कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
कवयित्री शांता शेळके
(जन्म: 12 ऑक्टोबर 1922 – मृत्यू: 6 जून 2002)
विविधा
☆ शांताबाई..आदरांजली… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆
आमच्या लहानपणी गणेशोत्सव असला की गणराज रंगी नाचतो, नाचतो पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! व
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
ही गीते लाउडस्पीकरवर सतत वाजायची. पुढे मोठे झाल्यावर ही गाणी शांताबाईने लिहिली हे कळले. त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. शांताबाई एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके आहे. त्यांचा जन्म इंदापूर यथे झाला. त्यांनी आपले बालपण मंचर येथील खेड येथे घालवले. त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत.एकूण ही पाच भावंडे त्यात शांतबाई सगळ्यात मोठ्या.आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले. शांताबाईचे वडील रेंजर फॉरेस्ट ऑफिसर होते. वडिलांच्या बदलीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी येथे राहावे लागले. चित्रकलेचे संस्कार आणि वाचनाची आवड शांताबाईवर कायमच राहिली.. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांच्या कानांवर विविध पारंपारिक गाणी, कविता आणि श्लोक पडले. म्हणूनच त्यांचे काव्यप्रेम, वाचनावरचे प्रेम या ग्रहणशील युगात रुजले. १९३० मध्ये शांताबाईच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्या नऊ वर्षाच्या होत्या.चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. 1938 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. आणि पुणे येथून पदवीधर झाल्या. महाविद्यालयातून बी. ए पूर्ण झाले. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली.या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले.कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला.प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला.हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली.१९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्.ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोनतीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.
आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार :- गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६, सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी), केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल
साहित्यसंपदा :- कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६) तोच चंद्रमा (१९७३) गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती (१९८६), जन्मजान्हवी (१९९०),चित्रगीते (१९९५),पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) एक गाणे चुलीचे – स्नेहवर्धन प्रकाशन, कविता विसावया शतकाची – उत्कर्ष प्रकाशन, कविता स्मरणातल्या- मेहता प्रकाशन, गोंदण – मेहता प्रकाशन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा- सुरेश एजन्सी, निवडक शांता शेळके- उत्कर्ष प्रकाशन, हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
शांताबाईंची भक्तिगीते :-
गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो !
कटि पीतांबर कसून भर्जरी बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो !
नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग धिमि वाजतो !
देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो !
नादयुक्त शब्दरचना कशी असावी याचे हे गीत आदर्श उदाहरण ठरावे. यातल्या प्रत्येक शब्दाला एक अनोखा झंकार आहे, यातली गेयता कर्णमधुर ठरावी अशी आहे कारण याची टिपेला जाणारी स्वररचना होय. त्याचबरोबर बालगणेशाचा ह्रदयंगम कौतुक सोहळा चपखल शब्दात अवीट गोडीच्या चालीत इथे रचला आहे. या गीतावर आपल्या नकळत आपली मान डोलावते.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
गणेशोत्सवात हे गाणं ऐकलं नाही असं सांगणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. शांताबाईंनी लिहिलेल्या या भक्तीगीताने मराठी माणसाचे खुद्द गणेशासोबतचे नाते दृढ केले आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं हे गाणं गणेशोत्सवाशी एकरूप झाले आहे.
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. लता मंगेशकरांनी छान गाईले आहे. राम भजन कर लेना, जय शारदे वागीश्वरी, शोधितो राधेला श्रीहरी, नको रे नंदलाला ही भक्तिगीते आपण वारंवार ऐकली आहेत।
शांताबाईंची कोळीगीते :-शांताबाईंची कोळीगीते कथाप्रवण आहेत, त्यातल्या कथा उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत त्यामुळे त्याला वेगळीच अनुभूती प्राप्त होते. कोळीगीतातली लयबद्ध गोडी हे या गीताचं विशिष्ट्य ठरावं. या गीतात देखील कथात्मकतेची विण आहे, तिचा बाज प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे. लडिवाळीकतेच्या अंगाने जाणारे हे एक युगलगीत आहे, ज्यात ते दोघेही एकमेकासाठी आसक्त झालेयत अन निसर्गाला साक्षीस ठेवून ते साद घालताहेत.
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्यानं घेतंय झेपा
नथ नाकान साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाल्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय् मौजा
वादलवारं सुटलं गो वार्यान तूफान उठलग
तुफानवारं सुटल्यानंतर आपल्या डोलकराला साद घालणाऱ्या कोळीणीची आर्तता मनाला भिडणारी आहे, डोळ्यात पाणी आणून ती म्हणते की, ‘डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा..’ या गाण्याला सुरसंगीताचा अप्रतिम साज चढवल्याने ते अत्यंत श्रवणीय झालेय.
माज्या सारंगा, राजा सारंगा, डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जावया घरा !
आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय् सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं राहीला दूर
डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा
माजे रानी माजे मोगा, माजो लवताय डावा डोळा ही गीते कायम स्मरणात राहतात.
शांताबाईने लिहिलेली प्रेमाची गाणी:- शालू हिरवा पाच नि मढवा वेणीत पेढी घाला साजणी बाई येणार साजण माझा, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, शोधू मी कुठे कशी, सांगू कशी प्रिया मी, पायावरी प्रियाच्या सर्वस्व, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना, प्रीति जडली तुझ्यावरी, घन रानी साजणा, प्रीतफुले माझी सोनेरी, प्राणविसावा लहरि सजण, चित्र तुझे हे सजीव होऊन, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे, तळमळतो मी इथे तुझ्याविण ही गाणी खूप लोकप्रिय झाली.
शांताबाईने लिहिलेली निसर्गाची गाणी:- पाऊस आला वारा आला, श्रावणसरी, ऋतु हिरवा, ऋतु बरवा तर ‘ऋतू हिरवा’ या कवितेत ऋतूंचे इंद्रधनुष्यी रंगातले चित्र त्या आपल्या शब्दकुंचल्यातून साकारतात. भिजुनी उन्हे चमचमती, मधुगंधी तरल हवा, मनभावन हा श्रावण, पुढे त्या म्हणतात भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा…’ अशी मनमोहक शब्दसंगती त्यांनी योजली आहे.
चंद्र चांदण्याचे गाणे :- चांदणं टिपूर हलतो वारा, चांदण्या रात्रीतले ते, शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलव झूला, पुनवेचा चंद्रम आला, चंद्र दोन उगवले, आज चांदणे उन्हात हसले, तोच चंद्रमा नभात ही गाणी अनेकांच्या ओठावर आपसूकच येतात.
बालगीते:- विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्या तुम्ही केला चट्टामट्टा !
पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !
कुठुन मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्ही?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्यांशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !
बडबडगीताच्या चालीवर आधारित भातुकलीच्या विवाहप्रसंगातलं लोकगीतही शांताबाईंनी मोठ्या तन्मयतेने लिहिले आहे. त्याला तितकीच रसिकमान्यताही मिळाली ! या गाण्याला गाताना आजही बालपणातला आनंद अनुभवता येतो.
बाळ गुणी तू कर अंगाई, बाळा माझ्या नीज ना, टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा, जो जो गाई कर अंगाई, झुलतो झुला जाई आभाळा, किलबिल किलबिल पक्षि ही सारी बालगीत आजही मनाला आनंद देतात.
देशप्रेमाच्या कविता :- ‘शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !
आईच्या गर्भातच झुंजायची रीत आम्हाला कळली. तलवारीशी लगिन लागलं
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !
जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !’
शांता शेळके यांनी लिहिलेले हे गीत शाळकरी मुलापासून ते उतारवयाकडे झुकलेल्या ज्येष्ठापर्यंत सकलांच्या अंगावर रोमांच उठवते. नसानसात जोश भरणारी ही कविता इतकी आवेशपूर्ण आहे की ऐकणाऱ्याच्या मनामध्ये स्फुरण निर्माण होते. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात लता मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम स्वरात हे गाणं गायले आहे.
लावणी:- शृंगाररसाचा अतिरेक न करता देखण्या ढंगाची लावणी कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणून शांताबाईंच्या लावणीकडे निर्देश करता येईल. आपल्या साडीचं मनमोहक वर्णन करतानाच आपल्या प्रितमास साडीला हात लावू नको असं लाडे लाडेचं सांगणं अगदी मधाळ शैलीत त्यांनी मांडलंय. यातला ठेका ताल धरायला लावणारा आहे. काव्यरचनेत लावणीचा ठसकेबाजपणा आहे, अगदी कोरीव रेखीव असं हे गाणं आजही रसिकप्रिय आहे.
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोर्यात अवचित आला माझ्या होर्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला? हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !
इतक्या विविध विषयावरची आशयघन सहजसोपी व तितकीच रसिकप्रिय काव्यरचना मराठी कवितेत अन्य कुणा कवयित्रीच्या हातून प्रसवली गेली नाही. यात शांताबाईंच्या कवितेची वेगळी उंची दिसून येते.
आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतःचं उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या शांता शेळके प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगळ्या अवस्थेत भेटत गेल्यात ; बाल्यावस्थेत बडबडगीते, तारुण्यात प्रेमगीते, पोक्तवयात भावगीते आणि उतार वयात भक्तिगीते – भावकविता असा त्यांचा प्रत्येकाशी संवाद होत गेलाय.
6 जुन त्यांचा स्मृति दिन त्यांना आदरांजली ?
© डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे
प्राचार्य लोक महाविद्यालय वर्धा
ईमेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