मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काळाच्या पुढे चार पावलं असावं असं म्हणतात.पण बघता बघता काळाचीच चार काय,पाचवही पाऊल टाकून झालं आणि उद्या सहाव पाऊल पडेल.हे पाचवं पाऊल  म्हणजेच वर्षाचा पाचवा महिना. तापवणाराही आणि सुखावणाराही! मे महिना! मे  म्हणजे वैशाख वणवा. मे महिन्याची अखेर म्हणजे ज्येष्ठाची चाहूल.संपूर्ण महिना जसा चटके देणारा तसाच सुट्टीच्या मोठ्या कालखंडामुळे  विद्यार्थी वर्गाला आनंद देणारा.लहान मुलांना मामाच्या गावाला घेऊन जाणारा,शिबिरांच्या निमित्ताने अभ्यासाव्यतिरिक्त नवीन काहीतरी शिकायला वेळ देणारा,मनसोक्त खेळू देणारा,लग्न समारंभातून सर्व आप्तेष्टांना भेटवणारा,थंडगार पेयांनी तहान भागवणारा आणि रसराज आंब्याच्या रसात बुडून जाताना फणसातील ग-यांचा वास घमघमवणारा मे महिना तो हाच.यामुळेच की काय,वणव्यासारखा पेटणारा सूर्य असूनही, त्याची दाहकता सोसूनही दरवर्षी आतुरतेने वाट बघायला लावणारा हा महिना, मे महिना! वैशाखातून ज्येष्ठाकडे नेणारा महिना.ग्रीष्मातील धारा विसरून मान्सूनच्या वा-यांचे स्वागत करायला उत्सुक असणारा महिना !

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा दिवस म्हणजे एक मे.याच दिवशी 1960 साठ साली भाषावार प्रांत रचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.मराठी भाषा राजभाषा झाली. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा महिना आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.

एक मे हा दिवस कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

तीन मे 1991 साली विंडहोक येथे पत्रकारांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यात पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सादर करण्यात आला. त्यानंतर 1992 पासून तीन मे हा दिवस वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर पाच मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे.याच दिवशी 1895 साली पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड ‘हे प्रकाशित झाले होते.

युद्धातील जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी जीन हेनरी ड्यूनेट यांनी मोहिम सुरू केली.ती संघटना म्हणजे रेड क्राॅस सोसायटी.म्हणून जीन यांचा जन्मदिवस आठ मे हा  दिवस रेड क्राॅस दिन म्हणून साजरा केला जातो.

आई हे दैवत आहे हे आपणा भारतीयांना तर माहित आहेच.पण हे महत्व लक्षात घेऊन आईचा सन्मान करण्यासाठी 1914 पासून आंतरराष्ट्रीय मातृ दिन झाला आहे  नऊ मे हा दिवस. आईप्रमाणेच ममता देणा-या आणि सेवाधर्म पाळणा-या परिचारिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारा मे हा जागतिक परिचारिका दिन आहे.कारण आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा तो जन्मदिवस आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीयांची भावना आहे.शांतता,विचार आणि भावनांच्या देवाणघेवाणीची जाणीव निर्माण व्हावी या कल्पनेतून 1994पासून युनो कडून पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.तसेच अठरा मे हा दिवस जागतिक वस्तू संग्रहालय दिन आहे.1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली.तो दिवस होता एकवीस मे.त्यामुळे एकवीस मे हा दिवस जागतिक दहशतवादविरोधी दिन म्हणून पाळला जातो.एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू  विरोधी दिन आहे.

गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तो तीस मे 1987 ला.त्यामुळे तीस मे हा गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

1998साली अकरा मे ला पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी झाली.त्यानंतर 1992 पासून अकरा मे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस या नावाने  ओळखला जातो.     

असे  विविध दिन या  मे महिन्यात येत असतात.याच मे मध्ये म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असते बुद्ध पौर्णिमा.बसवेश्वर जयंती,आद्य शंकराचार्य जयंती,छ.संभाजी महाराज जयंती,स्वा.सावरकर जयंती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती ही याच महिन्यात असते.तसेच छ.शाहू महाराज,पं.नेहरू,राजीव गांधी यांचे स्मृतीदिन याच महिन्याताल.

शिवाय मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद याच मे मध्ये साजरा होतो.

असा हा मे किंवा वैशाख सरता सरता पावसाच्या आगमनाच्या बातम्या सुरू होतात आणि क्वचित मान्सूनपूर्व सरीही पडून जातात.सुखद गारव्याची जाणीव, येणा-या पावसाची पुनःपुन्हा आठवण करून देते.शेतक-यासह सगळेच आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात.कारण नवजीवन प्राप्त करून देणारा,’जीवन’ घेऊन येणारा वर्षाऋतू येणार असतो,आपल्या तनामनाला न्हाऊ घालायला,वसुंधरेला फुलवायला !तो येईपर्यंत फक्त एवढंच म्हणायचं,’ये रे घना,  ये रे घना….

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 19 – विवेक दे ! वैराग्य दे ! ज्ञान दे ! ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 19 – विवेक दे ! वैराग्य दे ! ज्ञान दे !  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आईची अवस्था, आजूबाजूच्या लोकांची वागण्याची रीत, पितृछत्राचं  दु:ख या सगळ्यांमुळे नरेंद्र अंतर्मुख झाला. गरीब आणि दु:खी लोकांचं आक्रंदन भगवंतांना दिसत नाही की काय? नुसता कमरेवर हात ठेऊन, ही निष्ठुर दानवी लीला तो निर्विकारपणे बघतोय? त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही? नरेंद्रचा ईश्वरावरचा विश्वासच उडू लागला होता.

आपल्या मित्रांनाही तो हे कधी कधी बोलून दाखवे. त्यावरून त्यांचाही समज दृढ झाला की नरेंद्र आता नास्तिक झालाय. तसच त्याच्या बद्दल शिष्यवृंदांमध्ये आणखी अपप्रचार होऊन तो रामकृष्णांपर्यंत पोहचे. त्यांचा तर नरेंद्रवर पूर्ण विश्वास होताच. खात्री होती. नरेन्द्रबद्दल असे काहीही ऐकून न घेता त्यांनाच ते दटावत असत. पण हेच तर आपली परीक्षा घेत नसतील ना? अशी शंका नरेन्द्रनाथांना आली खरी.      

घरगुती कारणांमुळे नरेंद्र दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्णांकडे जाऊ शकत नव्हते. रामकृष्ण त्यांच्या शिष्यांकरवी नरेंद्रला भेटायला येण्याचे निरोप देत. पण नाही. मनात त्रागा होताच. ईश्वराचा मनातून राग आला होता. पण प्रेमळ अशा रामकृष्णांची आपल्या हृदयातली मूर्ती ते काही केल्या पुसू शकले नव्हते. त्यांच्या बरोबर आलेल्या आतापर्यंतच्या आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांनी कल्पिलेली नास्तिकता दूर होऊ लागली होती. एका क्षणी त्यांना स्वत:चेच आश्चर्य वाटले की मी हे काय करतोय? त्यांना जाणीव झाली आपल्या अस्तित्वाची.

