मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

सकाळपासून घरामध्ये  एखाद्या सणासारखं वातावरण होतं. सासूबाईंच्या चेहर्‍यावरील उत्साह आणि स्वयंपाकघरातून येणारा खाद्यपदार्थांचा घमघमाट या दोन्ही गोष्टींचं कारण एकच होतं – आज घरी दुपारच्या जेवणासाठी त्यांची एक मैत्रीण येणार होती. म्हणून घर पूर्णपणे सुशोभित केलं होतं.

काल संध्याकाळीच त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की उद्या त्यांची एक मैत्रीण जेवायला घरी येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी, आम्ही बाजारात गेलो आणि सासू- -बाईंनी एक छानशी, किंमती साडी आपल्या मैत्रिणीसाठी विकत घेतली.

आज तर त्या जणू काही वेगळ्याच पातळीवर होत्या. उत्साहाच्या भरात, त्या सकाळी माझ्या अगोदरच उठल्या होत्या. माझ्याआधीच स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी स्वतःच तयार केलेल्या यादीमधील एक एक पदार्थ, मनापासून व मोठ्या प्रेमाने बनवायला सुरुवातही केली होती.

त्या आज खूपच आनंदी दिसत होत्या.  पण मी… मी मात्र खोट्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याने आणि जड अंत:करणाने त्यांना मदत करत होते.

आज माझ्या आईचा वाढदिवस होता. माझ्या लग्नानंतरचा आईचा हा पहिलाच वाढदिवस होता. आणि ती एकटीच असणार होती. मी इथं सासरी, बाबा ऑफीसच्या कामासाठी बाहेरगावी आणि भाऊ तर आधीच परदेशात गेलेला होता.

काल मी माझे मन घट्ट करून माहेरी जाण्याचे ठरवले होते. मी याबाबत माझ्या सासूबाईंशी काही बोलणार, तेवढ्यात त्यांनीच त्यांच्या येणाऱ्या मैत्रिणीबद्दल व उद्याच्या ठरवलेल्या बेताबद्दल सांगितले. दुपारचे भोजन आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या मैत्रिणीबरोबर, फन सिटीला जाण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता.

ह्यावर मी आता काय बोलणार होते? मी गप्पच राहिले आणि कामाला लागले. सर्व घर व्यवस्थितपणे आवरले आणि स्वतःही जरा नाराजीनेच तयार झाले. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सासूबाईंनी मलाच पाठवलं.

दरवाजा उघडल्यावर भल्या मोठ्या पुष्पगुच्छाच्या मागे लपलेला चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि मी ‘आ ‘ वासून बघतच राहिले ! कारण समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे, माझी आई  होती. आई मला पुष्पगुच्छ  देत म्हणाली, ” सरप्राईज! “

आश्चर्याने आणि आनंदाने, मी तिथे उभी राहून आपल्या आईकडे एकटक बघत होते. 

” वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही का देणार माझ्या मैत्रिणीला? ” मागे उभ्या असलेल्या सासूबाईंनी विचारले.

“माझी आई… तुमची मैत्रीण?” मी मोठ्या आश्चर्याने विचारले.

“अग, हो ! मी खोटं नाही बोलत ! कोण म्हणतं की विहीणी-विहीणी मैत्रिणी होऊ शकत नाहीत? ” सासूबाई म्हणाल्या.

“ नक्कीच होऊ शकतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सासू आपल्या सुनेचे, मुलीसारखे लाड करू शकते आणि तीच विहिणीला पण मैत्रीण बनवू शकते.” असे म्हणून माझ्या आईने पुढे होऊन सासू- बाईंना मिठीच मारली.

आनंदाने माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले होते. मी सासूबाईंचे हात हातात घेऊन डोळ्यांना लावले आणि त्यांच्या हाताच्या तळव्यांचे मुके घेतले व त्यांना मिठी मारली. आम्हा दोघींना बघून, माझ्या आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या व तिने स्मित हास्य केले.

नात्यांचा हा उत्सव, अत्यंत प्रेमाने साजरा करत असताना, एका बाजूला माझी आई होती, जिने मला नात्यांचं महत्त्व शिकवलं, तर दुसरीकडे माझ्या सासूबाईं- ज्यांनी नातं हृदयापासून कसं जपायचं हे शिकवलं.

दोघीजणी माझ्याकडे बघून हसत होत्या आणि त्या दोघींच्यामधे उभी राहून, मी माझ्या नशिबावर खूष होत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर मात्र हसू फुलले होते.

स्वतःला महत्त्व कसे मिळेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांना “मान” कसा देता येईल याविषयी आपण विचार केला पाहिजे, हे मनापासून पटलं मला. 

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटची सुट्टी ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

 

? वाचताना वेचलेले ?

☆ शेवटची सुट्टी…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

असाच एक English picture बघितलेला…

‘Last Holiday’—‘ आयुष्याची शेवटची सुट्टी ‘— जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं… 

त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरुणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. 

मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजूनपर्यंत जी ‘सुट्टी घेणं’ परवडत  नव्हतं,  त्या ‘ मोठ्ठ्या सुट्टी ‘ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. 

ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये… आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत,  उच्चभ्रू वर्तुळात वावरते. 

तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो…पण ती देवाला विचारते….

” why now…? आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास? “

पण आता तिला कशाचंच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता ‘ आणखी काही ‘ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा ‘ दांभिक सभ्यतेचा ‘ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते… वागतेे… बोलते.

आणि तिला जाणवतं—– 

“ आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही.  केवळ ‘ भविष्य ‘ आणि ‘ लोकं काय म्हणतील ‘….याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं.”

” I have wasted too much of time on assumptions…..now I have time only for reality! ” 

—–ती राहिलेलं दोन आठवड्यांचं  आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरुवात करते. तिच्या departmental store owner लाही खरी खोटी सुनावते… त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.

—–आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत… तिला कसलाही आजार नाही… ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच  विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात—–

फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता. 

आपणही… आजचा – आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही… मनात कायम उद्याची चिंता ! काही तरी अशाश्वत मिळवण्यासाठी… कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो—इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. 

सगळा आनंद, सगळी मजा, एखाद्या ‘ सुट्टीत ‘ उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो….आणि —-आणि हे सगळं व्यर्थ आहे… जे खरच हवं होतं… तो आनंद, ते  समाधान… हे या कशात नव्हतंच… हेे कळायच्या आतच…   ‘ शेवटची सुट्टी लागते ‘. 

शिलकीतली ‘ पुंजी ‘ तशीच राहून जाते… न वापरलेली… कोरीच्या कोरी… पण आता निरूपयोगी  ! 

या ‘ शेवटच्या सुट्टी ‘ पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर?—-

—तर प्रत्येक क्षण त्या ‘सुट्टी’ इतकाच आनंद देईल. 

संग्राहक :  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलका कठीण नसतोच मुळी !! ☆ संग्रहिका – सुश्री प्रतिभा तळेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फुलका कठीण नसतोच मुळी !! ☆ संग्राहिका – सुश्री प्रतिभा तळेकर ☆

त्या दिवशी रात्री मी स्वैपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. 

मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला, आणि एकदा परतून भाजून घेतला. 

तोवर दुसरा लाटून तयार होताच. एका हातात पकड घेऊन तवा उचलला, आणि फुलका चिमट्याने त्यावर धरला, लगेच तो फुगून आला. 

मुलगा आश्चर्याने म्हणाला  “झाला पण फुलका? इतका सोप्पा ??”

मी म्हणाले,  “हो, कठीण नसतोच मुळी फुलका.” 

खरं तर सगळा स्वैपाकच मुळी सोप्पा असतो . कठीण असतं ते—-

तो रोज रोज करणे, ^दिवसातून^ अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे, आपल्या मूडचा, मनःस्थितीचा ,आजारपणाचा, दुखण्याचा कशाकशाचा विचार न करता अचूक आपली भूमिका निभावत, भयंकर उकाड्यात देखील शेगडीजवळ न कंटाळता लढत देणे .

सगळे संपले असे वाटत असतानाच,  ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून चार पोळ्या जास्त कराव्या लागणे. स्वैपाकघर आवरून ठेवल्यावर ‘ संपली एकदाची दगदग आतापुरती ‘ असे वाटत असतानाच… बैठकीतून ”आज जेवूनच जा “चा पुरुष मंडळींनी पाहुण्यांना केलेला आग्रह हसून साजरा करणे आणि तडक बिनपगारी overtime करणे आणि हे करीत असताना प्रत्येकाची भाजी, तिखट, चटणीची ^वेगळी आवड^,  आणि ^तर्‍हा^ समजून घेऊन, त्यानुसार जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे. 

बरे एवढे करून भागेल तर कसले स्वैपाकघर?  म्हणून सगळा जीव निघून गेल्यावरही ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून पुन्हा लख्ख करून ठेवणे आणि –  इतक्या मेहनतीला साधा कुणी thank you चा उच्चार ही न करता,  साधी पुढली ताट देखील न उचलता निघून जाणे.  

भरीस भर म्हणून ‘ ह्यात कोणते जग जिंकले??  स्त्रिया असतातच स्वैपाक आणि घरकाम करण्यासाठी टाइप ‘ अशी सामाजिक मान्यता असणे.. 

आणि हे सगळे, शिकल्यासवरल्या स्त्रिया आहात म्हणून बँक, शाळा, नोकर्‍या, उद्योग, असे उत्पन्नाचे मार्ग अवलंबत राहून, आणि  मीठ- मसाला, नातेवाईक, सण समारंभ अशा इतर अनेक जास्तीच्या गोष्टी सांभाळून,  फिरून ओट्याशी दोन हात करीत न कुरकुरता उभे राहणे. 

^कामवाल्या बाईला^ निदान पगार तरी देतात, ^घरच्या बाईला^ तर तेवढीही किंमत नसते. 

अरे —-

 * फुलका कठीण नसतोच मुळी—-

——————– कठीण असतो तो स्त्री जन्म .*

(खूप साऱ्या स्त्रियांचे मनोगत …)

संग्राहिका – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३०– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३०– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

इतिहासातून

प्रगट होत नाही माणूस

झगडून वर येत रहातो तो

इतिहातून —

 

[2]

मन लावून ऐकणार्‍या

या पाईन वृक्षांमधून

गुरफटत राहावी

समुद्राची गाज

तसा तुझा आवाज

प्रिय, माझ्यामधून

 

[3]

रात्र म्हणाली सूर्याला,

‘तू पाठवलीस मला

तुझी प्रेमपत्र

चादण्यांच्या अक्षरात

मी माझी उत्तरं

आसवांच्या अक्षरात

गवतावर पसरून

निघून जाते रे….’

 

[4]

पराभूत माणसाच्या

विजयाची

सोशीक प्रतीक्षा करणारा

हा मानवी इतिहास

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१]

माझीच सावली

पसरतो मी माझ्या रस्त्यावर

कारणदिवा आहे माझ्याकडे

पण न पेटवलेला….

 

[२]

चवच सारी

हरवून बसलास

आणि आता

अन्नाला

दोष देतोस?

 

[३]

नम्रतेचा शिखर

गाठता आलं

तरच जवळ जाता येतं

शिखराच्या

 

[४]

समृद्ध अन यशस्वी लोक

फुशारकी मारतात जेव्हा

ईश्वरी कृपेची

तेव्हा

किती शरमून जातो ईश्वर

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

एक जण भारतीय लोकशाहीला शिस्त लावणारा तडफदार माजी निवडणूक आयुक्त,  तर दुसरा कोकणरेल्वे, दिल्लीमेट्रो सारख्या चमत्काराचा निर्माता मेट्रो मॅन.– टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन— हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात टॉपचे अधिकारी तर होतेच, पण दोघांनीही आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था सुधारून दाखवली.

विशेष म्हणजे हे दोघेही अधिकारी अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एका वर्गात होते, आणि पहिल्या नंबरसाठी त्यांच्यात तुफान स्पर्धा चालायची.

 ई.श्रीधरन यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या आठवणी सांगितल्या आहेत—–

 दोघेही मूळचे केरळचे. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल मिशन हायस्कूलमध्ये श्रीधरन यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश केला. शेषन आधीपासून त्याच शाळेत होते. वर्गात त्यांचा पहिला नंबर यायचा.

 श्रीधरन यांनी आल्याआल्या त्या वर्षी शेषन यांना मागे टाकले. तिथून या दोघांची स्पर्धा सुरु झाली.  शेषन उंचीला कमी असल्यामुळे वर्गात पहिल्या बेंचवर बसायचे, तर श्रीधरन उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. शेषन हे अतिशय अभ्यासू, कायम पुस्तकात बुडालेले असायचे. याउलट श्रीधरन फुटबॉल खेळायचे. इंग्रजीमध्ये मात्र टी.एन.शेषन यांच्या तोडीस तोड अख्ख्या शाळेत कोणी नव्हतं.

 बोर्डाच्या परीक्षेत शेषन यांनी श्रीधरन यांना १ मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या ssc बोर्ड परीक्षेत शेषन ४५२ मार्क मिळवून पहिले आले, तर श्रीधरन यांना ४५१ मार्क मिळाले होते व त्यांचा दुसरा क्रमांक आला होता.

 मार्कांसाठी किती जरी स्पर्धा असली, तरी शेषन आणि श्रीधरन  चांगले दोस्त होते.

पुढे इंटरमीजीएटसाठीदेखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतलं. दोघांनी एकत्र झपाटून अभ्यास केला. अख्ख्या मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते दोघेच होते.: पण टी.एन.शेषन यांना आपल्या भावाप्रमाणे आयएएस अधिकारी बनायचं होत.  यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही व मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. श्रीधरन यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.

पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस बनण्याचं  स्वप्न शेषन यांनी पूर्ण केलं. याच काळात श्रीधरन हे इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झाम पास होऊन रेल्वेमध्ये भरती झाले. 

 योगायोग असा की दोघेही ट्रेनिंगच्या निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज, डेहराडून, येथे एकत्र आले. ते २ महिने शेषन व श्रीधरन सोबत राहिले. त्यानंतर मात्र दोघांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. शेषन यांनी प्रशासकीय कारकीर्दीत एकामागून एक यश मिळवत भारताचे मुख्य कॅबिनेट सचिव बनण्यापर्यंत मजल मारली. हे भारतातील सर्वोच्च पद. १९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं.

 भारतात निवडणूक काळात आचारसंहिता कडकपणे राबवण्यास शेषन यांनी घालून दिलेली शिस्त कारणीभूत ठरली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना मॅगसेसे पुरस्कार देखील देण्यात आला. तर श्रीधरन यांनी कलकत्ता मेट्रो, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोची मेट्रो, लखनौ मेट्रो असे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले. विक्रमी वेळेत, सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत, श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना याबद्दल भारताचा सर्वोच्च ‘ पद्मविभूषण ‘ हा सन्मान देण्यात आला.

मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात. स्पर्धा असावी तर शेषन-श्रीधरन यांच्या प्रमाणे चांगले  काम करण्याची. देशाला ‘ नंबर वन ‘ करण्यासाठी या दोन दोस्तांनी जे प्रयत्न केले, त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा हे नक्की.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

(स्वा सावरकर आणि CDS जनरल बिपीन रावत यांच्यातील काल्पनिक संवाद)

बिपीन – तात्या, तुम्ही इथे बसलाय होय…. कुठे कुठे शोधलं तुम्हाला ! गेले चोवीस तास मी तुम्हालाच शोधत फिरतोय सगळीकडे. तात्या… तात्या… मी तुमच्याशी बोलतोय… तुम्हाला भेटायला आलोय… मी बिपीन… भारतमातेचा सुपुत्र !… तात्या, खरं सांगतो, तुम्ही आखून दिलेल्या मार्गावरून चालतांना मला माझाच खूप अभिमान वाटत होता. तुमचे विचारशिल्प मनात घोळवत चिंतन, मनन केलं की आपोआप समस्येचा उलगडा होऊन मार्ग दिसायचा. तेव्हा प्रत्येकवेळेस मी मनाने तुमच्यासमोर नतमस्तक होत होतो. आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याचा योग्य आला. तात्या… तात्या…. ऐकताय नं तुम्ही? माझ्याकडे बघत का नाही? मी कुठे चुकलो का? चुकलो असेल तर माझा कान धरा… तुम्हालाच तो अधिकार आहे. पण, खरं सांगतो… मातेच्या रक्षणात मी कणभरही कधीच कसूर केली नाही आणि लेफ्ट जनरल लक्ष्मणसिह रावतांनी म्हणजे बाबांनी पण नाही. १९७८ मध्ये गोरखा रायफलच्या पाचव्या बटालीयनमध्ये रुजू झाल्यापासून माझं एकच स्वप्न होतं….

तात्या – मग ते स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच इथे का आलास? कुणी आमंत्रण दिलं होतं तुला इथे येण्याचं? इथे कुणी तुझी वाट पाहत होतं? की इथे कुणाला तुझी खूप गरज होती?

बिपीन – नाही तात्या, तसं नाही… पण…

तात्या – पण काय? अं …. पण काय??? जिथे कुणालाही आपली गरज नाही किंवा जिथे कुणी आपल्याला बोलावलं नाही, तिथे आपण जाऊ नये, इतकंही तुला कळत नाही? जिला तुझी खरी गरज आहे… आपली माता… तिला तू असं एकटं सोडून आलास? अरे, शास्त्रीजी, सुभाष, मी… आमचा गप्पांचा फड जमला की आम्ही तिघंही तुझ्याविषयी खूप अभिमानाने बोलायचो. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक…. अशी पदके तुझ्या छातीवर विराजमान होताना पाहून आमच्याच अंगावर मूठ मूठ मास चढत होतं. जेव्हा भारतमातेचं रक्षाप्रमुखपद तू स्वीकारलस तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना… चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ !!…. वाटलं, आता मानसच्या काठावर पुन्हा मंत्रघोष होणार !!…

बिपीन – तात्या, याचं खरं श्रेय तुम्हालाच आहे. तुम्ही मार्ग दाखवला तसं तसं मी वागत गेलो. तुम्ही म्हंटल होतं न..” आपलं भूदल, वायुदल, नौदल सुसज्ज बनवा. लढाऊ विमानांनी, आकाशयानांनी नि जेट विमानांनी आकाश आच्छादित होऊ द्या…” आता तर सुपरसोनिक, हायपरसोनिक क्षेपणास्त्र आपल्या जवळ आहेत. पृथ्वी, अग्नी, धनुष या क्षेपणास्त्रांनी आपण सुसज्ज आहोत. ब्राह्मोसला पाहून तर चीनला घाम फुटलाय. आणि हो.. “शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालविणे हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे”… हे तुमचं वाक्य सतत मनात घोळत होतं. म्हणूनच तर उरी सर्जिकल स्ट्राईक करून तुमचे शब्द कृतीत उतरवले.

तात्या – शाब्बास माझ्या वाघा !…

बिपीन – तात्या, तुमच्या डोळ्यात पाणी?

तात्या – एक डोळा हसतोय, एक डोळा रडतोय…. १९६२ मध्ये आपल्या सैन्यदलाची जी स्थिती होती, ती आता नाही याचा आनंद आहे. पण, जेव्हा मातेला तुझी नितांत गरज आहे तेव्हा तू तिला सोडून इथे आलास याचे अतीव दुःख आहे. शौर्य आणि साहस या शब्दांना समानार्थी शब्द म्हणजे ‘बिपीन रावत’ हे समीकरण इतक्यातच मिटायला नको होतं. भारतीय सेनेला एक नवीन वैश्विक ताकद मिळवून देणारा तू…. ५/६ वर्षांपूर्वी पण तू माझ्या काळजाचा ठोका चुकवला होतास.. आठवतंय तुला?

बिपीन – हो तात्या, चांगलंच आठवतंय. तेव्हा नागालँडमध्ये माझं पोस्टिंग होतं.

तात्या – तेव्हा वरची पायरी चढताचढता थांबलास… मातेच्या प्रेमापोटी परत फिरलास.. मग आताही तसं का नाही केलं?

तात्या – तात्या, तुमच्यासारखी मृत्यूला थोपवून धरण्याची शक्ती माझ्यात नव्हती. मृत्युंजयी तुम्ही एकच ! मला तर बोलावणे आल्यावर काहीही कारण न देता निघावंच लागलं. अजून खूप काम करायचं होतं, योजना आखून तयार होत्या आणि सिंधू पण भारतात आणायचीच असा कृतनिश्चयही केला होता… पण, हरकत नाही… तुम्हाला भेटून, तुमच्याकडून अक्षय ऊर्जा घेऊन परत जातो आणि राहिलेलं कार्य पूर्ण करतो की नाही बघाच…! मी पण भारतमातेला शब्द देऊन आलोय..   भेटेन नऊ महिन्यांनी…..

लेखिका– @ डॉ शुभा साठे 

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मार्गशीर्ष…. श्रीअनंत जोशी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मार्गशीर्ष…. श्री अनंत जोशी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

श्री कृष्णाने भगवदगीतेत “मासानाम मार्गशीर्षम” असे संबोधून ,या नक्षत्राचे मोठेपण वर्णन केले आहे. संस्कृतमध्ये मृग म्हणजे हरीण व हरणाचे डोके(शीर्ष) म्हणजे मृगशीर्ष. या मृगशीर्षाजवळ या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र असतो म्हणून या महिन्याचे नाव मार्गशीर्ष महिना. याच मृग नक्षत्रात जून मध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा मान्सूनची सुरुवात होते (मृगाचा पाऊस). आकाशातील हे अतिशय सुंदर व ठळक नक्षत्र एकदा बघितले  की आपण कधीच विसरू शकत नाही (फोटो जोडला आहे), भारतीयांना यात हरणाचे ४ पाय ,त्याचे डोके आणि व्याधाने (sirius / hunter star) पोटात मारलेला बाण (सरळ रेषेतील 3 तारे)असा आकार दिसतो. तर ग्रीक लोकांच्या समजुतीप्रमाणे त्यांना या नक्षत्राचा आकार म्हणजे योद्धा(warrior) दिसतो. त्यांनी याला नाव दिले (The orion) प्रगत शास्त्रीय अभ्यासाप्रमाणे आपल्या आकाशगंगेत ताऱ्यांचे पट्टे(spiral) आहेत , यातील एक पट्टा म्हणजे Orion-Cygnus Arm . आपला सूर्य व  सूर्यमाला याच पट्ट्यात येतात. 

तर याच मृग नक्षत्राचा आधार घेऊन लोकमान्य टिळकांनी The Orion  हे इंग्रजीत पुस्तक लिहून,  मृग नक्षत्राच्या पुराणातील उल्लेखांवरून व  गणितीय पद्धतीने भारतीय संस्कृतीची प्राचीनता व कालखंड  सांगितला  आहे ( पुस्तकाचा मराठी अनुवाद “मृगशीर्ष”)

असे  हे सांस्कृतिक , ऐतिहासिक, पौराणिक  व भौगोलिक महत्व असलेले मृग किंवा मार्गशीर्ष  नक्षत्र.

सोबत मृग नक्षत्राचा फोटो जोडला आहे. पुन्हा भेटू अवकाशातील नवीन विषय घेऊन.—

लेखक – श्री अनंत जोशी, पुणे

9881093880

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी कसा आहे ? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी कसा आहे ? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक   उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ”  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?”  हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”

उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–

—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .

खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा  व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ”  हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ”  हे महत्वाचे आहे—-

विचार जरूर करा—

 

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट बाराची ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गोष्ट बाराची… ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

ऐका गोष्ट बाराची—–

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक—-

मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती—१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्षाचे महिने १२,

नवग्रहांच्या राशी १२

गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

तप….१२ वर्षाचे,

गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

घड्याळात आकडे…..१२,

दिवसाचे तास …..१२,

रात्रीचे तास …..१२ ,

मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

सकाळच्या बाजारात उरला सुरला माल– १२ च्या भावात 

पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

बाळाचे नामकरण– १२ व्या दिवशी 

मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

कृष्ण जन्म….रात्री १२

राम जन्म दुपारी…१२ ,

मराठी भाषेत स्वर…१२– त्याला म्हणतात…बाराखडी

१२ गावचा मुखीया,

जमिनीचा उतारा ७/१२चा

इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा इतर कोर्सेससाठी प्रवेश – १२ वी नंतर 

खायापिया कुछ नही , गिलास फोडा–बाराना

बारडोलीचा सत्याग्रह 

पळून गेला ——पो’बारा’

पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

एक गाव— १२ भानगडी

लग्न वऱ्हाडी —- ‘बारा’ती

बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

बेरकी माणूस म्हणजे –१२ गावचं पाणी प्यायलेला

तसेच कोणाचेही न ऐकणाऱ्या  रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण– 12 

अशी आहे ही १२ चीं किमया….

कोणालाच दोष देऊन  उपयोग नाही…

महिनाच  “बाराचा” आहे—–

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares