मराठी साहित्य – विविधा ☆ मी करवली उमेची..! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

?विविधा ?

🍃 मी करवली उमेची..! 🍃 सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

`गुढीपाडव्याची म्हणजे नववर्षाच्या प्रथम दिनाची तयारी करत असतांनाच नेहमीच माझ्या मनात वाजंत्री वाजू लागतात. कशाची म्हणाल तर, माझ्या बहिणीच्यालग्नाची.. . उमेची.. . श्रीपार्वतीदेवीच्या लग्नाची.. ! कारण पण मी करवली आहे तिची.

साताऱ्या जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळ गांव. शिव पार्वती हे माझ्या माहेरचे कुलदैवत. उंच डोंगरावर, भक्कम, दगडांच, हेमाडपंथी, सुरेख गोपुरे,उंच शिखर, कळस,असं शिल्पाकृतींनी नटलेलं महादेवाचं मंदिर हे वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आहे. गाभा-यात शिवपार्वतीच्या दोन शाळुंका (पिंडी)आहेत. सभामंडपातील खांब व मूर्ती सुरेख आहेत. डोंगरउतारावरअमृतेश्वर,मंदिरआहे. ,आजूबाजूला उतारावरच गाव वसलं आहे.

माझं माहेरचं आडनाव जिराईतखाने. पार्वती कडून मानकरी. तेथील बडवे पुजारी हे शंकराकडून मानकरी जंगम म्हणजे शैव.. हेही  देवस्थानच्या मानकऱ्यांपैकी एक. चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती ला लग्नाच्या हळदी लागतात याच रात्री वाड्यावर ताशा वाजंत्री शिंग फुंकत देवस्थानचे सेवेकरी भालदार चोपदार गावातील प्रतिष्ठित हळदीच मानाच बोलावं पण करण्यासाठी आमच्या वाड्यावर येत. मग पुरुष मंडळी सर्वांसह देवळाकडे निघत. हे सर्व अनुभवताना आनंद भक्तिनं मनं भरून येतात.  लहानपणी मी आमच्या दादांना (वडिलांना) सोवळं नेसून असं मानानं जाताना, त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती मिश्रित तेज पाहिलं आहे. हळद लावण्याचा पहिला मान आमचा नंतर मानाप्रमाणे सर्वजण व भक्तगण हळद लावतात. सगळीकडे `हर हर महादेव ʼचा गजर होत असतो. ही वेळ रात्री बाराची. भक्तगण नुसते पळत ही वेळ गाठतात यानंतर रोज  धार्मिक विधी असतात. मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिर यांच्या कळसाला हात मागाचा कापडी शेला दोन टोकांनी दोन बाजूंनी बांधतात. त्याला ध्वज असे म्हणतात. ध्वज विणणारा एक मानकरी आहे  रात्रीच्या वेळी ध्वज खाली न टेकवता भक्तीभावाने कुशलतेने करतात. चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शिवपार्वती चे लग्न लागतं. मुलीचे बाजू असूनही आमच्या घराण्याला मान आहे. सारीपाटात हरल्यावर शंकर रुसून या डोंगरावर आले तेव्हा भिल्लिणीच्या रुपात आलेल्या पार्वतीवर, शंकरांनी मोहित होऊन त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली पार्वतीने बरेच आढेवेढे घेतले अशी आख्ययिका आहे. यामुळे कदाचित तिची बाजू मानाची असावी. आम्हाला तो मान मिळाला नाहीतर वधू पक्षाला एवढा कुठला हो मान?

नवमीला भंडारा असतो त्यावेळी पंक्तीत उदक सोडण्याचा मान असतो. दशमीला कवडी घराण्याचा पुरुष घोड्यावरुन तळ्यापासून सर्व दगडी ,पायर्‍यांना कमानी ना पार करून देवदर्शनाला जातो त्यालाही भालदार चोपदारांचा मानअसतो. एकादशीला सासवडहूनʼ तेल्या भुत्याʼ आडनावाच्या भक्तांची,कावड येते. प्रचंड मोठी जडशीळ कावड आणि त्याला मोठी भगवी निशाण आणि पाण्यानं भरलेलं तांब्यांचे मोठे रांजण भक्तीभावाने चिंब होऊन वाटेत कुठेही न टेकवता अखंड चालत हे भक्त मुंगी घाटातून वर मंदिरात येतात खडकाळ डोंगराचा उंच,  खडा कडाच,भक्तीची परीक्षा घेतो असं वाटतं. वाटेत, सावलीला झाड नाही. भर उन्हाचा चटका, अशा स्थितीत खांद्यावर कावड घेऊन येणं केवळ अवघडच. तोंडानं अखंडʼ हर हर महादेव `ही गर्जना ,धावाही अन् असह्य झालं कि,चक्क`  महाद्या`अशा आपुलकिच्या-हक्काच्या आरोळ्याही. !भक्तांची सगळी जत्रा दिवसभर उन्हातान्हात त्या डोंगर माथ्यावर जमलेली असते सायंकाळी महादेवावर कावडीतल्या,पाण्याचा अभिषेक होतो.

लाखांच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी धावतात शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळी पिंडीवर चांदीचे सुरेख मुखवटे चढवून मुंडावळ्या बांधतात. बाहेरच्या पटांगणात बाजूला होम हवन होतं. पालखी फिरवतात सगळीकडे आनंदाचा ,भक्तीचा जल्लोष आणि `हर हर महादेव ʼची देवाला हाक. ! हा आनंद सोहळा मी लग्नानंतर एकदाच अनुभवला. त्याला आता साठ वर्ष पूर्ण झाली. इतर जत्रा आणि प्रमाणे इथंही दुकान ,सिनेमा इत्यादींची रेलचेल असते. पण आम्हाला पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या विवाह सोहळ्याचं अप्रूप! माझे आजोबा व नंतर आमचे वडील दादा त्यावेळी आवर्जून जात असत. पण सेवानिवृत्तीनंतर व वयोमानाने त्यांना नंतर जमत नसे आता तेथील नातेवाईक यात सहभागी होतात. कधी भाऊही जातात. शिंगणापूर प्रमाणेच माहेर घरी,घाणा भरणे,हळद दळणे,फराळाचे लाडू,इ. पदार्थ, रुखवताचे, डाळं,-शेंगादाणे-चुरमु-याचे लाडू,देवाला हळद लावणे,लग्न असा सोहळा होत असे. भाऊही करतात. म्हणूनच म्हटलं.. “मी करवली आहे, उमेची.. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

ऐसे दास्यत्व पत्करावे !

