मराठी साहित्य – विविधा ☆ माझी रेसिपी मला परत…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ माझी रेसिपी मला परत… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

रविवारची ‘टवाळखोरी’ ?

माझी रेसीपी मलाच फाॅर्वर्ड झालीय..

मंडळी नमस्कार ?

तुमच्या पैकी अनेकांनी वरचे वाक्य असलेली जहिरात पाहिली असेल.

आपण  लिहून पाठवलेली एक रेसिपी व्हायरल होऊन परत आपल्याला कडे येते, हे जिला सर्वप्रथम ही रेसिपी पाठवली तिला सांगताना काकूंना होणारा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय.

असा अनुभव आज अगदी कुणालाही येऊ शकतो. सध्याच्या ‘सोशल युगात’ तत्पर फिडबॅक मिळण्याचा एक नवीन प्रकार आहे हा असं मला वाटते.

आज एखादी नवीन माहिती,  नविन विचार, विनोद, मिम्स,राजकीय विश्लेषण, संदर्भ, कला, लेख, एखादे गाणे  सोशल मिडीयावर शेअर केले जाते. त्यातील आवडलेली माहिती/ पोस्ट  पुढे ढकलली जाते ( कधी मुळ कर्त्याचे नाव ठेऊन/ काढून/बदलून).  आणि अशाप्रकारे आपण त्या पोस्ट कर्त्याचे एक प्रकारे कौतुकच करतो.

पूर्वी लेखन हे प्रामुख्याने पुस्तक/ कादंबरी रुपात वाचायला मिळायचे. वाचनालय ही हक्काची ठिकाणे असायची. दिवाळी अंक/ पाक्षिक / मासिक यातून ही अनेक लेखक भेटायचे. त्यानंतर अनेकजण  रविवारच्या वृत्तपत्र  पुरवण्यातून भेटावयास येऊ लागले. इंटरनेट माध्यमातून मात्र लेखक/ वाचक यांच्यातील अंतर कमी झाले. प्रत्यक्ष भेटून अभिप्राय देता नाही आला तरी विविध संकेतस्थळे, त्यांचे ब्लाॅग, यूट्यूब चँनेल्स आणि आता व्हाटसप/फेसबुक पेज इ माध्यमातून हे सगळे कलाकार प्रत्येकाच्या अगदी खूप जवळ आलेत. त्यांना प्रतिक्रिया देणे ही सोपे झाले आहे.

याच माध्यमामुळे अनेक वेगवेगळे लेखक/ कलाकारांची माहिती झाली. छापील माध्यमातून पेक्षा  आँनलाईन लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली, अनेकजण प्रसिद्ध झाले.  आणि जेंव्हा अशी त्यांची निर्मिती / रेसिपी  जेंव्हा त्यांची त्यांनाच परत फॅर्वर्ड होऊन परत येऊ लागली ती त्यांच्या त्या लेखनाची यशाची पावतीच म्हणावी लागेल.

माणूस जसं प्रारब्ध घेऊन येतो तसे काही लेख/ कथा / विनोद/ मीम्स / कलाकृती या ही प्रारब्ध घेऊन येतात. कुणाच्या नशिबात केंव्हा ‘व्हायरल’ व्हायचा योग येईल हे त्या कर्त्याला ही सांगता येणार नाही.

माझ्या सुदैवाने गेल्या १०-१२ वर्षात काही लेख याबाबतीत सुदैवी ठरले मग तो ‘भाईं’ वरचा लेख असेल किंवा संकष्टीच्या आधी ‘ साबुदाणा भिजवण्याचा ‘ निरोप असेल किंवा मग ‘ शेपटीवाल्या प्राण्यांचे ‘ विडंबन गीत असेल.

अगदी त्या काकूंना झालेला आनंद प्रत्यक्ष अनुभवलाय. मीच नाही तर अगदी अनेकांनी.

तेंव्हा ‘रेसिपी’ बनवत रहा.

मंडळी थोडंसं तत्वज्ञान सांगून माझी टवाळखोरी थांबवतोय.

” माझी रेसीपी म्हणजे माझे कर्म ( नेहमी)  मलाच फाॅर्वर्ड होत असते ”

समझनेवालों को….

 

©  श्री अमोल अनंत केळकर

०६/१२/२०२०

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

सुरेल आवाजाची निसर्गदत्त देणगी असलेल्या सुमन कल्याणपुर यांचे ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी ‘हे गाणं माझं अगदी फेवरेट! ते ऐकताना गाण्यातला एक विषण्ण भाव त्या नाजूक सुरातून माझ्या मनात डोकावला. अर्थातच माझं मन माझ्याशी हितगूज करायला लागलं. या गाण्यातील शब्दांना म्हणजे त्या बकुळीच्या नाजूक फुलांना कुठे साठवू कसे जपू असं झालं मला……

कुठेतरी असही वाटलं की या शब्दांची सुंदर लेणी तयार झाली तर ती डोळ्यात साठवता येतील. या शब्द रुपी कमळाच्या भावविश्वात माझ्या मनाचा भुंगा रुंजी घालू लागला आणि मकरंद चाखू लागला. माझं शब्दांवर प्रेम जडलं. मी शब्द वेचू लागले.

शब्दांचे बुडबुडे माझ्या भावविश्वात तरंगायला लागले आणि माझ्या विचाराच्या लोलकातून परावर्तित होऊन माझ्याच कोऱ्या मनावर एक इंद्रधनुष्य उमटलं अर्थातच माझा मन मोर पिसारा फुलवून नाचू लागला

अडीच अध्याक्षरा पासून तयार झालेला हा शब्द! याचं वर्णन शब्दातीत आहे!! शब्द शब्द जोडून त्याचे वाक्य, वाक्यांच्या सरी गुंफून लेख, अनेक लेख एकत्र येऊन ग्रंथ, ग्रंथांच्या भांडारामुळे ज्ञान आणि ज्ञान हाच आपला खरा श्वास! श्वास हेच जीवन ,जीवन हेच अस्तित्व आणि अस्तित्व हाच सन्मान म्हणून शब्दाचा सन्मान केलाच पाहिजे.

संत तुकाराम महाराजांचा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हा भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग शब्दरूप रत्नांचा सन्मान करतो.

शब्दाचा ध्वनी कानात शिरला की भावविश्वात भावतरंग निर्माण होतात आणि मन डोलायला लागतं. सुंदर शब्द पेरलेली गाणी हे त्याचे जिवंत उदाहरण….

शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना

आवरू किती गडे मी या लोचना

शब्द सौंदर्यानेच तर अशा कविता सजतात आणि पदन्यास घालतात.

शब्द हे एक प्रकारचं रसना चाळवणारं भोजन आहे .ते कसं वाढायचं हे सुगरणीच्या हातात असतं. जेवणात खडा आला की कसं अन्नावरची वासना जाते ना तसंच काहीसं संवादात काटेरी शब्द मन दुखावतात. गोड जेवण जसे मन तृप्त करते तसेच चार गोड शब्द हे खारीच्या पाठीवरून प्रेमाने फिरवलेल्या हाताच्या बोटा सारखे हळुवार असतात.

शब्दांना एक गंध असतो सुवासिक फुलांसारखा !लेखकाच्या लेखणीतून श्वासागणिक एकेक शब्द कागदावर उतरतो जसा काही फुलांचा सडा… वेगवेगळ्या रंगरूपात त्यांचं साहित्य फुलतं अगदी सुरेख सुवासिक फुलांसारखं आणि आपलं मन त्यांच्या भोवती रुंजी घालत.

शब्द इतिहास घडवतो.पेशवाईत आनंदीबाईनी ध चा मा केला हे सर्वश्रुतच आहे.’ लक्ष्मण रेषा’ या शब्दाने रामायण घडले. गैरसमजाच्या साथीचा रोग या शब्दांनीच पसरवलाय असे म्हणावे लागेल. राजकारणातही रोज एक नवीन गैरसमज ही शब्दांचीच खेळी करते आहे.घडलयं बिघडलयं हे आवर्तन सतत शब्द घडवतात.

मुद्राराक्षसाचे विनोद शब्दांच्या फेरफारीने घडतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांना असे छापायचे होते की, मंत्री महोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढ झोपले होते परंतु मुद्राराक्षसामुळे झालेला विनोद असा की मंत्रिमहोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढव झोपले होते. दोन शब्दात आलेल्या व या शब्दाने अर्थाचा अनर्थ केला.

शब्दांच्या काना मात्रा यामधील मधील फरकामुळे मारू चे मरू असे होते आणि वाक्याचे अर्थ बदलतात शिर आणि शीर या शब्दांचेही असेच…… दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये एक शब्द आला तरी अर्थ बदलतो उदाहरणार्थ.. बायको आणि प्रियकर या दोन शब्दांमध्ये चा हा शब्द आला तर बायकोचा प्रियकर असा अनर्थ ओढवतो.

एकाच अर्थाचे दोन शब्द एकमेकांशेजारी आल्यासही गम्मत घडते .हाडांचा अस्थिपिंजरा, पिवळ पितांबर, काळी चंद्रकळा वगैरे वगैरे

शब्दालाही पाण्यासारखा रंग आहे तो ज्या प्रकारच्या लेखनामध्ये वावरतो त्या प्रकारचं सौंदर्य त्याला मिळतं .पाण्या तुझा रंग कसा असा प्रश्न जसा आपण पाण्याला विचारतो तसेच शब्दाला विचारला तरी त्याचे हेच उत्तर मिळेल.

शब्द जादूगार आहेत म्हणूनच अनाकलनीय असे साहित्य, गाणी जन्माला येतात. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले या ओळीत अभिप्रेत असलेल्या शब्दांच्या पलीकडे हे शब्द घेऊन जातात. आणि मौनाचे भाषांतर होते.

शब्दाने शब्द वाढतो. त्याचे पर्यावसान गैरसमज आणि भांडण्यात होते. मनं दुखावली जातात पण गंमत अशी आहे की पुन:मैत्रीचे आव्हानही शब्द स्वीकारतात अशा वेळी शब्द एखाद्या कुलुपाच्या किल्ली सारखे काम करतात किल्ली सुलटी फिरवून मनं मोकळी करतात आणि किल्ली उलटी फिरवून गप, चूप, कट, पुरे असे शब्द तोंड बंद ही करतात. प्रेमळ शब्दांचे दोन थेंब कलह रुपी पोलिओ नष्ट करतात.

अहंकार, अबोला ही शब्दवस्त्रे उतरवून आपुलकी, आनंद ही शब्द वस्त्रे ल्याली तर परमानंद होतो तो निराळाच!

शब्दाचा शोध घेतला तर अनेक अर्थ निघतात.शब्द झेलणे, शब्द जोडणे, शब्दाबाहेर नसणे, शब्द पडू न देणे ,शब्द देणे, शब्दाचं पक्कं असणे ,शब्दाचा बाण ,शब्द संस्कार या आणि अशा अनेक वाक्प्रयोगातून ते शोधता येतात.

शब्दांच्या मोत्यांचा सर संवादाचा हार बनतो. त्या हाराचे पावित्र्य पुन्हा शब्दांचा सन्मान करतात.

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

शब्द जुळवुनी घट्ट करू नात्यांच्या गाठी

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आज सकाळी सकाळी शिल्पाचा फोन आला. “काकू, ई अभिव्यक्ति वरचे माझे लिखाण वाचून एका आजींचा फोन आला होता. त्यांच्या आवाजावरून, बोलण्याच्या स्टाईल वरून आजी वाटल्या मला त्या. माझ्या लिखाणाचे कौतुक केले त्यांनी. आवडले म्हणाल्या.”

“अरे वा! छानच आहे मग. अभिनंदन, तुझा लढा पटतोय ना खूप जणांना”. मी म्हणाले.

“पण फोन ठेवताना मला आशिर्वाद देत म्हणाल्या, ” असेच सांगत जा आम्हाला. खूप मोठी हो. सौभाग्यवती हो!”. शिल्पा म्हणाली.

“चांगले आहे ना. छान आशीर्वाद मिळाला. उत्साह वाढेल तुझा.”

“काकू,!लग्न झालेल्यांना भाग्यवती म्हणतात ना आपल्याकडे. मग मी कशी काय?” जरा पडेल आवाजात शिल्पा म्हणाली.

“अगं, तसंच काही नाही. ती एक प्रथा आहे. तुला त्या आजी तसं म्हणाल्या कारण ई  अभिव्यक्तिवर व्यक्त होण्याचे भाग्य तुला लाभलेआहेच. ते सौ पटीने वाढू दे, असा आशीर्वाद दिला त्यांनी तुला. शिल्पा, खरे सौभाग्य म्हणजे ज्याला जे येतं, आवडतं ते करायला मिळणं म्हणजे खरं भाग्य! आणखी एक सांगते, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी माता आहेत, ज्यांनी आपल्या एकटीच्या बळावर मुलांना मोठं केलं. सुसंस्कारित केलं. चांगले शिकून आपल्या पायावर उभं केलं.त्या सगळ्या माऊली सौभाग्यवती!सौभाग्यवती हे आदराने मान झुक विण्यासाठी म्हटलं जातं .तो एक मान आहे असं समज .त्या आजींनी एक प्रकारे तुझा गौरवच केलाय. तुझ्या साहित्याला केलेला मुजराच आहे. तुझ्या ज्ञानाचा,लिखाणाचा गौरवच आहे.”

खरोखर शिल्पा, अशा ग्रुपमध्ये तुझे विचार मांडायला मिळत आहेत हे खरंच तुझं भाग्य आहे. माझ्याही सदिच्छा सतत तुझ्या बरोबर आहेत. शिल्पा, तू सौभाग्यवती आहेसच. अशीच खूप खूप मोठी हो!तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांना दिपवून टाक.काव्य गंधाने सर्वांना मुग्ध कर. तुला तुझ्या मनातले विचार व्यक्त मिळोत. तुझे घुंगरा चे पदन्यास पहायला सर्वांना ते भाग्य लाभो. तुझ्या वक्तृत्वाची धार सर्वांना ऐकायला मिळो आणि तुझे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “जयोस्तुते” पहाण्याचे महद भाग्य सर्व वाचकांना, श्रोत्यांना आणि ईअभिव्यक्तीच्या संयोजकांना लाभो. खास या सर्वांसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित करू.कोरोना चे संकट, सावट दूर झाले  की खरंच आपण “शिल्पोत्सव” साजरा करू.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लाखेचे उपयोग एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की थक्क व्हायला होतं. हैद्राबादच्या प्रसिद्ध लाखेच्या बांगड्या या समस्त स्त्री वर्गाच्या आकर्षणाचा विषय आहेत. याच बरोबर दागिने, पेन, खेळणी बनवण्याकरता लाख वापरतात.

परंतु, लाखेचा उपयोग मुख्यत्वे सील करण्यासाठी होतो. मोठं मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सीलबंद करुन परीक्षाकेंद्रांवर पाठवल्या जातात. सरकारी कागदपत्रं, तिजोर्‍या या ही सीलबंद केलेल्या असतात. सरकारी लखोट्यांवर जो लाल शेंदरी रंगाचा मोठा ठिपक्या सारखा आकार दिसतो, तो दुसरं तिसरं काही नसून लाखच असते.

लाख विद्युत निरोधक म्हणूनही वापरतात.

मुद्रणाची शाई तयार करण्यासाठी लाखेचा उपयोग होतो.

लाकडाचं पॉलिश, व्हार्निश करण्यासाठी लाख उपयोगी आहे.

चामडे आणि जोडे यांच्यावरील  संस्करण लाखेनं केलं जाते.

लाकूड, धातू, आणि अन्य पृष्ठभागावरील नक्षीकाम  करण्यासाठी हिचा वापर तर सर्वपरिचित आहे.

इ.स.१९५० पर्यंत शेलॅकचा वापर ग्रामोफोनच्या तबकड्या बनवण्याकरता होत असे.

पातळ व टिकाऊ थर बनू शकेल अशी  जलीय व्हार्निशे तयार करण्यासाठी लाख वापरली जाते.

फर्निचर, वाद्यं, क्रिडासाहित्य आणि खेळणी यांच्या पृष्ठभागावर लावण्यासाठी तसेच धातूच्या आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील चिरा आणि फटी बुजवण्यासाठी स्पिरिट व्हार्निशांचा उपयोग करतात.

कागद आणि धातूंची भांडी, पोटात घ्यायच्या औषधी गोळ्या यांच्यावर थर देण्यासाठी देखील स्पिरीट व्हार्निश वापरतात.

मानवशास्त्रीय तसेच प्राणीवैज्ञानिक नमुने यांना संरक्षक लेप देण्यासाठीही स्पिरीट व्हार्निश वापरलं जातं.

रबरी कापड, मेण कापड इतकच नाही तर आपल्या घरातील फ्लोअर आकर्षक करण्यासाठी अंथरले जाणारं लिनोनियम यांच्या अंत्यरुपणासाठी स्पिरीट व्हार्निशच वापरतात.

डोक्यावर ठेवण्यात येणारी साहेबी थाटाची हॅट कडक बनवणं, मातीच्या भांड्यांना ती

भाजण्यापूर्वी लेप देणं यासाठी लाखच लागते .

रुपांतरीत शेलॅकवर आधारित, चांगली लवचिकता आणि रसायनांना प्रतिरोधक असलेले पॉलियुरेथिन लेपही विकसित करण्यांत आले आहेत.

तुमच्या घरातील शिशवी पलंगाचे पाय, आजोबांची काठी, दिव्यांचे स्टॅंड लाखेच्या करामती  मुळेच आकर्षक बनतात.

सील तयार करण्यासाठी राळ, केओलिन, रंगद्रव्य इत्यादींचे शेलॅक( झाडांच्या फांद्यांवरील लाख गोळा करून धुतल्या नंतर मिळणाऱ्या लाखेला शेलॅक म्हणतात.) बरोबर  मिश्रण  करतात.

उच्च विद्युत रोध, उच्च विद्युत दाबाचे विसर्जन झाल्यास संवाहक मार्गाचे प्रसारण होणे, इतर पदार्थांना चिकटणे या गुणधर्मांमुळे शेलॅकचे विद्युत उद्योगात अनेक  उपयोग आहेत.

विद्युत निरोधक, लाइटचे स्वीचेस, त्यांचे फलक, मुठी, विद्युत ठिणगी संरक्षक आवरणे ही यादी मारुतीच्या शेपटी सारखीच लांबलचक आहे.

रेडिओतील निर्वात नलिका, विद्युत दिव्यांच्या टोप्या यासाठी सुद्धा लाखच लाखमोलाची.

याशिवाय  धातू आणि  काच परस्परांना चिकटवण्यास बंधक द्रव्य म्हणून  लाखेचीच बात.

भारतात  सोन्या चांदीच्या  पोकळ दागिने भरण्यासाठी, बांगड्या बनवण्याकरता लाखच भरली जाते आणि तो  दागिना शब्दशः  लाखमोलाचा  बनतो.

आयुर्वेद म्हणजे  सध्या  लोकमान्यता  मिळालेले देशी वैद्यक शास्त्रात काडी लाख  पोटात घेण्याचं  औषध  म्हणून  देतात.

आहे  ना लाख मोलाची गोष्ट ! पण बरं का, समस्त  भारतीयांसाठी ही लाख केवळ लाख मोलाची नाही तर;  अत्यंत  अभिमानाची लाखातील बात अशी  की ;  या बहुउपयोगी लाखेचे जगाच्या  ऐंशी टक्के  उत्पादन  आपल्या  भारतात  होते . त्यामुळं  भारताला परदेशी  चलन मिळते. काय, झाली ना मान ताठ? मग करा बरं प्रतिज्ञा  भारतातील वनसंपदा टिकवण्याची, वृद्धिंगत  करण्याची!!

जय हिंद!!

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र (भाग ३) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

लाखेच्या अळीची कोष्ठावरणात वाढ होतच असते. कोष्ठावरण म्हणजे लाखेच्या अळीने स्वत:चा स्त्राव स्त्रवून स्वत: भोवती तयार केलेलं आवरण. ती मोठी  होईल  तसतसे कोष्ठाचे आकारमान वाढत जाते. प्रौढ दशा येईपर्यंत  अळी तीन वेळा  कात टाकते. अळी अवस्थेतील या तीन अवस्थांचा  काळ हा तापमान, आद्रता तसेच आश्रयी वनस्पती यांवर  अवलंबून  असतो. या काळात  किड्याचे लिंगही ओळखता  येते. हा लिंगभेद  पहिली कात टाकल्यावर  जास्त  ठळकपणे  दिसतो.

नर अळीचा लाक्षाकोष्ठ सपाता किंवा  खडावा  सारखा  असतो. दुसर्‍यांदा  कात  टाकल्यावर  लगेचच  मागच्या टोकाला  झाकणासारखी वाढ दिसू  लागते. यामुळे मागील टोक चादरीसारख्या आच्छादनाने झाकले जाते. पहिली कात टाकण्यापूर्वीची अवस्था  म्हणजे  पूर्व कोशावस्था आणि  दुसरी  कात  टाकण्यापूर्वीची अवस्था  म्हणजे  कोशावस्था.या अवस्थांमध्ये अळी काही  खात  नाही. कोशावस्था पूर्ण  झाल्यावर पंखहीन अथवा सपंख नर बाहेर  पडतात. मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला  रेटून  त्या बाहेर  येतात. यात पंखहीन नर संख्येने जास्त  असतात. नर लाख किड्याचे आयुष्य  केवळ  बासष्ट ते ब्याण्णव  तासच असते.

मादी  डिंभ फुगीर ; नासपतीच्या फळासारखा किंवा  गोल पिशवी  सारख्या  आकाराचा असतो. तिसर्‍यांदा  कात टाकल्यावर  मादी  लैंगिकदृष्ट्या प्रौढ  बनते. अशा मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला सारून बाहेर  पडलेल्या  मादीचा नराशी संयोग होतो.यासाठी  नर लाख  किडा  मादी  लाख  किड्याच्या कोष्ठात  शिरतो  आणि  मादीच्या  शरीरात  शुक्राणू सोडतो. मात्र  लाख स्त्रवण्याची क्रिया मादी  अजूनही  चालूच  ठेवते. किड्याच्या आकारमानाबरोबरच लाक्षाकोष्ठही झपाट्यानं  वाढत जातो. मादीचा लाक्षाकोष्ठ नराच्या  लाक्षाकोष्ठापेक्षा अनेक  पटींनी  मोठा  असतो. अंडी  घालून  होईपर्यंत  मादी  लाख स्त्रवत असते. अफलित मादीसुध्दा फलित मादी सारखीच  लाख स्त्रवते तसेच  जननक्षम  प्रजा  देखील  निर्माण  करु शकते.

अंडी  अजून  मादीच्या  अंडाशयात  असतानाच  त्यांची  वाढ होऊ लागते. ही अंडी मादी लाक्षाकोष्ठातील विशिष्ट  कप्प्यांत घातली  जातात. या कप्प्यांमध्येच अंडी  ऊबवली जातात. अंडी  ऊबवल्यानंतर अंड्यातून  अळी  बाहेर  पडते. याच अळीला डिंभ म्हणूनही  ओळखतात. डिंभ झाडाच्या  कोवळ्या  फांद्याकडं कूच करतात.तिथं  आपली  सोंड  आत खुपसून  स्थिरावतात  आणि  पुढील  जीवनचक्र  सुरु राहते.

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर 

आज ठरवलच आहे मी स्वतंत्र होणार! किती दिवस हे सगळे सहन करु? पण मी स्वतंत्र झाले तर माझे हे दोन बछडे राहतील माझ्याशिवाय? पण बाबा आहेच की त्यांची काळजी घ्यायला. त्यालाही कळू दे आपली जबाबदारी! इतके दिवस मीच सांभाळत आलीय सगळे. घर- दार- सासू- सासरे- पै पाहुणे मीच ओढत होते रामरगाडा! त्याची किंमत तर नाहीच, पण आपल्याला घरच्या कामवाल्या बाईपेक्षाही कमी किंमत दिली जातीय! व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य या सगळ्या बेगडी कल्पना आहेत. लग्नापूर्वी याच कल्पना किती पोटतिडकीने मांडत मी अनेक वक्तृत्व- वादविवाद स्पर्धा गाजवल्या. तीच मी आज माझ्याच स्वातंत्र्यासाठी झगडतेय.पण आज ठरवलंय मुक्त व्हायचे ! तुटतंय जरा पोटात पिल्लांचा विचार करुन! पण शिकतील तीही कधीतरी स्वतंत्रपणे जगायला! मी मात्र पक्क ठरवलंय आज स्वतंत्र, मुक्त व्हायचे या पाशातून …….

आशिष

जमणार आहे का मला तो NEET चा अभ्यास करणे? नाही आवडत मला तो biology विषय! समोर घेतलाच की झोप यायला लागते. पण तो सोडून मला नाही चालणार! आमचे पूर्ण घराणे डॉक्टरांचे! मग परंपरा कशी मोडायची? मला मेडिकललाच जावे लागणार असे पप्पांनी निक्षून सांगितले आहे. मम्मीचा पण तोच आग्रह आहे. ती बिचारी तर हॉस्पिटलमध्ये काम करुन दमून येते, पण माझ्यासाठी पुन्हा रात्री जागते.अरे यार! पण नाही मला हा अभ्यास करायला आवडत! त्यापेक्षा मला माझ्या आवडीचे व्हायोलिन का नाही शिकून देत? पण आता मात्र ठरवलंय मी की या सर्वांतून मुक्त होणार!मम्मी-पप्पांना वाईट वाटेल खूप! पण मला नाही पूर्ण करता येणार त्यांच्या अपेक्षा!म्हणूनच मी स्वतंत्र व्हायचे ठरवलंय! मी घरातूनच अशा ठिकाणी निघून जाईन की नाहीच शोधू शकणार कोणी मला! मी मुक्त होणार…. मी स्वतंत्र होणार …..

नाना- नानी

काय मिळवलं आम्ही मुलाला एवढे उच्च शिक्षण देऊन? परिस्थिती नसतानाही पै पै जमवून याला अमेरिकेला पाठवले. वाटले होते की म्हातारपणी तरी सुखात, आरामात आयुष्य जगता येईल. पण पोटच्या पोरालाच आम्ही जड झालो, तिथे दुसऱ्या घरातून आलेली ती मुलगी का आम्हाला प्रेम देईल? या वृद्धाश्रमाच्या चार भिंतीत फार कोंडल्यासारखं वाटते. आम्हाला स्वतंत्र व्हायचंय, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगायला आवडेल आम्हाला! मिळवू शकू का आम्ही ते स्वातंत्र्य?

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!

त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात आतल्या कोपऱ्यात तीन बातम्या होत्या….

* शहरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेची गळफास लावून आत्महत्या!

* शहरातील एका प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक दाम्पत्याच्या १२वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरी हाताची नस कापून घेऊन आत्महत्या!

*शहरातील एका वृद्धाश्रमातील दाम्पत्याची विष खाऊन आत्महत्या !

मिताली, आशिष आणि नाना-नानी स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वतंत्र झाले होते.त्यांना हवे होते ते स्वातंत्र्य त्यांनी मिळवले?

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेच्या किड्याची  शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेच्या किड्याची  शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आजच्या भागात जाणून  घेऊया  लाखेच्या  किड्याची शरीर रचना.  लाखेच्या  किड्यात नरकिडा आणि मादी किडा अशी दोन लिंगे असतात.  नर  आणि   मादी  लाख किड्यांच्या  बाह्य  शरीर  रचनेत,  आकारमानात  आणि  काही  अवयवांमध्ये फरक असतो.  नर लाख किडा  हा आकारान मोठा आणि  लाल रंगाचा  असतो.  शरीराचे  डोके, वक्ष आणि  उदर असे  भाग  होतात.  डोक्याला स्पर्शिकांची (जशा झुरळाला असतात.) एक  जोडी  आणि  डोळ्यांची एक  जोडी  असते.  या किड्याला मुखांगे (हे असे अवयव असतात जे अन्न ग्रहण करण्यास आवश्यक असतात.) नसतात. त्यामुळं  हा नर लाख किडा  खाऊ  शकत नाही. वक्षाच्या खालील  बाजूस तीन पायांच्या  जोड्या  असतात.  पंख असतातच  असं  नाही.  उदर हा शरीराचा  सर्वात  मोठा  भाग  असतो.   उदराच्या पश्च  टोकाला पुरुषांचे जननेंद्रिय असते.  आता जाणून घेऊया मादी लाख किडा कोणती  वैशिष्टे  दाखवितो. मादी  शरीराने लहान असते.  तिच्याही डोक्याला  स्पर्शिकांची एक  जोडी  असते.  तशीच  एक  सोंडही असते.  मादी लाख किड्याला डोळे  नसतात. मादी लाख किड्याला पंख  आणि  पायही नसतात. यामागचं  कारण ही तसंच  मजेशीर  आहे.  मादी अळी एकदा  एका  जागी स्थिर  झाली  की मुळी सुद्धा हलत नाही. वापर न झाल्यामुळं तिचे पाय आणि  पंख दोन्ही  नष्ट  होतात.  युज अँड डिसयुज हे उत्क्रांतितत्त्व  इथं  सिद्ध  झालेलं  दिसतं. या मादी लाख किड्यापासून आपल्याला लाखेचं उत्पादन  मिळते.

आता  आपण  लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र  कसे असते  हे बघू.  या किड्याच्या जीवनचक्रात अनेक अवस्था  दिसून  येतात. जसं १ डिंभ, २ नर लाक्षाकोष्ठ, ३ मादी  लाक्षाकोष्ठ, ४.पंखहीन प्रौढ नर, ५. पंखयुक्त प्रौढ नर, ६. प्रौढ  मादी, ७. पक्व मादी  लाक्षाकोष्ठ आणि  ८. झाडाच्या  फांद्या वरील  लाखेचा थर.

सूक्ष्म, नावेसारख्या आकाराच्या  लाल रंगाच्या  डिंभापासून या किड्याच्या  जीवनचक्रास सुरुवात  होते.  डिंभाची लांबी शून्य  पॉइंट  पाच मिमी. आणि  रुंदी शून्य  पॉइंट  पंचवीस मिमी. असते.  एक  निकोप  मादी  तीनशे  ते एक हजार डिंभांना जन्म  देते.  डिंभ ही स्वतंत्रपणे  अन्न  मिळवून जगणारी  अवस्था  असं  म्हणता  येईल.  डिंभाचं प्रौढ किड्याशी साम्य  नसते.  (सोयीसाठी इथून पुढे डिंभाचा उल्लेख अळी असा केला आहे)ज्या झाडांवर   या अळ्या वाढतात त्या; म्हणजेच आश्रयी वृक्षांच्या रसाळ, कोवळ्या डहाळ्यांवर त्या  स्थिरावतातही.  आपली सोंड सालीत खुपसून अन्नरस शोषून  घेतात. त्या दाट रेझीनयुक्त द्रव स्त्रवतात. त्या स्त्रावाने त्यांचे  शरीर  आच्छादले जाते.  हा स्त्राव अळ्यांच्या उपत्वचेखाली असणार्‍या ग्रंथींमधून  स्त्रवला जातो. फक्त मुख, दोन  श्वासरंध्रे, आणि  गुदद्वार या भागांवर लाख स्त्रवणार्‍या ग्रंथी नसतात.  अळी अशारितीने  स्वत:च्या स्त्रावाने बनलेल्या कोष्ठाच्या आवरणामध्ये बंदिस्त  होते.  काही  काळानं  सर्व  अळ्यांचा स्त्राव एकरुप होतो. त्यामुळं  डहाळीवर एक  टणक  अखंड  थर तयार  होतो. (त्याच किड्यांचं  जीवनचक्र  पूर्ण  झाल्यावर  आणि  पुढच्या  पिढीतील डिंभ बाहेर  पडण्यास सुरुवात  होण्याच्या  वेळेला  डहाळ्या  कापून  घेतात, वाळवितात  आणि  लाख मिळवण्याची प्रक्रिया  करतात.)

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

वाचणे’ हे दोन अर्थ असणारे क्रियापद.एक एखाद्या संकटापासून,अरिष्टापासून सुटका होणे आणि दुसरा लिखित वाङमय,पुस्तके,संहिता यांचे वाचन करणे.वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘वाचाल तर वाचाल ‘ ही टॅग लाईन ‘वाचणे’या क्रियापदाचे दोन्ही अर्थ सामावून घेत वाचन संस्कृती लयाला जात असताना तिला वाचवू पहातेय. वाचनाचे महत्त्व पटवून देण्यापेक्षाही न वाचाल,तर तुम्ही निर्माण होणाऱ्या संकटांपासून वाचूच शकणार नाही याचा पोटतिकडीने इशारा देते.

वाचनाची आवड जाणिवपूर्वक जोपासणारे त्याचं महत्त्व तर जाणतातच,आणि वाचनातून आनंदही मिळवतात. किंबहुना वाचनाची आवड असणारे आहेत म्हणूनच लिहणारे लिहिते राहू शकतात.

वाचनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी वाचनाकडे पहायचा दृष्टीकोन मात्र निकोप हवा.वाचन हे वेळ घालवायचे साथन नसावे. त्यापासून मिळणारे ज्ञान आत्मसात  करण्याची दृष्टी महत्त्वाची.वाचन फक्त ज्ञानच देत नाही तर जगावे कसे हेही शिकवते.वाचनाची आवड नसणार्ऱ्यांचं जगणं या संस्कारांअभावी झापडबंद होत जातं.माणसांची मनं वाचण्याची कला वाचनाने समृध्द केलेल्या मनाला नकळतच अवगत होत असते.त्यामुळे माणसांना समजून घेणे,स्विकारणे सहजसुलभ घडत जाते.जगाकडे आणि जगण्याकडे पहाण्याचा निकोप दृष्टीकोन सकस वाचनानेच प्राप्त होत असतो.लेखनप्रतिभेची देन लाभलेल्या भाग्यवंतांनीही आपल्या लेखनाचा कस टिकवून ठेवण्यासाठी विविध विषयांवरील इतरांचे लेखन आवर्जून वाचायला हवे.तरच त्यांच्या लेखनातले वैविध्य न् ताजेपण टिकून राहील.

लेखकाला त्याचं अनुभव विश्व लिहिण्यास प्रेरणा देत असतं,तसंच मनाला स्पर्शून  जाणारे लेखन वाचकालाही अनुभवसंपन्न करीत असते. लेखकाचं लेखन एक ‘न फुटणारा आरसा’च असतं. वाचणारा त्यात प्रतिबिंबित होणारं, एरवी दिसू न शकणारं स्वत:चं,स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब अंतर्दृष्टीने  पाहू शकतो.अर्थात त्यासाठी सजग दृष्टीने वाचनाची आवड लावून घेणे न् ती जोपासने हे  महत्त्वाचे असते !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आपल्या  आजूबाजूला  अनेक  सजीव  हालचाल  करताना  दिसतात . काही  डोळयांना  सहज दिसतात  तर काहींच निरीक्षण  सूक्ष्मदर्शक  वापरुन  करावं  लागतं . ऋतुप्रमाणं या जीवांच्या  संख्येत बदल होताना दिसतो. काही किटक कोणत्याही हवामानात तग धरून राहतात. काही किटक मात्र ठराविक हवामानातच जिवंत राहू शकतात.

सुरवंट या किटकाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरात रुपांतर होतं. मध चाखायला येणारी मधमाशी, रेशीम देणारे रेशमाचे किडे, शाई बनवण्याच्या कामात उपयोगी पडणारा लाखेचा किडा, परागीकरण करणारे किटक  असे माणसाला उपयोगी पडणारे किटक आहेत.

निसर्गानं माणसाला प्राणी आणि त्यांच्या पासून मिळणाऱ्या गोष्टींच्या रुपात एक अनमोल खजिना दिला आहे. प्राण्यांच्या विचित्र, विलक्षण आणि गुंतागुंतीच्या वर्तणुकीमुळं मानवाला त्यांच्या बद्दल नेहमीच एक औत्सुक्य वाटत आलं आहे. लाखेच्या किड्यानही मानवाचं कुतूहल असंच जागृत केलं.

लाखेचा वापर भारतात अगदी महाभारताच्या काळापासून होत आलेला दिसतो. कौरवांनी कुंतीसह पांडवांना जाळण्यासाठी लाखेचा महाल म्हणजेच लाक्षागृह बांधल्याची नोंद महाभारतात आढळते. अथर्ववेदातही लाखेचा उल्लेख आढळतो. यावरून पुरातन काळी हिंदूंना लाख आणि तिच्या उपयोगा विषयीची माहिती होती हे लक्षात येते.

इ.स. पू. बाराशेच्या सुमारास भारतात लाखेपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या जात असा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकातही व्यापाऱ्यांनी लाखेचं रंजकद्रव्य आणि शेलॅक (पत्रीच्या स्वरुपातील लाख ) ही उत्पादनं युरोपीय बाजारपेठेत नेली.

लाखेचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास मात्र बराच ऊशीरा सुरु झाल्याचे लक्षात येते. 1709 मध्ये फादर टाकार्ड यांनी लाखेच्या किड्याचा शोध लावला. 1782 मध्ये केर्र या शास्त्रज्ञानं प्रथम  कोकस लॅका असं नामकरण केलं. इतर  काही  शास्त्रज्ञांनी  ते मान्यही केलं . परंतु  नंतर  एकोणीसशे बावीस  मध्ये श्री . ग्रीन आणि  एकोणीसशे पंधरा मध्ये श्री. चॅटर्जी यांनी  या किड्याला टॅकार्डिया लॅका असं  नाव दिलं. फादर टाकार्डा यांच्या नावावरून टॅकार्डिया आणि  केर्र यांनी  दिलेल्या  नावावरून  लॅका. मंडळी, बघा बरं   “नावात काय नाही ?” नामकरणाची ही पध्दत मोठी  मजेशीर आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मानही झाला आणि  कोणीही  इतिहासाच्या पानावरुन पुसलं गेलं नाही.

लाख  किडा अनेक झाडांवर तसेच  झुडुपांवर आढळतो. किंबहुना या झाडांवर  परजिवी ( parasite ) म्हणून राहतो. म्हणजे या झाडांच्या खोडातील रस शोषून तो आपली उपजीविका करतो. जसं . . . कुसुम, पळस ,  बेर  ,बाबुळ ,खैर अरहर  इत्यादी .

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(रविवारची टुकारगिरी)

मंडळी नमस्कार

‘मी परत येईन’ नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा “सूत्रधार” तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे ‘सूत्रधार’ म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन – तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय ‘हमलोग’ मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार ‘सूत्रधार’ म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे ‘निवेदक’ हे ‘दिसणारे सूत्रधार’ . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी “सूत्र शिरोमणी” म्हणून पु.लं च्या ‘नारायणाचा’ आवर्जून उल्लेख करेन.

जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे ‘सूत्र’ संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ‘ सूत्रधाराला’ ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची “ब्रेकींग न्यूज” ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते – १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना ” सूत्रांचा” योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती ?

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, ‘सूत्र ‘ धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

( सूत्रधार) अमोल

१/१२/१९

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print