‘केवळ पैसा मिळवून, कुटुंबाचं अटीतटीने पोषण करत आयुष्य कंठीत राहायचं? आणि एक दिवस मरून जायचं? नाही, नाही माझा जन्म यासाठी झाला नाही. माझ्या जीवनाचं उद्दीष्ट महान आहे. अखंड सच्चिदानंदाचा लाभच माझे लक्ष्य आहे’. असे मनाशी ठरवून, नरेन्द्रनाथांनी  कुणालाही नकळत एक दिवस घरादारचा त्याग करण्याचा दिवस निश्चित केला.

गृहत्याग करण्यापूर्वी एकदा  गुरूंना वंदन करून मग कायमचा निरोप घ्यायचा असं ठरवलं. त्याच दिवशी गुरु कलकत्त्यात आपल्या एका भक्ताकडे आले आहेत हे कळल्याने नरेंद्रनाथ त्याच्याकडे गेले. तर श्रीरामकृष्णांनी त्यांनाच आग्रह करून दक्षिणेश्वरला नेले. रात्रभर गुरुशिष्यांमध्ये अद्भुत असा संवाद घडत राहिला.

अत्यंत करुण नेत्रांनी श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांकडे बघून म्हणले, बेटा, कामिनी-कांचनचा त्याग केल्याखेरीज काहीही व्हायचे नाही. श्रीरामकृष्णांना भीती होती की न जाणो हा संसारात गुरफटून बसेल. त्यांनी नरेंद्रनाथांना एका बाजूला नेऊन परोपरीने सांत्वन केलं. सांगीतलं की, माझा देह असेपर्यंत तुला या जगात राहावे लागेल. आणि विशिष्ट कार्यासाठीच हा देह तू धारण केला आहे, याचं रहस्य ते सांगत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरहून घरी आले. मनावरचं एक मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. आता, रामकृष्ण त्यांचे आदर्श, गुरु, पिता आणि सर्वस्व झाले होते. नातेवाईकांनी कटकारस्थान करुन त्यांच्या विरोधात केलेली केस हाणून पाडण्यासाठी त्यांनी कंबर कसली. ‘अन्याय, असत्यापुढे काहीही झालं तरी मान झुकविणार नाही’. हा त्यांचा बाणा होता. नामांकित बॅरिस्टर उमेशचंद्र बंडोपाध्याय यांनी नरेंद्रनाथ यांच्याकडून केस लढवली. 

कोर्टात लोकांना नरेन्द्रनाथांचे प्रसंगावधान,चारित्र्याची दृढता आणि सद्गुण्णांची चुणूक दिसलीच. पण विरोधी पक्षाचे वकील, उलट तपासणीत नरेंद्रनाथांची निर्भयपणे, स्पष्ट, धीरगंभीर, उत्तरे ऐकून आश्चर्य चकित झाले. न्यायमूर्तिंनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन, शेवटी नरेन्द्रनाथ यांच्या बाजूने निकाल दिला. नरेन्द्रनाथ हे ऐकताच धावतच घरी आले आणि आईला म्हणाले, “आई घर बचावले”. त्याक्षणीच, भुवनेश्वरी देवींनी अत्यानंदाने विजयी पुत्राला हृदयाशी धरले. दोघांचा आनंद गगनात मावेना.

दिवसांमागून दिवस जात होते. पण आता आर्थिक दृष्टीने काहीतरी सोय व्हायला हवी होती. श्रीरामकृष्णांच्या कृपेने यावर काही तरी उपाय नक्की निघेल असे वाटून, नरेन्द्रनाथ ताबडतोब दक्षिणेश्वरास गेले. नरेंद्रनाथांना बघून रामकृष्ण आनंदित झाले. नरेंद्रनाथांनी म्हटले, “ महाराज माझ्या आईच्या आणि भावंडांच्या दोन घासांची कशीतरी तरतूद होईल असे तुम्ही आपल्या जगन्मातेजवळ धरणे धरावे. माझ्यासाठी”.

श्री रामकृष्णांनी उत्तर दिले, “काय सांगू रे? मी आईला असे चुकूनही कधी काही मागितलेले नाही. तरीपण तुम्हा लोकांची काहीतरी सोय व्हावी म्हणून आईची विनवणी केली होती. पण काय करू? तू तर आईला मानत नाहीस. म्हणून तीही तुझ्याबद्दलच्या सांगण्याकडे लक्षच देत नाही”. कट्टर निराकारवादी नरेंद्रची साकारावर तीळमात्र निष्ठा नव्हती. म्हणून ते गप्प राहिले. बोलायला जागाच नव्हती आणि आईच्या कृपेखेरीज काहीही घडणार नाही असे ठाम मत गुरूंचे होते.

ते एक प्रकारे नरेंद्रनाथांची परीक्षाच घेत होते. शेवटी ते म्हणाले, “बरं, आज मंगळवार आहे. मी सांगतो तुला, आज रात्री कालीमंदिरात जाऊन, आईला प्रणाम करून तू जे मागशील ते आई तुला देईल”. आणि विश्वास असो की नसो श्रीरामकृष्णांची ‘दगडी’ जगन्माता आहे तरी कशी हे एकदा पाहिलंच पाहिजे, म्हणून नरेंद्रनाथ काली मातेच्या देवालयात भारल्यासारखे गेले. आज श्रीरामकृष्णांच्या कृपेने त्यांच्या सांसारिक दु:ख दारिद्रयाचा अंत होणार या उत्कंठेने त्यांना भरून आले होते.

ते गेले तिथे त्यांना दिसले की, जगदंबेच्या रूपाने मंदिर प्रकाशित झाले आहे. दगडी मूर्ती नव्हे, ‘मृण्मय आधारी चिन्मयी जगन्माता’  वर आणि अभय देणारे कर वर करून, असीम अनुकंपापुर्ण, स्नेहमय मंदस्मित करीत आहे. ते पाहून नरेन्द्रनाथ सर्वकाही पार विसरून गेले. फक्त भक्ताप्रमाणे प्रार्थना करू लागले. “ आई विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे. भक्ती दे. आई जेणेकरून तुझ्याच कृपेने तुला सर्वदा पाहू शकेन असं कर”.

नरेंद्र परत आले तसे रामकृष्णांनी विचारले काय रे काय मागितलंस? तेंव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की अरेच्च्या खरच की हे काय करून बसलो मी? मागायचं ते राहूनच गेलं की. गुरूंच्या आदेशानुसार पुन्हा गेले. पुन्हा तेच. दोनतीन वेळा जाऊनही काहीच मागितले नाही . नरेंद्रनाथांना सारं लक्षात आलं. गुरु म्हणाले, ज्या अर्थी तू मागू शकला नाहीस त्याअर्थी तुझ्या कपाळी ऐहिक सुख नाही. तरी पण तुम्हाला अन्नवस्त्राची ददात पडणार नाही. नरेंद्रनाथ आश्वस्त झाले. त्यांना कुठे हवे होते ऐहिक सुख? पण त्या दिवसापासून नरेंद्रनाथांच्या जीवनातल्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पावसाच्या धारा… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

पावसाच्या धारा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

“काय रे,काय करतोयस ?”

“काही नाही रे,बसलोय निवांत,”

“निवांत”?

“होय,खिडकीपाशी बसलोय पाऊस बघत!”

“पाऊस बघतोयस? काय लहान आहेस काय?”

“लहान नाहीय रे,पण लहान झालोय”

“आता शहाणा की खुळा?”

” म्हण  खुळा हवं तर.पण मी झालोय लहान.तू बसला असशील मोबाईल घेऊन बोटं बडवत.पण इथं खिडकीपाशी बसून पाऊस बघताना,रस्त्याच्या कडून वाहणारं पाणी बघताना,वाहून गेलेलं सगळं आठवतं बघ.पावसाच्या पाण्यानं खिडकीच्या काचा पण झाल्यात स्वच्छ!म्हणून की काय,सगळं स्वच्छ दिसतय बघ.आठवतंय तुला,आपल्या वेळेला पाऊस आणि शाळा एकदमच सुरू व्हायचं.जणू काही पावसाचीपण उन्हाळ्याची सुट्टी संपायची आणि त्याची जाणीव झाली की तो  एकदम धावत यायचा.ज्या आठवड्यात शाळा सुरू,त्याच आठवड्यात पाऊस सुरू.मग आपले नवे कोरे युनिफॉर्म,दप्तर आणि वह्यापुस्तकं जपत,सांभाळत,रेनकोट घालून अवघडत चालत चालत शाळा गाठायची.शाळाही सगळी ओलीचिंब! बाहेरून आणि बरीचशी आतूनही.पण बरेचसे शिक्षक मात्र आतून कोरडेच असायचे.पावसात सुद्धा थोडासा उशीर झाला तरी पट्टीचा एक फटका बसणारच हे नक्की.

फटका आठवला आणि भानावर आलो बघ.ते बघ,ती चिखल तुडवणारी पोरं.एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणारी पोरं.ते बघ,तिकडून आली  ती दोघं, कागदाच्या होड्या घेऊन.आता या मोठ्या पावसात काय टिकणार या होड्या?पण केव्हा एकदा होडी सोडतोय पाण्यात असं झालंय त्यांना.ते बघ तिकडं रंगीत पट्टयापट्टयाची छत्री घेऊन कोण आलय.सुटलं वारं आणि झाली छत्री उलटी.आता काय,नुसती रडारड.पावसाच्या मा-यापेक्षा   घरच्या माराचीच भीती जास्त.ती बघ अंगणातली छोट्यांची फौज.गोल गोल फिरत सुरू झालीत गाणी पावसाची.”पावसाच्या धारा,येती झरझरा…”पलिकडे बघ   जरा.शेजारच्या काकू आल्या धावत आणि पडल्या धबक्कन चिखलात.सगळी पोरं हसताहेत

फिदीफिदी. आता वाळत टाकलेले कपडे एवढ्या पावसात भिजल्याशिवाय राहणार आहेत का? कशाला घाई करायची? जाऊ दे,आपल्याला तर मजा बघायला मिळाली की नाही !अशा सगळ्या गमतीजमती डोळ्यासमोर उभ्या राहतात चित्र बनून असा पाऊस बघायला लागल्यावर.म्हणून थोडा वेळ तरी लहान व्हायचं असतं.नाहीतर उद्या पेपर आहेच की ,कुठं झाडं पडली,कुठं नुकसान झालं,कुठं दुर्घटना घडली हे सगळं वाचायला.हे सगळं घडू नये असं वाटतं पण तरीही घडत असतंच.मग असं थोडं मागचं आठवाव,मनाच्या पुस्तकाची पानं फडफडावीत आणि जरा ताजं तवान व्हावं.हे सगळं आठवता आठवता पावसाचा जोर ओसरला बघ.चला,आता जरा गरमागरम चहा मिळतोय का बघूया.सारखं खिडकीत बसून कसं चालेल?येतोयस का चहाला?तू कशाला येशील म्हणा?तिकडे भजावर   ताव मारत असशील,होय ना?

चला, दुसरी सर यायच्या आत चहाची एक फेरी होऊन जाऊ द्या !

©  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवा मुलूख नवा दिवस ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆

श्री मुबारक बाबू उमराणी

?विविधा ?

☆ नवा मुलूख नवा दिवस ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆

मन बेचैन झाले की,मस्त डोंगर दरी धुंडाळावी, छत्री, रेनोकोट,डोक्यावरची टोपी फेकून द्यावं अन् मनसोक्त फिराव . नव्या मुलूखात नव्या दिवासात आणि डोंगराच्या कडा उन्हात न्हात हळूच पाझरणा-या झ-याकडे पहात खळखळणारा नाद मनात साठवत कित्येक वर्षे उभा आहे. एकटक पहात दिवसागणिक त्याचा आनंद द्विगुणित होत जातो. त्याला भान राहात नाही. पडणाऱ्या रिमझिम पावसात तोही कोसळत असतो 

पाऊस होऊनच. सभोवतालचा परिसर मनाला मोहित करुन सोडतो.लाल मातीतून हिरवे अंकूर, गवताची पाती वा-यासवे खेळत, नाचत असल्याचे दिसते.एखादे गवत फुल डोलत रानभर फिरणा-या मस्त मौला भूंग्याला बोलवतो अाहे.खुणावतो आहे .पण आपल्याच ना्दात फिरणा-याला यातले काहीच माहितच नसते.विरहात झुरणारे फुल फुलते फुलते अन् एक एक पाकळी गळून पडते.फुलातला इवला  गंध हळूच धरणीमातेच्या चरणी नौछावर होतो.माती तत्क्षणीच शहारते.पाझरणारे पाणी दूध होऊन खडकाच्या दणकट अंगावर बाल लीला करीत उड्या मारीत जातांनाचे दृश्य. पहात राहावे वाटते.चराचरात आनंद ,मोद,हर्ष, भरलेला आहे.पाखराची चिमणपिले पाण्यात खेळत असतांना ते थकत नाहीत. चिमण्यांनी आणलेला इवलासा सुरवंटाचा आस्वाद घेत लाल चोचीतून पोटात जातांनाचे दृश्य अन् मातृत्वाचा आविष्कार विधात्याने चरारात पेरून ठेवल्याचा प्रेमळ,वात्सल्याचा ठेवा येथेच पहावा.सारे सारे, वारा उनाड होऊन तुमच्या भोवती पिंगा घालायला लागतो अन् म्हणतो, अरे येड्या थोड लीन हो. सारं  विसरून अंहम् पणाचा शेला वा-यावर पहाडाच्या टोकावरुन फेकून दे.मन हलके हलके होत मस्त वा-याच्या मा-यासह पावसाचे नाजूक तुषार अंगावर घेतच राहवे अन् निसर्गगीत गात गात मनातला दुःखाचा गाळ कधी अनंतात विलीन झाला हे कळणारही नाही.दगडाच्या उभ्या शीळांना कान लावून डोळे बंद करुन पहा.तुम्हांला ऐकू येतील घोड्यांच्या  टापांचा आवाज.शिव छत्रपतीच्या जयजयकारचे घोष. शिवशाहीच्या यशोकिर्तीचा भगवा ध्वज फडपड आवाज करीत डौंलाने फडकत असल्याचा आवाज.मग तुमच्या मनाच्या ह्दयपटलावर जगण्याचे उन्मेश कोरले जातील. ईर्षा, द्वेश,नैंराश्य लयाला जाऊन तुम्ही स्वतः व्हाल शिवबाचे शिलेदार अन्

जयघोषाच्या निनांदात वीरत्वाचे संचार तुमच्या मनात येईल. मरगळ हवेत विरून जाईल, चेतना,चैतन्याच्या मंगलमय परीसाचा परीरस्पर्श तुम्हाला होईल अन् आपण स्वतः परीस होऊन जाल. कित्येक नैराश्याच्या गंजलेल्या लोखंडासमान असणाऱ्याना  तुमचा हस्तस्पर्श होताच तो तत्क्षणी बदललेला दिसेल.

तू तू मी मी चे पागोटे किती दिवस डोक्यावर ठेऊन बसाल? दिवसागणिक पागोट्याचे वजन वाढत जाईल, वाढत जाईल. त्या वाढणाऱ्या वजनांच्या भाराखाली तुम्ही दबून जाल. भावनांच्या कल्लोळाच्या तडतड बाजाने तुम्ही वेडे व्हाल वेडे. आताच वेळ आहे ही वेडेपाणाची शाल फेकून द्यायची.मग कशाची वाट पहाता, फेका ना, बघा निसर्ग कसा हिरवाईचं कवच पांघरुन डोलत आहे.

पहा पहा ते निसर्गरंग फौंडेशनचे मा.कुलदीप देवकुळे याचे निसर्ग वारकरी ,अविरतपणे पाच वर्षे झाडे लावण्याचे अन् ते संवर्धन करण्याचे महान कार्य एक वारी म्हणून करीत अाहेत.विठ्ठलाच्या भेटीसाठी जातांना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सुस्वरे आळविती”ही तुकोबाची वाणी खरी करीत त्यांचा वारसा जपत कार्य करीत आहेत, “निसर्गराया भेटू या “. हे बिरूद घेऊन  हिरवेपणाचं हिरवेपणा जपत आहेत ,यांच्या हातात हात घालून आपणही थोडं यांच्या बरोबर चालत एकतरी झाड लावू या. या धरणीमातेचे ऋण फेडू या.कोणाच्या आदेशाची वाट पहात आहात ? तुम्ही  निसर्गात जा निसर्गाला सजवा,नटवा, फुलवा तरच आपले मानवी जीवन सुखी समृध्द होईल असा संदेश देत सांगलीपासून पेड पर्यंतचा निसर्ग वारीतील प्रवासात सायकलस्वारांनी ठिकठिकाणच्या गावात वृक्षारोपण करीत समाजाला देश वाचवा व पर्यावरण वाचवा असा संदेश कृतीतून दिला. मग आपणही  मनात निश्चय करा, साहित्य-सांस्कृतिक छावणीतील मुख्य वजीर-इ- आलम, ऐपतदार होऊ या. चला गड्यानो व्हा हिरवे गालीचे, खळखळणारा झरा अन् वाहत राहा पाण्याच्या झुळझुळणा-या झ-यासारखे.

निसर्गरम्य कवी संमेलनाच्या निमिताने पेड ता.तासगाव, सुंदरलाल बहुगुणा नगरी जि.सांगली येथे  दयासागर बन्ने, अभिजित पाटील, गौतम कांबळे, संजय ठिगळे, तानाजी जाधव, प्रतिभा जगदाळे, कु.खाडे, सुनीता बोर्डे-खडसे  यांच्या समवेत जाण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळी तेथील निसर्ग परिसर पाहून प्रभावित झालो अन् माझ्या मनात ज्या भावना आल्या त्या व्यक्त केल्या.

चला तर आपणही होऊ या एखादे झाड.

आणि पेरत राहू हिरवळ.निसर्गराया भेटूया चला विठ्ठल. पेरु या!

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे… ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ,रंग,भाव असतात.तसेच परस्पर भिन्न अर्थ असणारे पण वरवर एकच भासणारे अपवादात्मक शब्दही असतात.

‘वसा’ हा अशा अपवादात्मक शब्दांपैकीच एक. अक्षरे तीच.शब्दही तेच.पण अर्थ मात्र भिन्न. व्रत,नेमधर्म या अर्थाचा असतो तो ‘ वसा ‘ हा एक शब्द आणि स्निग्ध पदार्थ या अर्थाचाही ‘वसा’ हाच दुसरा शब्द.दोघांमधली अक्षरे तीच म्हणून चेहरामोहराही सारखा तरी DNA पूर्णत: वेगळा. स्निग्ध पदार्थ म्हंटले की तेल,लोणी,तूप,वंगण,मेण या सारखे पदार्थ चटकन् नजरेसमोर येतात पण या अर्थाने ‘वसा’ शब्दाकडे पाहिले की असा एखादा विशिष्ट पदार्थ नजरेसमोर मात्र येणार नाही.’मेदयुक्त पदार्थ’ या व्यापक अर्थाच्या वसा या शब्दात अशा सर्वच स्निग्ध पदार्थांचा समावेश होत असला तरी त्या अर्थाने वसा हा शब्द फारसा प्रचारात मात्र आढळून येत नाही.

वसा हा शब्द व्रत या अर्थाने मात्र सर्रास वापरला जातो.निदान वरवर तरी व्रत आणि वसा हे दोन्ही शब्द समानार्थी वाटतात आणि कांही अंशी ते तसे आहेतही. व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांचा समान अर्थ म्हणजे ‘नेम’ !’नेम’ हा शब्द मला तरी ‘नियम’ या शब्दाचा  बोलीभाषेत रूढ झालेला अपभ्रंश असावा असेच वाटते. कारण व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांना ‘नियम’ या शब्दात असणारा नियमितपणाच अपेक्षित आहे हे लक्षात घ्यायला हवे.’नेम’ या शब्दाचे मात्र लक्ष्य, उद्दिष्ट ,रोख,शरसंधान असे व्रत किंवा वसाशी काही देणेघेणे नसणारेही अर्थ आहेत. त्यामुळे स्वतः साठी एखादा ‘नेम’ म्हणजेच ‘नियम’ ठरवून घेणे आणि तो सातत्याने पाळणे हेच व्रत किंवा वसा दोन्हींनाही अपेक्षित आहे.

व्रत या शब्दाचे संकल्प, उपवास हे अर्थ वसा या शब्दालाही अभिप्रेत आहेत.तथापी व्रत हे सदाचरण, ईशसेवा, भक्ती, आराधना यास पूरक असेच असते.पण वसा या शब्दाचा अवकाश यापेक्षा अधिक आहे. व्रत आणि वसा या दोन्हीमध्येही अध्यात्मिक उन्नतीसाठी स्वीकारलेले नेमधर्म गृहीत आहेतच पण वसा या शब्दात त्याहीपेक्षा अधिक व्यापक अर्थ सामावलेला आहे.

या व्यापक अर्थाला स्वतःचे जन्मभराचे उद्दिष्ट ठामपणे ठरवून स्वीकारलेला आचारधर्म अपेक्षित असतो.

कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात अडकून न पडता दीनदुबळ्यांची,वंचितांची सेवा करण्यासाठी, सामाजिक उन्नतीचा ध्यास घेत अनिष्ट प्रथा ,रूढी ,परंपरा यातल्या तथ्यहीन गोष्टी कालबाह्य ठरवून समाजाचा दृष्टिकोन  बदलण्यासाठी, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन तन-मन-धनाने स्वतःचे आयुष्य राष्ट्राला अर्पण करून

राष्ट्रहिताला वाहून घेत ज्या थोर स्त्री-पुरुष महात्म्यांनी स्वतःची उभी आयुष्ये वेचलेली आहेत, स्वतःच्या स्वास्थ्याचा, सर्वसुखांचा त्याग करून, असह्य हालअपेष्टा  सहन करुन आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्या त्या प्रत्येकाने अतिशय निष्ठेने तरीही डोळसपणे स्वीकारलेला जीवन मार्ग हा त्यांच्यासाठी त्यांनी घेतलेला आयुष्यभरासाठीचा ‘वसा’च होता ! यातील  ‘डोळसपणे’ या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यायला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे खालील प्रसिद्ध काव्य उचित ठरेल !   की घेतले न हे व्रत अंधतेने

लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग

 माने

  जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे

    बुध्दयाची वाण धरिले करी हे सतीचे!

‘एखादे दिव्य कार्य दाहक हे असणारच. त्याचे चटके बसणारच. पण सतीचे वाण घ्यावे तसे आम्ही स्वखुशीने हे स्वीकारलेले आहे. अंधतेने नव्हे !’

स्वातंत्र्यवीरांची या काव्यामधे  व्यक्त झालेली निष्ठा आणि निर्धार ‘वसा’ या शब्दाचा पैस किती अमर्याद आहे याची यथोचित जाणिव करुन देणारा आहे !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 18 – असतील शिते तर जमतील भुते ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 18 –  असतील शिते तर जमतील भुते ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प

नरेंद्र ब्राह्मो समाजाच्या कामात, त्यांच्या मतप्रणालीत आतापर्यंत चांगला मुरला होता. त्यामुळे श्री रामकृष्णांबरोबर पूर्ण वेळ काम करण्याचे अजून त्याचे मन मानत नव्हते. बर्‍याच दिवसांत नरेंद्र दक्षिणेश्वरला गेला नव्हता. त्यामुळे रामकृष्णांचे मन सुद्धा नरेंद्रला भेटण्यास उत्सुक होते. ब्राह्मो  समाजात गेलं तर, नरेंद्र तिथे नक्की भेटेल असं त्यांना वाटलं आणि ते सरळ संध्याकाळी उपासनेच्या वेळी ब्राह्मो समाजात गेले. त्यावेळी आचार्य, वेदिवरून धर्मोपदेश देत होते. त्यांच्या ईश्वरीय गोष्टी ऐकून रामकृष्ण सरळ वेदीजवळ जाऊन पोहोचले, याचा अंदाज नरेंद्रला होताच. लगेच तोही त्यांच्या पाठोपाठ वेदीजवळ गेला आणि त्यांना सावरू लागला. यावेळी आचार्य, आसनावरून उठले नाहीत आणि रामकृष्णान्शी बोलले देखील नाहीत. साधा शिष्टाचार सुद्धा पाळला नाही. नरेन्द्रनी, कसेतरी     श्री रामकृष्णांना सभागृहाबाहेर काढून, त्यांना दक्षिणेश्वरला रवाना केले. त्यांचा आपल्यासाठी असा झालेला अपमान नरेंद्रला सहन झाला नाही. या जाणिवेने क्षुब्ध आणि व्यथित होऊन नरेन्द्रने त्या दिवसापासून ब्राह्मो समाजाचे काम सोडले ते कायमचेच.

नरेंद्र बी.ए.ला शिकत असतानाच विश्वनाथ बाबूंनी त्यांचे मित्र, निमईचरण बसू यांच्याकडे कायद्याच्या शिक्षणाची सोय केली होती. त्याच्या जीवनात स्थैर्य यावं, म्हणून त्यांचा प्रयत्न चालला होता. घरी नेहमी पाहुणे रावळे, येणारे जाणारे, नातेवाईक यांची वर्दळ असे. त्यामुळे नरेंद्र अभ्यासाला आजीकडे जात असे. साधे अंथरूण, आवश्यक पुस्तके, एक तंबोरा एव्हढेच त्याचे सामान असे. एकांतवास, ध्यानधारणा, कठोर शारीरिक नियम असा ब्रम्हचार्‍याचा दिनक्रम असे. काही वेळा तर श्रीरामकृष्ण सुद्धा तिथे येऊन साधनेसंबंधी उपदेश देऊन जात असत. काही नातेवाईक आणि मित्रांना हे वागणे आवडत नसे. सर्वजण आध्यात्मिकतेपासून नरेंद्रला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असत. मात्र तरीही नरेंद्र चे मित्रांना भेटणे सुरू असे.

एकदा असेच वराहनगर मध्ये मित्राकडे सर्व जमले होते. गप्पागाणी यात सर्व दंग झाले असताना, अचानक घाबरलेल्या अवस्थेत एकाने येऊन, नरेंद्रच्या वडिलांची हृदयक्रिया बंद पडून ते गेल्याची बातमी दिली. या बातमीने सगळ्या झगमगाटात सुद्धा नरेंद्रला सगळीकडे अंधार दिसू लागला. ताबडतोब तो घरी आला. ते दृश्य पाहून, पितृशोकाने नरेंद्रचे वज्रदृढ हृदय वितळून अश्रुंच्या धारा लागल्या.

आता भविष्यकाळ कसा असेल? आता दर महिन्याचा हजारो रूपयांचा खर्च कसा चालवायचा? भुवनेश्वरी देवींना आकाश फाटल्यासारखं झालं. संसारासंबंधी नेहमी उदासीन असलेल्या नरेंद्रला दारिद्र्याच्या कल्पनेने गांगरून जायला झालं. अनुकूल अवस्थेत अगदी जवळची म्हणवणारी, प्रतिकूल अवस्था येताच जवळचीच मंडळी पारखी होऊ लागली. विपन्नावस्थेत कुणी साथ देत नाहीत ही जगाचीच रीत. नरेन्द्रनाथाच्या तीक्ष्ण बुद्धीला सर्व उमजलं आणि समजलं सुद्धा. हे बसणारे चटके ते नेटाने आणि धैर्याने सहन करू लागले होते.

एकीकडे वकिलीची परीक्षा देत होते. दुसरीकडे कामधंदा, नोकरी शोधत होते. तीन चार महीने असेच गेले. घरात धान्याचा कण नसल्याने एखाद्या दिवशी सर्वांना उपाशीच झोपावे लागे. जवळच्या मित्रांना त्याने हे कळू दिलं नव्हतं. कधी अन्न आहे पण सर्वांना पुरेसे नाही. असे पाहून नरेंद्रनाथ, “आज मला एकाने जेवायला खूप आग्रह केला आहे, तेंव्हा, मी आज घरी जेवणार नाही” असे खोटेच भुवनेश्वरी देवींना सांगून कडकडीत उपास करत असे.

अशा लागोपाठ उपवासांनी तर एकदा ग्लानी येऊन  निपचीतच पडले. काही जवळचे मित्र आर्थिक मदत करायला पुढे येत, त्यांची मदत ते सविनय परत करत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा स्वीकारायची हे त्यांना असह्य होत असे. कधी कधी मित्र त्याला घरी जेवायला बोलावण्याचा प्रयत्न करीत. तेंव्हा कामाचा बहाणा करून नरेंद्र टाळत असे. नाहीतर कधी खोटा खोटा आव आणत जेवायला जात असे तेंव्हा त्यांच्या मनात कालवाकालव होऊन, डोळ्यासमोर, भुकेने कोमेजलेली आपली लहान लहान भावंडे दिसत.

तारुण्यात पाय ठेवत असतानाच भाग्यचक्र अचानक पालटल्यामुळे, पितृछत्र गेल्याने नरेन्द्रनाथ कुटुंबाचा पालनपोषणाचा भार सांभाळत असतानाच आणखी एक अरिष्ट आलं. नातेवाइकांनी कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा डाव रचून कोर्टात फिर्याद दाखल केली.

एक दिवस सकाळच्या प्रहरी उठता उठता भगवंताचे नाव घेऊन नरेंद्र अंथरुणातून उठत असताना, आईने ऐकले आणि त्वेषाने संतपून त्यांना म्हणाली, “ चूप रहा कार्ट्या, लहानपणापासून केवळ भगवान आणि भगवान. फार छान केलं भगवानानं?” हे शब्द ऐकून नरेन्द्रनाथाच्या व्यथित मनाला घरे पडली. तसच भाग्य फिरताच, वडिलांच्या जुन्या मित्रांचं वागणं पाहून नरेंद्र अचंभीत झाला. जगाच्या ह्या शोचनीय कृतघ्नतेचे बीभत्स रूप पाहून त्याचं मन बंडखोर होऊन उठलं.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पोस्टमनदादा… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ पोस्टमनदादा… ☆ सुश्री त्रिशला शहा 

(अलिकडे मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांंच्या जिव्हाळ्याचे असलेले ‘ पोस्टखाते ‘बरचं मागे पडलंय,त्यामुळे पोस्टमनची फारशी कुणाला आठवणचं येत नाही.याचसाठी हा लेख)

नमस्कार पोस्टमनदादा,

एकेकाळी पोस्ट,पत्र आणि जनता यांच्यामधे तुमच्यामुळे एक भावनिक अनुबंध गुंफला गेला होता.अत्यंत जिव्हाळ्याच नातं तुमच्यामार्फत येणाऱ्या पत्रामुळे आमच्याशी जोडलं गेल होत.आपल्या माणसाच एखाद पत्र येणार असेल तर आम्ही तुमची आतुरतेने वाट पहायचो.तुमचा तो युनिफॉर्म, खाकी शर्ट-पँट,डोक्यावर टोपी,हातात पत्रांचा गठ्ठा आणि खांद्यावर शबनम बँग,अशा तुमच्या वेगळेपणामुळे तुम्ही लांबूनही ओळखायचात.तुम्ही दिसलात की इतका आनंद व्हायचा! ज्या पत्राची आम्ही वाट पहात असायचो,ते तुम्ही नक्की आणले असणार असं वाटायचं.तुमच्यामुळेच तर आम्हाला परगावी असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळायची.आनंद,सुख-दुःख अशा सगळ्या बातम्या तुमच्यामुळेच तर कळायच्या.तुम्हालाही एखादी लग्नपत्रिका, आनंदाचे,खुशालीचे पत्र आम्हाला देताना आनंद व्हायचा.शाळेचा निकाल,नोकरीचा काँल,शहरातून आलेली एखादी मनीआँर्डर तुम्ही प्रसन्न मनाने आमच्याकडे सुपूर्द करायचात.नवविवाहित जोडपं,प्रेमीजन तर तुमची आतुरतेने वाट पहायचे.

पण एखाद्या दुःखद घटनेचे पोस्टकार्ड, तार देताना तुम्हीही तितकेच हळवे व्हायचात.तार आली म्हणजे तर घरातले सारे घाबरुनच जायचे.अशावेळी तुम्हीच ती तार वाचून दाखवायचात.ती वाचताना नकळत तुमचेही डोळे ओले व्हायचे.याच तुमच्या स्वभावाने लोकांशी आपुलकीचे नाते तयार व्हायचे.सासरी गेलेल्या मुलीची खुशाली,मुलीला माहेरची खुशाली या गोष्टी तुमच्यामुळेच कळायच्या.अशावेळी तुम्ही त्यांना एक देवदूतच वाटत होता.त्यामुळे दिवाळीची खुशी देताना तुमचाही नंबर त्यात असायचा.

पत्राची वाट पहाणं आणि त्यानंतर पत्र येण यातला हुरहुरीचा काळचं आता संपल्यासारख झालयं.या इंटरनेट,व्हाटस्अँपच्या जमान्यात तुमची कुणाला गरजच उरली नाही. किती बदललं जग सार! इथे वाट पहायला कुणाला वेळच नाही.फँक्स,ई-मेल,व्हाटस्अँपमुळे सारे जगचं जवळ आल्यासारखे झाले आहे.पाच मिनीटात साता समुद्रापार मेसेज पोहोचतोय.त्यामुळे पोस्ट आणि पोस्टमन या गोष्टी विस्मृतीत गेल्यासारख झालय.हुरहुरीतला आनंद संपलाय.आलेली पत्रे पुन्हापुन्हा वाचण्यातली गोडीच नाहीशी झालीये.जुनी तारकेटमधे घातलेली पत्रे पहाताना नकळत त्या पूर्वीच्या दिवसांची आठवण होते.हे काहीच उरले  नाही.आता फक्त मेसेज वाचणे आणि डिलीट करणे एवढचं उरलय.नाही म्हणायला ठराविक पार्सल सेवेसाठी, राखी पाठविण्यासाठी मात्र पोस्टाचा नक्कीच उपयोग होतो.पोस्टामधे पैसेही सुरक्षितपणे साठविता येतात.पण तो तेवढाच संबंध आता पोस्टाशी उरलाय हेही खरेचं

असो,कालाय तस्मै नमः इथेच थांबते. 🙏

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

आजोळी जायचा विषय निघाला आणि माझ्या मुलांच प्लॅनिंग सुरू झालं. किती दिवस जायचे गाडीत, पुढच्या सीटवर कोणी बसायचे, कोणता सिनेमा पहायचा, कोणत्या ट्रेकींगला जायचे, मोबाईल मधे कोणते गेम लोड करायचे, domino’s चा pizza, अमूलच ice-cream, डॅशिंग कार कुठे जाऊन खेळायचे, मॉल कोणता पहायचा, शॉपिंग कुठे करायचे, बापरे बाप भली मोठी यादी ती…..

आमच्या लहानपणी आजोळी जायचे म्हटले की नुसती धमाल असायची.

आगगाडीत बसून धुरांचे ढग पहात जाण्यात एक अनोखा आनंद असायचा.

आम्ही भावंडं प्रत्येक वळणावर इंजिन पहायला मिळावे म्हणून खिडकीत बसण्यासाठी धडपडत असू.

जायच्या आधी चार- पाच दिवस आमचा बॅग भरण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आत्ता सारख्या चाकांच्या बॅगा नव्हत्या त्यावेळी. त्यावेळी होत्या पत्र्याच्या ट्रंका जड च्या जड. कोणते कपडे घ्यायचे, तिथे गेल्या वर कायकाय करायचे ह्याचे नियोजन आम्हा भावंडांचे चांगले पाचसहा दिवस आधी सुरू होई. आमच्या मामाला दर मंगळवारी सुट्टी असायची. त्यादिवशी तर नुसती धमाल असायची.

मला चांगले चार मामा आणि दोन मावश्या आहेत त्यामुळे सगळे एकत्र जमलो की धमाल यायची. मला आता कौतुक वाटते ते माझ्या मामींचे एवढं सगळ्यांचे करतांना एकही आठी नाही कपाळावर. उलट प्रेमाने सगळ्यांना आग्रह करून करून वाढायच्या.

माझी आजी मात्र कडक शिस्तीची पण तेवढीच प्रेमळ. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपापली ताट धुऊन टाकायची हा तिचा नियम होता. आजी प्रमाणेच आजोबा पण कडक होते. त्यांना शिस्त आवडायची. आणखीन एक त्यांचा कटाक्ष होता तो म्हणजे प्रत्येक मुलींनी कपाळावर कुंकू लावायचेच.

त्यावेळी रोज आजोबा सगळयांना काहीना काही खाऊ आणायचे. आत्ता सारखे कॅडबरी, कुरकुरे, वेफर्स, pizza, burger असं काही नसायचे बरं का त्यावेळी. त्यावेळी आम्हाला मिळायचे ते करवंद, जांभळं, बोरं, श्रीखंडाच्या गोळ्या, गरे एकूण काय रानमेवा. आणि एक गंमत म्हणजे ते सगळ्यांना ओळीत उभं रहायला सांगत आणि स्वतः प्रत्येकाला ते वाटत.

त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि समाधान टिपण्या जोगा असायचा.

आत्ता सारखे हॉटेलिंग असं काही नसायचे त्यावेळी. बागेत डबे घेऊन जाऊन जेवायचे म्हणजेच हॉटेलिंग. काय मजा असायची सांगू त्यात !! खूप धमाल यायची. भाकरी, झुणका, वांग्याची भाजी, मसाले भात, पापड, तळलेल्या कुटाच्या मिरच्या आणि कांदा असा फक्कड ठरलेला बेत असायचा.

जेवणं झाली की मोठी मंडळी झाडाखाली चटई टाकून ताणून देत असत. आम्ही बच्चे कंपनी मात्र पत्यांचा डाव रंगवत असू. थोडसं उन उतरले की परत पकडापकडी, विटी दांडू असा खेळ रंगात येई. संध्याकाळी मात्र तिथली गाड्या वरची भेळ ठरलेली. आणि एक एक बर्फाचा गोळा.

आईस्क्रीमची सुद्धा एक धमाल असायची. मामा स्वतः ते पॉट मधे बनवायचा. खूप मेहनत घ्यावी लागते त्याला, आणि खूप वेळ लागतो, पण आजिबात तक्रार न करता आनंदाने आणि अगदी मनसोक्त ice-cream तो आम्हाला खाऊ घालायचा.

माझ्या आजोळी अंगणात छान मोठा जाई चा वेल होता. माझ्या मावसबहीणी सकाळी सकाळी त्या फुलांचे सुंदर गजरे बनवायच्या , मला काही बनवता येत नव्हता पण त्या कशा बनवतात ते पाहण्यातच खूप आनंद मिळायचा. दुपारच्या वेळी सगळे झोपले की आम्ही पत्र्यावर चढून जांभळे आणि पेरू तोडायचो. कधी सापडलोच तर एक धपाटा मिळायचा पण त्याचा काही फारसा परिणाम न होता वानरसेना दुसरे दिवशी परत पत्र्यावर हजर…

माझ्या एका मामाचे कार्यालय होते. त्यामुळे रात्री झोपायला दोन्ही बाजूला दहा दहा गाद्या घातलेल्या असायच्या. एकीकडे मुली आणि दुसरीकडे मुलं. साहजिकच आहे आम्ही सगळे मावस, मामे, आत्ते भाऊ बहीण जमलो की पंचवीस जण तर व्हायचो. मग काय रात्री पत्ते खेळणे, चिडवा चिडवी,चेष्टा मस्करी आणि गाण्याच्या भेंड्यांची मैफिल जमायची. शेवटी जेव्हा मामा चा ओरडा बसे तेव्हा शांतता पसरे.

आताना, कुठेतरी हरवली आहे ती अंगणातील जाई, जुई ,ती अमराईची मेजवानी , हरवला तो बर्फाचा गोळा, आणि तो पत्यांचा एक डाव, खरचं परत लहान व्हावं असं वाटतं परत बसावं आगगाडीत आणि परत धुरांच्या लोटांचा आनंद घेत मामाच्या गावी जावं, परत मनसोक्त दंगा करावा आणि लावावी पुरणपोळी ची पैज. रात्र रात्र जागून परत खिदळावे आणि जोरात मामाची हाक ऐकू यावी अरे झोपारे आता.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पं. शिवकुमार शर्मा…. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

 

☆ पं. शिवकुमार शर्मा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या सुप्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा यांचा संतुरवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली होती. सुरेख, देखणा, काश्मीरी सफरचंदासारखा टवटशवीत चेहरा,धवल केसांचा पसरलेला झाप, अंगातला जरकाडीचा सोनेरी कुर्ता,पायजमा,खांद्यावरची वेलबुट्टीची शाल पांघरलेला हा संगीत योगी  पाहताना मन भरुन गेले. वादनापूर्वी त्यांनी त्या अफाट श्रोतृवर्गाला नम्रपणे अभिवादन केले.आणि म्हणाले,”हे माझं भाग्य आहे की ज्या महान गायकाने सुरु केलेल्या या संगीत महोत्सवात मला माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे…मै पुरी कोशीश करुंगा..!!”

इतक्या महान कलाकाराची ही नम्रताच सदैव लक्षात राहण्या सारखी होती.

नंतरचे दीड दोन तास त्या तंतुवाद्यातून निर्माण  होणार्‍या संगीत लहरीवर श्रोते नुसते तरंगत होते. स्वर्गीय आनंदाचीच ती अनुभूती होती.

पंडीत शिवकुमार शर्मा हे मूळचे जम्मु काश्मीरचे. त्यांचे वडील ऊमा दत्त हे प्रसिद्ध गायक व तबला वादक होते.

वयाच्या पाचव्या वर्षीच शिवकुमारजींना त्यांनी गायन व तबलावादनाचे धडे द्यायला सुरवात केली.संतुर हे काश्मीरी लोकसंगीतातलं तंतुवाद्य. त्यांच्या वडीलांनीच असा निश्चय केला की,शिवकुमार हे भारतीय बनून प्रतिष्ठित भारतीय शास्त्रीय संगीत संतुरवर वाजवतील. वयाच्या तेराव्या वर्षापासून शिवकुमारजींने संतुर वादनाचे शिक्षण सुरु केले.

संगीतात संतुर व बासरीला आज मान्यता मिळाली असली तरी पूर्वी शास्त्रीय सभेमध्ये यांना समाविष्ट करुन घेण्यात विरोध होता.ही वाद्ये लोकसंगीतातील मानली जात होती. पार्श्वसंगीतात, पडद्यावर कुणी पहाडावर असेल तर,बासरी आणि खळखळत्या झर्‍याच्या काठी असेल तर संतुर अशीच धारणा त्यावेळी  संगीत क्षेत्रात होती. परंतु हरीप्रसाद चौरसिया आणि पंडीत शिवकुमार शर्मा या जोडीने मात्र या लोकसंगीतातल्या वाद्यांना शास्रीय संगीताच्या प्रवाहात आणले.

संगीत हा ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. तपश्चर्या आणि साधनेच्या मार्गाने पंडीतजींनी प्रचंड यश मिळविले आणि संतुर या वाद्याला सांगितीक प्रतिष्ठा मिळवून दिली.नवं परिमाण दिलं. तसेच पुढच्या पीढीसाठी एक आयता रंगमंच मिळवून  दिला.

या त्यांच्या योगदाना बद्दल कुणी भरभरून कौतुक केलं तर ते एव्हढंच म्हणत, “मी फक्त प्रयत्न केला…!”

केव्हीडी नम्रता. तिळमात्रही अहंकार नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची कारकिर्द सुरु झाली.

व्ही. शांताराम यांनी त्यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत करण्यासाठी त्यांना पाचारण केले.

त्यानंतर त्यांनी संतूरवादनाचे खासगी कार्यक्रम सुरु केले.

ते उत्तम तबला वाजवत. गाईड मधील, ‘पिया तोसे नैना लागे रे..’ या गाण्यात त्यांनी तबला वाजवला आहे. पं. जसराजजींनाही त्यांनी तबल्याची साथ दिली आहे. तरुणपणी

मिळालेल्या यशाने त्यांना ग ची बाधा झाली नाही. टीम वर्कचे महत्व त्यांना होते. आणि म्हणूनच ते  एस डी बर्मन, खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पंचमदा यांचे आवडते वादक होते.!

त्यांनी इराणी संतुरचाही अप्रतीम वापर केला. बॉबी, दाग, एक नजर या चित्रपट गीतांत हे विलक्षण सुंदर संतुर वादन ऐकायला मिळतं.

प्रतिभा आणि अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटगीतांना अप्रतीम चाली दिल्या. आणि त्या लोकप्रिय झाल्या. सिलसिला या चित्रपटातली गाणी सर्वज्ञातच आहेत.

अंतरराष्ट्रीय संतुर वादक म्हणून ते तुफान प्रसिद्ध झाले.

त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण , संगीत नाटक अॅकॅडमी च्या पुरस्काराने सन्मानित केले.

ज्या शास्त्रीय संगीतात संतुर वाद्याला स्थान नव्हते ,त्या संगीत सभा या वाद्याविना अपूर्ण ठरू लागल्या.या वाद्यावर दरबारी,मालकंस सारखे कठीण, अशक्य रागही त्यांनी सहजपणे वाजवले.  संगीतातला मिंड हा बहारदार प्रकारही त्यांनी लीलया हाताळला. काश्मीर संगीतातलं संतुर वादन काहीसं सूफी प्रकारातलं असतं. पण पंडीतजींनी या वाद्याची परिभाषाच बदलली. आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रवाहात या वाद्याला उच्च स्थान मिळवून दिलं.

त्यांच्या वडीलांचं स्वप्नही पूर्ण केलं.चित्रपट सृष्टीतल्या झगमगत्या प्रसिद्धीकडे त्यांनी पाठ फिरवली. आणि भारतीय शास्त्रीय संगीतातच लक्ष केंद्रीत केले. सर्व तंत्र आणि परंपरेच्या पलीकडे त्यांचं वादन होतं. त्यांचं संतुर वाजत नसे तर गात असे…

१३जानेवारी १९३८ ला जम्मु शहरात जन्मलेल्या या संगीतदूताची प्राणज्योत १०मे २०२२ ला अनंतात विलीन झाली. पण हा संगीतात्मा अमर आहे. मृत्यु हे सत्य आहे पण अस्तित्व हे चिरंजीव आहे. त्याला अंत नाही.

या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?विविधा ?

☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज मी ज्या विषयाला स्पर्श करणार आहे, हो तुम्ही बरोबरच वाचलेत, स्पर्शच करणार आहे असे मी फार जबाबदारीने म्हणतोय, त्याचे कारण म्हणजे या विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे आणि त्या वरील दोन्ही बाजूने खूपच लिखाण अगोदरच झालेले आहे !

पण म्हणून माझ्या सारख्या, दोन्ही बाजूचे विचार वाचल्यावर, ज्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे, अशा माणसाने त्या विषयी आपले मत व्यक्त करू नये असे थोडेच आहे?

“तो” अस्तित्वात आहे का नाही या विषयावर शतकानुशतके वाद चालू आहेत आणि जिथ पर्यंत मानव जात या पृथ्वीतलावर आहे, तिथपर्यत ते वाद असेच चालू राहतील यात कोणाला काडीचीही शंका घेण्याचे कारण नाही.

“तो”आहे असे मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या मते, “त्याची” मर्जी असेल तरच झाडावरची पाने हलतात, फुले फुलतात एवढेच कशाला तर  “त्याच्या” मर्जीनेच चंद्र, सुर्य उगवतात अथवा मावळतात, पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते, वगैरे वगैरे. 

“तो’ नाहीच असे मानणारा जो वर्ग आहे, ते आपली बाजू मांडतांना विरुद्ध वर्गाची मते,  शास्त्रीय आधार देवून खोडून काढतात !

“त्याच्या” अस्तित्वाबाबतची दोन्ही गटांची मते, एक आहे रे आणि दुसरा नाही रे, आपण जर नीट वाचलीत, ऐकलीत,  तर आपल्या असे लक्षात येईल की ती दोन्ही मते इतकी टोकाची असतात की आपल्यास असे वाटवे की, एकजण उत्तर धृवा वरून बोलतोय तर दुसरा दक्षिण !  या मध्ये माझ्या सारख्या माणसाचा फारच म्हणजे फारच पोपट होतो बुवा  !  म्हणजे कधी उत्तर धृवाचा जे बोलतोय ते खरे वाटाते, तर कधी दक्षिणेचा जे सांगतोय ते पण पटावे !

मी या बाबतीत एक observe  केले आहे की, दोन्ही धृवावरील लोकांचे इतके प्रचंड brain washing झालेले असते, की त्यापैकी कोणीही दुसऱ्या बाजूचे मत ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो. फक्त आपापल्या धृवावरुन आपणच कसे बरोबर आहोत, हेच  ओरडून ओरडून सांगत असतो आणि एकमेकास challenge करीत असतो !

हे उत्तर आणि दक्षिण ध्रुववाले आपापल्या विचाराने इतके भारावून गेलेले असतात, की

या दोन्ही गटांना आपला काही लोकांकडून राजकारणासाठी कसा उपयोग करून घेतला जातो आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही म्हणा, अथवा त्या योगे आपल्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या पुढे ते त्याकडे काणाडोळा करीत असावेत !

पण या सगळ्या गोंधळात, त्या दोन्ही गटांकडे तटस्थपणे पाहणाऱ्या लोकांचा मला फार म्हणजे फार हेवा वाटतो ! हे लोक दोन्ही बाजू अगदी लक्षपूर्वक ऐकल्याचे दाखवतात आणि शेवटी आपल्या जे करायचे आहे तेच करतात !

समजा, आपल्या अत्यंत जवळच्या अशा प्रिय व्यक्तीचे त्याच्या जीवावर बेतणारे,  operation एखाद्या डॉक्टरने आपले कौशल्य पणाला लावून, आठ-नऊ तास खर्च करून, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे प्राण वाचवले असतील, तर त्या डॉक्टर मध्ये एखाद्याला “तो” दिसू शकतो !

मला असे वाटत की “तो” कधी कुणाला कुठे दिसेल याचा नेम नाही.  एखाद्याने आपल्याला अत्यंत अडचणीच्या वेळी जर योग्य मदत केली असेल आणि आपले त्या वेळेस जीवावरचे संकट दूर झाले असेल, तर आपण “त्याला” मदत करणाऱ्या माणसात बघतो आणि त्याचे उपकार जन्मभर विसरत नाही !

मग मला प्रश्न असा पडतो की “तो” खरच आहे का नाही आणि असलाच तर त्याचे नेमके रूप काय ? यावर निर्गुण, निराकार असे शब्द आपल्याला ऐकवले जातात ! पण त्याने माझे तरी समाधान होत नाही बुवा !

माझ्या मते आपण जर “त्याला” नीट शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या रोजच्या जीवनात “तो” आपल्याला ठाई ठाई दिसत असतो, अनुभवायला येत असतो, पण त्या साठी आपली नजर पारखी पाहीजे !

आपल्याला सुद्धा अशी पारखी नजर लाभो हीच सदिच्छा !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares