मराठी साहित्य – विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

मनाच्या कुपीत..आठवणींच्या सा‌‌ठवणीत पडून असतं बरंचसं. आठवूच नये असं जसं , तसंच आठवत रहावं असंही बरंच कांही. असं असो वा तसं जुनंच सगळं. भूतकाळातलं. आठवत रहावं असं असलं , तरी सारखं तेच आठवत रहाणं म्हणजे भूतकाळातच जगणं. आठवू नये असं तर दामटून बसवलं नाही, तर डोकं वर काढतच रहातं सारखं सारखं लवचटासारखं. आठवणी हव्या-नकोशा कशाही असोत त्या उपटून फेकून नाहीच देता येत. मग करायचं काय? हव्याहव्याशा, चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या निगुतीनं. आवडती वस्तू सहज कधी हाताळून पहातो ना , तसं अलगद आठवून पहायच्या क्षणकाळ. तेवढाही श्वास पुरुन उरतो वर्तमानात जगण्यासाठी. नकोशा आठवणींकडे करायचं दुर्लक्ष. मुद्दामच. पाहूनही न  पाहिल्यासारखं. हिरमुसल्या होऊन मग रहातात पडून न् जातात विरुनही कधीतरी हळूच खाली मान घालून निघून गेल्यासारख्या. आठवणी कशाही असोत, त्या हव्यातच. पण भल्याबुऱ्याचं भान जागं ठेवण्यापुरत्या. जगायचं कसं आणि कसं नाही हे सांगण्या-सुचवण्यापुरत्या.

आठवणी हव्यातच सोबतीपुरत्या. अंधारल्या वाटेवरच्या इवल्याशा दिव्यासारख्या. मिणमिणताच पण प्रकाश देणाऱ्या. चुकत असेल वाट तर रस्ता दाखवणाऱ्या.

आठवणी म्हणजे अनुभवच तर असतात भूतकाळात जमा झालेले. हवेसे किंवा नकोसेही. मनाच्या खोल तळाशी पडून असतात वाट पहात, हांक आली की झरकन् झेपावण्यासाठी. आठवणी कशाही असोत सारखं कुरवाळत नाही बसायचं आवडती गोळी चघळल्यासारखं, किंवा झिडकारायच्याही नाहीत कडवट कांहीतरी थुंकून टाकल्यासारख्या. न जाणो, त्या कडवट असल्या, तरी उपयोगीही पडत असतात कधीतरी औषधासारख्या..!

औषधासारख्याच तर असतात आठवणी. (मनाच्या) तब्येतीला भानावर आणणाऱ्या. गोड सिरप गोड असतं म्हणून आवंढा न गिळताच तोंडात नसतंच ना धरून ठेवायचं. किंवा असेल गोळी औषधाची कडवट किंवा गोडसरही, पण तीही चघळत नसतीच रहायची तासनतास. गिळून टाकायची पाण्याच्या एका घोटाबरोबर क्षणार्धात. आठवणी लगडलेल्या असतातच विचारांना , येणाऱ्या.. जाणाऱ्या..! जाऊ द्यायच्या आल्या तशाच जाणाऱ्या विचाराबरोबर तशाच अधांतरी तरंगत. जात नाहीतच त्या कायमच्या. जाऊन बसतात आपल्याच मनाच्या तळाशी वेळ येईल, तेव्हा अलगद.. हळूवार सावरायला आपल्याच मनाला…!!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—६ ?

!! दिवाळी–नव्या जाणिवांची !!

यावर्षी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपण दिवाळीचा सण साधेपणाने पण मनापासून साजरा केला.आनंद घेतला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे.त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची.निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची.विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो.काही गोष्टी परंपरा म्हणून,रूढी म्हणून करतो.पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे.याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे.म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात.शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही.त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण  जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही.स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे.पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा,वेगवेगळे दिवे आपण लावतो.तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे.दिवा हा चैतन्याची,मांगल्याची उधळण करतो.तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा दिवा असंख्य दिवे पेटू शकतो.लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जपताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते.या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल.त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘दृष्टीदाना’ चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा  हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल रुजायला लागलेली आहे.आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे,नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते.

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडून मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे.सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

शुभ दीपावली.  ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

फ्रेंडशिप, मैत्री किती छान कल्पना त्यादिवशी फ्रेंडशिप डे होता. सर्वजण एकमेकांना फ्रेंडशिप ब्याण बांधून आपल्या  मैत्रीची एकमेकांना आठवण करून देत होते. मी हे सगळं पहात होते. माझ्या मनात विचार आला. याप्रसंगावर चार ओळी तरी लिहाव्यात. म्हणून मी कागद पेन घेऊन बसले. आणि कविता लिहू लागले. तीच ही कविता.

फ्रेंडशिप

फ्रेंडशिप ही कल्पना आहे किती छान

एकच दिवस असतो मैत्रीचा मान

तीच असते या दिवसाची शान

रोजच्या जीवनात नसतं याच भान

पण आठवण होताच वाटतं किती छान

एकमेकांना होतात फोन

गर्दीने भरतात गावांचे कोन

गप्पांच्या फडात रहात नाही वेळेचं भान

आठवणीचे गोफ विणले जातात छान

एकमेकांना बांधतात फ्रेंडशीपचे बँण

सगळेच असतात एकमेकांचे फँन

जीवनाच्या फेऱ्यात होतात अनेक प्लॉन

केव्हातरी होतात छोटी छोटी भांडण

मनमोकळ बोलण्याचं हेच असतं ठाणं

कारण ह्यात नसतं कोणतच बंधन

आठवणीने मनं होतात म्लान

भेटल्यावर होतात परत भेटण्याचे ल्पॉन

भेट न झाल्यामुळे होतं रुदन

विचारांचे होते मंथन

मनांचं होतं मिलन

अन् भावनांचं होतं प्रज्वलन

शंकाचं होतं शमन

संकटकाळी होतं जीवाचं रान

असच असतं मैत्रीचं अतुट बंधन

मैत्रीचं महत्त्व अन् किर्ती महान

त्यावर होतं कवनांच गान

त्यानं भरतं पेपराचं पान

वातावरण ही होतं खूप छान

खरच फ्रेंडशीप ही कल्पना फारच महान

बघा कशी वाटते.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा–भाऊबीज ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—५ ?

!! बलिप्रतिपदा–भाऊबीज !!

शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते.शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो.तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते.दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.

या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो.याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे.जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी,नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष,  भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.

कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो.म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात.थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान,श्रद्धा,सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ  आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे.

याच्या दुसऱ्या दिवशी येते भाऊबीज.बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला  ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. यमराजाची बहिण यमुनाने या दिवशी आपल्या घरी त्याची पूजा केली, त्याला ओवाळले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. ती म्हणाली, “दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस.” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून दरवर्षी  भाऊबीज साजरी होते

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते  निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते.सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची,तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला बहिणीची आठवण येते.

या नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे,मावस भावंडं कोणतीही असोत हे नाते मनापासून जपावे हेच हा दिवस सांगतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत रात्री १० नंतर फटाके उडवण्यास बंदी यावर आम्ही एक सर्वे घेतला ज्यात वेगवेळ्या राशींच्या लोकांची मते जाणून घेतली.  राशी प्रमाणे उत्तरे साधारण अशी मिळाली *)

मेष: काय वाट्टेल ते होऊ दे रात्री  १० नंतरच फोडणार फटाके. ?

वृषभ: व्यवस्थित आवरून तयार व्हायला तसंही दरवर्षी ८ वाजतात च म्हणा ?

मिथुन: रात्री ८ ते १० इथे आणि सकाळी  ८ ते १० अमेरिकेतील वेळेप्रमाणे  इथेच फटाके फोडू ?

कर्क: दिवाळीत चंद्र नसताना आकाश दिवा, पणत्या यांचा प्रकाश हीच दिवाळी. लक्ष्मी पुजनाला मात्र मी फुलबाजी लावणारच. ?

सिंह: खरे बॉम्ब फोडणारे मस्त परदेशात एन्जॉय करतायत आणि शिक्षा कुणाला ?

रात्री १० नंतर फुसके फटाके फोडणारी लोकं….. ?

कन्या : किती ते प्रदूषण सध्या होतंय ना. दिवाळी अंक पण महागलेत. ८ ते १० रोज कुणा कुणा कडे जायचंय. यंदा फटाके खरेदी होईल असं वाटत नाही??‍♀

तुळ:  दिवाळीत रोज पाऊस पडावा. फक्त रात्री ८ ते १० पाऊस न पडावा ☔ म्हणजे फक्त त्याचवेळेत फटाके उडवावे लागतील आणि निर्णयाचा सन्मान होईल ⚖

वृश्चिक : अगरबत्तीला खालच्या बाजूल ला एका बाॅम्बची वात गुंडाळून असे असंख्य टाईम बाॅम्ब  रात्री १० नंतर मोक्याच्या जागी ठेऊन येईन ?

धनू  : नाही त्याच्या गल्लीत रात्री १२ वा बाण सोडला तर नावाचा/ नावाची  धन्नू नाही ?

मकर: रोज रात्री १० नंतर न उडलेले फटाके गोळा करायचे. तेच दुस-या दिवशी ८ ते १० या वेळेत उडवायचे ?

कुंभ : दिवाळीच्या आधी काहीतरी करुन हा निर्णय स्थगित कसा करता येईल हे पहायला पाहिजे.?

मीन: मार्केट एवढे पडले असताना ‘आय मिन’ काही गरज आहे का फटाके उठवण्याची? त्यापेक्षा ‘लक्ष्मी मित्तल’ चे शेअर्स घेऊन आत्तापासून मुंबई -गोवा सागरी प्रवासाची तयारी करु आणि फटाक्यांच्या आवाजाची कॅसेट विकत घेऊ.?

??????✨?

? (राशीतज्ञ) अमोल

* काल्पनिक

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

जेव्हा माझ्या घरी आई-बाबांना समजले की मी आता काहीच पाहू शकणार नाही, अर्थातच काही करू शकणार नाही, काय बरं वाटलं असेल त्यांना?आता ही चा काहीही उपयोग नाही, अ सा जर त्यांनी विचार केला असता,  तर माझ्यासाठी ते किती अवघड होतं. पण त्यांनी मला इतकं समजून घेतलं, इतकं तयार केलं म्हणूनच आज मी आनंदाने  वावरू शकते.

घरामध्ये मी सारखी आईच्या या मागे मागे असायची. किचन मध्ये काहीतरी लुडबुड करायची. आईला सारखं लक्ष ठेवायला लागायचं. एके दिवशी आईनं काय केलं, फुलाची परडी माझ्याकडे घेऊन आली आणि त्यात ली लाल फुलं उजवीकडे आणि पिवळी फुलं डावीकडे अशी ठेवली. माझा हात हातात घेऊन ते मला दाखवलं अर्थात स्पर्शज्ञानान मी

पाहिलं. सुई मध्ये दोरा ओवून दिला आणि एकदा उजवीकडच  एक फुल आणि एकदा डावीकडचा एक फूल अस ओवायला शिकवलं आणि झाला कि छान हार तयार. आईचा हा प्रयोग यशस्वी झाला. अर्थात हिला जमलं तर जमू दे कंपल्शन

केलं नाही. मलाही तो नाद लागला आणि  आमच्या देवाला रोज रंगीत फुलांचा मिळायला लागला. भाजी निवडायला हीआईनं मला शिकवलं. किसणीवर खोबरे किसायच,  गाजर किसायचं हेही मी शिकले. माझी आई जर त्यावेळी टी पं गाळत बसली असती तर आजची मी तुम्हाला दिसलेच नसते. घरातलं ट्रेनिंग मला आईने दिलं आणि बाहेर शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्वाचे धडे माझ्या बाबांनी गिरवून घेतले. खरंच या दोघांचा किती मोठा वाटा आहे माझ्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये !दोन्ही महत्वाचे होते. मी स्वयंपाक करू शकणार नव्हते पण आईला इतर कामात मदत करू शकले ‘अजूनही करते आहे.

मी साधारण सातवीत असताना टेप रेकॉर्डर, टेलिफोन आमच्या घरी आला.गाणी ऐकता ऐकता तो बंद कसा करायचा ते हात फिरवून मी बघायला लागले.माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी मला प्ले, स्टॉप, रेकॉर्ड या सगळ्या बटनां नी माझ्या बोटांनी ओळख करून दिली. रिवाइंडिंग कसं करायचं हेही शिकवलं. त्याचा मला पुढे खूपच उपयोग झाला. एम ए चा अभ्यास करताना मॅडम जे वाचून दाखवत ते मी टेप करून घेत होते. आणि मला पाहिजे तेव्हा ऐकू शकत होते. याच प्रमाणे नवीन आलेला फोन कुतुहलाने मी हात फिरवून ओळख करून घेत होते. माझ्या भावाने हाउ टू ऑपरेट हे मला शिकवलं. रिसिव्हर हातात दिला फोनवरील बटनांची एक ते नऊ आकड्यांची ओळख करून दिली. ते कसे दाबायचे तेही शिकवलं. 22 आकडा असेल तर दोन चे बटन दोनदा दाबायचे असे सांगितले. मी तशी करत गेले आणि आणि मला अपोआप फोन नंबर रही पाठ होत गेले. मुद्दाम पाठांतर असे करायला लागले नाही.

रेडिओ लावणे मला खूप सोप्प वाटलं. खूप आवडलं सुद्धा. काही वर्षांनी याच रेडियो मधून माझा आवाज मी ऐकू शकेन असे मला वाटले सुद्धा नव्हते. सांगली आकाशवाणी वरून ऊन आणि कोल्हापूर आकाशवाणीवरून माझी मुलाखत प्रसारित झाली आहे बर का !

अर्थात मला सगळेच येते असेही नाही. बाहेर जाताना कोणाच्यातरी मदतीशिवाय मी अजूनही जाऊ शकत नाही. पूर्वी मला बाबा म्हणायचे तुला पांढरी काठी घेऊन देऊया त्याची सवय कर म्हणजे तुला चालायला सोपे जाईल. पण पण त्यावेळी मी त्यांचे ऐकले नाही. तशी मी हट्टी होते.

रेग्युलर शाळेमध्ये जात असल्यामुळे आणि बाईंनी शिकवलेले सगळे समजत असल्यामुळे ब्रेल लिपी शिकण्याचे मला महत्त्व वाटले नाही. एकदोनदा मी प्रयत्न केला होता. पण तिथल्या वातावरणामुळे मला तिकोडी लागले नाही. मी ऐकून शिकायचे, लक्षात ठेवायचे, सांगायचे यामध्ये घोडदौड सुरू ठेवली.

आई सांगते लहानपणी माझं सुसाट काम होत. जीना सुद्धा सहज धडधडत उतरायची. बघणार यालाच भीती वाटायची इतरांनाच खूप काळजी वाटायची.

माझ्या स्वतःच्या वस्तू म्हणजे कंपास, पेन्सिल पेन रबरसगळं मी व्यवस्थित ठेवायची.मात्र माझ्या भावाला बहिणीला त्यांची एखादी वस्तू सापडेना झाली की खुशाल माझ्यातली काढून घ्यायची.मला समजल्यावर मी त्यांच्यावर खूप रागवाय ची. अर्थात ते थोडाच वेळ टिकायचं.

माझ्या काकूच्या आईने मला क्रोशाचे काम शिकवल. त्यांनी मला साखळी घालणे,  खांब घालणं शिकवलं होतं. त्याचा मी रुमाल ही के ला होता. अजून मी तो जपून ठेवला आहे. आत्तासुद्धा क्वचित मला क्रोशा चं मिळण्याचा मोह होतो. मी कधीतरी करते.

घरी कोणी आले तर त्यांना पाण्याचा तांब्या पेला नेऊन देते,  आईने तयार केलेला चहा ती कप बशी मी देते.सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटते.पण मी हे सगळं सरावाने   आणि आईला थोडीतरी माझी मदत व्हावी मुद्दाम शिकले आहे.

मागच्या वर्षी माझ्या बाबांना दवाखान्यात न्यायचे होते. त्यावेळी मी आधी फोन करून डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली होती. बाबांना रिक्षातून घेऊन गेले होते. सगळ्यांना त्याच्या इतकं आश्चर्य वाटलं की काही विचारू नका.

आवाजावरून मी लोकांना बरोबर ओळखण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये यशस्वी होते. मग काय विचारता भेटणारी व्यक्ती कौतुकच कौतुक करते. पण लक्षात ठेवणे हे मी मेंदुवर इतकं बिंबवलं आहे कि त्यामुळेच मी सगळं लक्षात ठेवू शकते.

आमच्या घरी वॉशिंग मशीन आणल्यानंतर मी तेसुद्धा शिकून घेतलं आणि सध्या तर मीच ते ऑपरेट करते. आईचं तेवढच एक मोठं काम कमी होतं ना !तेवढीच आईला मदत होते, तिला विश्रांती मिळू शकते याचा मला खूप आनंद होतो.

कॉलेजचा अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, गॅदरिंग, मैत्रिणी आणि आईने शिकवलेली घरातली काम हे सगळ करण्यामध्ये माझं बी. ए.वर्ष कसं संपलं समजले सुद्धा नाही.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ल‌क्ष्मीपूजन  ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—४ ?

!! ल‌क्ष्मीपूजन  !!

ॐ  महालक्ष्मी च विद्महे

विष्णुपत्नीच धीमही

तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् !!

आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते‌. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते.  शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.

दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते.  मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.

घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक,  धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.

‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्‍याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको,  इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.

लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’,  स्वार्थात वापरतात ते वितरण , दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.

लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.

एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवले लक्ष्मी शाश्‍वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना  खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

आकाशाचा निळा गाभारा सजला

चंदेरी चांदण्यांनी

थंडीचा अत्तर स्पर्श मऊ- मुलायम

बनवला उन्हालाही

केला दूर अंधकार केसरी- पिवळसर

प्रकाश दिव्यांनी

प्रसन्न उत्सव प्रकाशाचा

दीपावलीचा

चैतन्याच्या पहाटेचा… !!

 

काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होणे अपरिहार्य आहे. तसाच बदल मुंबईत साजरा होणा-या दिवाळीत झाला आहे… दिवाळी ही धनश्रीमंतांचे इमलेही उजळते व मन श्रीमंतांचे दरवाजेही उघडते..मुंबईची दिवाळी म्हणजे फटाक्यांचा दणदणाट, आतषबाजी,  चमचमीत फराळ, सुगंधी उटणे, दिव्यांची रोषणाई असे बरेच काही असते..

दिव्यांची रोषणाई म्हणजे फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढचं नाही तर या दिव्यांनी मनाचा गाभारा भरला पाहिजे उजळला पाहिजे. आज माणसांचं मन अंधारात चाचपडतयं त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा  दिवा लावायला पाहिजे. दिव्यांचे प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलसं करून समसमान प्रकाश देते ना अगदी तसच्चं…

मोबाईलच्या जमान्याने शुभेच्छा पत्र, मेसेजेस कालबाह्य झाली आणि आपली मन बँकवर्ड झालीत.

एकमेकांच्या संवादाचे सूर धुसर झालेले दिसतात. दिवाळीच्या निमित्ताने ख-या अर्थाने प्रत्यक्ष जगण्यातचं स्वतःला झोकून द्यावं . चारचौघांबरोबर, समाजाबरोबर संवादाच्या भिंती बांधाव्यात त्यामुळे जीवनात नवचैतन्य निर्माण होईल.

सामाजिक बांधिलकी जोपासण्याचाही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवा तसेच या कालावधीतही वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्पर्धा, कविता पाठांतर, गायन कथा-कथन अश्या स्पर्धांचे आयोजन करावे त्यामुळे आपण एकत्र येतो व एकत्रित संवादही साधला जातो.

दिवाळी पहाट ही संकल्पना तर अतिशय सुंदर… सांस्कृतिक क्षेत्रातून केला गेलेला एक अनोखा कार्यक्रम.. दिवाळी पहाट संगीतमय व्हावी हा हेतू विविध कला असलेले कलाकार एकत्र येऊन कलेचे सादरीकरण घरघुती स्वरूपात करत होते. कालांतराने त्याचे सार्वजनिक स्वरूप झाले.आता तसे न करता ” दिवाळी पहाट ” ही घरघुती स्वरूपाचीच  असावी त्यामुळे सर्वांना अगदी सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल व आनंदही लुटता येईल.

खरी ” दिवाळी पहाट ” झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येईल.

आपल्या समाजात असेही काही उपेक्षित लोक आहेत जे या सगळ्या आनंदा पासून वंचित आहेत या आनंदाला मुकले आहेत. अश्या लोकांबरोबर जर दिवाळी साजरी केली तर आपल्या बरोबरच सर्वांची दिवाळी सुखाची जाईल आणि सर्वांच्याच चेह-यावर आनंद दिसेल.

अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक अशांसाठी कामे करणा-या संस्थांना देणग्या द्याव्यात. त्यांच्या बरोबर जर आपण दिवाळी साजरी केली तर त्यांच्या चेह-यावरचे हसू आनंद आपल्या मनाला आत्मिक समाधान देऊन जातं ख-या अर्थाने दिवाळी साजरी होईल असे मी मनापासून नमूद करीन.. या सणामागचा उदात्त हेतू असा की कृतज्ञतापूर्वक माणुसकी जोपासून परोपकार करावा. सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. तसेच विश्वाचं पालन करणा-या महाशक्तीलाही विसरू नये..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नरकचतुर्दशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—३ ?

!! नरकचतुर्दशी !!

आज ‘नरक चतुर्दशी’.  आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.

स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.

आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले.  त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले.  त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.

मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.

स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.

स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे.  यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल.  मुली स्वयंपूर्ण बनतील.  त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.

प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे,  नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत,  सामाजिक भान राखत श्रध्देने,  आनंदाने हा सण साजरा करू या.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆      

दिवाळीची चाहूल तर  लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या  तेल,वात  घालून प्रज्वलित होऊ लागल्या!या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले. त्याचा प्रकाश मनभर पसरला!  पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या!

आमच्या लहानपणी आत्ता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पवित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी मंदिरात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवता येई! कोजागिरी पौर्णिमा  आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे. पहाटेचा गारवा सुखद वाटत असे. घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या!

डबे घासणे, अनारसा पीठ तयार करणे, चकली कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे सुरू होत असत! दिवाळीची खरेदी फार मोठी नसे. तरीही खिशाच्या परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडे फटाके आणले जात. कधीकधी घरासाठी म्हणून काही खरेदी असे! दिवाळीची वाट पाहिली जायची ती मुख्यतः फराळासाठी! लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली,  करंजी सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे!

दिवाळी अगदी उद्यावर आली की पहिला फटाका कोण, किती वाजता वाजवणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत. कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्‍यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे.त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे यावर जोरदार चर्चा होत असे. सगळं वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेले सुगंधी तेल, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली!

आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली!

पण गेल्या पंधरा वीस वर्षात दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले आहे असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले. त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. त्याच बरोबर काही चांगले बदल आता झाले आहेत. दिवाळी निमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ ,मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करतात. अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी फराळ देणे, कपडे देणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. दिवाळी पहाट गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकांची मेजवानी या सुट्टीत अनुभवयाला मिळत असते. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप बदलले असले तरी दिवाळी आनंदमय  आहे! रूटीन मध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग यामुळे  पणत्यांची शोभा कमी झाली असली तरी अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे, ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते.

बदलत्या दिवाळीचे अनुभव आठवता आठवता या सगळ्या दिवाळींपेक्षा वेगळी दिवाळी यंदा येत आहे. गेले सात-आठ महिने कोरोनामुळे वातावरणात एक प्रकारची मरगळ आली. अजूनही कोरोनाची भीती माणसाच्या मनात आहेच पण कोरोनाबद्दल बऱ्याच गोष्टी आता कळल्यामुळे सावधगिरी बाळगून का होईना माणूस उत्साह दाखवत वावरत आहे! मास्क, सॅनिटायझर  आणि सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री वापरून लोक बाजारात गर्दी करत आहेत. बाजारात नव्या साड्या बरोबर नवीन नवीन मॅचिंग मास्क ही मिळू लागले आहेत. माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे त्यामुळे कोणत्या तरी कारणाने एकत्र जमणे हे माणसाला आवडते! तरी अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या कार्यबाहुल्यामुळे एकमेकांकडे असलेले येणे जाणे कमी झाले आणि कोरोनामुळे तर आणखीनच कमी झाले आहे. व्यवसाय, नोकरीतील मंदीमुळे लोकांच्या हातात पैसाही कमी झाला आहे. या सर्वांचा बाजारपेठेवर थोडा परिणाम होणारच असला तरी आहे त्या परिस्थितीत माणसं दिवाळीचा सण साजरा करणारच! दिवाळी सारखा वर्षातून एकदा येणारा मोठा सण सुना जावा असं वाटत नाही ना!

लोक आहे त्या परिस्थितीत जमेल तेवढा आनंद साजरा करतील. लवकरच कोरोना वर लस येईल आणि आपण कोरोनामुक्त होऊ! तोच दिवस आपल्यासाठी खरतर दिवाळीचा असणार आहे एवढे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares