोकशाही!!”

( संसदमार्ग-लोकशाहीचा राजमार्ग- ले. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पुस्तकातून साभार. ) 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार मिळणे म्हणजे लक्झरी नाही. 

—— लक्झरी म्हणजे निरोगी असणे.

लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे नाही आणि प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नाही.

—— लक्झरी म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगणात उगवलेले ताजे सेंद्रिय अन्न खाणे.

लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे नाही.

——- लक्झरी म्हणजे अडचणीशिवाय 3-4 मजले चढण्याची क्षमता.

 लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता नाही.

——- लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची क्षमता.

लक्झरीमध्ये होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.

——– लक्झरी हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेणे आहे.

 60 च्या दशकात एक कार एक लक्झरी होती.

 70 च्या दशकात टेलिव्हिजन ही लक्झरी होती.

 80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.

 90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती …

 मग आता लक्झरी म्हणजे नेमके काय ?

—— निरोगी असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवनात असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांसोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहणे, — या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. 

—- आणि हीच खरी” लक्झरी” आहे.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 18 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 18 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८९]

‘आम्ही कोण?

आम्ही का?

आम्ही कुठून?’

म्हणत

मला खिजवणारे

हे माझे उदास विचार…

 

[९०]

कातर विचारांनो,

भिऊ नका ना मला

कवी आहे मी.

 

[९१]

राखेच्या लाटांनी

आणि

धुराच्या लोटांनी

पुन्हा पुन्हा बजावलं

धरतीला –

‘आम्ही सख्खे भाऊ

अग्नीनारायणाचे …’

 

[९२]

गजबजून गेलेला

माझा ओसंडता दिवस

त्याच्या ग्ल्ब्ल्यातून

तूच  आणलंस मला 

इथपर्यंत

जिथं माझी

विषण्ण संध्याकाळ

मिनवत राहते

एकटेपणाचं काहूर

पोरक्या प्राणांमधून….

काय अर्थ असतो

या सगळ्याचा?

पाहीन मी वाट

उत्तरासाठी

सोबतीला घेऊन

माझी दीर्घ रात्र

गूढ… शांत… निश्चल…

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print