मराठी साहित्य – विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

आज ललिता पंचमी! म्हणूनच मी तुम्हाला हळदी-कुंकवाला बोलावते आहे. आज मी तुम्हाला आमच्या अन्नपूर्णेची ओळख  करून देते. तशी तर अन्नपूर्णा सर्वांबरोबर माहेरुनच आलेली असते, पण ही अन्नपूर्णा थोडी वेगळी आहे. पण आधी मस्त चहा घ्या.

“काकू, चहा फक्कड झाला आहे”. हो ना? तोही ह्या आमच्या अन्नपूर्णेनच बनवलेला आहे. तर ह्या आमच्या कडील कर्मयोगी! सौ चंदा  दिघे. आमची अन्नपूर्णा.

तशी त्यांची जन्मभूमी पुणे आणि कर्मभूमी पण पुणेच ! लहानपणी आपल्या आई बरोबर कर्मयोगच करत होत्या पण त्याच बरोबर शाळेतही जात होत्या. पुढे लग्न झाले आणि सुखावल्या. दोन मुले एक मुलगी, सासूबाई सर्वच कष्ट करत. छान मजेत होते. त्यावेळी त्या ब्युरोत सेवा कर्म करत होत्या. मुलीचे लग्न झाले. एका मुलाचे लग्न झाले. सर्व काही ठीक ठाक चालेले होते. घरात एक चिमुकली नात आली. चंदाबाई सुखाने कष्ट करत होत्या पण संसाराकडे पाहून विसरत होत्या. असेच दिवस चालले होते.

आणि एक वादळ आले. वादळात सगळेच कोलमडले. त्यांचा मोठा मुलगा पोहायला गेला असताना बुडाला आणि पाठचा तो त्याला वाचवताना बुडाला. काय हाहाकार! एकाच वेळी काळाने दोन्ही मुले हिरावली. दोघेही पती पत्नी खचले. खोल निराशेत गेले. सगळीकडे नुसता अंधार. पण काहीच दिवसात बागडणाऱ्या चिमुकलीकडे त्यांचे लक्ष गेले. तरुण सुंदर विधवा सून दिसली. आणि त्या अन्नपूर्णेने पदर खोचला. “पुनःश्च हरी ओम” करत कामाला सुरुवात केली. त्याच वेळी आमच्या सोसायटीत पोहोचल्या. सुविचारी अश्या ह्या दुर्गेने अजून एक निर्णय घेतला. तरुण सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. आणि नातीची जवाबदारी स्वीकारली. तिला मोठी केली, शिकवली आणि तिचे लग्न करून ती नीट पार पडली.

केवढे मोठे मन !! पण मनातली ही सर्व दुःखे एका गाठोड्यात घरीच ठेवून येतात. जसे मन तसे अन्न  बनते. त्यामुळे नेहमी प्रसन्न. इथे फक्त कामाचाच विचार. त्यामुळे सगळे सुग्रास आणि राहणीमान पण तसेच. एवढी कामे करतात पण नेसलेल्या साडीला दिवसभर सुरकुती पण नसते. नवरात्री मध्ये तर रोज त्या त्या रंगाच्या साड्या नेसतात. सगळे सणवार आठवणीने साजरे करतात. आम्हालाही उत्साह देतात. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे स्मार्ट फोन त्या सहजपणे वापरतात. वॉट्सअँप , फेसबुक वर त्या छान सक्रिय आहेत.

आमच्या सर्वांकडे येताना, प्रत्येक सणावारानुसार त्या काहीतरी घेऊन येतात. यात्रेला गेल्या की एखादा फोटो घेऊन येतील. नागपंचमीला वैदेहीला बांगड्या, मेहंदी आणतील . दुःखात सुद्धा सुख शोधायला ह्या माउलींकडून मिळते. १३५ कोटी लोकांचे सुख सारखेच असेल, दुःख मात्र वेगवेगळी !! अशा माउली प्रत्येकीकडे आहेत, त्यांची उणीव आपण lockdown मध्ये अनुभवली आहे . तर चला आज मी तुमच्या सर्वांसमवेत त्या माऊलीची साडी, खणा-नारळाने ओटी भरते.

तुम्ही पण घरी जाऊन तुमच्या तुमच्या माऊलीची ओटी भरा!

या देवी सर्व भूतेषु क्षुधा रुपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

 

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

” पाखंड” श्रध्दाळु भक्तांना पुजारी उपदेश करीत होते, “उपाशी लोकांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी पाजणे, दुःखी-कष्टी लोकांना मदत करणे हाच खरा मनुष्यधर्म आहे. गरीब लोकांत ईश्वराचा वास असतो; म्हणून त्यांची मदत केल्याने ईश्वर प्रसन्न होतो.”

प्रवचन संपल्यानंतर एक अतिशय मरतुकडा मुलगा, हातापायाच्या काड्या झालेल्या, पोट खपाटी गेलेलं, डोळ्यात दया-याचना असलेला पुजार्यासमोर हात पसरत म्हणाला, “पुजारीबाबा, कालपासून काही खाल्लं नाही, फार भूक लागली आहे. थोडासा प्रसाद द्याल तर ……”

एक सणसणीत शिवी हासडत पुजारी म्हणाला, “हरामखोर तू परत आलास? आपल्या आईबापाला जाऊन विचार की पोटाला देता येत नव्हते तर जन्माला कशाला घातले!फुकटखाऊ नुसते! येऊन धडकतात रोज-रोज गिळायला …..”

ताटात झाकलेले लाडू त्यांनी चपळाईने आपल्या उपरण्यात बांधले आणि भराभरा पावले टाकीत मंदिराच्या मागे असलेल्या आपल्या खोपट्याकडे निघून गेला. देवळाच्या आवारात त्याचे प्रवचनातील शब्द वार्याबरोबर भिरभिरत होते………

 

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

तो मातीचा दरवळणारा सुवास अत्तरा पेक्षाही भारी वाटून जातो. मनातली मरगळ कशी लांब पळवून नेहतो. मन कसे प्रसन्न टवटवीत करून सोडतो.

ते टपोरे थेंब पाहताना नेत्र कसे सुखावून जातात आणि ती रिमझिम सर जेव्हा अंगावर पडते तेव्हा सारी काया सुखावते. पानं आनंदानी डोलू लागतात तर फुलपाखरू शांत फुलावर बसुन पावसाची रिमझिम पाहत राहते.

प्रत्येकाला हा अनुभव नक्की आला असेल नाही का?

तो पहिला पाऊस, तो आला की कसे सारे सुखावतात अगदी लहान मुलांपासून आजी आजोबा पर्यंत. प्रत्येकाच्या आठवणी ताज्या टवटवीत होऊन जातात.

काहीजण आपल्या जुन्या आठवणीत रमतो, तर काहींच्या मनाची तगमग शांत होऊ पाहत असते, कुणाचे नेत्र चोरून वाहत असतात तर कोण पावसात मनमुराद भिजत असतो. तर कोणाला गरम गरम चहा भजीची हुक्की आलेली असते.

अगदी रांगणारे मुल सुद्धा पावसात भिजण्यासाठी धडपडत असते. तीच थोडी मोठी मुल आईची नजर चुकवून मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतात.

मला ना माझ्या लहानपणी चि एक गंमत आठवते. पावसाळ्यात आई अगदी आठवणीने रेनकोट द्यायची वर बजावून सांगायची पावसात भिजायचे नाही. आईच्या समाधानासाठी तो आम्ही घेऊन जात होतो हे खरे पण जर शाळा सुटल्यावर पाऊस आला तर घर जवळ येईपर्यंत हा बिचारा रेनकोट दप्तरातून बाहेर येतच नव्हता. घर जवळ आले की हळूच तो अंगावर चढवला जायचा. आई विचारायचीच रेनकोट होता ना मग कसे भिजला? उत्तर तयारच असायचे अग दप्तरातुन काढे पर्यंत मोठी सर आली आणि भिजलो. पण शेवटी आईच ती बरोबर ओळखायची कधी एखादी चापटी मिळायची, नाही तर कधी ती पण आमच्याबरोबर मनमुराद हसायची. कदाचित् तिनेही तेच केले असेल नाही का तिच्या बालपणी.

अरे हा पाऊस तर मला बालपणात घेऊन गेला की, मला खात्री आहे तुम्हाला ही घेऊन गेला असेल बालपणात. हो ना?

हळू हळू सार्‍या आठवणी कश्या मनाच्या कोपऱ्यातून डोकावू लागतात नाही का ? त्या केलेल्या छोट्या छोट्या होड्या त्या पाण्यात सोडून कोणाची किती लांब जाते ह्यावर लावलेली पैज, तो कॉलेजचा कट्टा, ते कॅन्टीन तो कटींग चहा आणि आपला तो ग्रुप. वाटले ना परत जावे कॉलेज मधे आणि परत पडावा मुसळधार पाऊस.

अरे आपणच नाही काही अगदी आपले आजी आजोबा सुद्धा रमून जातात पावसात ते ही सैर करून येतात भूत काळात. काहीना आठवणीने डोळ्यात पाणी येते तर काही ते पावसांच्या सरित लपवतात.

आपल्या प्रमाणेच निसर्ग कसा सुखावून जातो. त्यानी नेसलेला हा हिरवागार शालू पाहताना त्याचे हे सौंदर्य पाहताना कसं मन प्रसन्न होऊन जाते. पक्षी ही झाडाच्या फांदीवर बसुन झोके घेत आनंद लुटत असतात. तर ही धरती शांत शीतल होत असते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

09.8.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग २ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग २ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

त्यातली एक कथा तर मला फारच आवडली. शंकर सगळीकडे संचार करणारा…त्यामुळे  त्याला नाना प्रकारच्या चवदार अन्न पदार्थांची  माहिती असे.

देवी पार्वती म्हणजे हिमालयाची राजकन्या, तिला कुठला स्वैपाक येणार!   शिवाय खाणारे गणेश कार्तिकेय आणि भूतगण म्हणजे जबरे.. त्यामुळे ती आपली दही भात, रोट्या किंवा लचका यापैकी एखादाच पदार्थ पण भरपूर प्रमाणात करे.

शंकराला एकदा कुठेतरी पुरण पोळ्याचा नैवेद्य खायला मिळाला.  झाले,  त्यानी आणि नंदीने कैलास पर्वतावर.. त्या पोळ्यांचे असे काही वर्णन केले की गणेशबाळ आणि कार्तिकेय तर नाचायलाच लागले.  मग पार्वतीने नंदीला पुरणपोळीची कृती विचारायला पिटाळले.  त्याने काहीतरी धांदरटपणाने अर्धवट ऐकून काहीतरी सांगितले. .तरी पार्वतीने. मोठ्या पातेल्यात डाळ शिजवायला ठेवली,  त्यात साखर घालून पुरण शिजवले..त्यात त्या पोरांनी येता जाता भरपूर सुका मेवा ओतला.  .त्यामुळे  पोळ्या काही जमेनात. गणेश तर रडायलाच लागला मग कार्तिकेयाने युक्ती करून पुरण कणकेत भरुन ते गोळे तळायला सांगितले.  तेव्हापासूनच गणपतीला मोदक आवडायला लागले.

ते तळलेले मोदक सगळ्यांनी खाल्ले खरे पण शंकर नंदीला म्हणाले…,  ” पुरणपोळी नाही जमली तुमच्या मातेला..शेवटी मोदक खायला घातला… ” असे म्हणून हसू लागले.  पार्वतीला राग आला. दुस-या दिवशी तिने पुन्हा  पुरणाचा घाट घातला, पोरांना तिथे फिरकायचे नाही अशी सक्त ताकीद केली.   पहिली पोळी नंदीला खायला घातली,  नंदी बिचारा काहीच बोलला नाही.  गणपती,  कार्तिकेय आणि भूतगण तर काय काहीही खायचे…त्यांना सगळेच आवडायचे.. पण शंकराने मात्र पार्वतीची खूप चेष्टा केली.  पार्वतीला पहिल्यांदा राग आला पण नंतर तिला वाईट वाटले.

मग तिने  स्वतःच्या अन्नपूर्णा रुपात परत येण्यासाठी ईश्वराची दस-यापासून पाच दिवस आराधना केली आणि कोजागिरीला ती काशीक्षेत्रात अन्नपूर्णेच्या रुपात प्रगट झाली.

आता ती केवळ दृष्टीने पदार्थातील मर्म जाणू लागली आणि तिच्यासारखा उत्तम रांधणारा त्रिखंडात कोणी उरला नाही.  एवढेच कशाला चांगले रांधता येण्यासाठीही लोक तिची प्रार्थना करू लागले…लग्नामध्ये वधूला तिची आई अन्नपूर्णेची मूर्ती देऊ लागली….

अशा प्रकारच्या गंमतशीर कथा असलेली आणि देवांचे मनुष्य रुप कल्पून गाणी गातात… कथा सांगतात. शेवटी सर्वजण फेर धरून नाचतात.

माळी पौर्णिमेची देवी म्हणजे अर्थातच अन्नपूर्णा…पार्वतीदेवी,  त्या पाच दिवसात तिची,  तिच्या परिवारासह मनोभावे पूजा केली जाते.

वर्षभर खाण्याची ददात पडू नये असे आशीर्वाद मागितले जातात.  दुसर्‍या दिवशी सर्व मंडपी तिथेच धावड्याच्या किंवा मोहाच्या झाडाखाली ठेवून परत घरी जातात.

तिस-या दिवशी पुन्हा नैवेद्य  घेऊन जातात आणि आपापल्या मंडपी आणि एखादी दिवणाल घरच्या अंगणात ठेवण्यासाठी घेऊन येतात…

असे म्हणतात की त्या मंडपात शंकर पार्वती पाखरांच्या रूपात येऊन भाजीपाल्याचे बियाणे ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा धान्याचा साठा संपत आलेला असतो आणि धुवांधार पावसामुळे बाहेर जायची सोय नसते त्यावेळी अंगण भरून रानभाज्या उगवतात.  भूकेची आणि औषधाचीही तरतूद झालेली असते.

ता.  क.  मराठवाडा आणि विदर्भातील काही खेडेगावात मातीच्या शिड्या करून त्यावर या दिवसात पणत्या लावतात, तिथे कोजागिरीला ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात.

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्री सूक्त – एक ‘अर्थ ‘पूर्ण  प्रार्थना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ श्री सूक्तएक ‘अर्थ ‘पूर्ण  प्रार्थना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कुठल्याही देवी- पूजनाच्यावेळी आवर्जून श्रीसूक्त म्हटलं जातं. देवी-स्तुतीव्यतिरिक्त श्रीसूक्तात काय आहे याची माहिती मिळाल्यावर, ती साररूपात इतरांनाही सांगावी असं मनापासून वाटलं.

धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत, त्यापैकी धर्म हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. अर्थ आणि काम हे जीवनाच्या भौतिक विकासासाठी आवश्यकच आहेत,पण त्यांच्या मुळाशी धर्म असावाच लागतो. श्रीसूक्तात अशा धर्माधिष्ठित लक्ष्मीला आवाहन केलेले आहे. अर्थ म्हणजे धन धर्ममार्गाने प्राप्त केले तर कधीच सोडून जात नाही, हा विश्वास यात आहे. ही लक्ष्मी कशी यावी, कायमस्वरुपी कशी रहावी, आणि आयुष्यातल्या सर्व सुखांचा मर्यादशील उपभोग घेण्यासाठी कशी जपावी, यासाठी केलेली सुंदर प्रार्थना म्हणजे श्रीसूक्त.

श्रीसूक्त हे एक व्यापक ‘अर्थ’ शास्त्र आहे. अर्थ, अर्थात धन आयुष्यात महत्त्वाचे असतेच. म्हणूनच ‘धनलक्ष्मी’ ही संपत्तीची देवता असे म्हणतात. इथे संपत्ती म्हणजे फक्त पैसा अभिप्रेत नाही. उत्तम गुण, उत्तम आरोग्य, उत्तम अन्न, उत्तम ज्ञान, उत्तम मित्र, ही सुद्धा मौल्यवान संपत्ती आहे जी यथायोग्य मिळाली तरच आयुष्य सुखी-समाधानी होते आणि आत्मिक विकासाची वाटही सापडू शकते. उपभोग-दान-विलय या धनाच्या तीन अवस्था आहेत.

लक्ष्मी मातृस्वरूप आहे असे मानले आहे, म्हणूनही तिची पूजा केली जाते. मिळवलेली सर्व प्रकारची माते-समान पवित्र संपत्ती कायम-स्वरुपी आपल्या घरी रहावी, ती प्रसाद समजून स्वीकारावी, हा फार मोठा हेतू लक्ष्मी-प्रार्थनेमागे आहे.

श्रीसूक्तात अग्नीला प्रार्थना केली आहे की, ‘त्या तेजस्वी लक्ष्मीला तू माझ्या घरी घेऊन ये. ती कधीही परत जाऊ नये. आणि ती वाजत गाजत येऊ दे ‘….. गर्भितार्थ असा की, ही धनरूपी लक्ष्मी पवित्र, स्वकष्टार्जित आणि चोख असावी. ती लपवावी लागू नये. ती उजळ माथ्याने घरात विसावली तरच मनःशांती आणि समाधान लाभते. तिला ‘आर्द्रा’ असेही म्हटलेले आहे. समुद्रपुत्री आणि विष्णूपत्नी म्हणून ती क्षीर-सागरात तर रहातेच. शिवाय तिच्यात वात्सल्याचा, भावनांचा ओलावा आहे, म्हणून ती अंतर्बाह्य ‘आर्द्रा’ आहे, जिच्या सोबत जीवन सुसह्य आणि आनंदमय होऊ शकतं.

धनाला अशी लक्ष्मी मानल्यामुळे, सर्वांनीच याप्रमाणे चोख व्यवहार केला, तर समाजजीवनही अत्यंत आनंदमय आणि समाधानी राहील हाच अप्रत्यक्ष संदेश श्रीसूक्तातून दिलेला आहे.

यात धनलक्ष्मीला  आवाहन केलेले आहे की ….’देवांनीही तुझा आश्रय मागावा इतकी तू उदार आहेस. तुझ्या-मुळेच आमचं दारिद्र्य नष्ट होईल‘…… अर्थात ‘दारिद्र्य फक्त पैशाचे नसते. ते बुद्धीचे,विचारांचे आणि भावनांचेही असते. तेही नष्ट व्हावे आणि माणसाचे व्यक्तिमत्व संपन्न व्हावे‘. दारिद्र्य म्हणजे ‘अलक्ष्मी‘. हिचे वर्णनही यात केलेले आहे…..’अनेक प्रकारच्या तहान-भुकेमुळे मलीन झालेली, जगभर मोठ्या प्रमाणात वास करणारी, आणि अतिदुःखदायक अशी लक्ष्मीची मोठी बहीण‘…..ती घराबाहेर गेली तरच क्लेशकारक दारिद्र्य सर्वतोपरी नाहीसे होऊ शकते, जे एका माणसासाठीच नाही, तर एका राष्ट्रासाठीही आवश्यक आहे. तरच श्रीमंती आणि गरिबी यात जगभर दिसणारी प्रचंड दरी सांधण्याची शक्यता आहे.

श्रीसूक्तात पुढे म्हटले आहे की, या तेजस्वी लक्ष्मीने तपश्चर्या केली त्यातून बेलाचे झाड निर्माण झाले. त्याचे त्रिदल पान म्हणजे सत्व- रज- तम या त्रीगुणांचे, त्रिविध तापांचे, बाल्य- तारुण्य- वार्धक्य या तीन अवस्थांचे, आणि कर्म- अकर्म- विकर्म या कर्मत्रयांचे प्रतीक आहे. हे त्रिदल ईश्वरचरणी समर्पित करायला लक्ष्मी शिकवते, आणि स्वतः अर्थलक्ष्मी, ज्ञान- लक्ष्मी आणि आत्मलक्ष्मी, या त्रिविध रूपात उपासकाकडे रहाते.

श्रीसूक्तात अशीही प्रार्थना आहे की….. “या समृद्धी संपन्न राष्ट्रात मी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे कुबेराने मलाही ‘चिंतामणी’ देऊन समृध्द करावे. माझी कीर्तीही वाढावी. माझ्या राष्ट्राची थोर परंपरा, समृध्द संस्कृती आणखी उज्ज्वल होण्यासाठी माझाही हातभार लागावा. “म्हणूनच वाटते की श्रीसूक्त ही राष्ट्र -प्रार्थनाही आहे……..’आसेतू हिमाचल पसरलेल्या या संपन्न राष्ट्राचा प्रतिनिधी असणारा मी, लक्ष्मीचा वरद-हस्त लाभलेला समृध्द नागरिक असावा ‘…… अशी ही मनोमन प्रार्थना आहे.

शेवटी आशिर्वाद मागितला आहे……..” उपासकांच्या मनाला कामक्रोधादी सहा रिपूंचा वाराही लागू नये. आणि त्यांच्यावर या पवित्र लक्ष्मीचा वरदहस्त सदैव रहावा. ”

…… श्री लक्ष्मी नमो नमः…….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

माहिती सहाय्य: सौ शुभदा मुळे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग १ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग १ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

कोजागिरी पौर्णिमेला विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही आदिवासी भागात माळी पौर्णिमा म्हणतात.  यावेळी पावसाळी पीक तयार झालेले असते.

नवरात्र ते कोजागिरीचा हा काळ सुगीचा हंगाम साजरा करण्याचा आणि रब्बी हंगामासाठी बियाणे निवडण्याचा आणि तयार करण्याचा असतो.  लोकांच्या घरी आनंद असतो आणि कामाची धांदलही असते.

दस-यापासून कोजागिरीपर्यन्त झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात शंकर आणि पार्वती रात्री वस्तीला येतात अशी समजूत आहे.  त्यांच्यासाठी अंगणात ऊसाची, धानाची किंवा  ज्वारीची मंडपी तयार करतात.  त्या मंडपात  मऊ गवताची बिछायत घातलेली असते.  गवताची उशी,  लोड,  तक्के केलेले असतात,  काही घरी झूलाही बनवलेला असतो. त्यामध्ये शंकर पार्वती,  गणपती, कार्तिकेय, नंदी असा सर्व परिवार बनवलेला असतो.  एक भाग शेण आणि चार भाग माती हे प्रमाण घेऊन हा परिवार तयार केला जातो.

या मंडपी रोज नाना प्रकारच्या फळा फूलांनी सजवतात.  विशेष म्हणजे त्या मंडपीवर छोट्या छोट्या पणत्याही मांडलेल्या असतात.  त्या पणत्यांना दिवणाल म्हणतात. दस-यापासून पौर्णिमेपर्यन्त रोजच त्या सूर्योदयाच्या वेळी  ताज्या ताज्या बनवल्या जातात.

दस-याच्या म्हणजे पहिल्या   दिवशी 5, त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी कमीत कमी 4 दिवणाल.. असे पौर्णिमेपर्यन्त करतात.  नवसाच्या असल्या तर जास्तीही बनवतात. त्या दिवसभर वाळवून रात्री त्यात दिवे लावून आरास करतात.  त्यासाठी करंजीचे तेल वर्षभर साठवलेले असते.

अगदी 2000 साली सुध्दा तिथल्या कितीतरी पाड्यात वीज घेतलेली नव्हती पण माळी मंडपी आणि त्यावरच्या दिव्यांची आरास मात्र प्रत्येक घरात सजलेली असे.

घरातली आणि शेजारची  सर्वजण त्याच्यासमोर बसून गातात आणि फेर धरतात.  ही गाणी साधारण भूलाबाईच्या गाण्यासारखीच असतात.

मंडपीचा रोजचा नैवेद्य  म्हणजे रोटया आणि भाजी. ही भाजी मुख्यतः पालेभाजी किंवा कंदभाजी,  पण ही पाचही दिवस वेगळया ठिकाणावरून गोळा करुन आणायची असते.  म्हणजे कधी अंगणात उगवलेली,  शेतातली,  पाण्यातली,  रानातली, अशा प्रकारची.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी,  आपापल्या घरच्या मंडपी घेऊन सर्व लहानथोर जवळपास असलेल्या नदीकाठच्या देवळात  जमतात.

तिथे सगळे जण मिळून स्वैपाक करतात.  स्वैपाक म्हणजे भात, आमट, बरा म्हणजे डाळीचे वडे,  मक्याच्या रोट्या,  गोड पदार्थ  म्हणजे कणकेचा लचका. लचका म्हणजे गव्हाची रवाळ कणिक दळून ती भरपूर तूपात खमंग भाजतात आणि घोटून घोटून अगदी मऊ थुलथुलीत शिरा करतात.

बायका आणि मुली रानफूलांच्या माळांनी सजलेल्या असतात. लहान मुले गणपती आणि कार्तिकेयाच्या रुपात असतात.   एखादे नवसाचे मूल नंदीसारखेही सजवलेले असते.  मोठी म्हणजे टिनेजर मूले भूतगण बनतात.  सगळीकडे नुसती धमाल असते.

फूलांची  आकर्षक सजावट केलेल्या मंडपी मध्यभागी ठेवून त्याच्या वर सर्व दिवे लावतात.   उरलेले दिवे मंडपींच्या भोवतीने वर्तुळाकार 2-3 ओळीत लावलेले असतात.

सर्वप्रथम शंकर पार्वतीला त्यावर्षीच्या पाऊस पाणी आणि शेतातल्या पिकांबद्दल निवेदन केले जाते.  त्या वर्षभरात समाजात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी  देवाला सांगितल्या जातात.

त्यानंतर जमलेल्या स्त्रिया आणि पुरूष .. यांच्या गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करत गाणी म्हटली जातात.  ही गाणी खूपच गंमतीदार असतात,  त्यामध्ये शंकर पार्वतीच्या भांडणाच्या आणि रुसण्याच्या आणि  चंद्र,  गंगा,  गणपती आणि कार्तिकेयाच्या यांच्या खोड्यांच्या… अशा कथा असतात.

त्यातली एक कथा तर मला फारच आवडली.

(ही कथा उद्याच्या भागात वाचूया)

क्रमशः ….

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे – 5 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे – भाग 5 ☆ सौ. अंजली गोखले ☆

संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ आणि जबाबदारीच्या पदांसाठी साठीच्या पुढच्या मंडळींना प्राधान्य देतात.  कारण त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता जबरदस्त असते.  त्यांचे कौटुंबिक पाश बऱ्यापैकी झालेले असतात, काम करण्याची इच्छाशक्ती असते, क्षमतेमध्ये ते कमी पडत नाहीत. अमेरिकेमध्ये संशोधन करून प्रयोगांती असे सिद्ध केले आहे की माणसाचे सर्वात कार्यक्षम वय 60 ते 70 आहे. आहे की नाही आश्चर्यकारक!त्यांच्यामध्ये सत्तरी पर्यंतच्या लोकांचा नंबर काम करण्याच्या बाबतीत पहिला. त्यानंतर सत्तर ते ऐंशी वयाचे लोक व्यवस्थित कार्यक्षम!त्यानंतर चा नंबर लागतो 50 ते 60 वयाचा. विशेष म्हणजे नोबेल पदक विजेत्यांचे सरासरी आयुर्मान 62 वर्षे दिसून आले आहे. अमेरिकेतल्या मोठाल्या शंभर चर्चेस मध्ये काम करणाऱ्या धर्मोपदेशक यांचे वय तपासले असता बहात्तर वर्षापर्यंत हे लोक व्यवस्थित काम करू शकतात असे आढळून आले. पोपचेसरासरी वय 76 दिसून आले. यावरून एवढाच निष्कर्ष निघू शकतो की परमेश्वर यांनी हे जे शरीर बहाल केले आहे, त्याची सर्वात चांगल्यात चांगली वर्षे कोणती म्हणाले तर साठी पासून सत्तरी पर्यंत!या वयामध्ये आयुष्यातले चांगले तुम्ही मिळवु शकता.

यावरून आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनो, वाढत्या वयाची चिंता करू नका, योग्य नियोजन करून कार्यरत रहा, अच्छा ही बना, आनंदात रहा. मग संध्याछाया का बर  भिववतील ?याच वयामध्ये आयुष्याचा खरा अर्थ समजलेला असतो, दिशा तर आता ठरलेलीच असते, त्यामुळे मागे अजिबात न वळून बघता पुढे पुढे चालत रहा. या वाटेवर काही झाडे उन्मळून पडणारच, आधारचे हात कमी होणारच, शरीराला_ मनाला वेदना या होणारच.  पण या सर्वांवर मात करून जीवन गाणे गात राहिले पाहिजे.  आकाशातील ढग, पाऊस बरसून आपले पूर्ण आयुष्य रिते करतो, नद्या सतत वहाततेच पाणी किनाऱ्याला देत राहतात, सागर त्याच पाण्याची वाफ करून पुन्हा ढगांना पाणी भरण्याची संधी देतो. झाडे आपले पूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी वेचतात, गोड गोड फळे माझी म्हणून त्यांना खाताना आपण कधी पाहतो का?ही सगळी रंगीत सुवासिक फुले माझेच आहेत असे ते कधी म्हणतात का?दुःखाने टाहो फोडताना, अपयशाने खचून जाताना रडत रडत जीवन जगणारी झाडे आपण कधी पाहतो का?मग या सुंदर अश्या निसर्गाकडून आपण हेच शिकूया आणि आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य ही आनंदी बनवूया. बालपण तरुणपण वृद्धावस्था आपल्याला मिळालेली वरदा नं आहेत.  त्या त्या वयात, त्या त्या क्षणात, त्यांचा आनंद मिळवू या मग कुठल्याही वयामध्ये आपल्या ओठी याच येतील

“जीवनात ही घडी

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपले निर्व्याज गुरू ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ आपले निर्व्याज गुरू ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

आत्ताच्या विज्ञान युगात खूप वेळा पुस्तके, ग्रंथ, मोबाईल, संगणक यांच्याद्वारे आणि नेटवरुन मिळणारी माहिती खूप उपयोगी पडते. ही माहिती खरी असते. त्यांच्याकडून भेदभाव होत नाही. गुरु करण्याआधी आपण सर्वप्रथम त्यांची कथनी व करनी याबाबतीत निरीक्षण व मनन,चिंतन केले पाहिजे. त्याला कसोटी लावलीच पाहिजे असा दंडक आहे.गुरु हा त्याच्या ज्ञान व सदाचरणावरून ठरतो. वयावरुन नाही. गुरु ही शक्ती आहे व्यक्ती नाही. वर्तमानकाळात गुरु परंपरेलाही किड लागू पाहत आहे. त्यांचे व्यापारीकरण होत आहे. त्यांच्याकडून स्रियांचे लैंगीक शोषण होत आहे. याबाबतीत खुप सावध रहावे लागत आहे. असे गुरु संकट दूर करण्याऐवजी संकटे निर्माण करतात. हे देवदूत नसून यमदूत आहेत. साधू नसून संधीसाधू आहेत. म्हणून मला पुस्तक, संगणक हे गुरु मला विश्वासू वाटतात. या दोन्ही गुरुंचे वर्णन करणाऱ्या कविता केल्या आहेत.

पुस्तक

पुस्तक असे आमचा गुरु आणि मित्र

त्यानेच घडवले अनेकांचे अंतर

त्यानेच उलगडले अनेकांचे अंतर

पुस्तक वाचता वेळ जाई मजेत

ती एक असे वेगळीच संगत

रुपे त्याची अनेक अन् कित्येक जन्मदाते

भाषाही त्यांच्या अनेक

मर्यादा नसे कोणत्याच गोष्टींची  परी मर्यादा पडे त्यासी

मार्गदर्शन, मनोरंजन करी सर्वांचे

भेदभाव नसे तयापाशी

तो एक प्रसिध्दिचा अन् संग्रहाचा मार्ग

ते एक उत्तम प्रसारमाध्यम

ग्रंथालय असे त्यांचे घर

जगाच्या पाठीवर सर्वत्र त्यांचे अस्तित्व

पण शेवटी पुस्तक करी विनंती

‘मी जरी मुका तरी वाचकांनो

जाणा माझे अंतर

दुमडू नका, फाडू नका माझी पाने

सांभाळूनी ठेवा मला

माहिती अन् स्फूर्ती घेऊन माझ्याकडून

घडवा आपुले भविष्य सूंदर’

आणि आता

संगणक

संगणक तू संगणक

आहेस माहितीचा साठक

आयुष्याचा अविभाज्य घटक

नवीन दिशांचा प्रेरक

पुढील प्रवासाचा संयोजक

तरीही आमचा सहचालक

आहेस संपर्काचा साधक

असतो तुला मालक

कित्येक क्षेत्रांचा दर्शक अन् संचालक

देतोस माहिती करतोस करमणूक

आहेस माहीतीचा अन् मालाचा वितरक

नवीन कल्पनांचा सुचक

जुन्यानव्या मैत्रीचा योजक

तसाच आनंदाचा आयोजक

रिकाम्या वेळाचा नियोजक

तुच असशी आमचा मार्गदर्शक

तसाच निरोपाचा वितरक

जन्मदाता तुझा एक संशोधक

साथी तुझा नेटवर्क

मग लागतो तुला संरक्षक

तूच एक संगणक

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ टपालाचे दिवस …. ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ टपालाचे दिवस …. ☆ श्रीशैल चौगुले ☆

(ऑक्टोबर महिन्यात टपाल दिवस साजरा करण्यात येतो.त्यानिमीत्त.)

आठवणीतले क्षण एखाद्या चिमणीसारखे टिपतात आणि मग आपणास लेखणीने सांगीतल्याशिवाय मनही स्वस्थ बसत नाही.

लहान असताना जसजसे कळायला लागले तसतसी विशीष्ट व्यक्तींची ओळख डोळ्यात साठवून ओळख पटू लागली. खास करुन शिक्षक,पोलीस, व सर्वात महत्वाची व्यक्ती चटकन आकर्षून घ्यायचा तो पोस्टमन.

मला वाटते त्यावेळी जांभळा सदरा व टोपी असा काहीतरी वेश होता बहुधा. नंतर खाकी वेष व हातात कसले तरी थोडे कागद व पिशवीतही खाकी चौकोनी जाड कागद. हळूहळू त्या कागदाची ओळख टपाल म्हणून परिचीत झाली. दारात पोस्टमन आला कि हा काही क्षणाचा विशेष पाहुणाच वाटायचा. मग बहिणींची धावपळ व्हायची. कुणाचे पत्र आले हे पहाणेसाठी व माझीही लुडबूड व्हायची, बहिणींचे परकर धरुन. मग ती टपाल नावाची अद्भूत वस्तू मलाच मिळण्यासाठी रडारड घरभर. पण, ते पत्र पूर्ण वाचलेशिवाय काय माझ्या हाती लागायचे नाही.

कधी कधी तारही आल्याचे आठवते. धारवाडहून मामांचे अथवा मुंबईहून नागूकाका शिक्षक जे वडिलांचे व आमचे घरोबा शेजारी यांचे.

मग घरभर धिंगाणा चालायचा. पत्र वाचायला अथवा लिहायला येणारी व्यक्ती अथवा मुलगा हुशार समजला जायचा.

पण हे टपाल भांडण लावण्यात सर्ईरात. वाचायला व्यवस्थीत आले तर ठिक, नसता घरभर बहिण भावंडात हशा होऊन कधी कधी टपाल फाटूनही जायचे. पाठवाणार्याचे ते दुर्दैवच.

पत्ता निट असेल तरच पत्र लवकर मिळायचे. अन्यथा पोस्टमन गल्ली बोळ शोधून दोन दिवस दिरंगाईने पत्र पोचते करायचे. त्यात पत्र वेळाने आले कि,पटकन पोस्टात जाऊन दहा पैशाचे पत्र आणून ऊत्तर पाठवताना मजकूरात पहिले वाक्य ‘टपाल वेळाने मिळाले’.

पत्र लिहिताना लिहीणार्याचा भाव काय विचारता. आम्ही सगळे त्यांच्याभोवती रींगण करुन गुडघे दुमडून,गालावर हात ठेऊन गांभिर्याने टपालकडेच एकटक मंत्रमुग्ध होऊन बघत असू. मग काय लिहीणार्या बहिणीचा भाव अधिक,सरा, अंधार करू नका,हलवू नका. मग आम्ही हताश. पण टपाल पूर्ण झाले की टपालपेटीत टाकून येण्याची जबाबदारी कधी कधी माझ्यावरही यायची. मला अतिशय कटाक्ष सुचना असायच्या,’हे बघ,ते पेटीचे वरचे दार ऊघडून त्यात टाकायचे. हाताला येतय नव्हे. मी होय म्हणून थाप लावायचा. मग मुलींच्या शाळेत अथवा बस स्थानकातल्या पेटीजवळ गेलो की,अगोदर चड्डी गच्च करणार. कारण ही गडमोहीम साधी नव्हती. खांबावर चार पाय वर चढून मोठ्या कसरतीने दार ऊघडून टपाल टाकायचे. पण मोहिम फत्ते झाली कि मला पाच दहा पैशाचे बक्षिस घरी आल्यावार नक्की मिळायचे. अहाहा काय त्या टपालमेहनतीतून मिळालेल्या साखरगोळी,निलगीरी गोळीचा आस्वाद. छे ! तो आनंदच वेगळा.

टपालाची सुध्दा एक गंमत असायची. आम्ही  चव्हाणवाड्यात नवीन रहायला आलेलो. मी तिसरी चौथीच्या वर्गातला हुशार विद्यार्थीच होतो अगदी ठाम.

मग दिवसभर शेजारी चव्हाणवाड्यातच थौड्या फरकाने एक दोन वर्षाच्या अंतराने सवंगडी असलेने तिथेच खेळायला असू. मग टपाल वागैरे आले कि गलकाच गलका. मग त्यांचे घरी आमच्या तुलनेने लहान व शिक्षणानेही थोडाफार मठ्ठ असलेला चव्हाणांचेच शेजारीमित्र होते. त्याला टपाल वाचायची भारी हौस. अजून दुसरीपर्यंतच असेल पण टपालाचा आनंद विरळच.

तो कोणतेही पत्र आले कि,मामा चचो,मामी चचो,काका चचो असा मोठ्याने वाचायचा आणि वाडा हशानै गदगदून जायचा.

आणखी एक टपालाचा प्रसंग,आमच्या बहिणींची नुकतीच लग्नं झालेली. मग त्यांच्यात सरशी असायची कि,कुणाचे मिस्टर किती थोर म्हणजे भाऊंजींची लढत असायची.

मग मोठ्या बहिणीच्या हाती मधल्या बहिणीच्या भाऊजीकडून आलेले पत्र हाती आले मग त्या टपालातील दोष काढून चिडवा चिडवी सुरु. आम्ही सगळे गमतीत रमून हसू लागलो. आणि आमच्या मधल्या बहिणीचा राग अनावर होऊन अक्षरशः पळीने फेकून बहिणीला अंदाजाने भिरकावले. तिला वाटले लागणार नाही. आणि काय विचारता राव पळीचा घाव पायावर जबरदस्त बसला. बहिण बेशुध्द काही क्षण. हसता हसता सगळ्यांचे डोळे भरुन आले., मधल्या बहिणीचे तर काळीजच फुटले या टपालप्रकरणातून. तसा मारण्याचा हेतू नव्हता पण  रागाने भिरकावलेले स्वयंपाकशस्त्र. क्षणभर धावपळ. काय करायचे कुणाला काही कळेना.

यापुढे मात्र टपालातल्या दोषांची टिका टळली. आणि आम्ही चांगले टपाल लिहायला शिकलो.

एकंदरीत संदेशाचे पुष्पकविमान म्हणजे टपाल.

एक हिंदी कविता आठवाते पाठ्यपूस्तकातीलः

लेकर पिला पिला थैला

पत्र बॉंटने आता

यह है मुन्सीराम डाकीया. . . . .

डाकीया’ नावाची कविता.

अशा खूप जीवनातल्या सुख-दुःख क्षणाशी निगडीत पोस्टमन वा टपालाच्या आठवाणी. पण आजसाठी ईथेच थांबतो.

सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार व. . . . गोड गोड पापा.

आपला विश्वासू

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

हाव. दिसायला दोन अक्षरी एक साधा शब्द, पण त्यात नकारात्मक अर्थांचे विविध छटांचे रंग ठासून भरलेले. . ! कांही हवं असणं आपण समजू शकतो, पण अंत नसलेलं ‘आणखी हवं’ ही उध्वस्ततेची सुरुवात ठरते. आणखी हवं असणं म्हणजे हव्यास. हव्यास म्हणजे विध्वंसाची ठिणगीच जणू. कारण कोणत्याही हव्यासाचं असणं परोपकारासाठी, जनसुखाय -जनहिताय कधीच नसतं. ते तसं असूच शकत नाही. ते असतं स्वत:साठी, . . स्वार्थासाठी. ! म्हणूनहव्यासाची परिणती अर्थातच विनाश हेअपरिहार्यच. खरं तर विश्व निर्माण झालं तेव्हाच निसर्गनियमही अस्तित्वात आले. हे नियम निसर्गातले सर्व घटक काटेकोरपणे पाळत असतात. अपवाद फक्त माणसाचा.  पैसा, पद, प्रतिष्ठा, सुख यांच्या हव्यासापायी निसर्गाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या सुरुवातीचा पहिला क्षणच विनाशकाले विपरीत बुध्दी ठरला.  आपलं जगण्याचं निसर्गाला अपेक्षितच नव्हे तर अभिप्रेतही असलेलं प्रयोजनच माणूस विसरुन गेला आणि विनाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला.

निसर्गाने माणूस निर्माण केला आणि त्याला बुध्दीचं वरदान दिलं. त्या बुध्दीचा  सर्व निसर्गघटकांच्या हितासाठी त्याने योग्य उपयोग करणे अपेक्षित होते. पण हव्यासाच्या अतिरेकामुळे सुखासमाधानाच्या मृगजळामागे धावता धावता निसर्गानेच दिलेलं बुध्दीमत्तेचं कोलीत हातात घेऊन सर्वाना प्रकाश दाखवणे अपेक्षित असताना अतिरेकी हव्यासामुळे माणूस ते क़ोलीत घेऊन सगळा निसर्गच जाळत सुटलाय.

माणसाचं हे अनैसर्गिक जगणंच त्याला आज विनाशाच्या अखेरच्या वाटेवर घेऊन आलंय.

निसर्गाला अपेक्षित असणारं  माणसाचं ‘ जगणं’ हे एका अतिशय सुखी, समाधानी, समृध्द,  सुंदर अशा जगाच्या निर्मितीला निमित्त झालं असतं.  एरवी अगदी सहज वास्तवात येऊ शकलं असतं असं ते सुंदर जग आज माझ्या मनात मला स्वच्छ दिसतंय, पण. . स्वप्नवतच.  म्हणूनच ते रुखरूख वाढवणारं ठरतंय. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख.  निसर्गाला अभिप्रेत असलेल्या त्या सुंदर जगाचं दर्शन   तुमच्याही मनात ती रुखरुख निर्माण करेल आणि कदाचित नव्या वाटा शोधण्याची असोशीही. . . . !

कसं आहे हे हवंहवंस जग?हे जग आणि अर्थातंच इथलं जगणंही अतिशय निरामय

आणि  सुंदर आहे. या जगात माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात आहे. ॐकार हाच प्रत्येकाचा देव आहे. घरं मंदिरासारखी पवित्र आहेत आणि त्या घरांऐवजी प्रत्येकाच्या मनामधे देव्हारे आहेत. त्या देव्हार्यात ॐकाराची पूजा नित्यनेमाने होते. नीतिनियमांनुसार आचार हे प्रत्येकाचे व्रत, आणि त्यातून मिळणारं समाधान हा पूजेचा प्रसाद. . !निसर्गाचे सर्व नियम इथे सर्वानी मनापासून स्विकारलेत. त्यामुळे निसर्गालाही कृतकृत्य वाटतेय. त्यामुळे निसर्ग छान खुललाय. फुललाय. निसर्गचक्राचा स्वत:चा ताल, वेग सर्वांसाठीच हवाहवासा, आनंददायी ठरतो आहे. निसर्ग प्रसन्न आहे, त्यामुळे माणसेच नव्हे, तर मनुष्येतर प्राणीही अतिशय समाधानी आहेत. माणसांनी त्याना अभयारण्यांऐवजी अभयच देऊ केल्यामुळे मानवाचा अधिकार त्यानीही मनापासून स्विकारलाय आणि स्वत:च्या अरण्यकक्षेत ते आनंदाने जगतायत. माणसांचं नागरी जीवन त्यामुळे भयमुक्त आणि श्वासोच्छवासासारखं सहजसुंदर आहे. पृथ्वीच्या अंगाखांद्यावरचं जनसंख्येचं अतिरिक्त ओझं आता कमी झालंय. त्यामुळे पृथ्वीसुध्दा निरोगी आणि नीतिमान माणसांचं आस्तित्व अलंकारांसारखं मिरवतेय. . . !

या जगात प्रत्येकजण सुखी आहे आणि समाधानीही. . !

प्रत्येकाला स्वत:च्या कुटुंबाचं असं घर आहे. ते एकमजलीच आहे. घरापुढे प्रशस्त अंगण आहे आणि फुललेली हसरी बागही. त्या बागेतल्या गोड,  रसाळ फळांसारखाच प्रत्येकाचा संसार आहे.

रस्तेआहेत आणि ते स्वच्छ, चकचकीत आहेत. पादचार्यांसाठी खास अभयरस्ते आहेत. वाहनांसाठी अर्थातच वहातुकीचे वेगळे रस्ते. त्यामुळे रस्त्यातून चालणं आणि वहान चालवणंही आनंददायी आणि निश्चिंत आहे.

एकमजली बैठ्या घरांमुळे सूर्यही प्रसन्न आहे. त्याच्या आनंदप्रकाशी किरणांतून पसरणार्या प्रकाशाची कोणत्याही अडसरावीना आता मुक्त उधळण होऊ शकतेय. त्यामुळे या वातावरणात भरुन राहिलेल्या सौरशक्तीवरच सर्व वाहने चालतायत. त्यामुळे संपूर्ण निसर्गच प्रदूषण, धुराचा वास, आणि सहवास यापासून पूर्णपणे मुक्त आहे. शाळा आहेतच, त्याना प्रशस्त पटांगणेही आहेत. घरांसारख्या शाळाही नैसर्गिक संस्कारकेंद्रे आहेत. मुलं फुलांसारखी सुंदर आहेत. त्याना शाळा घरांइतक्याच प्रिय आहेत. . !

कौटुंबिक पार्श्वभूमीवर श्रमविभागणी आहे. नेमून दिलेली सर्व कामे प्रत्येकालाच आळीपाळीने करावी लागतात. तिथे स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी याऐवजी प्रत्येकाचा एक व्यक्ती म्हणूनच विचार होत असल्याने सर्वानाच सर्वप्रकारच्या कामांचं कौशल्य अंगी बाणवणं शक्य होतं. या जगात वृध्दांचं वार्धक्य तरुणांच्या निगराणीखाली कृतार्थ आहे. . !इथे मरणही आहेच, आणि ते  जगण्याइतकंच सुंदरही आहे. कारण ते भयमुक्त आहे. निसर्गनियमांनुसार योग्यवेळी येणारा हा मृत्यू अट्टाहासाने कांहीही करून जगण्याचा हव्यास नसल्याने कृतार्थही आहे. आणि म्हणूनच पुन्हा सळसळत्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी टाकल्या जाणार्या कातीसारखि तो सहजसुंदर आहे.

हे स्वप्नवत वाटेल सगळं, पण हे वास्तवात उतरणं अशक्य नसणारं स्वप्न आहे. मात्र सर्व स्तरांवर फोफावलेल्या हव्यासांची बांडगुऴं हाच यातला एकमेव अडसर आहे. . !त्या बांडगुळाचा नाश करायचा की फक्त जिवंत रहाण्यासाठी घुसमटत जगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता आलं,  तरच स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा पुसली जाईल. . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print