श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
स र्व ज्ञा नी !
“पंत हा तुमचा पेपर, निघतो, जरा घाईत आहे !”
“अरे मोऱ्या थांब जरा, तुला एक विचारायचं होतं!”
“बोला ना पंत !”
“अरे गाढवा, काल माझं एक काम होतं तुझ्याकडे म्हणून तुला मोबाईल लावला, तर ‘समाधान सल्ला केंद्राला फोन केल्याबद्दल धन्यवाद ! वैयक्तिक सल्ल्यासाठी एक दाबा, कौटुंबिक सल्ल्यासाठी दोन दाबा, प्रेम प्रकारणाच्या सल्ल्यासाठी…..”
“तीन दाबा ! बरोबर ना पंत ?”
“हो, बरोबर. आता ही सल्ला केंद्राची काय नवीन भानगड सुरु केल्येस तू मोऱ्या ?”
“अहो भानगड कसली पंत, घरी बसल्या बसल्या चार पैसे मिळवायचा आणि त्यातून झालीच तर थोडी समाजसेवा करायचा उद्योग चालू केलाय एवढच !”
“म्हणजे रे मोऱ्या ?”
“अहो पंत, हल्ली सगळेच लोकं काहींना काही समस्यांचे शिकार झालेले आहेत. त्यातून काही जणांना नैराश्य येवून, त्या पैकी काही जणांची मजल आत्महत्या करण्यापर्यंत गेल्याच तुम्ही पेपरात वाचल असेलच !”
“खरं आहे तुझं मोऱ्या, हल्ली एवढ्या तेवढ्या कारणावरून आत्महत्या कारण्याच प्रमाण वाढलंय खरं !”
“बरोबर, म्हणूनच अशा डिप्रेशनमधे गेलेल्या लोकांसाठी मी ‘समाधान सल्ला केंद्र’ सुरु केलं आहे !”
“हे बरीक चांगल काम करतोयस मोऱ्या, पण तुझ्याकडे सल्ला मागणारे ना तुझ्या ओळखीचे ना पाळखीचे, ते तुझ्याकडे मोबाईल वरून त्यांना पाहिजे तो सल्ला मागणार, मग याच्यातून तुला अर्थप्राप्ती कशी होते ते नाही कळलं मला !”
“पंत, तुम्ही नेट बँकिंग बद्दल ऐकलं असेलच !”
“हो ऐकून आहे खरा, पण त्यात फसवलं जाण्याची भीती असते असं म्हणतात, म्हणून मी माझ्या अकौंटला तो ऑपशनच ठेवला नाहीये बघ !”
“ते ठीक आहे पंत ! पण माझ्याकडे सल्ला मागणाऱ्यांना मी ठराविक रक्कम माझ्या अकाउंटला जमा करायला सांगतो आणि ती तशी जमा झाल्याचा मेसेज मला माझ्या बँकेतून आल्यावरच मी त्यांना पाहिजे तो सल्ला देतो !”
“अस्स, म्हणजे पहिले दाम मग तुमचं काम, हे सूत्र तू अवलंबल आहेस तर !”
“अगदी बरोबर पंत, म्हणजे पैसे बुडण्याची भीतीच नाही !”
“ते सगळं खरं रे मोऱ्या, पण प्रत्येकाच्या निरनिराळ्या समस्यांवर तुझ्याकडे समाधानकारक उत्तर कशी काय असतात बुवा ?”
“पंत माझ्याकडे कुठे उत्तर असतात !”
“अरे गाढवा, पण तूच तर प्रत्येकाला त्याच समाधान होईल असं उत्तर देतोस नां ?”
“हो पंत, पण त्यासाठी मी आमच्या पेरेन्ट कंपनीचा सल्ला घेतो !”
“आता ही तुझ्या पेरेन्ट कंपनीची काय भानगड आहे मोऱ्या ?असं कोड्यात बोलू नकोस, नीट सविस्तर मला समजेल असं काय ते सांग बघू !”
“त्याच काय आहे ना पंत, माझ्या सासूबाई स्वतःला ‘सर्वज्ञानी’ समजतात आणि त्यांनी सुद्धा त्यांचे ‘सर्वज्ञानी सल्ला केंद्र’ नावाचे मोबाईलवरून सल्ला देण्याचे केंद्र सुरु केले आहे.”
“बर मग ?”
“अहो त्या वरूनच माझ्या बायकोच्या डोक्यात, आपण पण असं सल्ला केंद्र मोबाईलवर चालू करावं असं आलं आणि सासूबाईंच्या त्या सर्वज्ञानी सल्ला केंद्रलाच मी आमची पेरेन्ट कंपनी म्हणतो !”
“अस्स !”
“मग मी काय करतो पंत माहीत आहे, मला आलेल्या सगळ्या समस्यांवरचा सल्ला मी मोबाईलवरून, माझ्या पेरेन्ट कंपनीला, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या ‘सर्वज्ञानी सल्ला केंद्राला’ विचारतो आणि त्यांनी दिलेला तोच सल्ला पुढे…..”
“ढकलून मोकळा होतो, बरोबर ?”
“बरोब्बर पंत !”
“पण काय रे मोऱ्या, तुझ्या सासूबाई तू त्यांचा एकुलता एक जावई असलास म्हणून तुला काय नेहमीच फुकटचा सल्ला देतात का ?”
“नाही हो पंत ! अहो मी त्यांना प्रत्येक वेळेस, वेगळेच नांव सांगून, मला एखाद्याने किंवा एखादीने विचारलेला सल्ला त्यांना विचारून त्याचे उत्तर घेतो आणि तोच माझा सल्ला म्हणून पुढे पाठवतो आणि सासूबाईंच्या अकाउंटला पैसे जमा करतो ! तेवढीच त्यांना आर्थिक मदत पण होते !”
“अरे पण तुला यातून कसे काय अर्थार्जन होते ते नाही कळलं मला !”
“पंत, सध्याचा जमाना हा कमिशनचा जमाना आहे, हे तुम्ही पण मान्य कराल ! ‘माझं काय ?’ हाच प्रश्न कुठच्याही व्यवहारात हल्ली लोकांचा असतो ! मग मी तरी त्याला कसा अपवाद असणार ?”
“तू म्हणतोयसं ते खरं आहे मोऱ्या, हल्ली जमानाच आलाय तसा, पण मग तू काय करतोस ?”
“पंत, मी जेवढे पैसे सासूबाईंना देतो, त्यावर माझे दहा टक्के कमिशन आकारून सासूबाईंनी दिलेला सल्ला पुढे ढकलतो !”
“धन्य आहे तुझी मोऱ्या !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
१७-१२-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