मराठी साहित्य – विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

‘सूर नवा ध्यास नवा ‘ या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी किमान दोन वर्षापूर्वी प्रश्ण विचारला होता पण त्यानिमित्याने सुरु झालेला  ‘भोंडल्याची१६ गाणी’ चा प्रवास अजूनही सुरु आहे आणि मुख्य म्हणजे तो खूप सुखावह आहे. अनेक जण बालपणीच्या आठवणीत दुनियेत रमत आहेत

तर जरा यात बदल म्हणून

‘दिवस नवा, टवाळखोरी पून्हा ‘ या आमच्याच एकतर्फी कार्यक्रमात ही ‘अमल्याची काही गाणी’ ?

(टीप : मनोरंजन हा हेतू)

 

करोना करोना, इथे तिथे देवा

ऑनलाईन खेळूनच, यंदा तुझी सेवा

झूम आयडी ठरला  दुपारच्या पारी,

पासवर्ड धाडला व्हाटसपवरी

मेसेज वाचल्याचा पाहिला टिक्का

आमच्या ग्रुपच्या हुश्शार बायका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

एक मास्क घेऊ बाई, दोन मास्क घेऊ

दोन मास्क घेऊ बाई तीन मास्क घेऊ

रंगीत मास्क घेऊ बाई,डिझाईन पाहू

आठवड्या भराचा साठा

भारी फोटो स्टेटसला टाका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

अक्कल बातमी, बक्कळ बातमी,रिपोर्ट तो खणावा

अस्सा रिपोर्ट सुरेख बाई,ट्विट ते रोवावं

अस्सं ट्विट सुरेख बाई, चर्चा ती करावी

अश्शी चर्चा सुरेख बाई, चॅनेल ते बघावं

अस्सं चॅनेल सुरेख बाई, पैशाचं जमावं

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता बत्ता

लोकशाहीला लेक झाला, नाव ठेवा सत्ता

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होती भाकर

भक्त असो वा चमचे सगळेच आपले चाकर

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता पाटा

पाच वर्षात निवडणूक आली, आश्वासनं परत वाटा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

‘कार्डशेडचा’  वेल लाव गं सुने, लाव गं सुने

मग जा आपुल्या माहेरा माहेरा

कार्डशेडचा’  वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘काढ्याचा’  डोस वाढू दे गं सुने, वाढू दे गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘काढ्याचा’  डोस वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘पार्ल्याचे’ बिस्कीट खा गं सुने, खा गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘पार्ल्याचे बिस्कीट’ खाल्ले हो सासुबाई खाल्ले  हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘आरेची’ दृष्टं काढ ग सुने, काढ ग सुने

मग जा तू आपल्या माहेरा माहेरा

‘आरेची दृष्ट काढली हो सासुबाई काढली हो सासुबाई

आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा जेसीबी,वापरा जेसीबी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

वाच बाई वाचुनी

वाचुन पुढे ढकलुनी

‘टवाळखोर’ नशीब दमला

टुकार भोंडला  संपला ?

 

टीप:  निवडक गाणी ☝️

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पु. ल.देशपांडे ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  पु. ल.देशपांडे ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

“क्रियापदाचे मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे आहे त्याच्यावर अवलंबून असते.”

हे वाक्य ज्या कर्तृत्ववान कर्त्याने उच्चारले त्याचे स्वतःचेच कर्तृत्व इतके महान आहे की अवघ्या काही मिनिटात त्याच्यातील व्यक्तीचीच काय पण वल्लीचाही परिचय करुन देणे म्हणजे ‛नस्ती उठाठेव’ करण्यासारखे आहे.

पु. ल., पी.एल्. किंवा भाई या संबोधनाने जी व्यक्ती ओळखली जाते ती म्हणजे महाराष्ट्राचे कोट्याधीश ‛पु. ल. देशपांडे.’! त्यांची जन्मशताब्दी या वर्षात आपण साजरी करत आहोत.

कोट्याधीश या उपाधीबद्दल एकदा पुलना विचारले असता ते म्हणाले,“विनोद हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि विनोदनिर्मिती होते.” याच विसंगतीतून त्यांनी विनोदी लेखन, नाटके, चित्रपटांसाठी पटकथा – संवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांची ‛पुरचुंडी’ आपल्या गाठीशी बांधली.

अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, विठ्ठल तो आला आला सारखी नाटके, अपूर्वाई-पूर्वरंग सारखी प्रवासवर्णने, असा मी असामी, बटाट्याची चाळ, हासवणूक, मराठी वाङ्मयाचा ( गाळीव) इतिहास अशी ‛अघळपघळ’ लेखननिर्मिती केली.

१९५६-५७ या कालखंडात त्यांनी नभोवाणी- आकाशवाणीसाठीसुद्धा काम केले. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये नोकरी केली.

आता ‛उरलंसुरलं’ क्षेत्र म्हणजे संगीत! त्याची तर भाईंना आधीच उत्तम जाण आणि ज्ञान असल्याने संगीतकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटगीतांना संगीत दिले . ‛देवबाप्पा’ चित्रपटातील ‘ नाच रे मोरा’ हे गाणे आजही अनेकांच्या बालपणातील स्मृती चाळवते. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे तर भाई सबकुछ होते.कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि अभिनयसुद्धा!

आयुष्यातील विसंगतीची ‛खिल्ली’ उडवतानाच समाजातील विसंगती नष्ट करण्याचा त्यांनी अंशतः प्रयत्न केला.सक्रिय शक्य नसले तरी अनिल अवचट यांच्या ‛ मुक्तांगण’ व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या ‛निहार’ या संस्थेला भरभरुन आर्थिक सहकार्य दिले. हे ‛गणगोत’ मात्र त्यांनी काळजापासून जपले. म्हणूनच मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात-

“ रोज आठवण यावी असं काही नाही

रोज भेट व्हावी असंही काही नाही

पण मी तुला विसरणार नाही

ही झाली खात्री

आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री

शेवटी काय हो,

भेटी झाल्या नाहीत तरी

गाठी बसणं महत्वाचं !”

हीच गाठ भाई तुम्ही आम्हा रसिकजनांच्या हृदयात इतकी घट्ट मारली आहेत की ‛ काय वाट्टेल ते होईल’ पण ‘पु.ल.- एक साठवण’ ची आठवण पिढ्यान् पिढ्या कायम राहील.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा……  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आरसा…… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आरसा! प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा 6000 वर्षापूर्वी इजिप्शियन लोक polished copper आरसा म्हणून वापरत होते .साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आपण वापरतो तो आरसा अस्तित्वात आला

प्राचीन काळातील शिल्प पहाताना, अजंठा वेरूळ येथील मूर्ती पाहाताना मनात प्रश्न पडे की तेव्हा आरसा कुठे होता पण त्यासंबंधी वाचन केल्यावर असे लक्षात आले की तेव्हा आरसा म्हणून सोने ,चांदी किंवा तांबे अशा धातूंचे चकचकीत सपा ट पृषठभाग आरसा म्हणून वापरले जात असत!

पौराणिक गोष्टींमध्ये पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला आरसा म्हणून वापरले जाई. पंचतंत्राच्या गोष्टीत पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजून डरकाळ्या मारणारा सिंह आपण पाहिला !थोडक्यात काय आपलं तोंड पहाणे म्हणजे आरशात तोंड बघणे होते.

‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भाव ना चे…. ‘हे गाणे ऐकताना असे हे प्रतिबिंब आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो. दुसऱ्याला एखाद्या गोष्टीविषयी काय वाटतं ते त्याच्या चेहऱ्यावरून व डोळ्यावरून ही कळते .चेहरा हा मनाचा आरसा आहे म्हणतो ते यासाठीच! एखादी व्यक्ती आवडत नसते तरी समोर आल्यावर हसरा चेहरा ठेवून आपण तिचे स्वागत करतो, मनातलं चेहऱ्यावर उ म टू देत नाही. अशावेळी आरशामागे ज्याप्रमाणे मुलामा लावलेला असतो त्याप्रमाणे आपण मनाला आतून बंद करून घेतो आणि  समोरून दिसणारा भाग मात्र आरशाप्रमाणे  चकचकीत दिसतो.

आरसा वरून मला चितोडची राणी पद्मिनी ची गोष्ट आठवली. तिची अभिलाषा धरणाऱ्या

अल्लाउद्दीन खिलजी ला राणा प्रतापने पद्मिनी चे आरशातील प्रतिबिंब दाखवून बरोबर उत्तर दिले .आरशात जर ती इत की सुंदर  दिसते तर प्रत्यक्षात ती किती सुंदर असेल या कल्पनेने खिल् जी भारावून गेला आणि चितोड वर स्वारी केली पण सौंदर्याबरोबरच स्वाभिमान असणाऱ्या पद्मिनी ने जोहार करून आपले सौंदर्य अजरामर केले!

आपण वापरतो तो आरसा आपल्या देशात साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आला आणि स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनात आरशाची भर पडली. त्याकाळी स्त्रियांकडे एक आरसा पेटी असे. खोपा आंबाडा घालताना केस विंचरणे ,भांग पाडणे हे खाली बसून आरशात बघून केले जाई. माझ्या आजीची अशी फणी क रंड्या ची  लाकडी पेटी होती त्या पेटीवर छान नक्षी होती. पेटी उघडली की समोर आरसा आणि पेटीत काजळ कुंकवाचा करंडा आणि फणी ठेवण्यासाठी छान मखमली जागा होती. तिच्याकडे एक हस्तिदंती फणी पण होती. या सर्व गोष्टींची मला गंमत वाटत असे .आजी वेणी घालताना मी तिच्यासमोर बसून सर्व निरीक्षण करीत असे.

पुढे गोदरेज ची किंवा मोठा आरसा असणारी लोखंडी कपाटे बाजारात आली आणि लोक अशी कपाटे  खरेदी करू लागले. पाच वारी साडी बरोबरच संपूर्ण साजशृंगार त्यात बघता येई.

असा हा आरसा जीवनात महत्वाची जागा व्यापू लागला. इतका की ऑफिसला जाताना छोट्याशा पावडरच्या डबीतही हा आरसा सामावला गेला!

आरशाचे विविध प्रकार आपल्याला म्युझियम मध्ये बघायला मिळतात. एखाद्या आरशात आपण जाड बुटके दिसतो तर एखाद्या आरशात अा पन एकदम बारीक आणि उंच दि स तो. एखादा आरसा आपल्या प्रत्येक हास्या गणिक  वेगवेगळे रूप दाखवतो की ते बघूनच आपल्याला हसू येते

पूर्वी बेल्जियम काचेचे आरसे प्रसिद्ध होते .त्याची काचही चांगली असे आणि त्यावर बाजूने नक्षीकाम ही केलेले असे. मोठे मोठे आरसे लावून राजे महाराजांचे दिवाणखाने ही सजत असत. काही सिनेमातूनही अशा

आरशांचा उपयोग केला गेला. प्यार किया तो डरना क्या? गाण्याच्या नृत्यावर असंख्य चेहरे प्रतिबिंबित होणारा मोठा सेट तेव्हा उभारला गेला होता.

आरशासारखे स्वच्छ निर्मळ मन असावे किंवा एखाद्याचा स्वभाव आरशासारखा निर्मळ आहे असे म्हंटले जाते . अशा सुभाषितवजा वाक्यातून ही आरशा बद्दलची संकल्पना साकार होते. मनात असलेले वाईट विचार ,द्वेष ,रा ग यांची मनाचा आरशावर आलेली  काजळी प्रयत्नपूर्वक पुसावी लागते. मूल लहान असते तेव्हा त्याचे हास्य  आरशासारखे स्वच्छ व निर्मळ असते. तो मनाचा आरसा नितळ असतो ,त्यावर चरे ओरखडे उमटलेले नसतात. जसजसे मोठे होत जाते तसे त्याचे बालपण जाऊन विकार वाढू लागतात आणि मनाच्या आरशाची स्वच्छ प्रतिमा धुरकट होत जाते ही क्रिया नकळत घडत असते!एकदा का आरशाला तडा गेला की कितीही सांधले तरी तो तडा पूर्ण नाही सा होत नाही !

त्याप्रमाणेच हा मनाचा आरसा जपावा लागतो. तडा जाऊ न देता स्वच्छ प्रतिमेसह!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूल…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ चूल….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

जिच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो ती जागा म्हणजे चूल.चूल ही सामान्यतः स्वयंपाकघरात असते.तिच्यावर कुटुंबाचा स्वयंपाक केला जातो म्हणून चुलीला देवत्व प्राप्त झाले आहे त्यासाठीच चुलीला पाय लावीत नाहीत.पूर्वी चूल सारवून तिच्यावर रांगोळी घातली जात असे.अग्नीकुंडाचे एक स्वरुप म्हणून चूल ओळखली जाते.

चूल हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा टप्पा दाखवते.प्रारंभी माणसे विस्तवात अन्न भाजून खात असत.त्यानंतर तीन दगडांची चूल आली.बलुतेदारीची पध्दत अस्तित्वात आल्यावर कुंभार मातीच्या चुली बनवू लागले.नंतर लोखंडाची,लोखंडी बादलीतील चूल आली.फिरस्तीचे लोक हलविता येणारी ती चूल वापरू लागले.आता गॅसच्या शेगड्या सर्वत् वापरात असून विद्युत चूल आणि त्या पाठोपाठ सौर चूल आली.

कितीही गरीबी असली तरी चूल अडवता येत नाही .काही ना काही शिजवावेच लागते.कधी कधी मात्र चुलीला वाटाण्याच्या अक्षदाही द्याव्या लागतात

म्हणजे उपाशी रहावे लागते.याला चुलीला विरजण पडणे असेही म्हणतात.अत्यंत दारिद्र्यावस्था येण्याला चुलीत मांजरे व्यालेली अवस्थाही म्हटले जाते.दारिद्र्यात भर पडणे म्हणजे चूलजाळ आणि पोटजाळ एक होणे !

काही वेळा माणसाची बुध्दी नको ते काम करते त्यामुळे नुकसान होते अशावेळी तुझी अक्कल चुलीत गेली होती कां?असे विचारले जाते.

चूल आणि स्त्री यांचे नाते अतूट असल्याने बऱ्याचवेळा स्त्रिया आपले विचार चुलीत सारतात म्हणजे गप्प बसतात, चुलीत डोके खुपसून स्वयंपाक करतात.

आता मात्र स्त्री बाहेर पडल्याने चुलीत डोके खुपसण्याइतकेच तिचे जगणे मर्यादित राहिले नाही.

जोपर्यंत मानवी जीवन आहे तोपर्यंत चूलीचे अस्तित्व असणार आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 68 – जननी – जनक ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆

☆ जननी – जनक ☆

माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या  शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर  स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी  तिचा कामाचा झपाटा मोठा होता.

मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!

मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??

आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.

 

आई बाप असतात

फक्त जन्माचे धनी

आयुष्याचे गणित

सोडवायचे ज्याचे त्यानी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनातले महासागर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मनातले महासागर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

मनाच्या महासागरात जेव्हा फिरून आले तेव्हा अनेक रंगांनी नटलेल्या लाटांची भेट झाली. काही ना खूप जगण्याची उमेद होती तर काही अगदी दमून गेल्या होत्या. काही निराश तर काही उत्साहाने सळसळत होत्या.

काही स्वपनात हरवल्या होत्या तर काही वास्तव्याशी चार हात करत होत्या.

काहीना हासरा मुखवटा घालता येत होता. पण काहीना खूप प्रयत्न करून ही ते जमत नव्हते.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या अनेक लाटा येतात. काही सुखावून जातात तर काही आवाज न करता सगळ विस्कटून जातात. मागचा पसारा आपल्याला आवरायला सोडून जातात.

अश्या अनेक रंगांनी नटलेल्या लाटा प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आहेत फक्त काहींच्या रंगबिरंगी तर काहींच्या बेरंग आहेत.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुख म्हणजे काय ☆ सौ. राधिका भांडारकर

 ☆  विविधा ☆ सुख म्हणजे काय ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

माझ्या आजोबांच्या घरात दर्शनीच भिंतीवर एक मोट्ठी पाटी होती. त्यातलं पहिलं वाक्य चांगलच ध्यानात आहे!

समाधान हेच खरे सुख! गंमत म्हणजे लहानपणी, मोठे होत असताना सुखाविषयीची अनेक सुभाषिते ,श्लोक ऐकले अन् अभ्यासिले.

जगी सर्वसुखी असा कोण आहे? किंवा,

अलसस्य कुतो विद्या

अविद्यस्य कुतो धनम्

अधनस्य कुतो मित्र

अमित्रस्य कुतो सुखम्

कधीतरी माझ्या मनात, हाश्लोक आठवला आणि आले, आळशी असुनही शिकलोच की! पदवी मिळाली! नोकरी मिळाली..

मित्रपरिवार तर लहानपणापासून विस्तारलेलाच!

म्हणजे हा श्लोक आपल्याला लागू होत नाही!

मग हे सगळे ऊदात्त सिद्धांत मी जरा बाजुलाच ठेवले आणि माझ्या सुखाच्या ,आनंदाच्या व्याख्या तपासून पाहिल्या. शाळेत असताना ,मे महिन्याच्या सुट्टीत अडीचकं (आता हे पाढे वगैरे प्रकरण संपुष्टातच आलय्) म्हटलं की वडील अडीच आणे द्यायचे आणि मैदानात भाड्याची सायकल चालवायची परवानगी द्यायचे.. केव्हढा आनंद व्हायचा!

अबोला धरलेली जीवलग मैत्रीण एकदम एके दिवशी गळामीठी द्यायची!तो असायचा परमोच्च सुखाचा क्षण!

छोटे छोटे सुखाचे अनंत क्षण!

बसच्या भल्यामोठ्या रांगेत ऊभे असताना, आपल्याला हवी असलेल्या नंबरची बस आली की,सगळ्यांना ओलांडून बसमधे शिरताना होणारा आनंद कसा सांगू?

रेल्वेने प्रवास करत असताना आपल्या आरक्षित जागेवर कुणीही आगंतुक बसलेले नाहीत म्हणून भांडण टळल्याचा तो आनंद माझ्रासाठी विलक्षण असतो!

माझ्यासाठी वरसंशोधन चालु असताना, वडीलांनी विचारले,”तुझ्या जोडीदाराबद्दल काय अपेक्षा आहेत?”

मी लगेच ऊत्तर दिले,”जेवताना भुरके मारणारा आणि ताटात अन्न सांडणारा नवरा नको मला!”

आणि खरोखरच पुरुषांत अभावानेच अढळणारा व्यवस्थितपणा असलेला जोडीदार मिळाला अन् मी भरुन पावले!

पुढेपुढे माझ्या सुखाच्या व्याख्या बदलतच राहिल्या.

म्हणजे मदतनीस वेळेवर आली तर होणारा आनंद अन् त्यातून जाणवणारं सुख !

प्रभातसमयी नवर्‍याने दिलेला गरमागरम वाफाळलेला चहा! वा! क्या बात है! It makes my day!

अमेरिकास्थित मुलींशी बोलताना त्यांच्या आवाजावरुन जाणवणारी त्यांची ख्यालीखुशाली हाही एक सुखदु:खाचा विषय असतो.त्या मजेत तर मी मजेत त्यांचा आनंद माझा आनंद!

लाॅकडाउनमुळे सगळंच बंद! पण नवर्‍याने वाढदिवसाचे गिफ्ट काय दिले? कुंडीतल्या झाडावर ऊमलललेलं टवटवीत गुलाबाचं सुंदर फुल! अन् नजरेतली गाढ प्रीत!

किती सुखाचा क्षण!

एकीकडे म्हणतात, Sky is the limit. ध्येय बाळगा. जीवनात लक्ष्य हवं. Low ambition is crime. तर वडील म्हणायचे माणसांनी फार महत्वाकांक्षा बाळगु नयेत——नव्हे महत्वाकांक्षाच नसाव्यात!

गोंधळ व्हायचा माझा. पण कुठेतरी आता पटतं. गीतेतलाच ना हा सिद्धांत.

कर्म करा फळाची अपेक्षा न ठेवता! महत्वाकांक्षे सोबत अपेक्षा येते अन् मग अपयशातून दु:ख नैराश्य!

मग मनांत येत, सुशांत सिंगने आत्महत्या का केली? अधिक पैसा अधिक ग्लॅमर अधिक कीर्ती———— आणि मनाविरुद्धच्या परिस्थितीत टिकुन राहण्याचं नसलेलं मनोबल!

म्हणुनच सुखाच्या व्याख्या तपासल्या पाहिजेत. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण! पण मोठेपणातही छोटेपण जपता आलं पाहिजे! म्हणूनच छोट्याछोट्या क्षणातलं सुख मुठीत सांभाळून ठेवते मी. मला मेडीकलला जायचं होतं .पण नाही जाऊ शकले. झाले होते मी निराश, दु:खी! पण दुसरे पर्याय मिळाले आणि यश मिळालं! जीवन थांबलं नाही.

हंं..!! म्हणजे परवा संपूर्ण भारत देशाने जेव्हां डाॅक्टरांना अभूतपूर्व सलामी दिली तेव्हां नकळत वाटलंही “आज आपणही या समुहात असतो…!!”

असो तर मंडळी सुखाची व्याख्या करता येत नाही. दोन अधिक दोन बरोबर चार असे ते गणित नाहीच! पुन्हा तत्वंआलीच..सुख मानण्यावर आहे!

प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या. सुख प्रेमात आहे .सुख त्यागात आहे .सुख अहिंसेत आहे.

सुख देण्यात आहे! वगैरे वगैरे खूप काही…!सुख म्हणजे काय रे भाऊ? ——या प्रश्नाला काहीच ऊत्तर नाही.

मी मात्र एव्हढच म्हणेन, सुख—सुखी असणं ही वृत्ती आहे कदाचित असे तर नाही ना, तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी,..!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आटपाट नगर…. साठा उत्तरांची कहाणी….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ आटपाट नगर…. साठा उत्तरांची कहाणी….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

आपल्या बहुधा सगळ्या कहाण्यात…श्रावणातल्या जवळ जवळ सगळ्या वारांची, त्याचबरोबर मार्गशीर्ष, सत्यनारायण…सत्यविनायक…कोणत्याही कहाणीची सुरुवात…  एक आटपाट नगर होतं, अशी असते.

हे कोणतं आटपाट नगर… कुठे असते ते..?  याचा अर्थ  असा आहे की त्या ज्या कहाण्या आहेत त्या कोणत्याही शहरात घडू शकतील अशा आहेत. आपण त्या कहाण्यांना  ‘भौगोलिक दृष्ट्या न्यूट्रल’ कहाण्या म्हणू शकतो.  त्यामुळेच त्या नगराला  विशिष्ट नाव असायची  गरज नाही. अमुक तमुक नगर होतं असं म्हणण्याऐवजी आटपाट नगर… त्याचा अजून एक अर्थ  सांगता येतो तो म्हणजे आटापासून पाटापर्यन्त म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत…

या कहाण्यांमध्ये असलेल्या त्या नगरात तळी असतात,  त्यावरून शंकर पार्वती जातात,  शेते असतात… हे सगळीकडेच असते… म्हणूनच ते नगर म्हणजे आटपाट नगर.. समजा नारळी पौर्णिमेच्या समुद्र पूजेची कहाणी असेल तर ती आटपाट नगराची कहाणी असणार नाही तर त्या कहाणीत त्या नगराचे विशिष्ट नाव असेल.

आता आपल्याला वाटेल…  आटपाट गाव का नाही?  यातल्या ब-याच कहाण्यांमध्ये राजा राणी असतात,  प्रतिष्ठित  व्यापारी असतात… ज्यांच्या घरी व्रतवैकल्ये केली जाऊ शकतात अशी संपन्न घरे असतात… त्यामुळे  ती ठिकाणे म्हणजे छोटी गावे नसून सधन नगरे असतात.

या सर्व कहाण्यांचा शेवट ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असा असतो.

अनेक ठिकाणी याचा अर्थ…’ही साठ उता-यांची कहाणी पाच उता-यात सारांशाने सांगितली आहे आणि ही कहाणी ऐकून आता व्रताची सांगता होईल आणि व्रताचे सुफळ मिळेल असे सांगितले आहे.

पण मला असं वाटतं… माणसे काहीतरी इच्छा धरून ही व्रतवैकल्ये करतात.

या इच्छा म्हणजे… घरातले लग्न,  नोकरी,  परीक्षेत यश, स्वतःचे घर,  आरोग्य, नावडतीचे आवडते होणे,  मोटार गाडी, ध्येयपूर्ती …परदेश प्रवास… या प्रकारच्या असतात.   आपण जर काळजीपूर्वक या इच्छांची मोजदाद केली तर या सर्व इच्छांची संख्या साठ पेक्षा जास्त नसते… अगदी माणसांचे सरासरी आयुर्मान साठ वर्षांचे धरले आणि इच्छा मनात निर्माण  होण्याच्या वयाचा विचार केला तर आपल्यालाही हे पटेल… त्यामुळे ही साठ उत्तरांची कहाणी… पाचा उत्तरी संपूर्ण  होते… म्हणजे काय… तर त्याची फलश्रुती ही पाच ज्ञानेंद्रियांना किंवा पाच कर्मेंद्रियांना सुखावणारी असते.  खरं तर आपल्या संस्कृतीत ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांपेक्षा अधिक महत्व आहे…

त्यामुळे  ते व्रत त्यात सांगितलेल्या नियमाने पूर्ण झाले  असले तरी प्रत्यक्षात त्याचे सुफळ  मिळाल्यावरच ते संपूर्ण  होणार आहे असा गर्भित संदेश…ज्याचे किंवा जिचे व्रत केले आहे त्या देवतेला ..ज्याने किंवा जिने व्रत केलेले आहे त्यांनी  दिलेला असतो.

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

गेल्या रविवारचाच प्रसंग…

आम्ही नवरा-बायको बिबवेवाडी रोडवरील चितळे मास्तरांच्या दुकानात थांबलो होतो. मिठाई घेऊन बाहेर निघत होतो. तेवढ्यात एक गिर्‍हाईक दांपत्य दुकानाच्या मालकांशी हुज्जत घालू लागले, त्या आवाजाकडे लक्ष गेले. त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे १२००-१३०० रुपयांची खरेदी तर केली होती, पण घरून पिशवी आणायला विसरले होते! आता बाहेर उभ्या मोठया, पॉश कारपर्यंत सामान नेणार तरी कसे? दुकान मालकाकडे त्यांनी ’कॅरी बॅग द्या!” अशी मागणी चालवली होती. मध्यमवयीन, चांगले टापटिपीत कपडे घातले असले तरी बोलण्याचा बाज उध्दट वाटत होता. गृहस्थ बहुदा पुण्याबाहेरील पाहुणे असावेत. कारण चितळे मास्तरांकडे कॅरी बॅग मागण्याचा गधडेपणा दुसरं कोण करणार? आता मालक काय उत्तर देतात, हे ऐकायला आम्ही ’अनुभवी पुणेकरांनी’ कान टवकारले.

मालक: (कपाळावरची रेषही ढळू न देता) “सॉरी, आम्ही कॅरी बॅग देऊ शकत नाही.”

गिर्‍हाईक: अहो, पण मग मी माल बाहेर कार पर्य़ंत नेणार कसा?

मालक: पिशवी आणली नाहीत वाटतं?

गिर्‍हाईक: अहो, ती जर असती तर मागितली असती का कॅरी बॅग?

मालक: हे बघा, कॅरी बॅग देणे कायद्याने गुन्हा आहे, तुम्हालाही ह्याची पूर्ण कल्पना आहे. कायदा मोडणे आम्हाला परवडणारं नाही.

(गिर्‍हाईकाने आता अंधारात एक तीर मारला.)

गिर्‍हाईक: आणि तुमच्या गावातल्या दुकानात कशी देतात मग?

मालक: तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आमचे नियम सगळीकडे सारखेच असतात. दुकान बदलले म्हणून नियम बदलत नाहीत आणि कॅरी बॅग देणे हे आमच्या नियमांत बसत नाही. (दुकानातील गिर्‍हाईकांमध्ये हलकासा हशा पसरतो.)

(तीर फुकट गेल्याने गिर्‍हाईक वैतागते. पण मागे न हटता दुसरा गुगली टाकते. गृहस्थांना बहुदा ’You Can Negotiate Anything’ सारखी मॅनेजमेंटची bestseller  पुस्तके नुकतीच वाचून त्याचा ज्वर चढला असावा. चितळे मास्तरांच्या दुकानात त्याचा यशस्वी वापर करायचाच ह्या हट्टाने पेटल्यासारखे बोलत होते. मधूनच अकारण इंग्रजीही पाजळत होते.)

गिर्‍हाईक: एवढ्या खरेदीवर तर तुमच्या पलिकडील ’जोशी’ वाले हव्या तेवढ्या कॅरी बॅग्ज देतील. मी त्यांच्याकडे जातो ना मग!

मालक: हे पहा, आमचे दुकान कॅरी बॅग्ज देण्याबद्द्ल प्रसिध्द नसून मालाच्या क्वालिटीबद्दल प्रसिध्द आहे!

गिर्‍हाईक: हे बघा मिस्टर, तुम्ही मुद्दाम विषय बदलता आहात. तुमच्या दुकानात आलेल्या गिर्‍हाईकाला मदत करण्याची मालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही माझ्यासारख्या गिर्‍हाईकाला काय मदत करीत आहात, ते सांगा बरं मला.

मालक: हं, आता तुम्ही मदत मागत आहात म्हणून सांगतो, पिशवी आणायला विसरलेल्या गिर्‍हाईकांसाठी आम्ही कापडी पिशव्यांची सोय केली आहे. हे एवढे सामान नेण्यासाठी मी तुम्हाला आमच्या दुकानातील दोन कापडी पिशव्या देऊ शकतो.

(आता गिर्‍हाईकाच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरते आणि तो विजयी मुद्रेने आपल्या बायकोकडे सूचकपणे पाहतो. “कसा आणला लाइनीवर?” पण हा आनंद पुढचे वाक्य ऐकून मावळतो!)

पिशव्यांचे तुम्हाला २० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

गिर्‍हाईक: (संतापलेल्या स्वरात) अहो पण एवढी मोठी खरेदी केल्यावर तुम्ही पिशव्यांचे कसले पैसे चार्ज करताय?

मालक: (शांतपणे) हे पहा, मी तुम्हाला पिशव्यांची मदत करू शकतो, पैशांची नव्हे. शिवाय आमच्या पिशव्यांचीही क्वालिटी उत्तम आहे, मी स्वत: वापरतो. तुम्हालाही पुढे चांगल्या उपयोगी पडतील.

….

…..

ह्या घडीला आम्ही दोघे दुकानातून बाहेर पडलो, त्यामुळे पुढील संवाद काही ऐकले नाही. बाईकवर बसलो आणि बटण-स्टार्ट केली. बायकोही मागे बसली. आता गियर टाकून निघणार त्याआधी उत्सुकतेपोटी मान वळवून दुकानाकडे नजर टाकली. त्याची बायको आधीच गाडीत येऊन बसली होती आणि नवरोबा हातात चितळे मास्तरांच्या मिठाईने भरलेल्या दोन कापडी पिशव्या घेऊन, मान खाली घालून आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत बाहेर येताना दिसले. अर्थात विजय कोणाचा झाला हे वेगळं सांगायला नको.
आम्ही दोघेही गालातल्या गालात हसलो आणि मार्गस्थ झालो.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लक्ष्मण रेषा ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

शिक्षण  B.A . मराठी

नोकरी EDC, A Semi Govt Financial Institution.

निवृत्ति नंतर मराठी लेखनास सुरवात. अनेक कविता प्रकाशनाच्या मार्गावर, दिवाळी अंकांमधून कथा, कविता प्रकाशित. वाचन लिखाण यांची आवड.

‘स्मृति कलश’ या ज्योती देशपांडे यांच्या पुस्तकाचे शब्दांकन, संपादन.

☆ विविधा ☆ ल्क्ष्मण रेषा☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

प्रभु श्रीराम कस्तुरीमृगामागे गेले, रामाची ‘धाव लक्ष्मणा धाव’ अशी आरोळी ऐकून सीता घाबरली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जाण्यास भाग पाडले.  सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने आश्रमाभोवती आपल्या बाणाच्या टोकाने एका रेषेचे कुंपण घातले आणि त्या बाहेर पाऊल न टाकण्याचा इशारा सीतामाईला देऊन तो रामाच्या आवाजाच्या दिशेने गेला.

पुढे काय झाले, हे आपण सर्वचजण जाणतो. त्याचे कारणही जाणतो. तेव्हापासून हेच कुंपण ‘लक्ष्मणरेषा’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथे सीतामाई होती, तिचं अपहरण झालं,  म्हणून लक्ष्मणरेषा फक्त स्त्रियांसाठीच असते, असा सोयीस्कर अर्थ नोंदवला गेला.

लक्ष्मणरेषा ही एकदाच ओढली गेली आणि तिचे उल्लंघन केल्याने जो अनर्थ घडला, त्यामुळे पुराणातील एक शिकवण किंवा एक इशारा म्हणून ती अजरामर झाली.

लक्ष्मणरेषा म्हणजे आत्मसंयमन, लक्ष्मणरेषा म्हणजे स्वत्वाचे रक्षण, लक्ष्मणरेषा म्हणजे आचारविचारांसाठी एक नियम,  लक्ष्मणरेषा म्हणजे चारित्र्य, शील यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक सुरक्षित कवच.

चारित्र्य आणि शील यांचे जतन आचार-विचार, आहार-विहार, याच्या माध्यमातून व्यक्त होते. आचार म्हणजे आपले वागणे,बोलणे, समाजात वावरणे, पोषाख, दुस-याला मान देणे, आदर करणे.

विचार म्हणजे पूर्वकाळातील अनुभव आणि संस्कार यातून आपल्याला झालेले ज्ञान व त्याचा सद्यः परिस्थिती साधलेला समन्वय.

आहार म्हणजे शरीराला आवश्यक,  प्रकृतीला अनुरूप असा आणि गरजेपुरताच करावयाचा अन्नपुरवठा.

विहार म्हणजे शरीर व मनाला उत्साह,  आनंद,  तरतरी देणारा अनुभव. तो व्यायाम असेल, पर्यटन असेल किंवा स्थलपालट असेल.

वरील चारही गोष्टी करत असताना,  सृष्टीवर त्या जगन्नियंत्याचे अधिपत्य आहे,  हे जाणून कर्म करणे. चांगले- वाईट दोन्ही कर्मे तो पहात आहे, याची जाणीव सतत ठेवणे. हे संस्कार मनावर असावे लागतात. यश, आनंद, समाधान ही चांगल्या कामाची फलश्रुती असते तर वाईट कृतीची शिक्षा ही भोगावीच लागते. हे ध्यानात ठेवून चांगले कर्म करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

भारतीय संस्कृतीचा हा अलिखित पण अधोरेखित नियम आहे. समाजात वावरताना देहबोली ही महत्त्वाची असते.  ही एक अलिखित बोली आहे.ती व्यक्तीच्या व्यवहारातून, चालण्या बोलण्यातून राहणीमानातून, पोषाखावरून, व्यक्त होते.  ही संयमाची लक्ष्मणरेषा अतिशय काटेकोरपणे पाळावी लागते. जरासं सुद्धा रेषेबाहेर पडलेलं पाऊल पाय घसरायला कारणीभूत ठरू शकते. हे केवळ नीतीमत्तेच्या संदर्भात नाही तर सर्व बाबतीत आहे.

हा नियम स्त्री-पुरूष,  गरीब-श्रीमंत, लहान-मोठे,  सर्वांना लागू असतो. स्थलकाल, वर्णजाती,  याचे परिमाण न राखता, पृथ्वीवरच्या मनुष्याला सर्व समान लागू असतो. प्रत्येकाचे वर्तन, उपजीविकेचे व्यवहार यासाठी ही आहे.

ह्याची जाणीव घराघरातून वडीलधा-यांनी स्वतः सांभाळावी, तरूण वर्गाला करून द्यावी. शिक्षण संस्थांनी याबाबतीतले नियम कडक केले पाहिजेत. अनेक संस्थांनी अशी पावले उचलली आहेतही.

प्रत्येकानेआपल्या मनात लक्ष्मणरेषेचे भान ठेवलेच  पाहिजे. प्रत्येक वेळी,  प्रत्येक ठिकाणी आपले रक्षण करण्यासाठी आईवडील, भाऊ,दीर, मित्रमैत्रिणी, पोलिस बरोबर असतीलंच असं नाही,  पण मनातली लक्ष्मणरेषा आपल्याला संरक्षण नक्कीच देते.

धुंद होऊन जगताना संयम हवा. बोलताना संयम हवा.विचार करताना लक्ष्मणरेषेची जाणीव असावी. लक्ष्मणरेषा प्रत्येकाने आपल्या पुरती सीमित केली तरी खूप आहे.

छोटे-मोठे अनर्थ घडूच नयेत म्हणून लक्ष्मणरेषेचा आदर करावा, स्वतःच्या आणि दुस-यांच्याही.

 

© सौ. अमृता देशपांडे

पणजी

9822176170

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print