आपण बऱ्याच गोष्टी नकळत करत असतो. त्यात काही चुकीच्या गोष्टी पण आपल्या हातून नकळत घडतात. त्याच जर हेतुपुरस्सर बदलल्या तर ती सवय होऊन जाते. आणि भावी पिढी साठी ते संस्कार बनून जातात. यातील काही आवश्यक गोष्टी विविध कारणांनी मागे पडत चालल्या आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे अन्नाचा सन्मान
आपल्याही नकळत आपण बरेचदा अन्नाचा अपमान करत असतो. कदाचित ते लक्षात पण येत नाही. इथे मला एक गोष्ट आठवते. एक खूप मोठे कुटुंब असते. घरातील सगळे काम करणारे असतात. रात्री ते एकत्र जेवत असतात. एक दिवस घरात फक्त तांदूळ असतात. त्या घरातील मोठी सून त्या तांदुळाची खिचडी करायला ठेवते. तितक्यात तिची सासू येते. तिला वाटते सून मीठ घालायचे विसरली म्हणून ती त्यात मीठ घालते. असेच घरातील तिन्ही सुनांना वाटून प्रत्येक जण स्वतंत्र पणे मीठ घालून जाते. त्याच वेळी लक्ष्मी व अवदसा या घरात असतात. आणि या घरात कोणी राहायचे या वरून त्यांच्यात वाद होतो. आणि असे ठरते, या कुटुंबातील एकाही व्यक्तीने अन्नाला नावे ठेवली नाही तर त्या घरात लक्ष्मी निवास करेल. आणि कोणी नावे ठेवली तर अवदसा त्या घरात राहील. त्या दोघी घरात एका बाजूला बसून निरीक्षण करत असतात. घरातील सर्व पुरुष मंडळी प्रथम जेवायला बसतात. सासरे पहिला घास घेतात त्याच वेळी भात खारट झाल्याचे लक्षात येते. पण घरातील स्त्रियांचे कष्ट लक्षात घेऊन ते काहीही न बोलता गुपचूप जेवतात. ते बघून त्यांची मुलेही गुपचूप जेवतात. त्यामुळे छोटी मुले, स्त्रिया कोणीही काहीही न बोलता जेवतात. थोडक्यात अन्नाला कोणीही नावे ठेवत नाहीत. म्हणजेच अन्नाचा सन्मान ठेवतात. आणि लक्ष्मी कायमची त्या घरात निवास करते.
अन्नाचा सन्मान हे खूप मोठे व महत्वाचे व्रत आहे. त्या सन्मान करण्यात शेतकरी त्यांचे कष्ट, घरातील स्त्रिया त्यांची कामे या सगळ्यांचा सन्मान असतो. परंतू हल्ली वाया जाणारे अन्न पाहिले की मनाला त्रास होतो. एकीकडे आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो. त्यावर आपला देह पोसला जातो. जेवणाला उदर कर्म न मानता यज्ञ कर्म मानतो. मग अन्न टाकून देताना ही भावना का विसरतो? असा प्रश्न पडतो. एखाद्या कार्यात बघितले तर अन्नाची नासाडी दिसते. आणि त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अन्नासाठी व्याकूळ झालेले लोक दिसतात. आणि अन्न वाया जाणार नाही, या साठी पण कायदे करण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न पडतो.
पुण्यातील एका कार्यालयात मी असा अनुभव घेतला आहे. ताटात कोणी अन्न ठेवून ताट ठेवायला गेले की तेथे उभी आलेली व्यक्ती ते ताट ठेवू देत नाही. ताट रिकामे करून आणा म्हणून ती व्यक्ती सांगते. सावकाश संपवा अशी विनंती केली जाते. सुरुवातीला लोकांना हे आवडले नाही. पण त्या कार्यालयाचा तो नियमच आहे. एकदा समजल्यावर लोक मर्यादेत वाढून घेऊ लागले. एका डायनिंग हॉल मध्ये पण अशी पाटी लावली आहे. ताटातील अन्न संपवल्यास २० रुपये सवलत मिळेल. असे सगळीकडे व्हावे असे वाटते. त्याही पेक्षा आपण ठरवले तर अन्नाचा योग्य सन्मान करु शकतो. आणि आपले बघून पुढची पिढी हेच संस्कार स्वीकारणार आहे.
अन्नाचा सन्मान तर पूर्वी पासूनच आहे. पण पुन्हा त्याला नव्याने उजाळा देण्याची वेळ आली आहे. तर अन्नाचा सन्मान हे व्रत आचरणात आणण्यास कोणाची हरकत नसावी.
☆ “लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
…. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात…
आई भाऊसाठी परि मन खंतावतं.
या कविवर्य कृ. ब. निकुंबांच्या घाल घाल पिंगा वार्या या गीताच्या ओळी रेडिओवरुन कानी पडल्या आणि मनात विचाराचा तरंग उमटला. खरचं आईच्या बरोबरीने किंवा आई नंतर जर कोणी आपल्या वर प्रेम करत असेल तर ती असते बहिण!मोठी असो की लहान तीचे आपल्या भावंडांवर प्रेम असते, सर्वांची ती मनापासून काळजी घेते. भावंडांच्या सुखातचं आपले सुख मानते. ती आपल्या भाऊबहिणींचे लाड पुरविते, मायेने समजाविते, आई वडील त्यांच्या वर रागवले तर भावंडांचा पक्ष घेते. आपल्या वाटेचा खाऊ भावाबहिणींना देते.. आईला घरकामात मदत करते. आई आजारी असली तर स्वतः सर्व कामे करते, आईची आणि इतर सर्वांची काळजी घेते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर नोकरी करून कुटुंबाला हातभार लावते. भावंडांच्या शिक्षणासाठी प्रसंगी आपले शिक्षण सोडते, आपल्या सुखांचा त्याग करते. खरचं किती मोठं मन असते तिचं. बहिण छोटी असली तरी ती मोठ्या हक्काने भावाबहिणीकडून आपले लाड पुरवून घेते आणि तेवढा जीव ही लावते. लहान असली किंवा मोठी असली तरी तिचे प्रेम, तिची माया अगाध असते. आईला मायेचा सागर म्हणतात तर बहिण ही त्याच सागरातून भरलेली मायेची, प्रेमाची, वात्सल्याची घागर असते जी नेहमीचं भरलेली असते….
काही घरांमध्ये पालक मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतात, तरीही मुली सर्व सहन करून आपल्या भावांवर निःस्वार्थ प्रेम करतात. त्यावेळी नकळतपणे घरातल्यातकडून तिचा आदर, मान राखला जात असतो. हीच तिच्या या प्रेमाची पावती असते. हेच तिलाही हवे असते.
लहानपणी एकत्रपणे खेळणारे, हसणारे, लुटुपुटुचे भांडण करणारे बहिण भाऊ मोठे झाल्यावर कधी कधी कारणास्तव भांडले तर बहिणचं स्वतः हून भावाशी बोलणार. जरी भांडली तरी मनात प्रेमचं असते.
बहिण रक्षाबंधन आणि भाऊबीज या दिवशी भावांचे औक्षण करुन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावाने दिलेली भेट प्रेमाने स्विकारते. इथ आर्थिकस्तराचा भेदभाव लक्षात आला तरीही नातं महत्वाच ठरतं.
बहिणी सासरी गेल्या तरी आपल्या भावाबहिणींची काळजी करीत असतात. आपले माहेरचे सर्व सुखात राहो असेचं त्यांना वाटत असते. बहिणी बहिणी या एकमेकांच्या मैत्रीणीचं असतात. लहानपणी आपली सुखदुःखे एकमेकांना सांगत असतात आणि लग्नानंतर ही आपले मैत्रीचे नाते जपत असतात.
कृष्णाला जखम झाली, ती बांधण्यासाठी आपली भरजरी साडी फाडणारी द्रौपदी ही कृष्णाची बहिण…
किती प्रेम तिचे आपल्या भावावर!आताच्या काळात ही आपल्या भावांच्या सुखासाठी स्वतः त्रास घेणाऱ्या द्रौपदी सारख्या बहिणी असतात पण सर्वच भाऊ कृष्णासारखे असतात असे नाही. तरीही बहिणी आपले कर्तव्य करीत असतात, नाते जपत असतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता.
भावा बहिणीतले बंध असे दृढ होतात. मनात कसल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केलेले खरे प्रेम. ‘रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण, प्रीती जी करती जगी लाभविण’ प्रेमात कसलीही लाभाची अपेक्षा ठेवली गेली की त्याची किंमत शून्य होऊन जाते. ग. दी. माडगूळकरांचे ‘चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला’ हेही गीत भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणारे. किती सुंदर असेल ना ते रेशीमबंधांनी जुळलेले त्यांचे अलौकिक पवित्र नाते! ‘साद घालता येईन धावून’ हे कृष्णाने दिलेले वचन द्रौपदीवर वस्त्रहरणाची वेळ आल्यावर पाळलेले आपण पहातो. तसेच प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला आश्वस्त केलं पाहिजे की घाबरू नको, मी तुझ्यापाठी सदैव उभा राहीन. तुझ्या मदतीसाठी तत्पर असेन. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण’ नाते भले रक्ताचे नसेल तरी देखील प्रेमाच्या विलक्षण शक्तीपोटी केवळ भावाचा भुकेला असलेला नारायण प्रसन्न होऊन अंतरीची खूण पटवतोच. तसंच निर्व्याज प्रेम भावा बहिणी मध्ये असेल तर एकमेकांची तुलना, मान-अपमान, ईर्ष्या, पैसाअडका अशा अडथळ्यांची पर्वा न करता जे टिकतं ते खरं प्रेम. भाऊबीज बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आदर राखणारा, सन्मान वाढवणारा दिवस. या दिवशी आवर्जून आठवण येते ती श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या नात्याची, भावा बहिणीच्या अतूट प्रेम बंधनाची.
प्रत्येक बहिणीला आपला भाऊ तो श्रीमंत असो की गरीब, लाख मोलाचा वाटत असतो. तिच्या हृदयात त्याच्यासाठी एक खास जागा असते. त्याच्याविषयी माया प्रेम मनात दाटलेले असते. त्याने तिला काही देवो अगर न देवो त्यावर तिचे प्रेम अवलंबून नसते. फक्त त्याने अधीमधी आपली आपुलकीने चौकशी करावी, ख्याली खुशाली विचारावी आणि तिने मोकळेपणाने त्याच्याशी चार शब्द बोलावे एवढीच तिची अपेक्षा असते. व्यवहाराच्या जगात चलनी नाण्याने देणेघेणे चालते तेव्हा फक्त नफातोट्याचा विचार होताना मान सन्मानाची कदर केली जात नाही. पण बहिणीचा आदर हा स्त्री शक्तीचा आदर असतो. तिच्यातील सृजनतेंचा आदर असतो. या पृथ्वीवर मानव वंश सातत्य टिकून राहावं यासाठी दोन घराणी जोडताना जीच तिच्या जन्मदात्याकडून नवरदेवाला दान स्वरुपात देण्याची परंपरा इथे आहे, तेव्हा दान आणि मानपान यांचा यथोचित समन्वय साधला जातो पण तरीही त्यातला काही पुरुष जातीचा अधिक हव्यासाची लालसा शमलेली नसते. माहेर कंगाल झालं तरीही. तिथे या नवर्यामुलीचा आदर, मानसन्मान राखला जात नाही. हे पूर्वी होत तसचं आजही आहे फक्त कालानुरूप त्याच स्वरूप बदलत गेल आहे. विविध शिक्षणाच्या सोयीने विद्याविभूषित, स्वावलंबी, कर्तबगार, कर्तुत्ववान होऊन घर, समाज, गाव, राज्य. देश आणि जागतिक स्तरावर उच्चपदस्थ बनल्या तरीही पुरुषसत्ताक मानसिकतेची शेवटी एक स्त्री म्हणू होणारी अवहेलना थांबलेली नाही. पूर्वी चूल नि मूल सांभाळताना तिच्या कामाची कदर न होता, उलट शाब्दिक, शारीरिक अत्याचार केले जायचे ते आता तिने गगनाला गवसणी घातल्याचा विश्वविक्रम केला तरी कौतुकाचे चार शब्द बोलयाला पुरुषप्रधान सत्तेला जड जातयं कारण त्यांचं आसनच आता डळमळीत झाल्यासारख त्यांना वाटतयं.
आता हळूहळू समाजात स्त्री शक्तीचा जागर जसा होत गेलायं तस तसा या नवदुर्गा शक्तींचा सन्मान सोहळा देखील होऊ लागला. आपल्या कामाची कदर होतेय, कौतुकाचा वर्षाव होतोय, आपल्याला सन्मानान वागवल जातयं ये पाहून या स्त्रीला प्रेमाचंभरत आलय. आता तिला आपल्या घरासाठी, आपल्या माणसांठी, समाजासाठी नि देशासाठी अधिक श्रम घेण्याचं बळं मिळतय..
आईवडिलानंतर भाऊ हा बहीणला म्हणजेच तिचं माहेर असतं. ती नात्याची नाळ तिला तुटू न देता सतत बांधून ठेवायची असते. नात्यांमधली भावनिक ओढ भावाबहिणीला एकत्र बांधून ठेवत असते. तिथे लोभ, मोह, मत्सर यांना जागा नसते आणि नसावी. तसं जर झालं, तर नात्यांमध्ये दरार पडायला वेळ लागत नाही. दान करण वा देण हा आपला धर्म आहे पण ते दान विनयशीलतेने दिले असता दात्याला नि याचकालाही सात्विक समाधान लागते पण तेच जर दान करताना दात्याला अहंतेचा स्पर्श झालाच तर दानाच पावित्र्य डागळतं. तिला कायद्याने हक्काचं दान मिळवायला लावण्यापेक्षा, आपुलिकीच्या गोडव्याने सन्मानपूर्वक केलेली बोलणी हे बंध रेशमाचे अतूट असेच का नाही राहणार?स्त्रीची अस्मिता जपण हे निरलस नात्याचं बहीण भावांच्या चेहर्यावरील हसू फुलण्यासारखं असणार नाही काय? या देवी सर्वभूतेषू शक्ति-रूपेण संस्थिता!… आपली संस्कृती तर याहून वेगळं काय सांगते?
☆ सागरी किनारा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
हो माहित आहे मला खूप वर्षांपूर्वी आले होते तुला भेटायला मी. पण आजचं येणं काही वेगळंच. पंचवीस वर्ष पुर्वी तुला भेटायला आले होते, तेव्हाची मी या लाटांच्या सारखीच होते, खळाळत, वाहत जाऊन कोठेही आपटणारी.
पण आज नव्याने पाहते मी तुला. किती रे विशाल तुझं हृदय! सर्वांना अखंडपणे सातत्याने सामावून घेत असतो. कुठलाच भेदभाव नाही तुझ्याजवळ.
हो पण तुझी एक गोष्ट वाखाण्यासारखी. तुला जे हवं तेवढंच घेत असतो आणि नको असलेले सगळं किनाऱ्यावर आणून ठेवतोस.
भरती आणि ओहोटी म्हणजे तुझे दोन सुंदर अलंकार. किती खुश असतोस भरतीच्या वेळी. खळाळत फेसाळत येऊन सर्वांना भेटतोस पण नाराज नाही होत ओहोटीच्या वेळेस. त्यावेळेस तेव्हाही तेवढ्याच वेगाने पाठीमागे प्रवाहित होतोस कारण तुला माहितीये पुन्हा तितक्या च वेगाने तुला भरती येणार आहे, आनंदाचे उधाण येणार आहे. हेच शिकले मी आज तुझ्याकडून.
नको असलेल्या सगळ्या नकारात्मक भावना, ती विचारांची जळमट, त्या कटू आठवणी सगळं विसरायचे मला जीवनात. त्या सर्वांचे ऋणी व्हायचे मला ज्यांनी मला जगण्यासाठी भरभरून आठवणी दिल्या. माझे जीवन सुंदर आणि कृतार्थ केले त्या सर्वांचीच मी मनापासून आभारी आहे आणि ऋणी देखील आहे ज्यांनी त्यांच्या असण्याने माझे जीवन सुंदर बनवले.
ओहोटी आयुष्यात जास्त काळ नसतेच कारण मला माहिती आहे पुन्हा भरती येणार आहे. माझ्या आयुष्यात एका नव्या पर्वाची. पण मनात रुंजी घालत राहतील नेहमीच त्या सर्व आठवणी.
आता मी ठरवलंय मला देखील तुझ्यासारखाच व्हायचंय अखंडपणे प्रवाहित होऊन सर्वांनाच आपलयात सामावून घ्यायचंय. सरीतेला सागरात सामावून जायचं असतं, शेवटी ही जगमान्यता आहे. पण मलाच आता सागर व्हायचंय. अथांग, खोल ज्याची उंची कधीच कोणालाच मोजता येणार नाही अशी.
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ये रे पत्रा … ये रे पत्रा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
परवा एकदा कपाट आवरायला घेतलं. कपाट आवरणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं काम असलं, तरी ते वेळखाऊ आणि जिकीरीचं काम असल्याने नेहमी पुढे पुढेच ढकललं जातं. त्या दिवशी मात्र मी नेटाने बसलेच. कपाट आवरून झालं आणि मी माझी आवडती गोष्ट पुढ्यात घेऊन बसले. ती म्हणजे माझा पत्रांचा बॉक्स. माझी शाळेपासूनची पत्रे मी त्यात जपून ठेवली आहेत आणि जेव्हा जेव्हा म्हणून मी कपाट आवरते, तेव्हा तेव्हा मी ती काढून, वेळ असेल तशी वाचत बसते. त्या दिवशी बॉक्स पुढे घेऊन मी फतकल मारून बसलेच.
सर्वात वरचं पत्र होतं सखा कलालांचं. या पत्राचं मला विशेष अप्रूप होतं, ते अशासाठी की अलिकडे अशी पत्रेच येईनाशी झालीत. सध्या टपाल येतं, ते फक्त वर्गणी संपली, किंवा मिळाली, किंवा मग कार्यक्रमाचं निमंत्रण, मिटींगची सूचना यासारखी. हे पत्र तसं नव्हतं. खूप दिवसांनी माझी कथा आवडल्याचं खुषीपत्र होतं ते. ‘समकालीन भारतीय साहित्यामध्ये माझ्या आलेल्या कथेचा हिन्दी अनुवाद वाचून त्यांनी लिहीलं होतं, युनिफॉर्म कथा वाचली. आवडली. मराठी लेखिकेची कथा हिन्दी भाषेत वाचण्याचा आनंद काही औरच असतो.’ पुढे त्यांनी आवर्जून लिहीलं होतं, ‘तुमच्या नावलौकिकाची कथा अशीच सर्वदूर विस्तारत जावो.’ असं पत्र कुणाचंही असतं, तरी आनंदच झाला असता, पण सखा कलाल म्हणजे नावाजलेले ग्रामीण कथाकार. त्यामुळे त्यांच्यासारख्या दर्दी माणसाकडून मिळालेली दाद मोलाची वाटली.
हे कौतुक – पत्र घरच्यांना दाखवलं. त्यांच्याबरोबर पुन्हा वाचलं. मैत्रिणींना दाखवलं. तितक्या तितक्या वेळा त्या पत्रवाचनातून आनंद होत गेला. या पत्रामुळे मला झालेल्या आनंदात घरच्यांना, मैत्रिणींना सहभागी करून घेता आलं. फोनचं तसं नाही. बोलणार्याशी प्रत्यक्ष संवाद होतो, हे खरे. पण तो आपल्यापुरता असतो. त्यात इतरांना सहभागी करून घेता येत नाही आणि पत्रवाचनासारखा पुन:प्रत्ययाचा आनंदही घेता येत नाही.
अलीकडच्या गतिमान युगात पत्रलेखनाला खूप ओहोटी लागली आहे. घराघरातून दूरध्वनीची यंत्रे बसली. आणि दूरवरून विनाविलंब संबंधितांशी संपर्क साधता येऊ लागला. ते माध्यम सोयीचं वाटलं. त्यामुळे अल्पावधीतच त्याचा प्रसारही झाला. आज-काल कथा, कविता, लेख आवडल्याची खुशी पत्रे नाही. खुशी फोन येतात.
मला अगदी लहानपणापासून पत्रलेखनची आवड आहे. त्याला आलेली उत्तरे मी जपून ठेवली आहेत. अगदी शाळेत असल्यापासूनची…. ती पत्रे पुन्हा पुन्हा काढून वाचण्याचा मला छंदच आहे.
माझे कथा-लेख ८०-८२पासून छापून येऊ लागले. त्या काळात दूरदर्शन आणि दूरध्वनी घराघरात फारसा बोकाळला नव्हता. अर्थात मनोरंजन आणि माहितीसाठी वाचनावरच भिस्त असायची. त्यावेळी लोक, कथा-लेख वाचत आणि जे आवडेल, ते लेखकाला खुशीपत्र पाठवून कळवत. मला माझ्या लेखनाबद्दल अनेक खुशीपत्रे आलेली आहेत आणि अजूनही ती माझ्याजवळ आहेत. त्यात सर्वात देखणं पत्र आहे व. पु. काळे यांचं. दोनच ओळींचं पत्र. पण मांडणी इतकी सुरेख की पत्र म्हणजे एक रेखाचित्र वाटावं.
औपचारिक खुषीपत्रे सोडली, तर इतर जी नातेवाईक, स्नेहीमंडळींची पत्रे असतात, ती वाचताना, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आठवतात. त्यामुळेच अलीकडे पत्रलेखन कमी होत चाललय, नव्हे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, यामुळे मन विषण्ण होतं. त्या दिवशी सखा कलालांचं असं अचानक आलेलं पत्र वाचलं आणि वळवाच्या पावसासारखं मन शांतवून, सुगंधित करून गेलं. मनात पुन्हा पुन्हा येत राहीलं,
☆ सहज सुचलं म्हणून…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
मनुष्याच्या जडणघडणीत अनेक गोष्टी आपली महत्वाची भूमिका बजावत असतात. यातील अनेक गोष्टींचा प्रभाव मनुष्याच्या मनावर दीर्घकाळ राहू शकतो, त्याला प्रभावित करू शकतो, नव्हे करतोच करतो…
प्रत्येक मनुष्याचे आयुष्य, जीवन म्हणजे कंगोऱ्यांची वाटी म्हणता येईल. कंगोऱ्याची आत गेलेली बाजू जर दुःख मानली तर बाहेर आलेली बाजू सुख मानावी लागेल. प्रत्येकाच्या वाटीला असे कंगोरे कमीअधिक प्रमाणात असतात.
मनुष्याला प्रभावित करणारे अनेक पैलू आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा त्यातील एक महत्वाचा मानला जातो.
एक मनुष्य होता. त्याला दोन मुले होती. दोघेही दहावीला होते. एक मुलगा नापास झाला तर दुसरा शाळेत पहिला आला. पत्रकारांनी त्या दोघांची मुलाखत घेतली तेव्हा दोघांनी एकच उत्तर दिले की माझे बाबा वारले म्हणून माझा शाळेत पहिला क्रमांक आला आणि माझे बाबा वारले म्हणून मी नापास झालो. घटना एकच आहे पण दोघांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याचात्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव दर्शवित असतो….
एकाने असे ठरवले असेल की आता माझे बाबा नाहीत, मी चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून दाखवले तर माझ्या बाबांना आनंद होऊ शकेल, त्याने तसा प्रयत्न केला आणि भगवंताने त्याला त्यात यश दिले…..
आणि दुसऱ्याने…… ?
दृष्टी पेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. दृष्टी तर प्रत्येकाला असते पण जो मनुष्य विवेकाने आपला दृष्टिकोन बदलतो, तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते….. !
जगात अनेक घटना घडत असतात, कधी त्यातील एक घटना आपल्या आयुष्यात घडते, ती आपली परीक्षा असते…. ! परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा की घाबरून परीक्षा न देण्याचा निर्णय घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे ?
आंबट कैरीच्या अर्धकच्च्या वयात बा. भ. बोरकरांची` ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता अभ्यासली होती. तेव्हाच गोमंतक भूमीच्या दर्शनाची ओढ मनात रुजली. पुढे कॉलेजच्या पाडाच्या कैरीच्या वयात बोरकरांच्या गोव्याच्या लावण्यभूमीचे वर्णन करणार्या अनेकानेक कविता वाचनात आल्या आणि ती लावण्यभूमी पुन्हा पुन्हा खुणावू लागली. तिथल्या माडांच्या राया त्यावर निथळणारे चांदणे, त्यामधून झिरपणारी प्रकाश किरणे, केळीची बने, तांबड्या वाटा, लाटांवरची फेनफुले हे सारं स्वप्नदृश्याप्रमाणे जागेपणीदेखील मिटल्या डोळ्यांपुढे साकार व्हायचं. उघड्या डोळ्यांनी हे आपल्याला कधी बघायला मिळेल का? कधी बरं मिळेल? हेच विचार तेव्हा मनात असायचे. ते वयही कविता आवडायचं होतं.
पुढे गोव्यातील पोर्तुगिजांची राजवट संपुष्टात आली. गोवा अखील भारताचा अविभाज्य भाग बनला. गोव्यातील कॉलेजेस मुंबई विद्यापीठाला जोडली गेली आणि माझे मेहुणे (मामेबहिणीचे यजमान) गोव्याला संस्कृतचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रुजू झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचचीच ही गोष्ट. ते गोव्यात गेले, या बातमीनेच मी खूश झाले. कारण गोमंतकभूमी आता माझी स्वप्नभूमी राहणार नव्हती. मला तिथे जाणं आता शक्य होणार होतं. याची देही याची डोळा मला त्या भूमीचं सौंदर्य, लावण्य निरखता, न्याहाळता येणार होतं.
माझी बहीण लता तिथे जाऊन बिर्हाडाची मांडामांड करते न करते, तोच मीदेखील तिथे पोहोचले. त्या नंतर गोव्याला मी अनेकदा गेले, पण तिथे जातानाचा पहिला प्रवास मी कधीच विसरणार नाही. रात्री मिरजेहून बसलो. पहाटे पहाटे लोंढा स्टेशन आलं. कॉफी घेऊन मी खिडकीला जशी खिळलेच. लोंढा मागे पडलं आणि झाडा-झुडुपांच्या हिरव्या खुणा जागोजागी पालवू लागल्या.
कॅसलरॉकपासून हे गहिरेपण अधीकच गहिरं होऊ लागतं. नानाविध छटातून आणि आकारातून डोळ्यांना सुखवू लागतं. हे हिरवेपण दिठीत साठवता साठवता एकदम वेगळंच दृश्य डोळ्यापुढे साकारतं. शंकराची स्वयंभू पिंड वाटावी, अशा पहाडातून तीन धारांनी दुधाचा प्रवाह खाली उतरताना दिसतो. गंगेचा उगम काही मी पाहिला नाही. पण, दूधसागरचा हा धबधबा पाहून गंगोत्रीच्या दर्शनाइतकी कृतार्थता वाटली. सभोवताली चैतन्य फुलवण्यासाठी, जीवन घडवण्यासाठी हा प्रवाह दूधसागर नदी होऊन पुढे पुढे जाणार होता. गाडी दोन मिनिटं त्या धबधब्याशी थांबून पुढे पुढे जाऊ लागली पण मन मात्र अजूनही त्या धबधब्याखाली सचैल स्नान करत होतं. दूधधारेचा तो जीवनस्त्रोत अंगांगावर वागवीत होतं.
मडगावमधलं बहिणीचं पहिलं घर गावाबाहेर टेकडीच्या उतारावर होतं. घरकामापुरतं घरात वास्तव्य आणि रात्री किंवा बाराच्या उन्हाच्या वेळेला घराचं छप्पर. एरवी टेकडी हेच घर झालं होतं तेव्हा. कलंदरपणे मनमुराद भटकायची हौस त्या टेकडीवर भागली. सकाळी सूर्योदय बघायला टेकडी चढायची. संध्याकाळी सूर्यास्त बघायला टेकडीचा माथा गाठायचा. दूरवर पश्चिम क्षितिजावर समुद्रात सूर्य बुडताना, टेकडीवरून बघणं मोठं बहारीचं वाटे. शिवाय हे सारं बघायला आम्ही घरचेच तेवढे. मी, बहीण, सत्यवती-सतन म्हणजे बहिणीची माझ्याएवढीच नणंद. कधी कधी प्रोफेसर महाशयही आमच्या पोरकटपणात सामील होत. सगळ्यात मला एक गोष्ट बरी वाटे. फिरायला जाण्यासाठी तयार होणं, कपडे बदलणं, वेणी-फणी, नट्टापट्टाटा करणं याची कटकट नव्हती. घरातही आम्ही तिघे-चौघे. टेकडीवरही आम्हीच तेवढे. नाही म्हणायाला गावड्यांची काही शाळकरी मुले इकडे तिकडे दिसत. किंवा कुणी कष्टकरी गावडे. त्यामुळे घरच्या पोषाखातआ आणि अवतारात बाहेर पडायला हरकत नव्हती. तेवढे १५-२० दिवस सूर्य केवळ आमच्यासाठीच उगवायचा आणि मावळायचा.
कधी-मधी आम्ही गावात जात होतो. चालत जायचं आणि चालत यायचं. सार्वजनिक वाहन व्यवस्था अद्याप साकारलेली नव्हती. त्यावेळी वाटायचं, स्वच्छ, चकचकितडांबरी रस्ते केवळ आमच्यासाठी उलगडलेआहेत. गावात गेलं, की तिथल्या एका उडपी हॉटेलमध्ये अडीच आण्याचा मसाला डोसा खायचा आणि चालण्याचा शीण शमवायचा. कोलवा बीचवर एकदा गेलो होतो. तुरळक माणसं तिथे दिसली तेव्हा. आमच्यासारखीच नवशी-हौशी आलेली असणार. तेव्हाही वाटायचं पुळणीवरती रेतीचा मऊशार किनारा आमच्यासाठीच हांतरलाय. लाटांचं नर्तन केवळ आमच्यासाठीच चाललय. माडांच्या झावळ्यासुद्धा फक्त आमच्यासाठी झुलताहेत. तेव्हा असं वाटायचं कारण हे सारं दृश्य अनिमिषपणे पाहणारे फक्त आम्हीच असायचो.
सुरुवातीला वाटायचं, काय करंटी इथली माणसं. निसर्ग आपलं लावण्य नाना कळांनी उधळतोय. यांची आस्वादाची झोळीच फाटकी. मग लक्षात आलं, इथला निसर्ग प्रत्येकाच्याच अंगणा-परसात आपलं वैभव उधळतोय. माझ्यासारखी निसर्ग सौंदर्य शोधत फिरण्याची यांना गरजच काय?
त्यानंतर अनेकदा अनेक कारणांनी गोव्याला जाणं होत गेलं. एकदा गोव्याला गेले असताना माझी गोव्यातील मैत्रिण मुक्तामाला सावईकर मला तिच्या घरी जांबवलीला घेऊन गेली. तिच्या घरी त्यावेळी तिच्या आजोबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव होता. त्यांच्या घरची आपुलकी, जिव्हाळा, आजही मनात घर करून आहे. तितकीच मनात खोलवर खोलवर रूतलेली आहे, जांबवलीच्या आस-पास केलेली मनमुक्त भटकंती.
माडांच्या रायातून मुक्तामालाने आम्हाला एका छोट्याशा धबधब्याजवळ नेले. दीड पुरुष उंचीवरून खाली उडीमारणारा हातभर रुंदीचा तो पाण्याच प्रवाह म्हणजे कुशावती नदीचं उगम स्थान. हे मला नंत रकळलं. खालच्या सखल भागात गळाबुडी पाणी साठलेलं. छोट्याशा विहिरीएवढाच विस्तार असेल तिथे साठलेल्या पाण्याच्या तळ्याचा. तिथून पाण्याची निर्झरणी लचकत मुरडत दूर निघून गेलेली. शाळेत असताना अभ्यासलेला, कड्यावरूनउड्या घेणारा, लता-वलयांशी फुगड्या खेळणारा, बालकवींच्या कवितेतला निर्झर मी इथे प्रत्यक्ष पाहिला. मुक्तामालाची सात-आठ वर्षाची आत्येबहीण पण आमच्याबरोबर होती. ती म्हणाली, `’माई न्हायाचं. ‘ मुक्तामालाला घरी माई म्हणत. मी पण डिक्लेअर केलं, `माका पण न्हायाचं. मग आम्ही तिघी त्या गळाबुडी पाण्यात डुंबू लागलो. वरून कोसळणर्या प्रवाहाखाली किती तरी वेळ पाण्याच्या धारा झेलत राहिलो. आस-पास माणसांची वस्तीच काय, चाहूलही नव्हती. एक निळाभोर पक्षी तेवढा पंख फडफडवत दूर उडून गेला, तेव्हा वाटलं, तळ्याच्या पाण्याचा ओंजळभर तुकडाच सघन होऊन आणि चैतन्य रूप घेऊन एखाद्या दूतासारखा आभाळाकडे चाललाय. आस-पास सळसळत्या वृक्ष-वेलींशिवाय तिथे दुसरी कसलीच चाहूल नव्हती. सारा भवताल त्यावेळी आमच्यासाठी स्नानगृह झालेला. बराच वेळ पाण्यात डुंबल्यावर आम्ही बाहेर आलो, तेव्हा लक्षात आलं, आम्ही फिरण्यासाठी बाहेर पडलो होतो, नदीत डुंबण्यासाठी नव्हे. अर्थात बरोबर कपडे नेले नव्हते.
मग आम्ही अंगावरच्या कपड्यांसकट स्वत:ला सूर्यकिरणी वाळवलं. पुढेपाच-सहा वर्षांनी लिरीलची जाहिरात पाहिली, तेव्हा वाटलं, या अनाघ्रात निर्झरणीचा लिरीलच्या अॅड एजन्सीलाही शोध लागला की काय?
दुसर्या दिवशीजांबवलीहूनरिवणला आलो. कशासाठी तिथे गेलो होतो, हे आता आठवत नाही. आठवते ती फक्त केलेली भटकंती. कुणाकुणाच्या कुळागरातून, माडांच्या रायातून, पोफळीच्या बनातून, मेंदीसारखे पायरं गवणार्या लाल चुटूक, नखरेल पायवाटांवरून, पाण्याच्या पाटातून चटक-फटक पाणी उडवत केलेली भ्रमंती आणि आठवतात जागोजागी झालेलीस्वागतं. समोर आलेले पिवळे धमक केळीचे घड, थंडगार शहाळी आणि कोकमसरबत. सुमारे ४९- ५० वर्षापूर्वी गोव्याच्या इंटिरिअरमधून केलेली ही भटकंती, माझ्या सदाचीच स्मरणात राहिलीय.
एका दिवाळीत गोव्याला असण्याचा योग आला. दिवाळीत महाराष्ट्रातील वातावरण जसं चैतन्याने रसरसलेलं असतं, तसं गोव्यात काही जाणवलं नाही. मात्र दिवाळीच्या म्हणजे नर्क चतुर्दशीच्या आदल्या दिवशी, घरोघरीच्या चुलाण्यावर लखखित घासून ठेवलेले पाण्याचे तांब्याचे हंडे दिसले. त्यावर पांढर्या मातीने आणि गेरूने नाजुक नक्षीकाम केलेलं. हंड्याची पूजा केलेली. वाटलं, आता लगेचच खालचं चुलाणं रसरसून पेटवावं. भोवती रांगोळी घातलेल्या पाटावर आडवं लावून बसावं. वासाचं तेल-उटणं लावून अंग छानपैकी चोळून –मोळून घ्यावं आणि हंड्यातील वाफाळलेलं पाणी घेऊन शिणवठा, हवेमुळे जाणवणारी चिकचिक दूर करावी. ताजं-तवानं, प्रसन्न व्हावं, पण या सार्यासाठी आणखी सात-आठ तास तरी मला धीर धरायला हवा होता.
दिवाळीत गोव्यात सगळ्यात जास्त महत्व असतं, ते नर्क चतुर्दशीला. नरकासुरांची मिरवणूक (आपल्याकडे गणपती विसर्जनाची असते तशी) आणि नरकासूर व श्रीकृष्णाचे लुटुपुटीचे युद्ध पाहत आम्ही रात्र जागवली. दुसर्या दिवशी सकाळी सगळं लवकर आवरून प्रा. सोमनाथ कोमरपंतांकडे काणकोणला गेलो. ते साधारणपणे १९८०साल असावं.
कोमरपंतांच्या अंगणात बाहेरच्या उंबर्याशी टेकलो. पांढर्या स्वच्छ मऊ रेतीनं आमच्या पावलांचं स्वागत केलं. वाटलं, चपला काढून तिथेच फतकल मारून बसावं आणि रेतीचा तो मऊ मुलायम स्पर्श अंगभर शोषून घ्यावा. ती रेती, पाढरी वाळू मुद्दाम आणून शोभेसाठी पसरलेली नाही, तर रेतीचंच अंगण आहे, रेतीचीच जमीन आहे, हे लक्षात यायला खूप वेळ लागला. कोमरपंतांकडे इतवकं आग्रहाचं जेवण झालं, की पाय पसरून बसताक्षणीच डोळे मिटू लागले. पोहे आणि मासे यांचे अगणित प्रकार. आम्ही मात्र, गाढवाला गुळाची चव नसल्याने, माशांची कालवणे बाजूला सारली आणि पोह्यांचे विविध प्रकार आस्वादत, कौतुकत राहिलो. जेवल्यानंतर सुस्ती आली, तरी उठलोच. समुद्रावर जायचंहोतं. पाळोळ्याचा समुद्र किनारा कोमरपंतांच्या घराच्या अगदी जवळ. परसात असल्यासारखा. गोव्याला येणर्या पर्यटकांमध्ये कळंगुट, कोलवा, मिरामार हे सागर किनारे महत्वाचे. पाळोळ्याच्या सागर किनार्यावर आम्ही पाऊल ठेवलं आणि अक्षरश: स्तिमित झालो. अगदी अनाघ्रात सागर किनारा. `पदोपदी नवांमुपैती’. पावला-पावलाव रलावण्याचा अनुपम साक्षात्कार घडला. समुद्राच्या पाण्याचा छोटासा प्रवाह वळून आत आलेला. शेतातल्या झडा-झुडपापर्यंत पाणी पोचावं, म्हणून शेता-भाटातून पाट काढतात, इतका छोटा प्रवाह. तो ओलांडून पुढे गेलो, आणि एक ठेंगणी-ठुसकी टेकडी स्वागत करती झाली. टेकडीवर चढून गेलो आणि चारीबाजूला नजर फिरवली. सागरानं चंद्रकोरीचा आकार धारण केलेला. प्रत्येक दिशेलाच काय, प्रत्येक कोना-कोनातून वेगळीच रम्यता. कुठे दूरवर आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेली समुद्राच्या पाण्याची निळाई, कुठे निळ्या पाण्याने वेढलेला, कासवाच्यापाठीसारखा दिसणारा जमिनीचा तुकडा, कुठे हिरवी गोल टोपी पाण्यात पालथी घालावी तशी दिसणारी हिरवीगार छोटीशी टेकडी. सारं भवताल मनस्वी. आत्ममग्न. गोव्यातले सारेच सागरकाठ स्वच्छ सुंदर देखणे. पण पाळोळ्याला अनुभवलेली निरामय मनस्विता मी पाहिलेल्या इतर किनार्यानवर मला प्रतीत झाली नाही. पाळोळ्याच्या सागरकाठाची रमणीयता आज आठवताना आणि तो अनुभव शब्दबद्ध करताना जाणवतय, आपलं अभिव्यक्तीचं सामर्थ्य किती तोकडं आहे. फारच तोकडं.
गोमंतकीय दुसरं साहित्य संमेलन डिचोली इथे झालं. अध्यक्ष होते, पंडित महादेवशास्त्रीजोशी. या संमेलनात माझ्या बहिणीचा सौ. लता काळेचा बालगीतांचा संग्रह `जमाडीजम्मत’ प्रकाशित होणार होता, तिच्या संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा गोव्यात जाणं झालं. या निमित्ताने तिथे गेलेल्या मला संमेलनाचा आनंद मनमुराद घेता आला. प्रकाशन करणारे अध्यक्ष पंडित महादेवशास्त्री जोशी आमच्या जवळिकितले. म्हणजे सौ. सुधातार्इंना माझे मामा बहीणच मानत. त्यामुळे त्यांच्या हस्ते लताच्या पुस्तकाचं प्रकाशन ही गोष्ट आम्हा सर्वांनाच अप्रूप वाटणारी. संग्रहाचं प्रकाशन अगदीऔपचारिकपणेच झालं, पण या संमेलनाच्या निमित्ताने तिथे गेलेल्या मला संमेलनाचा आनंद मनमुराद घेता आला या संमेलनाच्या निमित्ताने तिथे आलेल्या अनेक समान धर्मियांशी माझी नव्याने ओळख झाली. जुन्या ओळखींना नव्याने उजाळा मिळाला. संमेलनाला प्रेक्षकांची खूप गर्दी होती, तरीही वाटलं, इथल्या वातावरणातला नित्याचा निवांतपणा ही गर्दीदेखीलं पांघरून बसलीय. व्यासपीठावरचे कार्यकम रंगले, त्याहीपेक्षा अधीक रंगल्या खोल्या-खोल्यातून झडणार्या गप्पांच्या मैफली आणि हो, कवितांच्यासुद्धा. विठ्ठल वाघ यांनी व्यासपीठावरून सादर केलेली आणि नंतर पोरा-टोरांच्या, नवकवींच्या आग्रहामुळे खोल्या-खोल्यातून पुन्हा पुन्हा म्हंटलेली, खानदेशी लयकारीची डूब असलेली कविता `’मैना उडून चालली आता उदास पिपय’ ही कविता आणि नंतरच्या काळात` ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातलं त्यांचं लोकप्रिय झालेलं गीत `काळ्या मातीत मातीत तिफण चालतय.. ‘ या कविता म्हणजे खानदेशी लयकारीतलं त्यांचं तेव्हाचं कविता-वाचन अजूनही स्मरणात आहेत. प्रा. विठ्ठल वाघ हेही व्यासपीठावरला भारदस्तपणा जरा बाजूला ठेवून, शिंग मोडूनवासरात शिरले. बा. सा. पवार, पुष्पाग्रज, मेघना कुरुंदवाडकर, चित्रसेन शबाब या सार्या पोरांबरोबर त्यांच्यातलेच होऊन गेले. गोव्यातील अनेक नवोदित कवींचं कविता वाचन, व्यासपीठापेक्षा, खोल्या- खोल्यात रंगलेल्या अनौपचारिक बैठकीतून अधीक रंगलं. त्या सगळ्यांच्या कविता ऐकता ऐकता, एक गोष्ट सहजच जाणवून गेली. अलिकडे बर्याच कविमंडळींच्या काव्यातून ऐकू येणारा कटुतेचा सूर, विद्रोहाची, विस्फोटाची जहालता, या गोमंतीय कविमंडळींच्या कवितेतून अगदी तुरळकपणे आली आहे. मुक्तछंदापेक्षा वृत्तबद्ध, संगितात्मक रचना करण्याकडे त्यांचा अधीक कल दिसला. मनात आलं, हाही त्यांच्या भवतालचाच प्रभाव असेल का? समुद्राची गाज तालबद्ध. माडांचं डोलणं तालबद्ध. वार्याचं वाहणं तालबद्ध. या सार्या लयकारीनं भारलेल्या परिसरात, मनात उमटणार्या भावनाही लय घेऊनच येणार. या आश्वासक निसर्गाच्या सहवासात माणूस आनंदित होईल. त्याच्या गूढतेने चकित होईल. क्वचित दिङ्मूढही होईल, पण त्याच्यात कडवटपणा येणार नाही. कधीच नाही. डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात, गोव्यातील बुजुर्ग साहित्यिक, बा. द. सातोस्कर यांचा परिचय झाला. नुसता परिचयच नव्हे, तर इतकी आत्मीयता आणि जिव्हाळा निर्माण झाला, की त्या क्षणापासून ते मला मुलगीच मानू लागले. दादा सातोस्कर या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा गोव्यातखूपच दबदबा. फार मोठ्या माणसांशी माझं सहसा जमत नाही. जमतनाही, म्हणजे काय, तर माझ्यातील न्यूनगंडाची भावना अधीक गडात होत जाते. वागता-बोलताना सतत अंतर जाणवत राहतं. त्यांच्याशी वागता-बोलताना एक प्रकारचं दडपण येतं. धाकुटेपणाची भावना मनाला सतत वेढून राहते. पण दादांचं मोठेपण असं, की हे अंतर त्यांनी स्वत:हून तोडलं आणि ते आपल्या मनमोकळ्या वागण्यानेआणिबोलण्याने धाकुटेपणाच्या जवळ आले. `उदंड साहित्य प्रेम’ हाच केवळ आम्हालाजोडणारा भावबंध. एरवी त्यांची साहित्य सेवाकिती प्रचंड. एक लेखक म्हणून, संपादक म्हणून, प्रकाशक म्हणून. मी तर अजून धुळाक्षरेच गिरवित होते.
पुढच्याच वर्षी मंगेशीला झालेल्या गोमंतकीय तिसर्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. संमेलनाला मला त्यांनी आवर्जून निमंत्रण दिले होते. संमेलनासाठी तिथे जमलेले गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी, कृ. बा. निवुंâब अशा किती तरी मोठमोठ्या लोकांशी त्यांनी माझी ओळख`ही माझी मुलगी उज्ज्वला. कथा-कविता फार चांगल्या लिहिते’, अशी करून दिली. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्या या व्यक्तीने तितक्याच तोला-मोलाच्या महान व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, मला अगदी संकोचल्यासारखंच नव्हे, , तर ओशाळल्यासारखंही झालं. त्यांच्या एका गोवेकर मित्राने थट्टेने विचारले, `आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला झाली तरी केव्हा?’ ते सहजपणे म्हणाले, `गेल्या वर्षीच्या डिचोलीच्या साहित्य संमेलनात!’
मनात आलं, नातं जोडणं सोपं असतं, पण आपल्याला निभावणार आहे का ते? ज्या अभिमानाने त्यांनी माझी ओळख एक लेखिका म्हणून करून दिली, तो अभिमान सार्थ ठरेल, असं लेखन खरोखरच होणार आहे का आपल्या हातून?
बा. द. सातोस्करांशी मुलीचं नातं जोडल्यानंतर साहजिकच त्यांचा गोवा माझे`माहेर’ झाले. माझी मामेबहीण लताताई तर मडगावला होतीच होती. एके काळची माझी स्वप्नभूमी अशी माझं `माहेर’ बनली. माझ्या तापलेल्या, त्रासलेल्या मनाला गारवा देण्यासाठी या माहेराने आपलीहिरवी माया माझ्यासाठी पसरून ठेवली. गोव्यातील करंजाळे येथील दादांचे घर `स्वप्नगंध’ आणि घरातले दादा-आई जेव्हा आठवतात, तेव्हा तेव्हा विजय सुराणाच्या कवितेच्या ओळी अपरिहार्यपणे ओठांवर येतात,
‘असंमाहेर ग माझं, गाढ सुखाची सावली
क्षणभरी पहुडाया, अनंताने अंथरली. ’
अलिकडे गोव्याच्या प्रत्येक ट्रीपमध्ये गोव्याचं हिरवेपण कमी कमी होऊ लागलेलं जाणवतय. त्यातच नुकतीच अरुण हेबळेकरांची बहुदा, `रुद्रमुख’ ही कादंबरी वाचनात आली. कादंबरी वाचून झाली आणि मन अतिशय उदास, अस्वस्थ झालं. कादंबरी होती, गोव्यात वाढत जाणार्या प्रदूषणाविषयी. कादंबरी वाचली आणि जिवाचा थरकाप झाला. गोवा- माझं माहेघर, इथं मिळणारं क्षणाचं सुख, गारवा, डोळ्यांना लाभणारी तृप्ती, अनंत काळाच्या ताणाचा नि मनस्तापाचा त्याने विसर पडतो. मग संजीवनी मिळाल्यासारखं ताजं-तवानं, टवटवित होता येतं. मग वाटलं हे क्षणाचं सुख तरी आपल्याला अनंत काळ लाभणार आहे का? की तेही प्रदूषणाच्या धुक्याने वेढलेलं असेल.
आता इतक्यावर्षानंतर गोवा आता पहिल्यासारखा राहीला नाही, असे गोव्याचेच लोक म्हणताहेत. त्यात आता बा. द. सातोस्कर म्हणजे दादा राहिले नाहीत. माझ्या बहिणीने लताने ८-१० वर्षापूर्वी गोवा सोडून पुण्याला बिर्हाड केले. आता तर तीही तिथे उरली नाही. आता माझे गोव्याचे माहेर क्षणभरी पहुडायाही उरलेनाही.
☆ व्रतोपासना – १. मानवता ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आज सकाळच्या बातम्या ऐकल्या आणि मनात विचार आले. बातमीच तशी होती. जसे हवामान सांगतात तसे प्रत्येक ठिकाणची प्रदूषण पातळी सांगत होते. आणि हा खूप जास्त धोक्याचा इशारा आहे असेही सांगत होते. आणि असा इशारा मोठ्या सणाच्या नंतर नेहेमीच दिला जातो.
