मराठी साहित्य – विविधा ☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे

? विविधा ? 

☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…!

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं!

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात!! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! ?

प्रस्तुती – मानसी आपटे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषेचे वैविध्य ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.

दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.

मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.

शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी  प्रचुर शब्द येतात.

काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.

आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.

परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले.  साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी  अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली.  हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील  मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी  या नावाने प्रसिद्ध झाली.  तीच त्यांची बोली भाषा बनली.

हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला,  अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मॅटिनीचे दिवस ☆ श्री प्रकाश लावंड

?  विविधा ?

☆ मॅटिनीचे दिवस ☆ श्री प्रकाश लावंड ☆

मॅटिनीला लागलेले  चित्रपट बघणे, हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक कैफ असायचा. तो आम्ही पुरेपूर अनुभवला. त्याचे पडसाद आणि आठवणी, वयाच्या साठीतही निश्चित उर्जा  देणाऱ्या आहेत.

साधारण ४०-५० वर्षांपूर्वीचा हा कैफ आज आठवताना एक जाणवते की, केवळ चित्रपट, नट नट्या इतकेच मर्यादित नव्हते. ते तर असायचेच; पण त्याही सोबत इतर अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झाला आहे. पण गोठवलेले ते क्षण  अजूनही ताजे आहेत.

तसे कुणाचेही चित्रपट चालत; पण खरा सम्राट होता देव आनंद. शिवाय  राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमारही अनेकदा भेटत,,,शम्मी कपूर हा तर एक्का होता. सी.आय.डी, नौ दो ग्यारह, उजाला, तुमसा नही देखा, हमराही, ससुराल इत्यादी अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले.

त्या स्वप्नभारल्या शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा  जायचा. हा तो मॅटिनीचा काळ!

हा सगळा काळ भन्नाट गाण्यांचा होता. भगवान दादांचा ‘अलबेला ‘ देव आनंद चा’ असली नकली’ राजकपूरचा ‘श्री420’ दिलीप कुमार चा ‘कोहिनूर ‘ या चित्रपटांच्या गाण्यांवर पडद्यावर  पैसे उधळले जात. प्रेक्षक पडद्यासमोर डान्स करीत, एक “”बघणेबल सीन” असायचा.

मुळात थिएटर मधील चित्रपट ही संस्कृतीच आता संपली आहे. प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत हे जवळपास नाहीच.इंटरव्हल झाल्यावर येणारा थंड पेयांच्या बाटल्यावर ओपनर फिरवल्यावर येणारा आवाज आता नाही, गरम शेंगांचे कोन नाहीत. इंटरव्हल संपल्यावर वाजणारी घंटा,,, आतला मायावी काळोख, पडदा सरकल्यावर येणारा आवाज, सगळे अजून कानात साठवलेले आहेत. हा कैफ मल्टीप्लेक्स मध्ये नाही, का नाही सांगता येत नाही. मॅटिनीचं एक वेगळेपण होतं, अगदी  प्रांजळपणे सांगायचं तर चित्रपट साक्षरता वगैरे प्रकार त्याकाळी नव्हते. होते फक्त “एक वेडेपण”,,

आज सगळे बदलले आहे, टीव्ही, मोबाईल वर चित्रपट आहेत. एकपडदा थिएटर जाऊन मल्टीप्लेक्स आले, आणखी एक संस्था संपली,, काळाबाजारवाले हा देखील एक  अविभाज्य  भाग होता. या सगळ्या संस्कृतीचा!! खरं तर मॅटिनीला काळाबाजार नसायचा. त्यामुळे सिनेमा  बजेट मध्ये साजरा व्हायचा ;;

डोअरकीपर इतका स्थितप्रज्ञ माणूस सापडणे अवघड. उशीरा येणाऱ्या प्रेक्षकांना बॅटरीचा प्रकाश पाडून सीट दाखवली जायची. आपल्या सीटचा  वेध घेत  बसल्यावर उशीरा आलेल्या प्रेक्षकाचा एक प्रश्न ठरलेला, “‘किती वेळ झाला सुरू होऊन?”” या प्रश्नाला काही अर्थ नसायचा. शेजारचे उत्तर देखील तेच असायचे “”आत्ताच  टायटल संपली”” या सगळ्या उपाशी पोटीचे (अनेक वेळा ) हे आख्यान म्हणजे “मॅटिनी”.   

सिनेमाच्या आठवणी अनेकरंगी आहेत, मॅटिनी त्यातील एक छटा, केवळ माझ्याच नव्हे तर अनेक रसिकांच्या आणि  विविध  गावांच्या छटा आहेत. उद्या सिनेमा चा इतिहास लिहिला तर “मॅटिनीचा ” उल्लेख  नक्की असेल.

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारसा….राधा ओक… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वारसा….राधा ओक… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

काल सासूबाईंचे ८३ वर्षाचे भाऊ आले होते. त्यांच्याकडे बघून कोणी त्यांच्या वयाचा अंदाज बांधून दाखवावा. तरतरीत चेहरा, दात घट्ट, ऐकायला छान येतंय, हातात काठी नाही, डोळ्याला चष्मा नाही. वयपरत्वे किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सोडता तरुणांना लाजवेल असा उत्साह. मध्यंतरी मी एका पुस्तकासाठी लेखन केलं होत. त्या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या लेखिका स्वतः पुस्तक द्यायला आल्या होत्या. वय वर्ष ८०+. तरीही आवाज खणखणीत, डोळे उत्तम, सरळ बांधा. फार दूर कशाला माझ्याच घरात माझ्या सासूबाई ७४ वर्षांच्या.  पण आजही  या वयात माझ्या दुप्पट काम करतात. या सर्वांची उदाहरणे द्यायचा एकच उद्देश म्हणजे मागच्या पिढीला मिळालेलं उत्तम आरोग्य म्हणजे देणगीच नाही का? आणि इथूनच मला माझ्या नवा लेखाचा विषय मिळाला तो म्हणजे वारसा. 

आज आपल्या पैकी ७०% घरांमध्ये सकाळी नाष्ट्यापासून संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत घरात प्रत्येक कामाला बाई असतेच. नाश्ता, स्वयंपाक, केर, फरशी, भांडी. या प्रत्येक कामासाठी बहुतेक घरांमध्ये कामाची बाई लावलेली दिसते. या मुख्य कामांच्या यादीमध्ये भाजी आणणे, निवडणे, चिरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, घर आवरणे, बेसिन बाथरूम टॉयलेट घासणे, या सारखी अनेक छोटी कामं लपलेली असतात. घरात बाई लावण्यामागे प्रत्येकाच्या वेगळ्या गरजा किंवा कारणे  असू शकतात.  त्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये. पण घरातली ही सगळी कामं आपल्या हातावेगळी होऊन पण आपल्याला असे कुठले शारीरिक कष्ट पडतात, की ज्यामुळे चाळीशी पन्नाशीमध्ये गुडघे, सांधे दुखणे असे हाडाचे दुखणे किंवा शरीराच्या इतर असंख्य  व्याधी निर्माण होतात? 

एखादा दिवस बाई नाही येणार म्हटलं की आपल्याला अगदी जीवावर येतं. मग बिनधास्त त्या दिवशी आपण बाहेरून ऑर्डर करतो, किंवा मग भांडी तशीच ठेऊन देतो. पण त्यापैकी एखादे  काम आपण करावे  असं का नाही वाटत? याचं  कारण कामाची कमी होत चाललेली सवय. आज फूड प्रोसेसर, व्हेजिटेबल कटर यामुळे हाताने कणिक भिजवताना किंवा भाजी निवडताना- चिरताना होणारे बोटाचे व्यायाम होतच नाहीत. घरात केर फरशीला बहुतेक घरामध्ये बाई असते.  त्या मुळे वाकून केर काढणे किंवा बसून फरशी पुसणे हा व्यायाम होतच नाही. घरातील अशी असंख्य कामं असतात ज्यामध्ये आपल्या शरीराला उत्तम व्यायाम मिळतो. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला चाळिशीतच शरीराच्या अनेक व्याधी निर्माण होतात. कारण शरीराला काही हालचाल किंवा ताण नाहीच. दुर्दैवाने असे व्यायाम आपल्यापैकी अनेकांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत किंवा स्वतःला करायचे नसतात. किंबहुना so called वेळच नाही मिळत, या सबबीखाली ढकलले जातात. पण मग ऑफिसच्या आधी किंवा नंतर  जिम, योग क्लास इथे  व्यायाम करायला वेळ असतो. 

वारसा म्हणजे  फक्त संपत्तीवरचा हक्क, जमीन जुमला, याचा नाही बरं का. तो वारसा आहे उत्तम  आरोग्याचा, निरोगी शरीर आणि मनाचा. मागच्या पिढीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं आरोग्य जास्त चांगलं दिसत. का असेल बर असं? आज आपल्यापैकी ९०% स्त्रियांना ३५-४०शी मधेच तब्बेतीच्या असंख्य तक्रारी आहेत. पण याची खरी कारण आपण समजून किंवा जाणून घेतोय का? पूर्वी घरातली असंख्य काम घरातील बाई दिवसभर करत राहायची. त्यापैकी सगळ्याच स्त्रिया house wife नसायच्या. पण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून घरातील काम, सणवार यांचं management त्या जबरदस्त करायच्या. कारण मुळात त्यांच्याकडे स्वतःच्या घरासाठी काटकसरीनं जगायची आणि कष्ट करायची तयारी असायची. तिला आजूबाजूला बघायला देखील वेळ व्हायचा नाही. त्या बायकांना तासतासभर फोनवर बोलायला किंवा इतरांची उणीदुणी काढायला वेळ नसायचा. पण आपल्या पिढीमध्ये आपण “मला वेळच नाही ग मिळत” हे जे म्हणतो ना, त्याच्या खरं तर उलट, आपल्या कडे वेळच वेळ आहे. म्हणूनच कदाचित आपल्या पिढीमध्ये हेवेदावे, ego issues जास्त आहेत. कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा विचार करत बसण्याइतका वेळ आहे. 

आपण पुढच्या पिढीला काय देतोय? एक कृत्रिम आयुष्य जे फक्त तंत्रज्ञांच्या भोवती फिरतंय. आपल्या मुलांना स्वतःच्या गोष्टी जागेवर ठेवणे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपाट आवरणे, जेवलेलं स्वतःचं  ताट उचलून ठेवणे, अशी छोटी कामं देखील करून देत नाही. कारण त्यांच्या बघण्यात ही कामं  दुसराच कोणी तरी करतोय ज्याला पैसे दिले की आपलं काम झालं ही  भावना आपणच त्यांच्यात निर्माण करतोय, असं नाही का वाटत? आपल्या मुलांच्यात कष्टाची तयारीच निर्माण होत नाहीये. सगळं आयतं हातात मिळतं आहे. कॉलेजला जायला लागलं की   हातात गाडी मिळते,  पण मग कधी तरी चालत जायची वेळ आलीच  तर अशा वेळी मुलं कॉलेज बंक करून घरी बसतात. का? कारण कष्ट करायची तयारी नाही. 

आज आपल्याला एक किंवा फार फार तर दोन मुलं असतात. त्यामुळे त्यांना सगळं चांगलं द्यायच्या नादात आणि अति प्रोटेक्टिव्ह स्वभावामुळे आपण त्यांना अजून जास्त दुबळे बनवत आहोत. मध्यंतरी माझी एक मैत्रीण म्हणाली,  “ बर ग बाई तुला दोन मुलं आहेत. आम्हाला एकच आहे तेच जीवापाड जपायचं आहे. आमची राजकन्या आहे ती.”  प्रश्न मला दोन मुलं आहेत किंवा एक  मूल  याचा नाहीये. पूर्वीच्या काळी बायकांना ८-१० मुलं असायची.  पण म्हणून त्या त्यातल्या ८ मुलांना वाऱ्यावर नाही सोडायच्या. तसंच मला दोन मुलं आहेत म्हणजे मी एकाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आणि दुसऱ्याच्या  बाबतीत हवालदिल नाहीये. मुळात प्रश्न हा आहे की, मूल एक असो किंवा दोन, त्याला समाजात लढायची , कष्ट करायची , एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा ध्यास घेण्याची वृत्ती आपण निर्माण करतोय का नाही ? 

हा लेख म्हणजे मी काही ब्रह्मज्ञान देत नाहीये. किंबहुना मी देखील तुमच्या सगळ्यांच्यासारखीच आहे. पण स्वतःचं काही चुकत असेल तर मान्य करायची माझी तयारी आहे. तंत्रज्ञानाने माणसाला जितकं जवळ आणलं, मॉडर्न बनवलं, तितकंच पांगळही केलं. पूर्वी ६०ला सिनियर सिटीझन म्हटलं  जायचं. पण हे जर असंच सुरु राहिलं तर कदाचित येत्या काही वर्षात ४०लाच सिनियर सिटीझन म्हटलं जाईल. कारण जे म्हातारपण पूर्वी ६० नंतर यायचं, ते अलिकडे सरकत आत्ताच ४०ला येऊन पोचलंय. म्हणूनच वाटतं की आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती, पैसे याचा वारसा देण्यापेक्षा, उत्तम आरोग्यासाठी कानमंत्र देऊया, जो त्यांचं आयुष्य अजून सुंदर करायला मदत करेल.

लेखिका :-  राधा ओक

संग्राहक :- डॉ. ज्योती गोडबोले 

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निवृत्ती… ☆ श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ निवृत्ती… ☆ श्री शरद दिवेकर ☆

सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती.

माणसाचं देखील असंच  असतं. पण माणसाच्या आयुष्यात एकदाच येते का हो ही निवृत्ती ? नाही. माणूस अनेक वेळा निवृत्त होत असतो. नव्हे, त्याने प्रत्येक वेळी, प्रत्येक फेजमध्ये निवृत्ती घ्यायलाच हवी. एका फेजमधून निवृत्ती घेऊन  पुढच्या फेजमध्ये पाऊल टाकायला हवं. असं करताना त्या त्या फेजमध्ये निर्माण झालेले अनुबंध तोडण्याची काहीच आवश्यकता नाही. खरं तर अनुबंध तोडण्यासाठी नसतातच. पण माणसाने एका फेजमध्ये गुंतून राहूच  नये.

माणसाच्या अनेक निवृत्तींपैकी पहिली निवृत्ती म्हणता येईल ती  म्हणजे शालेय शिक्षण संपताना घ्यावी लागणारी निवृत्ती. हे वयच तसं असतं. आता सगळेच मित्र मैत्रिणी पांगणार असतात. इतकी वर्षे केलेला एकत्र अभ्यास, एकत्र खाल्लेला टिफिन, खेळ आणि मारामारी देखील. खुपच हळुवार आठवणी असतात आणि हुरहुर लावणारे क्षण. पण या निवृत्तीला पर्याय नसतो.

दुसरी निवृत्ती येते ती काॅलेजचं शिक्षण संपताना. पण शाळा सोडताना वाटणारी हुरहुर तेवढ्या प्रमाणात यावेळी नसते. एक चांगली बाजू असते हल्ली की काॅलेज सोडल्यावर देखील आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे ही निवृत्ती तेवढी क्लेशदायक नसते.

त्यानंतर माणूस नोकरी व्यवसायात शिरला की घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा नुसता धावत असतो, अखंड. करिअर, पैसा, सेव्हिंग्ज, आपल्या स्वप्नातील घर, मनासारखा जोडीदार आणि नंतर मुलं बाळं. त्यानंतर पाल्यांचं पालनपोषण, शिक्षण, वगैरे. कधीही न संपणारी यादी असते ही.

मुलं मुली मोठे झाले की त्यांना शिंगं फुटायला लागतात. त्यावेळी मित्रत्वाच्या भूमिकेत शिरून त्यांना सल्ला द्यावा, चांगलं वाईट काय ते समजावून सांगावं. आपल्या संस्कारांमुळे त्यांना आपलं बरंचसं पटतं. पण कधी कधी जनरेशन गॅपमुळे काही मतभिन्नता होऊ शकते. त्यावेळी त्यांच्यापासून त्या वेळेपुरती निवृत्ती घ्यावी. दुरून लक्ष ठेवावं हे ओघाने आलंच.

मुलामुलीच्या लग्नाच्या वेळेच्या आसपास आपली सेवानिवृत्ती जवळ आलेली असतेच. त्यावेळी मुलामुलीला त्यांच्या स्वतःच्या पायांवर उभं रहायला द्यावं. फार काही ढवळाढवळ करू नये त्यांच्या आयुष्यात. त्यांच्यापासून निवृत्ती घ्यावी.

मुलगा मुलगी परदेशात गेले असतील तर आपल्या व त्यांच्यात कदाचित जास्त अंतर पडू शकतं. त्याची मानसिक तयारी ठेवावी.

आयुष्यात असेही प्रसंग येतात की एखाद्याने तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करायला सांगितलेले असते आणि ते काम तुम्ही सहजरीत्या करून जाता. या कामाबद्दल तुम्हाला काही मोबदला मिळणार नसतो. तुमची तशी अपेक्षा देखील नसते. पण कौतुकाच्या दोन शब्दांची अपेक्षा मात्र असु शकते. पण खरं तर तशी अपेक्षा ठेवू नये. कारण अपेक्षापुर्ती झाली नाही तर आपल्यालाच मानसिक त्रास होतो. म्हणूनच ते काम करून मोकळं व्हावं व लगेचच त्यातून निवृत्ती घ्यावी.

एक निवृत्ती अशी देखील असावी ज्याची अनुभुती फक्त स्त्रीयाच घेऊ शकतात. पुरूष घेऊ शकत नाहीत. ती म्हणजे एकदा घरात सुन आली की सासुने मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरावं आणि सुनेचे नव्या नवलाईचे दिवस संपले की किचनचा ताबा हळूहळू सुनेकडे द्यावा. चार उपदेशाच्या गोष्टी जरूर सांगाव्यात. पण तिला मोकळीक द्यावी. तसेच तिच्याकडूनही काही नवं शिकावं, अपडेट रहाण्यासाठी.

यानंतर सर्वांच्याच आयुष्यात एकदाच येणारी निवृत्ती म्हणजे सेवानिवृत्ती. तो दिवस फारच हळवा असतो. उद्यापासून एकदम रिकामपण येणार असतं. एक मोठी पोकळी निर्माण होणार असते. काहीजण हे सगळं ग्रेसफुली घेतात आणि सहज निवृत्त होतात. पण ब-याच जणांना ते जमत नाही आणि तिथेच चुकतं त्यांचं. आता खरं तर सेकंड इनिंग सुरू करायची असते. त्या सेकंड इनिंगची तयारी अगोदरच केलेली असेल तर ती देखील एंजॉय करता येते. खुप सोपं असतं ते. आपण रोज कसं कसं आणि काय काय करायचं ते ठरवायचं आणि व्यवस्थित पार पाडायचं म्हणजे झालं. काय करता येत नाही या इनिंगमध्ये ? माॅर्निंग वाॅक, इव्हिनिंग वाॅक, व्यायाम, व्यवस्थित झोप, नाश्ता, जेवण, वगैरे. त्याच्या जोडीला वाचन, चिंतन, मनन आणि लेखनाचं अंग असल्यास उत्तमच. हल्ली तर WhatsApp,  Facebook, Blogs, इत्यादी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात. संगीताची आवड असेल तर दुधामध्ये केशरच. तसेच निसर्गात भटकावं, ज्या ठिकाणी जायचं राहीलं असेल तेथे जोडीदारासह जाऊन यावं, करायच्या  राहून गेलेल्या गोष्टी करून टाकाव्यात.

या सगळ्यात एका निवृत्तीबद्दल सांगायचंच राहिलं. रोज रात्री झोपताना सर्वांतून काही तासांसाठी सक्तीची निवृत्ती घ्यावी. म्हणजे शांत झोप लागते व दुस-या दिवशी सकाळी आपण एकदम फ्रेश असतो त्या दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. कारण नवीन दिवस म्हणजे नवीन जन्मच असतो आपला.

EVERY DAY IS A MINIATURE OF LIFE FOR BIG DREAMS.

या सर्व ब-याचशा सहजसाध्य निवृत्तींनंतर अगदी अखेरचीच निवृत्ती सहज घेता येईल का माणसाला ?

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570 

ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ टेक्निक ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? टेक्निक ! ??

“अगं ऐकलंस का, एक फक्कडसा चहा आण बघू, खूप दमलोय !”

“एवढ दमायला काय झालंय तुम्हांला ? चाळीतल्या पोरांनी ख्रिसमससाठी बनवलेलं ख्रिसमस ट्री  चढून एकदम घरात नाही नां आलात ?”

“काहीतरीच काय तुझं ? मला अजून पायाखालच नीट दिसतंय ! तुझ्या सारख्या त्या टीव्हीवरच्या रटाळ सिरीयल बघून, मला चष्मा नाही लागलाय अजून !”

“कळलं कळलं ! आता दमायला काय झालंय ते सांगा ?”

“अगं हे काय आणलंय ते बघ तरी !”

“अ s s ग्गो बाई ! डिनर सेट !”

“करेक्ट, अगं आपल्याला लग्नात मिळालेला डिनर सेट आता किती जुना झालाय ! म्हटलं घेऊन टाकू एक नवीन !”

“हो, पण त्यात एवढं दमायला काय झालंय म्हणते मी ?”

“अगं तो बॉक्स जरा उचलून तर बघ ! सेव्हन्टी टू पिसेसचा अनब्रेकेबल डिनर सेट आहे म्हटलं ! एवढा जड डिनर सेट दोन जिने चढून आणल्यावर दम नाही का लागणार ?”

“अगं बाई, खरच जड आहे हो हा !”

“आता पटली खात्री, मी का दमलोय त्याची ! मग आता तरी आणशील ना चहा ?”

“एकच मिनिटं हं !”

“आता का s य s ?”

“अहो, या बॉक्सवर Hilton कंपनीच नांव आहे !”

“बरोबर, म्हणजे तुला इंग्लिश वाचता येतं तर !”

“उगाच फालतू जोक्स नकोयत मला !”

“यात कसला जोक? तू नांव बरोब्बर वाचलंस म्हणून……”

“तुम्हांला ना, खरेदीतल काही म्हणजे काही कळत नाही !”

“आता यात न कळण्यासारखं काय आहे ? हा डिनर सेट नाही तर काय लेमन सेट आहे ?”

“तसं नाही, अहो Milton कंपनी डिनर सेट बनवण्यात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही आणलात Hilton चा डिनर सेट, कळलं ! कुठून आणलात हा सेट ?”

“अगं तुझ्या नेहमीच्या ‘महावीर स्टोर्स’ मधून ! तो मालक मला म्हणाला पण, काय शेट आज भाभीजी नाय काय आल्या तुमच्या संगाती ! मी म्हटलं शेठ, तुमच्या भाभीजीला सरप्राईज देणार आहे आज, म्हणून तिला नाही आणलं बरोबर !”

“आणि पायावर धोंडा मारून घेतला !”

“आता यात कसला पायावर धोंडा ?”

“अहो Milton च्या ऐवजी Hilton चा डिनर सेट आणलात नां ?”

“अगं तो शेठच म्हणाला, ही Hilton कंपनी नवीन आहे, पण चांगले डिनर सेट बनवते आणि Milton पेक्षा खूपच स्वस्त, म्हणून….”

“स्व s s स्त s s ! एरवी मी दुकानात घासाघिस करतांना मला अडवता आणि आज स्वतःच डुप्लिकेट माल घेऊन आलात ना ?”

“यात कसला डुप्लिकेट माल ? हे बघ या बॉक्सवर चक्क लिहलय, Export Quality, Made in USA !”

“अहो, USA म्हणजे उल्हासनगर सिंधी अससोसिएशन पण होऊ शकत ना ? मला सांगा, हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे कशावरून ?”

“अग असं काय करतेस ? शेटजीनी मला एक सूप बाउल आणि एक डिश खाली जमिनीवर आपटून पण दाखवली !”

“मग ?”

“मग काय मग, ते दोन्ही फुटले नाहीत, म्हणजे तो सेट अनब्रेकेबल नाही का ?”

“फक्त दोनच आयटम जमिनीवर टेस्ट केले ? सगळा डिनर सेट नाही ?”

“काय गं, तुम्ही बायका भात तयार झालाय की नाही हे बघायला, फक्त त्यातली एक दोनच शीत चेपून बघता ना ? का त्यासाठी अख्खा भात चिवडता ?”

“अहो भाताची गोष्ट वेगळी आणि डिनर सेटची गोष्ट वेगळी !”

“ठीक आहे, मग हा सूप बाउल घे आणि तूच बघ जमिनीवर टाकून.”

असं बोलून मी बायकोच्या हातात त्या सेट मधला सूप बाउल दिला ! तिने तो हातात घेऊन मला विचारलं

“नक्की नां ?”

“अगं बिनधास्त टाक, अनब्रेकेबल…”

माझं वाक्य पूरं व्हायच्या आत बायकोने तो सूप बाउल जमिनीवर टाकला आणि त्याचे एक दोन नाही तर चक्क चार तुकडे झाले मंडळी !

“आता बोला ? हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे म्हणून !”

“अगं पण शेठजीने खरंच सूप बाउल खाली टाकला होता पण त्याला साधं खरचटलं पण नाही. शिवाय…..!”

“एक डिश पण नां ?”

असं बोलून तिने सेट मधली एक डिश घेतली आणि ती पण जमिनीवर टाकली. मंडळी काय सांगू तुम्हांला, ती डिश पण सूप बाउलच्या मागोमाग निजधामास गेली ! ते बघताच मी उसन अवसान आणून बायकोला म्हटलं, “अगं पण माझ्या समोर त्याने या दोन गोष्टी टाकल्या त्या कशा फुटल्या नाही म्हणतो मी ?”

“अहो हेच तर त्या व्यपाऱ्यांच टेक्निक असतं !”

“टेक्निक, कसलं टेक्निक ?”

“अहो त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे तुम्हांला कधीच कळणार नाही !”

“म्हणजे ?”

“मला सांगा, त्या शेठने ज्या सेट मधल्या बाउल आणि डिश खाली टाकल्या तो सेट तुम्हांला दिला का ?”

“नाही नां, मला म्हणाला तो शोकेसचा पीस आहे, मी तुम्हांला पेटी पॅक सेट देतो !”

“आणि तुम्ही भोळे सांब त्याच्यावर विश्वास ठेवून पेटी पॅक सेट घेवून आलात, बरोबर नां ?”

“होय गं, पण मग आता काय करायच ?”

“आता तुम्ही नां, मेहेरबानी करून काहीच करू नका ! फक्त तो बॉक्स द्या माझ्याकडे, मी बघते काय करायच ते !”

“अगं पण….”

“आता पण नाही आणि बिण नाही, आता मी माझं टेक्निक दाखवते शेटजीला ! ही गेले आणि ही परत आले ! आणि हो, मी येई पर्यंत आपल्या दोघांसाठी चहा करा जरा फक्कडसा !”

असं बोलून बायकोने तो बॉक्स लिलया उचलला आणि ती घराबाहेर पडली ! मी आज्ञाधारक नवऱ्यासारखा चहा करायला किचन मधे गेलो ! माझा चहा तयार होतोय न होतोय, तेवढ्यात हिचा विजयी स्वर कानावर आला “हे घ्या !” असं म्हणत बायकोने Milton च्या डिनर सेटचा बॉक्स जवळ जवळ माझ्यासमोर आपटलाच !

“अगं हळू, किती जोरात टाकलास बॉक्स ! सेट फुटेल नां आतला !”

“आ s हा s हा s ! काय तर म्हणे सेट फुटेल ! अहो हा काय तुम्ही आणलेला डुप्लिकेट Hilton चा सेट थोडाच आहे फुटायला ?  ओरिजिनल Milton चा डिनर सेट आहे म्हटलं !”

“काय सांगतेस काय, Milton चा डिनर सेट ? अगं पण त्या शेटनं तो बदलून कसा काय दिला तुला ?”

“त्या साठी मी माझं टेक्निक वापरलं !”

“कसलं टेक्निक ?”

“लोणकढीच टेक्निक !”

“म्हणजे ?”

“अहो मी त्याला लोणकढी थाप मारली, की तू जर का मला हा Hilton चा सेट बदलून Milton चा सेट दिलास, तर मी आणखी पन्नास Milton चे सेट तुझ्याकडून घेईन !”

“काय आणखी पन्नास Milton चे डिनर सेट ? काय दुकान वगैरे….”