हनुमान म्हणजे रामरायाचा दास! प्रभुरामाच्या चरणी अगदी लीनतेनं बसणारा… आज्ञाधारक, बुद्धिमान, चपळ, साहसी अशी अनेक विशेषणं ल्यायलेला… याच हनुमानाची एक गोष्ट ऐकली जिनं त्याचं महत्त्व माझ्या मनावर बिंबवलं, त्याच्या उपासनेसाठी प्रवृत्त केलं. कीर्तनकार बुवा म्हणाले … हनुमानचं कर्तृत्व इतकं मोठं की त्यानं लक्ष्मणाप्रमाणेच रामाच्या शेजारी असायला हवं. तरीही तो पायाशीच… का… तर दास म्हणून नव्हे; प्रभुश्रीराम म्हणतात की जो कुणी माझ्याकडे मागणं किंवा गाऱ्हाणं सांगताना नतमस्तक होईल. त्याची नजर आधी माझ्या पायाशी असणाऱ्या या धर्मवीर, कर्तव्यदक्ष हनुमंताकडे जाईल. त्यानं हनुमंताची आराधना करावी. तोच तुमचं मागणं मनोवेगे माझ्यापर्यंत पोहोचवेल. दुसऱ्याच्या दुखाःशी समरस होण्यासाठीची भावोत्कटता हनुमानाजवळ प्रचंड आहे. त्यामुळे शक्य झालं तर तोच तुमचं मागणं पूर्ण करेल.’ हे ऐकताच मन हनुमाच्या विचारांत गुरफटलं… खुद्द रामानेच असं म्हणल्यावर हनुमानाशी जरा जास्तच गट्टी झाली.

दास्यत्व पत्करणं या शब्दाला आपल्याकडे एका संकुचित दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. पण मनुष्याच्या प्रगतीसाठी दास्यत्व किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हनुमानासारखं अद्वितीय उदाहरण नाही. 

पुढे कळतेपणी या सगळ्याबद्दल वेगळीच जाणीव झाली. हेच राम आणि हनुमंत वेगवेगळ्या रूपांत दिसू लागले. ‘मन’ म्हणजे हनुमंत आणि ‘बुद्धी’ म्हणजे राम. थोडक्यात बुद्धीपुढं मनानं नतमस्तक व्हावं. कुणीही कितीही नाकारलं तरी आपल्या मनाचे आपण दास असतो हे शंभर टक्के खरं. बुद्धी नेहमी योग्य-अयोग्य जाणून आपल्याला तसा सल्ला देते पण मन… वाहवत जातं… बुद्धीला आततायीपणानं प्रत्युत्तर देतं आणि पस्तावतं. या पस्तावणाऱ्या मनानं हनुमानाचा आदर्श ठेवावा. बुद्धीरुपी रामाचं वेळीच महात्म्य जाणावं. मन चंचल पण सामर्थ्यवान… तर बुद्धी सखोल पण अविचल… आणि जेव्हा या दोन्ही परस्परपूरक गोष्टी एकत्र येऊन काही कार्य घडतं तेव्हा हमखास यश मिळतंच.

अलीकडे तर मन आणि बुद्धी यांची फारच ताटातूट होत आहे. भवताल अस्वस्थ… अनपेक्षित घटनांनी भरलेला… त्यावर कसं व्यक्त व्हावं, त्याच्याशी कसा सामना करावा हे कळणं आकलनापलीकडलं. त्यामुळे मनाची चंचलता इतकी वाढली की बुद्धीलाही भ्रम व्हावा. अशावेळी मनानं दास्यत्व पत्करावं. स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून तिला सहकार्य करावं. कारण संकट येतं ते मनाच्या कमकुवतपणामुळे आणि परतवलं जातं तेही मन कणखर झाल्यावरच. जिथं राम आणि हनुमान एक होऊन लढतात तिथं संकट एकटं असो की दशमुखी त्याचा नाश होणारच. म्हणूनच या भवतालातून तारून जाण्यासाठी हनुमानाची उपासना करावी. कारण जिथं रावण नसेल तिथं प्रभूराम असेलच असं नाही पण जिथं भक्त हनुमान असेल तिथं प्रभूराम असणारच.

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।

वातात्मजं वानरयुथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(शर्ववर्मा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,” महाराज मी तुम्हाला सहा महिन्यात संस्कृत व्याकरण शिकवू शकेन. “) आता पुढे….

गुणाढ्याला ही गोष्ट अशक्य वाटली. त्याने मोठ्या हिरीरीने पैज लावली, “शर्ववर्माने जर  सहा महिन्यात राजाला संस्कृत व्याकरण शिकवून दाखवले  तर मी संस्कृत,पाली प्राकृत या तिन्ही भाषांचा त्याग करेन. “त्याच्या पैजेला उत्तर म्हणून शर्ववर्मा म्हणाला,”जर मी असे करू शकलो नाही तर पुढची बारा वर्षे डोक्यावर तुझ्या पादुका धारण करून वावरेन. “

….आता पैज जिंकणे ही मोठ्या प्रतिष्ठेची बाब झाली. शर्ववर्मा कुमारस्वामींकडून कातंत्र व्याकरण शिकला होता. हेच ते रोजच्या बोलचालीत उपयोगी पडणारे व्यावहारिक  व्याकरण… त्याच्या सहाय्याने त्याने खरोखरच सहा महिन्यात राजाला असे व्याकरण शिकवले की राजाला यापुढे कोणासमोरही बोलताना लज्जित व्हावे लागणार नव्हते.  

राजाचाआनंद गगनात मावेनासा झाला. खूप धनदौलत देऊन त्याने  शर्ववर्माची पूजा केली आणि त्याला नर्मदा तटावरील भृगुकच्छ (भडोच)देशाचा राजा घोषित केले.

मात्र जलक्रीडा प्रसंग… आणि ओघाने आलेला हा पैजेत हरण्याचा प्रसंग… दोन्हीही गुणाढ्याच्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.त्यामुळे त्याच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलून गेली. त्याचा वाईट काळ सुरू झाला. कबूल केल्याप्रमाणे त्याने संस्कृत, पाली,प्राकृत भाषेचा त्याग केला. मौन धारण करून विंध्य पर्वतावर जाऊन   त्याने देवी विंध्यवासिनीच्या पूजाअर्चनेत स्वतःला गुंतवून घेतले. कालांतराने तेथील वन-वासीयांकडून तो पैशाची भाषा शिकला. पैशाची भाषा हा प्राकृत भाषेचा उपभेद होता.

गुणाढ्याने तेथे बड्डकहेची (बृहत्कथा)रचना केली. सात वर्षात अथक प्रयास करून सात लाख छंदात त्याने ती लिहून काढली. तीही पैशाची भाषेत! त्यामुळे ती बृहत्कथे ऐवजी बड्डकहा!

विंध्याद्रीच्या घनदाट अरण्यात शाई किंवा भुजपत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनस्वी गुणाढ्याने मृतप्राण्यांच्या कातड्यावर स्वतःच्या रक्ताची शाई करून ही विशाल कथा लिहिली. लिहिता लिहिता गुणाढ्य ती वाचत असे. ती ऐकण्यासारखी तेथे सिद्ध विद्याधरांचा मेळावा जमा होई. त्यातील गुणदेव आणि नंदी देव हे दोघे त्याचे शिष्य झाले. सात वर्षांनी जेव्हा बृहत्कथा लिहून पूर्ण झाली तेव्हा त्याचा प्रचार प्रसार कसा करावा हा प्रश्न गुणाढ्याला भेडसावत होता. त्याच्या शिष्यांच्या मतानुसार फक्त सातवाहन नरेश सारखा योग्य व्यक्तीच या कथेचा प्रसार करू शकला असता. त्यालाही हा सल्ला आवडला. त्याप्रमाणे दोघे शिष्य राजधानीत राजदरबारी जाऊन पोहोचले. त्यांनी गुणाढ्याच्या कृतीवर सविस्तर माहिती पुरवली. पण सात लाख श्लोकांची इतकी मोठी पोथी… पोथी नव्हे पोथाच….तोही  प्राण्यांच्या कातड्यावर … निरस अशा पैशाची भाषेत आणि मनुष्याच्या रक्ताने लिहिलेला!राजाने त्या कृतीकडे पाहण्याचे ही टाळले. अपमान करून त्याने गुणाढ्याच्या शिष्यांना परत पाठवले.

या प्रकारामुळे कवी गुणाढ्य अतिशय दुःखी झाला. जवळच्या एका टेकडीवर त्याने अग्निकुंड तयार केले.उंच उंच उठणाऱ्या ज्वालात आपल्या महान कलाकृतीचे एकेक पान वाचून तो अर्पण करत गेला. त्या श्लोक पठणात इतके  माधुर्य होते की अवतीभोवती वनात राहणारे प्राणी,पशू-पक्षी जमा झाले. एकेक पान अग्निकुंडात जळून जात होते… शिष्य डोळ्यात पाणी आणून हे दृश्य बघत होते ….पशुपक्षी खाण्यापिण्याची शुद्ध हरपून स्तब्ध होऊन डोळ्यात पाणी आणून बृहत्कथा श्रवण करत होते.

इकडे राजवाड्यात सामिष भोजनासाठी चांगले मास उपलब्ध होईना. कारण सारे पशुपक्षी निराहार राहिल्याने हाडे-काडे होऊन गेले होते. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी विचारपूस, तपास सुरू झाला. त्यामुळे राजाला गुणाढ्य करीत असलेल्या काव्य-कथा हवनाची माहिती मिळाली. राजदरबारात घडलेला प्रकार राजाला आठवला. त्याला पश्चाताप झाला.

आपली चूक सुधारण्यासाठी तो ताबडतोब अरण्यात गेला. त्याला काहीही करून गुणाढ्याला व बड्डकहेला वाचवायचे होते. राजाने साष्टांग दंडवत घालून त्याची माफी मागितली. खूप अनुनय विनवण्यानंतर गुणाढ्याने आपले लेखन अग्नीत अर्पण करायचे थांबवले. पण….तोपर्यंत कथेचा एक सप्तमांश भाग….एक लाख श्लोकच शिल्लक राहिले होते.राजा त्याच्या प्रसार,प्रचाराचे आश्वासन देऊन त्याला त्याच्या अमूल्य वाड़मयाला सन्मानपूर्वक

 आपल्या राजधानीत घेऊन आला.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

इसवी सन पूर्व दोनशे ते तीनशे असा कालखंड … त्यावेळी विंध्य पर्वताच्या दक्षिणेस म्हणजेच साधारण हल्लीचा गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा भाग….त्या काळात तेथे सातवाहन वंशाचे राज्य होते. तर त्यापैकी एका सातवाहन राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही कहाणी आहे. प्रतिष्ठान( पैठण)प्रदेशात एक छोटेसे गाव होते सुप्रतिष्ठित….तेथे सोमनाथ शर्मा नावाचे एक विद्वान पंडित राहत असत. त्यांचा नातू म्हणजेच गुणाढ्य… तो लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होता.दक्षिणापथ येथे विद्या प्राप्त करून तो आपल्या गावी परतला. या प्रतिभावान विद्वान तरुणाला सातवाहन नरेशाने मंत्रिपद बहाल केले.

असेच एकदा सातवाहन राजा आपल्या राण्यांबरोबर राजमहालाशेजारी असलेल्या वापीवर (मोठी विहीर) जलक्रीडा करीत होता. एक राणी त्याने उडवलेल्या पाण्याच्या माऱ्याने त्रासुन गेली होती. ती एकदम राजाला म्हणाली,

“मोदकैस्ताडय!”

राजाने ह्या संस्कृत वाक्याचा अर्थ केला होता की मला मोदकांनी( लाडूंनी) मारा. त्यामुळे त्याने ताबडतोब खूप सगळे लाडू आणण्याचा आदेश  सेविकांना दिला. हे बघून ती राणी हसली आणि म्हणाली,” राजन् येथे जलक्रीडेत लाडूंचे काय काम? मी म्हणाले होते ‘मा उदकैःताडय’ म्हणजेच माझ्यावर पाणी मारू नका… आपणास तर संस्कृत व्याकरणातील संधीचे नियम सुद्धा येत नाहीत. शिवाय आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन माझ्या वाक्याचा अर्थ पण लावू शकला नाहीत”. ती राणी संस्कृत पारंगत विदुषी होती. तिने राजाला बरेच काही ऐकवले. ते ऐकून बाकीच्या राण्या पण हसू लागल्या. राजा एकदम लज्जीत झाला. पाण्यातून चुपचाप बाहेर येऊन तो आपल्या महालात निघून गेला. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली होती. तो एकदम मौन झाला. त्याने ठरवले जर संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवता आले नाही तर तो प्राणत्याग करेल. त्या नंतर राजाने दरबारात जायचे सोडले. इतरांशी बोलणे सोडले.इतकेच काय तो त्या दिवशी जेवला नाही की झोपला नाही.

दुसऱ्या एका शर्ववर्मा नावाच्या मंत्र्यांकडून गुणढ्याला ही हकिकत समजली. राजाचा झालेला अपमान..त्याची पूर्वीपासूनच संस्कृत शिकण्याची असलेली इच्छा याबाबत सर्व समजले. त्यानंतर तो व शर्ववर्मा  योग्य वेळ पाहून राजाला भेटायला गेले. दोघे राजाला बोलते करण्याचा प्रयत्न करू लागले. राजाचा उदास चेहरा पाहून शर्ववर्मा खोटे-खोटे त्याला स्वतःला पहाटेच्यावेळी पडलेले स्वप्न सांगू लागला. त्याच्या स्वप्नात आकाशातून पृथ्वीवर आलेले कमळ… त्याच्या पाकळ्यांना स्पर्श करणारा देव कुमार….त्या स्पर्शाने उमललेल्या कमळातून प्रकट झालेली साक्षात सरस्वती माता ….आणि राजाच्या मुखात शिरून तिने तेथे केलेले वास्तव्य… असे बरेच काही होते. त्याच्या या स्वप्नावर राजाचा विश्वास बसला नाही. पण तो बोलता झाला. म्हणाला,” मी मोठ्या प्रदेशाचा नरेश आहे. अपार धन संपत्ती माझ्याकडे आहे. पण विद्येशिवाय लक्ष्मीला शोभा नसते.” गुणाढ्याकडे वळून तो म्हणाला, “एखादी व्यक्ती परिश्रमपूर्वक किती दिवसात मला व्याकरणासहित संस्कृत शिकू शकेल?”

गुणाढ्य म्हणाला,” राजन्, व्याकरण म्हणजे भाषेचा आरसा… नियमित अभ्यास केला तरी व्याकरण शिकायला बारा वर्षे लागतात. पण मी तुम्हाला सहा वर्षात संपूर्ण व्याकरण शिकवेन. “गुणाढ्य  कोणत्या प्रसंगामुळे राजाला शुद्ध संस्कृत शिकायची तीव्र इच्छा झाली आहे हे ताडू शकला नाही. त्याला ही जाणिव झाली नाही की राजाला महापंडित व्हायचे नाहीय तर फक्त व्यवहारात बोलताना उपयोगी पडेल इतपत संस्कृत भाषेचे व्याकरण शिकायचे आहे. शर्ववर्माच्या मनात तसाही गुणाढ्याबद्दल द्वेष होताच, त्यात ही आयती चालून आलेली संधी!….मोठ्या आत्मविश्वासाने तो म्हणाला, “महाराज मी आपल्याला सहा महिन्यात व्याकरण शिकवू शकतो. “

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाटकी झोळी…  ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ फाटकी झोळी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

आजवरच्या इतिहासात अनेक समाजसुधारकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी जनजागृतीचे व्रत स्वीकारले.सामान्य माणसावर नकळत होणारे अन्याय नाहीसे होऊन त्याचे जगणे अधिक डोळस आणि सुखकर व्हावे यासाठी त्यांचा अविरत संघर्ष सुरू असायचा.

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम ही सलग चार शतकांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा ! या मांदियाळीतील प्रत्येक संतमहात्म्याचे आयुष्य प्रचंड विरोध, त्याग आणि संघर्ष यांनी व्यापलेले होते. सकल जनांना निखळ समाधानाचा मार्ग प्राप्त व्हावा यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत राहिले.

भारतीय संस्कृतीला अपेक्षित असणाऱ्या मूल्यांचे रोपण समाजमनात करीत, त्यांच्या उन्नतीसाठी जनजागृती करीत या थोर व्यक्तींनी आपली उभी आयुष्यं खर्ची घातलेली आहेत. तरीही ‘खऱ्या अर्थाने जागृती झाली आहे असे म्हणता येईल का?’ हा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आजही सभोवताली दिसून येते. अंधाराचे स्वरूप बदलले तरी भोवताली मिट्ट काळोखच असावा अशीच परिस्थिती आजही भोवताली दिसून येतेच.

तेराव्या शतकापासून आजच्या बाविसाव्या शतकापर्यंत प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही सर्व संतमहात्म्यांच्या जनजागृती करणाऱ्या अभंग-रचना आणि मौलिक ग्रंथ भांडार अनेक पिढ्या प्राणपणाने जपणारे आपण खऱ्या अर्थाने जागृत झालेलो आहोत कां?की अजूनही आर्थिक न् भौतिक स्तर उंचावूनही समाजमन सुप्तावस्थेतच राहिले आहे ? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे उत्साहवर्धक असणे शक्यच नाही ही वस्तुस्थिती आहे.यात दोष नेमका कुणाचा? जनजागृतीचं अखंड व्रत प्राणपणाने जपत भरभरु‌न देणाऱ्या संतमहात्म्यांचा की ते दान घेणारी आपली झोळीच फाटकी असणाऱ्या समाजमनाचा ??

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

परिचय

नँशनल असोसिएशन फाँर दि ब्लाईंड या संस्थेच्या सभासद. अंधांचे बचतगट  १० वर्षांपासून चालवितात. महाराष्ट्रातील पहिला प्रयोग म्हणून याला मान्यता मिळाली आहे. स्वतः अंशतः अंध. अपंग सेवा केंद्र, सांगली व सांगली महापालिका या दोन्ही चे ‘प्रेरणा पुरस्कार’ मिळाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सांगली यामध्ये सक्रिय कार्यकर्ती म्हणून काम.

चमत्कारामागील विज्ञान यासाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या नाटयप्रयोगात अभिनय, तसेच चळवळीची गाणी म्हणणे, इतरही अनेक कामे या समितीतर्फे केली जातात. जटानिर्मुलन, सत्यशोधक विवाह, भोंदूबाबा पकडणे याकामात  सहभाग असतो.

कविता, लेख लिहून सादर करतात. काही अंधांसाठीचे व्हाँटस अँप ग्रुपवर असे कविता लेख रेकॉर्डिंग करून पाठविते.

काही एकट्या रहाणाऱ्या जेष्ठांची बँकेची कामे करते.

लग्नसमारंभात मंगलाष्टके रचून म्हणते तसेच काहीइतरही खास समारंभासाठी गाणी लिहून सादर करतात.

नँब शाखा सांगलीवरही  मागणीवरून गीत लेखन केले आहे.

?  विविधा ?

☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा 

जीवन खूप सुंदर आहे. जगताना प्रत्येक गोष्टीचा पुरेपुर आनंद घेत गेलो तर दुःखाचा लवलेशही उरणार नाही, दुर्दैवाने ज्या वाईट घटना घडतात, त्यांना मागे टाकून जीवनाची पुढील वाटचाल करीत राहिलो तर आयुष्य खूप सुंदर होईल हे नक्की, परंतु या वाटचालीत काही वेळा मात्र भयदायी असतात. अगदी लहान असताना बालपणात एक भय आपली पाठ सोडत नाही, ते म्हणजे बागुलबुवा. थोडा जरी हट्ट केला, रडून निषेध नोंदवला तर घरातील आई, आजी, बाबा हे सगळे एकच भिती घालतात, “तो बघ बागुलबुवा आला “मग आम्ही आपल घाबरून गप्प!शिकत असताना शाळेतील शिक्षकांची भिती, परिक्षेची भिती, अभ्यास कितीही चांगला झाला तरी निकालाची भिती. यशस्वीपणे पास झालो तर नोकरीची भिती, नोकरी चांगली लागली तर बाँसची भिती. लग्न झाल्यावर तर विचारुच नका. पैसे पुरवायची भिती, मुलांच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी युक्त भिती कायमच असते. सगळं सुरळीत झालं, आयुष्यातील बऱ्यापैकी जबाबदाऱ्या पार पाडल्यावर एक मोठी भिती आपल्या मनात ठाण मांडून बसते ती म्हणजे असलेल्या किंवा होणाऱ्या आजाराची भिती. त्यातून परत जोडीदाराची काळजीयुक्त भिती असतेच. हे सगळं निभावताना वार्धक्यात मुलं आपल्याला बघतील कि नाही हि भिती तर मरेपर्यंत सुटतचं नाही. एकूण काय भय आपली पाठ सोडत नाही. जीवन आहे तिथे आनंद, उत्साह, सुख असतेच, आनंदाने जीवन जगावे हेही खरेच पण त्याच्या जोडीला दुःख, भय हे सुध्दा आहे.  याच वाटचालीत जगत असताना हे सुध्दा लक्षात ठेवावे वाटते, ‘भय इथले संपत नाही.’

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग १२-  संगीत -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग १२-  संगीत -१  डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

महाविद्यालयात शिकत असताना गंभीर विषयावरील ग्रंथ वाचनाच्या खालोखाल नरेंद्रच्या आयुष्यात स्थान होतं ते संगीताला. तो स्वत: संगीताचा आनंद घेत असे आणि इतरांनाही तो तेव्हढ्याच मुक्तपणे देत असे. अनेक वेळा मित्र जेंव्हा आग्रह करत असत तेंव्हा, नरेंद्र लगेच प्रतिसाद देत असे. त्याचा सूर लागला की सगळीकडे निस्तब्ध शांतता पसरून त्या स्वरमाधुर्यात सगळेजण डुंबून जात.

विश्वनाथबाबूंनी नरेंद्रचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास रायपूरच्या वास्तव्यातच सुरू केला होता. त्याला अनेक भाषेतली गीतं शिकवली होती. त्यांनी नरेंद्रला, ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा, ठुमरी, बंगाली कीर्तन शामसंगीत व बाउल संगीत हे लोकसंगीताचे प्रकार पण शिकविले. नरेंद्रची ही तयारी करून घेतल्यावर त्यांनी कलकत्त्याला परतल्यावर, पुढे योग्य गुरूंकडे रियाझ आणि धडे घेण्यासाठी व्यवस्था केली होती. आई भुवनेश्वरीदेवीं चा आवाज पण चांगला होता. आई वडिलांच्या सान्निध्यात तसे संगीताचे संस्कार नरेंन्द्रवर लहानपणापासूनच होत होते. लहानपणी आपली आज्जी रायमणीच्या घरात त्याचा कधी कधी रियाझ चालत असे. दत्त घराण्याला संगीताचं वरदान लाभल होतं. सन्यासी झालेले नरेंद्रचे आजोबा दुर्गाप्रसाद उत्तम गायक होते. त्यांचा वारसा विश्वनाथबाबू चालवत होतेच. ते दर आठवड्याला गुणीजनांना बोलवून त्यांच्या बैठका भरवायचे, सर्वदूर प्रवासात संगीतातले नवनवीन प्रकार ऐकून व पाहून आल्यावर तसे संगीत, गायकांना ऐकवायचे. असे म्हणतात की, ‘ठुमरी’ प्रकार बंगाल मध्ये विश्वनाथ बाबूंनीच परिचित करून दिला.  

तीव्र बुद्धिमत्तेबरोबर रसिकता आणि अभिजात अभिरुची हे गुण असल्यानेच युवावस्थेत येता येताच नरेंद्रने गायन वादन कौशल्य आत्मसात केले होते आणि कुटुंबातही याची ख्याती पसरु लागली. त्याच्या धीरगंभीर आणि सुरेल आवाजाने लोक आकर्षित होत. “स्वरांच्या माध्यमातून त्यातील सौंदर्याच्या आविष्कारा बरोबरच रसिक श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भाव निर्माण झाला पाहिजे. श्रोत्यांची आणि स्वत: गायकाची अशी भावसमाधी लागणे, गायनाचे सूर थांबल्यावरही तिचा परिणाम श्रोत्यांच्या मनात रेंगाळत राहणे आणि त्यांचे मन एका उदात्त वातावरणात पोहोचणे हे संगीताचे खरे उद्दीष्ट आहे” असे नरेंद्रचे मत होते. त्यांचा हा व्यासंग केवळ मैफिली पुरताच मर्यादित नव्हता.

श्री रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र ची पहिली भेट झाली त्याचं कारण, नरेंद्रचं गाणं हेच होतं. नरेंद्रचं  संगीत हेच या दोघांच्या मधल्या अतूट संबंधांचा सेतू होता.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्रगौर – उत्सवाचं लेणं… ☆ प्रा. डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर ☆

? विविधा ?

☆ चैत्रगौर – उत्सवाचं लेणं… ☆ प्रा. डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर ☆ 

वसंत ऋतु आला. आंब्याचा मोहोर गळाला .फाल्गुनातील रंग अधिक गहिरे झाले. चहुकडे आनंद पसरला आणि या आनंदात अधिक भर पडते चैत्रपालवीने. झाडे हिरव्यागार पानांनी, फुलांनी ग्रीष्माचे स्वागत करायला तयार होतात. आपली दाट सावली वाटसरूसाठी अधिक दाट करतात. अशावेळी नव्या वर्षाचा नवा दिवस घरोघरी गुढ्या उभारून साजरा केला जातो .नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी घरोघरी चैत्र गौरीचे आगमन होते.

हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीचे महत्त्व आहे. पौर्णिमा तर साजरी होते पण अमावसेला ही महत्त्व आहे. प्रकाशाला  प्राधान्‍य आहेच,  पण अंधाराकडेही दुर्लक्ष नाही. प्रकाश- अंधार या चक्राच्या गतीत तर जीवनाचे सार आहे . प्रतिपदा द्वितीया,  तृतीया  अगदी चतुर्दशीपर्यंत प्रत्येक तिथी कधीतरी महत्वाची असते. चैत्र महिन्यात तृतीयेचे महत्त्व आहे. ही गौरी येते ती चैत्र शुद्ध तृतीयेला. येते तो हवामान बदल करतच. क्षणात गडगडाटासह गारांचा पाऊस तर क्षणात स्वच्छ ऊन. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकू लागल्या, की चैत्रगौर जवळ आली असे समजावे. देवा इतकेच देवीला ही आमच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. आणि ही चैत्रगौर साधीसुधी नाही तर माहेरवाशीण आहे. आमच्याकडे एरवी मुलीचे कौतुक होणार नाही पण लग्न झाल्यानंतर ती सासरहून माहेरी आली की सगळे घर तिच्यापुढे नाचत असते. आई तर वेडीपिशी होते. लेकीला काय खाऊ घालू काय नको असे तिला होते. तिच्या आवडीचे आठवून आठवून केले जाते. चार-सहा दिवसा करता आलेली असते ,मग कौतुक करायला नको ?  तसं या लेकी चे कौतुक होत असते. परत ही लेक वर्षातून एकदाच येत असते,  मग काय विचारावे.! ती झोपाळ्याचा हलतच नाही नव्हे ती झोपाळ्यावर बसूनच येते. हा झोपाळा पितळी असतो किंवा लाकडी असतो. लहान-मोठा कसाही चालतो. पण झोपायला हवाच . कारण दिवस तिचे हे फुलायचे, झोपाळ्या सकट झुलायचे असे असतात.

आल्या दिवशी तिला तेल लावून न्हाहू  माखू  घालतात. खण नेसवतात. कैरी,  लिंबू , मिरच्या वगैरे घालून भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीच्या चटणीचा नैवेद्य दाखवतात. आंब्याचे पन्हे करतात. तिचा थाट काही निराळाच. जवळ जवळ महिनाभर ती  मुक्कामाला असते. चैत्र शुक्ल तृतीयेला येते व वैशाख शुक्ल तृतीयेला तिला पोहोचती करावे लागते. या महिनाभरात तिला नवनवीन पदार्थ खाऊ घालावे लागतात. चैत्री पौर्णिमा नंतरच्या तृतीयेला मधली किंवा दुसरी तीज  म्हणतात. या दिवशी पण डाळ पन्हे देवीसमोर ठेवतात. आणि मग करावा लागतो तिचा थाटमाट. तिचे खास हळदीकुंकू. जे कित्येक  वर्षापासून आमच्या परंपरेत चालत आलेले आहे.

पूर्वी हळदीकुंकू म्हणजे बायकांना एक पर्वणीच असायची. एकमेकींना भेटण्याची आणि दागदागिन्यांनी नटण्याची. बायकांची चार दिवसापासून धांदल उडते.लाडू , करंज्या, अनारसे, चकल्या ,शेव सगळे तिखट, गोड पदार्थ करावे लागतात. ज्या दिवशी हळदीकुंकू असेल ,त्यादिवशी परत गरम पाण्याने स्नान जरीचा खण घालून तिला बसवावे लागते. मोठी आरास करावी लागते .ही आरास कोण किती कौशल्याने करतो, यातही चढाओढ असते. कोणी पानाफुलांचा झोपाळा करून त्यावर तिला बसवतात.  कोणी एकावर एक पेट्या करून त्यावर कपडा घालून पायऱ्यांचा आभास करतात. आजूबाजूला पडदे लावतात. काही कल्पक कपड्यांचे जहाज , चंद्र असं काहीतरी करून नेहमीपेक्षा वेगळे कौशल्य दाखवतात. समोर डिशमध्ये फराळाचे पदार्थ भरून ठेवतात. खेळणी मांडतात. सुंदर रांगोळी काढतात. तिला जितके नटवता येईल तितके नटवतात. आहो बायकांचं काय सृष्टी देखील तिचं कौतुक करते. नाहीतर पावसाळा नसताना पावसाळी वातावरण थोडा वेळ तरी का निर्माण व्हावे ? गडगडाटासकट पाऊस का पडावा? तर चैत्र गौरीचे डोहाळे म्हणजे इच्छा पुरवण्यासाठी म्हणे. मोगरा सुद्धा बहरतो याच दिवसात. सगळे वातावरण ती सुगंधी व प्रफुल्लित करते. म्हणूनच बायका एरवी कोणाकडे जायच्या नाहीत पण चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला नाही म्हणणार नाहीत.

येणाऱ्या बायकांना चहा नसतो हो द्यायचा. आलेल्या बाईला आधी हळद कुंकू लावायचे. आत्तर लावायचे. गुलाब पाणी शिंपडायचे . कैरीचे पन्हे , खिरापत द्यायची. काही ठिकाणी खिरे म्हणजे पांढऱ्या काकड्या देतात. तर काही ठिकाणी चंदनाची उटी बायकांच्या हाताला लावतात व त्यावरून शिंपल्याने रेषा  ओढतात . या उटीने हाताला एक वेगळेच सौंदर्य येते व परत कुंकवाचे वरती ठिपके द्यायचे.  रंग संगती व थंडावा या दोन्ही गोष्टी किती सोप्या पद्धतीने साध्या जातात नाही का? शेवटी भिजवलेल्या ओल्या हरभऱ्याचे ओटी भरायची.

ऋतुमानाप्रमाणे सण साजरी करणारी आपली संस्कृती आहे .नाहीतर एरवी खा खा म्हटले तरी भिजवलेले पौष्टिक हरभरे कोणी खाणार नाही.  पण या दिवसात दोन-तीनदा तरी अशी ओल्या हरभऱ्याची उसळ होते.  असे हे शितल, प्रसन्न , उत्साही हळदीकुंकू बाहेरच्या गर्मीची , उष्णतेची जाणीवही होऊ देत नाही. चैत्रगौर अशी दिमाखात राहते आणि अक्षयतृतीयेला त्याच दिमाखात तिची बोळवण करावी लागते , एखाद्या माहेरवाशिणीसारखी.. जर अक्षय तृतीयेला बुधवार असेल तर ही माहेरवाशीण दुसऱ्या दिवशी जाते.

हे हळदीकुंकू कैरीच्या पन्हाचे, ओल्या हरभऱ्याचे,  पांढऱ्या काकडीचं , चंदनाच्या सुवासीक अत्तराचे , चांदीच्या गुलाबदाणीतून येणाऱ्या गुलाब पाण्याचं . सुगंधी,  प्रफुल्ल , पवित्र, शितल असंच असतं. यांनीच येणाऱ्यांचे स्वागत करावं… कारण चैत्रगौर म्हणजे तरी कोण?  तुमच्याआमच्यातलीच माहेरपणाच्या कौतुकाला आसावलेली एक मनगौरच आहे. एक उत्सवाचं लेणं घेऊन आलेली… खरं ना…..

 

© प्रा. डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर

सोलापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रेकी… ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ रेकी… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

काल सांताक्रुझला शाळेची एक बस काही तासांसाठी हरवली. ती सापडल्यावर एक उल्लेख केला गेला की गाडी चालक नवीन होता, त्याने मार्गाची ‘रेकी’ केली नव्हती म्हणून तो गोंधळला आणि नियोजित ठिकाणांवर पोचायला बराच उशीर झाला.

इतके दिवस केवळ गुन्हेगाराने / अतिरेक्यांनी अमुक तमुक ठिकाणांची , इतक्यांदा-तितक्यांदा ‘रेकी’ केली असे ऐकायला मिळायचे. त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या एका सामान्य वाहन चालकाबद्दल वापरलेला हा शब्दप्रयोग एक वेगळाच संदर्भ  देऊन गेला.

मग लक्षात आले की हा प्रकार नकळत ( म्हणजे याला रेकी बिकी असं काही म्हणतात हे माहिती नसताना) आपण अनेक वेळा आचरणात आणलाय. अगदी लहानपणी आपल्याला शाळेत घातल्यानंतर पालकांकडून त्या मार्गाची रेकी केली जाणे ( म्हणजेच घरापासून लागणारा वेळ, बसच्या वेळा,सायकल/ चालत जात असेल तर रहदारी,वस्ती, जवळचा मार्ग इ इ ) ते आपण नवीन ठिकाणी कामावर रूजू होण्यापूर्वी केलेली मार्गाची रेकी.

अशी प्रत्येकाची विविध उदाहरणे असतील. मला आठवतयं लहानपणी नाटकात काम करताना नाटकाच्या तालमी इतरत्र कुठेही होत असल्या तरी मुळ प्रयोग जिथे व्हायचा तिथेच काही दिवस आधी ‘फायनल रिहर्सल’ व्हायची. एकप्रकारे ही सादर होणाऱ्या प्रयोगाची ‘रेकीच’ म्हणता येईल.

भारताचा परदेशात सामने खेळायला गेलेला संघ किंवा भारतात आलेले संघ ( क्रिकेट का इतरही? ) मुख्य मालिके आधी काही सराव सामने खेळायचा. हा ही एक ‘रेकी’ चा प्रकार असावा का?

दहावी/बारावी बोर्ड परीक्षा आधी आमचे हुsष्षार मित्र सराव पेपरांची ‘रेकी’ करायचे. या भानगडीत आम्ही मात्र फारसे पडलो नाही ☺️

रेकी ची ही मला आठवलेली काही उदाहरणे.

माझ्या मते या सगळ्याचा प्रमुख उद्देश प्रत्यक्ष तशी परिस्थिती येईल तेंव्हा आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा   विश्वास ( काँन्फीडन्स) यावा, फिल गूड वाटावे,  आणि सहजतेने अतिरिक्त ताण वगैरे न घेता परिस्थिती स्वीकारणे वगैरे वगैरे असावा अशी प्रत्यक्ष जागेवरून जाऊन ‘रेकी’ करण्यात ज्यांची इतिहासाने नोंद करून ठेवली असे उदाहरण म्हणजे छत्रपतींचे विश्वासू ‘बहिर्जी नाईक’. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.

प्रत्यक्ष उपस्थिती ( physical ) बरोबरच आपल्या कडे  ‘मन’ या अत्यंत उपयुक्त  आयुधाचा  रेकी करण्यासाठी कसा विविध प्रकारे ( Meditation, Dream,Motivation, visualization इ इ प्रकारे)  उपयोग होऊ शकतो याबद्दल विस्तृत माहिती अनेकांना आहेच.

तुर्त इतकेच

 

अमोल 📝

विनायकी चतुर्थी ( अंकातील योग)

५/४/२२

(अवांतर : आपल्या समुहात लिहिलेले लेखन हे माझ्या ‘लेखी’ आपलं माझ्यासाठी ‘रेकी’ चाच प्रकार म्हणा ना !.. 😷)

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! घाम आणि अक्कल ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 घाम आणि अक्कल !😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर ! आज पेपरात वाचण्यासारखं काही नाही, म्हणून लवकरच आणला !”

“मोऱ्या, उद्यापासून एक कामं कर !”

“कोणतं पंत ?”

“आमचा पेपर वाचायला न्यायचा नाही, कळलं ?”

“असं करू नका पंत, गेली कित्येक वर्ष मी तुमचा पेपर तुमच्याआधी वाचतोय आणि परत आणून पण देतोय ना आठवणीने ?”

“गाढवा, आमचाच पेपर आम्हांला परत आणून देतोयस म्हणजे काय मेहेरबानी करतोयस की काय माझ्यावर ?”

“असं रागावू नका पंत, पण पेपरात आज खरंच वाचण्यासारखं काही नाही. रोजच्याच रटाळ बातम्या वाचून वाचून कंटाळा आलाय नुसता !”

“मग असं का करत नाहीस मोऱ्या, आपल्या एक ते आठ अहमद सेलरचा, चाळकमिटीचा अध्यक्ष या नात्याने, ‘अहमदी सफर’ नावाचा एक पेपर चालू कर ना तूच, म्हणजे तुला हव्या तशा बातम्या त्यात देता येतील संपादक या नात्याने आणि तुझा पेपर कसा वाचणेबल करायचा हे तुला ठरवता ही येईल, काय ?”

“ही मस्त कल्पना आहे पंत तुमची ! आपल्या आठ चाळीत काही ना काही रोज घडतंच असतं, त्यामुळे बातम्यांना पण तोटा नाही !”

“खरं आहे मोऱ्या, आठ चाळीतली नळावरची रोजची भांडण, प्रत्येक चाळीतली किंवा दोन चाळीत मिळून चालू असलेली प्रेम प्रकरणं, शाब्दिक हमरी तुमरी, मारामाऱ्या, नवरा बायकोची भांडण, असा बराच मसाला वापरून तुला तुझा पेपर रंजक आणि वाचनीय बनवता येईल बघ !”

“पंत समस्त आठ चाळीतील चाळकऱ्यांना सुद्धा कुठल्या चाळीत काय चालू आहे ते कळेल. लगेच ‘अहमदी सफरच्या’ कामाला लागतो आता, येतो पंत !”

“मोऱ्या तुझ्या ‘अहमदी सफर’ मध्ये इतर पेपरात जसा लोकांच्या पत्र व्यवहारासाठी, त्यांच्या समस्या किंवा विचार मांडण्यासाठी एक कोपरा राखीव असतो, तसा ठेव बरं का !”

“जरूर पंत, लोकांच्या समस्या मला चाळकमिटीचा अध्यक्ष या नात्याने लोकांच्या पत्रांनी कळल्या तर बरंच होईल, म्हणजे त्यावर लगेच काहीतरी तोडगा काढता येईल !”

“हॊ मोऱ्या !”

“पंत, जसं तुम्ही चाळीच्या पेपरला नांव सुचवलत तसं त्या पेपरमधील पत्र व्यवहाराच्या कोपऱ्याला पण नांव सुचवा ना तुम्हीच ?”

” ‘तुमच्या मनांत, सांगा जनांत’ हे नांव कसं वाटतंय तुला त्या पत्र व्यवहाराच्या कोपऱ्याला ?”

“अगदी योग्य आहे पंत ! तुमच्या मनांत काही असेल तर पत्र रूपाने ते आम्हाला कळवा, आम्ही ते आमच्या पेपरच्या पानावर छापून त्याला जनात सांगून प्रसिद्धी देवू, मस्त !”

“मोऱ्या एक लक्षात ठेव तुझ्या पेपरात माझंच पाहिलं पत्र प्रसिद्ध व्हायला हवं !”

“नक्कीच पंत, पण तुमच्या पत्राचा विषय काय असेल तेच माझ्या ध्यानात येत नाहीये, तो जर आधी कळला तर…..”

“मोऱ्या, आपल्या आठ चाळीत रोज कुणाकडे ना कुणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतंच असतं आणि…”

“पंत, आता आठ चाळी मिळून ४८० बिऱ्हाड म्हटली की असं होणारच ना !”

“त्याला माझी हरकत नाहीच मुळी, आपापल्या घरच मंगल कार्य नक्कीच साजरं करावं सगळ्यांनी पण ते कशा प्रकारे साजरं करावं याला काही पद्धत असते ना रे !”

“हॊ पंत, आपण म्हणता ते बरोबर, पण हौसेला मोल नसतं असं आपणच म्हणतो ना ?”

“अरे म्हणून काय उठल्या सुटल्या कुठल्याही कार्यक्रमात मोठं मोठ्याने DJ लावून नाचायलाच हवं का ?”

“पंत असते एकेकाला हौस त्याला…..”

“म्हणून बारशाला सुद्धा त्या लहान बाळाचा विचार न करता कर्ण कर्कश्य DJ लावून अचकट विचकट नाच करायचे ?”

“तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पंत, हल्ली सगळ्याच चाळीतून कुणी ना कुणी पेशंट असतो, बऱ्याच सिनियर सिटीझनना मोठ्या आवाजाचा त्रास होतो, हे कुणी लक्षातच घेत नाही ! पंत तुम्ही लिहाच या विषयावर पत्र, चांगल्या ठळक चौकटीत तुमचं पत्र छापतो की नाही बघा !”

“अरे मोऱ्या या अशा लोकांना सांगायला हवं, की उठल्या सुटल्या त्या DJ च्या तालावर नाचून नाचून तुम्हांला फक्त घाम येईल, पण अक्कल नाही येणार !”

“बरोबर पंत !”

“त्या DJ वर खर्च होणारे हजारो रुपये दुसऱ्या कुठल्या तरी सामाजिक कार्याला द्या, हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत करा यातच तुमचं आणि समाजाच भलं आहे.”

“अतिशय उत्तम विचार दिलात तुम्ही पंत ! आजच नवीन पेपरच्या कामाला सुरवात करतो, शुभस्य शीघ्रम !”

“मोऱ्या, पण एक लक्षात ठेव, तू तुझा पेपर काढलास तरी आमचा पेपर कसाही असला, तरी रोज आमच्या आधी नेवून वाचायचा आणि न विसरता परत आणून द्यायचा, काय ?”

“हॊ पंत, धन्यवाद, येतो !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

०८-०४-२०२२

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares