☆ विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
दिवाळी अंकांची न्यारी सफर
“टाटा टाटांच्या टाटानगरीत
किमया करती हजार हात
लोखंडाची बघा कोंबडी
घालितसे सोन्याची अंडी “
ही चारोळी आहे एका बालदिवाळी अंकातली. गळ्याशप्पथ !! अभिनव पध्दतीनं चारोळ्यांचा वापर मुळाक्षरांची ओळख लहान मुलांना करुन देण्यासाठी मराठी दिवाळी अंकात केला गेला. आहे ना मजेशीर माहिती ! आनंद,छावा,छात्रप्रबोधन अशा अंकांनी बालविश्व समृद्ध केलं दिवाळी आली की माझं मन पुस्तकांच्या दुनियेत जातं. दिवाळी अंकांच्या सफरीवर जातं
माझ्यातला वाचक, चातकपक्षी जसा पावसाची वाट बघतो, तसा दिवाळीआधी पासूनच दिवाळी अंकांची वाट बघत असतो. रंगीबेरंगी मुखपृष्ठांची प्रावरणे ल्यायलेले ते दिवाळी अंक पुस्तकांच्या स्टॉलवर असे काही मांडून ठेवले जातात की कपड्यांच्या भव्य शोरुम्सही लाजतील. पणत्या, आकाशदिवे यांच्याही आधीपासून दिवाळी अंक दिवाळीची चाहूल देत असतात. माझ्या पहिल्या बालवाचनाचा सवंगडी होता चांदोबा…. विक्रम वेताळ मधील वेताळ माझा सल्लागार होता. सावकाराचा लबाडपणा, राजाराणी, इसापनीतीमधील नायक , गुलामांच्या कथा, यांनी बालवयातच एक मनोधारणा निर्माण केली. अजूनही स्मरणात आहेत ती त्यातील चित्रं. दाट जंगल, दिमाखदार राजवाडे, पुष्करिणी (या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी चांदोबा मासिक वाचायलाच हव.), लांब, जाडजूड शेपटा घातलेल्या मुख्य कथा नायिका, सावकाराच्या चेहर्यावरील हावरा भाव, अगतिक, फसलेला मित्र, लांडगे, कोल्हे असे प्राणी अशी कितीतरी चित्रं मन:पटलावर कोरली गेली आहेत.
किशोर मासिकानंही माझं किशोर वय अलगदसं त्याच्या पानापनातून सांभाळलं. कविता, कथा, कोडी, विज्ञानाची अभूतपूर्व दुनिया, शब्दकोडी, घरबसल्या करता येतील असे अनेक उपक्रम…. पानोपानी उलगडत जाणारं हे अक्षरधन म्हणजे हिरे माणकांपेक्षाही अनमोल खजिनाच जणू. त्यातील गोष्टी, त्यांचा आशय, तो वास, कागदाचा तो गुळगुळीत स्पर्श, आणि त्या मासिकाचं डौलदार रुप मनात कसं घर करुन बसलयं. या अक्षरमोत्यांनी नकळत आम्हांला संस्कारक्षम केलं.
वय वाढत गेलं, शहाणं समजुतदार होत गेलं … खेळातून, उनाडक्या करण्यातून बाहेर आलं.. पण.. वाचनात मात्र रमलेलच राहिलं.. याचं श्रेयही या नटून थटून येणाऱ्या दिवाळी अंकानाच द्यायला हवं, हो ना? खमंग चकली खावी तशी या अंकांची चव मनाला खमंग, खुमासदार बनवायची. अलगद जिभेवर विरघळणारा सुग्रास लाडू जसा रसना तृप्त करुन बळ ही देतो तसे हे अंक वाचकांची मनं सुदृढ करत असत. कुरकुरीत पोहे, खरपूस खोबरं, तळलेले दाणे, डाळे, काजू यांनी नटलेल्या चिवड्यासारख मनातील भावना देखील नटून चुरचुरीत होत असत. शंकरपाळीचा खुसखुशीतपणा जास्त चांगला की तिच्यामुळं तोंडभर पसरलेली माधुरी जास्त अवीट असा प्रश्न पडतो ना? (ऊत्तरही या प्रश्नातच दडलय ना?) तसाच अगदी तसाच बुध्दीला, मनाला, डोळयांना या दिवाळी अंकांनी पौष्टिक खुराक दिला आहे.
कधी यातल्या कवितांनी भावनांच्या सतारींची तार छेडली तर कधी व्यंगचित्रांनी गालावर हलकेच स्मितरेषा उमटवली. कधीकधी तर एकमेकांना टाळ्या देऊन अख्खं कुटुंब मोठ्या हास्यलाटेवर स्वार होत असे. (जत्रा, आवाज) वहिनी, गृहलक्ष्मी, स्त्री, मानिनी या अंकांनी अवघ्या स्त्री जातीवर अधिराज्य गाजवलं. त्यांचं हळवं, नाजूक भावविश्व तरल बनवलं. त्यातील काही विचारांनी त्या सजग, प्रगल्भ, कणखर, स्वावलंबी झाल्या. आत्मभान जागृत करण्यांतही हे दिवाळी अंक सहभागी आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
थोडासा प्रौढ, बुध्दीजीवी वाचक वर्ग किर्लोस्कर, अक्षर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, ललीत, यांची वाट बघे. सामना, साधना केसरी, मनोहर सारख्या मासिकांना त्यांचा त्यांचा खास वाचकवर्ग असे. निदान दोन चार दिवाळी अंक घरात आल्याशिवाय सण साजरा होतच नसे.
मराठीतील पहिला दिवाळी अंक कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ साली संपादित केला.अनेक साहित्यिक निर्माण केले. तेंव्हापासून आजपर्यंत अक्षरसाहित्यानं समाजप्रबोधनाचा हाती घेतलेला वसा आजतागायत सुरु आहे.
साहस, महत्त्वाकांक्षा, स्वावलंबन या बरोबरच समाजाच वैचारिक परिवर्तन करुन सांस्कृतिक जडणघडण रुंदावून, सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा घडविण्यात या मासिकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. याच अंकांनी वाड्.मय कला विषयीची अभिरुची निर्माण केली आणि तिला एक उंची दिली. अजूनही दर्जेदार दिवाळीअंकात लिहिण्याचं आमंत्रण मिळणं हा लेखकांच्या अभिमानाचा विषय आहे. केवळ याचमुळं साहित्यकृती मार्फत होत असणार्या या दिवाळी अंकांच्या गाथेनं महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास कसा केला हे सांगणारी ही दोन उदाहरणं देण्याचा मोह मला टाळता येत नाहीय.
१९०९ सालच्या दिवाळी अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी मोदकावर एक कविता लिहिलि होती. ती वाचून एका स्त्रीने त्यांना कवितेतूनच प्रश्न विचारला होता ….
“मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला असे.
तव भार्त्याचे ह्याला साह्य नसे का, कथी मला ताई?”
या प्रश्नाच्या उत्तरासाठी १९१० च्या अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी पति-पत्नी ही कविता लिहिली. आईकडून मुलीला मिळणार्या शिकवणुकीपासून संसारात रमलेल्या स्त्री पर्यंतचे वर्णन या कवितेत दिसत. तत्कालीन पतिपत्नींच्या संबंधांचं स्वरुपही त्यातून लक्षात येतं.
“लग्न नव्हे ते प्रेम केले, एकीकरण जीवांचे
त्या ऐक्याचे वर्णन करणे शक्य न आपुल्या वाचे
असे न जेथे संसाराचा केवळ तेथे शीण
पत्नी वाचून पती पांगळा, ती ही तशी पतिवीण”
असा समजावणीचा सूरही त्यातून उमटतो.
संपादक रॉय किणीकर यांनी ‘चिमुकली दिवाळी’ नावाचा दिवाळी अंक लहान मुलांसाठी काढला होता. या अंकाचं मुखपृष्ठ जणू एक स्लेटपाटीच होती! त्यावर पेन्सिलनं लिहिता येऊ शकत होतं!! बालमनाचा विचार करुन त्यांना वाचनसंस्कृतीत सामील करुन घेण्याचं हे एक कौशल्यच आहे ना?
भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात. संस्कृतीच्या खुणा आणि प्रतिक म्हणून जुनं जपणं, वृध्दिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे. शतकाहून अधिक काळ दिवाळी अंक हे काम चोखपणानं करत आहेत. चारशेहून अधिक दिवाळी अंक मराठीची पालखी खांद्यावर मिरवत आहेत. मराठीचा मराठमोळा बाणा, शहरी औपचारिकता, ग्रामीण तोरा, भाषेची नजाकत, यांच्या दिंड्या पताका उभारून मराठी मनाची मशागत करत आहेत.
नवीन अंकांचं कात टाकून समोर आलेलं डिजिटल आधुनिक रुप तर जगभर पसरलेल्या मराठी मनातील काळ्या मायमातीची ओढ लावायला समर्थ आहे. हे ‘ई’ रुप हळवे मराठी भावबंध साखळदंडासारखे मजबूत बनवतील आणि मराठीचा डंका सातासमुद्रापार निनादत ठेवतील यात शंका नाही.
असे हे दिवाळी अंक, त्यांच्या नाना कळा (कला), नाना गुण!
हे नसतील तर. . . . .
गत:प्रभ झणी होतील ना मनअंगणे
तेजलुप्त ते होतील ना शब्दचांदणे
असं म्हणावसं वाटतं.
© सौ. दीपा नारायण पुजारी
फोन.नं: ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