श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? उर्वशी आणि सज्जन ! ?
“न..म..स्का..र
पं..त,
हा….
तु..म..चा
पे…प….र !”
“अरे मोऱ्या, एवढी थंडी वाजत्ये तर पेपर न्यायचाच कशाला म्हणतो मी ?”
“त्याच काय आहे ना पंत, तुमचा पेपर वाचल्या शिवाय दिवसाची सुरवातच झाल्या सारखी वाटत नाही बघा मला !”
“म्हणजे रे काय मोऱ्या ? माझ्या पेपरला काय जगा वेगळ्या बातम्या असतात की काय ? मुंबईला ‘अभूतपूर्व थंडी’ ही बातमी माझ्या पेपरात काय, ‘मुंबईत उष्णतेची लाट’ अशी थोडीच छापणार आहेत ?”
“तसं नाही पंत, पण चहा पिता पिता तुमचा पेपर वाचला, की लगेच हेड ऑफिसचा कॉल येतो आणि एकदा का तो कॉल व्यवस्थित पार पडला, की सारा दिवस कसा उत्साहात जातो माझा !”
“अरे गाढवा, पण ज्या दिवशी पेपरला सुट्टी असते तेव्हा काय करतोस रे ?”
“जाऊ दे पंत, त्या विषयी नंतर बोलू ! पण मला एक सांगा, तुम्हांला कशी नाही थंडी वाजत या वयात ?”
“या वयात म्हणजे ? गधड्या आत्ता कुठे माझी सत्तरी आल्ये !”
“हॊ, माहित आहे मला, पण या वयात अंगातलं रक्त कमी होतं आणि त्यामुळे थंडी जास्त वाजते असं म्हणतात, म्हणून म्हटलं !”
“अरे आमची जुनी हाडं पेर ! असल्या बारा अंशाच्या थंडीला ती थोडीच भीक घालणार आहेत !”
“पंत, पण थंडी वाजू नये म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करतच असणार ना ?”
“हॊ करतो नां! अरे मस्त आल्याचा चहा घेतो दोन तीन वेळेला आणि पाती चहाचा काढा सुंठ, काळी मिरी घालून उकळत ठेवला आहे बायकोने, तो पण घेतो मधून मधून ! मग थंडीची काय बिशाद !”
“अच्छा ! पण पंत तुम्हाला एक सांगू का, आपल्या मायबाप सरकारला यंदा आलेल्या बोचऱ्या थंडीची चाहूल आधीच लागली होती, असं मला आता वाटायला लागलंय !”
“असं कशावरून म्हणतोयस तू मोऱ्या ?”
“अहो पंत असं काय करता, सध्या सगळ्या पेपर मधे एकच विषय तर घटा घटा प्यायला, सॉरी, चघळा जातोय ना, वाईन, वाईन आणि फक्त वाईन !”
“तू म्हणतोयस ते बरोबर आहे रे मोऱ्या. अरे त्या वाईनच्या बातम्यांनी किराणामालाच्या दुकान मालकांचे गल्लेपण गरमा गरम झाले असतील नाही !”
“बरोब्बर पंत !”
“मोऱ्या, पण मला एक सांग, आपल्या चाळीच्या कोपऱ्यावरच्या ‘उर्वशी साडी सेंटर’ मधे सकाळ पासून खरेदीसाठी लाईन कशी काय लागलेली असते हल्ली ? काल परवा पर्यंत त्या दुकानात काळं कुत्र सुद्धा फिरकत नव्हतं रे !”
“अहो पंत तो पण वाईनचाच महिमा !”
“काय सांगतोयस काय मोऱ्या ?”
“अहो पंत, त्या उर्वशी साडी सेंटरच्या मालकाने एक स्कीम चालू केली आहे !”
“कसली स्कीम ?”
“अहो पहिल्या शंभर गिऱ्हाईकांना एका साडीवर एक वाईनची बाटली फुकट ! म्हणून तर सकाळ पासून गर्दी असते तिथे !”
“अरे पण नवीन सरकारी नियमांप्रमाणे साडीच्या दुकानात वाईन विकायला परमिशनच नाही, मग तो …..”
“अहो तो वाईन विकतच नाही, तो साडयाच विकतो ! पण एका साडी खरेदीवर तो एक कुपन देतो ! ते घेवून त्याच्याच भावाच्या किराणा मालाच्या दुकानात जायचं आणि ते कुपन दाखवून वाईनची एक बाटली मोफत मिळते ती घेवून घरी जायचं !”
“हे बरं आहे, म्हणजे साडी खरेदीमुळे बायको खूष आणि वाईन मिळाल्यामुळे नवरा पण खूष !”
“अगदी बरोब्बर बोललात पंत ! पंत,
पण एक विचारू का तुम्हांला ?”
“अरे विचार नां, त्याच्यासाठी परमिशन कसली मगतोयस, बोल ! “
“पंत ह्या ब्यागा कसल्या भरल्येत तुम्ही, कुठे बाहेर जाताय का काकूंच्या बरोबर ?”
“मोऱ्या, अरे पुण्यात जाऊन येतोय दोन तीन दिवस हिच्या भावाकडे !”
“काही खास प्रोग्राम ?”
“काही खास प्रोग्राम वगैरे नाही रे ! तुला तर माहित आहेच, हिचा भाऊ पुण्यात ‘अस्सल पुणेरी अर्कशाळा’ चालवतो ते !”
“हॊ मागे काकूंनी सुनीताला ओव्याच्या अर्काची बाटली दिली होती एकदा !”
“हां, तर त्याच हिच्या भावाने त्याच्या अर्कशाळेत, अथक परिश्रमातून साबुदाण्यापासून बनवलेली, उपासाला चालणारी, ‘सज्जन वाईन’ बनवल्ये आणि त्या वाईनच्या पहिल्या बाटलीच बूच, मी माझ्या हस्ते उघडून त्याच्या या नवीन वाईनच मी उदघाट्न करावं असं माझ्या मेव्हण्याला वाटत, म्हणून चाललोय पुण्याला !”
“धन्य आहे तुमची आणि तुमच्या त्या सज्जन मेव्हण्याची !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
ताजा कलम – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