“अहो, मी त्याला सांगितलं पुढच्या महिन्यात माझ्या नणंदेच लग्न आहे. तेंव्हा पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मला ते हवे आहेत !”

“अगं पण तुला मुळात नणंदच नाही तर तीच लग्न…..”

“अहो हेच ते माझं  लोणकढीच टेक्निक !”

“धन्य आहे तुझी !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-१२-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज २३ डिसेंबर— 

रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते —

हृदयात दाटलेली भावांजली वहाते —-”

आपल्या रसिक श्रोत्यांप्रती आणि रसिक वाचकांप्रती जणू कृतज्ञता व्यक्त करत, असे भावपूर्ण काव्य लिहिणारे श्री. गंगाधर महाम्बरे यांचा आज स्मृतिदिन.(३१/१/१९३१ – २३/१२/२००५) 

प्रतिभावंत कवी, गीतकार, लेखक, बालसाहित्यकार, आणि याच्या जोडीने, अनुवादक, ग्रंथपाल, कोशकार– असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेले श्री. महाम्बरे. ते कोकणातून पुण्यात आल्यावर पूर्ण वेळ साहित्यक्षेत्रात रममाण होण्याआधी, त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय सुरु केला होता. आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बरीच वर्षे ग्रंथपाल म्हणूनही ते कार्यरत होते. 

अर्थात  ही त्यांची अगदी सुरुवातीची ओळख. खरी ओळख ” एक बहुरंगी बहुढंगी साहित्य-निर्माते ” हीच., 

 त्यांच्या साहित्यनिर्मितीतले वैविध्यही खरोखरच थक्क करणारे. त्यांनी अगदी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ती अशी —-

१ ) साहित्यविश्वाला समृद्ध करणारे लेखन —
आनंदाचे डोही, मराठी गझल, उत्तुंगतेचा सह्जस्पर्श, उषःकाल ( कवितासंग्रह ), किशोरनामा –
 ( कथासंग्रह ), रंग जीवनाचे ( कादंबरी ), रसिकेषु ( ललितलेखन ), वॉल्ट डिस्ने चरित्र, व्यक्तिचित्रे, सैगल, चार्ली चॅप्लिन : काळ आणि आज, विस्मरणापलीकडील पु.ल., प्रतिभावंतांच्या सहवासात,
बिजलीचा टाळ ( कादंबरी ), भावगीतकार ज्ञानेश्वर, सापेक्षी समीक्षा, प्रवासातील प्रतिभावंत,
माणसं जनातील-मनातील, मौनांकित ( चरित्र ). त्यांनी नाटककार आणि बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक असणाऱ्या मामा वरेरकर यांचे चरित्र ‘ एक अविस्मरणीय मामा ‘ नावाने लिहिले आहे. तसेच दादासाहेब फाळके यांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहे.
 
२ ) अगदी वेगळ्या विषयांवरील पुस्तके —
कोकणातले व्यवसाय व त्यासंबंधीचे मार्गदर्शन, ऑटोरिक्षा ( देखभाल व दुरुस्ती ), महिलांसाठी उद्योगव्यवसाय, लाखमोलाचे उद्योगव्यवसाय, चला जाणून घेऊ या ! अंकशास्त्र. मौलिक मत्स्यव्यवसाय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, मोडी शिका, भगवान गौतम बुद्ध आणि बौद्धधर्म, लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा, महाराष्ट्रातील समाजसुधारक, विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता, विद्यार्थ्यांसाठी उद्योगव्यवसाय, शुभंकरोती, — आणि असे बरेच काही मार्गदर्शक लेखन. याखेरीज, २१ व्या शतकाचा मराठी-इंग्रजी शब्दकोश, आणि चित्रपट क्षेत्रातल्या तांत्रिक शब्दांचा कोशही त्यांनी तयार केला होता.

श्री. महाम्बरे यांच्या काव्यनिर्मितीतही– भावगीते, चित्रपट गीते, आणि नाट्यगीते, अशी विपुलता होती.—– कंठातच रुतल्या ताना, तू विसरुनी जा रे–, निळा सावळा नाथ, पाण्यातले पहाता प्रतिबिंब, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद, संधीकाळी या अशा, सावलीस का कळे, तूच खरा आधार- देवा, अशी कित्येक उत्कट भावकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत.

धाकटी मेहुणी, युगे युगे मी वाट पहिली, सोबती, सौभाग्यकांक्षिणी, अशा चित्रपटातली त्यांची गीते प्रसिद्ध झाली होती. तसेच, गा भैरवी गा, चाफा बोलेना, तेथे कर माझे जुळती, या नाटकांमधली गीते त्यांनी लिहिलेली होती.

त्यांना मिळालेले पुरस्कार —– “ मौलिक मराठी चित्रगीते “ या रसग्रहणात्मक पुस्तकाला ‘ राष्ट्रपती सुवर्णकमळ ‘ – नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल दिल्ली तर्फे १९८३ सालचा ‘ पोएट ऑफ दि इयर ‘ पुरस्कार, – चित्रपट महामंडळाचा ‘ चित्ररत्न पुरस्कार’, – गोमंतक मराठी अकादमीची सन्माननीय फेलोशिप,– म.स.प.चा ना.घ.देशपांडे पुरस्कार ‘, –केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार. मॉरिशस नभोवाणीवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या, आणि ‘ रसिक तुझ्याचसाठी ‘ या गीताची ध्वनिमुद्रिका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती, या विशेष गोष्टी सांगितल्याच पाहिजेत अशा.

श्री. गंगाधर महाम्बरे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.

आज  “ कवितेचा उत्सव “ या सदरात वाचूया श्री. महाम्बरे यांची एक सुंदर काव्यरचना.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शि ट्टी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ शि ट्टी ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“एक…. दोन…. तीन…. चार….

चार…. तीन…. दोन…. एक….”

लहानपणी शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला, एक, दोन, तीन, चार या ऑर्डरवर आणि नंतर गुरुजींनी त्याच ठेक्यात वाजवलेल्या शिट्टीच्या तालावर, माझ्या पिढीतल्या अनेकांना कवायत केल्याचे आठवत असेल !  एवढ्या लहानपणी शिट्टीशी येणारा आपला (निदान माझा तरी) तो तसा पहिलाच प्रसंग असावा ! गुरुजींच्या गळ्यात, रंगीत दोऱ्यात अडकवलेल्या, स्टीलच्या चकचकित शिट्टीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे ! त्या काळी, ती इतक्या जोरात कशी वाजते, ह्याचेच अप्रूप वाटायचे ! पण या शिट्टीच्या आवाजाचे वर्णन आपल्या मराठी साहित्यात, फु s s s र s s s, फु s s s र s s s  असे करण्याचा पहिला मानकरी किंवा पहिली मानकरीण (शिट्टी हा स्त्री लिंगी शब्द असल्यामुळे आणि तिचा स्त्रियांशी जवळचा संबंध येतो हे नंतर वयात आल्यावर कळल्यामुळे, ही शंका मनांत डोकावली, इतकंच !) कोण असावा अथवा असावी, हा माझ्या मते संशोधनाचा विषय होईल !कारण बशीतून चहा पितांना काही जणांच्या तोंडातून येणाऱ्या आवाजाचे वर्णन सुद्धा अनेक विद्वान लेखक, लेखिकांनी फु s s s र s s s, फु s s s र s s s असेच केल्याचे आढळते ! आपली मराठी भाषा एवढी समृद्ध असतांना, दोन टोकाच्या, दोन वेगवेगळ्या आवाजांसाठी एकाच प्रकारची शब्द रचना वाचतांना, माझ्या कानांत नेहमी वेगळीच शिट्टी वाजते, एव्हढं मात्र खरं ! असो !

पुढे शालेय जीवन संपता संपता, कॉलेज प्रवेशाच्या आधी माझे बरेचसे मित्र वेग वेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या, तोंडाने वाजवण्यात पारंगत झाले होते ! त्याचा काही मित्रांना कॉलेजच्या उर्वरित वर्षात चांगलाच उपयोग झाला ! कारण त्यांनी घातलेल्या शिट्टीरुपी कुहू कुहूला, त्यांच्या त्यांच्या मैनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे, भविष्यात त्या पैकी काहींची लग्ने आपापल्या मैनांशी झाली ! पुढे हेच यशस्वी कोकीळ संसारात पडल्यावर, आपापल्या मैनांचा “अहो, जरा चार शिट्ट्या झाल्यावर आठवणीने कुकर खालचा गॅस बंद करा !” असा आदेश ऐकायची सवय त्यांना करून घ्यावी लागली, हा भाग निराळा ! पण कॉलेजातील काही उर्वरित कमनशिबी कोकीळ, मैनांना भुलवण्याच्या नादात शिट्ट्या वाजवून, वाजवून आपापल्या तोंडाची नुसतीच वाफ फुकट घालवत राहिले ! काही वात्रट मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्या सगळ्या मित्रांच्या फुकट गेलेल्या वाफेच्या एकत्रित शक्तीवर, माथेरानला जाणाऱ्या आगगाडीचे छोटे इंजिन नक्कीच धावले असते म्हणे !

इंजिनावरून आठवण झाली. ज्या काळात आम्ही आत्ताच्या “ट्रेनला” आगगाडी म्हणायचो, त्या अठरा वीस डब्याच्या अजगरा सारख्या लांबच लांब मेल किंवा एक्सप्रेसमधून प्रवास करायची बरेच वेळा त्या काळी वेळ आली ! तेंव्हा त्या गाडीचा गार्ड, गाडी सुटतांना जी शिट्टी फुकायचा ती इतकी कर्कश्य असायची की, फलाटावरच्या हजारो लोकांचा गोंगाट भेदून, वीस डबे सोडून असलेल्या इंजिन ड्रायव्हरला बरोब्बर ऐकू येत असे ! मग तो इंजिन ड्रायव्हर सुद्धा ऑल क्लिअरचा हिरवा झेंडा गार्डच्या दिशेला फडकावून, एक दोन दणदणीत इंजिनाच्या शिट्ट्या देवून आगगाडी सुरु करत असे ! गेले ते दिवस उरल्या त्या फक्त आठवणीतल्या अशा शिट्ट्या !

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे असं बघा जेंव्हा पोलीस त्यांच्या निळ्या टोपी पासून निळी हाफपॅन्ट अशा गणवेषात होते, तेंव्हा त्यांची ती स्टीलची लांबूडकी शिट्टी नुसती ऐकून चोर एका जागी थिजून जात असत ! एवढी ताकद त्या काळी फक्त त्यांच्या शिट्टीत होती ! पण सध्या गणवेशापासून सारेच ‘खिशाचे गणित’ बदलले असल्यामुळे त्या पूर्वीच्या शिट्टीला सध्याच्या युनिफॉर्ममधे खिसाच नाही, मग ती शिट्टी तरी कशी असेल ? कालाय तस्मै नमः !

एखाद्या कलाकाराची रंगमंचीय कला पिटातल्या प्रेक्षकाला आवडल्यावर, त्या कलाकाराला वन्समोअरसाठी वाजणाऱ्या टाळयांच्या जोडीला, वाजणाऱ्या शिट्यांची जातकुळी फार म्हणजे फारच वेगळी असते मंडळी ! त्या टाळ्या, शिट्या ऐकून एखादा कलाकार प्रेक्षकांची वन्समोअरची हौस पुरवतो सुद्धा, पण त्या साऱ्या गदारोळात खऱ्या रसिक प्रेक्षकांची फारच गोची होऊन जाते ! रंगमंचीय कला अविष्काराला अशी दाद मी एकवेळ समजू शकतो, पण चित्रपटगृहात हिरोच्या एखाद्या डायलॉगवर किंवा हिरोईनच्या नाचावर, तो आवडला म्हणून कानठळ्या बसण्या इतक्या शिट्ट्या वाजवायच प्रयोजन, माझ्या सारख्या रसिक प्रेक्षकाच्या बुद्धीच्या आकलना पलीकडलं आहे !

सांप्रतकाळी समस्त महिला वर्ग, पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे बरोबरी करत असतांना, या शिट्टी वाजवायच्या पुरुषांच्या पूर्वी पासून मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात कशा बरे मागे राहतील ? उदाहरणच द्यायच झालं, तर काही भगिनी शिट्टीवर वेगवेगळी गाणी म्हणण्याचे दोन अडीच तासाचे स्वतंत्र कार्यक्रमच सध्या सादर करत आहेत, हे आपल्याला ठाऊक असेलच !

मंडळी, सध्या मी शिट्टीचा जनक कोण ?  याच बरोबर ती शिट्टी पहिल्यांदा कोणी कशी वाजवली व त्याच्या आवाजाचे त्या काळी कोणावर कसे चांगले अथवा वाईट परिणाम झाले या विषयी संशोधन करत आहे ! पुढे मागे ‘शिट्टी’ विषयावरच एखादा प्रबंध लिहून, तो उत्तर प्रदेश मधल्या एखाद्या युनिव्हर्सिटीत सादर करून, डॉक्टरेट पदरात पाडून घ्यायचा विचार माझ्या डोक्यात शिट्टी वाजवून गेलाय एवढं मात्र नक्की !

ता. क. – उत्तर प्रदेशातल्या अनेकांनी “शिट्टी!” याच विषयावर आधीच डॉक्टरेट मिळवल्याचे कळले ! पण मी आशा सोडली नसून, मध्य प्रदेशातील एखाद्या युनिव्हर्सिटीत मी माझी “शिट्टी!” वाजवायचीच, असा निर्धार केला असून, आपल्या “शिट्टी” रुपी शुभेच्छांची या कामी मला नक्कीच मदत होईल !

© श्री प्रमोद वामन वर्तक

३०-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

माणूस परंपरेला चिकटून जगण्यातच धन्यता मानतो. तिथेच जीवनाची सार्थकता शोधत जगत राहतो.  त्याची ही जीवनशैली बदलण्यासाठी एका  तत्त्वनिष्ठ अजोड क्रांतीची गरज भासते आणि मग वेळोवळी सामाजिक गरजे नुसार तिच्यात काही बदलही घडत जातात. शस्त्राच्या धाकाने घडवला जाणारा बदल हा क्रांतीचा पहिला प्रकार आहे. पण घडलेली ही क्रांती तात्कालिक असते. कालांतराने तिच्यावर परंपरेचे दडपण येते. ती क्षीण बनते आणि शेवटी परिणाम शुन्य ठरते. प्रगतिशील विचार मांडणी आणि त्या नुसार विचारपूर्वक  केली जाणारी कृती हा क्रांतीचा दुसरा प्रकार आहे. पण हिच्यात सर्वसंमतीचा अभाव जाणवतो म्हणून तिच्यात म्हणावा तसा प्रभावी प्रभाव दिसत नाही. शिक्षणातून घडणारी क्रांती हा तिसरा प्रकार. ही क्रांती मात्र चिरंतन टिकणारी असते. कारण ती व्यक्तीमनाचा ठाव घेणारी असते व तिला भक्कम मजबूत पाया प्राप्त झालेला असतो. जनात होणा-या क्रांतीपेक्षा मानवी मनात होणारी क्रांती ही सर्वश्रेष्ठ असते आणि ती दिर्घ काळ टिकते. शिक्षणाने मने प्रगल्भ होतात. पहिल्या दोन्ही क्रांती शिक्षणामुळेच घडत असतात. म्हणूनच शैक्षणिक क्रांतीला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे हे नक्की. व्यक्तिच्या अंगी असणा-या सुप्त गुणांचा विकास, मानवी कर्तृत्वाला पोषक वातावरण निर्मिती, जीवन समृद्ध करणा-या चिरंतन मुल्याना प्रोत्साहन, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण , आणि माणसाला मिळालेल्या मूलभूत  स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे कार्य ख-या अर्थाने शैक्षणिक क्रांतीच करत असते. म्हणूनच ती स्थायी स्वरुपाची  क्रांती आहे. आणि तिची  प्रेरणा गुरू मुळेच मिळते. जो माणसाला  अज्ञानापसून मुक्त करतो, वैचारिक दाशस्यातून व गुलामगिरी तून मुक्त करतो, जातीपातीच्या परंपरागत कैदखान्यातून मुक्त करतो, भूतकाळाच्या उसन्या आवेशातून मुक्त करतो, मानवीस्वभावात साठून राहिलेल्या विकृती पासून मुक्ती मिळवून देतो, लिंगभेदाच्या परंपरागत जाचक जुनाट समजुतींच्या विळख्यातून मुक्त करून नवविचार प्रेरणा देतो. तोच खरा गुरू असतो. तोच जीवनाला आकार देणारा मार्गदर्शक ठरतो.

माणसाला आपल्या जीवनमूल्यांची खरी जाणीव होऊन त्याच्या जीवनाला पूर्णत्व आणि कृतार्थता प्राप्त  करून घ्यायची असेल तर, माणसाच्या अंगी प्रज्ञा , प्रतिभा , प्रार्थना , नम्रता , प्रयत्न , व कृतज्ञता या सहा गुणांचा सुंदर समन्वय असणे अत्यावश्यक आहे. प्रज्ञा माणसाचा सर्वांगीण विकास करून योग्य सुधारणावादी पर्यावरण बनवते. प्रतिभेच्या साथीला सहवेदना आणि संवेदनशीलता असेल तर माणसाला सखोल स्वरुपात समजून घेता येते. त्या योगाने नाविन्यपूर्ण नव निर्मीती ही करता येते. माणसाच्या अंगी असणारा अहंकार नष्ट करून माणसाला ईश्र्वराच्या सानिध्यात नेण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. नंम्रता माणसाच्या अंगी असणा-या मूलभूत स्वरुपाच्या चांगल्या गुणवत्तेला विनंम्रभावे अभिवादन करते. प्रयत्न माणसाला प्रगतीची वाटचाल करायला शिकवत उन्नतीच्या व यशाच्या दिशेने मार्गाक्रमण करावयास प्रेरणा देतो. कृतज्ञता माणसाला माणुसकी शिकवते. माणसांशी जवळीक साधते व केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त करते. प्राप्त परिस्थितीशी अथक संघर्ष करत उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करणे वाटते तितके सोपे नाही. पण जो ध्येयोपासक असतो तो साधक बनतो . साधनाकरतो. आणि सा-या संकटावर मात करत यशाची वाट निर्धोकपणे चालत राहतो . त्यालाही क्रांतीच म्हणावे लागेल. मानवी जीवनात सुखापेक्षा दु:खेच अधिक असतात. पण जे दुःखाने दु:खी होत नाहीत,ते दु:खालाच दु:खी करून सहज विजय मिळवतात तेच खरे क्रांती कारक असतात. ते आपल्या दु:खाचे कधीच प्रदर्शन मांडत नाहीत. त्याचे भांडवलही करत नाहीत आणि त्यांच्या पुढे शरणागतीही पत्करत नाहीत. आज अशाच क्रांतीकारकांची गरज आहे. ते मिळाले तर भारत पुन्हा सुवर्ण भूमी होईल. यात काही शंका नाही. आजच्या काळाची ही प्रमूख गरज आहे .असे मला वाटते.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पहिलं वहिलं…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

पहिलं वहिलं…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 ‘पहिलं वहिलं,  देवाला वाहिलं’ असं लहानपणी ऐकायचो आम्ही. म्हणजे असं की बागेत लावलेल्या एखाद्या झाडाला पहिलं फळ आलं आणि ते पक्ष्यांचा तावडीतून सुटून आपल्यापर्यंत पोहोचलं तर ते आपण खायचं नाही . तर ते देवाला वाहायचं. का ?  तर तसं केल्यानं भरपूर फळं येतात म्हणे. !

आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद आपल्याला नकोय. मुद्दा एवढाच की पहिलं म्हणून त्याचं खूप खूप कौतुक. खरच ! काहीही असो, पहिलं म्हटलं की त्यात उत्सुकता, कौतुक, भीती, हुरहूर हे सगळं आलंच. ते पहिलेपण मनात घर करुन रहात असत. कधीतरी, कोणत्यातरी निमित्ताने आठवणींना उजाळा मिळातो आणि मग ते पहिलं वहिलं जे काही असेल ते आठवू लागतं.

आपली पहिली शाळा, पहिला वर्ग, पहिला बाक, पहिला मित्र, सगळं कसं सहजपणे आठवत जातं. शाळेचा पहिला दिवस, त्या दिवशीची आपली अवस्था आपल्याला आठवेलच अस नाही. पण घरातल्या वडिलधा-या मंडळींकडून कधी ना कधी तो समरप्रसंग आपण ऐकलेला असतो आणि आपल आपल्यालाच हसू येतं. आता मुलांना शाळेत सोडताना त्यांची होणारी अवस्था फार काही वेगळी असत नाही. कोणी हसत हसत शाळेला जात तर कोणी रडत रडत. कुणाला थोड्या वेळानंतर रडू येतं तर कुणी इतर सवंगड्यांकडून स्फूर्ती घेऊन रडू लागत. म्हणजे इतकी वर्षे लोटली तरी शाळेच्या पहिल्या दिवसाची अवस्था फार काही बदललेली नाहीच. मग डोळ्यासमोर येतो तो पहिला मित्र किंवा मैत्रीण. काहीतरी आमिषाने तरी आपण एकत्र आलेले असतो किंवा काहीतरी जरूरी म्हणून. पण मग हळूहळू होणा-या  या ओळखीतून मैत्रीचं बीज केव्हा रूजतं समजतही नाही. पुढे मोठेपणी हा मित्र आयुष्यभर आपल्या बरोबर असेलच असे नाही. पण त्याची आठवण, मिळून केलेला अभ्यास, केलेला दंगा हे मात्र आपल्या जवळच असतं. मग मोठेपणी कधीतरी आपण त्या शाळे जवळून जातो. कधी कुणाला सोडायला तर कधी आणायला. तेव्हा त्या जुन्या खुणा आपल्याला खुणावीत असतात. शालेय जीवनातल ते पहिलेपण पुनःपुन्हा डोळ्यांसमोर येत असतं. शाळेत असो नाहीतर नंतर काॅलेजात असो, आपण मिळवलेलं पहिलं बक्षीस, सर्वांनी केलेलं कौतुक, काॅलेजच्या मॅगझिन मधून छापून येणारी पहिली कविता किंवा कथा, स्पर्धेतील पहिलं भाषण, नाटकातला पहिला अभिनय, संगीत सभेतलं पहिलं गाणं; हे सगळं सगळं खर तर इतकं सुखावणारं असतं की त्यातून बाहेरच पडू नये असं वाटतं. या प्रत्येक पहिलेपणाच्या वेळेला केलेली धडपड, मनावर आलेलं दडपण, मनात असलेला संकोच, या सगळ्यानंतर मिळणारं यश आणि त्यामुळं पुढचा प्रवास ! पण कधी कधी पहिलं अपयश, पहिल्यांदा झालेली फजिती, लोकांसमोर पहिल्यादा बोलताना लटपटणारे पाय आणि उलटसुलट फेकलेली वाक्य, मॅच चालू असताना मस्त पोज घेऊन सुद्धा उडणारा त्रिफळा ! हे सारं आठवलं की आता मात्र हसू येतं. पण पहिल्यांदा ते झालं नसतं तर इथवर आलो तरी असतं का हा ही विचार मनात येतो आणि त्या पहिले पणाचही कौतुक वाटायला लागतं.

आपलं पहिलं पाऊल कसं पडलं, कुठं पडलं हे आपल्याला नाही आठवणार. पण घरातल्या बाळाची पहिली पाऊलं पडू लागली की आपल्याला होणारा आनंद आपण टाळ्या वाजवून साजरा करतोच ना ?बाळाचे पहिले बोबडे बोल त्याच्या मुखातून बाहेर पडल्या बरोबर त्याचा अर्थ आपल्याला नाही समजला तरी ते ऐकून, एखादे  सुरेल गीत ऐकण्यापासून मिळणारा आनंद आपल्याला होतोच की नाही. ?सायकल शिकताना पहिल्यांदा फोडून घेतलेले  गुडघे आणि नंतर शिताफीन चालवलेल्या सायकलची मजा आठवली की अजूनही हवेत तरंगल्यासारखं होतं. पहिल्यांदा जिंकलेली क्रिकेटची मॅच म्हणजे आपल्या दृष्टीनं वर्ल्डकप जिंकल्यासारखचं असतं. पहिल्यांदा केलेला चहा, तो कडवट झाला असला तरी किंवा अगदी बासुंदी झाली असली तरी, सगळ्या घरात कौतुकाचा विषय झालेला असतो. बहिणीने केलेल्या पहिल्या चपातीतून जगाच्या नकाशाच्या दर्शन झालं तरी चेष्टा करत करत का असेना, कौतुकाची थाप पडत असतेच !

पहिल्या पदवीच कौतुक तर काय सांगायलाच नको. बेकारातआणखी एकाची भर हे काही महिन्यांतच कळतं. पण पदवी मिळवताना मात्र आपण खूपच ‘उच्च विद्याभूषित ‘ झाल्याचं  समाधान असत. पुढे तो पहिला दिवस नोकरीचा असो किंवा व्यवसायाचा. नवे लोक, नवे विश्व,  नवी आव्हानं. आपण मात्र काल पर्यंत होतो तसेच असतो या पहिल्या दिवशी ! सगळेजण आपल्याकडे बघताहेत अस वाटत असत. प्रत्येक गोष्ट नव्याने शिकून  घेताना पुन्हा पहिलेपणा येतोच. शिकण्याशिवाय तर पर्याय नसतो. शिकायची उत्सुकता ही असते. अशा संमिश्र अवस्थेत ते पहिलं वहिलं चाचपडत पुढे जाणं चालूच असतं. मग पहिला पगार, पहिल्यांदा मिळणारी बढती, पहिली बदली, त्यानिमीत्ताने येणारे पहिले पहिले नवे नवे अनुभव, या प्रत्येक पहिलेपणात कमालीच उत्सुकता असते. मग ओढ असते ती एका नव्या प्रवासाची. प्रथमच नजरभेट होते कुणाशी तरी आणि चुकतो ठोका काळजाचा. ही झालेली पहिली ‘चूक’ आयुष्यभर जपण्यासाठी मात्र धडपड सुरू होते.

किती आणि काय काय आठवत जावं यालाही काही मर्यादा नाहीत. स्वतःच्या हातांनी लावलेलं पहिलं झाड. त्याला येणार पहिलं फूल. स्वतःच्या माडाला येणारा पहिला नारळ असो किंवा आंब्याच्या झाडावर दिसू लागणारी पहिली कैरी असो. फळ खाण्यातल्या आनंदापेक्षा ते आलय याचाच आनंद मनस्वी असतो. पहिला रेडिओ घरात येणार म्हणून तो ठेवण्यासाठी घरातल्या जुन्या लाकडी टेबलाची केलेली स्वच्छता, मग रेडिओची जागा पहिल्या टि. व्ही. ने घेताना तो खोलीत कुठे ठेवावा यावर झालेली चर्चासत्रं, पहिला लँडलाइन फोन येताना ‘ त्याची आवश्यकताच काय ‘ इथपासूनच्या शंका.  एक ना दोन. पहिली दुचाकी खरेदी करताना तिच्यासाठी घातलेल्या पायघड्या(की चाकघड्या म्हणू ?), खूप प्लॅनिंग करून घेतलेली चारचाकी, पहिल्या परदेश वारीसाठी केलेली मानसिक तयारी, त्यासाठी पचवलेले उपदेशांचे डोस आणि सूचनांचा मारा. सगळं सगळं आठवलं की त्या पहिलेपणात किती अप्रूप होतं याच कौतुकच वाटायला लागतं.

कुणाच्याही आयुष्यात घडणा-या या घटना. यात जगावेगळं  ते काय असतं? माझ्या आयुष्यात घडलं तसच थोड्याफार फरकानं तुमच्याही आयुष्यात घडतं. पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात ते पहिल्यांदाच घडत असत म्हणून त्याच कौतुक जगावेगळं असतं. उन्हाळा असह्य झाल्यावर, खूप खूप वाट पाहिल्यावर येणा-या पहिल्या पावसाचा जो आनंद असतो, अगदी तसाच आनंद या पहिलेपणात असतो. ते सगळं आठवत बसलं की नकळत डोळ्यातला पाऊस सुरू होतो.  गोड आठवणींच्या सरी घेऊन बरसत राहतो मनावर .  हळूहळू शांत होतं मन. पहिल्या पावसानंतरच्या तृप्त झालेल्या धरित्रीसारखं !

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print