मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१९ च्या दिवाळीत पंढरपूर क्षेत्री जाऊन जवळजवळ दीड तास दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो असताना मी विचार करीत होतो की ‘इतका वेळ रांगेत घालवणे उचित आहे का? देवालयाला बाहेरूनच नमस्कार करायला काय हरकत आहे?’ पण मग विचार केला की देवाचे दर्शन हे सहजपणे न होता हे असेच कष्टसाध्य असले पाहिजे. नुसते पैसे भरून काही मिनिटांत होणारे सुलभ दर्शन “देखल्या देवा दंडवत!” सारखे झटपट समाधान देईलही कदाचित पण त्याने देवदर्शनाची आस फिटेल का? सरतेशेवटी एकदा पांडुरंगाच्या सगुण मूर्तीसमोर उभा राहिलो आणि मात्र डोळ्याचे पारणे फिटून धन्यधन्य झालो! कदाचित मंदिरातील, गाभार्‍यातील वातावरणाचा, आवाजाचा कुठेतरी मनावर खोलवर परिणाम होत असावा. “स्थानं खलु प्रधानं” असे म्हटले आहे ते काय उगीच नव्हे. थोडाफार असाच परिणाम नुकताच पुन्हा एकदा अनुभवास आला जेव्हा मी रायगडावरील ‘महाराजां’च्या स्फूर्तिदायक मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा.

१६ जानेवारी २०२१ रोजी मी रात्री 10:30 वाजता ‘गिरीदर्शन’च्या ‘रायगड’ ट्रेकच्या बसमध्ये उत्साहाच्या भरात चढलो आणि लक्षात आले की मी मास्क आणि उन्हाळी टोपी ह्या दोन्ही आवश्यक गोष्टी घरीच विसरलो आहे. JJ असो. बस हलली असल्याने आता काही करणेही शक्य नव्हते. बसमध्ये मात्र सर्वत्र तरुणाई भरली होती त्यामुळे उत्साहाचे वारे संचारले होते. मग माझ्या शेजारी बसलेल्या मेकॅनिकल इंजींनीयरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असलेल्या चिंचवडच्या सर्वेश बरोबर ओळख काढून गप्पा सुरू केल्या. “कोविद मुळे लेक्चर्स ऑफलाइन झाली नाहीत आणि ऑनलाइनही नियमितपणे होत नाहीत” असे गार्‍हाणे गात बिचारा जेरीस आलेला होता. कुठेतरी आयुष्यात बदल हवा म्हणून तो ट्रेकला आला होता. असो.

रात्री साधारण साडेतीन वाजता पाचाड गावातील एकांच्या मुक्कामस्थळी पोहोचलो. लगेचच घरच्या सारवलेल्या ओसरीवर पसरून सर्व पुरुषांनी ताणून दिली आणि मुली घरातील एका खोलीमध्ये विसावल्या. पुढील तीन-चार तासच जेमतेम झोपायला मिळणार होते. पण तासभर झाला असेल नसेल, आमच्या शेजारीच कांबळी टाकून झाकलेल्या एका दुरडीखाली ठेवलेल्या कोंबड्याने बांग द्यायला सुरुवात केली. त्याला आजूबाजूच्या त्याच्या साथीदारांनी सुरात सूर मिसळून साथ द्यायला सुरुवात केली. त्याच जोडीला दुरडीमध्येच असलेल्या कोंबड्याच्या पिल्लांनीही चिवचिवायला सुरुवात केली. एखाद्याच्या “झोपेचे खोबरे होणे” ह्याऐवजी झोपेचे कुकुच्च्कू होणे असा वाक्प्रचार प्रचलित करून ‘अखिल कोंबडे पक्ष्या’चा निषेध करावा असे ठरवून मी झोपेची आराधना करायला लागलो.

सकाळी साडेसहाला उठून पहिले तर ‘रोप वे’च्या पाळण्याच्या ट्रिप सुरू झालेल्या दिसल्या. लगेच आवरून आम्ही हॉटेल ‘मातोश्री’ मध्ये पोहे-चहाचा भरपूर नाश्ता करून पायथ्याशी पोहोचलो आणि आमच्या दुहेरी ‘लेग वे’ ने चढाईस प्रारंभ केला.

रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी लोटली होती. त्यामुळे गडाची संपूर्ण माहिती देणार्‍या गाईडनाही काम मिळत होते. पायथ्याची सर्व दुकाने एव्हाना सजली असल्याने मला उन्हाळी टोपी लगेच विकत घेता आली. मास्क मात्र कोणीच घातलेला नव्हता, त्यामुळे मीही तो घेण्याच्या फंदात पडलो नाही. काही पायर्‍या चढून पहिल्या बुरूजापाशी थांबलो. स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगडच्या दर्शनाला आलेल्या भक्तांच्या भावना अनावर होऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा उत्स्फूर्त घोषणा सतत उठत होत्या. तिथल्या दुकानातच महाराजांची प्रतिमा असलेला ‘जाणता राजा’ लिहिलेला भगवा झेंडा मिळत होता. त्यासोबत फोटो काढून घेण्याची सर्वजण धडपड करीत होते. काहीजण तो झेंडा हातात घेऊन धावत गड चढून जात होते.

आपल्या आवडत्या राजाला मानाचा मर्दानी मुजरा देण्याची व भेटण्याची केवढी विलक्षण आतुरता!!

मजल दरमजल करीत चढत असताना आमच्या मध्येच पाठीवर पायरीचे तासीव अवजड दगड लादलेली गाढवे ही गड चढत होती. एका पाथरवटाला विचारले तर कळले की एका दिवसात एक गाढव तीन फेर्‍या मारते. हे ऐकून मात्र ह्या कष्टाळु प्राण्याचे भारीच कवतिक वाटले. इथे आम्ही कसाबसा एकदा हा गड चढउतार करून मोठा पराक्रम गाजवणार होतो! अर्थात रायगडच्या पायर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी चढाईच्या वेळेत उन्ह अजिबात लागत नव्हते व त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. एक पर्यटक मोबाईलवर मोठयाने गाणी ऐकत गड उतरत होता त्याला आमच्या चमूतील एकाने ताबडतोब बंद करायला लावला. सुमारे दोन-सव्वादोन तासांत आम्ही वर पोहोचलो.

प्रथम दर्शन झाले ते महादरवाज्याचे. काही वर्षांपूर्वीच बसवलेला हा 16 फूटी भव्य दरवाजा खरोखर बघण्यासारखा आहे. त्यानंतर स्वागत करतो ते ‘हत्ती तलाव’. “हत्ती तलावात शिरला तर कसं बाहेर येईल?” तर ह्याचे उत्तर “ओला होऊन!” हा विनोद मला आठवला. पण रायगडावरील ह्या तलावात जर हत्ती शिरला तर तो खात्रीने पायाचे तळवेही न ओलावता कोरडा ठणठणीत बाहेर येईल इतका हा शुष्क पडला आहे. पावसाचे पाणीही गळतीमुळे ह्यात टिकत नाही. पूर्वी केलेल्या गळती-प्रतिबंधक योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. इथून थोडे वर आल्यावर ‘शिरकाई’ देवीचे मंदिर लागते.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

 ☆ विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

“भाषा” म्हणजे काय? त्याची उत्पत्ती, व्याख्या,ई ,क्लिष्ट चर्चेत न शिरता व्यावहारिक वापराचा विचार करुया.

भाषेची नाळ जोडली जाते ती “बोलणे” शी. बोलणे म्हणजे तरी काय? तर अभिव्यक्ती विचारांची आणि भावनांची मौखिक अभिव्यक्ती.

“देहबोली” हे पण अभिव्यक्तीचे माध्यम आहे, पण भाषाविरहित. मौखिक अभिव्यक्ती माणुस सोडुन ईतर प्राणिमात्रांमध्येही असते, कुत्र्यांचे भुंकणे, गाईम्हशींचे हंबरणे, वाघांची डरकाळी, भुंग्यांचा गुंजारव,पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे डराव डराव, पालीचे चुकचुकणे, थी त्यांची भाषा असते असे म्हणतात.

माणसाने भाषेचा वापर केंव्हा, कसा सुरू केला यासाठी यासाठी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास तर नक्कीच करावा लागेल. पण तूर्तास भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आहे, सर्वश्रेष्ठ वरदान आहे असे अनुभवाने सिध्द केले आहे.

आपला भारत बहुभाषिक देश,.तरीही भाषा म्हटले की आवर्जुन प्राधान्य दिले जाते ते मातृभाषेलाच, मायबोलीलाच.

आपली मायमराठी, महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी, समृध्द आणि संपन्न भाषा असे गर्वाने म्हणावेसे वाटते, तिच्या विविध रंगांचा, प्रत्येक रंगातील विभिन्न छटांवर  धावता दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न. उदाहरणे अनेक देता येतील पण शब्दसंख्येवरील मर्यादेमुळे तो मोह टाळावा आहे.

महाराष्ट्रातील मराठी म्हटले तरी वर्हाडी, कोल्हापुरी, सोलापुरी, खानदेशी, कोकणी, पुणेरी, मुंबईची, मराठवाड्याची असे अनेक रंग, आणि ढंग आढळतात. हिंदीची घुसखोरी, दुहेरी क्रियापदांमधे वापर अशी नागपुरी. फेटा घातलेली, थोडीशी रांगडी, कानडी शिडकावा म्हणजे कोल्हापुरी, वरुन काहीशी कडक वाटली तरी आतुन प्रेमळ, तिथल्या नारळासारखीच कोकणी, त्यातही मालवणी वेगळीच, वाक्यात किमान २, ४ शब्द ईंग्रजी किंवा हिंदी अगदी मस्त अशी मुंबईची, सोलापुरी तर न्यायची धाटणी, अन् सांस्कृतिक पगडी घातलेली पुणेरी, अनेक रंगातील अनेक छटा असल्या तरी प्रत्येकाचा बाज तेवढाच आकर्षक, तेवढाच रुबाबदार.

काळाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की बदलत्या काळाबरोबर शिक्षण,सांस्कृतिक जडणघडण, रीती रिवाज जसे बदलत गेले तसे भाषेचा पेहरावाही बदलणे स्वाभाविक होते, फार मागे जाऊया नको, २०व्या शतकात वापरले जाणारे अनेक शब्द आज कालबाह्य झाले आहेत. जसे, सदरा, पोलके, शेगडी, आणि ईतर अनेक, आजच्या आधुनिक मराठीत अनेक शब्द ईतर भाषेतून येऊन इतके रुळले आहेत कीअमराठी आहेत हे नविन पिढीला पटत नाही.

प्रत्येक व्यवसायाची पेशाची  भाषेची खासियत वेगवेगळी असते, वकील, डॉक्टर, शिक्षक, नोकरदार, कारखानदार,व्यापारी,.प्रत्येक पेशात परत बारीकसारीक फेरफार असतातच,व्यापारी म्हटला तरी_कपडे,सोनेचांदी, भांडी,किराणा,धान्य,ई प्रमाणे,भाषा बदल होतोच,

राजकारण,समाजकारण,यातील भाषा वेगळी,तर संरक्षणदल,पोलिस दल इथली वेगळीच.

नैसर्गिक भेद किंवा इतरही काही कारण असेल पण स्त्री पुरूष यांच्या भाषेचा पोतही खुप वेगळा असतो, भाषा ही केवळ मौखिक अभिव्यक्ती ची मक्तेदारी नाही, लिखीत अभिव्यक्ती साहित्य क्षेत्रात लेखनाच्या रणांगणावर भाषेची भूमिका सरसेनापती असते, लेखकाच्या लेखनाचे यशापयश भाषेवरच अवलंबून असते,

साहित्य मग ते कोणतेही, कोणाचेही, कशाशीही संबंधित असो, त्याप्रमाणे लेखकाला शब्दरूपी शस्त्र वापरावे लागते, संत साहित्यात टाळचिपळी, तर बालसाहित्यातील चेंडुफळी असते.

कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, अतिलघु, लघुत्तम,लघु,दीर्घ,रहस्य,ई कथा,ललित,सामाजिक,धार्मिक, अध्यात्मिक, ई लेख, प्रवासवर्णन, विविध काव्यप्रकार,अशा बहुविध साहित्य प्रकाराप्रमाणे, भाषेचा रंगढंग बदलत जातो,आणि आमची मराठी मायेच्या ममतेने  सर्वांना आकंठ दुग्धपान देते.

कुठेतरी वाचलेले आठवते, “भाषा सरस्वती त्यांच्यापुढे शब्द घेऊन ऊभी रहाते, आणि शब्दही माझा वापर केंव्हा करणार याची चातकासारखी वाट पहातात” धन्य ते साहित्यिक आणि त्यांच्या अजरामर कलाकृती, अशांपैकीच एक मान्यवर  कवि कुसुमाग्रज त्यांना कोटी कोटी प्रणाम,  शब्दरूप फुलांची ही माला सविनय,सादर अर्पण.

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

पुणे,

मो 9403862565,  9209301430

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार श्री भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

(27 फेब्रुवारी माघ पौर्णिमा निमित्ताने)

आपला भारत देश हा अनेक ऋषी, मुनिंच्या परंपरेने आणि ज्ञानाने समृद्ध झाला आहे. बहुतेक सर्व मुनिनी वेद, अध्यात्म, यज्ञ, याग, कर्मकांड, विज्ञान इ.अनेक विषयांवर विस्तृत विवेचन केले आहे.पण “नाट्यशास्त्र” या विषयावर सुबद्धविवेचन करणारे मुनि म्हणजे भरतमुनि होय.

भरतमुनि – कलर पेन्सिल पेंटींग – श्री मिलिंद महाबळ (साभार) 

भरतमुनिंचा कालखंड निश्र्चित नाही. साधारणपणे इ.स.पू. ४०० ते १०० असा मानला जातो. “दशरूपक विधान”  या ग्रंथाच्या १८ व १९ व्या अध्यायात नाट्यशास्त्र हा विषय आला आहे.संगीत हा विषय २८ व्या अध्यायात आहे. ६ व ७ या अध्यायात रससिद्धांत सांगितला आहे .शृंगार,वीर,करुणा,भय,हास्य,बिभत्स, अद्भुत, शांत आणि रौद्र हे ९ रस सांगितले आहेत.

त्यांच्या नाट्यशास्त्रातील ठळक मुद्दे :-

१)  नाटकाचा विषय प्रख्यात कथेवर असावा.(उदा.रामायण, महाभारत, कृष्णलीला इ.)

२) ५ ते १० अंक असावेत.

३)  दोन अंकाच्या मध्ये “विष्कंभक” (निवेदक)असावा

४)  आवश्यक तेवढीच पात्रे असावीत.कथेला पूरक तेवढीच.

५)  अभिनय ४ प्रकारचा सांगितला आहे-१)अंगिक(Body language) 2) वाचिक (oral) 3)  सात्त्विक (expressions) 4) आहार्य म्हणजे ( with essential property)

६) कथानक रंजक हवे, क्रौर्य नको, प्रवाही असावे, सुखान्त

७) पात्रांचे चित्रण व्यवस्थित समजेल असे असावे.

८) रंगमंच किती,कसा असावा हे सविस्तर सांगितले आहे.

९) सर्व ९ रस शक्यतो यावेत.

१०) नाटकाचा उद्देश- मनोरंजन,कलादर्शन, लोकांना आनंदी करणे, संदेश/ बोध देणे.

याशिवाय प्रेक्षागृह कसे असावे ? कोणी कोठे बसावे ?

अभिनेता, दिग्दर्शक, कपडेपटवाला इ.लोकानी कसे कष्ट घ्यावेत ?

या सर्वांचा सविस्तर विचार मांडला आहे. विषय खूप मोठा आहे, परंतु  त्या काळात मांडलेल्या सूचना आजही मानल्या जातात. भरतमुनिंची जयंती संस्कार भारती दरवर्षी  माघ पौर्णिमेस साजरी करते. त्यांना वंदन करून मी इथे थांबतो.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  विविधा ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

“उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले

अजूनही……….”

 

अशी चिऊताई ला साद घालत जागे करणारी कविता,  जीवनाचे सगळे टप्पे अनुभवत,  नवरसांचे प्याले  रसिकांना बहाल करत,  विविध छंदांच्या आणि विविध वृत्तांच्या अलंकारानी कवितेला सालंकृत पेश करणारे कुसुमाग्रज..

त्याच वेळी …

“ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण!

बेताल नाचवी,  सूत्रधार हा कोण?

मातीतच अंती त्याचेही निर्वाण?

स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती

मातीवर चढणे एक नवा थर अंती……”

 

असे सांगत माती हेच शाश्वत सत्य आहे, हे पटवून देणारी कविता लिहिणारे कुसुमाग्रज

अलौकिक प्रज्ञा, ईश्वरदत्त प्रतिभा, आणि चराचरातल्या प्रत्येक भौतिक आणि अभौतिकतेला स्पर्श करणारं तत्वज्ञान यांचं दैवी रसायन म्हणजे कुसुमाग्रज

नटसम्राट,  ययाति देवयानी, कौंतेय, वीज म्हणाली धरतीला, यासारखी शतकानुशतके अजरामर रहाणारे नाट्यरेखन,  सतारीचे बोल, फुलवाली, काही वृद्ध-काही तरूण, छोटे आणि मोठे असे असंख्य कथासंग्रह,  रसयात्रा, विशाखा,  किनारा,  मराठी माती, स्वगत, हिमरेषा 100कविता असे हजारो कवितांनी भरगच्च असे कविता संग्रह.  अशा विपुल लेखन संभाराने लगडलेला वृक्ष म्हणजे कुसुमाग्रज

कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा अमृतस्पर्श झालेल्या काही जगन्मान्य  अजरामर ओळी मनात कधी गुंजन करतात, तर कधी धीर देतात,

कणा –

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा”

अनामवीरा

“काळोखातुन विजयाचा ये पहाटचा वारा

प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा”

नवलाखतळपती दीप

“नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणु नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुळ तेव्हा

त्या माजघरातिल मंद दिव्याची वात”

प्रेम कर भिल्लासारखं

“प्रेम कर भिल्लासारखं

बाणावरती खोचलेलं

मातीमध्ये उगवून सुद्धा

मेघापर्यंत पोचलेलं”

नदी

“माय सांगे थांबू नका

पुढे पुढे चला

थांबत्याला पराजय चालत्याला जय”

समिधाच सख्या या

“समिधाच सख्या या

त्यात कसा ओलावा

कोठुनि फुलापरि वा मकरंद मिळावा

जात्याच रुक्ष त्या एकच त्यां आकांक्षा

तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा”

कोलंबसाचे गीत

“अनंत अमुची ध्येयासक्ती

अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

पृथ्वीचे प्रेमगीत

“परी भव्य ते तेज पाहून पुजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे ?

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे”

भाव- भावनांच्या अशा अलौकिक,  परतत्वस्पर्शी शब्दांची गुंफण करून दिव्य भव्य दर्शन घडवणारे आणि रसिकांच्या अंतर्मनात चेतनाशक्ती जागवणारे स्फुल्लिंग म्हणजे कुसुमाग्रज

जीर्ण देवळापुढे*   ही इतर कवितांच्या मानाने कमी प्रसिद्धी मिळालेली कविता.

“तशीच तडफड करीत राही

तेवत ती ज्योती

उजळ पाय-या करी,

जरी ना मंदिर वा मूर्ती”

अंधःकार दूर करणे आणि उजळत रहाणे हाच ज्योतीचा व तेवणा-या वातीचा धर्म. कुसुमाग्रजांनी हाच धर्म आयुष्य भर जपला. अनासक्त कर्मयोग्याचे कार्य त्यांनी आपल्या मनस्वी लेखनाने केले.

लीनता, वात्सल्य,  करूणा यांचं बोलकं रूप म्हणजे कुसुमाग्रज,  त्याचबरोबर करारी,  ध्येयवेडे, विजिगीषू,  क्रांतीचा जयजयकार करणारं दमदार आणि रांगडं रूप म्हणजे ही कुसुमाग्रज.

“शब्द बोलताना शब्दाला धार नको आधार हवा कारण धार असलेले शब्द मन कापतात, आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.”असे नकळत संस्कार घडवणारे कुसुमाग्रज.

नटसम्राट मध्ये”सरकार, आपली मुलं वाईट नाहीत,  वाईट आहे ते म्हातारपण”असं जीवनावर जळजळीत सत्य भाष्य करणारे कुसुमाग्रज.

कवी आणि लेखक म्हणून त्यांची थोरवी शब्दातीत आहे. ते माणसाच्या रूपातले महायात्री होते. ईश्वरदत्त मानवी जन्म घन्य झाला. अशा दिव्य कर्तृत्वापुढे सर्व सन्मान, सर्व गौरव नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहिले. म्हणूनच मराठी साहित्यातील या चालत्या बोलत्या ज्ञानपीठाकडे “ज्ञानपीठ पुरस्कार”अदबीने शाल श्रीफळ घेऊन आला आणि माय मराठी धन्य धन्य झाली, आणि म्हणाली,

“मराठी मी धन्य धन्य,

धन्य जन्म सारा

अढळपदी अंबरात

कुसुमाग्रज चमकता तारा”

कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून अभिमानाचा ठरला आहे.

कुसुमाग्रज आणि माय मराठी  ला मराठी मनाचा मानाचा मुजरा ll

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दोन क्षण ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ दोन क्षण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

  (कवी कुसुमाग्रजांच्या दोन चारोळयांवर आधारित ललितबंध)

गतकाळाच्या काही कटू काही गोड आठवणींचं स्मरण वारंवार होणं हे स्वाभाविकच आहे. गेला क्षण पुन्हा येत नाही ही गोष्ट शाश्वत असली तरी गोड क्षणांच्या स्मरणाने मन मोहरून जातं हे नक्की !

कटू क्षणांच्या आठवणी पुन्हा एकवार काळीज हेलावून सोडतात, पण त्या क्षणांसोबतच आपण आपल्या अनुभवाची शिदोरी बांधलेली असते, हे आपण विसरत नाही.

प्रत्येकाचं आयुष्य कधी इंद्रधनुष्यासारखं अनेकविध रंगांनी रंगून जातं तर कधी त्याच आयुष्यावर काळया मेघांचं सावट येतं.सुखाला दुःखाची झालर असते आणि दुःखाला सुखाची आस !

‘प्रेझेंट इज प्रेझेंट’ हे स्वीकारत चाललेलं आयुष्य एकाएकी ढवळून निघतं.एखादा दिवस असा उभा ठाकतो की आपण भूतकाळाचा चलत चित्रपटच पाहतो आहोत की काय अशी शंका यायला लागते. स्वतःच स्वतःला चिमटा काढून जागं करावं लागतं. हे खरंच घडतंय का? अशी शंका येत असतानाच….

वास्तव एखाद्या प्रेझेंट सारखं प्रेझेंट मध्ये आलेलं असतं.त्या स्वप्नवत घटनेला स्वीकारायला लागतं. प्रियजनांच्या याच भावनेतून कुसुमाग्रजांना हया दोन चारोळ्या सुचल्या असाव्यात….

सहज जाता जाता मला गवसलेल्या त्यांच्या या दोन चारोळ्या म्हणजे दोन क्षण आहेत असं मला जाणवलं.

पहिली चारोळी….

भेट जाहली पहिली तेव्हा

सांज पेटली होती

रिमझिम वर्षेतून लालसा

लाल दाटली होती.

पहिला क्षण पहिल्या भेटीचा! निरव, सुंदर, शांत अशी सांज ! या सांजवेळी झालेली ही पहिली भेट. ‘दोनो तरफ आग बराबर लगी है!’ असं वर्णन व्हावं असा तो क्षण…त्या क्षणाची आठवण तितकीच धगधगीत!

रिमझिम बरसणाऱ्या वर्षेच्या आगमनानंतर तर त्या दोघांमधील एका अनामिक ओढीने ही भावना अधिकच दाटून आली. कुसुमाग्रजांनी ‘लाल लालसा’ या शब्दद्वयीतून ती व्यक्त केली आहे.केवळ अप्रतिम!!

स्वप्नात रंगलेला क्षण होता तो!

दुसरा क्षण दुसऱ्या चारोळीतला…

काळ लोटला आज भेटता

नदी आटली होती

ओठावर उपचाराची

सभा दाटली होती

हा क्षण होता….पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतरचा, वर्तमानातला, आजचा, आत्ताचा…..

अकस्मात दोघेही एकमेकांसमोर आले पण….

आंतरिक सुखाच्या अपूर्णतेची अस्पष्टशी एकही हाक त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून आल्याचा गंध या वातावरणात नव्हता. तेव्हाचा तो भावनांचा आवेग दोघांनाही जाणवला नाही. ‘नदी आटली होती’ या ओळीतून तो उद्धृत झाला आहे.

त्यांची स्मरण भेट त्यांना वास्तवाचं भान देत होती. ‘काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही अशी दोघांचीही अवस्था ! नीरव शांततेत दोघेही निशब्द!!

ओळख असूनही अनोळखी असल्याचा भास होत होता त्यांना !उपचार म्हणून बोलणं इतकंच उरलं होतं. औपचारिक शब्दच दोघांच्या तोंडून येत होते.

वास्तवाचं भान असणारा क्षण होता तो!

माझ्या वाचन प्रवासाच्या सुरम्य वाटेवर स्वप्न आणि वास्तवाचं भान देणाऱ्या या चारोळ्या सांडल्या होत्या.

प्राजक्ता सारख्या त्या मी वेचल्या आणि माझी रिती ओंजळ मी भरुन घेतली. फुलं सांडून रितं होणाऱ्या त्या प्राजक्ताचे मी आभार मानले. तो प्राजक्त म्हणजे अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ पुन्हा फुलांनी डवरुन पुन्हा माझी ओंजळ भरायला तयार असणारा असा तो प्राजक्त!….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विज्ञान शिक्षण: काळाची गरज ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

संक्षिप्त परिचय

शिक्षा – एम. ए(शिक्षण शास्त्र), एम. ए. (इतिहास), बी. एड.

प्रकाशन – विविध वर्तमानपत्र वा मासिके यात कविता. ले, सामाजिक विषयावरील पत्रे प्रसिद्ध, काव्यलेखन, काव्यवाचन, निबंध लेखन, यात 100 हुन अधिक बक्षिसे

विविध सामाजिक संस्थामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत.

जागतिक विज्ञान दिन निमित्त लेख

 ☆ विविधा ☆ विज्ञान शिक्षण: काळाची गरज ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆ 

महाराष्ट्रातील  बीड जिल्हात   शुभम सपकाळचा करणी केल्याच्या संशयावरून खून असो या आंध्रप्रदेश चितूर येथील  उच्चविद्याविभूषित  आई वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलीना  ठार  मारल्याची  घटना असो अशा रोज घडणाऱ्या विविध घटना  जेव्हा आपण वाचतो  या पाहतो तेव्हा मनाला  अतिशय वेदना होतात.खरचं आपण 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. माणूस इतका निर्दयी  कसा होतो? त्याला पुढील परिणामाची भीती कशी वाटतं नाही? तथ्यहीन गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो? साधी पायाखाली आलेली मुंगी  ही आपण मुद्दामहून मारत नाही. येथे तर जिताजागता जीव मारायला  काहीच कसं वाटतं नाही?

अशावेळी आपली प्रगती, सारा झगमगाट, तंत्रज्ञान असून काय उपयोग असं  वाटतं. आपण एक लहानगा जीव वाचवू शकत नाही तर काय उपयोग या सगळ्याचा.नरबळी, करनी, भोंदूगिरी, पुंर्जन्म, नवस, भूतबाधा, पैशाचा पाऊस, भानामती असे एक ना अनेक  प्रकार आज ही राजरोसपणे सुरु आहेत. अशावेळी  एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना  विज्ञानजागृतीच फार  मोठं कार्य करावे लागणार आहे. विज्ञान हे काळाची फार मोठी गरज बनले आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,

डॉ नरेंद्र दाभोळकर  म्हणतात आपण विज्ञानाची  सृष्टी घेतली पण  दृष्टी घेतली नाही.आपण विज्ञान तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सर्व सुखसोई घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला  पण आपली मानसिकता, विचार करण्याची पद्धत बदलली नाही. आधुनिक तंत्र अविष्कार म्हणून आपण घरी संगणक आणतो, विविध  उपकरणे आणतो  आणि कुणाची दृष्ट  लागू नये म्हणून दाराला  लिबू मिरची टांगतो  म्हणजेच आपले हे वागणे दुट्टपीपणाचे  आहे. भारतीय घटनेच्या भाग 4 अ मध्ये कलम 51 अ नुसार नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य दिली आहेत त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकाने  वैज्ञानिक दृष्टीकोन  जोपासणे  हे एक महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या बाबत आपण सजग केले पाहिजे. लहानपणापासून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासता  येईल हा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हा फक्त पाठयपुस्तकाचा भाग न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या प्रगतीचा राजमार्ग हा विज्ञानच आहे कारण विज्ञान हे प्रगतीशील आहे  नम्र आहे. त्याला  व्यक्ती, स्थळ,काळ  याचे बंधन नाही त्यामुळे आपणास प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास विज्ञानाचा  मार्ग हा उपयुक्त व लाभदायक  आहे.कोणत्याही अतार्किक, बुद्धीला न पटणाऱ्या सांगिवांगीच्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपणास केला पाहिजे. ज्याचा पुरावा आहे ज्याचा  अनुभव सर्वांना घेता येतो अशाचा बाबीवर आपल्या बुद्धीला पटत असेलतरच विश्वास ठेवला पाहिजे. विनाकारण बुवाबाबाच्या नादी  लागून कर्मवादी बनन्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर मेहनतीवर ज्ञानवादी, विज्ञानवादी  बनूया.

श्रद्धां आणि अंधश्रद्धा यात एक पूसटशी  रेष असते  त्यामुळे कधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल हे कळत नाही त्यामुळे नेहमी सजग राहून सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. समाजात, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, विज्ञान आश्रम पाबळ, अगस्त्य फौंडेशन मुंबई , कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड या शासकीय वा बिगरशासकीय संस्था जोमाने कार्य करीत आहेत. चला तर आपण स्वतः  पासून सुरुवात करून विज्ञानाला आपला मित्र, मार्गदर्शक, बनवूया.

© प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

नवी मुंबई

7738436449

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

रसग्रहण:

कविवर्य कुसुमाग्रज यांची ही अतिशय गाजलेली कविता; जिचे एक  जाज्वल्य स्फूर्तीगीत झाले. शिवकालीन इतिहासातील एक घटना शब्दबद्ध करणारी ही नितांत सुंदर अशी कविता आहे. कुसुमाग्रजांना तेजाचे, समर्पणाचे अतिशय आकर्षण आहे.या आकर्षणातून व्यक्त झालेल्या त्यांच्या सर्वच कविता जणू झळाळणाऱ्या शलाकांसारखी स्फूर्ती गीते ठरल्या. त्यातीलच ही अतिशय बलशाली कविता आहे.

कवितेची सुरुवात होते छत्रपती शिवाजीराजांच्या पत्राने.रणात पाठ फिरवून पळालेल्या आपल्या सेनापतींना महाराज उपरोधपूर्ण; पण त्यांच्या पराक्रमाला चेतविणारे पत्र लिहितात. ‘रण सोडून पळून आलात. भर दिवसा रात्र झाली असे वाटले.अरे ‘पळून येणे’ हे काय मराठी शील झाले ? आपली जात विसरलात काय ?’

या पत्रातील प्रत्येक अक्षराने प्रतापरावांच्या वर्मावरच घाव घातला. ते त्वेषाने पेटून उठले.  ‘काल रणात पाठ दाखविली. लढवय्या मराठी धर्म विसरलो. पण आज तळहाती शीर घेऊन शत्रू सैन्यावर तुटून पडतो ‘ असे म्हणत सहा सरदारांसह शत्रूवर तुटून पडले. ‘त्यांची भिवई चढणे’ ‘पटबंदाची गाठ तुटणे’ या शब्दातून वीररसाचा आविष्कार झाला आहे.

नाट्यात्मकता, दृश्यात्मकता हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कित्येक शतकांपूर्वीची ही घटना जणू आपण साक्षात अनुभवतो आहोत इतके नाट्य, इतकी वातावरण निर्मिती कविवर्य व्यक्त करतात. ही उत्कटता प्रत्येक कडव्या बरोबर वाढतच जाते.

‘खालून आग, वर आग,आग बाजूंनी’ या ओळींनी तिथल्या घनघोर युद्धाचे चित्र समोर उभे ठाकते आणि त्वेषाने लढता-लढता ‘खग सात जळाले अभिमानी वणव्यात’ ‘दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा | ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा’

या ओळी त्यांच्या पौरूषाचा आवेग केवढा प्रचंड होता याची साक्ष देतात. राजनिष्ठा, ध्येयनिष्ठा, वचनपूर्ती यासाठी त्यांनी केलेले हे समर्पण आहे. त्यांच्या झुंजार,पराक्रमी बलिदानाची ही गाथा. पण इथे पराभवाने सुद्धा विजयाची उंची गाठली आहे. अतिशय भावनिक,आवेशपूर्ण आणि लयबद्ध अशी ही कविता आहे. पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे. कुसुमाग्रजांनी या ऐतिहासिक घटनेचे हे काव्यशिल्प अजरामर केले आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

“मराठी भाषा दिन” ?

मंडळी, नमस्कार ??

‘मराठी भाषा दिन’ अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर जन्मदिवसाचे  निमित्य साधून  एका शाळेत घडलेल्या  एका कार्यक्रमाबद्दल तुम्ही आता वाचणार आहात

२७ फेब्रुवारीला जरी हा दिवस असला  तरी शाळेने काही दिवस आधीच हा कार्यक्रम साजरा केला. शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवे ध्वज, पताका  यांनी शाळा सुशोभित करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेश द्वारावरच  ‘ सुस्वागतम  ‘ असे छान फुलांच्या नक्षीकामात  लिहिले होते.  अनेकांना हा शब्द  नवीन होता. लागलीच  गुगल भाषांतराद्वारे  अनेकांनी त्याचा अर्थ ‘ वेल कम ‘ असा आहे हे जाणून घेतले. शाळेत आज राष्ट्रगीत  झाल्यांनतर  ज्ञानेश्वर गुरुजींनी पहिला तास सुरु केला. आज आपण  मराठी भाषा रुजेल यासाठी  काय करावे ? यावर चर्चा करू असे म्हणाले. प्रत्येकाने आपले मत सांगा  ( कृपया  आज तरी  मराठीतच )  असे सांगताच  एकेक जण बोलू लागले. त्यातील काही विचार

१) सकल मराठी जनांनी कमीत कमी एकमेकांशी मराठीत बोलावे.

२)महाराष्ट्रात आम्हाला

‘मराठी भाषा दिन’ साजरा करावा लागतोय…..हे आमचेच दुर्दैव…अशा दिनाच्या शुभेच्छा द्यावं लागण म्हणजे तर अजूनच. वाईट…

तरीही मी आजच्या दिवशी अशी सदिच्छा व्यक्त करतो की…निदान ह्या निमित्ताने तरी समस्त मराठी लोक एकमेकांशी मराठी बोलतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतील. आणी हे करताना अजिबात लाज वाटणार नाही

जय मराठी ?

वर्गातील सर्वात हुशार  विद्यार्थ्यानेे अशी  ☝?प्रतिक्रिया देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला ????

यानंतर शाळेपासून शाळेच्या खेळाच्या मैदानापर्यत ‘मराठी अनुदिनी दिंडी’ निघाली, शाळेभोवतीच्या सहा गल्ल्यातून जाऊन  मैदानावर तिचा शेवट होणार होता. वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचा चित्र रथ  यावेळी मुलांनी सादर केला. यात प्रामुख्याने भाव खाऊन गेलेले संकेतस्थळ ठरले

माझे टुकार ई-चार   ?

(या अनुदिनीचा पत्ता तर सगळ्यांना अगदी तोंडपाठ होता)

शाळेच्या मैदानावर तंत्रशिक्षण खात्यातर्फे प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीवर  ‘ मराठी टंकलेखन ‘ बसवून देण्यात होते.  तेथेच स्वयंसेवक  मराठीत  ॐ, क्ष, ज्ञ, त्र. श्र, इ  व्यंजन कशी टाकायची याचे प्रात्यक्षिक देत  होते

आजच्या  दिवसाचे औचित्य साधून  शाळेत मुलांसाठी ‘ पंगती  जेवण ‘ हा विशेष कार्यक्रम ठरवला होता. काय अप्पा वरचा विनोद ‘ पूर्वी लोक एकाजागी  बसायचे आणि वाढपी सगळीकडे फिरत जेवण वाढायचे ‘  याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आणि पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला ?

जेवणानंतर वर्गातील आणखी एका हुशार मुलाने  खूप पूर्वीच्या  दूरदर्शन वर होऊन गेलेल्या ‘ प्रतिभा आणि प्रतिमा ‘  या कार्यक्रमाचे संकलन सादर केले. हाही कार्यक्रम विशेष भाव खाऊन गेला.

यानंतर एकत्रित  ‘ मराठी वृत्तपत्र ‘   वाचन हा कार्यक्रम पार पडला. तरुण भारत, नवसंदेश, केसरी,  पुण्य नगरी  यांच्या काही जुन्या आवृत्या  मुलांना वाचावयास दिल्या. चित्रपटाच्या जहिराती, क्रीडा विश्व, मनोरंजन, कोडी,  राजकारणाविषयी बातम्या  हे सगळे ‘ काय अप्पा ‘ पूर्वी ही अस्तित्वात  होते  हे पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सगळ्यात मजा मुलांना आली ती म्हणजे पहिल्या पानावरची बातमी संपताना खालील कंसात लिहिलेले  अधिक वृत्त पान  ५ वर. आणी मग पुढचा वृत्तांत परत ५ वर जाऊन वाचणे.. तसेच काहीही क्रमशः  लेख ही त्यांनी पाहिले, एकंदर हे सदर ही खूप छान  रंगले.

एवढ्यातच ‘wake up wake up, its brand new day’ असा मोबाईल मधे गजर झाला आणि सनी झोपेतून उठला. शाळेत वेळेवर जाण्यासाठी तो लगेच आवरु लागला.

पण आज पडलेले हे ‘ मराठीचे स्वप्न ‘ त्याला खूप आवडले होते

(संग्रहित)  अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कवीवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि. वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना नितांत सुंदर अशीच आहे.. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन २००० पासून २१ फेब्रुवारी हा ” आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ” साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. या दोन्ही सुदिनाचे औचित्य साधून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या मायबोलीच्या सन्मानाचे आहेत.

माझ्या मराठी मातीचा

लावा ललटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

द-याखो-यातील शिळा

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे… भारतभरात आपापल्या संस्कृतीप्रमाणे आणि जातीधर्मा प्रमाणे भाषा बोलल्या जात असल्या तरी देखील माझ्या मराठी भाषेत जो गोडवा सामावलेला आहे त्याची सर इतर कुठल्याही भाषेला नाही…काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार या सर्वांचा साज लेऊन मराठी पुढे येते त्यावेळी तिचे सौंदर्य काय वर्णावे ?

मराठी भाषा परिपूर्ण माधुर्याने शब्दविलासाने नटलेली, विविध बोलींचे लेणे घेऊन आलेली, साहित्यिकांच्या लेखणीने समृद्ध केलेली मराठी भाषा आपल्या सर्वांचाच मानबिंदू आहे. मराठी भाषेला जो लहेजा आहे तो अन्य कुठल्या भाषेला आहे?  मराठी भाषा वळवावी तशी वळते…एवढा लवचिकपणा कोणत्या भाषेत आहे. आपल्या मराठी भाषेला बोलीभाषांचे ऐश्वर्य लाभलेले आहे. एक ना अनेक अशी कितीतरी वैशिष्ट्ये आपल्या मराठी भाषेची आहेत…

मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मराठी भाषा एक अमूल्य अशी देणगी आहे. सौंदर्य, माधुर्य आणि विविधतेने/ विविधता यांनी नटलेली..

मराठी भाषा म्हणजे काय ? असा जर कुणी प्रश्न विचारला तर माझे उत्तर असेल… मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार…

मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड,, संताजी- धनाजींची स्फूर्ती, सावरकरांची किर्ती, मराठी महन्मंगलम मूर्ती शारदेची…साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून- थटवून सुंदर केलं. आचार विचारांच्या परंपरांनी संस्कृतीची जडणघडण ही केली.

स्वर्गे अमृताची गोडी

चाखून पहा थोडी

वाटे फुलांची परडी

माझी माय ही मराठी

मराठी राजभाषा दिन साजरा करताना मराठी भाषेचे संवर्धन आणि जोपासनेची धुरा अभिमानाने पुढे नेऊया..

सन्मान मराठीचा

अभिमान महाराष्ट्राचा

मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे. तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. ती संतांच्या किर्तने भजन भारूडांनी सजली आहे. आपली मराठी भाषेची सुंदरता आणि संपत्ती ही समजून घ्यावी लागेल आणि समजून द्यावीही लागेल…

मराठीचा ” म” या अक्षरात मी, माझी मराठी, मायबोली अश्या सर्व ” म” कारात मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व  ” म” सामावलेले आहेत. म्हणूनच आम्ही बोलतो मराठी असे आमुची मायबोली..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

भावनेत अडकलेला नात्यांचा गुंता सुसंवादानं सोडवणं सोपं जातं त्यासाठी सुसंवादाची सुगंधित कुपी नात्यांवर सांडली पाहिजे. नाही तर नातं धुसर आणि पुसट होत जातं अगदी वृद्धापकाळातल्या नजरे सारखं…..

आई वडील आणि मुलगा सून यांच्या नातेसंबंधावरचा विषय तसा चावून चोथा झालेला, पण पुन्हा पुन्हा उफाळून येतो आणि नव्याने विचार करायला लावतो याचं कारण दररोज घडणाऱ्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना अन् मनाला चटका लावून जाणारे प्रसंग !….नाईलाजावर इलाज नाही असं म्हणून हताश झालेली आईवडिलांची मनं विचारांच्या गर्तेत बुडन जातात……

‘आमच्या प्रेमाच्या ओलाव्याने ही बीजे अंकुरली बहरली ना? त्यांना पंखही आम्हीच दिलेत ना ?त्यात बळही आम्हीच भरले ना ? तशात अपेक्षांचं ओझं कधीही त्यांच्यावर लादलं नाही. अर्थात आई वडील म्हणून या नात्यामधून माफक अपेक्षा केली तर आमचं काय चुकलं? रक्ताची नाती मतलबी का झाली? ती इतकी संवेदनाशून्य का झाली? आम्ही कुठे कमी पडलो? आणखी काय करायला हवं होतं आम्ही? आपल्याच पोटचीच पोरं…..तीही इतकी भावनाशून्य?’ विचारांचं मोहोळ उठत, पण विचारांचा गुंता सुटत नाही.

पंख फुटलेली लेकरं उडून जातात. त्यांच्या प्रगतीत आई-वडिलांचं सुख असत.थोडे दिवस एकांत मिळतो. याच एकांताच एकटेपणात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.

मुलांसोबत राहणाऱ्या आई-वडिलांच्या जीवनातील एकटेपणाचा हाच अर्थ आहे. भावना आणि व्यवहारात फरक जाणवू लागतो आपलंच सगळं परकं वाटू लागतं

आणि…….

अचानक आठवते ती कावेरी ! नाट्यसम्राट वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ मधली कावेरी आणि तिने त्याकाळी म्हटलेलं एक शाश्वत वाक्य ‘जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये’

चूक नसतानाही, केवळ वाद टाळावा म्हणून सतत माघार घेऊन संयम राखणारं एका वृद्ध जोडप्याची करूणरस प्रधान अशी शोकांतिका म्हणजे ‘नटसम्राट’! ते एक क्षोभनाट्य आहे.

काळ लोटला आहे. या शोकांतिकेतली पात्रं बदलली आहेत,परंतु या नाटकातील विषयाचं गांभीर्य अधिक गडद होत चाललं आहे.

इथून पुढच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व वाढेल का? की ते एक स्मरणरंजन राहील? एकत्र कुटुंब पद्धतीची दुर्दशाच आपण नटसम्राटमध्ये पाहतो म्हणून याबद्दल आपण साशंक होत चाललो आहोत.

‘बी प्रॅक्टिकल’ चा गोषवारा सध्या फार आहे. या व्यवहारी जगात संवेदना भावना यांची किंमत कमी होत चालली आहे.अशा परिस्थितीत ‘परावलंबी वृद्धत्व’ हा एक यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. पर्यायाने वृद्धाश्रम हा व्यवसाय झाला आहे.

‘नटसम्राट’ मधलं हे जोडपं, कलावंत मन असलेलं जोडपं आहे. त्याच्यासारखंच आयुष्य व्यतीत करणारी समाजातली असंख्य वृद्ध जोडपी असंच मूक भाष्य करत आहेत. विदेशी संस्कृतीचा आणि तिच्या संस्कारांचा प्रसार आपल्या इथेही होतोय. ती वाळवी इकडे जोमात पसरते आहे.तिला आवर घालणं हे संवेदनशील मनाचं काम आहे.

गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही कलाकृती आणि त्यात वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीने पेरलेली स्वगतेही अनन्यसाधारण!…

आपल्या समाजात आपण अप्पासाहेब बेलवलकरां सारखी दुर्दैवी परिस्थिती ओढवलेल्या व्यक्तीला ‘त्याचा नटसम्राट झाला’ असे बोलीभाषेत म्हणून ‘नटसम्राट’ हे विशेषण देतो.ह्यातच कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या नाटकाचं श्रेष्ठत्व आहे.

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print