मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्य एक प्रवास ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ? 

☆ आयुष्य एक प्रवास ☆सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आयुष्य.. ! तसं पाहिलं तर आयुष्य हा एक प्रवासच असतो. प्रत्येक व्यक्तीला तो करावाच लागतो. अगदी लहानपणापासूनचा हा प्रवास अगदी स्वतःच्या नकळत येणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर करावा लागतो.. तसे पाहायला गेलं तर आयुष्याच्या प्रवासाचं वर्णन करणं सोपं नाही. प्रत्येकाचेच आयुष्य वेगळे असते आयुष्याचा प्रवासही वेगवेगळाच म्हणायचा.. माझं ही तसंच समजा… छोटा का होईना?..

ह्या प्रवासात वेगवेगळी वळणे येत असतात पण ह्या प्रवासाची खरी गमंत म्हणजे प्रत्येकाचाच प्रवास हा अगदी भिन्न असतो. काहींसाठी हा प्रवास खडतर तर काहींसाठी खूप मजेशीर असतो. काहींना ह्या  प्रवासाचा हेवा वाटतो तर काहींना तो नकोसा वाटतो. पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा ह्या प्रवासात नवीन वाटा  येतात.. अनोळखी वाटा एकत्र होतात नवीन व्यक्ती येतात आणि एकाच वाटेने प्रवास करत आपल्याला सोबत  करतात.. तसं म्हटलं तर आयुष्याचा प्रवास हा एकट्याचाच.. तरीही विधात्याने त्यात रंजकता आणावी म्हणून पेरलेली असते ती सोबत प्रत्येक वळणावर प्रवासाला वेगळा अर्थ अन् दिशा देण्यासाठी..

आयुष्य हळू हळू चालत राहणार, एका वेगळ्या वळणावर असणार, कधी अमावसेच्या रात्री सारखं अंधारमय असणार तर कधी पौर्णिमेच्या चंद्रासारखं कलेकलेनी  वाढणार.. कधी श्रावणसरी सारखं रिमझिम सुखद बरसणार..तर कधी   चैत्रातल्या कडक उन्हासारखं पोळणारं…आयुष्य कुणासाठीच न थांबणार सतत पुढे जात राहणारं.. आयुष्य प्रत्येक पावलावर नवं काही शिकविणार, अनुभवाचे धडे देणार आणि आठवणीची शिदोरी देणार आयुष्य.. हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणार… मात्रं हा प्रवास करताना माणसाला खूप काही शिकायला मिळतं.. नव-नवीन गोष्टींची अनुभूती होते आणि असचं आयुष्याचा एक एक टप्पा गाठत माणूस आयुष्यात पुढे पुढे जात असतो…कुठेतरी आपण सगळेचजण आपल्या पाठीवरती वा मनावरती आयुष्याच ओझं घेऊन प्रवास करत असतो तरी पण कुठल्यातरी वळणावर असं वाटून जातं की हा आयुष्याचा प्रवास आपण एकटे सहजपणे पूर्ण करू शकतो ? पण बारीक विचार केला तर खरंच असं होऊ शकतं का..? एकट्यानं हा आयुष्याचा प्रवास पूर्ण होऊ शकतो का ? आणि झालाच तर तो प्रवास आपल्या मनाला आनंद देणारा ठरू शकतो का..? असे कितीतरी प्रश्न.. उत्तर मात्र अनुत्तरीत… मग मात्र कुठेतरी असही वाटू लागतं की आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकालाच एका जोडीदाराची गरज असते नाही का ? परमेश्वरानं बनवलेल्या या सुंदर  कलाकृतीने दोघेही एकमेकांशिवाय अपूर्णच.. असो मनावरच्या ओझ्यांबद्दल बोलायचंच झालं तर काहींना भूतकाळात केलेल्या चुकांचं ओझं, काहींना जबाबदारीच ओझं, काहींना तुटलेल्या स्वप्नाचं ओझं तर काहींना भाविष्यकाळातली स्वप्न पूर्ण करण्याचं ओझं… काहींना इतरांच्या अपेक्षांचं ओझं तर काहींना स्वतःच निर्माण केलेल्या अपेक्षांचं ओझं .

पण या ओझ्यांची गंमत अशी असते की आपण जर एकटेच हे ओझे वाहत निघालो तर या ओझ्याचं वजन जड वाटायला लागतं पण जर कोणी सोबती या प्रवासात बरोबर मिळाला तर हेच ओझं हळू हळू जाणवेनासं होतं आणि बघता बघता हाच खडतर वाटणारा आयुष्याचा प्रवास एकदम सोपा होऊन जातो.. सोपा वाटायलाही लागतो… आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकालाच असा साथीदार मिळेल असं मात्र नाही. काही नशीबवान लोकांना सहज मिळून जातो तर काहींना मात्र बऱाच काळ वाट पाहावी लागते.. या आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत साथ देणारा साथीदार ज्याला मिळतो ना त्याला नशीबवान म्हणावे लागेल आणि अजूनही ज्याच्या आयुष्यात असा साथीदार कोणी आला नसेल तर विश्वास ठेवा की कुठल्यातरी वळणावरती नकळतपणे कोठून तरी  आयुष्याच्या रस्त्याला तो नक्कीच येऊन मिळेल तोपर्यंत एकट्यानं का होईना हा आयुष्याचा प्रवास चालू मात्र ठेवावा हं…. म्हणतात ना आयुष्य हे एक रेसचे मैदान आहे इथे घोडे ही आपलेच आणि सवारीही आपलीच… जिंकलो तरी आनंद आणि हरलो तरीही आनंदच…

काहीजण हा आयुष्य -प्रवास करायचा म्हणून करतात तर काहीजण ह्या प्रवासाचा मनापासून आनंद घेत असतात.. टप्प्याटप्प्याने काळा सोबत पुढे सरसावणारा हा प्रवास कधी वेग पकडतो कळतच नाही.. पापण्यांची उघडझाप झाली आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य सरले असे वाटायला लागते मग असे वाटते की आपण ह्या संपूर्ण प्रवासात  जगायचेच विसरलो… आयुष्य जगलोच नाही.. आपल्या खूप इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात. खूप प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी राहिलेली असतात, खूप साऱ्या गोष्टी गुपित बनून राहतात.. मग या थोड्या वेळात खूप जगावं वाटायला लागतं अगदी काळाचं चक्र उलट फिरवून मागे परतावेसे वाटते आणि पुन्हा एकदा भरभरून जगावेसे वाटू लागते अर्थातच प्रवासाच्या या अंतिम टप्प्यावर आल्यावर मात्र ते अशक्य असत… पण एक गोष्ट शक्य आहे ती म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असताना येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे ठरवले कि आयुष्य हे नक्कीच सुंदर वाटतं आयुष्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यातील प्रत्येक सुंदर गोष्टींचा आस्वाद घेत जगलं कि आयुष्य हे खूप सुंदर बनतं…

प्रवासातली ती वळणे, आणि वळणांवरचा तो प्रवास.. सहसा आठवणीतून मिटला जात नाही..

कारण तिथल्या काही पाऊलखुणा, प्रवास संपला तरी सहसा पुसल्या जात नाहीत..

 

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिनकोड ☆ संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग

?  विविधा ?

☆ पिनकोड ☆ संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग ☆

भारतातील पिनकोड सिस्टिम चा जनक कोकणातील ‘राजापूर’ मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल… त्यांचे नाव श्रीराम भिकाजी वेलणकर…

PIN म्हणजे Postal Index Number… १९७२ पर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची… पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या… म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे… आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा.! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.!

या सगळ्या अडचणीतून जात असताना त्यावर उपाय म्हणून  पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली… पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली…

पिनकोडची रचना अशी आहे… पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे… यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत… तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो… या मधील पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात… म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल…

११, दिल्ली…*

१२ व १३, हरयाणा…*

१४  ते १६, पंजाब…*

१७, हिमाचल प्रदेश…*

१८ ते १९ जम्मू/काश्मिर…*

२० ते २८, उत्तर प्रदेश/उत्तराखंड…*

३० ते ३४ – राजस्थान…*

३६ ते ३९, गुजरात…*

४० ते ४४, महाराष्ट्र…*

४५ ते ४९ मध्य प्रदेश/छत्तीसगड…*

५० ते ५३, आंध्र प्रदेश…*

५६  ते ५९, कर्नाटक…*

६० ते ६४, तामिळनाडू…*

६७ ते ६९, केरळ…*

७० ते ७४, पश्चिम बंगाल…*

५५ ते ७७, ओरिसा…*

७८, आसाम…*

७९, पूर्वांचल…*

८० ते ८५ बिहार आणि झारखंड…*

९० ते ९९, आर्मी पोस्टल सर्व्हिस…*

म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक विभाग दाखवतो, दुसरा अंक उपविभाग, तिसरा अंक  सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो…

उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे… यात पहिला अंक दाखवतो पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे…

*आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही… ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांना मानाचा मुजरा.

श्रीराम वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते…

 

— संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

यानंतरचा मुख्य दिवस मकरसंक्रांत. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगितली जाते. संक्रांत या देवतेने संकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा आनंदोत्सवाचा दिवस. संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांती मध्ये   हिंसेला महत्व असेल, पण सं–क्रांती मध्ये मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे संग क्रांती. प्रत्येकाने मुक्त व आनंदी जीवन जगणाऱ्या, लोकांशी संग युक्त होऊन,  षड्रीरिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा. संक्रांती म्हणजे संघ क्रांती. “संघे शक्ती कलौ युगे”. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण –उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद सुसंवाद आणि ऐक्‍याचे प्रतीक मानला जातो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (संक्रांत). (तमसो मा ज्योतिर्गमय).

संक्रांतीला तीळ  (स्नेह) आणि (गुळ)  गोडी याला महत्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची  गरज असते. ती गरज भागविणारे तीळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. आहारात वापरणे प्रकृतीला लाभदायक ठरते. तसेच तीळयुक्त पाण्याने  स्नान करतात. अध्यात्मानुसार  तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा, सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगली व्हायला, सर्वोत्तम मानले जातात. तिळाचे तेलही पुष्टीप्रद असते. या दिवशी ब्राह्मणांना दान, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे  लावतात. पितृ श्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात.तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत, अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणपोळ्या करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे .आप्तेष्टांना तिळगुळाची वडी किंवा लाडू देऊन, “तिळगुळ घ्या,गोड गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात.

“तिलवत वद  सस्नेहमं, गुडवत मधुरम वद । 

उभयस्य प्रदानेन  स्नेहवृद्धीः  चिरं भवेत ।।”

अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काहीजण पुण्यकाळ व महापुण्य काळ मुहूर्तावर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन, पूजा करून ,आरती करून, सूर्य मंत्र  २१ किंवा १०८वेळा पठण  करतात. पूजेच्या वेळी काही भाविक 12 मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यां पर्यंत वाढून, कामे यशस्वी होतात अशी समजूत आहे. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने, जप ,तप ,ध्यान आदी धार्मिक क्रियांना महत्त्व आहे. संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला, सासरचे काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हलव्याचा हार, गुच्छ ,चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून देतात. लहान बाळालाही काळे कपडे, हलव्याचे दागिने घालून, बोरन्हाण घालतात. (चिरमुरे, बोरं, भेंड, बत्तासे, चॉकलेट वगैरे). थंडीचे दिवस असल्याने काळा रंग  ऊब  देत असल्याने, काळे कपडे घेण्याची पद्धत असावी. स्त्रिया हळदीकुंकू करून तिळगुळ व दान देतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत — संक्रमण. संक्रांतीचा सण हा निसर्गाचा उत्सव आहे .भारत हा कृषिप्रधान देश असल्याने निसर्गाशी, शेतीशी निगडित असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,म्हणजे संक्रमण करतो, तो दिवस 14 जानेवारी. सूर्य भ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी, दर 80 वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. व 15 जानेवारीला संक्रांत येते. यानंतर दिवसाचा काळ मोठा, आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. धार्मिक हिंदू लोक उत्तरायणात मृत्यू यावा, असा जप करतात. मृत्यूलाही थांबवून धरणारे पितामह भीष्म हे उत्तम उदाहरण आहे.

संपूर्ण देशभर या सणाला महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटक आणि केरळ मध्ये संक्रांति ,उडुपी भागात संक्रमण, तर काही ठिकाणी, यादिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली, म्हणून त्यास उत्तरायणी असेही म्हणतात .तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते, म्हणून कापणीचा सण, असेही म्हणतात .तेलगू त्याला पेंडा पाडुंगा , बुंदेलखंडात सकृत, उत्तरप्रदेश बिहार मध्ये, खिचडी करून सूर्याला अर्पण करून, दानही  दिले जाते, म्हणून या दिवसाला खिचडी असेच  म्हणण्याची प्रथा आहे. गंगासागर मध्ये या दिवशी खूप मोठा मेळावा भरवला जातो. हिमाचल हरियाणामध्ये मगही आणि पंजाब मध्ये लोव्ही म्हणतात. मध्यप्रदेशात सक्रस, जम्मूमध्ये उत्तरैन, काश्मीर घाटी मध्ये    शिशुर संक्रांती, आसाम मध्ये भोगाली बिहू, तर ओरिसामध्ये आदिवासी या दिवशी पासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळ मध्ये तर हा उत्सव  ७–14 –21           किंवा  40 दिवसांचाही करून, संक्रांति दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये  दान घालून गुप्त दान देण्याची पद्धत आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे, पतंग उडविण्यासाठी मैदानात किंवा गच्चीत जावे लागते. आणि आपोआपच  सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही  जोडलेले आहे. त्यादृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.

सूर्याचा ( पृथ्वीचा ) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला धुंधुरमास किंवा धनुर्मास म्हणतात.( 13 डिसेंबर ते 1३ जानेवारी). मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. याबाबत पुराणातही एक कथा सांगितली आहे. या काळात एखाद्या दिवशी तरी पाहाटे स्वयंपाक करून, उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

आपल्याकडे संक्रांत हा तीन दिवसाचा उत्सव साजरा करतात. भोगी, संक्रांत ,आणि किंक्रांत.

भोगी दिवशी  सुगडाच्या (सुघटचा अपभ्रंश  सुगड असा असावा ). पूजेचे महत्व असते. मातीची नवीन गाडगी, ( घट) कोणी दोन, कोणी पाच अशी आणून, त्यापैकी एका मध्ये अगदी छोटी बोळकी ,(ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात). घालतात. ऋतूप्रमाणे शेतातून आलेले गाजर, घेवडा, शेंगा, सोलाणा, ऊस, बोर, तिळगुळ, असे जिन्नस त्यामध्ये भरून, ती देवापुढे ठेवून , त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ ,शेंगा, पातीचा कांदा ,मुगाची डाळ, तांदूळ, लोणी, वस्त्र, विड्याचे पान, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर अगदी स्नानासाठी शिकेकाई, खोबरेल तेल असे सर्व ठेवून ते  वाण स्नानापूर्वी एखाद्या सुवासिनीला  देण्याची पद्धत आहे .या दिवशीच्या स्वयंपाकात  तीळ लावून  बाजरीच्या भाकरी राळ्याचा भात किंवा खिचडी आणि वरील सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी  (या भाजीला लेकुरवाळी असे नाव आहे.) भरपूर लोणी, दही असा हा आरोग्यदायी घाट असतो.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! अल कपोने आणि दयाळू काल्या दादा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? अल कपोने आणि दयाळू काल्या दादा ! ?

“अगं ऐकलंस का, चहा टाक बघू फक्कडसा, मग तो घेता घेता तुला आणलेली एक वस्तू दाखवतो !”

“असं बोलून तुम्ही उगाच आशा लावता आणि ती वस्तू नंतर नेहमी फुसका बारच ठरते !”

“अगं आज आधी आणलेली वस्तू एकदा बघ तर खरी, मग ठरव फुसका बार आहे का ऍटोम बॉम्ब आहे ते !”

“ठीक आहे ! फुसका बार निघाला तर खाली इराण्याकडे जाऊन कटिंग पिऊन यायचा आणि ऍटोम बॉम्ब निघाला तर घरच्या आल्याच्या चहा बरोबर क्रीम बिस्कीटं मिळतील तुम्हांला !”

“ठीक आहे !  हा बघ नऊ इंच धारदार पात असलेला, गेल्या शतकातला रामपुरी चाकू !”

“उ s s ठा, ताबडतोब उ s s ठा आणि खाली इराण्याकडे जाऊन कटिंग चहा पिऊन या !”

“अगं पण माझं जरा ऐकून तर…”

“काय ऐकायचं तुमच ? घरात पाच पाच वेगवेगळे चाकू, सुऱ्या असतांना, हा रामपुरी चाकू कशाला आणलाय तुम्ही? त्याने मी काय सगळी कामं सोडून मर्डर करत सुटू की काय ?”

“अगं अशी डोक्यात राख नको घालून घेऊ ! या रामपुरीने पण अनेक खरे खून केले आहेत त्या….”

“आणि असा रामपुरी चाकू तुम्ही मला देताय आणि वर चहा मागताय ? आज आता तुम्हांला दिवसभर चहाच काय, नाष्टा, जेवण काहीच मिळणार नाहीये, कळलं ?”

“अगं जरा बैस आणि शांतपणे मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे आणि मग बोल !”

“ठीक आहे, बोला पटपट, मला भरपूर कामं पडली आहेत घरात !”

“अगं हा रामपुरी चाकू साधासुधा नाही ! याची नक्षीदार मूठ बघितलिस का ?”

“त्यात काय बघायचं? सोनेरी रंगाची आहे म्हणून….”

“अगं वेडाबाई ती खऱ्या चांदीवर सोन्याच पाणी दिलेली मूठ आहे !”

“काय सांगताय काय ?”

“मग ? अगं हा रामपुरी खास आहे म्हटलं ! गेल्या शतकात आपल्याकडे होऊन गेलेल्या ‘दयाळू काल्या दादाचा’ आहे हा !”

“अहो पण हा तुम्हाला मिळाला कुठे ?”

“अगं आपल्याकडे जी ‘दानी आणि मनी’ नावाची लिलाव संस्था आहे ना तिथून हा मी लिलावात घेतला, अँटिक पीस म्हणून !”

“मी पण ऐकून आहे त्या संस्थे बद्दल, जी लिलावातून आलेल्या अर्ध्या पैशाचे गरजूना दान करते !”

“बरोब्बर !”

“पण केवढ्याला घेतलात हा रामपुरी चाकू ते सांगा ना ?”

“अगं त्याची एक गंमतच झाली ! त्या संस्थेच्या लीलावातील सगळ्या दुसऱ्या वस्तू खूपच चढया भावाने गेल्या, पण या रामपुरी चाकूला कोणी बोलीच लावे ना !”

“का हो ?”

“अगं असं काय करतेस ? याच रामपुरीने ‘दयाळू काल्या दादाने’ तेरा श्रीमंत सावकारांचे मर्डर केले होते ना ?”

“आणि असा चाकू तुम्ही घरात घेवून आलात ? आधी तो फेकून…..”

“अगं माझं जरा ऐक ! त्या दादाने गेल्या शतकात श्रीमंत सावकारांचे मर्डर केले असले तरी त्याने त्यांचे धन गरीब लोकांतच वाटले ! म्हणून तर त्याला ‘दयाळू काल्या दादा’ म्हणतात !”

“पण हा रामपुरी आपण घ्यावा असं का वाटलं तुम्हांला ?”

“अगं त्याच काय झालं सांगतो. परवाच पेपरात एक बातमी वाचली ! परदेशातल्या जगप्रसिद्ध ‘सदबी’ या लिलाव कंपनीने, गेल्या शतकात इटालीत होऊन गेलेल्या ‘अल कपोने’ या कुप्रसिद्ध ‘गॉडफादरचे’ पिस्तूल अडीच कोटी रुपयांना, कॅलिफोर्नियात झालेल्या लिलावात विकले म्हणून ! अगं त्या पिस्तूलानेच त्या कुप्रसिद्ध ‘अल कपोनेने’ दोनशे जणांचा खून केला होता !”

“बापरे !”

“पण मजा अशी, की त्याच्यावर शेवट पर्यंत एकाही खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही बोल ! पण हां, त्याला ‘टॅक्स’ चुकवल्या प्रकरणी दोषी ठरवून फक्त साडे सात वर्षाची शिक्षा झाली !”

“कठीणच आहे सगळं!”

“अगं पण तो वर बसला आहे ना तो सगळं बघत असतो बघ ! वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्याचे निधन झाले.”

“ते सगळं ठीक, पण हा रामपुरी….”

“अगं एकदम स्वस्तात मिळाला !”

“खऱ्या चांदीची मूठ आणि त्यावर सोन्याचं पाणी दिलेला, तरी स्वस्तात कसा काय मिळाला ?”

“त्याच कारण म्हणजे त्या रामपुरी चाकूने गेल्या शतकात झालेले तेरा खून ! त्यामुळे त्या चाकूला कोणी लोकं बोलीच लावायला तयार होईनात, हे मी तुला मगाशी बोललोच.”

“बरोबरच आहे लोकांचं, असा खुनी चाकू कोण कशाला घरात….”

“हो, पण त्यामुळे ‘दानी आणि मनी’ कंपनीचे धाबे दणाणलं आणि त्यांनी त्याच्या बेस प्राईस पेक्षा खालची बोली स्वतःच डिक्लेर केली !”

“बापरे”

“तरी कोणी तो घ्यायला तयार होईना ! शेवटी कंपनीने स्वतःच एकशे एक किंमत डिक्लेर केली तरी सगळे गप्प !”

“मग ?”

“मग शेवटी मीच एक्कावन्न रुपयाची बोली लावली आणि ती कबूल होऊन मी हा अँटिक रामपुरी चाकू घरी घेवून आलो !”

“हो पण आपण याच करायचं काय ?”

“आपण काहीच नाही करायच ! हा असाच शोकेस मधे ठेवून द्यायचा ! जे काही करायच ते आपल्या नातवाने मोठा झाल्यावर !”

“म्हणजे ?”

“अगं तो मोठा झाल्यावर जेंव्हा हा अँटिक रामपुरी तो पुन्हा एखाद्या लिलावात विकेल, तेव्हा त्याला नक्कीच कमीत कमी पन्नास लाख तरी मिळतील बघ !”

“कमाल आहे बाई तुमची ! आत्ता आणते आल्याचा चहा आणि क्रीम बिस्कीटं !”

असं बोलून बायको हसत हसत किचनकडे पळाली आणि मी नातवाला त्याच्या तरुणपणी मिळणाऱ्या पन्नास लाखावर, बोटं कापली जाणार नाहीत याची दक्षता घेत हळुवार हात फिरवत, चहाची आणि क्रीम बिस्कीटांची वाट बघत बसलो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी..अगबाई! नवं वर्षंउगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू,आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मूळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

काय म्हणताय् तिळगुळजी..

तिळगुळ…सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजुन तीळगुळ घरी बनवतेस…

संक्रात..अरे पण तुझं महत्व सांग ना..नाही जमत सगळ्यांनाच स्वत: बनवायला..महत्वाचं आहे ते तिळगुळाचं  असणं,..

