मराठी साहित्य – विविधा ☆ दिन दिन दिवाळी – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ दिन दिन दिवाळी – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दिन दिन दिवाळी ।

गाई- म्हशी ओवाळी ।। 

असं अगदी आनंदाने म्हणत, दिवाळीचं स्वागत करण्यासाठी अगदी घराबाहेरच्या गोठ्यापर्यंत  जायचं, अशी एक छान “ अगत्यशील “ प्रथा आपल्याकडे आहे. आणि हा स्वागताचा दिवस म्हणजे “ वसुबारस “, ज्याला “ गोवत्सद्वादशी “ असेही म्हटले जाते. आपल्या शेतीप्रधान देशात गाई-गुरे-जनावरे यांना रोजच्या आयुष्यातच अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्या सर्व गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशी “ गोधनपूजा “ ही प्राधान्याने केली जाणारी पूजा. बैलपोळा खास बैलांच्या पूजेसाठी असतो, तशी वसुबारस खास गाईंच्या पूजेसाठी. आता काही ठिकाणी स्वतःला जगतांना उपयोगी पडणाऱ्या इतर काही प्राण्यांचीही पूजा केली जाते. यादिवशी घरोघरी दारात, अंगणात रांगोळी काढून दिवाळीची जणू पूर्वतयारी केली जाते. 

पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून पाच कामधेनू बाहेर आल्या होत्या. त्यापैकी “ नंदा “ नामक कामधेनूसाठी वसुबारसेचे व्रत अंगिकारले जाते. यादिवशी गो -वासराची मनोभावे पूजा केल्याने अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आजच्या काळाचा विचार करता, कृषी-उत्पादन भरघोस आणि दर्जेदार व्हावे, उत्तम दूधदुभते उपलब्ध व्हावे आणि त्यायोगे मुलाबाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे, अवघा देशच धनधान्यसमृद्ध व्हावा, अशी कामना मनी बाळगून सर्वांनीच गाई-वासराची प्रतीकात्मक का होईना, पण कृतज्ञतापूर्वक पूजा करणे संयुक्तिक ठरणारे आहे. आता प्रत्येकाच्या घरी गाय पाळणे दुरापास्तच आहे. त्यामुळे अनेक घरात रांगोळीने किंवा तांदुळाने पाटावर गायीचे चित्र रेखाटून, किंवा मातीच्या बनवलेल्या प्रतिमा आणून ही पूजा करतात. दिवाळीचे स्वागत करण्यासाठी, एरवी सतत बंद असलेली, आणि घराची बेल वाजल्यानंतर ‘ कोण आहे ‘ असं त्रासिकपणे विचारून, किँवा की-होलमधून बघून, आत बोलावण्यास हरकत नाही याची खात्री करून उघडली जाणारी हल्लीच्या घरांची दारे, यादिवशी मात्र सताड उघडी ठेवली जातात, म्हणून ही “ अगत्यशील प्रथा “ आहे असे आवर्जून म्हणावेसे वाटते. आणि अर्थातच सर्वात महत्वाचे म्हणजे, पूजा करण्याची पद्धत, किंवा पूजासामग्रीतला नेमकेपणा , यापेक्षा पूजा किती श्रद्धेने, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मूळ उद्देश लक्षात ठेवून केली जाते, हे सर्वात जास्त, किंबहुना हे एवढेच महत्वाचे असते. बरोबर ना  ? 

या अनुषंगाने असा विचार मनात येतो की, अशा सणाच्या निमित्ताने सगळं कुटुंब, आप्तेष्ट प्रत्यक्ष किंवा आजकाल निदान virtually तरी आवर्जून एकत्र येतात, काहीवेळ एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात, एकमेकांची आस्थेने चौकशी करतात, आणि हा सणांचा मोठाच फायदा सगळ्यांनाच होतो, हे अगदी १००% खरे आहे. पण इतके सारे सण साजरे करण्याची सुरुवात फक्त याच उद्देशाने झाली असावी, असे मात्र नक्कीच वाटत नाही. सण साजरा करण्याचे हे सगळे ancillary किंवा complementary फायदे आहेत, हे सुजाण माणसांनी नक्कीच ध्यानात ठेवायला हवे. याचं कारण असं की, आपल्या प्रत्येक श्वासात, रोजच्याच जगण्यात, अर्थार्जनाच्या आणि इतर प्रत्येकच  कामात, अनेक सजीव तसेच निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींचा महत्वाचा हातभार अतिशय गरजेचा असतो, हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. आणि अशा सर्व गोष्टींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्या बहुतेक सर्व सणांचे आणि उत्सवांचे प्रयोजन विचारवंत आणि ज्ञानी सत्पुरुषांनी खूप पूर्वीपासूनच केलेले आहे. त्यामुळे नेमकी तेवढीच भावना वगळून, बाकी सगळे आनंदाने साजरे करणे, म्हणजे सण साजरा झाला का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा—- प्रत्येक सण साजरा करतांना— आणि आता हाच विचार मनात ठेऊन दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाकडे वळू या. 

“धनत्रयोदशी “ – धनतेरस -. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्वाचा असतो, कारण यादिवशी त्यांच्या हिशोबाच्या नव्या वह्यांची साग्रसंगीत पूजा करून त्यांचा वापर करण्यास ते सुरुवात करतात — हिशोबाच्या वह्या म्हणजे, ते कुठल्या दर्जाचे जीवन जगू शकतील हे दाखवणारे अदृश्य आरसेच–महत्वाचे मार्गदर्शक- त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून वापरण्याआधीच त्यांची पूजा. काही ठिकाणी याच दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजाही केली जाते. दागिने -कपडे   -नवीन वस्तू खरेदी करायला हा दिवस म्हणजे एक हुकमी कारण.

हा दिवस आणखी एका कारणाने शेतकरीवर्गातही साजरा केला जातो. त्यांच्यासाठी ‘ धान ‘ म्हणजे स्वतःच्या शेतात पिकलेले धान्य, हे त्यांचे धनच असते. म्हणून यादिवशी घरात आलेल्या धान्याची तर ते मनोभावे पूजा करतातच, पण त्याच्या जोडीने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचीही कृतज्ञभावनेने पूजा करतात.    

या दिवसाला “ धन्वंतरी जयंती “ असेही म्हटले जाते, आणि पौराणिक कथांनुसार यामागची प्रचलित कहाणी अशी आहे की—— देव- दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीच्या पाठोपाठ, हातात अमृतकुंभ घेऊन श्री धन्वंतरी प्रकटले. भगवान विष्णूंचा अवतार समजले जाणारे धन्वंतरी सर्ववेदविद्यापारंगत, मंत्र-तंत्रांचे जाणकार तर होतेच , आणि त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे, त्यांनी अमृतरूपाने देवांना अनेक औषधींचे सार प्राप्त करून दिले होते. म्हणूनच की काय, बऱ्याच दवाखान्यांमध्ये, अगदी मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्येही श्रीगणेशाच्या जोडीने धन्वंतरीची, एका हातात कलश असलेली चतुर्भुज मूर्ती, सहजपणे दिसेल अशी, अगदी मापाची काचेची उभी पेटी तयार करून, त्यात ठेवलेली हमखास पहायला मिळते. या दिवशी ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वन्तरींची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते, असेही  मानले जाते.

यादिवशीपासून घराभोवती, घरासमोर सगळीकडे भरपूर पणत्या, आकाशकंदील लावून सर्व परिसर लखलखीत प्रकाशाने उजळून टाकला जातो. घर आणि घराचा परिसर जसा प्रकाशमान– अंधःकारहीन होतो, तशी त्या घरातल्या माणसांची मनेही तेवढ्या काळापुरती का होईना, दुःख – चिंता -यातना – वेदना, तसेच राग, मत्सर, हेवेदावे, दुस्वास, तुलना, अशासारख्या सगळ्या नकारात्मक भावनांना विसरून, निखळ आनंदाच्या प्रकाशाने उजळून जावीत, हाच त्या इतक्या सगळ्या पणत्या लावण्यामागचा हेतू असायला हवा. 

पुराणांमध्ये या लखलखाटाचे कारण सांगणारीही  एक गोष्ट आहे — एका राजपुत्राचा सोळाव्या वर्षी अकाली मृत्यू होईल, आणि तोही त्याच्या लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी, असे भविष्य वर्तवलेले असते. त्यादिवशी त्याची नववधू त्याच्या अवतीभवती आणि महालाच्या प्रवेशद्वारात सोन्याचांदीच्या मोहरांची रास ठेवते, आणि मग महालात मोठमोठे दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो, आणि राजपुत्राला जागे ठेवले जाते. रात्री यमाने सर्परुपात महालात प्रवेश केल्यावर तिथल्या लखलखीत प्रकाशाने डोळे दिपल्यामुळे त्याला काहीच दिसत नाही, आणि तो यमलोकात परत जातो. राजपुत्राचा प्राण वाचतो. 

एकूण लक्षात घेण्यासारखे काय, तर ज्ञानाचे – सारासार विचारांचे – योग्य आणि आवश्यक तितक्या प्रयत्नांचे – सहभावनांचे,  सद्भावनांचे आणि सकारात्मक विचारांचे अनेक दीप प्रत्येकाने नंदादीपासारखे स्वतःच्या मनात सतत आणि श्रद्धेने तेवते ठेऊन, अंध:कारजनक नकारात्मक भावना त्याच वातीने फटाक्यांसारख्या पेटवून संपवून टाकून,  मन निर्मळ निर्व्याज आनंदाने सतत लखलखते ठेवले, तर आयुष्यात फक्त चारच दिवस नाही, तर रोजच दिवाळी साजरी होईल यात शंकाच नाही. 

क्रमशः ….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

?  विविधा ?

☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

करंजी आवडणारे फार कमी लोक आहेत असं मला वाटतं. माझी आई खूप सुंदर पुडाच्या करंज्या करायची आणि तिची आईही आई आणि आजीच्या हातच्या त्या अलवार करंजा लहानपणापासून खाल्लेल्या दिवाळीत !

एका दिवाळीत बडोद्याहून आत्या सहपरिवार आल्या गावाकडे, माझी आई आणि काकी दोघींना मोठ्ठा पितळेचा डबा भरून पुडाच्या करंज्या केल्या रात्रभर जागून. आणि तो पितळी डबा मी उठायच्या आत पाठवला!

आत्या सहकुटुंब मळ्यातल्या घरी रहिल्या होत्या. तिकडे, ताजी करंजी खायला न मिळाल्याची खंत मला अजूनही आठवतेय मी तेव्हा नववी दहावीत असेन आम्ही तीन चार मुलं गावातल्या घरात असताना सगळ्याच्या सगळ्या करंज्या तिकडे का पाठवल्या होत्या ते आता आठवत नाही, घरात सुबत्ता होती आणि घरातल्या सगळ्या बायका सुगरणी होत्या … नंतर करंजी सह सगळे पदार्थ केले आणि भरपूर खाल्लेही असतील, पण तो भला मोठा करंज्यांनी भरलेला पितळी डबा आणि आम्हाला त्यातली एकही करंजी न देता सकाळी गड्याबरोबर पाठवलेला……अजूनही आठवतो आणि खूप हसू येतं त्या वेळी करंजी न मिळाल्याचं!

माझ्या लग्नानंतर मी ही दिवाळीला त्याच पद्धतीने पुडाच्या करंज्या करू लागले, एकदा दिवाळीत सरोज फडके नावाची केटरिंग व्यवसाय करणारी मैत्रीण आली तिला दिवाळीच्या पदार्थाची ताटली दिली,तर ती म्हणाली “ती करंजी काढ पहिल्यांदा “मी म्हटलं तू खाऊन तर बघ, मग तीने फक्त चार करंज्याच खाल्ल्या!
माझ्या हातची पुडाची करंजी खूप जणांना आवडलेली आहे हे माझं मलाच खूप छान वाटतं,

माझी मैत्रीण स्वाती सामक आणि मी आम्ही दोघींनी एका दिवाळीत काही पदार्थ एकत्र केले होते, तिला पण करंजी अजिबात आवडत नव्हती पण तिने माझ्या करंजीची खूप तारीफ केली होती, आणि ती आजही म्हणते, “प्रभा करंजी मला फक्त तुझीच आवडली होती. ” बरेच वर्ष केली नाही करंजी, यावर्षी कंटाळा न करता पुडाची करंजी करीन, मागच्या दिवाळीत एका सीकेपी मैत्रीणीने दुस-या एका मैत्रीणीकडे कानवले आणले होते तिथे मी एक कानवला खाल्ला खूप प्रशंसा केली, मी आणि इतरांनीही !पण माझी पुडाची करंजी काकणभर सरसच असायची ! फरक इतकाच ती सीकेपी मैत्रीण पंचाहत्तरी पार केली तरी अजून घरी दिवाळीत कानवला (करंजी )करते आणि मी साठीतच माझ्यातल्या सुगरण पणाला तजेला देणं सोडून दिलं . गेली अनेक वर्षे करंजी केली नाही.

माझ्या पुतणीचं लग्न झाल्यानंतर तिला करंज्या पाठवल्या दिवाळीत….तेव्हा ती गावाला गेली होती , एकत्र कुटुंबात रहाणारी माझी पुतणी- प्रीती गावाहून आल्यावर ,मला म्हणाली, “काकी मी तुझी करंजी ओळखली, मी मम्मींना म्हटलं, “ही काकीची करंजी आहे”.

खूपजणी माझ्या पेक्षा सुंदर पुडाच्या करंजा करत असतील, पण अशा पद्धतीची प्रशंसा माझ्या करंजीला मिळाली आहे!

समस्त भारतीय सुगरणींच्या कुळात माझ्या करंजीची ही खसखशी एवढी नोंद!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ?

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

प्रकाश कुलकर्णी सरांनी यंदाच्या ‘नवरत्न’दिवाळी अंकाचा ‘दिवाळी कालची व आजची’हा विषय कळल्यानंतर मला माझं बालपण आठवल.

आम्ही लहान होतो तेव्हाची दिवाळी मला अजूनही आठवते. सहामाही परीक्षा संपली की आम्हाला दिवाळीची सुट्टी लागायची. त्याअगोदरच आम्ही आईबाबांच्या मागे लागायचो.चुलत भावडांना,मामाला भेटण्याची ओढ लागलेली असायची. माझ्या बाबांना तीनही भाऊच.अत्त्या नाही. चौघे चार ठिकाणी असल्याने चारही भाऊ मुलांच्या शाळेच्या सुट्टीत एकत्र जमून कुठेही एकिकडे आम्ही दिवाळी साजरी करायचो.आम्ही सर्व सख्खी चुलत भावंडे एकत्र जमायचो.मोठी धमाल असायची. आम्ही खूप गमतीजमती करायचो.रोज दुपारी पत्ते  खेळायचो. कुठलेच। काकाकाकू आम्हा भावंडामधे भेदभाव करत नव्हते. सर्वांना समान न्याय होता.

दिवाळी म्हटली की अजूनही आठवतं ते गारगार कडक थंडीत दात कडकड वाजत असतानाचं कुडकुडत पहाटे उठणं.घड्याळात रात्री झोपताना पहाटे साडेतीन/चारचा गजर लावलेला असायचा. तो झाला हळूच उठायचं आणि बाबांच्या किंवा मोठ्या बहीणभावाच्या सोबतीने अंधारात अंगणात लावलेल्या व पणत्यांच्या उजेडात घाबरत घाबरत जाऊन पहीला फटका लावायचा. तेव्हा आतासारखे गँसचे किंवा लाईट वरचे गिझर नव्हते. कोकणात तर सगळीकडेच नारळीपोफळीची झाडे खूप असतात. त्यामुळे त्यांच्या वाळलेल्या झावळी पडल्यावर त्या गोळा करून त्याच्याच तटक्या विणून त्यांनी शाकारलेल्या खोपीत उन्हाळ्यात लाकडे व झावळी तोडून लहान लहान तुकडे गोळा करून ठेवलेले असायचे. घराच्या मागच्या अंगणात एका कोपऱ्यात चुल बाराही महीने कायमच असायची. त्याजवळच पाण्याचा हौद व त्यालगतच मोठी न्हाणी असायची. चुलीवरच्या हंड्यात पाणी तापत असायच. प्रत्येक वेळी हंड्यात भर घालायची. चुलीत नीट विस्तव करायचा. तेल उटणं लावयचं आणि कुडकुडत पटापटा अंघोळी करायच्या एकमेकांच्या अंघोळीच्या वेळी प्रत्येकाने फटाके उडवायचे.आम्ही बहीणी पुढच्या अंगणात केलेल्या किल्ल्यावर मावळे मांडायचो. त्यापुढे शेणाने सारवलेल्या अंगणात ठिपक्यांच्या कागदाच्या मदतीने ठिपके काढून रांगोळी काढायचो.त्यात रंग भरायचे. तोपर्यंत उजाडायला लागायचे. मग फराळ करायचा. त्याबरोबरच दहीपोहेही असायचे.

हळूहळू काळ बदलला. मानवाच्या प्रगतीबरोबर जंगले,थंडी कमी झाली. आता पुर्वीसारखी थंडी पडत नाही. पहाटे उठणंही कमी झालं.ठिपक्यांची रांगोळी जाऊन संस्कारभारतीच्या रांगोळ्या आल्या. नोकरीच्या बदलेल्या स्वरुपामुळे रजा मिळणे कठीण झाले. त्यामुळे एकत्र येऊन सण साजरे केले जात नाहीत. पुर्वी एकमेकांना दिवाळीची भेटकार्ड पाठवली जायची. ती.बंद झाली. बायका दिवाळीचा फराळ करायला एकमेकांच्या घरी जमायच्या.एकमेकांना फराळाचे डबे ,ताटं द्यायच्या.फराळ ,भाऊबीजेची एकत्र जेवणं सगळंच कमी झालं माणसातलं प्रेम कमी झालं. बाजारात साचेबद्ध किल्ले मिळतात. अपार्टमेंट झाल्याने प्रत्येकाचा वेगळा आकाशकंदील आणि लाईटच्या माळा त्यामुळे इमारती झगमगतात.सर्व अपार्टमेंटची अंगणं गाड्यांच्या पार्किंगने भरून गेलेली असतात रांगोळीला जागाच नसते. फ्ल्याटच्या दाराशी काळ्या फर्शीवर  छोटीशी रांगोळी काढली जाते. त्यातही तयार रांगोळ्याहि अनेक प्रकारच्या बाजारात मिळतात.

एकुण काय पुर्वीच्या दिवाळीची मजा कमी झाली हेच खरं. आणि या दोन-तीन वर्षात पावसाळी पुर त्याबरोबरच आताचा हा कोरोना या नैसर्गिक संकटांमळे सगळं बदलून गेलं.या कोरोनामुळे तर सगळीकडेच वाहतूक व दुकाने बंद आहेत.घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

      आठवणी जागतात

       मन मोहून जातात

       बदलत्या जगासवे

       लागते बदलावे

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ  ज्योती विलास जोशी 

पायातलं वहाण म्हटलं की सिंड्रेलाच्या परिकथेतला तिचा तो एक बूट आठवतो. जिच्या भोवती कथा फिरते. मला प्रकर्षानं आठवते ती ‘द आदर पेअर’ही इजिप्शियन अवॉर्ड विनिंग फिल्म ! अवघ्या चार मिनिटाच्या या फिल्म मध्ये रेल्वेत चढताना एकच बूट पायात राहिलेल्या मुलानं सारासार विचार करून तो बूट प्लॅटफॉर्मवरच्या मुलाकडे भिरकावला जेणेकरून त्याला त्याचा वापर होईल. निरागसतेला केवढ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही गोष्ट.

चाळीस लाखाच्या चप्पल्स चोरी करून लक्षाधीश झालेला माटुंग्याचा इब्राहिम सर्वश्रुत आहे.कुलभूषण जाधवला त्याची आई पाकिस्तानात भेटायला गेली तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या आभूषणांसह तिचे चप्पल काढून घेतले.तेव्हा ट्विटरवर ‘चप्पल चोर पाकिस्तान’या# खाली दिवसभर ट्विटर ट्रेंड करत होतं.आपल्या कोल्हापूरी चप्पलनं तर जगात चप्पल ची किंमत वधारून ठेवलीय….

जूते लो पैसे दो म्हणत हम आपके है कौन मध्ये माधुरी थिरकते. लग्नातल्या या विशिष्ट प्रसंगाने चप्पलला केवढा भाव मिळतो. नवऱ्या मुलाने देऊ केलेल्या पैशावरून त्या चप्पलची किंमत ठरते…. ते निराळंच….एकेकाळी ‘पायातली वहाण पायातच’ असं म्हणून स्त्रीला हिणवणारया पुरुष प्रधान संस्कृतीच स्मरण झालं. दुसऱ्याच क्षणी चप्पल जोडीवर फुल ठेवून त्याची पूजा करत आर्चीला विनवणारा सैराट सिनेमातला परशा आठवला.

आताशा प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अस्तित्वाला एक दिवस ठरवायची पद्धत आहे. तो त्याच्या अस्तित्वाचा दिन म्हणून साजरा करतात. पंधरा मार्चला नुकताच चप्पल दिन होता. एरवी ‘चपलीनं मारीन’या इतक्या मोठ्या अपमानाचा मूळ असणारी ही चप्पल आजच्या दिवशी इतकी वलयांकित का झाली ? त्याचं रहस्य मला कळलं होतं……..अर्थातच एक नवीन चप्पल जोड खरेदी करून मीही ‘चप्पल डे’ साजरा केला.

आज व्हाट्सअपचं पान हिरवंशार झालं होतं. उघडून पाहते तो प्रत्येक पानावर चप्पल दर्शन घडत होतं. अनाहूतपणे कर जुळू नयेत याची मी काळजी घेत होते.चप्पलचं असणं किती महत्त्वाचं आहे. तिचं असणं हेच तिचं अस्तित्व! अस्तित्व साजरा करण्याच्या दिवसांमध्ये एक दिवस तिचा ही असणारच ना? माझ्याच प्रश्नांचं निरसन माझ्याच अभ्यासातून झालं. उद्या परत कोणाच्या अस्तित्वाचा दिवस असा विचार करत मी झोपी गेले.

नित्य नेमानं सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा डाटा ऑन केला आणि पुन्हा हिरवंगार पान मला खुणावू लागले. बुचूबुचू मेसेजेस येऊन पडले होते. प्रामुख्यानं आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपचं पान अगोदर उघडलं जातं आणि ते आजही उघडलं तर ‘अहो आश्चर्यम’ गुड मॉर्निंग च्या जागी एक चप्पल जोडचा फोटो! ‘टुडे ‘या मथळ्याखाली…..आणि खाली लिहिलेलं…..हे कुणाचं आहे? माझं कुणीतरी घालून गेलं आहे’

सकाळ सकाळी रामाच्या पादुकांच दर्शन व्हावं तसा मी नमस्कार केला. टेक्नॉलॉजीला ही मनोमन दंडवत घातला ते पुढचा मॅसेज वाचून…. अगं तुझं आणि माझं एक्सचेंज झालंय बहुतेक अगदी सेम टू सेम..

चप्पल हा खरंच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ! आमची आजी म्हणायची ‘देह देवळात चित्त खेटरात’.. तिच्या या बोलण्याचा मला पदोपदी अनुभव येतो बापाला आपली मुलगी देखणी असली की जसं कोणीही उचलून नेईल अशी सुप्त भीती मनामध्ये असते ना तसंच प्रत्येकाला आपली चप्पल डोळ्यात भरण्या जोगी आहे; कोणी तरी घालून जाईल असंच वाटतं आणि कधीकधी घडतही तसंच…..

मंदिरात आत जाताना नेहमीच्या पेढेवाल्याकडे पेढे देऊन चप्पल ठेवायची प्रथा त्यामुळेच पडली असावी. तो बिचारा स्वतःचे पेढे खपवण्यात इतका मशगुल असतो की आपल्या चप्पलची त्याला कितपत काळजी असते देव जाणे !आपला तो अंधविश्वासच !!

पैसे देऊन स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवण्याची मानसिकता बहुतेकांची नसतेच. खेटरंच ते… त्यासाठी इतकी किंमत द्यायची गरज नाही. जे कोणी त्या स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवतात ते टोकन देऊन चप्पल परत घेताना, देणारा माणूस चप्पल अशा पद्धतीने भिरकावत होतो की आपल्या चप्पलची हीच लायकी आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा..आपल्या देशात भाजी रस्त्यावर आणि चप्पल दुकानाच्या शोकेसमध्ये अशी परिस्थिती असताना चप्पल ची अशी किंमत केलेली मनाला लागते. सहाजिकच आहे ना?

चप्पल बूट यांच्या आताच्या जाहिराती पाहून आमचे आजोबा सांगायचे. “आम्हाला वर्षातून एकदा चप्पल मिळे. सततची घालायची सवय नसल्यानं ती घातलेल्या दिवशी आम्ही कुठेतरी विसरून येत असू. त्यानंतर पुन्हा एक वर्षांनंतरच नवीन मिळे.चप्पल घालायची सवयच नसल्याने ती विसरायची सवय जास्ती लागली होती.”

कुटुंबात जितक्या व्यक्ती तितकी वाहनं आणि चौपट वहाणं. चपलांची खानेसुमारीची डोकेदुखी होऊन बसली आहे. माणशी दहा याप्रमाणे चप्पलचा स्टॅन्ड भरलेला असतो. वॉकिंग, जॉगिंग, कॅज्युअल, स्पोर्ट्स, स्लिपर्स ,फॉर्मल बापरे बाप!म्हणून का चप्पल इतक वलयांकित? आणि तिची जागा दुकानातल्या काचेत आणि मेथीची पेंडी रस्त्यावर?…..

एकदा माझ्या मैत्रिणीकडे आम्ही रात्री जेवायला गेलो होतो. जेवणानंतर गप्पा-टप्पात बारा वाजून गेले. फ्लॅट सिस्टिम मधल्या तिच्या घरातून आम्ही चौघेही बाहेर पडलो आणि लिफ्टने खाली निघालो तितक्यात, दोघांच्या पायात घरातलेच स्लीपर आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पण पुन्हा आत जाऊन चप्पल घेण्याऐवजी तात्पुरतं शेजारच्या फ्लॅटच्या चप्पल स्टैंड मधील आपल्याला बसतील ते चप्पल घालून ते खाली आले.माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून ती हसली. “अगं गाढ झोपलेत ते ! काय समजतं त्यांना? शिवाय आमचे स्लीपर्स आहेतच की त्यांच्या दारात….

रात्री घरी पोचलो आणि कॉरिडोर मधल्या माझ्या चप्पलच्या रॅकला एक कुलूप आणि त्याला दोन किल्ल्या लावलेल्या मला दिसल्या. मी स्टॅन्डला कधीच कुलूप लावलं नव्हतं आत्ता मी लगेच एक किल्ली फिरवली चपला बंदिस्त केल्याआणि आत आले.दर खेपेला कुलूप उघडून चप्पल काढायची आणि बाहेर पडायचं…. चप्पल स्टॅन्ड ला जणू मी लाॅकरचा दर्जा प्राप्त करून दिला होता.प्रत्येक ठिकाणी जायचे चप्पल निरनिराळे… दुपारी मंदिराला घालून जायचे चप्पल घालून मी बाहेर पडले. भजन आटोपलं आणि मंदिरात गेले देव दर्शन करून बाहेर आले तो चप्पल गायब ‘मंदिराला घालून जायचे चप्पल’असलं म्हणून काय झालं आता पुन्हा मंदिरात जायचं तर कोणतं चप्पल वापरायचं? पंचाईत झाली ना माझी??

माझे डोळे सगळ्यांच्या पायांकडं भिरभिरू लागले. काय काय करावं सुचेना. मंदिरात बसलेला राम आठवला. तो असताना मी का उगा चिंता करत बसले होते? पुन्हा एकवार मी राम मंदिरात जाऊन रामाला साकडं घातलं, रामा बाबा रे, तू हि अनवाणीच आहेस पण तुझ्या पादुका सुरक्षित आहेत रे ….भरतानं सिंहासनावर ठेवल्यात. राज्य करताहेत त्या ….रामाचा हसतमुख चेहरा मला काहीतरी सांगतोय असा मला भास झाला . काय ?माझ्या हि चप्पलांचा असाच कोणीतरी सन्मान केला असेल ? इश्श्य काहीतरीच ! कुणाच्या पायातून गेली असेल माझी चप्पल त्याला सद्बुद्धी दे रे देवा..” मी रामाला साकडं घालून बाहेर आले.

मंदिराबाहेर चपलांचा खच पडला होता. गर्दी कमी होऊ लागली तशी चपलांही कमी होऊ लागल्या. चुकून आपल्या पायातील चप्पल आपलं नव्हे म्हणून कोणी परत येतं का असं वाटून मी थोडीशी रेंगाळले.

फुलवाला हे सर्व काही पाहत होता. नेहमीचा तोंड ओळख असणारा तो हसला आणि मला त्याने एक अफलातून सल्ला दिला.”मावशी,अहो चपला कमी व्हायला लागल्यात. तुम्हाला बसणारा साईज आता उरणार नाही. त्यापेक्षा त्यातलं तुम्हाला बसतंय ते घाला आणि जा घरी नाहीतर अनवाणी जायची पाळी येईल.”त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं.मी अनवाणी कशी जाणार? त्यातलं एक चप्पल देवाच्या साक्षीने मी चोरलं आणि घर गाठलं.

घर गाठताच त्या चप्पलचं ‘मंदिराचं चप्पल’असं नामकरण झालं.ते चप्पल घालून मी नियमित मंदिरात जाते. जी कोणी माझं चप्पल घालून गेली आहे ती माझं चप्पल ठेवून स्वतः चप्पल घेऊन जाईल.या आशेवर आहे मी अजून ….अजूनही मला वाटतं रामाच्या कृपेनं माझ्या पादुका मला मिळतील पुनःश्च राम राज्य येईल….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

(दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.भाग 2 पुढे चालू)

मग या नायिकेला लाडीगोडी लावण्यासाठी तिच्याच वजनाइतकी चिरलेल्या पिवळ्याधमक गुळाची साडी नेसवली जाई. त्यामुळे ती नायिका आपला पूर्वीचा रंग झटकून हा पिवळा रंग अंगभर लपेटून घेई. त्या पिवळ्या साडीला खोवून घेतलेल्या पांढऱ्याशुभ्र ओल्या नारळाच्या किसाची मध्ये मध्ये नक्षी काढली जात असे. ही कलाकुसर मात्र सढळ हाताने करत असत. असा हा मेकअप पूर्ण झाल्यावर आता या नायिकेला प्रत्यक्ष नाटकाचे वेध लागलेले असत. मग एका गोल, खिरीच्या साजेशा रंगाला मॅच होईल अशा रंगाच्या डिशच्या रंगमंचावर नायिका अवतरत असे.   आता नायकाच्या एंट्रीची वेळ जवळ आलेली असते.  इतका वेळ सर्व दिव्यातून बाहेर पडताना आपल्या या नायिकेला अग्नीसरांनी योग्य वेळी साथ  दिलेली असते. पण ते फक्त पाहुणे कलाकार असल्याने या प्रयोगातून वेळीच exit घेतात. त्यानंतरच नायकाचे रंगमंचावर आगमन अपेक्षित असते. अग्नीसरांच्या उपस्थितीतच जर चुकून या नायकाचे आगमन झालेच तर मोठा अनर्थ ओढवतो. कारण आपल्या तापट स्वभावाने अग्नीसर पाहुणे कलाकार न राहता खलनायकाच्या भूमिकेत शिरुन गुळाच्या मदतीने या दुग्धरुपी नायकाला बदसूरत करण्याची शक्यता असते आणि पूर्ण नाटकाचा प्रयोगसुद्धा फसू शकतो. म्हणून मग थोडा वेळ ही नायिका मंद वाऱ्याच्या सान्निध्यात आपले श्रम विसरुन थंड होत आतुरतेने नायकाची वाट पाहू लागते. हीच वेळ नायकाच्या आगमनाची असते. आपल्या शुभ्रधवल वर्णाने हा दूधनायक सळसळत रंगमंचावर प्रवेश करतो. आपल्या सहजसुंदर  अभिनयाने या नाटकात रंग भरु लागतो. जोडीला याने  नायिकेला भेट म्हणून तुपाची धार पण आणलेली असते. त्याच्या सानिध्याने खिरीचे नाटक अधिकच झळकू लागते. शिवाय साथीला त्याची नेहमीची, नेहमीच छोटीशी पण महत्वाची भूमिका निभावणारी वेलचीताई या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आता हा सर्व  कलाकारांचा एकजीव झालेला संच नाटकाच्या शेवटच्या अंकासाठी सिद्ध होतो. आतुरतेने क्लायमॅक्स ची वाट पाहणारे आम्ही प्रेक्षक ताबडतोब आमच्या रसनारुपी चक्षूनी त्या रंगमंचीय रंगतदार खिरीचा आस्वाद घेत असू. आणि आमच्या चेहऱ्यावरील तृप्तीने आपल्या कलाकृतीला योग्य दाद मिळाल्याचे त्या दोन दिग्दर्शिकाना समजत असे. मग आपल्या या स्त्रीपार्ट करणाऱ्या नायिकेकडे कौतुकाने पाहताना त्या  कृतकृत्य होऊन जात.

तळटीप:-

  • आवडत असल्यास या नाटकात काजूचे तुकडे, बदाम, बेदाणे याना छोट्या भूमिका द्यायला हरकत नाही.
  • खोबऱ्याच्या किस वापरण्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करुन त्याची नक्षी पिवळ्या साडीला काढली तरी चालेल.
  • महत्वाचे म्हणजे खपली गव्हाच्या अनुपस्थितीत घरातले रोजचे गहू किंवा त्याचा बाजारात मिळणारा  तयार दलिया कधीतरी नायिकेची भूमिका उत्तम पार पाडू शकतात.
  • सध्याच्या काळात उखळ सहज उपलब्ध नसल्यामुळे त्याचे काम मिक्सर करु शकतो. फक्त गव्हाला हलकेच पाण्याने ओलसर करुन, मिक्सरमध्ये हलके हलके फिरवावे लागते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

माझ्या माहेरी कराडला चैत्रात कृष्णाबाईचा मोठा उत्सव असतो. देवीची पालखी, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम याची तीन दिवस रेलचेल असते. पण मला कायम उत्सवाचा शेवटचा दिवस आवडत असे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून ‛गव्हाची खीर’ असायची. आणि घरोघरी गहू गोळा करुन तयार केलेल्या या खिरीला एक प्रकारची अवीट गोडी असायची.  सोहळयातल्या या खिरीला जसा वेगळा स्वाद असायचा तसाच ही खीर आमच्या घरी करायचा पण एक सोहळाच असायचा.

पाचवीत असताना आम्हाला शाळेत एक कविता होती. त्यात एका स्त्रीचे वर्णन करताना म्हटले  होते, “ गोधूम वर्ण तिचा!” आता हा गोधूम वर्ण म्हणजे कसला? असा त्या वयात आम्हाला प्रश्न पडला. पण बाईंनी लगेचच स्पष्टीकरण केले,“मुलींनो, गोधूम म्हणजे गव्हासारखा बरं का!” तेव्हा तो गव्हाळ वर्ण डोक्यात अगदी पक्का बसला. तर अशा या गव्हाची एक गंमत आहे बर का! बिचाऱ्याला पाकशाळेत गेल्यावर  कोणत्याही पाककृतीच्या नाटकात काम करायचे असेल तर अनेकदा ‛स्त्रीपार्ट च’ करायला लागतो. उदा. पुरणपोळी,सांज्याची पोळी, चपाती,गूळपापडी, कुरडई, खीर इ. इ.! क्वचित पुरुषपार्ट पण मिळतो जसे पराठा, लाडू वैगेरे वैगेरे ! पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. असो.

तर आमच्या घरी  ‘गव्हाची खीर’ करायची तर जय्यत तयारी असे. नाटकात काम करणारे अनेक कसलेले नट असले तरी कोणत्या भूमिकेसाठी कोणता नट योग्य आहे हे जसे दिग्दर्शकाला माहीत असते. तसे आमच्या घरातील आई आणि जवळच राहणारी मामी, या दोन दिग्गज दिग्दर्शकांना खिरीच्या नाटकासाठी ‛खपली गहूच’ लागत. ते दुकानात मिळाले की मामीला लगेच निरोप जात असे. मग दुपारी घरची जेवणे आटोपली की मामी जय्यत तयारीनिशी आमच्या घरी हजर होत असे. कारण नाटक बसवायचे असे ना! मग या दोन दिग्दर्शकांच्या अंगात खीर चढलेली असे.   स्त्रीपार्ट करायचा म्हणजे या गव्हाला भरपूर पूर्वतयारी करावी लागत असे. नाटकात फिट होण्यासाठी सूप आणि चाळणीच्या मार्गदर्शनानंतर ते उखळबाईंच्या  ताब्यात दिले जात. मामीच्या अनुभवी नजरेतून सूप आणि चाळणी या गव्हाचे ग्रुमिंग करत असतानाच बरेच दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे रागावून बसलेल्या उखळ आणि मुसळीला लाडाने  अंजारून- गोंजारून, थोडे पाणी पाजून आईने त्यांच्या कृष्णकांतीला लकाकी आणली असे. मग हे थोडेसे तांबूस वर्णाकडे झुकणारे खपली गहू उखळात प्रवेश करत. इथे आपले पुरुषी दिसणे कमी करण्यासाठी आपल्याला दिव्यातून जावे लागणार हे माहीत असूनही ते निमूटपणे मुसळीचे घाव सोसण्यासाठी सज्ज होत. मग आई आणि मामी या दोन दिग्दर्शिका मुसळीला वरखाली नाचवत त्यांना हवा तसा मेकओव्हर तिच्याकडून करवून घेत. यावेळी गव्हाचे वॉक्सिंग होत असे. ते करताना कातडी सोलवटली जात असे. म्हणून मध्ये मध्ये त्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा लागे. तरीही एखादा चुकार दाणा पटकन बाहेर पडे. पण दोघी दिग्दर्शिका बारीक लक्ष ठेवून असत. त्या लगेच त्यांचे बखोटे पकडून त्यांना पुन्हा उखळीत घालत. बघता बघता गव्हाचे रुप पालटू लागे. बाह्य आवरण बाजूला पडून हे गहू आता नाटकाच्या रंगात रंगायला लागलेले असत. मग याना पुन्हा सुपात नाच करावा लागे आणि उरले सुरले त्यांचे बाह्य आवरण गळून पडे व गव्हाला अधिक गोरा रंग प्राप्त होत असे. आता मात्र या दोघी दिग्दर्शिका त्यांच्या रुपावर खुश होत त्यांना थंड पाण्याच्या बाथटबमध्ये किमान तासभर तरी डुंबायला सोडत. मग त्याला त्याच पाण्यात चांगले चोळून घेऊन गरम पाण्यात, कुकरमध्ये अग्नी सरांच्या साथीने स्टीम बाथ घ्यायला लावत. मग आपल्यातील पुरुषी ताठा टाकून हे गहूराजे स्त्रीभूमिकेसाठी अगदी मऊ मुलायम बनत. आपल्यात झालेला हा बदल बघून गहूराजे स्वतःवरच खुश होत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर मूठभर पाणी चढून ते टम्म फुगत. अशी ही नाटकासाठी योग्य, अंगाने भरलेली नायिका बघून दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ?

“अहो ऐकलंत का जरा !”

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”

“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”

“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”

“काय s s s s ?”

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”

“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”

“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला ओवाळणीत नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”

“म्हणजे ?”

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”

“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’

“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”

“यात कसलं सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूम मधे कशाला जायचय ते नाही कळलं !”

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे !”

“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”

“तेच ते, अगं पण मग खोटी खोटी एक ग्रॅमची ‘ठुशी’ कशाला ? आपण वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी ‘ठुशी’ घेऊ या की ?”

“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं !”

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत, त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”

“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”

“प्रेशर कुकर आणि…..”

“काय  s s s ?”

“अगं किती जोरात ओरडलीस ? मगाच्या सारखे शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”

“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”

“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय दिवाळीसाठी बाजारात!”

“काय सांगताय काय ?”

“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही?”

“अगं जरा नीट ऐक, मी तुला म्हटलं ना की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”

“बरं, मग ?”

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”

“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच ! ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”

“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”

“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”

“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते म्हणतात!”

“ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेड.”

“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय ! ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”

“ते नाच कामाचं नंतर बघू, पटकन त्याच नांव….”

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”

“काय ?”

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो ! बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस ! बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”

“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पडलो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुंकू/ टिकली डे…. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ कुंकू/ टिकली डे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

#NoBindiNoBusiness

या शेफाली ताईंनी सुरु केलेल्या उपक्रमावरुन काही महिन्यापूर्वी लिहिलेला लेख आठवला

अर्थात त्यांचा उद्देश आणि या लेखाचा उद्देश अगदी वेगळा आहे

पण असंच चालू राहिले तर हा काल्पनिक लेख सत्यात यायला वेळ लागणार नाही

=======================

रिपोस्ट ?

 

कुंकू / टिकली डे *

(काल्पनिक, पण सध्या पहाण्यात येणा-या  निरीक्षणावरुन *)

 

कुंकू किंवा टिकली ला इंग्रजीत काय म्हणतात हे माहित नाही त्यामुळे तेच लिहून पुढे ‘डे’ असं लिहिलय.तुम्हाला माहित असेल तर ते नाव टाकून बदल करायला हरकत नाही. बाकी बरेच जागतीक पातळीवरचे ‘डे’  उदा फादर, मदर, फ्रेंडशीप, चाँकलेट, कटलेट, वडा, सामोसा, योग डे इ.इ.इ हे माहित  आहेत.

तर मंडळी, आजपासून पुढे ५० वर्षांनी  कुठल्या अमेरिकन / युरोपियन संस्थेने केलेल्या पाहणीतून कपाळावर कंकू / टिकली लावणे कसे शास्त्रीय आहे हे सिध्द होऊन जुलै महिन्यातील “फूल मून” च्या जवळच्या रविवारी हा कुंकू/ टिकली डे अतीशय उत्साहात साजरा होईल यात शंका नाही. असा डे साजरा होताना कुणाच्या तरी एकदम लक्षात येईल की अरे ही तर मूळ आपलीच परंपरा आहे. त्या खास दिवसानिमित्य मग चँनेलवर “माझा कूंकवाचा कट्टा” यावर खास चर्चासत्र किंवा विविध ठिकाणी चर्चा सत्रे रंगतील. आठवडाभर स्पेशल सेल मधे अँमेझॉन किंवा तसल्याच कुठल्याही संकेत स्थळावरुन मागवलेले  कुंकू/ टिकल्यांचे combo पॅक एव्हांन घरपोच मिळायला लागले असतील. आपण घेतलेले डिझाईन, किंमत शेअर केली जाईल. एखादी मैत्रीण दुस-या मैत्रिणीला उद्या माझा सेल्फीच बघ, एकदम हटके डिझाईन मागवलय असं सांगून आपण काय मागवलय हे गुलदस्त्यातच ठेवेल.

सोशल मिडीयावर याचे महत्व सांगणारे अनेक निबंध लिहिले जातील, दूरदर्शन वर कुंकू सिनेमा तर काही चॅनेलवर कुंकू मालिकेचे भाग दाखविले जातील आणि इतर अनेक स्पेशल ‘डे ‘ सारखा हा दिवस तेवढ्यापुरता साजरा होऊन संपून जाईल.

काही येतय लक्षात?  असो.

लेखनाचा शेवट नेहमीप्रमाणे टुकार ओळींनी

परंपरे पुरती ‘टिकली’

अन् अस्मितेचे ‘कंकू’

आधुनिक सावित्रींचे म्हणणे

तरीपण

आम्हीच जिंकू

आम्हीच जिंकू

आम्हीच जिंकू

 

 ??

#टिकलीतरटिकली

#NoBindiNoBusiness

अमोल

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुरू…..☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

?  विविधा  ?

 ☆ सुरू….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

 रोज गडबडीने ग्राउंडवर फेऱ्या मारून घरी येऊन कामाला लागणारी मी रविवार असल्याने फेऱ्या मारून झाल्यावर ग्राउंडवरच एका बाकावर बसले.इकडं तिकडं बघितलं. ओळखीचं कुणी दिसलं नाही तसं सभोवताली बघू लागले आणि एका झाडाने माझे लक्ष वेधले.

सरळसोट वाढलेले ते सुरुचे झाड होते.त्याच्याकडं बघताना मनात विचार आले.आपल्या विस्ताराचा पसारा न वाढविता, आजूबाजूला न बघणाऱ्या या झाडाने आकाशाकडंच झेप घेतली की,

त्याची ही वृत्ती मला फार आवडली.ना फांद्यांचे अवडंबर ना फुलांचा मायापाश, सोस!स्वतंत्र जगण्याची ओढ असलेलातो वृक्ष मला एखाद्या व्रतस्थासारखा वाटला.

शाळेत मुलांना शिकविलेला सूचीपर्णी वृक्षांचा प्रदेश आठवला. बर्फाळ प्रदेशात आपल्या टोकदार पानांनी अंगावरचे बर्फ झटकणारा तो सुरे आणि आकाशात झेप घेणारा हा सुरु.एकमेकांचे भाऊबंदच दुसऱ्यात न अडकणारे !

त्या सुरूची मी माझ्याशी तुलना करु लागले. आपल्याला गोतावळा गोळा करण्याची हौस !त्यात अडकलेल्या मायापाशात बऱ्याचवेळा आपल्या ध्येयाचाही आपल्याला विसर पडतो. ज्याची गरज नसते त्यात गुंतून पडतो.अहंकार,  स्वार्थ जोपासतो.

‘कसला विचार करतेस?’

माझं मन मला म्हणालं, मन नव्हे तो सुरुच माझ्याशी बोलला.तशी मी सावध झाले.

‘जमेल कां आपल्याला सुरुसारखे जगणे?सोडता येईल कां मायापाश?तोडता येतील कां स्वार्थाच्या फांद्या?’

खांद्यावर असलेल्या पर्समधील मोबाईल वाजला.नाईलाजाने हातात घेतला.मुलाचा फोन होता.पटकन उठले.

‘मी नाही सुरु होऊ शकणार’

सुरुच्या झाडाकडं बघतच उठले.घरच्या ओढीने !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बापमाणूस ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ बापमाणूस ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही दिवसांपूर्वी आमच्या ब्रह्मकमळाच्या झाडावर एका बुलबुलच्या जोडीने घरटे बांधले आणि थोड्याच दिवसात छोटी, चिमुकली पिल्ले दिसू लागली. आई – बाबा आपापल्या  पिल्लांसाठी खाऊ घेऊन येत असत. पण ते घरटे इतके खाली होते की आमच्या घरातील मांजरे त्यावर डोळा ठेवून होती. आणि एक दिवस त्यांनी डाव साधलाच.बिचाऱ्या आई बुलबुलची शिकार त्यांनी केली.पिल्ले एकटी पडली. पण बाबा बुलबुल मात्र आता दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू लागले.ते दृश्य बघताना माझ्या डोळ्यासमोर बापाची अनेक रुपे उभी राहू लागली.

काही वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी “निमो” नावाचा एक animated चित्रपट आला होता. त्यामध्ये छोट्या निमो माशाची आई मरते व त्याचे बाबा त्याचा डोळ्यात तेल घालून सांभाळ करु लागतात. पण दुर्दैवाने निमो कोळ्यांच्या जाळ्यात सापडतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी केलेली धडपड आपल्या काळजाला हात घालते.

मग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीच्या बापूचा ‛ विठोबा’!

लेकावर अमाप प्रेम करणारा ! बापूच्या आईला स्वतःच्या स्वार्थापुढे मुलगा आणि नवरा यांची किंमत नसते. पण हा विठोबा आपल्या या बापूवर इतके आंधळे प्रेम करत असतो की आपला मुलगा कधी चुकीच्या मार्गाला लागला हे त्यालाच समजत नाही.

याउलट नरेंद्र जाधवाचा मिश्किल आणि रांगडा बाप त्या प्रतिकूल परिस्थितीतही अनेक विनोद निर्माण करत आयुष्य आनंदाने कसे जगायचे हे नकळतपणे मुलांना शिकवून जातो.

तर ह. मो. मराठे यांचे वडील म्हणजे विक्षिप्तपणाचा नमुना! आपल्याबरोबर त्या लहानग्या आईविना असणाऱ्या पोराची फरफट करणारे! पण त्याचबरोबर त्या मुलावर माया पण असणारे ! असे अजब मिश्रण!

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे शिवाजीमहाराज शत्रूशी दोन हात करताना जेवढे कणखर होते तितकेच आपला पुत्र शंभूराजांच्या बाबतीत अतिशय हळवे!  दिलेरखानाच्या छावणीतून पुत्राला परत आणण्यासाठी ते स्वतः जातीने जातात. अवघड जागेचे दुखणे तितक्याच कौशल्याने हाताळले पाहीजे हे त्यांच्यातील बापाला माहीत होते. म्हणूनच स्वतःतील राजेपण बाजूला ठेवून ते बाप बनून शंभूराजांना परत घेऊन येतात.

‘मार्टिना नवरातिलोव्हा’ नावाची ८०/९० च्या दशकातील  टेनिस खेळणारी लोकप्रिय खेळाडू! लहानपणी तिच्या पुरुषी दिसण्यावरुन शाळेतील मुले- मुली तिला चिडवत असत. त्यावेळी तिचे वडील हिरमुसलेल्या  तिला सांगतात,“ आयुष्यात सुंदर दिसणे महत्वाचे नाही तर आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्याच्या जीवनात काहीतरी सुंदर अनुभूती देणे अधिक महत्त्वाचे आहे. ” आणि त्यानंतर तिने विम्बल्डनमध्ये  इतिहास घडवला. तिच्यात हा आत्मविश्वास केवळ वडिलांच्या शब्दांनी निर्माण झाला.

ज्या समाजात लहान असताना सिंधुताई सकपाळ  रहात होत्या त्या समाजात स्त्रियांनी शिक्षण घेणे योग्य मानले जात नव्हते. तरीही त्यांच्या आईच्या विरोधाला न जुमानता सिंधुताईंच्या वडिलांनी त्यांना यथाशक्ती शिक्षण दिले. त्याच इवल्याश्या पुंजीवर सिंधुताईनी आज केवढी भरारी मारली आहे हे आपण जाणतोच.

इंदिरा संत व ना.मा. संत यांचा मुलगा , लेखक‛ प्रकाश संत’ यांना वडिलांचा सहवास अगदी अल्पकाळ मिळाला. पण त्यांच्या लेखनातून प्रकाशना ते भेटत गेले व  त्यांचे जीवन समृद्ध होत गेले.      

याउलट प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिच्या सौंदर्य व अभिनयाचा फायदा घेत तिच्या वडिलांनी तिच्या लहान वयातच चित्रपटक्षेत्रात तिचा प्रवेश करवून अमाप पैसा मिळवला.

‛आनंद यादव’ यांना वडिलांच्या जाचामुळे अनेकदा ‛शिक्षणापासून वंचित रहावे लागते की काय?’ अशी परिस्थिती निर्माण होत असे.

परवाच झी वहिनीच्या ‘लिटल चॅम्प’ या कार्यक्रमात एका मुलीने वडीलांविषयी अतिशय कृतज्ञतापूर्ण उद्गार काढले. त्यांच्या वैयक्तिक समस्येमुळे आईचा सहवास नसणाऱ्या या मुलींना वडील तितक्याच जबाबदारीने सांभाळत आहेत. आणि ही गोष्ट खरोखरच प्रशंसनीय आहे.

असे हे वडिलांचे वेगवेगळे रंग त्या एका घटनेने मनात उभे राहिले. काळ बदलला तसे हे नाते पण बदलत गेले. पूर्वी घराघरात वडिलांची प्रतिमा ‛कडक शिस्तीचे’ अशीच असे. वडीलांसमोर बोलण्याची मुलांची हिम्मत होत नसे.पण हळूहळू ही मानसिकता बदलली आणि नाते अधिक दृढ होऊ लागले. वडील केवळ वडिलांच्या भूमिकेत न राहता मित्रत्वाच्या नात्याने मुलांशी जोडले गेले. काहीवेळा मनात असूनही  प्रत्यक्ष भावना व्यक्त करण्यास मनुष्याला संकोच वाटतो. पण आता फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून  दोघेही आपल्या भावना  अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवू लागले आहेत.

जग बदलले, घरे बदलली, माणसे बदलली. त्यामुळे नात्यांचे रंग बदलले.पण पिढ्यान् पिढ्या वडिलांची भूमिका तिच राहिली. काही अपवाद असतीलही; पण घरातील ‘आधारवड’ म्हणून वडील आजही ठाम उभे असलेले दिसतात. त्या बुलबुल बाबासारखा पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.पिल्ले आकाशाला गवसणी घालू लागली की मात्र अभिमानाने डोळे भरुन त्याची भरारी बघण्यात धन्यता मानतो. म्हणूनच तो “बापमाणूस”!

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print