सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींशी निगडीत आहेत. लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात ‘खेळे’ यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे गाण्याच्या तालावर नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारिक गाण्याबरोबरच नवीन नवीन सिनेमाच्या गाण्यांवर नाचत केले जायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यात उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने, उत्साहाने गोळा व्हायचे.तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!
होळीचा खुंट म्हणजे होळी उभी करायची जागा ठरलेली असते. दरवर्षी एखाद्याच्या बागेतील सुरमाड होळीसाठी निवडला जाई.सुरमाडाला नारळ येत नाहीत. तो सुरमाड तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणला जाई. मुख्य म्हणजे ते झाड माणसे वाहून आणत. त्यासाठी चार पाच तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून ते बघण्यात दंग असायचो! एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. तसेच देवीची पालखी ही तिथे आणली जाई.जुगाई देवीच्या मंदिरापासून मिरवणुकीने देवीची पालखी येत असे. तेव्हा खूपच गर्दी उसळत असे.रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्याबहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते पण उत्साह तेवढा जास्तच असतो.
देवीच्या पालखी चे पाच दिवस असत पण देवीची पालखी उठली तरी होळी पंधरा दिवस उभी असे. पाडव्याला होळी उतरवतात.होळी उतरवतात म्हणजे उभा केलेला सुरमाड खाली पाडून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवतात. खुंटावर होळी जाळण्याची पध्दत तेथे नाही. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात. तिचा कौल मिळाला की ते काम होते असे लोकांना मनापासून वाटत असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे नवस पुरा करण्यासाठी बांधली जातात.
होळी च्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते पण कोकणात मात्र रंगपंचमीची जास्त असते. परीक्षा तोंडावर आलेली असते पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची, कोकणातील होळी माझ्या डोळ्यासमोर अशीच येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे. पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळीचा सण अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