तिळगुळ…हे बघ तिळआणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ…हेमंत ऋतुत येते संक्रांत..

थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक ,स्निग्ध.शिवाय त्यातली अॅमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोहअसते .ते .शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का?शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक.राग हेवे दावे विसरून जायचे.नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..

मी..किती छान!!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..

संक्रांत…अगदी बरोबर!

मी..पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट कां बरं बोलतात!!

संक्रांत…कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात.याचवेळी उत्तरायण सुरु होते.हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं..

सूर्याची पूजा केली जाते.शुक्राचाही उदय होतो..

मी ..भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..

संक्रांत..हो .तामीळनाडुत पोंगल असतो.बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…

मी ..खिचडी?

संक्रांत…हो.कारण या दिवशी तुर मसुर तांदुळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे.

तीळाचे लाडु ,वड्या ,रेवडी गजक गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…

मी..वा!!किती छान माहिती मिळाली.भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे.बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानीक अभ्यास आहे…मग स्त्रीयांसाठी हळदीकुंकु,वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण पतंग उडवणे या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.

खरोखरच आज मला मी,तीळगुळ आणि संक्रांत यातील परस्पर संबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग तिळगुळ घ्या अन् गोड बोला…..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

प्रिय माहेरघरास,

सप्रेम नमस्कार,

तुला आश्चर्य वाटलं ना? आज कशी काय आठवण झाली हिला? असं नक्कीच म्हणत असशील. म्हण, म्हण. तेव्हढा हक्क आहे तुला. आठवण व्हायला विसरावं लागतं. मी तुला मुळ्ळीच विसरले नाहीय. हे तुला पक्कं ठाऊकाय. हं, एक सल ऊरात आहे. तुझ्या कुशीत शिरायला, तुला ऊराऊरी भेटायला मी किती वर्षात आले नाही!

थांब, थांब, लग्गेच गट्टी फू नको हं करु. गळाभेट जरी वरचेवर होत नसली तरी मी तुझ्याशीच  तर बोलत असते सारखी. आणि मी येत नाही तुझ्याकडं, आले तरी लगेचच माघारी फिरते याला तूच तर जबाबदार आहेस. तूच शिकवलंस ना, आपलं घर, आपलं काम, हेच प्रमाण. उगाचच इथं तिथं रेंगाळायच नाही. काम झालं रे झालं की घरी परत.

पण खरंच राहूनच गेलं तुझ्या अंगणात झिम्मा खेळणं. आठवतं तुला हादग्याची खिरापत, गोल फेर धरून म्हंटलेली गाणी, पाटावर काढलेला हत्ती आणि भिंतिवरच्या हदग्याच्या चित्राला घातलेल्या माळा? या माळांनी मला झाडांची ओळख करून दिली. या गाण्यांनी लय दिली, ठेका दिला. खिरापत वाटण्यात गंमत होती.

ती ओळखण्यात तर अधिकच मज्जा. हादग्याच्या विसर्जनावेळी माझा वाढदिवस. खूप साऱ्या मैत्रिणी, आईच्या हातची श्रीखंड पुरी, बटाट्याची चविष्ट भाजी असा साधासा मेन्यू. (त्याकाळातील जंगी मेन्यू. कारण बटाट्याची भाजी सणासुदीलाच केली जात असे.) नवा फ्रॉक, घर दणाणून सोडणाऱ्या आवाजात हदग्याची गाणी. पुन्हा नाही च धरला तसा मैत्रिणींसोबत फेर. अनेक वाढदिवस आले आणि गेले. पुन्हा तुझ्या कडं नाही येऊ शकले रे वाढदिवसाला हदग्याची गाणी म्हणायला.

हं, राहूनच गेली माझी भातुकली तुझ्या खिडकीत. इवली इवली चूल बोळकी, गूळ दाण्याचे लाडू, पण बरीचशी आंबटगोड चव रेंगाळत राहिलीय हं अजूनही. कालपरवापर्यंत सांभाळून ठेवलेली लेकीची भातुकली कामवालीच्या मुलीला देऊन टाकली. वाटत होतं त्या खेळाच्या रुपात बालपण आहेच माझं, माझ्या पक्व मनात.लेक म्हणाली देखील, ‘आई, माझ्या पेक्षा तूच रमलीस माझ्या खेळात.’

भरतकामाचे टाके, वीणकामाच्या सुया, गजगे, जिबलीची एक्कय दुख्खय, दोरीच्या उड्या…  वय वाढलं, काळ बदलला, खेळ बदलले… मन तेच आहे.परसदार नाही राहिलं, तरी तिथल्या बंबाची ऊब तीच आहे. किती दिवस झाले ना? लग्नानंतर पहिल्या वर्षी सणवार, होसमौज होत राहिली. तुझी माझी भेट होत राहिली. मला बघून तू खूष व्हायचास. मेंदीच्या पानावर रेंगाळणारं मन प्रोढ झालं. मी आई झाले.तुझ्या ऊबदार कुशीत आईकडून आईपण शिकले. माझ्यातली आई मोठी झाली. इकडं सासरी जबाबदारी वाढत गेली. मी क्वचित कधीतरी येत असे तुझ्याकडं.

परत जाण्याची गडबड दांडगी असे.तुझ्या कुशीत शिरून, तुझ्या मांडीवर डोके ठेवून पडावं, तुझ्याशी हितगुज करावं असं वाटत होतं. पण वेळ कुठं होता?….

नंतर फारशी  कधी राहिलेच नाही तुझ्या गारव्यात.माझ्या मैत्रिणी यायच्या माहेरपणाला. मी त्यात नसायचीच. कारणं काय अनेक. कधी मुलांच्या शाळा- सुट्ट्या यांच न सुटणारं सापशिडीवजा वेळापत्रक, कधी त्यांच्या आजापणाची लंगडी सबब! तर कधी माझ्या नणंदांच माहेरपण. राहून गेलंय माहेरवाशीण म्हणून आराम करणं. राहून गेलंय तुझ्या कानात सासरचं कौतुक सांगणं!! अभिमानानं सख्यांना मुलांची प्रगती सांगणं!!

आई खूपदा बोलवायची,’येत जा गं. मुलांना घेऊन.’नाही जमलं, आता वाटतं, आपणच जमवलं नाही का? आई- मावशीनं कसं जपलं त्यांचं माहेरपण? आणि आमचं आजोळ? मला का नाही जमलं? नंतर नंतर ती म्हणायची आता तुला ये म्हणणार नाही. तुला वाटलं तर ये. मी हसून मान झटकत असे… वेळ कुठं होता?..

पुढं मुलं मात्र कॉलेजच्या शिक्षणासाठी आजी आजोबांपाशी काही काळ राहिली. लेक मित्रांना घेऊन जात असे आजीकडं वरणभात चापायला.लेकीनं तर आजीची कॉफी जगप्रसिद्ध केली. रात्री त्या दोघांच्या बरोबर गप्पा मारत जेवत तेंव्हा नकळतच माझ्याच मुलांचा मला हेवा वाटत असे.आजही आजोबांच घर त्यांच्या मनात वेगळंच स्थान टिकवून आहे. तेंव्हाही मला वेळ… नव्हताच.

ती कधी बोलली नाही. बाबांच्या शेवटच्या आजारपणात तिला वाटलं नसेल का मी चार दिवस रहावं. तिला मदत करावी. थोडा शीण हलका करावा. मलाही वाटत असे, जावं चार दिवस, बाबांच्या बरोबर जुन्या आठवणीत रमावं. तशी उभ्या उभ्या एखाद्या दिवशी येत होते मी. सलगपणे चार दिवस काही राहू शकले नाही.  रात्री उशिरापर्यंत तिच्याबरोबर जागून बाबांची सेवा केली नाही मी.वेळ.. होता. नक्कीच होता.. पण..

खरंच राहूनच गेलं रे,

तुझ्या साठी वेळ देणं

तुझ्या अंगणात बागडणं

तुझ्या सुरात गाणं

तुझ्या तालात नाचणं

राहूनच गेलं

तुझ्या गळ्यात गळे घालून बेधुंद हसणं

तुझ्या कुशीत शिरून हमसून हमसून रडणं

          

तुझ्या कुशीत, तुझ्या सावलीत विश्रांती घेण्याच्या प्रतिक्षेत,

 

तुझीच दीपा

क्रमशः ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

अलीकडं घरी आम्ही दोघेच असतो.हे सकाळी दवाखान्यात जातात. त्यानंतर साधारणपणे मी एकटीच असते. त्यामुळे माझ्या दुपारवर कोणाचाही हक्क नसतो. आजही मी एकटीच दिवाणवर लोळत पडले होते. दाराची बेल वाजली. कोण बाई एवढ्या ऊन्हाचं? असं म्हणत मी दार उघडलं. दारात एक तरुणी उभी होती.

‘हाय’ ती घुसलीच घरात.

माझ्या कपाळावरील आठ्या बघून सुध्दा ती हसत हसत गळ्यातच पडली.

‘कोण तू?’ मी घुश्शातच विचारलं.( खरंतर अगोचर म्हणायचं होतं. पण जीभ आवरली.)

तोपर्यंत ती बया हातपाय पसरुन सोफ्यावर पसरलीही!

मोठ्यानं हसून म्हणाली,’ बघ, विसरलीस ना मला?’

‘छे बाई, काय ते गडगडाटी हसणं? असं का हसतं कुणी?’

आत्तापर्यंत माझं निरीक्षण पूर्ण झालं होतं.

उंच, शेलाटी, जाड- जाड दोन लांब वेण्या; त्याही पुढं घेतलेल्या! बॉटल ग्रीन बेलबॉटम, डबल कॉलरचा लाईट पिस्ता कलरचा थोडा ढगळा टॉप, कानात छोटे छोटे स्पिनर्सवाल्या डुलणाऱ्या रिंग्ज …… अं … अं …. अं.. ही तर..

‘बरोब्बर अगं मी तूच ..ती.. ती कॉलेजमधली दीपा’.

 टाळीसाठी लहानसा हात पुढं आला. मीही टाळी दिली.

‘काय हा अवतार दीपा? साडी, टिकली, बांगड्या.. . ‘

या वाक्याकडं दुर्लक्ष करून स्वयंपाकघरात जाता जाता मी विचारलं… ‘कॉफी?’

‘पळ्ळेल…’

आता मी ही हसत हसत आत वळले.

ती केंव्हाच ओट्यावर चढून पाय हलवत बसली.

‘हे काय नेसकॅफे? ब्र्यू नाही? ‘

‘नाही गं, ह्यांना ब्र्यू नाही आवडत.’

‘हो क्का? ‘

मग ओट्यावर बसूनच कॉफी चे घुटके घेत भरपूर गप्पा झाल्या.

कॉलेजच्या दीपाला मी निरखत राहिले. मला ती न्याहाळत होती. अल्लड, अवखळ, निरागस, दीपा. ठाम पण शांत दीपा. साधी, सरळ तरीही मैत्रिणींच्या घोळक्यात राहणारी, डोळ्यात सुंदर, निरामय, साधीशी स्वप्नं…

तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आला. लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. आरडाओरडा, गाड्यांच्या हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज…. दोघींनीही कानावर हात ठेवले. ती तर कपाळावर आठ्यांच जाळं घेऊन, हातात डोकं खुपसून बसली.काही वेळानंतर आवाज थोडे कमी झाले.

‘काय ग, असल्या कोलाहलात कुठं घेतलंस घर?’

‘विसरलीस तुला हवं होतं शांत, रमणीय परिसरात छोटंसं घर. कुठं आलीस तू? ‘

‘हं. हे डॉक्टर आहेत ना! मध्यवर्ती ठिकाणी बरं पडत त्यांच्या व्यवसायासाठी.’ मी पुटपुटले.

‘एवढ्या कलकाटात!, बापरे!!. कल्पनाच करवत नाही.

‘सोप्पं जातं त्यांना. खाली दवाखाना वर घर.मुलांनाही शाळा-कॉलेज जवळ. भाजी मार्केट दोन मिनिटांवर.’

‘काय म्हणतेयस ऐकूही येत नाही नीट.’

‘असू दे ग.’

‘काय? क्क क्क काय….?

रस्त्यावरचे आवाज पुन्हा वाढले बघ. धन्य आहेस बाई तू. तूच बैस इथं तुझं घर सांभाळत. मी कलटी घेते.’बाय बाय. करत ती निघूनही गेली. मी दीपा. . दीssपा . .  अशा हाका मारत राहिले.

पण ती कधीच जीना उतरुन पळाली.

मी मात्र सोफ्यात विचार करत बसले. बरोब्बर बोलली ती. तेच तर स्वप्न होतं. लहान असलं तरी चालेल, घर हवं शांत वसाहतीत, गर्दी पासून दूर.. खरंच राहूनच गेलं…

कितीदा बोलूनही दाखवलं ह्यांना की एखाद्या कमी वर्दळीच्या जागी घर होतं मनात माझं, स्वप्नातलं, इवलंसं. इथला रस्ता सकाळी सहा वाजल्यापासूनच बोलू लागतो. गाड्यांची खडखड, हॉर्न ची पीं पीं, सायलेन्सर काढलेल्या बाईक्सचा कर्णकर्कश आवाज. या सगळ्यात पक्ष्यांची किलबिल ऐकू येतच नाही. हलक्याशा झुळूकीनं डोलणाऱ्या पानांची सळसळ वाऱ्यावर विरुन जाते. रेडिओ टीव्ही मोठ्या आवाजात कोकलत असतील तरच कान वेधतात. हा वर्दळीचा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत वहात असतो. कर्णकटू सूरात वेडेवाकडे आलाप? गात असतो. ओरडत असतो. मनातलं शांतता वाटणारं घर दूर राहिलंय. हरवून गेलंय. बांधायचंच राहून गेलं… राहूनच गेलं.

क्रमशः ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

“थांब,भास्करा,थांब ! असा जाऊ नकोस.

अरे तू येणार या कल्पनेनच मी किती आरक्त झाले होते. आठवतयं ना तुला, माझं ते रूप? हवेत गारवा सुटला होता. तुझ्या लक्ष लक्ष किरणांतील एखादा किरण, वांड मुलासारखा, तुला न सांगताच, आगाऊपणानं पुढं आला होता. पण ते ही बरंच झालं. त्याच्या येण्यानच मला तुझ्या येण्याची चाहूल लागली. मी लगबगीनं उठले. अंगावरची श्यामल वस्त्रे दूर सारली. त्या नादात चांदण्यांची पैंजणं कुठं विखुरली समजलही नाही. मी तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. तुला आवडेल असं शुभ्र वस्त्र परिधान केलं. पण काय सांगू? त्या धवल वस्त्राला लाल, गुलाबी छटा  केव्हा आल्या माझं मलाही समजलं नाही. केवळ तुझ्या येण्याच्या चाहुलीन केवढा फरक पडला होता बघ! तुझं तेजस्वी दर्शन होणार या कल्पनेनच माझी अवघी काया शहारून उठली. चेह-यावर  रक्तिमा चढला.तो सा-या आसमंतात पसरला. खरच मित्रा,तुझ्या दर्शनासाठी मी किती व्याकुळ झालेली असते ते तुला कसं समजणार?

सोन्याच्या पायघड्या घालून तुझ्या आगमनाची वाट  पहात असते. आणि तू असा निष्ठूरपणे निघून जातोस? नाही, भास्करा तुला थांबावच लागेल. माझ्या प्रेमासाठी तरी थांबावच लागेल.

मान्य आहे मला की तुझ्या मागे फिरता फिरता माझं रूप मला बदलावं लागतं. मला हे ही मान्य आहे की थांबणं, गतिहीन होणं हे तुला मान्यच नाही. तुझ्या तेजाला ते शोभणारही नाही. म्हणून तर तुझी वेडी झालेली ही उषाराणी तुझी पाठ सोडायला तयार नाहीय.पण तू तरी  असा निष्ठूर का होतेस? अरे, तुझं तेजच इतकं दिव्य आहे की त्याच्यापुढे माझ्या सौंदर्याचा रक्तिमा. फिका पडून जातो. पण तरीही तुझा सहवास मला हवा आहे.मी अगदी निस्तेज झाले तरी तुझा सहवास मला हवा आहे.

पण तू तर ऐकायला तयारच नाहीस. तुझी पाऊले तर वेगानेच पडत आहेत. क्षणभर मागे वळून पहा. पाहिजे तर मी तुला आवडेल अशा रूपातच पुन्हा येते. तोच रक्तिमा, तोच शितल वारा सारं काही घेऊन येते. तुझी ही उषाराणी, तुझी अभिसारिका बनून, तुझ्या साठी संध्याराणी   होऊन  आली आहे. आता तरी थांब.माझं हे रूप   पाहशील तर तुला नक्कीच आपल्या प्रभातसमयिच्या  मंगल भेटीची आठवण होईल.थांब जरासा.

पण नाही, तू थांबणार नाहीस. सा-या विश्वासाठी वणवण भटकशील. पण माझा एक शब्दही ऐकणार नाहीस. ठीक आहे. तुझी मर्जी. तुझ्यासारख्या सामर्थ्यशाली,तेजस्वी प्रियकराला समजावणं माझ्या कुवती बाहेरचं आहे.

