मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

 ☆ विविधा ☆ बदलता दृष्टीकोन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

ऐका सख्यांनो, ‘तिची’ कहाणी. ‘ती’ तुमचीच एक सखी. तिची कहाणी पण संसार, मुलं-बाळं, जिवलग, निसर्ग, कुटुंबाचे हीत, परमार्थ, व्रत,त्याग,साफल्य या भोवतीच फिरणारी.

तिचे माहेर छोट्याशा गावातले.  घरी धार्मिक,अध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक अशा सर्व विचारांचा मेळ. सर्व देवधर्म, पूजाअर्चा, परंपरा श्रद्धेने जपणारे आई-वडील. इतरांच्या मदतीला धावणारे, सर्वांच्या उपयोगी पडणारे, गावाचा आधारस्तंभ होते. धार्मिक व्रतवैकल्यांबरोबर सामाजिक व्रताचा वसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला. वारीची परंपरा, त्यातले मर्म समजले.

लग्नानंतर ती मोठ्या शहरात, मोठ्या गोतावळ्यात गेली. तिथले वातावरणही पूर्ण श्रद्धाळू, धार्मिक. तिच्या सासूबाई त्या काळाप्रमाणे कमी शिकलेल्या, सण-वार,परंपरांच्या धबडग्यातल्याच.पण तरीही अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या. असंख्य पुस्तकांच्या वाचनाने विचारात, आचारात काळानुरूप बदल केलेल्या. जुन्या कालबाह्य गोष्टी त्यांनीच सोडून दिलेल्या होत्या. त्यामुळे सुनांना त्यांनी कसलीच बंधने कधी घातली नाहीत. ती घरात सर्वात लहान. त्यामुळे सासूबाई नंतर कुळधर्म मोठ्या घरी सुरू झाले. सर्वांनी आपापल्या घरी करण्याऐवजी एका घरी करताना सर्वांनी एकमेकांकडे जाणे, या निमित्ताने नाती जपणे हे तिने कटाक्षाने पाळले. घरामध्ये, नातलगांमध्ये मिळून-मिसळून, सर्वांना धरून राहण्याचे व्रत ती अखंडपणे जपते आहे. या व्रतवैकल्यांचा अंतिम उद्देशच सर्वांचे हित,कल्याण हा आहे. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे खरे आहे.

तिने पुढच्या पिढीला श्रद्धा जपायला शिकवले आहे. प्रथेचे अवडंबर न करता काळानुसार जे शक्य आहे ते मनोभावे करा. माणसातला, स्वत:च्या मनातला देव जपा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. तो सदैव पाठराखण करतो हेच मनी बिंबवले आहे.

सण उत्सव, व्रतवैकल्ये हवीत. नियम, बंधने, संयम अवश्य हवा. पण या सर्वांसाठी निसर्गाला हानी पोहोचवू नये असे तिचे ठाम मत आहे. फुलं- पानं, फांद्या हव्यात म्हणून झाडांना ओरबाडायचे, निर्माल्य नदीत सोडायच्या निमित्ताने सगळा कचरा, घातक रंगांच्या प्लॅस्टरच्या मूर्ती पाण्यात सोडून जलप्रदूषण करायचे, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करायचे ही कसली आलीय श्रद्धा ? यामुळे उत्सवांच्या मूळ उद्देशालाच दूर सारले जाते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्सवाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला हवे असे तिला वाटते.

या सणावारांना ऋतू बदलानुसार योग्य खाद्य पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. ही गोष्ट आहारशास्त्राशी निगडित आहे. ती निश्चितपणे पाळावी. चातुर्मासाच्या निमित्ताने अनेक नेम धरले जातात. जे आरोग्यास योग्य ते अवश्य करावे. पण या जोडीला आणखी काही नवीन नेम धरता येतील. जास्ती समाजाभिमुख होऊन काही वेगळे संकल्प करावेत असे तिला वाटते.

असे उपक्रम म्हणजे — हॉस्पिटलमधील अॅडमिट पेशंटना भेटणे.एखादे फूल, फळ देऊन ‘लवकर बरे व्हा’ सांगत मानसिक उभारी देणे.

अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील लोकांना भेटणे.त्यांना चांगली गाणी, गोष्टी ऐकवून मनमोकळ्या गप्पा मारणे.

शाळा-शाळांतील मुलांना चांगली गाणी, गोष्टी, कथा ऐकवणे. त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे.

घराबाहेर पडू न शकणार्‍या ज्येष्ठांना आवर्जून जाऊन भेटणे.

दर आठवड्याला एका नातेवाईकाला जाऊन निवांतपणे भेटणे.जवळीक वाढवणे.

सर्वांनी मिळून देऊळ, बागा अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे.

झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवणे. यासारख्या कितीतरी उपयोगी गोष्टी करता येतील.

“मनी वसो रामनाम, हात करो पुण्यकर्म” हेच तर ब्रीद असावे.  पुढच्या पिढीला पण अशा विचारांची दीक्षा देऊन त्यांना या कामात सहभागी करून घ्यायला हवे. ज्याला ज्या मार्गाने जमते त्या मार्गाने त्याने समाजसेवा करावी.

तिने समाजसेवेचा वसा आई-वडिलांकडून घेतला आहे. तो ती वेगवेगळ्या मार्गाने अमलात आणते. आपण ‘समाजाचे देणे’ लागतो ते फेडायचा ती यथाशक्ती प्रयत्न करते. शेवटी समाज म्हणजे कोण?  तुम्ही आम्हीच ना! म्हणून या चांगल्या कामांची स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे तिचे मत आहे.

तिला ‘खुलभर दुधाची’ कहाणी फार आवडते. प्रत्येकाने आपल्या श्रद्धा जपत उत्सवाच्या निमित्ताने थोडा थोडा हातभार लावला तर समाज प्रबोधन, समाजरक्षण, पर्यावरण रक्षण यांचा हा गोवर्धन निश्चितपणे उचलला जाईल.

तेव्हा मैत्रिणींनो आनंदात समाधानात सण साजरे करूयात.धन्यवाद.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

 ☆ विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

आविष्कार एका सृजनाचा

छान किती दिसते फुलपाखरू

मी धरु जाता येई न आता…. फुलपाखराचं असं यथार्थ वर्णन एका कवितेत केलेलं आहे. रंगीत फुलपाखरांची दुनिया मोठी अजब असते. काही दिवसांचे छोटेसे आयुष्य असणारी फुलपाखरं जन्म घेतात ती एकदम मोठी होऊनच! इतर प्राण्यांसारखा ‘बालपण’ हा टप्पाच नसतो त्यांच्या आयुष्यात; आणि या कीटकवर्गी जीवाचा जन्म सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो. अंडी-अंड्यातून अळी-अळीचा कोष आणि कोषातून फुलपाखरू असा तो प्रवास! मागे एकदा एका फुलपाखरू उद्यानात फुलपाखराच्या या जीवनावस्था जवळून प्रत्यक्ष पाहता आल्या होत्या. झाडांची कुरतडलेली, अर्धवट खाल्लेली पानं ही बरेचदा फुलपाखराच्या अळीचा प्रताप असतो हेही तेव्हा कळलं होतं. तेव्हापासून अशी पानं पाहिली की ही कोणत्या बरं फुलपाखराच्या अळीने खाल्ली असतील या विचाराने कुतूहल जागृत होऊ लागले..  भविष्यात एका सुंदर फुलपाखराला जन्म देण्यासाठी झाडाची पानं विद्रूप करणाऱ्या अळीला पानावरून झटकून टाकण्याची भावना नाहीशी झाली.. असो..

गवतावर बागडणारी पिवळी फुलपाखरे प्रत्येकाने पाहिली असतील. ‘ग्रास यलो’ फुलपाखरे म्हणतात त्यांना. यातही बरेच प्रकार आहेत. याच प्रकारच्या एका फुलपाखराच्या जन्माची ही गोड कहाणी….

माझ्या घरातल्या कुंडीतील शिरीषाच्या रोपावर एक दिवस तीन चार हिरव्यागार उदबत्तीच्या पातळ काडी सारख्या जेमतेम एक सेंटीमीटर लांबीच्या अळ्या दिसल्या. जेमतेम अर्धा फूट उंचीचे ते रोप आणि त्याला चार-पाच चिंचेच्या पानासारखी संयुक्त पानं, छोटी छोट पर्णदलं असणारी.. या एवढ्याच विश्वात या अळ्या दोन-चार दिवस मनसोक्त हुंदडत होत्या; बाजूच्या इतर झाडांकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. त्या इटुकल्या झाडाच्या पानांचा फडशा पाडत होत्या आणि दिवसागणिक लठ्ठ होत होत्या. ‘खादाड’ हाच शब्द अगदी बरोबर लागू पडतो त्यांना. मी वाट बघत होते आता पुढे काय होणार? ही अळी कोष कुठे बनवणार? रोज सकाळी उठल्यावर आधी झाडाचे निरीक्षण करत होते. एके दिवशी पाहिलं तर एकही अळी दिसेना! म्हटलं कोष बनवायला दुसरीकडे गेल्या की काय? म्हणून आजूबाजूची झाडं न्याहाळू लागले पण काsही दिसेना.. मग पुन्हा शिरीषाच्या रोपाचंच पान अन् पान बारकाईने पाहू लागले; आणि काय? अगदी पानासारखे दिसणारे, पानाच्या आकाराचे दोन हिरवे कोश मला दिसले आणि एका हिरव्या देठाला बिलगून असलेली एक लठ्ठ अळी, हालचाल न करता अगदी निपचीत पडून असलेली; पटकन दिसणारच नाही अशी! तिच्याकडे पहात मी तशीच उभी राहिले अन् तेवढ्यात अळीची जोरदार हालचाल सुरू झाली!! अळीच्या  शरीराचे एक टोक देठाला चिकटून राहिले आणि दुसरे टोक  अधांतरी लोंबकळत; त्यातून भराभर स्त्राव पाझरू लागला आणि त्यात अळी गुरफटली जाऊ लागली. वीस-पंचवीस सेकंदांचा खेळ!! अळी ‘अळी’ राहिलीच नाही, त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा त्रिकोणी आकार दिसू लागला. त्रिकोणाचे अधांतरी टोक तेवढ्यात वर देठाकडे सरसावले आणि पुन्हा खाली आले. पाहते तर काय? एका बारीक धाग्याने आता ते टोकही देठाला जोडले गेले होते! विस्फारलेल्या नजरेने मी हा सगळा प्रकार पाहत होते. अगदी अद्भुत!!! हुबेहूब पानासारखा दिसणारा तिसरा कोष आता त्या इवल्याशा रोपावर लटकत होता; खादाड अळी कोषात बंदिस्त झाली होती….

आता रोज मी त्या कोषाचे निरीक्षण करू लागले. चार दिवस उलटले. प्रत्येक दिवसागणिक कोषाचा रंग पालटताना दिसत होता. हिरवा कोष सुरुवातीला पिवळसर होत गडद पिवळा झाला. आणखी एक-दोन दिवसांनी त्या पिवळ्या कोषात काळी कडा उमटलेली दिसली. मी निरखून पाहत होते काही हालचाल दिसते का ते आणि माझे अहोभाग्य की निसर्गाच्या सृजनाचा एक मनमोहक आविष्कार माझ्या डोळ्यासमोर साजरा झाला. एका क्षणात या कोषाच्या, धाग्याने जोडलेल्या टोकातून पिवळी पिवळी लड खाली घरंगळली. रेशमी कापडासारख्या त्या पिवळ्या गुंडाळीतून ताबडतोब दोन काळ्या अँटिना(स्पृशा) उंचावल्या आणि आणि दोन इवल्या पायांची पकड कोषावर घट्ट बसली. पिवळा अपारदर्शी कोष आता रिकामा होऊन पारदर्शक झाला. पिवळी गुंडाळी आता हळूहळू मोकळी होऊ लागली आणि काही सेकंदात काळ्या किनारीचे ठिपकेदार पिवळे पंख पसरले गेले. आपल्या पायांच्या तीन जोड्यांच्या आधाराने कोषाला बिलगलेले, पूर्ण वाढ झालेले ग्रास यलो फुलपाखरू या जगात अवतरले होते.

अर्ध्या-एक मिनिटात घडलेले हे अद्भुत पाहून मी आनंदाने ओरडायचीच बाकी होते. एक बाय अर्धा सेंटीमीटर आकाराच्या कोषातून चांगले तीन सेंटीमीटर लांब पंख असलेले फुलपाखरू बाहेर आले होते. जवळ जवळ तासभर ते तसेच रिकाम्या कोषात पाय रोवून होते; अधून-मधून पंखांची उघडझाप करत होते. एका क्षणी ते झटकन कोष सोडून उडून गेले आणि दूर पसार झाले…

दिवाळीच्या मुहूर्तावर अशाप्रकारे दोन सुंदर जीवांचा आमच्या घरी जन्म झाला होता, दिवाळीचा आनंद त्यांनी दशगुणित केला होता.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझे कॉलेजला जाणे माझ्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक होते.  मी एकटी जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी मैत्रिण बरोबर असेल तरच नियमीत घडे.  समजा कोणी आली नाही, तर वाट पहाण्याशिवाय मी काही

च करू शकत नसे.  मात्र माझी ही अडचण बाबांनी ओळखली आणि उशीर होतोय हे लक्षात आल्यावर ते मला लुनावरून कॉलेज पर्यंत सोडायला यायचे, वर्गापर्यंत सोडायची त्यांची तयारी असायची, पण मी दिसले की कॉलेज मधली कुठलीही मैत्रिण, ओळख असो वा नसो, मला हात द्यायला यायची.  त्यामुळे सगळ्याच माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या.

शाळे मध्ये माझ्या बाबांचे माझ्यावर protective कवच होते.  सगळेजण सरांची मुलगी म्हणूनच मला ओळखत होते.  मात्र कॉलेज मध्ये आल्यावर घरट्यातून पक्षी कसा भरारी मारतो, तसे मी माझ्या पंखांनी भरारी मारते आहे असेच मला वाटले.  सगळे नवीन , मैत्रिणी नवीन, प्राध्यापक नवीन, वातावरण नवीन.  सुखातीला फार बावचळल्यासारखे झाले, पण नंतर मीच जुळवून घ्यायला सुरवात केली.  प्राध्यापक जे  बोलतात, शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकायचे, ते सांगतील ते आणि तसेच करायचे हे मी पक्के ठरवले. .

१२वीच्या बोर्डाच्या परीक्षेला थोडे tension आले होते.  रायटर ची मदत घ्यायची हेतर नक्की हेतेच.  माझ्यासाठी एक वर्ग रिकामा ठेवला होता.  मी आणि माझी रायटर एका बाकावर आणि सुपरवायझर मागच्या बाकावर बसल्या होत्या.  त्यांनी त्यांचे काम चोख बजावले.  रायटर कडे पुस्तक, कागद नाही ना, हे त्यांनी तपासले.  त्यावेळी थोडे दडपण आले, पण माझा अभ्यास व्यवस्थित तयार होता.  एक वेगळा अनुभव मिळाला आणि मला १२वी आर्टस ला ६१% मार्क्स मिळाले.

FY B.  A.  चे वर्ष सुरळीत पार पडले.  पण SY मध्ये माझ्या दोन्ही बहिणींची पाठोपाठ लग्ने झाली.  त्यामुळे घरी मला वाचून दाखवणे कमी झाले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.  मला A T K T मिळाली, माझा English विषय राहिला.  मला फार वाईट वाटले.  पण बाबानी धीर दिला.. ” अग, एवढे काय त्यात ? ऑक्टोबर ला सोडव”.  त्यांनी माझा अभ्यास घेतला.  पुनः रायटर शोधायला पाहिजे होती.  माझ्या वर्गात अमीना सार वान नावाची मुलगी होती.  ती मला खूप मदत करायची.  तिच्या हाताला पोलीओ झाला होता.  त्यामुळे स ह वेदना ती जाणायची.  मला चांगला राइटर पाहिजे आहे हे समजल्यावर तिने तिच्या लहान बहिणीशी माझी ओळख करून दिली. समीना,बारावी मध्ये होती.ती तयार झाली.रोज संध्याकाळी सहा वाजता,प्रॅक्टिस म्हणूनजुने पेपर्स आम्ही सोडवले.समीना नं खूप छान काम केलं,पेपर मध्ये स्पेलिंग मिस्टेक्स केल्या नाहीत,मी सांगितलं तसं तिनं लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे मला शंभर पैकी अष्टयाहत्तर मार्क्स मिळाले.

अभ्यासाबरोबरच कॉलेजमध्ये मी वक्तृत्व स्पर्धेत आणि गॅदरिंग मध्येही भाग घेतला. अकरावीमध्ये सायोनारा हा डान्स प्रतिमान माझा बस वला. डान्स ची सगळे ड्रेपरी पांढरी मॅक्सि,ओढणी,पंखा सगळं सगळं सांगली मधुन आणलं होतं.डान्स खूप छान झाला.सगळ्या मुलींनी डोक्यावर घेतलं.माझा डान्स संपल्यावर”यही है राईट  चॉईस बेबी”असा ठेका धरला होता घोषणा देत होत्या. ते मला अजूनही छान आठवते. माझे वक्तृत्व चांगले असल्यामुळे मैत्रिणी माझ्याकडून गाईडन्स घ्यायच्या. मी पण त्यांना मला जे येत असे ते बिनदिक्कत सांगत असे. आमच्यामध्ये निरोगी.  कॉम्पिटिशन होती.

मी कॉलेजमध्ये रमले होते. खूप मैत्रिणी मिळाल्या,सगळ्या प्राध्यापकांची ओळख झाली,अडचण अशी काही आली नाही.सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि मी सुद्धा माझ्यापरी नं सांभाळून घेतलं.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी 

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सकाळची वेळ…टि.व्ही वर लागलेली जुनी गाणी …बाहेर सुटलेला वारा

वादळाची चाहूल देणारा..पण मन मात्र बैचेन घुसमटलेले..मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. मनातले विचारांचे हे वादळ काही शमत नव्हते. तेवढ्यात हवेच्या झोक्यानी एक पान माझ्या पायाशी येऊन पडले. ते मी उचलून हातात घेतले. अरे !! हे तर माझ्या डायरीतले एक पान….

मान उंचावून बघितले तर समोरच्या टेबलावरच्या माझ्या डायरीतली पाने वा-याने फडफडीत होती त्यातलेच हे एक पान निसटून माझ्या पायाशी येऊन पडले होते..

कळत-नकळत… त्यातल्या दोन ओळी नजरेत पडल्या…जणू काही देवानेच माझ्या मनातले हे वादळ शमवण्याकरता ते पान माझ्या पायाशी पाडले असावे असे मला मनोमन वाटले…

माझे मन जरा स्थिरावत असतानाच माझ्या मनाने पुन्हा अनपेक्षित असे वळण घेतले व नव्या वाटेची साद घातली….पण हे अनपेक्षित वळण मात्रं माझ्या आयुष्यात” ओंजळीतले सोनेरी क्षण” बनून आले. तेच मी आता तुमच्या समोर उलगडते….

प्रत्येक दिवस हा उगवत असतो तसा तो मावळतही असतो. क्षणोक्षणी आपले वय कमी न होता वाढतच जाते. कितीतरी माणसे जन्माला येतात व मृत्यूही पावतात. पण असे कितीतरी लोक आपल्या मृत्यूला हुलकावणी देऊन परत मागे फिरतात आपले उरलेले आयुष्य व्यतित करण्यासाठी…आयुष्य म्हणजे काय? आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपण काय करतो?आपले जीवन खरचं काय आहे? असे प्रश्न मनात सतत येत होते पण त्याचे उत्तर काही सापडत नव्हते.याचा सतत विचार करता करता मला त्याचे उत्तर मिळाले..

आयुष्य म्हणजे ” जीवनातील सोनेरी क्षण ” हे ओंजळीत भरून जगण्यासाठी आहे. सुंदर, आनंदी, निरागस जीवन जगण्यासाठी आहेत. आपले जीवन काय आहे? हे ख-या अर्थाने समजून घेण्यासाठी आहेत. जीवन हा एक अनंत सुखाचा झरा आहे. या सुखाला झुल्यावर बसून आपण आनंदाने त्यावर बसून झुलण्यासाठी आहे. तसेच जीवनगीत गाण्यासाठीही आहेत…

प्रत्येकाच्या जीवनात सुख, दुःख, वेदना, नशीबाचा निर्णय, चुकीचा निर्णय, सत्यता अशा अनेक गोष्टी येतच असतात पण त्यातून आपण शहाणं होणं अत्यंत आवश्यक असतं.

स्वतःमध्ये भावतरंगाचे अनेक पैलू असतात ते आपण स्वतः उलगडून पाहिले पाहिजे. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. तसचं योग्य तो विचार- विनिमय सुद्धा केला पाहिजे.

“जीवन ही एक उदात्त उर्जा आहे व ती ईश्वराने आपल्याला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे.”  असे मला विचाराअंती पटले. ते मी माझ्या मनावर पूर्णपणे बिंबविले व स्वतःमध्ये लगेचच अमुलाग्र बदल घडवायला लागले..

बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाला दिसेल असं आपलं कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. आपण आपल्याला योग्य माणूस म्हणून घडविले पाहिजे. एक चैतन्य मूर्तीही बनलं पाहिजे. दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तप्तर ही रहायला पाहिजे. हे सर्व करत असताना आपल्या वैयक्तिक कटकटींना तिलांजली दिली पाहिजे. हे मी सर्व लक्षात ठेवले.

माझ्याशिवाय यांच्यावर प्रेम करणारं दुसरं-तिसरं कुणीही नसून फक्त मीच त्यांची आहे. मला त्यांना भरभरून सुख आनंद समाधान द्यायचा आहे. त्यांच्या चेह-यावर निरागस हास्य फुलवायचे आहे. असा विचार मी माझ्या मनावर पूर्णपणे ठसवला व या कामाला मी लगेचच सुरूवातही केली.. “ओंजळीतले सोनेरी क्षण ” मला सुखद अनुभवता आले. मनाला अतिशय आनंद झाला. या सर्व गोष्टी करत असताना मी माझं मन मात्रं निःस्वार्थी ठेवलं. फळाची अपेक्षा न करता सदैव मदतीचा हात पुढे केला. सगळ्यांशी प्रेमाने वागले -बोलले ..

थोरामोठ्यांचा सन्मान केला. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो आपण ते त्यांना दिले पाहिजे हे लक्षात ठेऊन निःस्वार्थी भावनेने समाजकार्य केले. दुस-यांना आनंद कसा देता येईल याचा सुद्धा विचार केला..

खरचं किती साध्या सोप्या या गोष्टी आहेत. आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला त्या कळत नसतात. पण मला त्या कळल्या म्हणून मी देवाचे मनोमन आभार मानले..

खरोखरचं एका अनपेक्षित वळणाने माझं आख्खं आयुष्याचं बदलून टाकलं…चेह-यावर आपोआपच हसू तरळलं…

किती वेळ गेला कुणास ठाऊक ?  मी  तंद्रीतून बाहेर आले व मनातल्या मनात खुदकन् हसत माझ्या कामाला लागले…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

शारदीय नवरात्रानंतर  येणारी ही शरद ऋतूतील पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा जणू हिरेजडित मुकुट आहे! पावसाचे चार महिने संपल्यानंतर शरदाचे सुखद चांदणे आणि पूर्ण चंद्रासह ही पौर्णिमा येते तेव्हा सर्वांच्याच मनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. पौर्णिमेचा चंद्र बघता बघताच मनातले की तसं तर प्रत्येक मराठी महिन्यात येणारी पौर्णिमा ही नवीन काहीतरी घेऊन येते आणि असा विचार मनात येताच माझे मन चैत्री पौर्णिमे कडे वळले.

चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिन आहे. बुद्धीमंत, शक्तिमान असा मारुती चैत्री पौर्णिमेला उगवत्या सूर्या बरोबरच जन्म घेतो आणि आपल्याला शक्तीची उपासना करण्यात प्रवृत्त करतो. चैत्रा नंतर वैशाखात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा चटका बसू लागतो. अशावेळी येणारी वैशाखी पौर्णिमा उत्तरेत पंजाब, दिल्ली या सारख्या भागात बैसाखी म्हणून साजरी होते. निसर्गात मिळणारी लिंबू ,कलिंगड, खरबूज यासारखी फळे व त्यांचे रस इथे मुबलक प्रमाणात वापरतात.

त्यानंतर येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला निसर्गाकडे नेते. पावसाची सुरुवात होऊन सृष्टी हिरवीगार होण्याचा हा काळ! या दिवशी स्त्रियांच्या वडपोर्णिमा व्रताचे नाते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवते !

आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आई ,गुरुजन, ग्रंथ असो वा निसर्ग आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या प्रत्येका प्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी ही आषाढातील पौर्णिमा! कधीकधी चंद्राचे दर्शनही होत नाही या पौर्णिमेला! तरीही ही पौर्णिमा आपल्या मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.

श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेपासून पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. खवळलेला समुद्र शांत होऊन समुद्रावर कोळी लोकांना आपले व्यवहार करता यावे ,यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो!

भाद्रपदात येणारे गौरी गणपतीचे सण साजरे करून येणारी भाद्रपद पौर्णिमा ही पुढे महालया चे दिवस सुरु करते.आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते.

या काळात पाऊस कमी होऊन पिके, भाजीपाला याची नवनिर्मिती दिसू लागते.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा मुकुट मणी वाटतो मला! पाऊस संपल्याने सारी सृष्टी हिरवेगार झालेली! दिवाळीसारखा सण तोंडावर आल्याने सगळीकडे उत्साह भरलेला! आकाश निरभ्र होऊन चांदण्यांनी भरलेले तर त्यांचा सखा चंद्र,त्याच्या   शांत, स्निग्ध प्रकाशाने सृष्टीला सौख्य देणारा! या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून आपण जागरण करतो. या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कारण नवीन भात आले असल्याने पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य केला जातो.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा! संध्याकाळच्या शांत वातावरणात त्रिपुर लावून त्याची शोभा पहाण्याचा आनंद वेगळाच! त्रिपुरासुराचा वध केला तो हा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व!

आल्हाददायक वातावरणात येणारी मार्गशीर्ष  पौर्णिमा! या पौर्णिमेचा चंद्र आकाराने थोडा मोठाच वाटतो. हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान याची जाणीव करून देणारा! सर्व सृष्टीचे तारणहार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तावतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो.

माघी   पौर्णिमेचे  वैशिष्ट्य जाणवते ते माघ स्नानात! या काळात, तीर्थक्षेत्री नद्यांच्या काठी मोठे मोठे मेळे भरतात आणि लोक पवित्र नदी स्नानाचा आनंद घेतात!

अशा तऱ्हेने वर्ष संपत येते आणि फाल्गुन पौर्णिमा येते.  सर्व वाईट गोष्टींचे अग्नि समर्पण करून चांगल्याचा उदय व्हावा म्हणून होळी पेटवली जाते!

यानंतर आपण पुन्हा नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो.

हिंदू संस्कृतीत निसर्गातील पंचमहाभूतांचा संबंध आपण सणांशी जोडला आहे. पृथ्वी ,आप, तेज, वायु ,.आकाश या सर्वांशी निगडीत असे आपले सण वार आहेत. पौर्णिमा हे भरतीचे प्रतीक आहे.कोणताही आनंद हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा भरभरून घेता आला पाहिजे! भरतीनंतर ओहोटी हा निसर्ग नियमच आहे. जसे पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या! अमावस्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून कलेकलेने चंद्रकला वाढताना आपल्याला दिसते. मनावर आलेली अमावस्येची काजळी दूर होत होत होत पौर्णिमे कडे वाटचाल चालू होते. आपलं जीवन हे असंच असतं!सुखदुःखाच्या चंद्रकला नी व्यापलेले! कधी दुःखाचे क्षण येतात पण त्यांची तीव्रता काळाबरोबर कमी कमी होत जाते आणि सुखाची पौर्णिमा दिसू लागते. पण कायमच पौर्णिमा राहिली तर तिचे काय महत्त्व! तसेच पूर्णत्व हेही कायमचे नसते!’ पूर्णत्वाच्या पलीकडे नष्टत्त्वाचे  उभे कडे’ अशी एक उक्ती आहे. त्याप्रमाणे सुखदुःखाची भरती ओहोटी आयुष्यात येत राहते. पुर्ण चंद्राचे या भरती ओहोटीशी कायमचे नाते असते. असा हा पूर्ण चंद्र प्रत्येक पौर्णिमेला आपण बघतो पण निसर्गाच्या अत्युत्तम अविष्काराचा दिवस कोजागिरी ला आपण पहातो.या दिवशी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा आस्वाद घ्यावा.आणि चांदणी रात्र आपण आनंदात घालवू या असाच विचार कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनात आला!

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

आज ललिता पंचमी! म्हणूनच मी तुम्हाला हळदी-कुंकवाला बोलावते आहे. आज मी तुम्हाला आमच्या अन्नपूर्णेची ओळख  करून देते. तशी तर अन्नपूर्णा सर्वांबरोबर माहेरुनच आलेली असते, पण ही अन्नपूर्णा थोडी वेगळी आहे. पण आधी मस्त चहा घ्या.

“काकू, चहा फक्कड झाला आहे”. हो ना? तोही ह्या आमच्या अन्नपूर्णेनच बनवलेला आहे. तर ह्या आमच्या कडील कर्मयोगी! सौ चंदा  दिघे. आमची अन्नपूर्णा.

तशी त्यांची जन्मभूमी पुणे आणि कर्मभूमी पण पुणेच ! लहानपणी आपल्या आई बरोबर कर्मयोगच करत होत्या पण त्याच बरोबर शाळेतही जात होत्या. पुढे लग्न झाले आणि सुखावल्या. दोन मुले एक मुलगी, सासूबाई सर्वच कष्ट करत. छान मजेत होते. त्यावेळी त्या ब्युरोत सेवा कर्म करत होत्या. मुलीचे लग्न झाले. एका मुलाचे लग्न झाले. सर्व काही ठीक ठाक चालेले होते. घरात एक चिमुकली नात आली. चंदाबाई सुखाने कष्ट करत होत्या पण संसाराकडे पाहून विसरत होत्या. असेच दिवस चालले होते.

आणि एक वादळ आले. वादळात सगळेच कोलमडले. त्यांचा मोठा मुलगा पोहायला गेला असताना बुडाला आणि पाठचा तो त्याला वाचवताना बुडाला. काय हाहाकार! एकाच वेळी काळाने दोन्ही मुले हिरावली. दोघेही पती पत्नी खचले. खोल निराशेत गेले. सगळीकडे नुसता अंधार. पण काहीच दिवसात बागडणाऱ्या चिमुकलीकडे त्यांचे लक्ष गेले. तरुण सुंदर विधवा सून दिसली. आणि त्या अन्नपूर्णेने पदर खोचला. “पुनःश्च हरी ओम” करत कामाला सुरुवात केली. त्याच वेळी आमच्या सोसायटीत पोहोचल्या. सुविचारी अश्या ह्या दुर्गेने अजून एक निर्णय घेतला. तरुण सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. आणि नातीची जवाबदारी स्वीकारली. तिला मोठी केली, शिकवली आणि तिचे लग्न करून ती नीट पार पडली.

केवढे मोठे मन !! पण मनातली ही सर्व दुःखे एका गाठोड्यात घरीच ठेवून येतात. जसे मन तसे अन्न  बनते. त्यामुळे नेहमी प्रसन्न. इथे फक्त कामाचाच विचार. त्यामुळे सगळे सुग्रास आणि राहणीमान पण तसेच. एवढी कामे करतात पण नेसलेल्या साडीला दिवसभर सुरकुती पण नसते. नवरात्री मध्ये तर रोज त्या त्या रंगाच्या साड्या नेसतात. सगळे सणवार आठवणीने साजरे करतात. आम्हालाही उत्साह देतात. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे स्मार्ट फोन त्या सहजपणे वापरतात. वॉट्सअँप , फेसबुक वर त्या छान सक्रिय आहेत.

आमच्या सर्वांकडे येताना, प्रत्येक सणावारानुसार त्या काहीतरी घेऊन येतात. यात्रेला गेल्या की एखादा फोटो घेऊन येतील. नागपंचमीला वैदेहीला बांगड्या, मेहंदी आणतील . दुःखात सुद्धा सुख शोधायला ह्या माउलींकडून मिळते. १३५ कोटी लोकांचे सुख सारखेच असेल, दुःख मात्र वेगवेगळी !! अशा माउली प्रत्येकीकडे आहेत, त्यांची उणीव आपण lockdown मध्ये अनुभवली आहे . तर चला आज मी तुमच्या सर्वांसमवेत त्या माऊलीची साडी, खणा-नारळाने ओटी भरते.

तुम्ही पण घरी जाऊन तुमच्या तुमच्या माऊलीची ओटी भरा!

या देवी सर्व भूतेषु क्षुधा रुपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

 

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

” पाखंड” श्रध्दाळु भक्तांना पुजारी उपदेश करीत होते, “उपाशी लोकांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी पाजणे, दुःखी-कष्टी लोकांना मदत करणे हाच खरा मनुष्यधर्म आहे. गरीब लोकांत ईश्वराचा वास असतो; म्हणून त्यांची मदत केल्याने ईश्वर प्रसन्न होतो.”

प्रवचन संपल्यानंतर एक अतिशय मरतुकडा मुलगा, हातापायाच्या काड्या झालेल्या, पोट खपाटी गेलेलं, डोळ्यात दया-याचना असलेला पुजार्यासमोर हात पसरत म्हणाला, “पुजारीबाबा, कालपासून काही खाल्लं नाही, फार भूक लागली आहे. थोडासा प्रसाद द्याल तर ……”

एक सणसणीत शिवी हासडत पुजारी म्हणाला, “हरामखोर तू परत आलास? आपल्या आईबापाला जाऊन विचार की पोटाला देता येत नव्हते तर जन्माला कशाला घातले!फुकटखाऊ नुसते! येऊन धडकतात रोज-रोज गिळायला …..”

ताटात झाकलेले लाडू त्यांनी चपळाईने आपल्या उपरण्यात बांधले आणि भराभरा पावले टाकीत मंदिराच्या मागे असलेल्या आपल्या खोपट्याकडे निघून गेला. देवळाच्या आवारात त्याचे प्रवचनातील शब्द वार्याबरोबर भिरभिरत होते………

 

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

तो मातीचा दरवळणारा सुवास अत्तरा पेक्षाही भारी वाटून जातो. मनातली मरगळ कशी लांब पळवून नेहतो. मन कसे प्रसन्न टवटवीत करून सोडतो.

ते टपोरे थेंब पाहताना नेत्र कसे सुखावून जातात आणि ती रिमझिम सर जेव्हा अंगावर पडते तेव्हा सारी काया सुखावते. पानं आनंदानी डोलू लागतात तर फुलपाखरू शांत फुलावर बसुन पावसाची रिमझिम पाहत राहते.

प्रत्येकाला हा अनुभव नक्की आला असेल नाही का?

तो पहिला पाऊस, तो आला की कसे सारे सुखावतात अगदी लहान मुलांपासून आजी आजोबा पर्यंत. प्रत्येकाच्या आठवणी ताज्या टवटवीत होऊन जातात.

काहीजण आपल्या जुन्या आठवणीत रमतो, तर काहींच्या मनाची तगमग शांत होऊ पाहत असते, कुणाचे नेत्र चोरून वाहत असतात तर कोण पावसात मनमुराद भिजत असतो. तर कोणाला गरम गरम चहा भजीची हुक्की आलेली असते.

अगदी रांगणारे मुल सुद्धा पावसात भिजण्यासाठी धडपडत असते. तीच थोडी मोठी मुल आईची नजर चुकवून मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतात.

मला ना माझ्या लहानपणी चि एक गंमत आठवते. पावसाळ्यात आई अगदी आठवणीने रेनकोट द्यायची वर बजावून सांगायची पावसात भिजायचे नाही. आईच्या समाधानासाठी तो आम्ही घेऊन जात होतो हे खरे पण जर शाळा सुटल्यावर पाऊस आला तर घर जवळ येईपर्यंत हा बिचारा रेनकोट दप्तरातून बाहेर येतच नव्हता. घर जवळ आले की हळूच तो अंगावर चढवला जायचा. आई विचारायचीच रेनकोट होता ना मग कसे भिजला? उत्तर तयारच असायचे अग दप्तरातुन काढे पर्यंत मोठी सर आली आणि भिजलो. पण शेवटी आईच ती बरोबर ओळखायची कधी एखादी चापटी मिळायची, नाही तर कधी ती पण आमच्याबरोबर मनमुराद हसायची. कदाचित् तिनेही तेच केले असेल नाही का तिच्या बालपणी.

अरे हा पाऊस तर मला बालपणात घेऊन गेला की, मला खात्री आहे तुम्हाला ही घेऊन गेला असेल बालपणात. हो ना?

हळू हळू सार्‍या आठवणी कश्या मनाच्या कोपऱ्यातून डोकावू लागतात नाही का ? त्या केलेल्या छोट्या छोट्या होड्या त्या पाण्यात सोडून कोणाची किती लांब जाते ह्यावर लावलेली पैज, तो कॉलेजचा कट्टा, ते कॅन्टीन तो कटींग चहा आणि आपला तो ग्रुप. वाटले ना परत जावे कॉलेज मधे आणि परत पडावा मुसळधार पाऊस.

अरे आपणच नाही काही अगदी आपले आजी आजोबा सुद्धा रमून जातात पावसात ते ही सैर करून येतात भूत काळात. काहीना आठवणीने डोळ्यात पाणी येते तर काही ते पावसांच्या सरित लपवतात.

आपल्या प्रमाणेच निसर्ग कसा सुखावून जातो. त्यानी नेसलेला हा हिरवागार शालू पाहताना त्याचे हे सौंदर्य पाहताना कसं मन प्रसन्न होऊन जाते. पक्षी ही झाडाच्या फांदीवर बसुन झोके घेत आनंद लुटत असतात. तर ही धरती शांत शीतल होत असते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

09.8.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग २ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग २ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

त्यातली एक कथा तर मला फारच आवडली. शंकर सगळीकडे संचार करणारा…त्यामुळे  त्याला नाना प्रकारच्या चवदार अन्न पदार्थांची  माहिती असे.

देवी पार्वती म्हणजे हिमालयाची राजकन्या, तिला कुठला स्वैपाक येणार!   शिवाय खाणारे गणेश कार्तिकेय आणि भूतगण म्हणजे जबरे.. त्यामुळे ती आपली दही भात, रोट्या किंवा लचका यापैकी एखादाच पदार्थ पण भरपूर प्रमाणात करे.

शंकराला एकदा कुठेतरी पुरण पोळ्याचा नैवेद्य खायला मिळाला.  झाले,  त्यानी आणि नंदीने कैलास पर्वतावर.. त्या पोळ्यांचे असे काही वर्णन केले की गणेशबाळ आणि कार्तिकेय तर नाचायलाच लागले.  मग पार्वतीने नंदीला पुरणपोळीची कृती विचारायला पिटाळले.  त्याने काहीतरी धांदरटपणाने अर्धवट ऐकून काहीतरी सांगितले. .तरी पार्वतीने. मोठ्या पातेल्यात डाळ शिजवायला ठेवली,  त्यात साखर घालून पुरण शिजवले..त्यात त्या पोरांनी येता जाता भरपूर सुका मेवा ओतला.  .त्यामुळे  पोळ्या काही जमेनात. गणेश तर रडायलाच लागला मग कार्तिकेयाने युक्ती करून पुरण कणकेत भरुन ते गोळे तळायला सांगितले.  तेव्हापासूनच गणपतीला मोदक आवडायला लागले.

ते तळलेले मोदक सगळ्यांनी खाल्ले खरे पण शंकर नंदीला म्हणाले…,  ” पुरणपोळी नाही जमली तुमच्या मातेला..शेवटी मोदक खायला घातला… ” असे म्हणून हसू लागले.  पार्वतीला राग आला. दुस-या दिवशी तिने पुन्हा  पुरणाचा घाट घातला, पोरांना तिथे फिरकायचे नाही अशी सक्त ताकीद केली.   पहिली पोळी नंदीला खायला घातली,  नंदी बिचारा काहीच बोलला नाही.  गणपती,  कार्तिकेय आणि भूतगण तर काय काहीही खायचे…त्यांना सगळेच आवडायचे.. पण शंकराने मात्र पार्वतीची खूप चेष्टा केली.  पार्वतीला पहिल्यांदा राग आला पण नंतर तिला वाईट वाटले.

मग तिने  स्वतःच्या अन्नपूर्णा रुपात परत येण्यासाठी ईश्वराची दस-यापासून पाच दिवस आराधना केली आणि कोजागिरीला ती काशीक्षेत्रात अन्नपूर्णेच्या रुपात प्रगट झाली.

आता ती केवळ दृष्टीने पदार्थातील मर्म जाणू लागली आणि तिच्यासारखा उत्तम रांधणारा त्रिखंडात कोणी उरला नाही.  एवढेच कशाला चांगले रांधता येण्यासाठीही लोक तिची प्रार्थना करू लागले…लग्नामध्ये वधूला तिची आई अन्नपूर्णेची मूर्ती देऊ लागली….

अशा प्रकारच्या गंमतशीर कथा असलेली आणि देवांचे मनुष्य रुप कल्पून गाणी गातात… कथा सांगतात. शेवटी सर्वजण फेर धरून नाचतात.

माळी पौर्णिमेची देवी म्हणजे अर्थातच अन्नपूर्णा…पार्वतीदेवी,  त्या पाच दिवसात तिची,  तिच्या परिवारासह मनोभावे पूजा केली जाते.

वर्षभर खाण्याची ददात पडू नये असे आशीर्वाद मागितले जातात.  दुसर्‍या दिवशी सर्व मंडपी तिथेच धावड्याच्या किंवा मोहाच्या झाडाखाली ठेवून परत घरी जातात.

तिस-या दिवशी पुन्हा नैवेद्य  घेऊन जातात आणि आपापल्या मंडपी आणि एखादी दिवणाल घरच्या अंगणात ठेवण्यासाठी घेऊन येतात…

असे म्हणतात की त्या मंडपात शंकर पार्वती पाखरांच्या रूपात येऊन भाजीपाल्याचे बियाणे ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा धान्याचा साठा संपत आलेला असतो आणि धुवांधार पावसामुळे बाहेर जायची सोय नसते त्यावेळी अंगण भरून रानभाज्या उगवतात.  भूकेची आणि औषधाचीही तरतूद झालेली असते.

ता.  क.  मराठवाडा आणि विदर्भातील काही खेडेगावात मातीच्या शिड्या करून त्यावर या दिवसात पणत्या लावतात, तिथे कोजागिरीला ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात.

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्री सूक्त – एक ‘अर्थ ‘पूर्ण  प्रार्थना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ श्री सूक्तएक ‘अर्थ ‘पूर्ण  प्रार्थना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कुठल्याही देवी- पूजनाच्यावेळी आवर्जून श्रीसूक्त म्हटलं जातं. देवी-स्तुतीव्यतिरिक्त श्रीसूक्तात काय आहे याची माहिती मिळाल्यावर, ती साररूपात इतरांनाही सांगावी असं मनापासून वाटलं.

धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत, त्यापैकी धर्म हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. अर्थ आणि काम हे जीवनाच्या भौतिक विकासासाठी आवश्यकच आहेत,पण त्यांच्या मुळाशी धर्म असावाच लागतो. श्रीसूक्तात अशा धर्माधिष्ठित लक्ष्मीला आवाहन केलेले आहे. अर्थ म्हणजे धन धर्ममार्गाने प्राप्त केले तर कधीच सोडून जात नाही, हा विश्वास यात आहे. ही लक्ष्मी कशी यावी, कायमस्वरुपी कशी रहावी, आणि आयुष्यातल्या सर्व सुखांचा मर्यादशील उपभोग घेण्यासाठी कशी जपावी, यासाठी केलेली सुंदर प्रार्थना म्हणजे श्रीसूक्त.

श्रीसूक्त हे एक व्यापक ‘अर्थ’ शास्त्र आहे. अर्थ, अर्थात धन आयुष्यात महत्त्वाचे असतेच. म्हणूनच ‘धनलक्ष्मी’ ही संपत्तीची देवता असे म्हणतात. इथे संपत्ती म्हणजे फक्त पैसा अभिप्रेत नाही. उत्तम गुण, उत्तम आरोग्य, उत्तम अन्न, उत्तम ज्ञान, उत्तम मित्र, ही सुद्धा मौल्यवान संपत्ती आहे जी यथायोग्य मिळाली तरच आयुष्य सुखी-समाधानी होते आणि आत्मिक विकासाची वाटही सापडू शकते. उपभोग-दान-विलय या धनाच्या तीन अवस्था आहेत.

लक्ष्मी मातृस्वरूप आहे असे मानले आहे, म्हणूनही तिची पूजा केली जाते. मिळवलेली सर्व प्रकारची माते-समान पवित्र संपत्ती कायम-स्वरुपी आपल्या घरी रहावी, ती प्रसाद समजून स्वीकारावी, हा फार मोठा हेतू लक्ष्मी-प्रार्थनेमागे आहे.

श्रीसूक्तात अग्नीला प्रार्थना केली आहे की, ‘त्या तेजस्वी लक्ष्मीला तू माझ्या घरी घेऊन ये. ती कधीही परत जाऊ नये. आणि ती वाजत गाजत येऊ दे ‘….. गर्भितार्थ असा की, ही धनरूपी लक्ष्मी पवित्र, स्वकष्टार्जित आणि चोख असावी. ती लपवावी लागू नये. ती उजळ माथ्याने घरात विसावली तरच मनःशांती आणि समाधान लाभते. तिला ‘आर्द्रा’ असेही म्हटलेले आहे. समुद्रपुत्री आणि विष्णूपत्नी म्हणून ती क्षीर-सागरात तर रहातेच. शिवाय तिच्यात वात्सल्याचा, भावनांचा ओलावा आहे, म्हणून ती अंतर्बाह्य ‘आर्द्रा’ आहे, जिच्या सोबत जीवन सुसह्य आणि आनंदमय होऊ शकतं.

धनाला अशी लक्ष्मी मानल्यामुळे, सर्वांनीच याप्रमाणे चोख व्यवहार केला, तर समाजजीवनही अत्यंत आनंदमय आणि समाधानी राहील हाच अप्रत्यक्ष संदेश श्रीसूक्तातून दिलेला आहे.

यात धनलक्ष्मीला  आवाहन केलेले आहे की ….’देवांनीही तुझा आश्रय मागावा इतकी तू उदार आहेस. तुझ्या-मुळेच आमचं दारिद्र्य नष्ट होईल‘…… अर्थात ‘दारिद्र्य फक्त पैशाचे नसते. ते बुद्धीचे,विचारांचे आणि भावनांचेही असते. तेही नष्ट व्हावे आणि माणसाचे व्यक्तिमत्व संपन्न व्हावे‘. दारिद्र्य म्हणजे ‘अलक्ष्मी‘. हिचे वर्णनही यात केलेले आहे…..’अनेक प्रकारच्या तहान-भुकेमुळे मलीन झालेली, जगभर मोठ्या प्रमाणात वास करणारी, आणि अतिदुःखदायक अशी लक्ष्मीची मोठी बहीण‘…..ती घराबाहेर गेली तरच क्लेशकारक दारिद्र्य सर्वतोपरी नाहीसे होऊ शकते, जे एका माणसासाठीच नाही, तर एका राष्ट्रासाठीही आवश्यक आहे. तरच श्रीमंती आणि गरिबी यात जगभर दिसणारी प्रचंड दरी सांधण्याची शक्यता आहे.

श्रीसूक्तात पुढे म्हटले आहे की, या तेजस्वी लक्ष्मीने तपश्चर्या केली त्यातून बेलाचे झाड निर्माण झाले. त्याचे त्रिदल पान म्हणजे सत्व- रज- तम या त्रीगुणांचे, त्रिविध तापांचे, बाल्य- तारुण्य- वार्धक्य या तीन अवस्थांचे, आणि कर्म- अकर्म- विकर्म या कर्मत्रयांचे प्रतीक आहे. हे त्रिदल ईश्वरचरणी समर्पित करायला लक्ष्मी शिकवते, आणि स्वतः अर्थलक्ष्मी, ज्ञान- लक्ष्मी आणि आत्मलक्ष्मी, या त्रिविध रूपात उपासकाकडे रहाते.

श्रीसूक्तात अशीही प्रार्थना आहे की….. “या समृद्धी संपन्न राष्ट्रात मी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे कुबेराने मलाही ‘चिंतामणी’ देऊन समृध्द करावे. माझी कीर्तीही वाढावी. माझ्या राष्ट्राची थोर परंपरा, समृध्द संस्कृती आणखी उज्ज्वल होण्यासाठी माझाही हातभार लागावा. “म्हणूनच वाटते की श्रीसूक्त ही राष्ट्र -प्रार्थनाही आहे……..’आसेतू हिमाचल पसरलेल्या या संपन्न राष्ट्राचा प्रतिनिधी असणारा मी, लक्ष्मीचा वरद-हस्त लाभलेला समृध्द नागरिक असावा ‘…… अशी ही मनोमन प्रार्थना आहे.

शेवटी आशिर्वाद मागितला आहे……..” उपासकांच्या मनाला कामक्रोधादी सहा रिपूंचा वाराही लागू नये. आणि त्यांच्यावर या पवित्र लक्ष्मीचा वरदहस्त सदैव रहावा. ”

…… श्री लक्ष्मी नमो नमः…….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

माहिती सहाय्य: सौ शुभदा मुळे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print