गेले काही दिवस सगळीकडे दीपावली आनंदोत्सव चालू आहे. वर्षातून एकदाच येणारा मोठा सण. सगळे मोठ्या आनंदात साजरा करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सण साजरे करतो. त्यात वावगे काहीच नाही. मुलांना शाळेला सुट्टी पण असते. आपल्या परंपरा, त्याचे महत्व लक्षात घेणे या दृष्टीने आपले सण फार महत्वाची कामगिरी बजावतात.
पण गेले काही वर्षे आपण जर निरीक्षण केले तर त्यातील गाभा किंवा उद्देश नष्ट होत चाललेला दिसत आहे. हल्ली तर असे सण नकोसे वाटतात. कारण त्यात दिखावाच जास्त वाटतो. आणि समाजाला होणारा त्रास जास्त दिसतो. सगळे सण साजरे करताना विद्यार्थी, आजारी, वृध्द यांचा विचार कुठेही नसतो. आणि तसे कोणी सुचवले तर दार लावा म्हणतात. आणि जास्त त्रास होईल असे करतात.
खरे तर दिवाळीत प्रत्येक दिवशी वेगळ्या निसर्ग देवतेची पूजा असते. ते लक्षात घेऊन आचरणात आणणे आवश्यक आहे. या निमित्ताने काही व्रते मनात आली. व्रत वैकल्ये आपण आचरणात आणतो. त्या त्या पूजा, उपासना, उपास करतो.
व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना इत्यादी साठी
विशिष्ठ नितीनियमांनी करावयाचे आचरण. व्रत हे विशिष्ठ काळासाठी, विशिष्ठ तिथीस, विशिष्ठ महिन्यात, विशिष्ठ वाराला किंवा विशिष्ठ पर्वात आचरले जाते. याचे निरनिराळे प्रकार आहेत. व त्यांचे उद्देश पण वेगवेगळे असतात.
हे उत्तमच आहे. पण त्यात काळानुसार काही बदल करावे असे वाटते. या सणाच्या निमित्ताने एक व्रत जे मी अनेक वर्षे आचरणात आणत आहे. त्याचा विचार व्हावा असे वाटते.
मानवता – याचे महत्व मला एका छोट्या मुलीकडून जास्त पटले. आम्ही शिक्षक शाळेतील मुलांची स्वतःच्या मुलांच्या प्रमाणे काळजी घेत असतो. बरेचदा आमच्या शाळेतील मुले काहीही न खाता शाळेत येतात. त्याला अनेक कारणे असतात. पण आम्ही शिक्षक कित्येकदा स्वतःचा जेवणाचा डबा अशा मुलांना देत असतो. असेच एकदा मी एका मुलीला डबा दिला. तिने तो घेतला आणि त्यातील निम्मा डबा ( भाजी पोळी) एका कागदावर काढून घेतली. आणि डबा परत दिला. तिला जेव्हा विचारले असे का केले? त्यावेळी ती म्हणाली, मी सगळा डबा खाल्ला तर तुम्ही काय खाणार? तिच्या या उत्तराने मला विचार करायला भाग पाडले. स्वतःला भूक लागलेली असताना दुसऱ्याचा विचार करणे किती महत्वाचा संस्कार आहे. यात मला तिच्यातील मानवता जाणवली.
अशी मानवता आपण कुठे कुठे दाखवतो असे म्हणण्यापेक्षा कुठे कुठे विसरत चाललो आहोत याचा विचार सर्वांनीच करावा असे वाटते. कोणताही आनंद साजरा करताना लाखो रुपयांचे फटाके फोडण्या पेक्षा काही गरजवंत लोकांना काही गोष्टी देऊन आनंद मिळवू शकतो. आणि आपल्या प्रमाणे त्यांचीही दिवाळी थोडी फार आनंदी करु शकतो. घरातील काम करणारे यांची दिवाळी तर आपण आनंदी करतोच. पण आज समाजात काही मंडळी अशी आहेत की कोणतेही अनुदान न घेता अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करतात. त्या मुलांना आपण आनंद देऊ शकतो. त्यांना फराळ, नवीन कपडे दिले तर त्यांच्या चेहेऱ्यावर जो खरा आनंद दिसतो तो आपल्यालाही आनंदी करतो.
खरे तर मानवता हे फार मोठे आणि महत्वाचे व्रत आहे. यावर लिहीण्या सारखे पण खूप आहे. आज फक्त दिवाळीत काय करु शकतो, आपला आनंद मिळवून, प्रदूषण टाळून आपल्या मुलांवर न कळत चांगले संस्कार कसे करु शकतो या विषयी माझे विचार व्यक्त केले आहेत.
सर्व जगावर अधिराज्य करत हाहाकार माजवत होता. माणसे मरत होती, माणसं जगत होती, माणसं धडपडत होती, माणसांचं जे काही व्हायचं ते होत होतं. पण त्यालाही अंत होताच. येणार येणार म्हणून येत असलेली आणि टोचणार टोचणार म्हणून टोचणीला सुरुवात झालेली लस आली. जिच्या आगमनाकडे आपण डोळे लावून बसलो होतो ती, होय तीच आली. आणखी एखादा विषाणू अजून येईल, झुंडीच्या झुंडी येतील. माणसांना टोचून जातील आणि संपून जाईल तो विषाणू. भविष्यात, उद्या, परवा कधीतरी. नक्कीच जाईल.
पण
असा एक विषाणू आपल्याला लक्षातही येत नाहीये. तो शिरतोय सगळीकडे. प्रसार माध्यमातून, प्रचार माध्यमातून, निवडणूक प्रचारातून, शिमग्याच्या बोंबाबोंबीतून. कुणातरी दोघांच्या संभाषणातून, पुढाऱ्यांच्या भाषणातून, कोणत्याही धर्माच्या धर्म प्रचारातून, उपदेशातून, निवडणुकीतून, राजकारणातून, गुंडगिरीतून आणि तथाकथित सभ्य माणसांच्या अंतर्मनाच्या गाभार्यातून. तो पसरतोय माणसा-माणसांच्या गप्पातून, छापील माध्यमातून, व्हाट्सअप मधून, फेसबुक मधून, किंवा जी जी काही समाज माध्यमे आहेत त्या सर्व माध्यमातून. तो फिरतोय, पसरतोय, झिरपतोय आणि माणसाचे जीवन कठिण करतोय. शांततेनं जगण्याच्या सर्व सोयी नष्ट करतोय.
यावर औषध नाही. लस नाही. एवढच नाही तर, यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे खून होतायत. दिवसाढवळ्या खून होतायत.
मग नवीन महामानव तरी जन्माला यावेत. परंतु त्यांच्याही भ्रूणहत्या होत आहेत. महामानव जन्मालाच येऊ नये म्हणून गर्भसंस्कारा पासूनच त्यांचं महात्म्य मारून टाकायचे प्रयत्न चालू असतात.
यावर उपाय शोधायला हवा, संशोधक निर्माण व्हावेत त्यांना संरक्षण मिळावे. अशी इच्छा धरण्याशिवाय आपल्या हातात काय आहे ? परंतु आशा करूया यासाठी कोणतीही लस आणि औषध नसलं तरी लोकांची नैसर्गिक सहनशक्ती प्रचंड मोठी आहे. ते वाट पाहतील कितीतरी वाट पाहतील त्यावरील उपायाची
किंवा
एका नव्या प्रेषिताची.
खरंच तो जन्म घेईल ? की या मानवजातीचा अंतच जवळ आला आहे ? मानवाचं नष्टचर्य हे या नव्या विषाणूतच दडलं आहे का?
घराच्या पडलेल्या भिंती बुरुजाची आठवण करून देणा-या.. त्यावर वाढलेलं.. वाळून गेलेलं गवत.. हिरवळ चिकटवल्यासारखा भिंतीचा हिरवा रंग ..अधून मधून पडलेली ढेखळं.. त्यात न पोहोचणारी सूर्याची किरण.. आणि गालावरच्या खडीसारखं अंधार सावल्यांचा त्यातलं वास्तव्य ..ही सारी खंडाळ्याची सौंदर्य स्थाने!
ह्या खंडाळ्याभोवती अनेक कथा आहेत .मातीच्या ढिगार्याखाली धनाचा हंडा आहे आणि त्याचा प्रकाश रात्री काही क्षणापुरताच पडतो. ज्याच्या नशिबात तो प्रकाश असेल तो त्याला दिसतो. मात्र हंडा दिसत नाही वगैरे. हा प्रकाश त्या धनावर लक्ष ठेवणाऱ्या शेषनागाच्या मस्तकावरचा मनी चमकला की पडतो. रात्री बेरात्री हा नाग बाहेर पडतो.. मोहल्लातल्या तिसऱ्या पिढीने त्याला पहिल्याच सांगतात. देशमुखाचा वाडा असतांना जशी या ठिकाणी रौनक होती, तशी आता राहिली नाय !असे म्हातारे सांगतात.
देशमुख बुढीची जमा असली तरीपण बुढाचं कारभारी होता.. चांगला ५० जणांचा कुटुंब कबिला असलेला तो वाडा होता म्हणे.. पण आज एक म्हणून शिल्लक नाही.. कशी राहणार पडलेल्या घरात आणि देशमुखकी थाट आता थोडीच राहिला शिल्लक ?देशमुख नागपूरला गेला मात्र त्यानं जागा विकली नाही. ती खंडाळ्याच्या रूपात गावाच्या मधोमध आजही तशीच आहे.
रात्रीच्या वेळेला खंडाळ्याच्या बुरुजावरल्या बाभळीवर घुबडांचे घुत्कार ऐकू येऊ लागले की रडणाऱ्या मला आई म्हणायची ‘भूत आलं रे बाळू बाभळीवर.. रडणाऱ्या पोरास्नी नेते बरं आणि उलटं टांगते रात्रभर बाभळीवर.. झोप बघू आता.’ आईच्या ह्या फुसक्या धमकीचा माझ्यावर जबरदस्त परिणाम व्हायचा. मी श्वास घेताना सुद्धा तो त्या बाभळीवरल्या भुताला ऐकू जाईल म्हणून दाबून ठेवायचो आणि मग गुदमरायला लागलं की आईच्या कुशीत तो श्वास दडवायचो..खंडाळ्याची काळीबाभूळ साऱ्या मोहल्यातील पोरांना चूप ठेवण्यासाठी वापरलेला हुकमी एक्का होता. लहानपणी लपाछपी खेळण्यासाठी खंडाळं आम्हांला जणू पूर्वजांकडून मिळालेलं वरदान ठरलं होतं. खंडाळ्यात लपलं की खंबा वाजवायला जाणाऱ्या गड्याला तो परतेस्तोवर कुठे गेले? याचा पत्ताच लागायचा नाही आणि तो चुकून त्या खंडाळ्यात घुसलाच तर पोरं त्याला विविध आवाज काढून आपापल्याकडे त्याचं लक्ष वेधयाचे आणि गोंधळलेल्या त्याला अशा मध्ये” रेश” बसायची. विचारा पुन्हा डाव द्यायला म्हणून खंब्याकडे जायचा .. पुन्हा तेच त्याच्यावर ‘ रेश’ यायची तो चिडायचा आणि मग खंडाळ्यात लपायचं नाही बा.. नाहीतर मी खेळत नाही.. म्हणून पूर्णविरामापर्यंत पोहोचायचा ..पण पोरं कुठे सोडतात ‘डाव ..डाव.. पचव्या ..सुपाऱ्या गिटक्या ..’ म्हणून त्याची मिरवणूक काढायचे ..त्याला भंडावून भंडावून सोडायचे.. मग खूप चिडलेला तो ‘साले ,हुटींनचेहो, लपा बरं आता.. घ्या बर आता.. म्हणत पुन्हा धावतच खांब्याकडे पळायचा.
मोठ्यांना खंडाळ्याबद्दल काय वाटतं कुणास ठाऊक? मात्र आमचं ते खंडाळ जीव की प्राण होतं.. त्याच्यावर आम्ही काय काय नाही म्हणून खेळलो.. लपाछपी, किल्ला किल्ला, वाडा वाडा, चोर पोलीस, भाजीपाला, टिप्पर गोटी..बाजार बाजार, बाहुला बाहुली सुद्धा ! पडलं धडलं तरी येथील माती आम्हांला जास्त मार लागू देत नाही.. पडलेल्या जागी” थू थू” करून थुंकायचं आणि जोराने उजवी लाथ आपटून पुन्हा स्वतःलाच लगावून घ्यायचं .. अन् पडलेल्या जागेचा कसा बदला घेतला म्हणून खुश व्हायचं.. बस एवढं केलं ना तर मार म्हणून मुद्दाम लागतच नाही.
रात्री अंगावर घुबड बसणाऱ्या काळ्या बाभळीची मात्र दिवसाच्या उजेडात मुळीच भीती वाटत नसे.. तिची खंडाळ्यात पडलेली मोरपंखी अंधार सावली आम्हां मुलांना मायेचा छत वाटे.. उन्हात खेळू नका रे सांगणाऱ्या प्रौढ आवाजांना काळी बाभूळ तोंड बंद करायला ठेवायला सांगे. बाभूळ एवढी विशाल की खंडाळ्याचा अर्धा अधिक भाग तिने व्यापलेला आहे. आपल्याला प्रश्न पडतो बाभळीसारखं झाड वाड्याच्या मधोमध देशमुखांना कां ठेवलं असावं? तेव्हा त्याला काही उत्तर मिळत नाही. देशमुखचा वारसा म्हणून काळी बाभूळ मानायची तेव्हाच तर तिच्यावरच्या घुबडाचा आम्हां मुलांना वचक राहायचा आणि ही बाभूळ अशी एक अनामिक दबाव आमच्यावर ठेवायची ..त्यामुळे कसं कां होईना काही प्रमाणात त्या जमिनीचे रक्षण मात्र व्हायचं.. हे खरं आहे!
अमावस्येच्या रात्री मात्र मोठ्यांसह कुणीही खंडाळ्याकडे भटकायचं नाही. पौराणिक कथेतील खंडाळ्यासारखं तेव्हा हे खंडाळ कुणीतरी काहीतरी गुपित गुंडाळून गावाच्या अगदीमध्ये दडवून ठेवलंय असं वाटायचं ..अमावस्याला खरोखरच देशमुखचा आत्मा येथे येऊन दर महिन्याला आपली जागा पाहून जातो ..अंधारात गडप झालेल्या त्या काळ्या बाभळीवर तो रात्रभर बसून सारं सारं पाहत असतो.. तोच पोरांनी उकरलेली आणि गाववाल्यांनी खणून नेलेली माती रात्रभर सावरीत असतो.. देशमुख ह्या जमिनीवर लय जीव आहे ..तो मेला तरीबी त्याचा आत्मा येथे भटकत राहतो म्हणून तिकडे कोणी जायचं नाही हा ठरलेला शिरस्ता..!
खंडाळ्याला आता कुणी ओळखत नाही तेथे असलेली भितकांड भुरभुर पडणाऱ्या मातीसकट कधीचीच भुईसपाट झाली आहे.. काळी बाभूळ तिचा तर पत्ताच नाही .. कोणीतरी रातूनच अख्खी बाभूळ कापून नेल्याचं सांगतात लोक ..मुलांचे घोळके अंगाखांद्यावर खेळवत एका सुखी कुटुंबाची किल्ली असलेलं खंडाळ.. आता जमीन दोस्त झालेलं आहे . बिन मालकाची जागा बिन नवऱ्याची बायको ह्या दोन्ही जगाला स्वस्तच! तसंच ह्या खंडाळ्यावर अतिक्रमण वाढत गेल आहे. नगरपालिकेने रितसर हे खंडाळ ताब्यात घेतलं तर म्हणतात! मात्र त्यावर पालिकेचा नियोजित बगीचा अजून उगवायचा आहे ..उगवत आहे फक्त बेशरमाच्या झाडासारखी अतिक्रमणवाल्यांची गर्दी आणि मिळेल तो कापतोय त्या काळ्या बाभळीचा शिल्लक राहिलेला भल्ला मोठा काळा बुंधा ..मात्र बुंधा कापणाऱ्यांनी मुळे सलामत असलेली ती बाभूळ कधीही बहरून येऊ शकते तिच्या काळ्याभोर.. मोरपंखी अंधार सावल्यासह.. देशमुखांच्या जमेसह आणि बाभळीवरल्या भयकारी घुबडासह याची जाणीव ठेवावी.. एवढच महत्त्वाचं वाटतं आणि सांगावसं वाटतं…