पण एक लक्षात  घे. तू. निघून चाललायस. आता माझ्या जीवनात काळोखच काळोख आहे.ही शुभ्रवस्त्र मला आता परिधान करवत नाहीत. हा रक्तिमाही मला आता नकोसा झालाय. बघता बघता माझा चेहराही काळवंडेल. तुझ्या विरहात माझी अवस्था दयनीय दयनीय होऊन जाईल. माझेच काय, सा-या जगाचे व्यवहार थंडावतील.

तू ही एक लक्षात ठेव.

मी तुझ्या तेजाची पूजक आहे. तुझ्या तेजानं मी दिपून तर जातेच. पण ते तेज तस मी सहजासहजी हातचं सोडणारही नाही.तुझी वाट पाहीन. मला खात्री आहे,तुलाही माझ्या विरहाची किंमत कळेल. आपलं निघून जाणं चुकलं असं तुला वाटेल आणि तू नक्की परत येशील,तुझ्या तेजाचा ताफा   घेऊन येशील मला दिपवायला.

पण……पण मनात अपराधीपणाची भावना बाळगून येशील.माझ्या समोर एकदम येणं तुला जमणार नाही. म्हणूनच आपला एखादा किरण दूत म्हणून पाठवशील, माझा अंदाज घेण्यासाठी.

मला तुझी चाहूल लागेल मी तर काय, प्रेमवेडीच!

तुझ्या येण्याच्या चाहुलीनं मी पुन्हा विरघळेन.

माझ्या कांतिवर पुन्हा एकदा रक्तिमा चढेल.

तुझ्या स्वागतासाठी मी पुन्हा एकदा हसतमुखानं सामोरी येईन.

रानपाखरांना सांगेन मंजुळ गायन करायला.

विरहात तापलेल्या तुझ्या देहाला थंडावा मिळावा म्हणून वा-यालाही आमंत्रण देईन.

मला खात्री आहे, तू नक्की येशील.

उशीरा का होईना, ख-या प्रेमाची किंमत तुला कळेल.

ये, भास्करा, ये.

तुझ्या विरहात काळवंडलेली ही उषाराणी, तिच निशाराणीचं रूप टाकून, चांदण्याचा चंदेरी शालू फेकून, पुन्हा एकदा उषाराणी बनून तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे.

मला माहित आहे, हा पाठलाग जीवघेणा असला तरी हे नातं युगायुगांच आहे. कधीच  न संपणारं. अगदी कधीच न संपणारं.!”.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कै. सिंधुताई सपकाळ

नवे वर्ष सुरु झाले आणि एका ध्यासपर्वाचा अस्त झाला. मन उदास झाले.नकळत एक पोरकी पोकळी मनात जाणवू लागली.

मृत्यु हे अंतीम सत्य आहे. राम गेले, कृष्ण गेले ,अनेक विभूतीअनंतात विलीन झाल्या..जणू पृथ्वीतलावरचे त्यांचे अवतार कार्य संपले आणि ते निघून गेले.

सिंधुताईंच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.

“..यांनी त्यांचे जीवन अर्पिले हो….”नकळत हेच उद्गार ओठावाटे बाहेर पडतात.

सिंधुताईंचा अचेतन ,शांत देह पाहतांना ,क्षणभर वाटले,या डोहातून शब्द झंकारताहेत…

“देखना एक दिन वक्ख्त भी तेरा गुलाम होगा।

मंझीले उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है..।।

संघर्षमय जीवनात त्यांनी  चैतन्यमय स्वप्ने उराशी बाळगली…

त्यांचं बाळपण खडतर..यौवनात अवहेलना..

ऊपेक्षा ,लाथाडणं ,वणवण ,पायात काटे अन् डोक्यावर प्रखर उन हीच तिच्या जीवनाची खडबडीत वाट…पण ती चालली.निर्धाराने.धडाडीने.तिची जिद्द ,तिचा विश्वास,आणि धुक्यातली तिची स्वप्नं ,आणि नारीशक्ती हेच भांडवल.डोळ्यातून गळलेला एकेक अश्रु तिने जपून ठेवला .कारण त्या अश्रुंची तिला फुले करायची होती…त्या अश्रुंतूनच निर्माण झाले विचारांचे मोती..जे तिला मिळालं नाही त्या प्रेमाचे मोती तिने  उपेक्षित ,अत्याचारित,नाकारलेल्यांवर मनसोक्त उधळले…त्या अनाथांची ती माय झाली..

निराधारांची आधारस्तंभ बनली..

एक गर्भवती स्त्री गोठ्यात एका बालिकेला जन्म देते..दगडाने ठेचून तिची नाळ कापते..स्मशानातल्या चितेवर भाकरी भाजून स्वत:च्या दुग्धधारा  जपते अन् आतल्या आत धुमसते ,पेटते ..एका युद्धासाठी तयार होते.

तिचं सोसणं तिला संपवत नाही तर घडवतं.

बळ देतं ,ताकद देतं..न्याय कुणाकडे मागायचा..

आपणच आपल्या जन्माचा न्याय करायचा ,या प्रेरणेने तिची कूसच रुंदावते…

ती एकाचीच नव्हे तर हजारो मुलांची माय बनते..

त्यांच्यासाठी  शिक्षणाची मोट बांधते.स्वावलंबनाची कास धरते.तिच्या वक्षातला पान्हा मग सागर बनतो..प्रेमाचा सिंधुसागर…..

सागर आटत नाही…

आज देहाने सिंधु अस्तित्वात नाही..

पण या सागरातल्या एकेका थेंबात तिचे अस्तित्व आहे…

बुडे तो सूर्य ऊरे तो आभास..

ज्याला नाही ठाव ते तर आभाळ…

आणि या आभाळमायेपुढे सदैव नतमस्तक…

एक प्रेममय ,सुखमय,शांतीमय समभावी समाज

निर्माण करण्याच्या निर्धाराचं सुगंधी फुल सिंधुचरणी वाहून श्रद्धांजली अर्पित….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print