मराठी साहित्य – विविधा ☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

अनुभवलेल्या प्रसंगांच्या कडू गोड बिया काळजात खोलवर रुजून बनले असते त्यांचे विशालवृक्ष आणि पुनः प्रत्ययाची सुमधुर फळ वारंवार चाखायला मिळाली  असती तर किती मजा आली असती जीवनात.

आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेडंवाकडं करण्याला, वागण्याला कुणी धजावलच नसतं आयुष्यात. सर्वात महत्त्वाचा फायदा हाच झाला असता की घडवणारा व उपभोगणारा बांधील राहिला असता एकामेकाला. संपला असता जीवनकलह, मिटल्या असत्या व्यथा विवंचना उरला असता निखळ आनंद कायमचा . परस्परांना बांधून ठेवणारा, अतूट . पण करणार काय?  आता सुपीक काळीज ही उरलं नाही आणि प्रसंगांच्या बिया ही उगवणक्षम राहिलेल्या नाहीत. हा सुधारलेल्या गतीमन काळाचा महिमा, स्विकारावाच लागेल भविष्याचा कसलाही विचार न करता.  प्राक्तनान दिलेली भेट म्हणून पण भविष्याचा विचार करण्याआगोदर जे पेरलजात तेच उगवतं हे माहीत नव्हतका ? भौतिक सुखाची चटक लागलेले आपण जमानाच बदलला असं म्हणताना , तो कुणी बदललाय याच्यावर  कधी विचार तरी करतो का ? आपला सहभाग आहेच ना त्यात ? मग आपण मौन पाळून गप्प का ? जमाना बदलत रहातो. ती काळाची गरजही आहे.  पण जुनं जे हितकारक आहे.सुंदर आहे, ज्याच्यातून ऐश्वर्याची उंची मोजली जाते. जे सुखकारक असून परमानंद देते. जे गुण आणि अगाध आहे , माणसाला  माणसात ठेवण्यासाठी आवश्यक आहे ते टिकवण्यासाठी आपण काय केलं. की त्याची मोडतोड करण्याला हातभार लावण्याचाच अपराध केला.हे नाहीच तपासलं कधी. कारण आपण मनाचे मिंधे. सुखाना लाचावलेले. थोडेका होइना पण अपराधी आहोतच ना.

केलेला अपराध मान्य करायलाही मनाचा मोठेपणा असायलाच हवा. आपलं चुकत कुठं हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते मान्यकरण्याची हिंमतच हरवली आहे आपल्यातली. मग उगीच कशाला दूस-याच्या नावावर बील फाडायची. माणसाला स्वत:चा टेंभा   मिरवण्याची जुनीच खोड आहे . त्यामुळे काय-काय घडलंय यांचे अनेक दाखले पुराणांन आणि इतिहासान नोंदवून ठेवले आहेत. ते वाचून  शहाणपण शिकेल तर तो माणूस कसला. कारण तो सजीवांच्यातला सर्वश्रेष्ठ जीव आहे, हे त्याला माहीत आहे. म्हणून  “मी करीन तीच पूर्व ” ही त्यांची घमेंड. तेवढ्याच तकलादू बळावर त्यान निसर्ग नियमांना बासनात गुंडाळून ठेवलं . त्यांच्यावर आक्रमण करत आपल्याला हवे तसे बदल घडवण्याचा चंग बांधला आणि टाकला बदलून जमाना आपल्या मर्जीप्रमाण. मग  बदलाचे परिणाम भोगताना आता काय म्हणून गळा काढून रड  मांडायचं.  हे सारं करताना आपल्या पेक्षाही एक वरचढ शक्ती या विश्वात आहे हेच आपण सोईस्कर रित्या विसरलोय . जग नियंत्यान घालून दिलेले आणि अनादी अनंत काळापासून चालत आलेले नियम पाळायला नकोतका? ते मोडले,की   गालफाड सुजेपर्यंत पडत जाणा-या थपडा  सोसाव्या लागतात. सध्या आपण हेच अनुभवत नाही काय ? तशा त्या पुढेही वाढतच रहाणार आहेत. निदान हे तरी लक्षात घेऊन पावलं उचलली जावीत हे समजायला हवं माणसाला.

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन… ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? विविधा  ?

☆ मन…☆ सौ .कल्पना कुंभार ☆

माणसाचं मन किती विचित्र असत ना.?? आता इथे तर क्षणांत दुसराच विचार मनात डोकावून पहातो…

मन कधीच शांत किंवा स्थिर नाही रहात..सतत काही न काही विचार हे चालूच असतात मनांत….अगदी झोपेतही…

मन कधीच समजू शकत नाही आपण त्याला…त्याचा थांग लागण खरचं खूप अवघड..कधी ते अगदी लहान वाटतं…मुंगीप्रमाणे…तर कधी गरुड होऊन उंच आकाशी भरारी मारू लागतं….

या मनाचे ना अनेक कप्पे आहेत..काही उलगडणारे..सहज..सोपे तर काही न उलगडणारे… गूढ…

या गूढ कप्प्यात अनेक आठवणी बंदीस्त करून ठेवलेल्या असतात जणू…अन बाहेर लावलेलं असतं भल मोठं कुलूप…अहंकाराच…

हा अहंकार जेंव्हा वितळू लागतो तेंव्हा हे कुलुपही नकळत तुटून पडत…अन अनंत आठवणी फेर धरू लागतात या मनभोवती….या आठवणीतून बाहेर पडणे वाटत तितकं सोपं नक्कीच नसत….त्यासाठी हवा असतो एक भरभक्कम आधार…प्रत्येकालाच..

असा आधार..अशी साथ ज्याला लाभते..तो खरचं खूप भाग्यवान… मनाच मनाशी जुळलेलं नातं जर घट्ट असेल तर कितीही वादळ आली तरी हातातले हात सुटत नाहीत…आणि मन पुन्हा गुंतू लागतं त्या अलवार मिठीत….त्याच्या प्रेमात…त्याच्या स्वप्नांत… जो ठाम उभा असतो प्रत्येक वादळात… आपल्यासमोर..

मन मनाशी सांगत

मनातलं गुंजन

मनातल्या स्पंदनांची

मनाशीच गुंफण

 

मनी आठवणीचा फेरा

नयनी दाटले काहूर

होती पापण्या या ओल्या

लागे कोणाची चाहूल

 

मन क्षणांत उदास

मन क्षणांत हसरे

मनालाच उमजेना

मन मनांत गुंतले

 

मन मनाशी खेळते

मनाचेच खेळ

कोण जिंके कोण हारे

त्याला नाही कसली फिकीर

 

मन नाजूक ते फुल

पडते मनास भूल

मन होते रे भ्रमर

त्याला सुगंधाची हूल

 

मन नाही समजत

मन नाही उमजत

मन न सुटलेले कोडे

मन तुझ्यासाठीच वेडे

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:: 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ लक्ष्मी गेली सिंगापुरी, आली अन्नपूर्णा दारी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? लक्ष्मी गेली सिंगापुरी, आली अन्नपूर्णा दारी ! ??

“नमस्कार पंत !”

“नमस्कार, काहीही म्हण मोरू पण आजच्या तुझ्या नमस्कारात नेहमी सारखा उत्साह नाही !”

“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो ?”

“अरे म्हणजे जुलमाचा राम राम कसा असतो ना, तसा वाटला आजचा तुझा नमस्कार आणि तुझा चेहरा पण  पडलेला दिसतोय !”

“पंत, सकाळी सकाळी बातमीच अशी कानावर आली, की मूडच गेला सगळा.”

“तू असा कोड्यात बोलणार आहेस का बातमी सांगणार आहेस ?”

“मला वाटलं आत्ता पर्यंत तुम्हाला ‘लक्ष्मी….’!”

“अरे मोरू, दिवाळी आली आणि गेली सुद्धा, तुझं ‘लक्ष्मी पूजन’ राहील असेल तर……”

“पंत, मी या दिवाळीत लक्ष्मी पूजन अगदी मुहूर्त साधून केलं आहे. मी बातमी सांगतोय ती ‘करूर’ काकांच्या ‘लक्ष्मी’ बद्दलची !”

“हां हां, ते ‘दक्षिण भारतातून’ आपल्याकडे

येवून बऱ्याच वर्षापासून

कुटुंबा सोबत राहतायत, तेच ना ?”

“हो हो, तेच ते !”

“त्यांच काय झालं मोरू ?”

“अहो त्यांची ‘लक्ष्मी’ पळून गेली ‘विलास’ बरोबर !”

“अरे बापरे, करूर काकांना शॉक बसला असेल ना ?”

“हो ना पंत !”

“पण मोरू कुठे पळाले असतील हे दोघे, तुला काही कल्पना ?”

“अहो, कल्पना कशाला करायच्या आपण, त्या दोघांनी  चक्क पेपरात बातमीच दिली आहे, की आम्ही दोघ आता ‘सिंगापूरला’ रहाणार आहोत म्हणून !”

“बापरे, मुलीच्या या अशा वागण्यापुढे आई बापावर काय प्रसंग आला असेल हे त्यांच त्यांनाच ठाऊक !”

“मी तेच म्हणतोय, भारतातलाच एखादा शोधला असता तिनं, तर नक्की मिळाला असता ‘करूरांच्या लक्ष्मीला.’ तशी रूपाने, अंगापिंडाने बरी होती की ती !”

“जाऊ दे रे मोरू, तू असा चेहरा पाडून बसू नकोस, ‘लक्ष्मीच्या’ नशिबात ‘सिंगापूर’ होत म्हणायचं आणि गप्प बसायचं ! शेवटी ‘लक्ष्मी’ कुणाचीही असो, ती चंचल असते हेच खरं !”

“हो ना पंत, आपल्या हातात तेवढंच आहे.”

“मोरू ‘लक्ष्मी’ सिंगापूरला गेली ठीक आहे पण आता तुला एक गोड बातमी देतो, म्हणजे तुझा गेलेला मूड थोडा तरी परत येईल !”

“कसली बातमी पंत ?”

“अरे आता आपली ‘अन्नपूर्णा’ परत येणार आहे आणि ती सुद्धा तब्बल शंभर वर्षांनी, त्यातच आनंद मानायचा झालं !”

“पंत, आता ही ‘अन्नपूर्णा’ कोणाची कोण आणि ती कुठून परत येणार आहे ?”

“म्हणजे तू पेपरातली ‘अन्नपूर्णेची’ बातमी वाचली नाहीस का ?”

“नाही पंत, कुठली बातमी ?”

“अरे मोरू, वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली ‘अन्नपूर्णा’ या हिंदू देवतेची मूर्ती, कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे !”

“अरे व्वा पंत, खूपच चांगली बातमी दिलीत, ‘लक्ष्मी सिंगापुरी’ गेल्याच दुःख आहेच, पण शंभर वर्षांनी परत  येणाऱ्या ‘अन्नपूर्णेचे’ स्वागत करायला या तुमच्या बातमीने मनांत थोडा उत्साह संचारला आहे, हे नक्की ! धन्यवाद पंत !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मज आवडते…. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ मज आवडते…⛱ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

धुक्याची दाट दुलई सावरत फिकुटल्या चांदण्याचा पदर आवरत …..भालावरील चांदव्याची टिकली एकसारखी करत…. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाला साद देत …. मंदिरातील घंटा मंजुळ वाजवत ऊबदार पहाट व्हायला आवडेल मला! सकाळच्या त्या तेजपुंज अरुणोदयाचे मंगल दर्शन घेऊन मग हळूहळू उतरत .. त्या डोंगरमाथ्यावरून खाली …खाली खोल दरीत विसावताना लाडीक झटका देईन ओलेत्या काळ्याभोर केशसंभाराला अन…पाणीदार मोत्यांच्या लडी विस्कटेन झुलत्या तृणाग्रावर …पर्ण संभारावर …फुलांच्या स्मित गालावर.

कधी मंद मंद वाऱ्याची झुळूक बनून झोके घेत उडवत राहीन गन्ध ताज्या फुलांचा…अन मस्त शीळ घुमवेन वेळूच्या बेटी ….उडवेन कुणा अल्लड तरुणीच्या अवखळ बटाना ..भुरुभुरू ..हाय !….. बघत राहीन तिची  खट्याळ लगबग!

काळाकुट्ट मेघ होऊन बरसावे मनसोक्त …निथळत रहावे प्रेयसीच्या बटामधून ..मोती होऊन …शुष्क धरणीला तृप्त करत …निथळत राहावे तिच्या सर्वांगावरून नद्या ,झरे होऊन .द्यावी नवी नव्हाळी अन न्याहाळत राहावे अनिमिष नेत्रांनी …तिचे नवे कोवळे हिरव्या पाचूच्या शालूतील हिरवकंच सौंदर्य! जावे .-कुण्या तृषार्त चातकाच्या चोचीत सामावून.

डोलत रहावे अवखळ वाऱ्यासोबत शेतात भरलेले कणीस होऊन ….भागवावी भूक कुण्या भुकेल्या पाखराची अन कुणा लेकराची !

गात राहावे …भटकत रहावे मनमौजी छोटेसे पाखरू बनून …रानमेवा खात ….आपल्याच मस्तीत गुंग …या फांदीवरून त्या फांदीवर झोके घेत …इवल्या पानाआड लपाछपी खेळत !

प्यावे ते पौर्णिमेचं चांदणं ..व्याकूळ चकोर होऊन …काजव्याचे  बांधून पैंजण धरावा ताल …करावे बेभान नृत्य ….

चांदणं भरल्या नभातील व्हावे एक प्रकाशतारा …दाखवावी वाट प्रकाशाची कुणा वाट चुकलेल्या पांथस्थास .

होऊन शूर सैनिक करावे भारत भूचे रक्षण… उसळून रुधिराचे तुषार करावे सिंचन त्या पवित्र मातीवर !

व्हावे आई त्या सर्व अनाथांची अन पांघरावी त्यांच्यावर मायेची ऊबदार सावली !…हसवावे ..रिझवावे बालमन गाऊन अंगाई…हरवून जावे बोबड्या बोलात …

नाहीच जमले तर व्हावे तो पायरीचा एक दगड त्या ज्ञानमंदिराचा …ज्या पायरीवर उभा राहील उद्याचा तरुण, उज्वल भारत !!

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोष्ट तशी साधीच..,पण..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ गोष्ट तशी साधीच..,पण..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखादी गोष्ट एका ठराविक पद्धतीने करायची सवय एकदा लागली की ती गोष्ट त्याच पद्धतीने नाही झाली, त्यात कांही अनपेक्षित अडचण आली तर मन बेचैन होतं. अंगवळणी पडलेली एखादी विशिष्ट रीत एखाद्या क्षणी तशीच नाही अनुसरता येत. अट्टाहासानं तसं करणं आपलंच मन कधीकधी नाही स्विकारत. तेव्हा आपण अस्वस्थ होतो. द्विधा मन:स्थितीतील त्या अस्वस्थ मनाला बुद्धीची जर योग्य साथ मिळाली तरच विचारांना एक नवी दिशा मिळते. एरवी रीतसर सगळं करायच्या अट्टाहासात ती दिशा मात्र हरवून बसते.

          त्याचीच ही गोष्ट.

          गोष्ट तशी साधीच..पण

माझ्यासाठी मात्र तो अनुभव अतिशय मोलाचा. म्हणूनच आज चाळीस वर्षं उलटल्यानंतरही मी तो विसरु शकलेलो नाहीय.

तो क्षणच तसा होता. कसोटी पहाणारा.माझ्या बुध्दीची.., माझ्या श्रध्देची.., माझ्या आस्तिकतेची..!!

होय. मी आस्तिक आहे. रोजची नित्य देवपूजा हा केवळ अंगवळणी पडलेला म्हणून नव्हे, तर वर्षानुवर्षं मी श्रद्धेनं जपलेला नित्यनेम आहे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधे एक पुसट रेषा असते असे म्हणतात. ती रेषा मला मात्र त्या कसोटीच्या क्षणी स्पष्ट दिसली आणि मी सावरलो. साधारण १९७८-७९ सालातला हा प्रसंग. माझं पोस्टींग कोल्हापूरला होतं. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आम्ही राहायचो. माझी रोजची देवपूजा म्हणजे फुलं हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? ती जागाच अशी होती की फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. सकाळी उठल्यावर चूळ भरली कि मी आधी फुलवाल्याने पहाटे कधीतरी शटर मधून टाकलेली ती फुलपुडी घेऊन आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्यादिवशी फुलपुडी उचलायला गेलो तर ती नेहमीच्या जागेवर पडलेली नव्हतीच. मग लक्षात आलं,त्या दाराच्या आडोशाला ठेवलेल्या शूजस्टॅन्डमधल्या माझ्या एका बुटाच्या खाचेत ती फुलपुडी पडलेलीय. मी नाराज झालो. ती फुलपुडी तशीच आत घेऊन आलो. त्यातल्या फुलांवर पाणी शिंपडून घेतलं. तेवढ्यापुरतं मनाचं समाधान झालं. पूजेला बसलो. देव धुऊन पुसून ताम्हणात ठेवले. गंध लावलं. नेहमीप्रमाणे फुलं वहायला हातात घेतली आणि अडखळलो. ती फुलं देवाला वहावीत असं वाटेचना. मग देवाला न वहाताच ती फुलं परत तबकांत ठेवली. देवाला हळद-कुंकू वाहिलं.निरांजन लावून नैवेद्य दाखवला. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होतीच. पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली पुसटशी रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो असं म्हणतात. पण माझ्या बुद्धीने त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पाहणाऱ्या माझ्या मनाला सावरलं होतं.योग्य आणि अयोग्य यातल्या फरकाची नेमकी जाणिव करून दिली होती.पूजेला फुलं नसल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीने अलगदपणे दूर केली होती. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं होतं.केवळ रीतीपेक्षा, उपचारांपेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं होतं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. डोळे मिटले. हात जोडले आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,’ देवा,आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारांत एखाद्या लहानशा कुंडीत कां होईना पण चारदोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहीन’.

पुढं जवळजवळ सोळा वर्षं ही देवपूजा अशीच सुरु राहिली. 1993 साली सांगलीतल्या वास्तव्यात आम्ही आमच्या गाव भागातल्या स्वतःच्या फ्लॅटमधे शिफ्ट झालो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या त्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तीयुक्त अंतःकरणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली,त्या पूजेनंतर मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना अपूर्व अशी होती. आज आमच्या’त्रिदल’ या वास्तूत सभोवतालच्या प्रशस्त बागेतल्या विविध रंग-रूप-वासांच्या फुलांनी दोन तीन मोठ्या परड्या तुडुंब भरून तेवढीच फुलं झाडा वेलींवर शिल्लक असतात.त्या परड्यांमधल्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरां मधल्या ‘त्या’च्यापर्यंत पोहोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो.देणारा तोच आणि घेणाराही तोच.पण त्यात आपलं निमित्तमात्र असणंही खूप सुखदायी असतं याचा अनुभव मला रोज नव्याने येत आहे.’त्या’चं आस्तित्त्व मनोमन मानलं त्या अजाण वयातल्या क्षणापासून  सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या असंख्य प्रक्रियां मधला तो एका क्षणभराचा अनुभव! त्यानंतर बरंच काही घडलं.लेखनाइतकीच वाचनाची आवड होती,पण त्या वाचनात नकळत विविधता आली.अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री.जी. के.प्रधान यांचं पुस्तक मला प्रभावित करून गेलं होतं. श्री.हरी भाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या छोटेखानी पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्त्व मला समजावून सांगितलं.श्री.संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा अक्षरश: खरवडून काढली आणि विचारांना योग्य मार्गावर आणलं.नरेंद्र दाभोळकरांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा,भ्रम आणि निरास, उच्चाटन अंधश्रद्धेचे,यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसटशी रेषा अधिक ठळक केली हे मला आवर्जून सांगावसं वाटतं.

प्रत्येक वेळी रीतसर वागण्याच्या अट्टाहासामागे भावनांचा अतिरेक असतोच. त्या भावनांना बुद्धीची जोड मिळाली तरच त्या त्या वेळी तेवढ्यापुरती कां होईना रीतीभातीना योग्य मुरड घालणं शक्य होतं आणि ते आनंददायीही असतंच याचा प्रत्यय देणाऱ्या अनुभवाची ही गोष्ट!

गोष्ट तशी साधीच…,पण अनुभव मात्र लाख मोलाचा..! म्हणूनच आवर्जून सांगावा असा..!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तू…. ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ तू…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

तू  तुफान वेगाने धावणा-या आयुष्याला एका अवघड वळणावर भेटलीस.  हळूवार कुजबुजताना म्हणालीस.

“जे नको असतं तेच नेमकं गरजेपोटी पदरात पडतं. ते नाइलाजानं घ्यावही लागत. त्यालाच जन्मभर झेलाव लागत . काळीज दगडाच करून . आपल्याच माणसासाठी, आपलं आपलं म्हणत लागतं आत्मसमर्पण करायला. अस्तित्व आपलं गहाण ठेवून, आपल्याच काळजात .  पराकोटीचा सोसावा लागतो छळ बिनबोभाट , आतला आणि बाहेरचा सुद्धा. उरतोच कुठे आपण आपले ! होवून जातो कळसुत्री बाहुले वास्तवाच्या हातातले. असे कैकजण असतात. संस्काराच्या आणि जुनाट संस्कृतीच्या प्रचंड ढिगा-या खाली  दडपलेले.”

तू प्रथम भेटलीस. बोललीस,  तुझे पाणीदार अबोल डोळे आतलं खोलवरच खूप काही सांगून गेले. तुझ्या नकळत मी समजून घेतलं सारं. कोरलच म्हण ते मी माझ्या काळजावर . मग या त्या निमित्ताने वरचेवर भेटलो. व्यथांच्या कथा मात्र कधीच ऐकवल्या नाहीत तुझ्या तोंडून. तूझं ते तुझं होत तुझ्याच काळजात साठवलेल. दडपून टाकलेलं. मला जाणवत होतं हे सारं . पण ते मला तुला विचारण्याच धाडस कधीच होत नव्हतं. कारण त्या मुळं वर्तमानच बदलून गेलं असतं याचा अंदाज होता मला. म्हणून मी ही गप्प गप्प.

पुढच्या अनेक भेटीत  समज गैरसमज दृढतर होत गेले. तू अबोल मी अवाक. तुझ्या भेटीची आस बाळगून रानभर भिरभिरणारा चातक.

तेव्हा पासूनची तुझी तीचती अवस्था. आजही तशीच . बदलं काहिच नाही. तो होणार तरी कसा  ? पण तुझं सोसण आणि इतरांसाठी भरभरून करणं दोन्हीही ग्रेट. प्राण जाय पर वचन न जाय म्हणतात तसं.  तू वृतस्थ देवभोळी , श्रद्धाळू  दैवात गुंतून देवासाठीच नव्हेतर सा-या साठीच चंदन होऊन झिजणारी. खंबीर विश्वासावर टिचून जगणारी.  हे सारं वरवरचं जगाला दाखवण्या साठीचं . पण इथेच एक पण हळूच डोक वर काढायचा आणि सहजतेने विचारायचा तुला.

“कधी कुणी केली का कदर तुझी ?  तुला विचारल का कधी काय हवं नको ते ? राबलीस तू तुझं विसरून अस्तित्व. पदरात बांधत राहिलीस  गाठोडं  पदोपदी होणा-या अपमानाच. वठवलीस भुमिका आदर्श स्त्रीची. भारतीय सुसंस्कारित नारीची . पोशिंदी बनलीस कुटुंबीयांची. मिळणारी  मौलिक संधी ठोकरून.  या शिवाय काहीच नव्हत तुझ्या मुलायम नाजूक सतत राबणा-या हातात. तू कधीच समाधानी

नव्हतीस हातात पडणा-या ढिगभर पैशावर .  फक्त पैसाच पुरेसा पडत नसतो संसाराला. इतरही मोप लागत, जे विकत घेता येत नाही ते. त्याचे बाजारच भरत नाहीत कुठे. पण नेमक तेच तू दिलस  .  तू कमवू शकली नसतीस काय पैसा, सांग बरं? पण तुझ्या मनाला तो विचारसुद्धा शिवला नाही कधी, तुझा तेवढा अधिकार असूनही. फक्त राहिलीस राबत. सगळ्या साठी . सारकाही पाठीवर टाकून. शिणलीस ,भागलीस, थकलीस पण बोलली नाहीस कधी. हेच तुझं दातृत्व सोईस्कर विसरून गेलेत सारे पाटचे, पोटाचे, आणि मालकीहक्क सांगणारेही.”

तुझ्या प्रथम भेटीपासून तूला मी तशीच पहात आलोय आज तागायत. पण तू जशीच्या तशी स्थितप्रज्ञ. कमाल आहे तुझी. तुला भेटल्या पासून मी तसा बनण्याचा फक्त विचारच करत राहिलोय. पण बनलो काहीच नाही.  कारण मी संवेदनाशील आणि हळवा नाही तुझ्या इतका. मी आता तुझ्या सारखाच चाकोरीबद्ध जगण्यात मुरून गेलोय. केवळ तुझ्या उदारमतवादी विचारांनी. म्हणूनच प्राकर्शान आठवतेस  तू,  तुझीच प्रतीमा समोर उभी रहाते. आणि काळजावर कोरली जातेस फक्त तू.

???

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेळ…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ खे ळ !  ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

” खेळ मांडीयेला वाळवंटी काठी….”

निरनिराळ्या ‘खेळांची’ परंपरा आपल्या भारतात अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे ! अगदी तुकोबा सुद्धा आपल्या वरील अभंगात ‘खेळाचा’ उल्लेख करतात !  पण तुकोबांच्या या अभंगात त्यांना जो ‘खेळ’ अभिप्रेत आहे, तो माऊलीच्या भक्तीत रंगून चंद्रभागेच्या वाळवंटात नाचणाऱ्या भक्तांना उद्देशून आहे ! नंतर नंतर कालपरत्वे ‘खेळ’ या शब्दाची व्याख्या, संदर्भ आणि अर्थ बदलत गेले !

“चला मुलांनो, दिवेलागण झाली, आता पुरे करा तुमचे खेळ ! सगळ्यांनी घरात चला आणि हातपाय धुवून शुभंकरोती सुरु करा बघू !” हे असे उद्गार माझ्या पिढीतील अनेकांनी लहानपणी आपल्या आजी, आजोबांकडून अथवा आई वडिलांकडून अंगणात खेळतांना ऐकले असतील, याची मला शंभर टक्के खात्री आहे ! यातील ‘खेळ’ या शब्दाचा अर्थ निदान त्या काळी तरी आम्ही खेळत असलेल्या, लपाछपी, लगोऱ्या, लंगडी, हुतुतू इत्यादी अनेक खेळांसाठी असायचा ! हे ‘खेळ’ काय असतात, हे हल्लीच्या पिढीतील लहान मुलांना माहित असण्याचा संभव तर सोडाच, या खेळांची नांव तरी त्यांना माहित असतील का नाही, याचीच मला शंका आहे ! असो !

नंतर जसं जसे वय वाढत जातं, तस तसे आयुष्यातले अनेक टक्के टोणपे खाता खाता ‘खेळ’ या शब्दाच्या अनेक व्यापक अर्थांची, नव्याने जाणीव व्हायला लागते. काही बऱ्या वाईट ‘खेळांचे’ अनुभव आपल्याला दुसऱ्या लोकांकडून यायला लागतात ! त्यातून जो शिकतो तोच जगात तरतो, हे झालं माझं मत !

जगात अनेक प्रकारचे ‘खेळ’ खेळले जातात ! या दुनियेत निरनिराळे ‘खेळ’ करणारे आणि तो आवडीने बघणारे लोकं, यांची अजिबातच वानवा नाही ! लहानपणी शाळेत जातांना रस्त्यावर, भागाबाई व राजा, हा माकड आणि माकडीणीचा ‘खेळ’ किंवा दोन टोकाच्या दोन दोन बांबूना मधे उंच ताणून बसवलेल्या तारेवर कसरत करून ‘खेळ’ दाखवत आपापली पोट भरणारा डोंबारी, यांचे ‘खेळ’ आम्ही रस्त्यात उभे राहून आवर्जून पहात होतो आणि मगच पुढे शाळेत जात होतो. काही काही भाग्यवान कसरत पटूना त्यांचे ‘खेळ’ दाखवायची संधी सर्कसच्या तंबुत मिळायची, हे ही तितकेच खरं !

तरुणपणी कॉलेजला जातांना, आपल्या रोजच्या यायच्या जायच्या मार्गांवर, एखादी सुंदर तरुणी रोज दिसायला लागली की, आपण पण साधारण तीच ठराविक वेळ रोज गाठायचा प्रयत्न सुरु करतो ! प्रथम तिच्याशी नजरा नजर, नंतर थोडं हसणं, यामुळे हृदयात फुलपाखरं नाचायला लागतात ! आपणहून तिच्याशी बोलायचं धाडस होतं नाही, पण रात्रीची झोप खराब व्हायला एवढं कारण पुरतं ! कधी एकदा तिचं दर्शन होतय, हा एकच विचार सकाळी उठल्यापासून मनाला छळत असतो ! मग यातून सुरु होतो एकतर्फी प्रेमाचा ‘खेळ’ ! मन लगेच भावी आयुष्याची स्वप्न पाहण्याचा ‘खेळ’ खेळण्यात दंग होऊन जातं ! हा एकतर्फी प्रेमाचा ‘खेळ’ असाच काही दिवस चालू रहातो आणि एक दिवस रोजच्या सारखी समोरून येतांना ती दिसते ! पण, आज तिच्या हातात हात घालून, एक उमदा तरुण चालत असतो ! ती दोघं हसत खिदळत आपल्याच मस्तीत आपल्या अंगावरून जातात. तिच आपल्याकडे बघून रोजच हसणं तर सोडाच, पण ती आपल्याकडे ढुंकूनही न बघता, त्याच्या बरोबर निघून जाते ! तरुणपणी अनुभवास आलेल्या पहिल्या वहिल्या एकतर्फी प्रेमाच्या ‘खेळाचा’ दि एंड होतो !

ऑफिस मध्ये सुद्धा बॉस आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून, आपल्या कडून जास्त काम काढून घेण्याचा ‘खेळ’ खेळत असतो ! पण शेवटी तो बॉस असल्यामुळे, आपल्याला नाईलाजास्तव त्याच्या ‘खेळात’ हसत मुखाने सामील होऊन त्या ‘खेळात’ कायमच हरण्याचे नाटक करण्यावाचून गत्यन्तर नसते !

काही व्यापारी व्यापार करतांना, गिऱ्हाईकाच्या हावरेपणाचा फायदा घेऊन, आपला खराब माल वेगवेगळ्या स्कीम खाली  (sale) त्याच्या गळ्यात मारण्याचा “खेळ” आत्ता पर्यंत निरंतर खेळत आले आहेत आणि या पुढील काळात पण ते असा “खेळ” खेळत राहतील, यात काडीमात्र शंका नाही !

माझं दुसरं असं एक निरीक्षण आहे की, हल्लीच्या काही तरुण मुलांना, बोलतांना शब्दांचे ‘खेळ’ करायला भारीच आवडतं ! माझ्या मित्राचा एक मुलगा आहे कॉलेजला जाणारा, त्याला एकदा मी विचारलं, “काय रे गौरव, बाबा आहेत का घरी ?” तर हा पट्ठ्या मला म्हणतो कसा “आई बाहेर गेली आहे !” त्यावर मी काही बोलणार, त्याच्या आत स्वारी माझ्या समोरून गायब सुद्धा झाली ! आता बोला !

लेखाचा विषय कुठलाही असला, तरी त्या विषयात नेते मंडळींचा उल्लेख नसेल, तर तो लेख पूर्ण झाल्यासारखे, निदान मला तरी वाटतं नाही ! तर ही नेते मंडळी सुद्धा आपापल्या अनुनयांच्या भावनांना हात घालून त्यांच्याशी ‘खेळ’ मांडतात आणि  राजकारणातली आपली उदिष्ट साध्य करण्यात कुठलीच कसर बाकी ठेवत नाहीत ! आणि इतकंच नाही तर त्यांची ती उदिष्ट एकदा का साध्य झाली, की नंतर त्याच अनुनयांना वाऱ्यावर सोडण्याचा ‘खेळ’ तितक्याच कोरडेपणाने खेळतात !

शेवटी, आपल्याकडून वेगवेगळे ‘खेळ’ करवून घेणारा किंवा आपल्याशी ‘खेळ’ करायला दुसऱ्या कोणाला तरी उद्युक्त करणारा सर्वांचा “खेळीया” हा वर बसला आहे, यावर माझा गाढ विश्वास आहे ! आपण सगळे फक्त त्याच्या ईशाऱ्यावर, तो सांगेल तेंव्हा, तो सांगेल तो ‘खेळ’ खेळणारे खेळाडू आहोत एवढं ध्यानात धरलं, की आपल्या वाट्याला येणाऱ्या कुठल्याही खेळातल्या जय, पराजयाचा त्रास आपल्या मनाला होणार नाही याची खात्री बाळगा !

शुभं भवतु !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अशा सांजवेळी… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार

सौ. कल्पना मंगेश कुंभार

?विविधा ?

☆ अशा सांजवेळी… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सांजवेळ…! ही वेळचं किती विचित्र आहे ना..??या वेळेच्याही दोन छटा आहेत..

एक आहे सुखाची,प्रसन्नतेची, हास्याची,शांततेची,आनंदाची, सकारात्मक…

आणि दुसरी आहे..दुःखाची, आठवणींची,मनात काहूर माजवणारी,कोणाच्या तरी प्रतिक्षेची,नकारात्मक….

सांजवेळ…!सांजवेळ येते ती शांतपणे…प्रसन्नतेचे वातावरण पसरत…देवापुढे सांजवात लावून..आपली संस्कृती जपत… शुभम् करोति.. चा संस्कार लहान बालकांमध्ये रुजवत..एखादया नव्या नवेली नवरीप्रमाणे लाजून चूर होऊन…म्हणूनच की काय..ती सूर्याची लाली पाहून वारा अधिकच गंधाळतो आणि सारा आसमंत शहारतो…

सांजवेळ…! प्रत्येकाला ओढ लागलेली असते घरी परतण्याची… सगळे ऑफिस, सगळ्या शाळा सुटलेल्या असतात आणिआई ,बाबा …मुले सगळेच घराच्या ओढीने घरी लवकर परतण्यासाठी धडपडत असतात.आकाशातील पक्षांचे थवेच्या थवे जणू अस्ताला जाणाऱ्या सूर्याला ” उद्या पुन्हा भेटू ” असे सांगून आपल्या पिल्लांच्या ओढीने घरी परतत असतात.ते दृश्यचं इतकं नयनरम्य असतं ना; की वाटतं आपणही पक्षी व्हावं आणि त्या पक्षांच्या थव्याबरोबर सूर्याची कोमल, सोनेरी किरणे पंखावर झेलत त्याला निरोप देऊन घरी उडत उडत परतावं….अशी ही किलबिलाटाने भारलेली मनमोहक सांजवेळ! पण….पण किती भुर्रकन उडून जाते ना…

अशा या सांजवेळेची दुसरी छटा… हवीहवीशी  वाटणारी पण तितकीच नकोशीही…अगदी जीवघेणी..

सांजवेळ ..! हीच वेळ…हीच वेळ मनात उठवत असते काहूर..हीच वेळ..हीच वेळ जागे करू पहाते माणसाचे अंतर्मन…..अंतर्मनात दडलेल्या त्या….अनेक ‘आठवणी’…. मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेले अनेक ‘क्षण ‘…काही गोड, हवेहवेसे.. तर काही कटू…काहूर माजवणारे…

या आठवणीमधील ‘ तो ‘

एक चेहरा…. जो आठवता मन जाते भारावून… आणि मग..तुला मनाला आवर घालणे कठीण होऊन बसते.अशा वेळी ही सांजवेळ जणू छळू लागते मनाला… दाटून येतो आठवांचा पाऊस आणि भिजवून चिंब चिंब करतो प्रत्येक क्षणाला.. हरवून जाते मन भूतकाळात….

भूतकाळातील ‘ तो ‘ किंवा ‘ ती ‘ …त्याच्याबरोबरच्या अनेक आठवणी….रुसवे फुगवे, एकत्र घालवलेले अनेक क्षण,मित्रमैत्रिणीचे चिडवणे…झालेली भांडणं…. धरलेला अबोला….रुसवा काढण्यासाठी केलेले प्रयत्न… तो लटका नाकावरचा राग…सगळं…अगदी सगळं आठवू लागतं आणि आपण स्वतः लाच विसरून जातो.कधी ओठावर गोड हसू उमटतं… तर कधीं नकळत पापण्या ओलावतात.अशी ही सांजवेळ……

सांजवेळ…! नव्या नवेली नवरीला क्षणात माहेरच्या अंगणात घेऊन जाते…तिची माहेराप्रतिची ओढ.. अशा एकाकी सांजवेळी उफाळून येते… मग तीही रमून जाते माहेरच्या कुशीत…आठवत रहाते तिचं बालपण… भावाबहिणीची लुटुपुटूची भांडणं… आईबाबांचे प्रेम….अगदी सगळं नजरेसमोरून जाऊ लागतं अगदी चित्रपटाप्रमाणे…मग दाटून आलेल्या या सांजवेळी तीही होते थोडी सैरभैर… पण इतक्यात लागते सख्याची चाहूल आणि त्याच्या ओढीने ती क्षणात सासरी परतते आणि रमून जाते तिच्या घरांत.. अशी ही सांजवेळ.. .जितके उलगडावे तिला तितके आपणच गुरफटून जाऊ तिच्यामध्ये…

सांजवेळ…! प्रत्येकाला पहायला लावते कोणाची तरी वाट..प्रत्येकजण असतो कोणाच्या तरी प्रतीक्षेत..पण….हवीहवीशी वाटणारी ती व्यक्ती जेव्हा येत नाही; तेंव्हा हीच सांजवेळ बनते भयाण.. भेसूर…

अशा या सांजवेळी मला कवी ग्रेस यांची एक कविता आठवते…

 

” भय इथले संपत नाही

   मज तुझी आठवण होते..

    मी संध्याकाळी गातो

    तू मला शिकवले गे ते..”

किती आर्तता आहे ना या गाण्यात… जेवढे हृदयातून ऐकू तेवढेच त्या गाण्यात हरवून जातो आपण…

पण…ही दुसरी छटा आहे। म्हणूनच पहिल्या छटेलाही अर्थ आहे,नाही का??

 

“येते लाजून चूर होऊन

सूर्याची लाली गाली लेऊन पक्षांच्या पंखांवर स्वार होऊन

हवेत गारवा पसरवून

सगळीकडे दिव्यांची रोषणाई करून

अशी ही सांजवेळ….

  पण…

जाते मात्र…

मनात काहूर माजवून

कोणाची तरी आठवण..

मनात ठेवून

डोळ्यांच्या पापण्या

ओल्या करून…

शांत सागरी

लाटा उठवून…

        अशी ही सांजवेळ……

 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ग्राइप वाॅटर. ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆  ग्राइप वाॅटर ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला

काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला हि जाहिरात आपण वर्षोनवर्षे पहात व ऐकत आलो आहोत. पण हे ग्राईप वॉटर म्हणजे नक्की काय ?

विलिअम वूडवर्डस या औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये फेन फिव्हरची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते.

वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बाळंतशेपू  तेल, सोडिअम बायकार्बोनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली.

कधीकधी ग्राइप वॉटरमध्ये बडीशोप व आल्या चाही समावेश असतो.

शेपा जे ग्राइप वॉटर चे मूळ घटक आहे ह्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens असे आहे. अंबेलिफेरी कुटुंबातली ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. यास बाळंतशोपा असेही नाव आहे. Anethum हे नाव ग्रीक ऍनिसोन  या शब्दापासून बनवले आहे ज्याचा अर्थ तीव्र वास असा होतो. Dill या शब्दाचे उगम सॅक्सन शब्द Dillan हया शब्दापासून  झाले आहे. Dillan means dull the restless child to sleep,  म्हणजेच अस्वस्थ मुलाची अस्वस्थता कमी करणे.या ३० ते ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे.

हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही  द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे. शेपू ची फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारण जुलै-ऑगस्टमध्ये येतात

यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात. ह्याची फळे व बिया सपाट आसतात. पालेभाजी तिखट, कडवट असते.शेपू फळामध्ये बाष्पनशील किंवा उडनशील तेल  असते. ह्या तेलात दिल अपियोल , अनिथॉल, युजिनॉल व कॅरवोन हे घटक असतात. अल्फा फिलाँड्रीन लिमोनिन डिल इथेर ह्या तेलातील घटकामुळे शेपूला एक विशिष्ठ सुवास येतो. हयात व्हिटॅमिन  अ व व्हिटॅमिन क व फ्लावनॉइड मोठया प्रमाणात आठळतात. पोटदुखी, दात येतानाची वेदना, पोट बिघडणे, तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते.शेपू कफवातनाशक, शुक्रदोषनाशक , कृमिनाशक समजतात.हा बाळंतशेपा म्हणून ओळखला जातो. गर्भवती महिलांना शेपा पचना साठी व निद्रानाश ह्यासाठी उपयुक्त आहे. नैराश्य दुर करण्यासाठी डिल चा वापर करता. अरोमाथेरपी मध्ये डिल तेल चा वापर होतो. डायबिटीस असलेलया लोकांमध्ये  साखरेचे नियंत्रण ठेणवण्यासाठी हि शेप्याचा उपयोग होतो. डिल तेल कीटक प्रतिबंधक म्हणून वापरले जाते. शेतकरी बऱ्याचदा बुरशीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी इतर धान्याबरोबर शेप्याची लागवड करतात. स्वयंपाकघरात शेपा आणि जिरे ह्यांचा एकत्रित उपयोग मसाला म्हणून करतात. स्वयंपाकात ह्याचा उपयोग  केल्यास पदार्थ चविष्ट बनतो.असा हा बहुगुणी स्वास्स्थवर्धक शेपा आपल्या स्वयंपाक घरातील आवश्यक घटक आहे.

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चविष्ट चटकदार मसाला..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ चविष्ट चटकदार मसाला..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

खोटं बोलणे आणि थापा मारणे यात कांही अंशी अवगुणात्मक फरक नक्कीच आहे.खोटं नेहमी स्वार्थासाठीच बोललं जातं असं नाही.समोरच्या माणसाला त्याच्याच हितासाठी कांही काळ अंधारात ठेवण्याच्या उद्देशाने खरं सांगणं योग्य नसेल तिथं खोट्याचा आधार घ्यावा लागतोच.एरवी बऱ्याचदा खोटं बोललं जातं ते भितीपोटी, स्वार्थापोटी,किंवा स्वतःची कातडी बचावण्यासाठीही.बेमालूम खोटं बोलणं सर्रास सर्वांना जमतंच असं नाही.तीही एक अंगभूत कलाच म्हणावी लागेल आणि नित्य सरावाने ते कलाकार त्यात पारंगतही होत असावेत.

थाप मारणे ही क्रिया मात्र मला उत्स्फुर्तपणे घडणारी क्रियाच वाटते.ऐनवेळी आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सुचेल ते खोटं बोलणं म्हणजे थाप मारणं.अशी थाप मारण्यात अहितकारक उद्देश असतोच असं नाही.पण एकदा थाप मारुन प्रश्न सुटल्याचा आभास निर्माण झाला की त्याची मग सवयच लागते‌.ती एकदा अंगवळणी पडलेली सवय मग अनेक अडचणीना निमंत्रण देणारीच ठरते.स्वार्थासाठी थापा मारुन दुसऱ्यांना टोप्या घालणारे थापाडे किंवा खोटं बोलून स्वतःचं उखळ पांढरं करुन घेणारे खोटारडे यांना मात्र सख्खी भावंडंच म्हणायला हवे.

बिकट परिस्थितीतून वाट शोधण्याचा सोपा मार्ग म्हणून एक थाप मारणारे हळूहळू त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे दुसरी थाप मारायला प्रवृत्त होतात आणि मग नाईलाजाने एकामागोमाग एक थापा मारीत स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात अडकून बसतात.या कल्पनेचा लज्जतदार मसाल्यासारखा वापर करुन खुमासदार विनोदी चित्रपट निर्माण करणारे कल्पक दिग्दर्शक आणि उत्स्फुर्त नैसर्गिक अभिनयाने त्यांना दिलखुलास साथ देणारे कलाकार यांच्या समन्वयाने आपल्याला हसवत ठेवल्याच्या अनेक हसऱ्या आठवणी हा प्रदीर्घ लेखाचाच विषय होईल.प्रोफेसर, अंगूर,पडोसन, गोलमाल,चाची ४२०, मालामाल विकली, हंगामा,बरेलीकी बर्फी,वाट चुकलेले नवरे,चिमुकला पाहुणा,थापाड्या, अशी ही बनवाबनवी हे वानगीदाखल सांगता येतील असे कांही  हिंदी मराठी चित्रपट..!’थापा’म्हणजे या सारख्या चित्रपटात वापरलेला, दु:ख-विवंचना विसरायला लावणारा आणि खळखळून हसवणारा चविष्ट खुमासदार विनोदमसालाच…!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares