मराठी साहित्य – विविधा ☆ कवतिक ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆  विविधा ☆ कवतिक ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

“स्तुति: कस्य न प्रिय:?” असे कुणीतरी थोर व्यक्तीने म्हणून ठेवले आहे. किती सार्थ आहे हे! आपण एखादे प्रशंसनीय, अभिमानास्पद काम करावे आणि त्याची दखल आपल्या आजूबाजूच्या कुणी तरी घ्यावी ह्याइतकी सुखद दुसरी जाणीव कोणतीच नसावी, नाही का? त्यातही कवतिकाचे बोल ऐकवणारी व्यक्ती जर आपल्या जवळची, प्रियजनांपैकी असेल तर काय मग “सोने पे सुहागा!”?

दुसर्‍या कोणीतरी आपले कवतिक करावे, स्तुती करावी, प्रशंसा करावी ही प्रत्येक मानवाची सुप्त आंतरिक इच्छा असतेच. उदा. प्रेक्षकांनी आपल्या अभिनयाची प्रशंसा करावी ही अभिनेत्यांची, श्रोत्यांनी-परीक्षकांनी तोंडभरून दाद द्यावी ही गायकाची, गुरुजींनी शाबासकी द्यावी अशी विद्यार्थ्याची, मालकाने ‘अर्थ’पूर्ण कवतिक करावे, ही नोकरदाराची इच्छा असते वगैरे वगैरे. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास, एखादा चांगला Whatsapp मेसेज/फोटो/व्हिडिओ पाठवला तर ग्रुपमधील इतरांनी त्याची ‘निदान दखल तरी घ्यावी’ अशी पाठवणार्‍याची अपेक्षा असते. पण ही मूलभूत अपेक्षा जर कुठल्या कारणाने पूर्ण नाही झाली तर आपला अपेक्षाभंग होणार हे निश्चित! आणि अपेक्षाभंगचे दु:ख हे मोठे असते. म्हणूनच “कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता कार्य करीत रहा!” हा महत्वाचा संदेश भगवदगीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेला आहे. म्हणजेच ‘चांगल्या कामगिरीबद्दल दुसर्‍याचे मनापासून व निरपेक्षपणे कवतिक करणे’ हे देखील आपले कर्तव्यच बनते, नाही का?

कवतिकाचे महत्व फार मोठे आहे. कवतिक हे एखाद्या दुधारी तलवारीप्रमाणे काम करते. ‘निखळ प्रशंसा’ ही एखाद्याच्या शिडात वारा भरून त्या व्यक्तीस चांगले काम करीत राहण्यास सतत उद्युक्त करते. उभारी देणारा एखादा शब्दही माणसाचे आयुष्य बदलण्यास पुरेसा ठरतो! अशी उदाहरणे जगाच्या इतिहासात आपण पहिली आहेत. इतकीच नव्हे तर आपल्या गणगोतांमध्येही आढळतात. दुसर्‍याची स्तुती ही तुम्हाला कधीच कनिष्ठपणा देत नसते. दुसर्‍याला प्रोत्साहित करणार्‍या व्यक्ती इतरांशी खेळीमेळीचे नाते लगेच प्रस्थापित करू शकतात. ह्याउलट तटस्थ राहणार्‍या व्यक्तींबद्दल इतरांचे मत तितकेसे अनुकूल बनत नाही.

अर्थात, काही पथ्य पाळणे मात्र महत्वाचे आहे… प्रशंसा ही अगदी मनापासून वाटत असेल तरच आणि आणि दुसरे महत्वाचे म्हणजे योग्य प्रमाणातच करा! कारण ‘अती तिथे माती’ हा नियम इथेही लागू आहे. शिवाय अवाजवी, अवास्तव, निराधार, विनाकारण केलेलं कवतिक हे ‘चापलुसगिरी’च्या / ‘गूळ लावणे‘ च्या हद्दीत मोडते. तुमच्या शब्दांत जरादेखील खोटेपणा असेल, आपमतलबीपणा असेल, तर तुमचे पितळ आज न उद्या उघडे पडल्यावाचून राहणार नाही. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तीला तुमच्या हेतूबद्दल शंका येऊन तुमच्याशी असलेले संबंध कायमचे बिघडूही शकतात.

अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की दुसर्‍यांच्या कवतिका सोबतच स्वत:चे रास्त कवतिक करणेही तितकेच महत्वाचे आहे. पुष्कळांना ‘स्वकवतिक’ / ‘स्वप्रशंसा’ करणे मुळातच पसंत नसते, एकदम दुसरे टोक, अगदी प्रसिद्धीपरायणच म्हणा ना! अशा व्यक्ती दुसर्‍याने केलेले त्यांचे कवतिक स्वीकारू शकत नाहीत. त्यात कमीपणा वाटतो म्हणा, आत्मविश्वास कमी पडतो म्हणा किंवा भिडस्त स्वभाव नडतो म्हणा. पण ही माणसे दुसर्‍याचे रास्त कवतिक करण्यातही मागे पडण्याचा धोका असतो. सरळ आहे, जी व्यक्ती स्वत:च्या पाठीवर सुध्दा “शाब्बास!” म्हणून थाप मारू शकत नाही, ती दुसर्‍याला काय थाप मारणार (म्हणजे चांगल्या अर्थाने बरं का…J)??

पुष्कळ जण असेही असतात की ज्यांना स्वत:च्या छोट्यामोठ्या सर्वच गोष्टीचा ढिंढोरा पिटण्याची सवय असते. “मी यंव आहे, मी त्यंव आहे, मी हे केले, मी ते केले” हे सांगण्यातच अशा “अहं, आवाम, वयं” वर्तुळात फिरणार्‍या व्यक्तींचे आयुष्य अकारण वाया जात असते. खरे म्हणजे ‘स्वत: बद्दल बढाया मारणे’ हे श्रेष्ठ गुरू समर्थ रामदासस्वामींनी ‘मूर्ख लक्षण’ म्हणून ‘दासबोधा’त अधोरेखीत केले आहे. परिणामत: अशा व्यक्ती समाजात अप्रिय ठरतात ह्यात नवल ते काय? अर्थातच ‘कवतिका’ बद्दल समर्थांनी कवतिकानेच लिहिले आहे.

थोडक्यात म्हणजे काय, तर ‘कवतिक’ हा विषय हलकाफुलका समजू नका, औप्शनला तर मुळीच टाकू नका. भरपूर अभ्यास करा, प्रॅक्टिकलचा सराव करा आणि त्यात कुठेही कमी पडू नका. चांगले गुण मिळवून पास व्हा, म्हणजे सर्व जण तुमचे ‘कवतिक’ केल्यावाचून राहणार नाहीत! ??

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चहा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

चहा हवा आहे का कोणाला असा शब्द जरी कानी पडला, अगदी मध्य रात्री बारा वाजता तरी नकळत सगळ्यांचेच कान कसे टवकारतात . जणू काही तो चहा आपल्यालाच बोलवत आहे.

काय आहे असे त्या चहात?

तो मस्त सुगंध दरवळायला लागला की कशी, तो न पिताच तरतरी येते मनाला.

कट्ट्यावर रमलेल्या गप्पांमधेच जर गरम चहाचा कप आला तर मग काय सोने पे सुहागाच.

लहान मुलांच्या कंपूत असो, नाही तर मित्रांच्या घोळक्यात, नातेवाईकांच्या गर्दीत असो नाही तर आपल्या सहकार्यां बरोबर तो सगळ्यानाच आपलसं करून सोडतो.

संध्याकाळी दमून जर एखादी स्त्री घरी आली असेल आणि तिच्या हातात कोणी ऐता गरम चहा आणून ठेवला तर तिचे निम्मे अधिक श्रम, तो प्यायच्या आधीच पळून जातात.

मित्रां बरोबरचा तो टपरी वरचा चहा आणि गरम भजी यांची मैफिल तर खूप रंगतदार असते.

पहाटेच्या रम्य वेळी, मस्त आलं आणि गवतीचहा घातलेला चहा आणि वर बाहेर पडणारा धोधो पाऊस जणू स्वर्ग सुखच.

चहाची मजा तरी पहा तो आपण केव्हांही घेऊ शकतो.

कोण सकाळी लवकर जाग आली म्हणून घेतो, तर कोण रात्री झोप लागली नाही म्हणून, कोण मनाचा थकवा घालवण्यासाठी, तर कोण आनंद साजरा करण्यासाठी, कोणाला त्यात दुःख लपवायचे असते तर कोणी असाच घेत असतो वेळ जात नाही म्हणुन.

नाना रंगांनी, अनेक ढंगानी असा नटलेला हा चहा आहे मग तो टपरीवरचा असो, किंवा कॉलेज कॅन्टीन मधला, घरचा असो किंवा हॉटेलचा, मसाला असो किंवा ग्रीन टी तो कसा ही घेतला तरी सगळ्यांना खुश करून जातो, मनातली मरगळ दूर करून जातो.

शेवटी एवढंच म्हणेन की

 

चहा तर चहाच असतो

तो ह्याचा किंवा त्याचा नसतो

तो एकच प्याला सुखाचा असतो

जणू दुःखावर घातलेली फुंकर असतो

अरे चहा तर चहाच असतो

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर

श्री मानसिंगराव कुमठेकर

 ☆ विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆ 

२१५ वर्षांपूर्वी झाले मुद्रण,

एकमेव प्रत मिरजेत,

 अमूल्य राष्ट्रीय ठेवा

जगभरात ज्या भगवद्गीतेतील विचारांचा अभ्यास केला जातो, ती भगवद्गीता पहिल्यांदा मिरजेत 1805 साली मुद्रीत झाली. 215 वर्षांपूर्वी देशात मुद्रीत झालेल्या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे. भारतीय मुद्रण कलेचा तो एक अमूल्य ठेवा आहे.

शेकडो वर्षांपासून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने भगवद्गीता हा महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. कुरूक्षेत्रावर  कौरव-पांडवांमध्ये झालेल्या युध्दावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये आहे.  त्यामुळे शेकडो वर्षे भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग बनला आहे.

मुद्रणपूर्व काळात याच्या अनेक हस्तलिखीत प्रती तयार झाल्या.  मात्र, ही गीता सर्वसामान्यांना सहजप्राप्य नव्हती.

पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय राजकर्त्यांच्या आगमनानंतर देशात मुद्रणकलेला प्रारंभ झाला. सुरूवातीला हे मुद्रण मराठी भाषेत पण, रोमन लिपीत असे. 1805 च्या सुमारास बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देशातील पहिले देवनागरी मुद्रण करीत ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिध्द केले. त्यानंतर काही वर्षातच अनेक देवनागरी ग्रंथ मुद्रीत झाले. पण, त्यामध्ये भगवद्गीतेचा समावेश नव्हता.

याच काळात पूणे येथे सवाई माधवरावाच्या दरबारात असणाऱ्या इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने नाना फडणवीसाचे सहकार्य घेऊन देवनागरी छपाईचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, नाना फडणवीसाच्या मृत्यूनंतर तो प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, मॅलेट याने ज्या तांबट करागीराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले होते. त्याला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरून घेतली. आणि तिच्या काही प्रती मुद्रीत करून घेतल्या. त्या ब्राम्हणांना दान देण्यात आल्या. सन 1805 साली मिरजेत भगवद्गीतेचे हे पहिले मुद्रण झाले. तोपर्यंत जगात कुठेही भगवद्गीता छापील स्वरूपात उपलब्ध नव्हती.  त्यामुळे भगवद्गीतेच्या छपाईबरोबरच देवनागरी मुद्रणाचा हा प्रयोग देशाच्या मुद्रण क्षेत्रात क्रांती घडविणारा ठरला.

मिरजेत 215 वर्षांपूर्वी मुद्रीत झालेल्या देशातील या पहिल्या भगवद्गीता ग्रंथाची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंगराव कुमठेकर संग्रहात आहे.  एकूण 166 पृष्ठांच्या या गीतेच्या शेवटी मुद्रणाच्या स्थळ काळाला उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख ‘मार्कंडेय मुनीक्षेत्रे’ असा केला असून ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५  होते. देशातील पहिले देवनागरी मुद्रण असलेली ही प्रत पाहण्यासाठी देश-विदेशातून काही अभ्यासकांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाला भेट देऊन त्याची माहिती घेतली आहे.

215 वर्षांपूर्वी मिरजेत मुद्रीत झालेल्या देशातील पहिल्या भगवद्गीतेची माहिती रोचक आहे. देशात मुद्रीत झालेल्या या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात असून तो अमूल्य असा राष्ट्रीय ठेवा आहे.

 

© मानसिंगराव कुमठेकर, ( मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५)

© श्री मानसिंगराव कुमठेकर

मिरज

मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती..’ म्हणत दोन्ही हातांची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्..’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हातांनी आपण नमस्कार करतो!

‘ओंजळ’ म्हंटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण!

सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्ध्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रिती राहात नव्हती! गंगास्नाना नंतर तो हा दान यज्ञ करीत असे ओंजळीने! त्याची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते  देण्यात व्यस्त असे. त्यामुळे कर्णा कडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवचकुंडले ही अशाच वेळी मिळवली!  ओंजळ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू!

दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्याले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते! तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखे वाटते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दाना साठी हाताचे महत्व आपण सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हातांनी काही देण्यासाठी असते!

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते! सकाळच्या वेळी कोणी जर सुवासिक जाई ,जुई, प्राजक्त ,मोगरा,बकुळी या सारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभार्‍यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हार्‍यात सजलेली पहाताना ते फुलांनी सजलेले रूप पाहून मन भरून येते!

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते! ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते!

भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेलं ओंजळभर पाणी याचे महत्व माणसाला खूपच असते! अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय राहात नाही! जे मिळते ते समाधानाने घ्यावे त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते!

ओंजळ भरुन लाहया जेव्हा पती-पत्नी लाजाहोमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात. जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकांसाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी  घेतात, जणूं आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते!

‘ओंजळभर धान्य’ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे  रूपांतर एका खूप मोठ्या धान्य साठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही पण अशा  असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते.

गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेलेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये, त्यांना फारतर पैसे  देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी! त्या काळी अन्नदानाचे पुण्य  मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण  लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत आहे आणि तिची ओंजळ सतत भरभरून वहात आहे असे असते! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येतं!यावरून सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते! त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की ते चित्र नक्कीच सर्वांच्या स्मरणात असेल!

आपल्या दोन हातांवरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो! जेव्हा हे दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते!

अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडतेय असं मला वाटतंय! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळी ला सतत ओतत रहाण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळी साठी मला वाटतंय!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जयंती ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

 विविधा ☆ गीता जयंती ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆

आज आहे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी.

आज एक विशेष जन्मदिवस आहे मंडळी…तो आहे व्यक्ती घडवणार्‍या विचारांचा. हा भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी याच दिवशी युद्धभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला गीता सांगितली, तो हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो.

गीता म्हणते कर्म करा..काम करा.. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही मनोवृत्ती गीतेला मान्य नाही.

कर्म म्हणजे स्वधर्म आचरण करा…

स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपापल्या स्वभावानुसार, क्षमतांनुसार, कौटुंबिक- सामाजिक परिस्थितीनुसार, योग्य कर्तव्यकर्म ईश्वरास साक्षी ठेवून किंबहुना ईश्वरास आपल्याबरोबर ठेवून करणे.

ईश्वरास साक्षी ठेवल्याने आपसूक चुकीचे काम हातून होतच नाही.

गीता म्हणते कर्मावर तुझा अधिकार आहे पण कर्माच्या फळावर नाही.

कर्मावर आपला अधिकार आहे म्हणजेच ते आपल्या स्वाधीन आहे. आपण कर्म कोणते करावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.जे काम करायचे ते आपल्या स्वभावानुसार,क्षमतेनुसार निवडावे असे गीता सांगते. असे   काम सहज व आनंददायी होते.

असे  कर्म करतानाचाच आनंद एवढा असतो की त्यापासून फळ काय मिळेल याचा विचार माणसाच्या मनातच येत नाही.

‘दैनंदिन जीवनात गीता’ या पुस्तकात डॉ. वि.य.कुलकर्णी म्हणतात- मुलगा खेळण्याच्या आनंदासाठी खेळतो. त्यामुळे व्यायामाचे फळ त्याला सहजच मिळते. परंतु त्या फळासाठी म्हणून तो खेळत नाही. खेळणं हे कर्म करतानाचा आनंद तो घेत असतो..फळाकडे त्याचे लक्ष नसते. त्याचा सर्व आनंद त्या खेळात असतो.

कधीकधी आयुष्यात न आवडणारे कामही करावे लागते…तेव्हा काय करावे?

एक गोष्ट आहे.. दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे धोंडू आणि महादू ..दोघांनाही एका कुठल्यातरी गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. पाच किलो वजन डोक्यावर घेऊन  डोंगर चढून जायचे होते. धोंडू ने पाच किलो वजनाचा दगड डोक्यावर घेतला आणि तो डोंगर चढून गेला. थकून गेला बिचारा.. दुसरा महादू विचारी होता. त्याच्या मनात आले शिक्षा भोगायची आहे.. पाच किलो वजन न्यायचे आहे, ठीक आहे, नेऊया .. पण काय न्यायचे हे कुठे सांगितले आहे ?त्याने काय केलं ? भाजीभाकरी, दह्याचा लोटा, पाण्याचा तांब्या असे सारे पाच किलो वजनाचे घेतले. डोंगर चढून गेला. तोही थकला पण नंतर खाली बसून त्यांने मजेत भाजी भाकरी वर ताव मारला. शिक्षा दोघांनीही भोगली पण एकाला शिक्षा झाली आणि दुसऱ्याने त्या शिक्षेचा ही आनंद घेतला.

शिक्षा म्हणून काम करू लागलो तर ते शरीराला आणि मनाला थकवा देते पण तेच विचारपूर्वक आणि मजेने स्वीकारलं तर त्या कर्मात ही आनंद  मिळतो. म्हणून आपलं कर्तव्य , काम याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा.

कर्मा फळा कडे पाहू नये ही गीतेची दृष्टी आहे.

एक गोष्ट सांगतात-  एका छोट्या मुलाने ऐंशी वर्षाच्या एका म्हाताऱ्याला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तेव्हा तो हसला. म्हणाला-  “आजोबा, या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळतील का?” तेव्हा म्हातारा हसून म्हणाला,” बाळ, ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते आंबे तरी मी कुठे लावले होते ? कोणीतरी माझ्या पूर्वजांनी जे पुण्यकर्म केले त्याचे फळ मी खातो, म्हणून माझ्या हातून मी झाडं  लावतोय , ते पुण्यकर्म होत आहे ..त्याच्या फळाचा मी कशाला विचार करू ?त्याचे फळ पुढील पिढ्यांसाठी.. मी त्याची अपेक्षा करत नाही.” ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर भगवंताने गीतेत फळाची अपेक्षा ठेवू नये असे का सांगितले आहे याची कल्पना येते..

तर अशी ही जीवनाचे शिक्षण देणारी गीता..विनोबा भावे तिला आई , गीताई म्हणतात..

स्वाध्याय परिवाराचे जनक पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात – गीता केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, हा विश्व धर्मग्रंथ आहे.

गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. आपण सामान्य माणसे जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी गोंधळून जातो..कसे वागावे,काय करावे उमजत नाही.. भगवंतांनी गोंधळलेल्या अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवन सोपेपणाने जगण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे…आपण ते समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे..

ख्रिस्ती काय, हिंदू काय किंवा मुस्लिम काय…सर्व धर्म शेवटी सारखेच.. वेगवेगळ्या नद्या जशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वहात येऊन  एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे एकाच ईश्वराकडे नेणाऱे हे वेगवेगळे मार्ग..

आजच्या ख्रिसमस व गीता जयंती निमित्त प्रभु येशू आणि गीताकार भगवान श्रीकृष्ण या दोन्ही विभूतींना तेवढ्याच प्रेमाने वंदन करूया..

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिनविशेष – २४-२५ डिसेंबर २०२० – नाताळ…. ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

☆ विविधा ☆ दिनविशेष – २४-२५ डिसेंबर २०२० – ??नाताळ…. ??☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

उद्या २५ डिसेंबर, ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण. ख्रिश्चन समुदायाचा हा सर्वात मोठा सण आहे.  प्रभू येशुंचा  जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.२४ डिसेंबर च्या संध्याकाळी चर्चमधे इव्हिनिंग मास म्हणजे प्रार्थना होतात. २४ च्या मध्यरात्री मिडनाइट मास सुद्धा होतात,मेरीने मध्यरात्री येशू बाळाला जन्म दिला म्हणून.. ख्रिसमस म्हटलं की केक, सजवलेला ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची भेटवस्तू, गिफ्ट या गोष्टी आठवतात. सांता क्लॉजचे गिफ्ट ही लहान मुलांच्या दृष्टीने या सणातील अगदी आनंददायी गोष्ट..

लाल रंगाचा डगला, लाल रंगाची गोंडेदार टोपी, पांढरीशुभ्र दाढी असं सांताचं  रूप .

कोण बरे हा सांताक्लॉज?

आजपासून दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले सेंट निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते. सेंट निकोलस म्हणजेच सांता, परंतु सेंट निकोलस आणि येशुंच्या जन्माचा काही संबंध नाही.

सेंट निकोलसचा जन्म तिसर्‍या शतकात, येशुंच्या मृत्युनंतर 280 वर्षांनंतर मायरा येथे झाला. ते एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. ते लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच त्यांची प्रभू येशुंवर नितांत श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी (पुजारी) आणि नंतर बिशप बनले. गरजूंना आणि लहान मुलांना भेटवस्तू देण्याची त्यांना आवड होती. या सर्व भेटवस्तू ते मध्यरात्रीच देत असत, कारण  देताना कोणी आपल्याला पाहू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वतःची ओळख ते कोणासमोरही आणू इच्छित नव्हते.

कुणालाही मदत करताना ती शक्यतो झाकल्या मुठीनं करावी उगीच त्याचा गाजावाजा करू नये हा किती छान विचार आहे नाही यात..

बायबलमधली गुड सामारिटनची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे.. सामारिटन म्हणजे सामारिया प्रांतातले लोक. यांचे आणि ज्यू लोकांचे वैर होते. ज्यू लोक सामारिटनना खालच्या दर्जाचे मानत.. जेरुसलेम आणि जेरिको या दोन शहरा दरम्यान घडलेली ही गोष्ट. एकदा एका ज्यू प्रवाशाला या वाटेमध्ये लुटारूंनी लुटलं. त्याला  बेदम मारहाण केली अगदी अर्धमेलं करून सोडलं. तो बिचारा विव्हळत रस्त्यावर पडला होता. थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून एक ज्यू धर्मगुरू गेला. त्याने त्याच्याकडे पाहिलं. हळहळ व्यक्त करत तो आपल्या कामाला पुढे निघून गेला. नंतर अजून एक माणूस त्या रस्त्यावरून  गेला. त्यानेही या विव्हळणाऱ्या प्रवाशाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिथे एक सामारिटन आला. त्या विव्हळणाऱ्या माणसाला पाहून तो अगदी कळवळला. तो त्या माणसाजवळ गेला, त्याने त्याच्या जखमा स्वच्छ केल्या.त्यावर थोडी आपल्याजवळची वाईन लावली आणि त्याला आपल्या घोड्यावर टाकून जवळच्या उपचार केंद्रात घेऊन गेला. एवढं करूनच तो माणूस थांबला नाही त्याने दुसऱ्या दिवशी त्या उपचार केंद्रातल्या माणसाजवळ काही पैसे देऊन ठेवले आणि त्यातून या माणसाचा उपचार पूर्णपणे करून त्याला बरे करण्यास विनंती केली.. ख्रिस्ताने याला गुड सामारिटन म्हटले..

‘Love thy neighbour’ हा ख्रिस्ताचा करूणेचा संदेश देणारी ही गोष्ट, अडचणीत, संकटात असलेल्या माणसाला, अगदी शत्रू असला तरी, मदत करावी असे सांगते.

यावरूनच निस्वार्थपणे लोकांच्या मदतीला धावून जाणार्‍या माणसास गुड सामारिटन म्हणण्याची प्रथा पडली आहे.

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्मृती’ आठवणींचं ब्रम्हांड..!☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘स्मृती’ आठवणींचं ब्रम्हांड..!☆ श्री अरविंद लिमये ☆

‘स्मृति’ हा संस्कृत शब्द.एक धर्मग्रंथ.

‘श्रृति, स्मृति, पुराणोक्तफलप्राप्त्यर्थं…’

या फलश्रृतित उल्लेख असलेला तो हाच धर्मग्रंथ..!

स्मृती शब्द मराठीत वापरला जातो तेव्हा ‘ति’ दीर्घ होते , तसा त्याचा अर्थही मर्यादित रुपात रुढ होत असावा. स्मृती हा शब्द आपण आठवण या अर्थाने सर्रास वापरतो.पण मला आपल़ं उगीचच वाटतं(उगीचच एवढ्याचसाठी कि त्याच्या पृष्ठ्यर्थ संदर्भ मला मिळालेला नाहीय)की आठवणी स्मृतींमधे साठवल्या जातात असं आपण म्हणतो, तर स्मृती म्हणजे आठवणी नव्हे तर त्या साठवल्या जातात ती जागा. माणूस दिवंगत झाल्यानंतरही तो स्वत:च्या कर्मांसोबत तो साठा बरोबर नेत असतो.पूर्वजन्मीच्या आठवणी म्हणतात त्या याच.

नवीन जन्मानंतर आपल्या पूर्वजन्मातील आठवणी पुसल्या जातात. त्या पुसल्या गेल्या नसत्या तर आपण त्या आठवणींसकट नवं आयुष्य नीट जगूच शकलो नसतो. म्हणूनच निसर्गयोजनेनुसार पुनर्जन्मापूर्वी जाणिवांवरील आठवणींचे ठसे पुसले जातात. मात्र कांही ठसे इतके खोलवर कोरले गेलेले असतात किं ते पुसले न गेल्याची शक्यता असते. नवजात अर्भक नजर स्थिर होईपर्यंत स्वत:शीच अस्फुटसं हसत असतं किंवा मधेच अचानक रडतही असतं ते पूर्वजन्मातल्या आठवणींभोवती त्याचं मन घोटाळत असल्यामुळेचअसं म्हणतात, त्यात म्हणूनच तथ्य असावे असे वाटते. नजर स्थिर झाल्यानंतर मात्र ते नव्या जन्मात खर्या अर्थाने स्थिर होते. त्या आठवणींपासून विलग होऊनसुध्दा या जन्मातही  काहीजणाना ‌वयाच्या ३-४ वर्षांपर्यंत त्यांचे गेल्या जन्मातले आईवडिल, जवळचे नातेवाईक सर्व संदर्भांसह आठवत असल्याच्या घटनाही कपोलकल्पित  नसल्याचे प्रत्ययास आलेले आहे. अर्थात ४-५वर्षांनंतर मात्र त्या आठवणी पुसट होत नाहीशा होतात.

कांहीवेळा एखाद्या माणसाला प्रथमच भेटत असूनही तो पूर्वी कधीतरी भेटला असल्याची  भावना मनात येते न् मन अस्वस्थ होते. कधी एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर, आपण इथे आधी कधीतरी येऊन गेल्याची भावना आपल्या मनात निर्माण झाल्याचा अनुभवही अनेकाना आला असेल.

या सर्वांवर सखोल संशोधन सुरु असले तरी मला स्वत:ला मात्र त्याचा थांग लागूच नये असे वाटते. नाहीतर आपल्या जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्या अक्षरांचा अर्थ मात्र मन:पटलावरुन पुसला जात नाही. तशाच या पूर्णत:पुसल्या न गेलेल्या पूर्वजन्मातल्या आठवणी..!!

आठवणी रम्य असतात तशा क्लेशकारकही.गोडअसतात तशा कडवटही.फुललेल्या असतात तशा रुतलेल्याही. त्या कशाही असल्या तरी त्यांचा गुंता होऊ न द्यायची काळजी आपण घ्यायला हवी. तरच हव्याहव्याशा आठवणी सोबत करतील आणि नकोशा आठवणींवर नियंत्रणही ठेवतील.

कटू आठवणी विसरता आल्या नाहीत तरी कधीच विसरु नयेत अशा आठवणी निर्माण करणं मात्र आपल्याच हातात असतं. कारण वर्तमानातलं आपलं वागणं, बोलणं, नव्हे जगण्यतला प्रत्येक क्षणच पुढे आठवणींमधे रुपांतरीत होणार असतो. त्या चांगल्या कि वाईट हे असं आपल्यावरच तर अवलंबून असतं. त्या आठवणी चांगल्या हव्या असतील तर आपलं जगणंही चांगलं असायला हवं हे ओघाने आलंच. चांगलं म्हणजे कसं, तर आठवत रहावं असं…!!

आपल्या स्मृतीत साठवल्या जाणार्या आठवणी या पुढील जन्मासाठीचं आपलं ‘संचित’असणार आहे एवढं भान जरी जगताना ठेवलं, तरी उद्या काय होईल याचं दडपण निर्माण होण्यापूर्वीच विरुन गेलेलं असेल.

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जादूचा चौरस (Magic Square) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ जादूचा चौरस (Magic Square) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

आज 22 डिसेंबर. भारतातील थोर गणितज्ञ कै.श्रीनिवास रामानुजान यांची आज 133वी जयंती. अवघं 33 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं पण एवढ्या अल्प काळात त्यांनी गणितातील जी सूत्रे शोधून काढली, जे सिद्धात मांडले, ते बघून अवघं जग विशेषत: युरोपातले गणितज्ञ दिपून गेले. त्यांच्याबद्दलची माहिती क्रमश: उद्यापासून अंजली गोखले देत आहेत. आजच्या दिवशी त्यांच्या गणिती प्रतिभेला अभिवादन करत त्यांचा एक जादूचा चौरस इथे सादर केला आहे. आपल्या माहितीसाठी आणि आपल्या मनोरंजनासाठीसुद्धा.

रामानुजान यांनी तयार केलेला जादूचा चौरस (Magic Square)

चौरस क्र. 1

चौरस – क्र. 2

रामानुजन यांची जन्मतारीख घालून त्यांनी तयार केलेल्या सूत्रांनुसार चौरस तयार करू. 

DD – Date of birth – 22 , MM- Month of birth – 12

CC- Century of birth – 18, YY – Year of birth – 87

त्यामुळे –

YY+1= 88 , CC-1 = 17,  MM-3 = 9,  DD+3 = 25

MM-2 = 10, DD+2 = 24, YY+2 = 89, CC-2 = 16

CC+1 = 19,  YY-1 = 86,  DD+1 = 23, MM-1 = 11

 

चौरस –क्र. 3

 

आता सूत्राप्रमाणे –आडव्या ओळी- संख्यांची बेरीज

1.ली ओळ – 22+12+18 + 87 = 139,  2.री ओळ – 88 + 17 + 9 + 25 = 139,

3.री ओळ – 10+24+89 +16 = 139,   4.थी ओळ – 19 + 86 + 23 +11= 139,

 

आता सूत्राप्रमाणे उभे रकाने – संख्यांची बेरीज

रकाना1 – 22 + 88 + 10 + 19 = 139  रकाना2 – 12 + 17 + 24 + 86 = 139

रकाना3 – 18 + 9 + 89 + 23  = 139  रकाना4 – 87 + 25 + 16 + 11 = 139

 

आता चौरस –क्र. 2 मधील आकड्यांच्या जागी चौरस –क्र. 3 मधील संख्या घ्या आणि खालीलप्रमाणे बेरीज करून बघा.

 

1+2+5+6 = 3+4+7+8 = 9+10+13+ 14 = 11+12+15+16 = 6+7+10+11 = 139

त्याचप्रमाणे a. 1+6+11+16 म्हणजेच 22+17+89+11= 139

तसेच         b. 4+7+10+13 म्हणजेच 87+9+24+ 19 = 139

                 c. 2+3+14 +15 = 1+ 4 + 13 +16 = 139

(c. मध्ये सूत्रातल्या प्रमाणे संख्या घालाव्या.)

याप्रमाणे आणखी अनेक पर्म्युटेशन्स- कॉम्बिनेशन्स करून बघता येतील. जसे

                d. 5+8+9+12 = 139

(d. मध्ये सूत्रातल्या प्रमाणे संख्या घालून)

 

याप्रमाणे जादूच्या चौरसात वाचकांनी आपल्या वयाचे आकडे घालावे आणि वर सांगितल्याप्रमाणे ती बेरीज समान येते का बघावे किती येते, तेही कळवावे.

(आता या वयात पुन्हा एकदा गृहपाठाचा अनुभव)

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जो उस्ताद तोच वस्ताद…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ जो उस्ताद तोच वस्ताद ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

?????

जंगलातील   रोजच्या रुटीनला कंटाळून  आनंदी वातावरण निर्माण  करण्यासाठी सुरु झालेला ‘बिग टास्क’ हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला होता.  आज  या कार्यक्रमाचा विजेता (/ विजेती) ठरणार  होता. विजेत्या स्पर्धकाला  ‘जंगलं पर्व’ या व्हाटसप ग्रुप चे ऍडमीन पद द्यायची घोषणा  ‘राजाने’ आधीच केली होती. या महा अंतिम फायनललाही  खास परीक्षक आले होते

छोटा  भीम – बेळगाव जवळील  दांडेली अरण्यातून

मोगली – पुण्या  जवळच्या अरण्येश्वर येथून

आणि चीन मधील एका जंगलातून खास डोरेमॅन आपल्या अद्भुत गॅजेटसह उपस्थिती होता.

मराठी इव्हेंट मधला कुठलाही शो हा

‘थूकरटवाडी’ जंगलातील प्राण्यांशिवाय संपन्न होऊच शकत नाही तेंव्हा निलू गाय आपल्या संपूर्ण टिम सह (भाऊ करकोचा, कुशल गेंडा, सागर मासा , श्रेया कोंबडी) सह हजर होता. उपस्थितांचे मनोरंजन करत होता.

जे या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत ते तुमच्या आमच्यासारखे ‘गाढव’ झुंडीने हा कार्यक्रम बोरिवलीच्या नॅशनल पार्क मधे लावलेल्या मोठ्या स्किनवर वर पहात होते. कात्रजच्या उद्यानात हा कार्यक्रम न दाखवल्याचा निषेध म्हणून पुणेकर गाढवांनी उद्या लोणावळ्याच्या भूशी जंगलात जिथे हा शो होतो तिथे निषेध मोर्चा न्यायचे ठरवले होते. आनायचे पावसाळी पिकनिक कुटुंबासह करता येईल असा विचार या हुषार गाढवांच्या डोक्यात होता हे वेगळे सांगायला नको

(जे यातलं काहीच करु शकत नव्हते ते हा टुकार लेख वाचत होते)

तर

शेवटच्या फेरी पर्यत

शिल्लक राहिलेले स्पर्धक होते  पुष्कर – लांडगा , अस्ताद, -अस्वल (उर्फ वकील),

सई, – लांडोर , मेघा, – मेंढी , शर्मिष्ठा –  वासरु , स्मिता – कोकिळा

सुरवातीला खास परिक्षकांनी वेगवेगळे टास्क देऊन स्पर्धकांना गोंधळात टाकले. यात कोकिळेला मलिष्काचे एक गाणे म्हणावयास सांगणे, लांडोरीला जंगलात तयार झालेल्या खड्ड्यात पाय न टाकता ‘मोर डान्स’ करायला सांगणे,  अस्वलाला भक्ती गीत म्हणायला लावणे, लांडग्याला १ मिनिटात शंभर वेळा पक्ष बदलणे,  इ इ. टास्क होते. सर्वांना हे करताना घाम फुटलस

त्यानंतर  सर्व प्राण्यांचा लाडक्या ‘ रिंग मिनिस्टर ‘ नागेश ने उपस्थित राहून सर्वाना एक एक आदेश दिेला. हा कार्यक्रम ही रंगला आणी उपस्थितांनी

‘जय जंगलराज’ अशा घोषणा दिल्या.

शेवटी मुख्य गोष्ट स्पर्धकांना करावयाला सांगितली ती म्हणजे मतांसाठी ( SMS) भिक मागणे. कारण मिळालेली मते आणी परिक्षकांचे गुण यावरच विजेता ठरणार होता.

सुरवात कोकिळेने केली मी जर ग्रुप ‌अॅडमीन झाले तर ग्रुपवर येणारे पुणेकरांवरचे विनोंद बँन करीन. पुणेकर please.please. मत द्या ?

लांडगा – नो नियम. पुश करो( forward करो) खुष रहो. देतायना मला मत

अस्वल ( वकील) – A to z मेसेज टाका फक्त B ग्रेड नको. आणि नवीन नियमाचा बाऊ नको. मी स्वतः तुमच्या ग्रुप मधे आहे तो “भालू पोलिस” कसा येतो तेच बघतो.  मला मत द्यायचे की नाही तुमचा प्रश्ण

वासरु- माझ्या सारखा आपला ग्रुप ही खेळकर राहिल. मलाच विजयी कराल ना?

लांडोर – तुम्ही माझा आत्तापर्यत चा प्रवास जाणता. आत्ता जो आपला ग्रुप आहे त्याला और ‘अच्छे दिन’ आणेन. विश्वास दर्शक मत नक्की द्या

मेंढी- काही पण भेंडी बोलून राहिले हे.  पोकळ आश्वासन देतायत सगळे.  मी काही नियम ठेवणार नाही आणी पाळणार नाही. श्रावण पण नाही. मला जर निवडून दिले ते माझ्याकडून सर्वाना गटारी पार्टी

तर शेपटी नसलेल्या प्राण्यांनो

.. हो हो तुम्हीच  कुणाला देताय मत?

आणी निकाल काय लागलाय ?

लवकरच.

वाचत रहा..

माझे टुकार ई-चार

(* सर्व लेखन काल्पनिक,  वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)

©  श्री अमोल अनंत केळकर

२०/७/१८

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

माझ्या मते ऋतुचक्रातला शेवटचा, ऋतु म्हणजे शिशिर ऋतु!!

या वर्षी २१ डीसेंबरच्या मध्यरात्री पासून सुरु होऊन १७ फेब्रुवारी पर्यंत ढोबळ मानाने शिशीर ऋतुचा काल आहे.. थोडेसे या ऋतूविषयी…

असं मानलं जातं की,वसंत,ग्रीष्म आणि वर्षा हे देवींचे ऋतु तर शरद ,हेमंत,शिशीर हे पितरांचे ऋतु.काडाक्याची थंडी, कधी घनदाट धुके,धवल दिशा आणि ऊज्वल धरती हेच शिशीराचे रुप! जणु पृथ्वी आणि आकाश यांचे एकतत्व!!

भरपूर ऊर्जा देणारा ऋतु म्हणजे शिशीर ऋतु!! या कालात सूर्यकिरणांत अमृततत्व असते. आणि वनस्पती,फळं, भाज्या,या सर्वांमधे याच तत्वांचा समावेश झाल्यामुळे त्या अधिक स्वस्थ्यवर्धक बनतात.

शिशिर ऋतु म्हणजेच शीतऋतु. हलक्या गुलाबी थंडीचा हेमंत सरतो  आणि कडक थंडीच्या शिशिराची चाहुल लागते.या दिवसात गोड आणि स्निग्ध पदार्थांचा आहार योग्य मानला जातो. त्यामुळे या काळात येणारे सण, विशेषत: माघी गणेश जयंती, सोमवती अमावस्या, मकर संक्रांत साजरी करत असताना तीळ आणि गुळाचे सेवन हे फार महत्वाचे ठरते.

माघ आणि पौष महिन्यात तिळ—गुळाचे दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. खरं म्हणजे आपले ऋतु आणि आपले सर्वच सण यांच्या केंद्रस्थानी धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचेच अधिष्ठान असते. शिवाय या संकेताच्या माध्यमातून संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच परस्परांमधले प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, नात्यांची जपणूक, याचाही पाठपुरावा असतो.

“तिळगूळ घ्या अन् गोड बोला..” हा प्रेमाचा, वैरभाव दूर करण्याचा, एक महान संदेश शिशिर ऋतु देत असतो!!

खरं सांगायचं, म्हणजे सृष्टी आणि मानवी जीवन हे एकात्म आहेत. सृष्टी ,निसर्ग हा मानवाचा महान गुरु आहे. बदलते ऋतुचक्र हे मूळातच जीवन कसं असावं, जगण्याचे नियम कोणते याचीच शिकवण देते. ही शिकवण शरीराबरोबर मनही घडवत असते.मनावरच्या संस्कारासाठी हवा फक्त निसर्गाशी जाणीवपूर्वक संवाद!! जगतानाची डोळस दृष्टी!

शिशिर ऋतुला पतझड अथवा पानगळीचा ऋतु असेही संबोधिले जाते. कारण या ऋतूत शुष्कता वाढलेली असते.झाडांवरची पानं पिवळी पडुन ती गळून जातात .. म्हणून पानगळ!! पण यामागचा निसर्गाचा नियम समजून घेण्यासारखा आहे.पानाद्वारे जे पाण्याचे शोषण होते त्याला अवरोध करण्यासाठी ही पानगळ असते. धरतीचं यौवन राखण्याची ती धडपड… परिपूर्ण आयुष्यन जगल्यानंतर आनंदाने गळून जाणं आणि मातीत मिसळणं, आणि  नव्या पालवीला बहरु देणं हा सृष्टीचा नियम!!नियम पाळण्याची ही तटस्थता निसर्गाकडुनच शिकायला मिळते!

किती सुंदर संदेश! रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल!!

जुनं जाऊद्या मरणालागुनी…।

विरक्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे. निर्विकारताही नाही. आसक्तीविरहीत जगणं आणि मरणं म्हणजेच विरक्ती. या खर्‍या विरक्तीचं दर्शन शिशिर ऋतुतील ,सूर्याच्या ऊत्तरायण काळातल्या पानगळीच्या रुपानं होतं…. स्थित्यंतर हा निसर्गाचा स्थायी भाव!  आणि त्याची सकारात्मक स्वीकृती हा सृष्टीचा नियम!!थंडी, वारा, ऊन, पाऊस, आर्द्रता, शुष्कता , तेज,तम ही सारीच निसर्गाची रुपे! जी मानवाच्या जीवनाशी निगडीत आहेत… सहा ऋतुंची सहा रुपे! शिशिरात या ऋतुचक्राची समाप्ती होऊन नवा वसंत येतो! नवे चक्र. नवा बहर. मिटणं, गळणं तितकच महत्वाचं जितकं ऊमलणं, बहरणं.

अनुभवांची शिदोरी मागे ठेऊन एखाद्या वृद्धासारखा आनंदाने निरोप घेणारा, हा पानगळीचा शिशिर ऋतु मला वंदनीयच वाटतो!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares