मराठी साहित्य – विविधा ☆ ‘थोडी सोडायलाच हवी अशी जागा..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘थोडी सोडायलाच हवी अशी जागा..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘माया’ या शब्दाचे शब्दकोशातले अनेक अर्थ आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगू शकतील फक्त. पण ‘माया’ या शब्दाची व्याप्ती त्या अर्थापुरती मर्यादित नाहीय याची ओझरती कां होईना जाणीव करून देईल ते फक्त संत-साहित्यच !

अनेक संत-महात्म्यांनी त्यांच्या विविध साहित्य रचनांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सामान्य माणसालाही समजेल, पटेल, रुचेल अशा सोप्या शब्दात सांगितलेले आहे. श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान रामदासस्वामींनी त्यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथात अतिशय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांनी अतिशय सोप्या,सुलभ पद्धतीने, क्लिष्ट न वाटता बोध घेता येईल असे त्याचे सविस्तर  विवरण केलेले आहे. दासबोध हा अत्यंत सखोल अभ्यासाचा विषय आहे हे खरेच पण ‘माया’ या संकल्पनेची व्याप्ती सोप्यापद्धतीने जाणून घेण्यासाठी तो एक सहजपणे उपलब्ध असणारा मार्ग आहे हेही तितकेच खरे. रामदासस्वामींनी दासबोधात ‘माया’ या शब्दाचा वापर विवेचनाच्या ओघात अनेकदा आणि तोही मूळमाया, महामाया, अविद्यामाया अशा अनेक वेगवेगळ्या रुपात केलेला आहे.आजच्या लेखनसूत्रासाठी यातील ‘वैष्णवीमाया’ या संकल्पनेचे प्रातिनिधिक उदाहरण घेऊया.’वैष्णवीमाया’ म्हणजे विष्णूची म्हणजेच परमात्म्याची माया! ही माया मोहात पाडणारी आहे. विधात्याने निर्माण केलेली सृष्टी म्हणजेच हे विश्वाचे अवडंबर!मायेने निर्माण केलेले एक दृश्यरुप! या विश्वात जे जे चंचल,जड,अशाश्वत ते ते सर्व या मायेचाच पसारा! या मायेने संपूर्ण ब्रह्म आच्छादलेले आहे. या मायेला अलगद बाजूला सारून ‘ब्रम्ह’ जाणून घेणे म्हणजे ज्ञान! अर्थात ते प्राप्त करून घेणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय गूढ,अशक्यप्राय वाटावे असेच  आणि म्हणूनच संतसाहित्य त्यांना ते अधिक सोपे,सुकर करुन समजावून सांगते.अतिशय सोप्या शब्दात हे संतसाहित्य माणसाला जगावे कां, कसे आणि कशासाठी हे शिकवते.

गंमत म्हणजे माणसाचे हे जगणे सहजसुंदर करण्यासाठी वेगळ्या अर्थाने त्याच्या मदतीला येते ती मायाच.माया चंचल, अशाश्वत जशी तशीच वात्सल्य, प्रेम आणि मार्दवही! मायेला जेव्हा माणुसकीचा स्पर्श होतो तेव्हा ममता,जिव्हाळा,आपुलकी, आत्मीयता,ओलावा,प्रेम,स्नेह अशा विविध रंगछटा मायेला अर्थपूर्ण बनवतात.या लोभस रंगांनी रंगलेली माया माणसाचं अशाश्वत जगातलं जगणं सुसह्य तर करतेच आणि सुंदरही.ही माया  माणसाच्या जगण्याला अहम् पासून अलिप्त करीत दुसऱ्यांसाठी जगायला प्रवृत्त करते. दुसऱ्याला स्नेह,प्रेम,आनंद  देणाऱ्यालाही ती आनंदी करते. या मायेला विसरून माणूस जेव्हा ‘अहं’शी लिप्त होऊन जातो तेव्हा तो मायेच्या पैसा-अडका, धनदौलत या मायाजालात गुरफटून भरकटत जाऊ लागतो. जगण्यातला आनंदच हरवून बसतो. मायेच्या ‘मायाळू’ आणि ‘मायावी’ अशा दोन्ही परस्परविरोधी रुपांमधला फरक संतसाहित्यच आपापल्या पध्दतीने सामान्य माणसालाही समजेल असे सांगत असते. आणि मग त्याला सारासार विचार, आणि नित्यविवेक अंगी बाणवून स्वार्थाचा लोप करीत सावली देणारा परमार्थ समजून घेणे सोपे जाते. यातील ‘सारासार विचार’ म्हणजे तरी नेमके काय?

पंचमहाभूतांनी बनलेला,जड, म्हणजेच अनित्य या अर्थाने ‘देह’ हा ‘असार’,अशाश्वत आणि नित्य ते शाश्वत या अर्थाने ‘आत्मा’ हा ‘सार’! हा ‘सारासार’ विचार हीच आपल्या ठायी वसणाऱ्या अंतरात्म्यातील परमात्म्याला जाणून घेण्याची पहिली पायरी!या पायरीवरच्या आपल्या पहिल्या पाऊलातच मायेला चिकटलेला स्वार्थ अलगद गळून पडलेला असेल.

‘माया’ या शब्दाच्या वर उल्लेखित अर्थांपेक्षा वरवर अतिशय वेगळा वाटणारा आणखी एक अर्थ आहे.या अर्थाचा वरील सर्व अर्थछटांशी दुरान्वयानेही कांही सबंध नाहीय असे वाटेल कदाचित,पण हा वेगळा भासणारा अर्थही माणसाच्याच जगण्याशी नकळत आपला धागा जोडू पहातोय असे मला वाटते.

शिवताना दोरा निसटू नये म्हणून वस्त्राचा थोडा भाग बाहेर सोडला जातो त्याला ‘माया’ असेच म्हणतात. लाकडावर एका सरळ रेषेत खिळे ठोकताना लाकडाच्या फळीवरचा मोकळा ठेवला  जाणारा थोडा भाग त्यालाही ‘माया’ म्हणतात. कापड कापतानाही अशी थोडी माया सोडूनच कापले जाते.लेखन करताना कागदाच्या डाव्या बाजूला थोडी माया सोडूनच केले जाते.अशा अनेक ठिकाणी जाणिवपूर्वक सोडाव्या लागणाऱ्या जागांचा निर्देश करणारी माया! या मायेला जगताना माणसानेही ‘अहं’ पासून थोडी माया सोडून जगणंच अपेक्षित आहे याचे भान आपण कधीच विसरुन चालणार नाही !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ या माहेरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

☆ या माहेरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कवितेच घर हेच शब्दांचे माहेर. …किती भावस्पर्शी जाणिवा नेणिवेच्या या कवितालयात पहायला मिळतात …… कल्पना  आणि वास्तवता यांच्या नाजूक संवेदनशील पण जागृत  अनुभुतींनी साकारलेल्या या शब्द रचना जेव्हा मनाशी संवाद साधतात ना तेव्हा मनाचा एकटे पणा कुठल्या कुठे पळून जातो.   डोळे आणि मन भरून येत. . .  आठवणींची पासोडी खांद्यावर टाकून  आपण या माहेरात  विसावतो आणि . . .

……अनेक जीवनातील सुख दुःख पचवलेली, जीवनसंघर्ष करीत  कवितेचा शब्दसुतेचा दर्जा देणारी संवेदनशील व्यक्ती मत्वे  ,  मनात रेंगाळत रहातात.  मनातील ताणतणाव  दूर करण्याचा प्रयत्न ही शब्द पालवी करते आणि म्हणावस वाटत  वसंत फुलला मनोमनी

खरंच . . .  ही फुलं फुलतात कशासाठी? माणस माणसांना भेटतात कशासाठी? थोड तुझ थोड माझं परस्परांना समजण्यासाठी . . तसच या माहेरी घडत. या कवितेच्या घरात कवितेचे विविध प्रकार मांडवशोभेसारखे नटून थटून येतात. त्यांच नुसते दर्शन देखील मनाची मरगळ दूर करते.  आजची कविता काय आहे, कशी  आहे  ,  तिच रूप, स्वरूप, तिचा प्रवास याच्या खोलात न जाता मी फक्त  इतकेच म्हणेन  आजची कविता प्रवाही आहे.  सोशल नेटवर्किंग साईट वरून ती लोकाभिमुख होते  आहे.  प्रत्येक कविता  आपला स्वतःचा वाचक वर्ग निर्माण करते आहे. हा साहित्य प्रवाह नसला तरी हा जीवनप्रवास आहे माणसातल्या सृजनशील मनोवृत्तींचा . ही निर्मिती माणसाला धरून ठेवते. माणसाशी संवाद साधते. त्याचं एकटेपण दूर करू पहाते. म्हणून कविता महत्वाची आहे. 

कवितेने किती पुरस्कार मिळवले, * आपल्या लेकिच्या अंगावर किती दागिने  आहेत* यापेक्षा  आपली लेक  किती लोकाभिमुख  आहे हे पहाणं मनाला जास्त भावत. मनान मनाशी जोडलेले भावबंध हाच उत्तम कवितेचा पाया असतो. नाते जपताना शब्दांना उकळी  आणून उसन्या गोडव्याने पाजलेला चहा भावाच्या मनात बहिणीची माया उत्पन्न करू शकत नाही त्याप्रमाणे कविता लोकांपर्यत किती पोचली तिचा समाजाभिमुख प्रवास कविला समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देतो.

माहेर. . . माहेर ..  म्हणजे नेमक काय. ? मनातली दुःख, चिंता, काळजी, ताणतणाव, बाहेर जाताना रांगत्या पावलांनी किंवा  अनुभवी वृद्ध व्यक्तीच्या आश्वासक खोकल्याने घरात कुणीतरी  असल्याची दिलेली चाहूल, शब्दांना भावनांनी दिलेला आहेर म्हणजे माहेर.  हे माहेर ममत्वाचा,मायेचा, माझ्या तला कलागुणांचा सर्वांगीण  अविष्कार करत, माझ माझ म्हणून ज्याला जोजवावं त्या विचारप्रवाहांचा जे स्वीकार करत ते माहेर माणसाला माणूसपण कवितेला घरपण प्राप्त करून देत.

कविता श्लोकातून जाणवायला हवी. अभंगातून निनादत ओवीतून उदरभरण करणा-या , गहू, ज्वारी, बाजरीच्या पिठात  एकजीव व्हायला हवी. कवितेने जुन्याची कास आणि नाविन्याची आस सोडू नये यासाठी हे माहेर प्रत्येक साहित्यिकासाठी फार महत्वाचे आहे.  या माहेरात कुणाला  एकटे सोडायचे अन कुणाला बांधून ठेवायचे हे काम आपले लेखन,  आपला दैनंदिन लेखन कला व्यासंग बिनबोभाट करतो. तुलना नावाची मावशी किंवा मंथरा या माहेरात आपल्याला पदोपदी भेटते. ही तुलना मावशी कविच्या कवित्वाचा देखील घात करू शकते.  या माहेरात आपल्या कार्यकरतृत्वाचं गुणांकन करायला दामाजी नाही तर आत्माराम कामी येतो हे ध्यानात ठेवा आणि जेव्हा जेव्हा स्वतःला  एकट समजाल तेव्हा तेव्हा या माहेरी निःशंकपणे या. पायवाट  आणि हमरस्ता दोन्ही ही आपलीच वाट पाहत  असतात. सुख, समाधान, हाकेच्या अंतरावरच असत त्याचा शुभारंभ या माहेरी होऊ शकतो.

हा प्रवास  ह्दयापासून ह्रदयापर्यतचा असतो. यात शब्द जितका महत्वाचा तितकाच एकेका शब्दासाठी  आपल सारं जीवन वेचणारा माणूसही तितकाच महत्त्वाचा. या शब्दालयात ,  माहेरपणात कविता नांदायला हवी.कविनं कविता  अन माणसान कटुता या माहेरी निवांत सोडून द्यावी. कविता तिचा प्रवास करीत रहाते  आणि मनातली कटूता एकटी होती. .  एकटी  आहे. .  एकटी राहिल . .  असा विश्वास देत पुढच्या जीवनप्रवासाला लागते.

धन्यवाद.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वक्ता दशसहस्रेषु ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?  विविधा ?

☆ वक्ता दशसहस्रेषु ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यापैकी ‘वक्ता’ हा एक झळाळणारा पैलू. तो त्यांनी कष्टपूर्वक साध्य केला होता.

त्यांचं पहिलं भाषण म्हणजे चौथीत असताना वर्गात सांगितलेली गोष्ट. पाठ केलेलं आठवेना. मग प्रत्येक वाक्यानंतर ‘झालं’-‘झालं’ करत पुढचं वाक्य

आठवायचे. मग ‘झालं’ म्हटलं, की वर्गात हशा पिकू लागला. अभावितपणे का होईना, त्यांच्या विनोदी भाषणाची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली.

पुढे इंग्रजी चौथीत गेल्यावर त्यांनी वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला. भाषण तोंडपाठ केलं. खणखणीत आवाजात त्यांनी केलेल्या या भाषणाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. ‘हशा आणि टाळ्या’मधल्या टाळ्यांची ही सुरुवात.

यामुळे त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला, की पुढची लागोपाठ तीन वर्षे ते वक्तृत्वस्पर्धेत पहिले येत राहिले.

काही विद्यार्थी सासवडला दरवर्षी नाटक करीत. तेव्हा पडद्याबाहेर येऊन, प्रेक्षकांना “आणखी एक अंक झाल्यावर नाटक संपेल,” हे प्रेक्षकांना सांगण्याचे काम अत्रे करत. त्यामुळे पूर्वतयारी न करता बोलायची सवय झाली व श्रोत्यांचे भय वाटेनासे झाले.

कॉलेजच्या चार वर्षांत त्यांनी मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने काळजीपूर्वक ऐकून त्यांचा अभ्यास केला.

लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, केशवराव छापखाने, श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर, दादासाहेब खापर्डे, अच्युतराव कोल्हटकर वगैरे वक्त्यांच्या वक्तृत्वशैलीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यापैकी खापर्डे व कोल्हटकरांच्या वक्तृत्वाचा अत्रेंच्या मनावर अतिशय परिणाम झाला.

दादासाहेब खापर्डे हे त्या काळातील एकुलते एक विनोदी वक्ते होते. घरगुती पद्धतीने गोष्टी सांगत ते श्रोत्यांना हसवत, तल्लीन करून टाकत.पण त्यांच्या  व्याख्यानात विनोदाखेरीज इतर रसांचा परिपोष कमीच असे.

अच्युतराव कोल्हटकर मात्र कोणत्याही रसाचा परिपोष लीलया करत. प्रभावी व्यक्तिमत्त्व, ऐट,वजनदार आवाज, वाङ्मयीन संदर्भ देत केलेले मार्मिक, परिणामकारक बोलणे यांची श्रोत्यांवर छाप पडे. पहिल्या दोन-चार वाक्यांतच ते टाळ्या घेत किंवा हशा पिकवत. पुढे भाषणातील रस आणि गती ते अशी काय वाढवत नेत, की मुख्य मुद्दा आला की टाळ्यांचा प्रचंड गडगडाट होई. त्या काळात ते अग्रगण्य राजकीय वक्ते होते. अत्रे त्यांना गुरुस्थानी मानत.

पुढची काही वर्षे अत्रेंची भाषणे फारशी ‘जमली’ नाहीत.

बी.टी. चा पद्धतशीर व जीवन तोडून अभ्यास केल्यामुळे ते पहिल्या वर्गात पहिले आले. त्यांचा आत्मविश्वास वाढला.

‘गडकरी स्मृतिदिना’निमित्त दिलेल्या व्याख्यानात, कोणतीही तयारी न करता, गडकऱ्यांची व आपली पहिल्याने ओळख कशी झाली, ते घरगुती भाषेत सांगून (दादासाहेब खापर्डे शैलीत) श्रोत्यांचे ‘हशे’ मिळवले.उत्तरार्धात  अच्युतराव कोल्हटकरांप्रमाणे नाटकी स्वर वाढवून कडकडून टाळ्या घेतल्या. या व्याख्यानापासून, त्यांच्या विशिष्ट शैलीची सुरुवात झाली.

पुढे इंग्लंडमध्ये सुप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. पी. बी. बॅलार्ड यांची व्याख्याने अत्रेंनी ऐकली व अभ्यासली. मानसशास्त्रासारखा अवघड विषय ते गोष्टी सांगून मनोरंजक करीत.

इंग्लंडहून परत आले, तेव्हा त्यांचे शरीर भारदस्त झाले होते.ही वक्त्यासाठी जमेची बाजू.

गडकरी स्मृतिदिनाचे अध्यक्ष म्हणून अत्रेंनी ठणठणीत आवाजात व स्पष्ट भाषेत बोलायला सुरुवात करून तिसऱ्याच वाक्यात कोटी केली, तेव्हा हास्याचा प्रचंड स्फोट झाला. नंतरही दोन-तीन वाक्यांनंतर ‘हशे’ घेत राहून श्रोत्यांना कह्यात घेतलं. मधेच काही कारणाने सभा बिनसते की काय, अशी भीती वाटल्यावर विनोद सोडून देऊन ‘अच्युतरावी’  पद्धतीचा अवलंब केला. एकूण, वक्ता म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.

गर्दीचे मानसशास्त्र अत्रेंना पक्कं ठाऊक होतं. ठणठणीत आवाजात पहिलं वाक्य बोललं, की वक्ता घाबरलेला नाही, याची खात्री पटून श्रोते शांत होतात. पहिल्या दोन-चार वाक्यांत त्यांना हसवलं, की पुढचा मार्ग मोकळा.

काही श्रोत्यांना मध्येच काहीतरी बोलण्याची सवय असते. त्याचा अगोदरच अंदाज बांधून त्यांची उत्तरे अत्रे आधीपासूनच ठरवून ठेवत. श्रोत्यांवर मात्र त्या प्रसंगावधानाचा प्रभाव पडे.

श्रोत्यांनुसार ते आपली वक्तृत्वशैली ठरवत असत. लहान मुलांसमोर सोपे, बुद्धिमान कॉलेजयुवकांसमोर विनोदी, तर गंभीर चेहऱ्याच्या प्रौढ व वृद्ध लब्धप्रतिष्ठितांसमोर प्रारंभीच ते वीररसाचा अवलंब करत असत.

सुरुवातीला अत्रे व्याख्यानाचे सर्व मुद्दे, संदर्भ, कोट्या यांची नोंद करून, टिपणे नीट तोंडपाठ करून, टिपणे हातात न घेताच ते तसंच्या तसं बोलत. नंतरनंतर मात्र व्याख्यानाला जाण्यापूर्वी पाच- दहा मिनिटे मनातल्या मनात मुद्द्यांची उजळणी करत.

राजकीय विषयांवर, पन्नास हजारांपासून एक लाखपर्यंत श्रोत्यांसमोर बोलताना विनोदी पद्धती, बेडर वृत्ती व ठणठणीत प्रकृती यांचा अत्रेंना खूपच फायदा झाला.

अत्रेंच्या मते व्याख्यान रंगणे हे वक्त्यापेक्षा जास्त श्रोत्यांवर अवलंबून असतं.

दहा हजार माणसांत एखादाच वक्ता सापडतो, या अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. पण अत्रेंच्याच शब्दांत सांगायचं, तर अत्रेंसारखा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आचार्य अत्रेंची काव्य सृष्टी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “आचार्य अत्रेंची काव्य सृष्टी ” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठीतील एक बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे श्री. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे. ते नामवंत लेखक,  नाटककार, कवी,  संपादक,  चित्रपट निर्माते,  शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्कृष्ट वक्ता होते.

त्यांनी तो मी नव्हेच,  घराबाहेर,  बुवा तेथे बाया,  मी मंत्री झालो,  मोरूची मावशी,  लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार यासारखी अनेक गाजलेली नाटके लिहिली. कथासंग्रह, क-हेचे पाणी हे आत्मचरित्र, कादंबरी, इतर असंख्य पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकाच्या निमित्ताने विपुल लेखन केले. चित्रपटासाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले.त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले ‘सुवर्ण कमळ’ मिळाले.

त्यांनी ‘केशव कुमार’ या नावाने कविता लेखन केले. केशवकुमार म्हटले की आठवतात ती  ‘झेंडूची फुले’, ‘गीतगंगा’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. झेंडूची फुले हा विडंबनात्मक कविता संग्रह जगद्विख्यात आहे. या काव्य लेखनाला त्यांनी स्वतंत्र स्थान मिळवून दिले. झेंडूची फुलेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा याबाबत मान्यवरांचे सविस्तर विचार या पुस्तकात दिलेले आहेत. कविवर्य केशवसुतांची “आम्ही कोण ?” ही प्रसिद्ध कविता. या कवितेचे आचार्य अत्र्यांनी केलेले विडंबनही लोकप्रिय झाले.

केशवसुत —

आम्ही आम्ही कोण म्हणूनी काय पुससी ? आम्ही असू लाडके |

देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळायला |

———-

आम्हाला वगळा – गतप्रभ जणी होतील तारांगणे

आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे|

आचार्य अत्रे —

आम्ही कोण ? म्हणून काय पुसता?दाताड वेंगाडुनी ?

फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला ? ||

————

आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील साप्ताहिके 

आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके ||

यावरून या पुस्तकाची झलक लक्षात येते.

अत्र्यांनी इतर काही चित्रपट गीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. ती आजही लोकप्रिय आहेत. १.छडी लागे छम छम, २.भरजरी ग पितांबर (दोन्ही चित्रपट श्यामची आई), यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया (चित्रपट ब्रह्मचारी), १.प्रेम हे वंचिता| मोह ना मज जीवनाचा ||२. प्रिती सुरी दुधारी ( दोन्ही नाटक पाणिग्रहण), किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार (नाटक प्रितिसंगम) त्यांच्या काही  प्रसिद्ध कविता बालभारती या पुस्तकात समाविष्ट आहेत उदा.आजीचे घड्याळ, माझी शाळा. त्यांची ‘प्रेमाचा गुलकंद’ ही एक मस्त वेगळीच मजा प्रेमकविता आहे. दिवस रात्रीच्या वेळा, सूर्याची स्थिती, कोंबड्याचे आरवणे, रात्री वाजणारा चौघडा यावरून आजी वेळ अचूक सांगत असे. पण कुठेही न दिसणारे, न वाजणारे हे आजीचे घड्याळ म्हणूनच मुलांना कुतूहलाचे वाटते.

शाळेची प्रार्थना म्हणून म्हटली जाणारी त्यांची प्रसिद्ध कविता म्हणजे ‘माझी शाळा’.

ही आवडते मज मनापासुनी शाळा

लाविते लळा ही, जसा माऊली बाळा ||

इथे हसत खेळत गोष्टी सांगत गुरुजन शिक्षण देतात. बंधुप्रेमाचे धडे मिळतात, देशकार्याची प्रेरणा मिळते, जी मुलांना देशासाठी तयार करते त्या शाळेचे नाव आपल्या कार्यातून उज्वल करा अशी शिकवण अतिशय सोप्या शब्दात ही कविता देते.

असेच त्यांचे खूप गाजलेले गीत म्हणजे ‘भरजरी गं पितांबर’. ‘श्यामची आई’ या चित्रपटातले हे गीत आजही लोकप्रिय आहे. बहीण भावाचे नाते, त्यातली प्रीती, श्रीमंतीचा बडेजाव, परमेश्वर स्वरूप भावासाठी सर्वस्व देण्याची समर्पण वृत्ती अशा वेगवेगळ्या मानवी स्वभाव छटांवर हे गीत अप्रतिम भाष्य करते. “चिंधीसाठी शालू किंवा पैठणी फाडून देऊ काय ?” असे विचारत सख्ख्या बहिणीने चिंधी दिली नाही. तर मानलेल्या बहिणीला वसने देऊन तिची लाज राखत पाठीराखा झालेल्या भावासाठी मानलेल्या बहिणीने त्रैलोक्य मोलाचे वसन भक्तीभावाने फाडून दिले. यासाठी अंत:करणापासून ओढ वाटली पाहिजे तरच लाभाविण प्रीती करता येते. नात्यांचे महत्त्व, त्यांची जपणूक अतिशय सोप्या, सुंदर शब्दात सांगितलेली आहे. आजच्या काळातील बदलत्या मानसिकतेला तर हे गीत छान मार्गदर्शन करते. अशा प्रकारे कविता, विडंबन काव्य, चित्रपट गीते, नाट्यगीते अशा विविध प्रकारात आपला ठसा उमटविणारी आचार्य अत्रे यांची अतिशय विलोभनीय, समृद्ध आणि लोकप्रिय काव्यसृष्टी आहे.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.🙏

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे) ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे) ☆ सौ राधिका भांडारकर ☆

१३ जुन हा प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने…

वास्तविक आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या ही काही शब्दांत किंवा काही वाक्यात करणे अत्यंत अवघड आहे. अनेक विविधांगी क्षेत्रांमध्ये त्यांचा अफाट वावर होता. ते  मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, लेखक, नाटककार ,संपादक ,पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकारणी आणि वक्ते होते.  कुठलेही क्षेत्र त्यांच्यापासून सुटले नाही.  आणि प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं स्थान हे नामांकित होतं.

काव्य लेखनापासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. १३ ऑगस्ट१८९८  साली पुरंदर तालुक्यात ,कोडीत खुर्द या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला.

बीए ,बीटी,टीडी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या चळवळीचे ते प्रमुख नेते होते . असं म्हणतात की त्यांच्या नेतृत्वामुळेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपूर्ण यशस्वी झाला.

महाराष्ट्राचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला. अध्यापन हे त्यांचं पहिलं मासिक. त्यानंतर रत्नाकर ,मनोरमा, नवे अध्यापन ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जय हिंद, मराठा अशी दैनिके ही त्यांनी सुरू केली.  आणि या माध्यमातून त्यांच्या जबरदस्त लेखणीचे फटकारे लोकांनी अनुभवले.

कधी पत्रकार कधी शिक्षक कधी राजकारणी तर कधी एक साहित्यिक म्हणून त्यांनी आपली परखड आणि सुदृढ मते समाजापुढे मांडली.

साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा अशी त्यांची एकाहून एक अनेक नाटके रंगभूमीवर गाजली.  विनोदाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विसंगतीला  सहज चिमटे काढले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक काव्य संग्रह अतिशय लोकप्रिय ठरला.

आचार्य अत्रे व कवी गिरीश या दोघांनी मिळून संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठी क्रमिक पुस्तके पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमात होती. यानंतर निघालेल्या पुस्तकांची या अरुण वाचनमालेशी तुलना होऊच शकत नाही, हे शिक्षण वर्तुळातील लोकांचे आणि पालकांचेही मत आहे.

श्यामची आई या सानेगुरुजी लिखित कादंबरीवरील चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. आणि त्यास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून पहिलं सुवर्णकमळ मिळालं.

अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघंकधीही विस्मरणात जाउ न शकणारे, महाराष्ट्रातील अफाट  विनोदवीर. ज्यांनी खरोखरच लोकांना सहजपणे खळखळून हसवलं.

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ खूप मोठे होते. एकदा एका ग्रामीण भागात दौरा करत असताना एका शेतकऱ्याने त्यांना म्हटले,

” तुम्ही सरकारला विधानसभेत कोंडीत पकडता पण त्यांच्या

एवढ्या मोठ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे  कसे काय पुरणार?

 तेव्हा अत्रे त्याला म्हणाले,

” तुझं शेत आहे ना?”

” हो साहेब”

” कोंबड्या पाळतोस ना?”

” व्हय तर!”

” किती कोंबड्या आहेत?”

त्याने छाती फुगवून म्हटले ,

” चांगल्या शंभरेक हायत की..”

” आणि कोंबडे किती?”

” कोंबडा फकस्त एकच हाय.”

“मग एकटा पडतो का तिथे?”

जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड हशा पिकला. अत्र्यांच्या या हजरजबाबीपणा मुळे अनेकांना त्यांनी जागीच गप्प केले होते.

अत्र्यांच्या साहित्यावर सावरकरांचा प्रभाव होता.  त्यांची आणि सावरकर यांची पहिली भेट रत्नागिरी येथे झाली होती. त्याविषयी ते म्हणाले होते,

” सावरकरांचा सतेज गौरवर्ण, आणि विलक्षण प्रभावी डोळे यांचा माझ्या अंत:करणावर अविस्मरणीय प्रभाव झाला. माझा अंतरात्मा तृप्त झाल्यासारखा वाटला.”

 सावरकर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर १४ लेख लिहिले होते. आणि ते अत्यंत प्रभावी आणि वाचनीय ठरले. सावरकराना प्रथम स्वातंत्र्यवीर म्हणणारे आचार्य अत्रेच होते.

” जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही. आणि तृप्ती कधी होत नाही.” असे आचार्य अत्रे म्हणत. इतकी त्यांची जीवनावर निष्ठा होती.

बाबासाहेब आंबेडकर आणि अत्रे यांची  विशेष मैत्री होती. आणि त्या दोघांनी एकमेकांच्या मतांचा नेहमी आदर राखला.

अशा या बहुगुणी. समृद्ध व्यक्ती विषयी बोलताना,राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी, राईटर अंड फायटर ऑफ महाराष्ट्र! असा त्यांचा उल्लेख केला होता.

साहित्यिक वर्तुळात ते केशवकुमार म्हणून प्रसिद्ध होते. आजीचे घड्याळ ही आजही आठवणीत असलेली त्यांची कविता केशवकुमार या नावाने प्रसिद्ध झाली होती. आचार्य अत्रे हे खरोखरच एक अद्भुत रसायन होते! त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती.  तशी त्यांच्या कटू जिव्हारी लागणाऱ्या वाक्बाणांनी  दुखावली गेलेली माणसं ही खूप होती..

कर्हेचे पाणी ..हे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगणारे पाच खंडात असलेले २४९३ पानी आत्मनिवेदन.  .”महाराष्ट्राच्या उद्धारासाठी नि संरक्षणासाठी तत्कारणि देह पडो ही असे स्पृहा….” असे म्हणून त्यांनी या पुस्तकाचा पाचवा खंड प्रकाशित केला. शेवटच्या परिच्छेदात ते म्हणतात, “हर्षाच्या आणि संतोषाच्या या मधुर धुंदीत, महाराष्ट्र मातेच्या चरणावर मस्तक ठेवून, अर्धोन्मिलीत नेत्रांनी काही काळ मला आता निश्चल पडू द्या…”

 यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. तो दिवस होता १३ जून १९६९.

असं हे अत्रे तत्रे सर्वत्रे व्यक्तिमत्व अनंतात लोप पावले.

पण आजही ते लोकांच्या मनामनात अमर आहे.

 त्यांच्या स्मृतीस अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली🙏

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 21 – पाथेय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 21 –पाथेय डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधी नंतर, त्यांच्या कडून मिळालेले परमपावन असे संचित नरेंद्र नाथांच्या जीवनाचे अक्षय असे पाथेयच होऊन गेले होते. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधी नंतर लवकरच काशीपूरचे उद्यानगृह सोडणे भाग होते. नाहीतर फाटाफूट होऊन हे बालसंन्यासी जर चहूकडे विखुरले तर, त्या देवमानवाच्या आदर्शांचा प्रचार करणे तेव्हाढ्यावरच थांबेल. त्यांच्या पैकी प्रत्येकाला गुरुदेवांकडून ज्या साधनेचा आणि आदर्शांचा  लाभ झाला आहे, त्या सर्व साधना आणि आदर्श एकत्र केंद्रीभूत करायला हवेत.

सर्वजण संघबद्ध होण्याची गरज आहे . आता सेवेच्या निमित्त का असेना सर्वजण एकत्र राहिल्यामुळे एकमेकात  स्नेह व प्रेम निर्माण झाले होते. हे सगळे वैराग्यशील तरुण संन्यासी निराश्रितांसारखे वणवण भटकत फिरतील ही कल्पना नरेंद्रनाथांना कशीशीच वाटली. इतर गृहस्थ भक्तांनाही ते पटले. त्यामुळे नरेन्द्रनाथ सर्वांना त्या दिशेने प्रोत्साहन देऊ लागले.

सुरेन्द्र्नाथ मित्रांनी वराहनगर भागात त्याना एक घर भाड्याने घेऊन दिले. गुरूंचा रक्षाकलश आम्हीच नेणार यावरून भक्तांमध्ये वाद सुरू झाला. “महापुरुषांच्या देहावशेषांवरून शिष्यांमधे वाद होणं नेहमीचच आहे, पण आपण संन्यासी आहोत. आपणही तसंच वागणं योग्य नाही. श्रीरामकृष्णांच्या  जीवनातला आपल्या समोरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आपले जीवन घडविणे, हेच आपले पहिले कर्तव्य आहे. रक्षा कलशावर ताबा ठेवण्यापेक्षा त्यांची शिकवणूक आचरणात आणणं आणि त्यांचा संदेश दूरवर पोहोचवणं खर महत्वाचं आहे”. नरेन्द्रनाथांच्या या सांगण्यावरून हा वाद मि टला.

कृष्णजयंतीच्या दिवशी रक्षाकलश नेऊन त्याचे काकुडगाछी  इथल्या रामचंद्रांच्या उद्यानात विधिवत स्थापना केली. रामचंद्र हे श्री  श्रीरामकृष्णांच्या सहवासात सर्वात आधी आलेले. इथे पुढे समाधी व छोटे मंदिर उभे राहिले. रामकृष्ण संघाने १९४३ साली ते ताब्यात घेतले आणि तिथे आज रामकृष्णमठ उभा आहे.

हा प्रश्न सुटला. आता काशीपूरचे उद्यानगृह सोडावे लागणार होते. श्रीरामकृष्णांना उपचार चालू असताना कलकत्त्या जवळच एक शांत, एकांत आणि गर्दीपासून दूर अशा गोपालचंद्र घोष यांच्या हवेशीर उद्यानगृहात हलवले होते. महिना ऐंशी रुपये भाडे होते. ते सुरेन्द्रनाथ भरत होते. श्रीरामकृष्णांचे  अखेरचे पर्व इथेच संपले होते. इथेच अनेक महत्वाच्या घटना घडामोडी घडल्या होत्या. काशीपूरचे हे उद्यानगृह खाली केल्यावर सर्व शिष्य इकडे तिकडे पांगले, शिष्यांच्या समोर आता बिकट परिस्थिति निर्माण झाली होती.

गुरूंच्या महासमाधी नंतर महिन्याभारतच सुरेन्द्रनाथांना गुरूंचा दृष्टान्त झाला की, रामकृष्ण म्हणतात, “ माझी मुलं तिकडं रस्त्यावर वणवण करताहेत आधी त्यांची काहीतरी व्यवस्था कर”. ते तत्काळ  उठून नरेंद्र नाथांना भेटायला आले आणि हे त्यांना सांगितले. आणि त्यावरील उपाय म्हणून तुम्ही एक भाड्याची जागा बघा आणि तिथे सारे शिष्य एकत्र राहू शकाल. आम्ही गृहस्थाश्रमीशिष्य इथे अधूनमधून येत राहू. काशीपूरला मी काही रक्कम मदत म्हणून देत होतो ती इथे देईन. जेवणाचा प्रश्न नव्हता भिक्षा च मागणार होते सर्व.

वराहनगर मधली भुवन दत्त यांची एक जुनी पुराणी मोडकळीस आलेली वास्तु अकरा रुपये भाड्याने मिळाली. नरेंद्र नाथांबरोबर इतर शिष्य तिथे राहू लागले. तळमजला खचलेला, गवत वाढलेले, उंदीर, घुशी, साप आजूबाजूला. डासांचे साम्राज्य, भिंतीचे खपले निघालेल्या अवस्थेत, झोपण्यासाठी चटया आणि उश्या, भिंतीवर देवदेवतांची चित्रं, येशुचे ही चित्रं, एका भिंतीवर तानपुरा, झांजा आणि मृदंग अशी वाद्ये. त्याच खोलीत धर्म, तत्वज्ञान, व इतिहास यावरील शंभर ग्रंथ पलंगावर ठेवलेले,

अशी सर्व दुर्दशा असूनही नरेंद्रनाथांना त्यांच्या गुरुबंधुना ही जागा पसंत होती. कोणाचाही त्रास न होता आपली साधना निर्वेधपणे करता येईल याचाच त्यांना आनंद होता. पुढे पुढे मठातील संख्या वाढली तसे सुरेन्द्र नाथ ३० रुपये ते चाळीस, पन्नास, शंभर अशी वाढवून रक्कम देत होते, ते अगदी हयात असे पर्यन्त. त्यामुळे नरेंद्रनाथांना व्यवस्था करणे सोपे गेले. हाच तो वराहनगर मठ. नरेंद्र आणि गुरुबंधु यांनी कठीण प्रसंगातून जिद्दीने, कठोर तपश्चर्या  केली आणि सुरेन्द्रनाथांनी रोजच्या गरजाही भागविल्या म्हणून हा मठ उभा राहिला. विवेकानंदांनी याची आठवण सांगतांना म्हटलंय, “परिस्थिति जितकी प्रतिकूल असेल तितकी तुमच्या आंतरिक शक्तींना अधिक जाग येत असते”.

वराहनगर मठात पुजागृहात श्रीरामकृष्ण यांची प्रतिमा ठेवली होती, रोज यथासांग पुजा होत होती. आरती,भजन, नामसंकीर्तन रोज होई. एक दिवस नरेंद्रच्या मनात आलं, ‘आपण सर्वांनी विधिपूर्वक संन्यास घ्यावा. तशी श्रीरामकृष्ण यांनी दीक्षा दिलीच होती. पण परंपरागत धार्मिक विधींची जोड दिली तर एक अधिष्ठान लाभेल असं त्यांना वाटत होतं. येथवरचं आयुष्य पुसलं जाईल आणि सर्वांच्या मनावर संन्यासव्रताचा संस्कार होईल’. 

दिवस ठरवला. सर्व गुरुबंधू एक दिवस गंगेवर स्नान करून आले, श्रीरामकृष्णांच्या प्रतिमेची    नेहमीप्रमाणे पुजा करून, आवारातील बेलाच्या झाडाखाली विधिपूर्वक विरजाहोम करण्यात आला.  होमकुंडातील पवित्र अग्नीची आहुती संपली. विधी पूर्ण झाल्यावर, नरेन्द्रनाथांनी राखालला ब्रम्हानंद , बाबूरामला प्रेमानंद, शशिला रामकृष्णानंद, शरदला सारदानंद, निरंजनला निरंजनानंद, कालीला अभेदानंद, सारदाप्रसन्नला त्रिगुणतीतानंद, अशी नावे दिली. तारक आणि थोरला गोपाल यांना काही दिवसांनंतर शिवानंद आणि अद्वैतानंद अशी नावं दिली.

लाटू आणि योगेन्द्र यांना नंतर अद्भुतानंद, आणि योगानंद तर, हरी यांना तुरीयानंद अशी नावे देण्यात आली. हिमालयतून परत आल्यावर गंगाधरला अखंडांनंद हे नाव दिलं. सुबोध यांना सुबोधानंद ,हरिप्रसन्न यांना विज्ञानानंद शशीला रामकृष्णानंद आणि स्वताला विविदिशानंद हे नाव घेतले. पण अज्ञात संन्यासी म्हणून भ्रमण करत असताना नरेन्द्रने विवेकानंद आणि सच्चिदानंद अशी नावे घेतली होती त्यातले अमेरिकेला जाण्यासाठी भारताचा किनारा सोडताना त्यांनी १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले आणि हेच नाव पुढे विख्यात झालं. एखादी संस्था, संघटना किंवा संघ उभा करायचा, त्याचा प्रचार करायचा, तेही अनेकांना सोबत घेऊन. हे काम किती कठीण असतं ते या वरून लक्षात येईल.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात इयत्ता सातवीत असलेली शांताबाई शेळकेंची ही कविता मला खूप खूप आवडायची. नुसती आवडायचीच नाही तर एक अनामिक हुरहूरही लावून जायची.

लहान मुलांचे एक वेगळेच भावविश्व असते. या भावविश्वात त्यांनी काय काय जपलेले असते!काही समज, भुतांच्या गोष्टी, राजाराणी, परीच्या, राक्षसाच्या गोष्टी, त्यांची खेळणी अन कल्पनाविश्वे !आपण त्यांच्या भावविश्वात डोकावले तर बरेच काही उमगत जाते.

खेळणी त्यांची जिवलग असतात विशेषतः बाहुले, टेडी, बाहुल्या. बाहुलीविना कुठल्याच मुलीचं बाल्य नसेल;अगदी विकतची सुंदर आखीव रेखीव नसेल पण कापडाच्या चिंध्याची घरात शिवलेली का असेना!पण बाहुली असतेच. आपल्या दृष्टीने निर्जीव असलेली खेळणी लहान मुलांना मात्र सजीव असतात. ते त्यांच्याशी बोलतात, भांडतात, परत जवळ घेतात, न्हाऊ माखू घालतात, त्याला सतत आपल्या जवळ ठेवतात, ते जिथं जातील, सोबत घेऊन जातात.

अशीच एक सुंदरशी बाहुली कवयीत्रीला पण लहानपणी आवडायची. दुसऱ्या पण बाहुल्या होत्या तिच्याकडे पण ही खास होती कारण ती अतिशय सुंदर आणि आकर्षक देखील होती.

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख

अशी ती लाखात एक होती. पुढे कवयित्री तिच्या सुंदर रूपाचे वर्णन करते.

किती गोरे गोरे गाल गुलाबी फुलले

हसते नाचते केस सुंदर कुरळे

टपोऱ्या गुलांबाप्रमाणे गोबरे गाल, सुंदर कुरळे केस, अंगातला रेशमी लाल झगा अन केसांवर बांधलेली लाल फित अर्थात रिबन यामुळं ती अजूनच देखणी दिसायची. कवयित्री पुढे म्हणते की तिच्याजवळ खूप बाहुल्या होत्या पण तीच माझी अतिशय आवडती बाहुली होती.

एके दिवशी अघटित घडलं बाहुलीचं. बाहुलीला घेऊन कवयित्री माळावर खेळायला गेली असता लपंडाव रंगात आला आणि लपलेली बाहुली काही केल्या मिळेना. उशीर झाल्याने हिरमुसली होऊन ती माघारी घरी आली पण बाहुलीशिवाय तिला चैनच पडेना. ते माळरान आणि बाहुली डोळ्यांपुढं नाचू लागली. मन तिला शोधण्यासाठी धावू लागलं पण शरीराने जाता येईना कारण संततधार पावसाला सुरुवात झाली.

पाऊस उघडल्यावर मात्र ती धावतच बाहुलीच्या शोधात  पळाली. पावसाने सारे रान चिंबले होते आणि ओल्याचिंब गवतावर ती दिसली!

पण हाय !तिची दशा दशा झाली होती.

कुणी गाय तुडवूनी गेली होती तिजला

पाहुनी दशा ती रडूच आले मजला

माळरानावर चरता करता कुण्या गायीने बहुलीला तुडवले होते. तिचे  कुरळे सुंदर केस विस्कटून गेले होते. गोरा गोरा रंग फिका झाला होता. ते भयाण दृश्य पाहून कवयित्रीला रडू आले, मैत्रिणीही चिडवू लागल्या “शी ! काय पण ध्यान!” पण तरीही कवयित्रीने तिला तसेच उचलून हृदयाशी घेतले कारण ती बाहुली तिची लाडकी तर होतीच पण तिच्याशी तिचा अतूट स्नेह, भावना जुळलेल्या होत्या म्हणूनच ती कशीपण असली तरी तिला अतिशय प्रियच  होती.

पण आवडली तशीच मजला राणी

लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

खूपच मनाला भिडणारी ही कविता एक संदेशही नकळत देऊन जाते की जीवापाड जपलेली खेळणी असो, माणसे असो की नाती कोणत्याही परिस्थितीत आपण त्यांना दुरावू देवू नये. सर्वसामान्यपणे मुलं खेळणं खराब झाले की फेकतात, मोडतोड करतात पण कवयित्रीने मात्र असे केले नाही कारण ती बाहुली तिच्या बालविश्वातली सजीवच गोष्ट होती. तिचे भावबंध त्या बाहुलीशी एकरूप झाले होते.

कधी कधी वाटते, लहानपणी खेळण्यांशी खेळुनसुद्धा आपली खेळणी जपून ठेवणारी माणसे पुढे नातीसुद्धा जपत असतील का?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साने गुरुजींचे पुस्तक – शामची आई ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? विविधा ?

☆ साने गुरुजींचे पुस्तक – शामची आई ☆ सौ अंजली दिलीप गोखले

“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”

संपूर्ण मानवतेला एका ओळीत मार्गदर्शन करून काव्य समजावून देणाऱ्या साने गुरुजींना वंदन !

मराठी साहित्या मध्ये साने गुरुजींचे”श्यामची आई” हे पुस्तक म्हणजे मातृ प्रेमाचा मुकुटमणी आहे.

सध्याच्या मतलबी जगामध्ये,निर्मळ मनाची, प्रेमळ , अतिशय संवेदनशील मन असणारी व्यक्ती होऊन गेली असे सांगितले तर पटणे कठीण.पण खरेच मऊ मेणाहुनी द्ददय असणारे होते गुरुजी आणि ते तसे घडले त्यांच्या परमप्रिय मातेमुळे .

कोकणामध्ये गरिबीमध्ये राहून, स्वाभिमानाने , इतरांना मदत करत, कसे जगावे, सर्वांवर प्रेम कसे करावे हे आपल्या आईने कसे शिकवले , कसे घडवले , हे,  गुरुजींनी स्वातंत्र्यासाठी कारावासात असताना सांगितलेल्या कथा म्हणजे पुढे तयार झालेले पुस्तक श्यामची आई .नाशिकच्या तुरुंगात जन्माला आलेले ऋदयस्पर्शी भावनिक बाळ म्हणजे श्यामची आई .तुरुंगातील 42 पैकी 36 रात्री गुरुजींनी आपल्या आईचे सर्वांग सुंदर संस्कार क्षम अंतरंग उलगडून दाखवत सर्वांना अश्रूंनी ओले चिंब भिजवून टाकले .

गुरूजी सांगतात,”आपल्यामध्ये फक्त , प्रेम, दया असून भागत नाही , तर, प्रेम ज्ञान आणि शक्ती हे महत्त्वाचे तीन गुण सुद्धा हवेतच.प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. आपला स्वतःचा हा विकास आईच्या रोजच्या जीवनाच्या अनुभवातून कसा घडत गेला त्या आठवणींचा मधुर ठेवा आपल्याला श्यामची आई मध्ये वाचायला मिळतो.

माणसानी माणसाशी माणसा सम कसे वागावे हे आईनेच त्यांना शिकवले .जात, पात न  मानता, गरीब भुकेल्यालाआपल्याकडे जे अन्न आहे त्यातलाच घास देऊन त्याची भूक कशी भागवावी हे आईने त्यांना कृतीतून शिकवले.

पाय घाण होऊ नयेत म्हणून आईच्या पदराला वरून चालत येणाऱ्या श्यामला आई समजावते,”श्याम,शरीराला घाण लागू नये म्हणून जेवढं जपतोस, तेवढंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो.”धन्य ती माऊली आणि धन्य ती चा सुपुत्र जो हे ऐकतो मानतो आणि मित्रांना ही आवर्जून सांगतो.

आईने श्यामला देवभक्ती देशभक्ति शिकवलीच .  त्याच बरोबर मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला, त्यांच्यावर माया करायलाही .  कष्ट  करायला, काम  करायला, मदत करायला लाजायचे नाही हे श्याम आईकडूनच शिकला .प्रत्येक प्रसंगातून आईने आपल्या मातृ गाथेतून मार्ग दाखवला आणि ते सगळे प्रसंग लक्षात ठेवून आठवणीने तुरुंगामध्ये सोबती ना सांगून मातृ ऋणही श्यामने फेडले .

श्यामची आई हे पुस्तक हृदयाचा ठाव घेणारे आहे .हे पुस्तक वाचून आपोआप डोळे भरून वाहू लागले नाहीत तर ती व्यक्ती खरोखरच पथ्य राहून कठोर मनाची म्हंटली पाहिजे .

आईची शिकवण श्यामच्या श्वासामध्ये मनामध्ये इतकी खोलवर रुजली होती की त्या आठवणींचा वृक्ष पुस्तकाच्या रुपाने झाला .

जीवनातील संस्कारक्षम अंतरंग, प्रेमान, भावपूर्ण स्पर्शानं ओथंबलेले काव्य म्हणजे श्यामची आई.

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्काराचा दीपस्तंभ… साने गुरुजी ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆

श्री गौतम रामराव कांबळे

परिचय

शिक्षण: एम्.ए.(इतिहास), एम्.ए.(समाजशास्त्र), एम् एड्.;बी.जे.,डी.एस.एम्.

साहित्यिक वाटचाल:

  • कोकण मराठी साहित्य संमेलन,चिपळूण,नवोदित कविसंमेलन,वसई;अ.भा.मराठी साहित्य संमेलन,यवतमाळ यात सहभाग.
  • आकाशवाणी रत्नागिरीवरून स्वरचित लोकगीतांचे सादरीकरण
  • दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रम निर्मिती सहकार्य आणि भारत निर्माण माहितीपटात भूमिका.
  • विविध दैनिके,साप्ताहिके,दिवाळी अंक यातून सातत्याने लेखन.

पुरस्कार:

  • काव्यशिल्प पुरस्कार,जनसेवा ग्रंथालय,रत्नागिरी.
  • राज्यस्तरीय विशेष सन्मान,फ्रेंड सर्कल,पुणे
  • मिरज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, 2000 व 2002साठी.
  • जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.म.रा.मा. शिक्षक संघटना.
  • नेशन बिल्डर ॲवाॅर्ड,इंनरव्हिल  क्लब ऑफ सांगली, 2017.
  • जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,रोटरी क्लब,सांगली 2018.
  • कवीभूषण पुरस्कार,नांदेड.
  • ‘गंध सोनचाफी’  कवितासंग्रह प्रकाशित. तीन पुरस्कार प्राप्त.

?विविधा ?

☆ संस्काराचा दीपस्तंभ… साने गुरुजी ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆

साने गुरुजी हे नाव जरी उच्चारलं तरी आठवते ती आईची ममता. गाईचं वात्सल्य. आपल्या साध्या सोप्या ओघवत्या वाणीतून संस्काराचा झरा आजही साने गुरुजींच्या साहित्यातून अलगद झुळझुळत राहिला आहे.

ज्याने ज्याने साने गुरुजींचे साहित्य वाचले आणि तो हळवा झाला नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.

खरा धर्म असतो तरी काय? हे साने गुरुजी आपल्या गीतात सांगतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ धर्माच्या नावाखाली चाललेल्या ओंगळपणाला किती सुंदर उत्तर दिलंय गुरुजीनी! जे रंजले गांजलेले, दीन दुबळे आहेत अशांना मदतीचा हात द्यावा. हे गांधीवादी तत्त्वज्ञान गुरुजी अलगदपणे सांगतात.

शिक्षक म्हणून काम करताना केवळ विद्यार्थीच नाही तर समाजशिक्षण देण्याचं कार्य साने गुरुजीनी केलं आहे.

‘शामची आई’ हे गुरुजींचं पुस्तक तर संस्काराचा अनमोल ठेवा आहे.

केवळ उक्ती करून बसायचे नाही. तर ते कृतीतही आणावे लागते. याचे उदाहरण म्हणजे गुरुजींचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह. सर्व परमेश्वराचीच लेकरे असतील तर त्या परमेश्वराचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला अस्पृश्यतेच्या नावाखाली का नकार असावा? हा प्रश्न त्या सत्याग्रहात होता. अतिशय शांतपणे, अहिंसक मार्गाने गुरुजीनी हा लढा दिला होता. मेणाहून मऊ हृदय असणारी माणसं सत्यासाठी वज्राहून कठीण होऊ शकतात. व तेही समाजास्वास्थ्य बिघडू न देता. हे गुरुजीनी दाखवून दिले.

गुरुजीनी माणसावर प्रेम तर केलंच; पण झाडे, वेली, निसर्ग, पशु पक्षी यांच्या मनाचा ठाव घेताना त्यांच्याही मातेचं स्थान त्यांनी प्राप्त केलं.

साने गुरुजींची शिकवण प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरते.

मुलांच्या बाबतीत साने गुरुजी खूप हळवे होते. ‘मुलं ही देवाघरची फुलं’ आहेत. असं त्यांचं मत होत होतं. ती फुलं सतत हसती खेळती, टवटवीत असावीत यासाठी ते धडपडत. त्यासाठी  त्यांच्याकरिता गाणी गोष्टी ते लिहायचे. आनंदाबरोबरच त्यांच्यावर संस्कार व्हावेत हाही हेतू असायचा.

या निमित्ताने मला एक प्रसंग आठवतो.

      आपली शाळा सुंदर असावी. झाडा फुलांनी बहरलेली असावी. त्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट असावा. असं वाटायचं.

योगायोगाने शाळेत झाडा फुलांवर अतिशय प्रेम करणाऱ्या एक बाई, विजयादेवी पाटील बदलीने आल्या. त्या मलाच पहिलीला शिकवायला होत्या.  आम्ही खूप वेगवेगळ्या  फूलझाडे लावली. सुंदर फुले डोलू लागली. नंतर त्या गावातील लोक बाईना फुलांची आई म्हणू लागले. पण, शाळेला कसलेच कुंपण नव्हते. लहान मुलांना तर फुलांचे आकर्षण असते. फुले तोडल्याने ती झाडे निस्तेज वाटायची.

त्या वेळी सानेगुरुजींच्या एका संस्कार कथेनं आधार दिला.

पाठ्यपुस्तकातच ती कथा होती. शामची आई या संग्रहातली.

त्याचा सारांश होता, शाम एकदा फुलझाडावरच्या कळ्या तोडून आणतो. त्यावेळी आई त्याला सांगते, ‘बाळ, कळ्या म्हणजे वेलीची बाळे असतात. आणि ती बाळे आईच्या मांडीवरच सुरक्षीत असतात. त्या बाळाला आईच्या मांडीवरुन तोडून दूर नेले तर ती रडतील. कोमेजतील.’

याचा संदर्भ घेऊन  आपल्या बाबतीत असे घडले तर चालेल का? असे वारंवार विचारून मुलांच्यात बदल घडवला. आजही त्या शाळेतील मुलेच काय, पालकही फुलांना हात लावत नाहीत. ही जादू आहे साने गुरुजींच्या संस्काराची.

साने गुरुजींचे विचार, संस्कार माणसाला मानवतेकडे नेण्यासाठी एखाद्या दीप स्तंभासारखे चीरकाल मार्गदर्शन करत राहणार आहेत.

© श्री गौतम रामराव कांबळे

शामरावनगर,सांगली.

9421222834

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मौल्यवान पण दुर्लक्षित’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘मौल्यवान पण दुर्लक्षित’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

संवादाचे एक माध्यम ही वाणीची ओळख परिपूर्ण ठरणारी नाही.तिची घडवण्याइतकीच बिघडवण्याची शक्ती जाणून घेऊन तिचा योग्य पध्दतीने वापर करणे अगत्याचे आहे असे मला वाटते.कुठे,कसे,किती बोलायचे आणि कुठे मौन पाळायचे यावरच वाणीद्वारे संवाद साधला जाणार की विसंवाद वाढणार हे अवलंबून असते.

वाणी माणसे जोडते तशीच तोडतेही.एखादे काम सुकर करते तसेच कठीणही.वाणी मन प्रसन्न करते आणि निराशही.ती आनंद देते कधी दु:खही.पण तिच्या या चांगल्या किंवा वाईट देण्याघेण्याच्या बाबतीत ती परस्वाधीनच असते.कारण तिचा वापर करणारे ‘आपण’ असतो ‘ती’ नाही.

मात्र या सगळ्याचे या आधी अनेकांच्या लेखनात सविस्तर विवेचन झालेले असल्याने या विषयाच्या एका वेगळ्यादृष्टीने महत्त्वाच्या कंगोऱ्याबाबत प्रामुख्याने आवर्जून कांही सांगायचा मी प्रयत्न करतो.

‘वाणी’ हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे हे वाचताना थोडं अतिशयोक्तीचं वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे.

विविध घटकांनी बनलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वातला ‘चेहरा’ सर्वसाधारणपणे काळजीपूर्वक जपला जातो कारण आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं दिसण्यासाठी आपला चेहराच महत्त्वाचा आहे असाच सर्वसाधारण समज असतो. त्यासाठी मुद्दाम वेळ काढून, भरपूर खर्च करून आपला चेहरा सतत ताजातवाना, टवटवीत राहिल, तो चांगला दिसेल याबाबत सर्वजणच दक्ष असतात.पण आपली वाणी म्हणजेच आपला आवाजसुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वातले तितकेच महत्वपूर्ण अंग आहे याबद्दल बरेच जण अनभिज्ञ असतात. त्यामुळे वाणीतील दोष आपल्या आकर्षक आणि रुबाबदार व्यक्तिमत्वावर क्षणार्धात नकारात्मक परिणाम करणारे ठरू शकतात याचा फारसा कुणी गंभीरपणे विचार करीत नाही. त्यामुळे अर्थातच ते दोष दूर करण्याच्या दृष्टीने कुणी फारसे प्रयत्नशीलही नसतात.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या परिपूर्णतेत, सौंदर्यात तिच्या वाणीचेही खास महत्त्व आहे.किंबहुना  चेहऱ्यापेक्षाही कणभर जास्तच. व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न, उमदं आणि चेहरा हसतमुख सुंदर असणारी व्यक्ती समोर येताच प्रथमदर्शनी आपण प्रभावित होतो खरे,पण त्या रुबाबदार व्यक्तीच्या वाणीत कांही दोष असतील तर तिने बोलायला तोंड उघडताच आपला विरस होतो.प्रथमदर्शनी निर्माण झालेला आपल्यावरील त्या व्यक्तीचा प्रभाव भ्रमनिरास व्हावा तसा क्षणार्धात विरून जातो.याचप्रमाणे सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व असणारी,क्वचित कधी कुरुप असणारी एखादी व्यक्तीही केवळ तिच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणीमुळे आपले लक्ष वेधून घेते.फोनवरचा कर्कश्श आवाज ऐकताच आपल्या कपाळावर नकळत आठी उमटते. तोच आवाज जर स्वच्छ, स्पष्ट, लाघवी असेल तर आपल्याला ती व्यक्ती पूर्वी कधीही प्रत्यक्ष भेटलेली नसली तरी तिचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते.अर्थातच इथे तिच्या वाणीच्या गुणवत्तेला तिच्या बोलण्याची पध्दत,त्यातील आदरभाव,मुद्देसूदपणा, लाघव या गोष्टीही पूरक ठरत असतात. यावरुन आपल्या वाणीचे, आवाजाचे आपल्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीतले महत्त्व समजून येईल.

गायक-गायिका, निवेदक, शिक्षक,वकील,विक्रेते अशा विविध व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत वाणीची गुणवत्ता महत्त्वाची असतेच.किंबहुना आवाजाची जाणिवपूर्वक केलेली सुयोग्य घडण ही या़च्याच बाबतीत नाही फक्त तर इतर सर्वांच्याच बाबतीतही तितकीच अत्यावश्यक बाब ठरते‌.

निसर्गत:च आपल्याला लाभलेली स्वरयंत्राची देणगी हे आपले स्वरवाद्यच.मग ते बेसूर वाजणार नाही याची काळजीही आपणच घ्यायला हवी हे ओघाने आलेच.

स्वरयंत्राची रचना आणि कार्यपध्दती याची सर्व शास्त्रीय माहिती आवर्जून करुन घेणे ही आवाजाची निगा राखण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणता येईल.त्यानंतर गाण्यासाठी असो वा बोलण्यासाठी हे स्वरवाद्य परिपूर्ण करुन ते सतत कार्यक्षम ठेवणे गरजेचे आहे.त्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे ॐकाराचा नियमबद्ध रियाज ! इथे ॐकाराचा सरधोपट उच्चार कुचकामी ठरतो.तो नेमका कसा,कधी आणि किती करावा हे जाणकारांकडून समजून घेऊन अंमलात आणणे अगत्याचे आहे.परिपूर्ण आवाज आणि निर्दोष वाणीसाठी ॐकार साधना आणि ॐकार प्राणायाम यांचं प्रशिक्षण देणारी माध्यमेही आज उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग मात्र करुन घ्यायला हवा. शब्दस्वरातील स्पष्टता, दमश्वास वाढणे,आवाज मुलायम,वजनदार होणे,बोलण्यात किंवा गाण्यात सहजता येणे,वाणी शुध्द होणे, बोबडेपणा, तोतरेपणा यासारखे वाणीदोष नाहीसे होणे, आवाजातली थरथर दूर होऊन आवाज मोकळा होणे असे अनेक फायदे या ॐकार साधनेमुळे मिळवणे सहजशक्य आहे. त्यासाठी चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व मात्र जाणवायला हवे.परिपूर्ण निर्दोष वाणी ही फक्त विशिष्ट व्यवसाय व कलांच्या बाबतीतच आवश्यक असते हा एक गैरसमज आहे.आपले व्यक्तिमत्त्व सर्वांगसुंदर आणि निर्दोष होण्यासाठी ती सर्वांसाठीच तेवढीच आवश्यक आहे.

कर्णबधीर किंवा मुक्या व्यक्ती त्यांच्यातल्या व्यंगामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीशी सतत संघर्ष करीत जशा स्वयंपूर्ण होतात तसेच त्या व्यक्तींकडे पाहिले की आपल्याला सहजपणे उपलब्ध झालेल्या वाणीची देणगी किती मोलाची आहे हेही आपल्याला नव्याने समजते.त्या मौल्यवान वाणीची योग्य निगा राखली तरच ते मोल मातीमोल होणार नाही हे मात्र विसरुन चालणार नाही.

आपण पैसे मिळवण्यासाठी अपार कष्ट करतो.आपला आवाज हेही आपले मौल्यवान असे आरोग्या’धन’च तर आहे.ते सहज उपलब्ध झालेय म्हणून त्याकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? ते मोलाचे धन आपणच जाणिवपूर्वक जपायला हवे !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares