मराठी साहित्य – विविधा ☆ सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

आम्ही टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व कलाप्रेमी वैद्य लोक कॉलेजमध्ये असताना एका कलासक्त, संस्कृत विषयाच्या प्राध्यापिक असणाऱ्या “ माधवी पटवर्धन” या व्यक्तिमत्वाबरोबर कलेच्या माध्यमातूनच जोडल्या गेलो. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आम्हा मुलांमधील कलेच्या ओढीला हलकेच साद घालत सुरु केलेले कलामंडळ म्हणजे एक आनंदाचे झाड होते. तेच झाड पुन्हा एकदा अतुलच्या प्रयत्नाने पुन्हा बहरले. आम्ही ऑनलाईन भेटू लागलो आणि जवळजवळ वीस वर्षांनी ते मैत्र पुन्हा एकदा उजळले. त्यातीलच कालचे पुष्प म्हणजे ‛ सलील कुलकर्णी’ यांच्याशी झालेल्या गप्पा! सलीलप्रवाहात डोकावताना आलेली अविस्मरणीय क्षणाची अनुभूती!

सलीलजींच्या भाषेत सांगायचे तर “ विकिपीडियावर जे नाही ते ज्ञान केवळ आजी- आजोबांकडे आहे आणि अशा अनुभवाच्या पायाशी नेहमी बसावे” आम्हीही काल असाच काहीसा अनुभव घेतला. आणि एक संपन्न अनुभवाचा, विचारांचा खजिना आम्हाला गवसला.

सलीलजींच्या गाण्यातून, लेखनातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते आपल्याला नेहमी भेटतच असतात. पण काल झालेल्या ‛या हृदयीचे त्या हृदयी’ संवादातून हे व्यक्तिमत्त्व अधिकच उलगडत गेले. आज महाराष्ट्रात राहूनही उत्तम मराठी शब्दसुद्धा कानावर पडणे दुरापास्त झाले आहे. अशा वेळी सलीलजींच्या बोलण्यातील शब्दसंपत्ती, सखोल चिंतन मनाला अधिक समृद्ध करुन गेले. ऐकण्याची प्रक्रिया कमी झाली आहे याबद्दल त्यांना खंत वाटते. एखादे गाणे कित्येक वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवी अनुभूती देते. म्हणूनच ते म्हणतात ,“ गप्पा आणि भाषणामध्ये फरक आहे आणि त्यामुळेच मला गप्पा मारायला आवडतात.”  कारण त्यात  देवाण- घेवाण आहे. बोलणे आणि ऐकणे या दोन्ही प्रक्रिया त्यात आहेत.

आपले वैद्यकीय शिक्षण आणि कार्यक्षेत्र याची निवड करायची वेळ आली तेव्हा मनाला पटला तोच निर्णय घेतला आणि संगीतक्षेत्र निवडले. हे सांगताना ते म्हटले,“ ज्या गावात राहायचे नाही तिथे बंगला का बांधायचा?” अशा सहज सोप्या उपमा- उदाहरणानी हा सलीलप्रवाह आम्हाला त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होता.

सातशेच्या वर त्यांनी संगीतरचना केल्या. बरेच वेळा आधी चाल आणि मग त्यावर शब्द सुद्धा बांधले. पण ठिपके जोडून रांगोळी काढण्यापेक्षा एखाद्या मनस्वी चित्रकाराने कुंचल्याच्या सहज मारलेल्या फाटकाऱ्यातून अप्रतिम चित्र उमटावे तसे गाणे आतून आले तरच रसिकांपर्यंत सहज पोहोचते असे त्यांना वाटते.

हृदयनाथ, लता मंगेशकर या नेहमीच त्यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी भरभरून बोलताना ते म्हणाले,“ झाड जितके मोठे तितका त्याचा विस्तार मोठा! ते ओरबाडण्यापेक्षा त्याचे सतत निरीक्षण करावे  आणि ते आपल्या आत रुजवण्याचा प्रयत्न करावा.”

अशाच गप्पा रंगत असताना “पुढच्या पिढीसाठी काय संदेश असेल किंवा काहीतरी उत्तम- अभिजात पुढे रुजावे असा गाण्यातून प्रयत्न असतो का?” असे विचारल्यावर ते लगेच म्हणाले,“ माझ्या मुलांनी काय ऐकावे हे मी ठरवू शकत नाही. पण उत्तम तेच त्यांच्या कानावर पडावे असा विचार कदाचित अंतर्मनात असेल आणि त्यातून जर असे संगीत निर्माण होत असेल आणि त्यातून पुढची पिढी घडली तर जास्त आनंद आहे.”

प्रत्येक गाणे हे खरं तर मूळची एक कविता असते हे आपण जाणतोच. जेव्हा अशा कवितांना संगीतकाराचा परिसस्पर्श लाभतो तेव्हा त्याचे सोने होते. पण त्यातही एक संगीतकार म्हणून त्यांनी एक विचार मांडला जो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात,“ प्रत्येक वृत्तबद्ध कविता चालीत बांधण्याचा अट्टाहास करु नये. काहीवेळा सूरांनी त्याची धार बोथट होते आणि कवितेचा भाव हृदयापर्यंत पोहचू शकत नाही.”  एक मनस्वी कलाकारच एखाद्या कालाकृतीकडे इतक्या डोळसपणे बघू शकतो. म्हणूनच या सलीलप्रवाहात डोकावताना खोल असला तरी त्याचा नितळ तळ स्पष्ट दिसत होता. या प्रवाहाची स्वतःची अशी मनोभूमिका, दिशा ठरलेली आहे. आणि ती सखोल चिंतनातून आली आहे. म्हणूनच त्या प्रवाहातून वाहणारा विचारांचा खळखळता झरा काल आम्हाला निखळ आनंदात चिंब भिजवून गेला.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

‘लहान सुंदर गोजिरवाणी अशी दिसे ही खार, लुसलुशीत हे अंग तिचेच शेपूट गोंडेदार!’

अशा वर्णनाची बालगीतात कुतूहलाचे स्थान निर्माण करणारी खार आजची नसून रामायणकालापासून तिची सर्वांना ओळख आहे .

रावणाच्या तावडीतून सीतेला सोडविण्यासाठी लंकेत प्रवेश करता यावा म्हणून वानरसेनेच्या मदतीने श्रीरामानी सेतू बाधंण्याचे

काम सुरु केले त्यावेळी एक खार सतत समुद्रातील वाळूत लोळून सेतूबांधावर येऊन आपले शरीर झाडत असल्याचे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आले. खारीचे हे काम पाहून त्यांनी कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरविला. त्याची निशाणी अजूनही समस्त खार जमातीवर दिसते.खारीच्या शरीरावर असणारे पट्टे म्हणजे खारीच्या पाठीवर हात फिरविलेले श्रीरामांच्या बोटांचे ठसे समजले जातात. आपल्या कुवतीप्रमाणे दुसऱ्यांना मदत करणारी, स्ततःच्या इच्छेनुसार, कोणाचीही बळजबरी नसताना काम करणारी माणसे दुसऱ्यांच्या कामात खारीचा वाटा उचलताना दिसतात.

सतत वृक्षावर राहणारा, प्रत्येक वस्तू कुरतडून खाणारा  सर्वसंचारी असा निरुपद्रवी प्राणी म्हणजे खार! काही मुले एखादी वस्तू दाताने कुरतडत। बसतात तेव्हा खारीसारखा कुरतडत बसू नको असे म्हणतात. स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी खारीला झुपकेदार शेपूट उपलब्ध झाली असावी. खारीसारखी चपळ वृत्तीची मुले पाहिली की,सर्वांना आनंद होतो. खारीचा वाटा उचलून सर्व मुलांनी काही चांगले उपक्रम केले तर राष्ट्र उभारणीच्या कार्याचे उद्याचे चित्र नक्कीच आशादायक असेल. आज अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या समाजात चेतना निर्माण करण्यासाठी खारीसारख्या कार्यक्षम प्रवृत्तीच्या माणसांची गरज आहे.

झरझर झाडावर, सरसर खाली पळणारी खार महत्वाचीच आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

स्त्रीने असिस्टंट म्हणून काम करणं हे सर्वमान्य आणि सर्वसामान्य आहे. पण ती जेव्हा बॉस म्हणून खुर्चीवर बसते तेव्हा तिला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. तिची ‘बढती ‘ही व्यक्तिशः मानाची,जबाबदारीची,प्रतिष्ठेची असली तरी बरेच वेळा कुटुंबातल्या इतरांसाठी गैरसोयीची होते. तिच्या रुटीनच्या नोकरीने घराचा जो जम

बसलेला असतो, तो विस्कटतो.प्रमोशनची सुरुवात बहुधा बदलीने होते.

तिथे संघर्ष सुरु होतो. पहिल्याने हा संघर्ष तिच्या मनात होतो.बढतीमुळे दैनंदिनीत बदल,नवीन कामाचा अभ्यास, जबाबदारी, संसार संभाळताना हे जमेल?कशाला सुखाचा जीव दुःखात घाला!अशी द्विधा मनस्थिती होते. अशा वेळी तिला कोणी आधार दिला, प्रोत्साहन दिलं तर ती वरिष्ठ म्हणून उत्तम काम करू शकते

सरिता आकाशवाणीत ड्यूटीऑफिसर होती. तिला प्रमोशन मिळालं. पण बदली होणार होती. तिची दोन्ही मुलं शाळेत जाणारी ,  बऱ्याच अडचणी होणार होत्या.पण सरिताची नवविवाहित जाऊ –ती मदतीला धावली. ती सरिताला म्हणाली,” वहिनी, तुम्ही प्रमोशन घ्या. मी मुलांच अभ्यास घेण्यापासून सर्व करीन, सासुबाईना समजावून सांगेन. मधून मधून या. मुलांना भेटा, इकडची काळजी करू नका.”

सरिताने अशी दोन वर्ष काढली. मग मुलांना तिकडे न्हेलं. आता तिचा नवरा मधून मधून तिच्या गावी येतो. सासूबाई पण चेंज म्हणून येतात. अशी साथ घरातल्यानी दिली तर सरिता प्रमोशनच्या पुढच्या पायऱ्याही चढेल.

स्वाती एक माध्यमिक शिक्षिका. तिच्या पदव्या, लवकर नोकरीला लागल्यामुळे सिनिऑरिटी, त्यामुळे  मुख्याध्यापकाची जागा तिला इतर सहकारी मैत्रीणींच्या आधी मिळाली. शैला स्वातीची जिवलग मैत्रीण.तिला वाटलं चला, आता आपल्याला थोडी मोकळिक मिळेल.कामाच्या बाबतीत ती निष्काळजीच होती. सहामाही जवळ आली तरी तिच्या विषयाचा पोर्शंन पूर्ण नाही. दहावीच्या मुलांनी तक्रार केली. स्वातीने शैलाला ऑफिस मध्ये बोलावल, विचारलं.

“गेल्या महिन्यात आजारी होते तुला माहितच आहे की.”

“पण जादा तास घेऊन अभ्यासक्रम तू पुरा करायला हवा होतास.”

“आता मी असं करते.शिकवलय तेव्हढ्यावरच पेपर काढते. म्हणजे मुलं चिडायची नाहीत.”

“अग, दहावीचा पेपर बोर्डाच्या फॉरमँटप्रमाणे काढायला हवा. मुलांना सराव नको का व्हायला?तू पोर्शंन पुरा कर.”

शैलाने ऐकलं नाही. पालकांनी तक्रारी केल्याच.स्वातीची दोन्हीकडून पंचाईत. मग ती कडकपणे वागू लागली. काही मैत्रिणीनी समजून घेतलं काही तुटल्या.स्वातीने स्टाफ मिटिंगमध्ये सगळं क्लिअर केलं.कारण तिला आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायची होती.ती म्हणाली, “मी भेदभाव करणार नाही. पुरुष शिक्षकांनी लक्षात घ्यावं, स्टाफमधल्या शिक्षिका तुमच्या इतक्याच कर्तव्यतत्पर आहेत पण काही वेळा त्यांना सवलती द्याव्या लागतात. कारण त्या माता आहेत. तुमच्या घरच्या स्त्रियांकडे बघा. स्त्री म्हणून सवलत नाही, पण सहानुभूती दाखवायला हवी ना! गैरसमज नको. त्यावेळी तरी पुरुष शिक्षकांनी माना डोलावल्या

आपली मैत्रीण  बॉसच्या खुर्चीवर बसली तर तिच्या सहकारी स्त्रियांनी तिला समजून घ्यायला हव.तिला ‘येस बॉस ‘म्हणताना आनंद , अभिमान वाटायला हवा. पण प्रत्यक्षात असं होतं का? की स्त्री स्त्रीची शत्रू ठरते?  तिच्या प्रमोशनवर अशी अनेक प्रश्न चिन्हं आहेत.

 

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले

 ☆ विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले

आपलं जगणं बऱ्याच अंशी वृक्ष-वनस्पतींवर अवलंबून असतं .. आपल्या तोंडचा घास आणि आपला श्वास सगळी वनस्पतींची देणगी..

तुकाराम महाराजांनी उगीच नाही त्यांना सोयरे म्हटलं.. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’

आपल्या कुटुंबात,आपण आपल्या सोयरे मंडळींना/पाव्हणे मंडळींना खूप आदराचं, मानाचं स्थान देतो.

तसा आदर आणि मान, आपलं जगणं ज्या सोयर्‍यांवर अवलंबून आहे, त्या या वनस्पतींना आपण देतो का?

उत्तर बहुतेक नाही असंच येतं; आपण अति परिचय झाल्यासारखं फारच गृहीत धरतो त्यांना किंवा चक्क दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे…

नर्मदालय’ संस्थेच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील नर्मदा किनारीच्या मागास व वंचित मुलांसाठी शिक्षण विषयक काम करणाऱ्या भारती ठाकूर . त्यांची एक गोष्ट मध्यंतरी वाचली होती.. गोष्टीचं शीर्षक होतं ‘क्षमा..’

शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून एकदा रागाच्या भरात भारती ताईंनी आपल्या बागेतलं १०-११ फुटी जास्वंदीचं झाड  अगदी दोन अडीच फुटांपर्यंत छाटलं..

आपल्या या अविवेकी कृत्याचा त्यांना लगेच पश्चात्तापही झाला.. पावसाळा होता त्यामुळे झाड पुन्हा लगेच वाढलं पण शेजाऱ्यांच्या कंपाउंडमध्ये एकही फांदी वाढली नाही परत! झाड वाढलं पण फुल मात्र एकही येईना; खतपाणी, सगळे प्रयोग करून झाले. मग कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या दीदींच्या सांगण्यावरून भारतीताईंनी त्या झाडाची क्षमा मागितली; त्याच्याशी रोज संवाद करू लागल्या, गप्पा मारू लागल्या.. एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं त्यांचं झाडाशी निर्माण झालं आणि मग काही दिवसात झाड कळ्यांनी पुन्हा भरून गेलं . झाडाने त्यांना ‘क्षमा’ केली होती..

ही गोष्ट मी वाचली आणि ती माझ्या अगदी हृदयाला भिडली.. मलाही झाडांची आवड आहे. झाडं आपल्याला प्राणवायू देतात, त्या जीवावर आपण खरं तर जगतो; पण आपण काय करतो त्यांना जगण्यासाठी? या विचाराने मी या मातीतल्या, देशी आणि नर्सरीत सहसा न आढळणाऱ्या झाडांची बियांपासून रोपं बनवते आणि मग कुणाला हवी त्याला देऊन टाकते लावायला. बिया एकत्र रुजत घालते आणि मग रोपांनी डोकं वर काढलं की त्यांना वेगळं काढून वेगवेगळ्या पिशव्यांत लावते. याचं कारण प्रत्येक बी वेगवेगळ्या पिशवीत लावायला आणि त्या पिशव्या ठेवायला माझ्याकडे तेवढी जागा नाही. हे रोप असं काढून पिशवीत लावलं की ते काढताना त्याच्या नाजूक मुळांना थोडी तरी इजा होतेच आणि मग त्या चिमुकल्या रोपाची पाने एक दिवस जरा मलूल असतात.. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन परिस्थितीशी जुळवून घेत टवटवीत होतात. हा माझा नेहमीचा अनुभव..

वरील गोष्ट वाचली तेव्हा मी रुजत घातलेल्या गोकर्णीचं रोप पिशवीत लावण्याजोगं झालं होतं, यावेळी मी जरा अधिक हळुवारपणे ते मातीतून काढायचा प्रयत्न केला पण तरीही त्याला थोडंसं दुखलं असणारच अशा विचाराने सॉरी हं,दुखलं का रे तुला? असं म्हणत त्या पिटुकल्या रोपाशी मी संवाद केला आणि काय सांगू..या एका वाक्याने माझं मलाच केवढं बरं वाटलं..’आता तुला नवीन जागा देते हं’ असं म्हणून मी ते पिशवीत लावलं. थोडी माती दाबली, पाणी घातलं. भारतीताईंसारखा अनुभव यावेळी मलाही आला. यावेळी पिशवीतल्या रोपट्याने दुसऱ्या दिवशी मान टाकली नाही.

वनस्पतींनाही संवेदना असतात, त्या प्रतिक्रिया देतात हे सगळं आपण शिकलेलं असतो. विज्ञानाने  ते सिद्धही केले आहे.. आपल्या ऋषीमुनींना मात्र ही गोष्ट आधीपासून माहित असणार..पद्मपुराणात तो श्लोक आहे. कोणतीही वनस्पती आपल्या उपयोगासाठी तोडण्या आधी तिची प्रार्थना करून हा श्लोक म्हणायचा असतो.

आयुर्बलम यशो वर्च: प्रजा: पशून्वसूनिच |

 ब्रह्म प्रज्ञां च मेधां च तत्वं नो देहि वनस्पते ||

हे वनस्पती तू आम्हाला आयुष्य, उत्तम बल, यश, धन, प्रज्ञा आणि चांगली बुद्धी दे..

हा श्लोक मी वाचला होता आधी; पण त्या मागचा ऋषींचा वनस्पतींबद्दलचा आदर आणि प्रेमभाव या माझ्या अनुभवातून माझ्यासमोर लख्खपणे स्पष्ट झाला होता..

 

सुश्री स्नेहा दामले

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक उनाड दिवस ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ एक उनाड दिवस ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

एका रम्य पहाटे जाग आली, हो पहाट रम्यच होती पण मन मात्र अस्वस्थ होते, बेचैन होते, उठून काही करावे असे मुळीच वाटत नव्हते.

बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकु येत होता . झाडावर बसुन ते ऐटीत झोके घेत होते. आपल्याच विश्वात मग्न होते जस काही एक उनाड दिवस साजरा करत आहेत. अगदी हेवाच वाटला मला त्यांचा, अस वाटले आपल्यालाही त्यांच्यात सामील होता आले असते तर?

इकडे माझ्या मनात सुरू होते आता उठून न्याहरी ला काय करायचे ह्याचे कॅलक्युलेशन. पुढे काय उठले तशीच मनात नसतानाही. खर तर अजून थोडं पडून रहायचे होते मला, शांत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत.

पण उठले फ्रीझ उघडला तर काय त्यातुन पडवळ, कारली डोकावत होती जणू विचारत होती जेवायला काय करणार आहे. तेव्हा परत चरफड झाली मनाची आणि आता मात्र पक्क ठरवले खूप झाले आता आज मनाचेच ऐकायचे. आज साजरा करायचाच एक उनाड दिवस.

छान गरम शॉवर घेतला, खूप दिवसानी चक्क जिन्स चढवली आणि स्वतः च्याच धुंदीत गाणी गुणगुणत गाडी बाहेर काढली.

बाहेर पडले ते थेट रम्य उद्यान गाठले. रम्य सूर्यकिरण किरण अंगावर घेतले, फुलांवरुन प्रेमाने हात फिरवला, फुलपाखरू धरायचा प्रयत्न केला. चक्क झोक्यावर बसुन उंच झोके घेतले. छान गप्पा मारल्या पक्ष्यांशी, गुणगुणली काही गाणी आणि तेवढ्यात आठवण झाली भुकेची. मग छान गाडी वळवली माझ्या आवडत्या रेस्टॉरंट कडे. ऐटीत ऑर्डर केली मसाला डोसा आणि दही वड्याची. वरती मस्त कोल्डकॉफी घेतली आणि मन प्रसन्न करून पुढच्या प्रवासाला निघाले. घड्याळात पाहिले दहा वाजले होते म्हणले चला आता विंडो शॉपिंग करावे. माझ्या आवडत्या मल्टिप्लेक्स मधे गेले छान विंडो शॉपिंग केले. आणि चक्क एक उनाड दिवस हा पिक्चर पाहिला. छान पॉप कॉर्न खाल्ले, पिझा ही घेतला होता. पुढे काय करायचे ते पिक्चर पाहतानाच ठरवले होते, तिथून बाहेर पडले ते थेट पोहोचले माझ्या बालसखी कडे. खूप दिवस नाही वर्षे झाली होती तिला भेटून. तिच्याशी खूप गप्पा मारायची इच्छा आज पूर्ण होणार होती. छान टवटवीत फुलांचा गुच्छ घेतला होता तिच्या साठी आणि पोचले की तिच्या दारात. मला पाहून दोघींचेही नेत्र वाहू लागले आनंदानी. घट्ट मिठी मारली चक्क दारातच आणि मन तृप्त होईपर्यंत गप्पा मारल्या.

गप्पांच्या ओघात कधी संध्याकाळ झाली हेच कळले नाही. तिथून फुलपाखराच्या मनानी बाहेर पडले ते थेट एका रम्य टेकडीवर जाऊन पोहोचले. रम्य, शांत, सुंदर निसर्गाने भरलेल्या अश्या ठिकाणी. शांत बसुन राहिले तिथे बराच वेळ मनाला शांती लाभे पर्यंत.

मैत्रिणीशी मारलेल्या गप्पांमुळे आणि ह्या रम्य निसर्गामुळे मन तृप्त झाले होते.

ह्याच प्रसन्न मनाने गाणी गुणगुणत गाडी घराच्या दिशेला वळवतच होती की तेवढ्यात हाक ऐकु आली अग उठते आहेस ना, जायचे आहे ना आज ऑफिसला !!! ब्रेक फास्ट नाही का बनवायचा ? आणि दचकून जागी झाले की हो म्हणजे हे सगळे स्वप्नच होते तर…

पण आज ह्या क्षणी एक निश्चयच करून उठले की हे पडलेले स्वप्न सत्यात आणायचेच तेही लवकरच

काय हे सारे तुम्हाला पण वाटत असेल नाही का?

तर मग होऊन जाऊदे,

असाच एक उनाड दिवस

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रांगोळी ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ रांगोळी ☆ सौ.दीपा पुजारी 

आजकाल सकाळी लवकर ऊठून सडासंमार्जन करणं कालबाह्य झालय. माझ्या मनात मात्र माझी लहानपणीची सकाळ अजूनही रोज भूपाळी गाते. सकाळी जाग यायची तिच मुळी आकाशवाणीच्या संगीतानं. दात घासण्यासाठी मागच्या बाजूला असलेल्या फरशी कडं जावं लागे. तिथं भला मोठा तांब्याचा बंब पेटवलेला असे. तो एक छानशी ऊब देई. मला घाई असे ती घराच्या पुढील दारात जाण्याची. आई किंवा काकू दारात रांगोळी काढत असत. मी गडबडीनं पाटी-पेन्सिल घेऊन धावे. रांगोळी चे ठिपके पाटीवर काढून ते जोडण्या चा प्रयत्न करे.

भल्या सकाळी रांगोळीच्या निमित्तानं घरच्या बायकांना मोकळेपणा मिळे.अंगण स्वच्छ करताना व्यायाम होई तो वेगळाच. घराचा एंट्रन्स स्वच्छ सुंदर प्रसन्न साजिरा दिसे. आणि आपला कलाविष्कार दाखवायला गृहिणीला, मुलींना संधी मिळे.

सडारांगोळी आज कालबाह्य झाली आहे. तरीही काही विशिष्ट प्रसंगी ती काढली जाते. पारंपरिक रांगोळी कमी प्रमाणात दिसून येत असली तरी अजूनही तीची नजाकत सांभाळून ठेवलेली दिसते. रांगोळी मोठी, डौलदार, रंगीबेरंगी  झाली. फक्त घराच्या दारासमोर, देवघरापुरती ती मर्यादीत राहिली नाही. ही कला स्त्री पुरूष सगळ्यांनीच आत्मसात केलेली दिसते. तिची शान वाढलेली दिसते. तरीही अंगणात सडासंमार्जन करुन दारासमोर सुबक साधी अनेक ठिपके जोडून काढलेली रांगोळी जास्त भावते. मला तरी ते गृहिणीचं घरातल्या सर्व लहानमोठ्या माणसांना जोडण्याचं कसबच सांगतेय असं वाटतं. घरातील वेगवेगळया विचारांच्या,स्वभावाच्या आणि वयाच्या घटकांना एकत्र सांधून ठेवण्याची तारेवरची कसरत तिलाच करावी लागते.या सगळ्या घटकांना घट्ट बांधायला जाडजूड दोर वापरुन नाही हो चालत. नाजूक, मनभावन भावबंधांची गुंफण विणून अतिशय कौशल्यानं ही वीण वीणावी लागते. अगदी रांगोळीच्या बारीक रेघे सारखीच असते ही भावबंधांची गुंफण! ठिपके जोडण्यात एव्हढीशी चूक  रांगोळीचा तोल ढळू द्यायला पुरेशी असे. नाती टिकवणं, त्यात मोकळेपणा निर्माण करणं आणि ती बळकट करणं हे सगळं लिलया करण्यासाठी रांगोळीतील सौंदर्य समजलं पाहिजे. ठिपके फार जवळ जवळ काढून ही नाही चालणार. आणि लांबलांब ही मांडून नाही चालणार. रेघांच्या जाडी इतकच ठिपक्यांचे अंतरही महत्त्वाचं. ठिपके खूप जवळ आले तर अपघात होण्याची भिती. फारच लांब गेले तर दोर तुटण्याची भिती!! म्हणूनच रांगोळी मला Hygiene, Space, Relationship, Creativity अशा अनेक ठिपक्यांना सांधणारी संस्कृतीचा वारसा वाटते.केवळ भारतातच दिसणार्‍या या परंपरेचा मला अभिमान वाटतो.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्नायूबळ ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ स्नायूबळ ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

खरं तर शरीरसौष्ठव आणि माझा कधीकाळी संबंध येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्य कारण म्हणजे आळस! 🙂 सौष्ठव मिळवण्यासाठी जी काही मेहनत करावी लागली असती त्यास मी कधीच तत्वत: तयार झालो नसतो. दुसर्‍या कुठल्यातरी ठिकाणी आपण गाडीने जाऊन मौल्यवान वेळ घालवायचा, वजने उचलायची, घाम गाळायचा आणि वर त्यासाठी पैसेही मोजायचे!? कुणी सांगितलाय नसता उद्योग? त्यापेक्षा मी घरी व्यायाम करेन, बागेत खुरपणीचे काम करेन, शेतातही कुदळ-फावडे घेऊन कष्टायला जाईन, अगदीच लागले तर घरातही कष्टाची कामे करेन, केरवारा काढणे, भांडी घासणे, कपडे धुवेन, इस्त्री करेन इ.इ. म्हणजे असे नाना पर्याय माझ्यासमोर असतील, एवढेच मला म्हणायचे होते. 🙂 पण ह्याचा अर्थ मी व्यायामशाळेत आत्तापर्यंत कधीच गेलेलो नाही असा मात्र नव्हे. महाराष्ट्र मंडळाच्या व्यायामशाळेत कॉलेजला असताना जात असे. पण तेही कॉलेजच्या मैदानावर सकाळीसकाळी उठून NCC ला जाणे टाळता यावे ह्यासाठी. 🙂

शरीरसौष्ठव हा खेळ म्हणून असतो हे प्रेमचंद डोग्रा, अर्नॉल्ड श्वार्झेनेगर वगैरें बलिष्ठांचे फोटो आणि पेपरातील बातम्या पाहून माहीत होते. पण हा खेळला जातो कसा हे मला माहीत नव्हते. कुस्ती मध्ये कसे दुसर्‍याला पाडून, उरावर बसून चीतपट करायचे असते. वजन उचलण्याच्या स्पर्धेत प्रत्यक्ष वजन उचलावी लागतात. तसे शरीरसौष्ठव स्पर्धेत नक्की प्रावीण्य मिळवतात तरी कसे? स्पर्धा कशी होते? आणि स्पर्धकांना गुण कुठल्या निकषावर दिले जातात? असे एक ना अनेक प्रश्न मनात घोळत होते. ह्यातील काही उत्तरे मिळायची संधी परवा मात्र अगदी घरपोच मिळाली. निमित्त होते ते जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ज्या १२ फ़ेब्रुवारीस लोकमान्यनगर जॉगिंग पार्कवर भरवण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे ’मिस्टर एशिया’ असलेला, महेंद्र चव्हाण! ह्या गुणी खेळाडूविषयी मी पुढे सांगेन. स्पर्धेचा मोठा जाहिरात फ़लक माझ्या घरासमोरील चौकातच लक्षवेधी ठिकाणी लावलेला असल्याने चुकवणे म्हटले तरी शक्य नव्हते. काहीही झाले तरी स्पर्धा बघायचीच, असे मनाशी ठरवून टाकले.

त्या दिवशी ऑफ़िसमधून निघून घरी पोहोचायला उशीर झाला आणि रात्रीचे ९:३० वाजले. तरी पण लॅपटॉपचे दप्तर घरी टाकून लगेच पार्क मध्ये पोहोचलो. मैदानातील सर्व खुर्च्या भरल्या होत्या. एक किंवा दोनच महिला उत्सुकतेपोटी म्हणून थांबल्या होत्या. सर्व तरणीबांड पोरे (माझ्यासारखी 🙂 ) गर्दी करून आली होती. टाळ्या आणि शिट्यांनी मैदान दणाणून उठले होते. मला कळेना की स्पर्धा चालू आहे का लावणी नृत्य का मिसेस पुणेची स्पर्धा? तसंही एका परीने ही पुरुषांची सौन्दर्यस्पर्धाच होती म्हणा.

८० किलो वजनगटाचे ५-६ स्पर्धक एका रांगेत येऊन उभे होते. परीक्षकाने पुकारा केला की सर्वजण ती पोज देत होते. अशा एकापाठोपाथ सहा पोजेस द्यायच्या असतात. सरते शेवटी एक मिनिटाची संगीत फेरी असते. ह्यामध्ये जोषपूर्ण संगीताच्या तालावर प्रत्येकाने आपापल्या लाडक्या पोजेस द्यायच्या, असे साधारण स्पर्धेचे स्वरूप होते. समोर जजेस बसले होते व गुण लिहीत होते. नुसते शरीर पिळदार असून उपयोग नसतो तर आत्मविश्वासाने स्नायूंचे दर्शन घडवणे ह्याला जास्त गुण मिळत होते. शिवाय तुमच्या चेहर्‍यावरील हावभाव सुध्दा महत्वाचे असतात. स्नायु उठावदार दिसावेत ह्यासाठी संपूर्ण अंगाला एक विशिष्ट प्रकारचे तेल चोपडण्यात येते. पुण्या आणि पुण्याच्या बाहेरील विविध व्यायामशाळेतून स्पर्धक आले होते. एक जण तर व्यवसायाने डॉक्टर होता!

स्पर्धेसाठी सर्व राजकीय पक्षांचे आजीमाजी नेतेही निमंत्रित होते.विविध वयोगटातील स्पर्धकांना करंडक, प्रशस्तीपत्रके, रोख बक्षीसे देण्यात आली.

स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होता तो म्हणजे मिस्टर आशिया असलेला महेंद्र चव्हाण. मजबूत गर्दन, गोलाकार खांदे, बायसेप्स, ट्रायसेप्स, एखाद्या नारळाप्रमाणे फुगलेली दंडाची बेटकुळी, व्ही आकाराची भरदार छाती, सहा पॅक मोजून घ्यावेत असे पोटाचे स्नायू, लोखंडी मांडया, फुगीर पोटर्‍या, सह्याद्रीच्या डोंगररांगांप्रमाणे पसरलेले पाठीचे घट्ट स्नायू म्हणजे एखाद्या शिल्पकृतीप्रमाणे शरीरयष्टी कमावलेला हा योध्दा इतक्य़ा सहजपणे पोजेस देत होता की प्रेक्षक बेभानपणे टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊ लागले. शरीरावर इंचच काय एक सेंटिमीटरही दिसत नव्हता जो स्नायू आणि शिरांनी तटतटलेला नव्हता. बाहुबलीच नव्हे तर हा जिवंत ’स्नायुबली’च आमच्या डोळ्यांसमोर उभा होता. सगळ्यात शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राज्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ बापटांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. भाषणात गिरीशभाऊंनी महेंद्र चव्हाणचे तोंडभरून कौतुक तर केलेच वर कौतुक म्हणून त्याला रोख पारितोषिकही जाहीर केले. त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगितली ज्यामुळे सर्व उपस्थितांचे डोळे खाडकन उघडले. माझ्या दृष्टीने तर तो समारंभाचा सर्वात महत्वाचा भाग ठरला. “महेंद्रची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तो लहानपणी फुटपाथवर झोपत होता. वडापावची गाडी चालवत त्याने दिवस काढले आहेत. अशाही विपरीत परिस्थितीत त्याने व्यायाम आणि शरीरसौष्ठवाचा ध्यास सोडला नाही आणि आज तो ’झिरो’चा ’हिरो’ म्हणून तुमच्या समोर उभा आहे”, हे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले.

महेंद्रनेही छोटे भाषण केले आणि सांगितले की “साहेब मला नेहमीच सपोर्ट करीत आले आहेत. त्यांनी सागितल्याप्रमाणे मी पर्वती पायथ्याशी असलेल्या जनता वसाहतीत वाढलो आणि मला त्यावेळेपासून ओळखणारे काही लोक आज प्रेक्षकांत बसलेले दिसत आहेत. आजही ते मला बघायला आलेले पाहून आनंद होत आहे.” त्याच्या ह्या विनम्र स्वभावावर सर्वांनी टाळ्यांचा जोरदार कडकडात केला. “मी आत्तापर्यंत २०३ स्पर्धा मारल्या आहेत. थंड देशात तुम्हाला आजारी पडण्याचा सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे खूप सावध रहावे लागते. ४० देशांचे स्पर्धक आलेले असतानाही मी सुवर्णपदक जिंकले आणि त्यावेळेस भारताचे राष्ट्रगीत ऐकताना मला माझे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.” असे ऐकल्यावर पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट आणि “भारतमाता की जय!”, “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष झाला.

“कमळ हे देखील शेवटी चिखलातच उगवते, हे खरे!” ह्या विचारातच जो तो आपापल्या घरी गेला.

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काळ आला होता पण ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ विविधा ☆ काळ आला होता पण … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

 स्टेट बँकऑफ हेद्राबादच्या शहागड शाखेतून माझी बदली हिंगोली शाखेला झाल्यामुळे मला एक आठवड्याचा ‘जॉईनिंग पिरियड’ (नवीन शाखेत रुजू होण्यासाठीचा अवकाश ) मिळाला म्हणून मी आणि माझी पत्नी सौ. निर्मला एक आठवड्यासाठी औरंगाबादला घरी थांबलेलो होतो. त्या दरम्यान नऊ ऑक्टोबर २००४ रोजी ही घटना घडली.

माझा मोठा मुलगा मनोज आणि सुनबाई सौ. अर्चना इथेच राहात होते.  मध्यंतरी माझा छोटा अपघात झाल्यामुळे मला भेटण्यासाठी म्हणून छोटा मुलगा रवींद्रही मुंबईहून आदल्या दिवशीच आला होता.

नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे सौ. फिरण्यासाठी बाहेर गेली आणि मी, घरात येऊन पडलेले ताजे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचू लागलो. मुले साखरझोपेमध्ये होती. साधारणपणे साडेसातच्या दरम्यान सौ. ‘मॉर्निंग वॉक’ हून परत येईल आणि नंतर चहा करील असा अंदाज बांधून मी ब्रश करण्यासाठी बेसिनजवळ गेलो. एका हातात टूथपेस्ट घेतली अन् दुसऱ्या हातात ब्रश घेतला. पण दोन्ही हात जणू गळून गेल्यासारखे झाले. त्यामुळे पेस्ट आणि ब्रश एकत्र येईचना. मी ब्रशवर पेस्ट लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच छातीत जोरात कळ आली. मी हातातील ब्रश आणि पेस्ट खाली सोडून दिली अन् पटकन जमिनीवर पाठ टेकली. दोन्ही पाय सरळ केले. तितक्यात माझ्या छातीवर जणू हत्तीने पाय दिल्यासारखे आणि कुणीतरी माझी छाती आवळल्यासारखे वाटले अन् पूर्ण अंग घामाने ओलेचिंब झाले. लगेच माझ्या मनात विचार चमकून गेलाकी, “हीच माझी शेवटची घटका आहे. मी आता मरणार आहे.” त्या क्षणी मी अक्षरश: मृत्यूच्या दारात उभा आहे असे मला वाटले.

मी तशाही स्थितीमध्ये मुलांना हाक मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी अद्याप फिरून आली नव्हती. मुलांनी आवाज ऐकला आणि दोन्ही मुले वरच्या बेडरूममधून पटकन खाली आली. काय झाले असेल ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मला ताबडतोब कारमध्ये बसवून हेडगेवार रुग्णालयामध्ये हलविण्याची तयारी केली. इतक्यात पत्नीही आली. तिला काहीच कळेना. तिला मुलांनी काहीही न सांगता फक्त गाडीत बसण्यास सांगितले. ती वेळ घरातील सर्वांसाठीच कसोटीची होती. हेडगेवार रुग्णालयामध्ये तिथल्या डॉक्टरांनी मला क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब दाखल करून घेतले आणि सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली धरायला लावली. हळूहळू छातीमधल्या वेदना कमी झाल्या आणि मला बरे वाटू लागले.

“इस्केमिक हार्ट डिसीज” असे माझ्या हृद्यरोगाचे डॉक्टरांनी निदान केले. पुढे जवळजवळ आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये राहून नंतर घरी आलो. मुलांनी तातडीने मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेले म्हणून मी मृत्यूच्या दारातून परत आलो. त्या दिवशी काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरे.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार ??

सध्या कुठला महिना चालू आहे असे कुणी विचारले  तर आपण अगदी पटकन सांगू सप्टेंबर. मराठी महिना कोणता चालू आहे हे ही काहीजण सांगतील. ही जी कालगणना इंग्रजी, मराठी महिन्यांची जी अनेक कालखंडापासून अगदी सुयोग्य पद्धतीने चालू आहे,त्याला गुंफणारा एक दुवा जो साधारण तीन एक वर्षानी येतो तो म्हणजे ‘अधिक मास’/अधिक महिना/ जो आत्ता सध्या चालू आहे. अधिक अश्विन. यासंबंधी अनेक शास्त्रीय/धार्मिक माहिती आत्तापर्यंत तुम्ही वाचली असेल. तर या सदरात थोडं अधिक या अधिक  (+) शब्दाशी आपण कसे परिचित आहोत हे पहायचं?

लहानपणी गणित शिकताना अधिक  (+)  हा शब्द  पहिल्यादा आपण शिकतो. माझ्याबाबतीत बरीचशी बेरीज (अधिक+) असलेली गणिते माझी वजाबाकी असलेल्या गणितापेक्षा जास्त बरोबर आली आहेत किंवा वजाबाकीच्या गणितांपेक्षा बेरीज असलेली गणिते मला जास्त आवडायची . थोडे मोठे होत गेल्यावर परीक्षेत अगदी  इतर विषयाच्या पेपरात  ‘ अधिक + पुरवण्या ‘ लावण्या एवढी मजल मात्र मी मारू शकलो नाही .

अधिक/जास्त/अजून  या गोष्टीशी आपले नाते मानवी स्वभावानुसार  अगदी नैसर्गीक  आहे कारण जन्माला आल्यापासून आपले ‘शारीरिक वय’ हे  वाढतच असते (अधिक+), उणे कधीच होत नाही. ‘मार्केटींग स्कीम’ मध्ये या  ‘अधिक +’ गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसतो.  २ गोष्टीवर एक गोष्ट  फ्री (अधिक), अमुक एक गोष्ट अमुक कालावधीत घेतली तर तिसरी एखादी गोष्ट अधिक मिळेल, एखादी  पॉलिसी/ट्रॅव्हल प्लॅन/एखाद्या क्लबची मेंबरशीप घ्या आणि ही (अधिक+) बक्षसे मिळवा इ इ इ

दिवाळी/ होळी साठी  कोकणात सोडण्यात येणार-या जादा (अधिक) रेल्वे, पंढरपूर यात्रेसाठीचा अधिक बसेस, दिवाळीत काही नशीबवान कर्मचा-यांना  मिळणारा बोनस (अधिक)  एखाद्या उत्तम कलाकाराने सादर केलेली कलाकृती याला मिळालेला ‘वन्स मोर’ (अधिक+), शनिवार/रविवार काही  मालिकांचा सादर होणारा एक तासांचा  विशेष (अधिक +) भाग, कुठल्याही मॉल मध्ये सिनेमाच्या तिकिटाबरोबरच खादाडी करण्यासाठी घेतलेला (अधिक +) कॉम्बो पॅक, मराठीतील काही म्हणी जशा ‘ आधीच  उल्हास त्यात फाल्गुनमास ‘ किंवा दुष्काळात तेरावा महिना  यासगळ्या गोष्टीचा  कुठे ना कुठेतरी  ‘अधिक +’  शी संबध येतो असे वाटते. अगदी आजारीपडलो, अपघात  झाला  तर आयुष्यमान  वाढण्यासाठी जिथे आपण पोचतो त्या जागेचे चिन्ह ही ‘+’ हेच असते.  आणि शेवटी ते म्हणतात ना ‘नॉट बट लिस्ट’ का काय ते  राजकारण ?  होय राजकारण या प्रकारातही आपण अनेकदा ‘बेरजेचे राजकारण’ ऐकतो/पहातो की तर असा हा अधिक + महिमा. आपणास आवडला असेल.

तर सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीही १ दिवस अधिक घेऊन आला होता. सर्व जावयांसाठी ‘ अधिक मास ‘ ही पर्वणीच असते असे म्हणतात कारण

अधिक मास, त्यात, कुठलीही तिथी

ताटलीयुक्त ताजे ताजे अनरसे किती?

दोन प्रहरी सासूरवाडीत सोहळा रंगला

तोची आनंदला ग सखे, जावई  भला

. पण कधी कधी वाटत  ही अजून अजून/अधिक अधिक ची हाव ही मर्यादित हवी. एकंदर मिळणा-या गोष्टीत समाधान आहे/ बास आता अजून अधिक नको. किती पळायचे त्या अधिक/अधिक च्या मागे? असे वाटणे ही महत्वाचे . लेखनाचा शेवट सगळ्यांसाठीच ‘धीर’ धरी  असा मोलाचा सल्ला देऊन

होसी का भयकंपित शरसी का शंका

गाजतसे वाजतसे तयाचाच  डंका

जय गोविद जय मुकूंद  जय सुखकारी

धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

आज सन्कष्टी चतुर्थी! सान्गलीच्या गणपती मन्दिराची आठवण आली. ‘झुम्बर’ म्हन्टल की मला सान्गलीचे गणेश मन्दिर डोळ्यासमोर येते. त्या दगडी कमानीतून प्रवेश करून प्रत्यक्ष मन्दिरात गेलं की ते काचेचे झुम्बर लक्ष वेधू न घेत असे. गणेशाची सुबक, सुंदर मूर्ती, प्रसन्न वातावरण आणि मन्दिराचा प्रशस्त अन्तर्भाग !विविध रंगाच्या हन्ड्यानी आणि एका  मोठया

काचेच्या झुम्बराने सजवलेले मन्दिर बघत बसावेसे वाटत असे. गणपतीत आणि सणासुदीला ही झुम्बरे दिवे लावल्यावर लखलखत असत. त्या  मोठया  झुम्बराचा प्रकाश मन्दिर उजळवून टाकत असे.

पूर्वी च्या काळी राजेरजवाड्याच्या महालान्ची, दरबाराची शोभा अशा झुम्बरानी खूपच वाढवली होती. बडोदा, म्हैसूर सारख्या ठिकाण चे राजवाडे पहाताना अशी झुम्बरे राजाच्या रसिकतेचे

आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून छताला टान्गलेले, दिसत असे. मोन्गलकालीन  कथा असलेल्या सिनेमात सुध्दा अशी काचेची झुम्बरे कौशल्याने वापरलेली असत!

आता हा झुम्बर प्रकार फारसा दिसत नसला तरी दिवाळीत, सणासुदीला, गणपतीच्या सजावटीत अशी झुम्बरे वापरली जातात. झुम्बराचा आकार कधी गोल तर कधी निमुळता होत गेलेला दिसतो. असन्ख्य काचेच्या लोलकानी झुम्बर बनलेले असते. त्यात रन्गीत दिव्याची भर टाकून

ते अधिक सुशोभित केले जाते !

रोषणाईतला हा झुम्बर प्रकार निसर्गातही आपल्याला पहायला मिळतो. जाम्भळ्या, पिवळ्या रंगाची कँशियाची फुले झुबक्यातून झुम्बरासारखी लोम्बकळताना पाहिली की ती नैसर्गिक झुम्बरे मनाला लोभवतात. केशरी फुलांचे गुच्छ ही असेच दिसतात !

आणखी एका ठिकाणी मला हे झुम्बर आवडलं, ते म्हणजे द्राक्षेबागेत !द्राक्षाच्या बागेतत्या मान्डवाखालून फिरताना द्राक्षाचे घोस झुम्बरासारखे आणि ती टपोरी द्राक्षे मण्यासारखी बघून मन हरखून जाते !

निसर्गात अशी वेगवेगळ्या प्रकारची झुम्बरे पहाताना पौर्णिमेच्या रात्री आकाशाच्या छताला चान्दण्यान्ची असन्ख्य झुम्बरे टान्गलेली आणि  त्यामध्ये चान्दोबा एखाद्या चांदव्यासारखा

दिसतो .त्यांच्या कडे बघता बघता माझ्या  मनात विचारांची छोटी छोटी झुम्बरे साकार होऊ लागतात! आठवणीची आणि विचारांची  अशी असन्ख्य झुम्बरे मनाच्या आकाशात लटकलेली

असतात. ती साकार, होऊ लागतात शब्दांच्या रूपात!

एक एक शब्दांची गुम्फण करतांना मनाच्या पटलावर अशा झुम्बरान्ची सुंदर आरास तयार होते. ही शब्द झुम्बरे शब्दात अशी काही उतरतात, की त्यांची एक सुंदर आरास तयार, होते आणि त्यातूनच एखादे कवितेचे किंवा लेखाचे ‘झुम्बर – शिल्प ‘कागदावर उतरते.

 

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares