मराठी साहित्य – विविधा ☆ “नावात काय आहे?” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

काही जणांना एक सवय असते. चित्रपट सुरु झाला.. टायटल्स संपले की मग आत.. म्हणजे थिएटर मध्ये जायचे. टायटल्स काय बघायचे असा त्यांचा समज असतो.

पण टायटल्स बघणंही बर्याच वेळा खुप इंटरेस्टिंग असतं. उदाहरणार्थ.. शोले. त्याची टायटल्स.. त्यावेळचं आरडीचं म्युझिक.. सगळंच अफलातुन होतं.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यातुन बरीच वेगळी, रंजक माहिती आपल्याला मिळत असते. नवकेतन फिल्मस् ही देव आनंद, विजय आनंद यांची निर्मिती संस्था. त्यांच्या काही चित्रपटाच्या टायटल्स मध्ये.. उदा. गाईड.. ज्वेलथीफच्या टायटल्स मध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून नाव येते यश जोहर यांचे.

काही काळाने मग याच यश जोहर यांचे टायटल्स मध्ये नाव झळकते ते ‘निर्माता’ म्हणून. आणि तो चित्रपट असतो.. दोस्ताना.

असेच एक निर्माते.. बोनी कपुर. त्यांचा चित्रपट सुरु होण्याआधी.. टायटल्सच्याही आधी स्क्रीनवर फोटो येतो.. गीताबालीचा. बोनी कपुर, अनिल कपुर यांचे वडील म्हणजे सुरींदर कपुर. फार पुर्वी ते या क्षेत्रात नवीन असताना गीताबालीचे सेक्रेटरी म्हणून काम करत. त्यावेळी गीताबालीने त्यांना खुप मदत केली होती. त्याची जाण ठेवून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची सुरवात होते ती गीताबालीच्या प्रतिमेपासुन.

अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटातुन एकत्र कामे केली. त्यावेळी विनोद खन्नाचा आग्रह असे.. टायटल्स मध्ये अमिताभ पुर्वी त्याचे नाव यावे.. कारण तो सिनिअर होता. पण कधी त्याचे ऐकले जायचे.. कधी नाही.

संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल काम करायचे.. अगदी सुरुवातीच्या काळात. त्यावेळी टायटल्स मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या नावालाच स्वतंत्र फ्रेम मिळावी असा कल्याणजी आनंदजी यांचा आग्रह.. आणि मोठेपणाही. नावात महत्त्व मिळाल्याने उमेद मिळते.. विश्वास वाढतो असं त्यांना वाटे.

आपल्या मुलाला.. म्हणजे कुमार गौरवला लॉंच करण्यासाठी राजेंद्र कुमारने चित्रपट बनवला.. लवस्टोरी नावाचा. त्याचा दिग्दर्शक होता.. राहुल रवैल. चित्रपट पुर्ण होत असतानाच निर्माता या नात्याने.. आणि वडील याही नात्याने राजेंद्र कुमारने काही बदल सुचवले. पण राहुल रवैलनै त्याला स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरुन मग राजेंद्र कुमारने टायटल्स मधुन त्याचे नावच कट केले. ‘लवस्टोरी’ पडद्यावर झळकला.. पण दिग्दर्शकाच्या नावाविनाच.

‘नावात काय आहे?’ असं म्हणतात सगळेजणंच.. पण नावात खुप काही आहे.. किंबहुना नावातच सर्व काही आहे हेही सगळेजण जाणतात.

आणि हे जाणुन होता काशिनाथ घाणेकर. आपल्या नाटकाच्या श्रेयनामावलीत.. आणि थिएटरमध्ये होणाऱ्या अनाउंन्समेंटमध्ये आपले नाव सर्वात शेवटी यावे हा आग्रह त्याने शेवटपर्यंत ठेवला. थिएटरमधील अनाउन्समेंट मध्ये तर आपले नाव ऐकण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता.. आतुरता पहाण्यासाठी तो स्वतः आतुर असे. सर्व कलाकारांची नावे सांगुन झाल्यावर.. शेवटी मग नाव येई..

“… आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“ताई गुणाची माझी छकुली,

झोका दे दादा म्हणून लागली! ‌‌

सांभाळ ताई फांदी वाकली,

दोन्ही दोऱ्यांना गच्च आवळी! “

माझा मोठा मुलगा लहान असताना दोनच वर्षांनी झालेल्या त्याच्या धाकट्या बहिणीला झोका देताना हे गाणं म्हणत असे! त्याचे ते गोड, थोडेसे बोबडे शब्द ऐकताना मला खूप छान वाटत असे!

प्रत्येक लहान मुलाला झोक्याचं खूप आकर्षण असतं. अगदी छोटं असताना पाळण्यात झोपलेल्या बाळाला झोके देताना मनामध्ये उठणारे वात्सल्याचे तरंग बाईला अनुभवता येतात! झोक्याच्या तालावरती गाणं म्हणताना, अंगाई गीत गाताना आईला होणारा आनंद अवर्णनीयच असतो. हा तर मोठेपणचा अनुभव!

पण आपल्या प्रत्येकाचं बालपण हे असं झोक्याशी बांधलेलं असतं! प्रथम पाळणा, नंतर झुला, झोपाळा 

यावर झुलता झुलता आपण कसं मोठं होतो कळतच नाही! माझ्या आठवणीतलं अजूनही आजोळी गेल्यावर माजघरात बांधलेला झोपाळा हे माझं आवडतं ठिकाण होतं! मामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपाळ्याचे झोके किती वर्ष घेतले असतील हे आठवलं की अजूनही वाटतं तो बालपणीचा झोपाळा आपला खरा सवंगडी आहे! सुदैवाने अजूनही वयस्कर असलेला माझा मामा आजोळी गेले की हे लाड पुरवतो!

… आपल्या मनाची स्पंदनं म्हणजे एक लयबद्ध झोका असतो. मनात उमटणारे विचार तरंग एखाद्या झोक्याप्रमाणे लयबद्धपणे मागेपुढे होत राहतात. आणि आपोआपच मूड चांगला येतो… आणि लिखाण होते. माझ्या बाल्कनीत बांधलेला झोका हा माझा खूप आवडता आहे. तिथून दिसणारे मोठे ग्राउंड, तिथे असणारी गुलमोहराची झाडे तसेच बहाव्याची आणि इतरही मोठी झाडे, त्यावर बसणारे पक्षी, वरचेवर होणारे भारद्वाजाचे दर्शन हे सर्व माझे झोक्यावरून दिसणारे साथीदार आहेत….

“खोप्यामध्ये खोपाबाई सुगरणीचा चांगला… ” या गीतात बहिणाबाई सुगरणीच्या खोप्याचं वर्णन करतात आणि तो झाडाला टांगलेला कसा असतो तो आपल्या नजरेसमोर उभा राहतो. अशी झुलणारी त्यांची घरं पाहिली की खरोखरच तो झाडाला टांगलेला बंगलाच वाटतो!

फार पूर्वी प्रत्येक घराला एक झोपाळा असेच असे. दुपारच्या वेळी घरातील एखादे आजी आजोबा त्या झोपाळ्यावर विश्रांती घेत असत, तर संध्याकाळच्या वेळी घरातील बालगोपाळांना झोक्यावर बसून परवचा, पाढे, शुभंकरोती म्हणण्यासाठी जोर येई! झोक्याच्या तालावर आणि वेगावर मोठमोठ्याने पाढे म्हणण्यात खूप मजा येत असे.. हळूहळू घरं लहान झाली आणि हा माजघरातला झोपाळा दिसेनासा झाला!

मग कुठे लहान बाळासाठी दाराला बांधलेला छोटासा झोका दिसे किंवा झोळी बांधलेली असे… हे आपलं दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं वाटे!

पूर्वीच्या काळी मोठ्या वाड्यातून पितळी कडी असलेला सागवानी झोपाळा म्हणजे घराचे वैभव असे.

घरात मोठी माणसं नसली की स्त्रिया झोपाळ्याचा आनंद घेत. एरवी झोपाळा म्हणजे घरातील मोठ्या माणसांचे विरंगुळ्याचे ठिकाण आणि ते नसतील तेव्हा लहान मुलांचे बागडायचे हक्काचं स्थान!

मनामध्ये येणाऱ्या विचारांचं वर खाली येणं हा तर मनाचा झोका! त्याची आवर्तन किती उंच जातील सांगता येत नाही. ‘आता होता भुईवर, भेटे आभाळाला’असं त्याचं अस्तित्व!

“एक झोका… एक झोका.. चुके काळजाचा ठोका, एक झोका…. “

“.. चौकट राजा” या सिनेमात स्मिता तळवलकर यांनी या झोक्याचा कथेसाठी फार सुंदर उपयोग करून घेतलेला आहे!

एखाद्या छोट्या अपघातामुळे एखाद्याचे आयुष्य कसे बदलून गेले, ही गोष्ट त्या सिनेमांमध्ये इतकी आर्ततेने दाखवली आहे की संपूर्ण चित्रपट भर ती झोक्याची आंदोलनं मनामध्ये फिरत राहतात! अजूनही आठवणीतल्या सिनेमांमध्ये हा दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर यांचा झोका रुतलेला आहे…

नागपंचमीचा झोका हा पूर्वीपासूनच मुलींच्या खेळाचे आवडते ठिकाण असे. अजूनही लहान गावातून खेड्यापाड्यातून झाडाला मोठे-मोठे झोके बांधून झोके खेळले जातात, त्यामुळे मनाला तर आनंद मिळतोच पण आपली शारीरिक क्षमता ही वाढवली जाते! नागपंचमी च्या 

निमित्ताने माझा मनाचा झोका ही मस्त झोके घेऊ लागला आणि एकेका झोक्याबरोबर आठवणी ही मनात झुलू लागल्या…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालदिन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

बालदिन!! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

“मुले ही देवाघरची फुले ” ही काव्यपंक्ती माहीत नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही. लहान मुलांमुळेच घराला घरपण येत असते. साधारणपणे प्रत्येकाने याची अनुभूती कमीअधिक प्रमाणात नक्कीच घेतली असेल. आज बरेचसे मानसोपचार तज्ञ मनावरील ताण हलका करण्यासाठी लहान मुलांशी खेळायला सांगतात किंवा त्याच्या समवेत वेळ घालवायला सांगतात. सर्वांचा अनुभव मात्र हाच आहे की लहान मुलांशी खेळताना आपला वेळ कसा जातो ते कळत देखील नाही. त्यांच्याशी खेळता खेळता आपण सुद्धा लहान होऊन जातो आणि आपल्याला पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळतं आणि तेही अगदी अकृत्रिमपणे.

‘बालदिन’ हा फक्त लहान मुलांसाठीच असेल असं मला तरी वाटत नाही. माझ्या मते याचे दोन भाग करता येतील. एक शरीराने लहान असलेली मुले म्हणजे खरी लहान बालके. आणि दुसरे म्हणजे वयाने वाढलेली, जबाबदारीने मोठी असलेली, कर्तृत्वाने मोठी असलेली आणि तरीही आपल्या मनाच्या एका कप्यात स्वतःचे बालपण जपणारी, निरागस मन टिकवून ठेवणारी आणि उपजत असेलेली बालवृत्ती वृद्धिंगत करून जीवनाचा निखळ आनंद घेणारी.

ज्या घरात भरपूर लहान मुले असत त्या घराला गोकुळ म्हणण्याची आपल्याकडे रीत होती किंवा घराचे गोकुळ व्हावे असेही म्हटले जायचे. घराला गोकुळ म्हटले तर त्या घरासाठी भूषणावह असायचे. त्याचा घरातील कर्त्या मंडळींना सार्थ अभिमान असायचा, आनंद असायचा. गोकुळ जर आपण इंग्रजीत लिहायचे झाल्यास असेही लिहिता येईल. Go cool. जिथे जाऊन मनाला निवांतपणा मिळतो, मनःशांती लाभते, गात्र सुखावतात असे स्थान म्हणजे गोकुळ. बालकृष्णाच्या काळात गोकुळवासियांनी याची अनुभूती घेतली आहे. कृष्णलीला पाहून सारे गोकुळ आनंदात न्हाऊन निघत असे. पूर्वी सारी घरे ही गोकुळच होती. घरातील मुलांची संख्या किती आहे यावर घराचे गोकुळ होत नसते तर त्या घरातील वातावरण, परस्पर स्नेह, नात्यांमधील अकृत्रिम स्नेह, बांधिलकी, निष्ठा महत्वाची ठरते. जोपर्यंत घरात गोकुळ होते तोपर्यंत भारतात मानसिक रुग्ण, कौटुंबिक समस्या फारच कमी होत्या किंवा नव्हत्याच. हे गोकुळ जोपर्यंत कार्यान्वित राही तोपर्यंत भारतातील समाज स्वाथ्य नक्कीच टिकून राहील. अर्थात हे सर्व भारतातच शक्य आहे कारण आपल्याकडे सुदृढ आणि उबदार कुटुंब व्यवस्था आहे.

आज काळ बदलला आहे. जीवनशैली आणि एकूण समाजरचना झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकविण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. कुटुंब व्यवस्था नीट राहिली तर बालसंगोपन उत्तम रीतीने होईल आणि भावी पिढी निश्चित चांगली निपजेल आणि ‘घडेल’. कुटुंब व्यवस्थेत आईबाबांचे कर्तव्य नुसते जन्म देण्यापर्यंत सीमित नक्कीच नाही तर खरी जबाबदारी जन्म दिल्यानंतरच वाढते. सक्षम ‘आईबाबा’ घडवणे ही काळाची गरज आहे आणि हे आज असलेल्या मुलांमधूनच घडणार आहेत त्यामुळे आजच्या पालकांची जबाबदारी निश्चित वाढणार आहे.

आजच्या पिढीला अनेक आघाड्यांवर लढाई करावी लागत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांची जबाबदारी, करिअर, नोकरीचे/कामाचे वाढलेले तास, पैशाने उपलब्ध होत असलेल्या सुखसोयी आणि प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा या सर्वाचा स्वाभाविक परिणाम घरातील बालकांवर देखील होत आहे आणि भविष्यात नक्कीच होईल. खिश्यात वाढलेल्या पैशामुळे मुलांना पैशाने उपलब्ध असलेली सुखं देण्यात आजच्या काही पालकांना आपली इतिकर्तव्यता वाटते, पण मुलांच्या निकोप वाढीसाठी हे घातक आहे. पालकांनी मुलांसाठी निम्मा पैसा आणि दुप्पट वेळ खर्च करावयास हवा. सध्या मुलांसाठी ‘Value Time’ देण्याची एक नवीन संकल्पना मांडण्यात येत आहे. पण सर्वच वेळ हा quality time करता आला तर अधिक चांगले. त्यासाठीच गोकुळ! ! आणि त्यासाठीच उबदार कुटुंब! ! आणिक एक करता येईल की मुलांशी त्यांच्या इतके लहान होऊन आपण त्यांच्याशी संवाद साधला तर मुलं आपली मित्र होतील. (एका सर्वेक्षणानुसार मुलांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याचे प्रमाण खूप कमी आहे ). आणि मग मुल आपली जबाबदारी (liability) न राहता ती स्वतः जबाबदार (reliable) होतील. आपल्या कुटुंबाचे एक सदस्य बनतील.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्याकडे ‘राष्ट्रीय बालदिन’ बरीच वर्षे साजरा केला जातो. या निमित्ताने शासकीय आणि अशासकीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याला अनुसरून ‘बालके, लहान मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांचा विकास व्हावयास हवा’, अशी अनेक वक्तव्य केली जातात. बऱ्याच वेळेस अन्य शासकीय कार्यक्रमाप्रमाणे हा कार्यक्रम देखील ‘उरकला’ जातो.

हा सर्व उपक्रमातील ‘Event’ बाजूला ठेऊन आपण ‘सजग’ होऊन घरात असलेल्या चैतन्यदायी लहान पिढीला साद घालू शकलो तर मग आपल्याला कोणालाही ‘घडवावे’ लागणार नाही, सर्व काही निसर्गक्रमाने होईल. मुलं पालकांवर अकारण आणि अकृत्रिम (Unconditional) प्रेम करतात. ते आपल्या पालकांना आपले आदर्श (idol) मानतात. पालकांनी देखील आपल्यावर तसेच (Unconditional) प्रेम करावे अशी त्यांची माफक अपेक्षा निश्चित असेल. आजच्या बालदिनी हि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु केला तर त्यांच्यासाठी बालदिनाची ही सर्वात मोठी भेट असेल.

‘बाल’ असलेल्या मनाचे बालपण जपून पुढील पिढीच्या पंखांना बळ देण्याचे काम आपल्याला करता आले तर ‘बाल मनं’ कणखर होतील आणि जीवनातील कोणत्याही परिस्थितीत ‘मन’ स्थिर ठेवण्यात यशस्वी होतील.

निकोप मनातून सदृढ कुटुंब घडेल, सुदृढ कुटुंबातून समाज बलशाली होईल आणि बलशाली समाजच गौरवशाली भारत घडवेल !!

भारतमाता की जय।

… सर्वांना बालदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा! ! !

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-  “सी मिस्टर लिमये, फॉर मी हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् रेगुलरली फ्रॉम अॅब्राॅड. हा प्रश्न प्रिन्सिपलचा होता. तरीही वुईथ एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन त्यादिवशी मी त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार ८५०/-रुपये पाठवून दिले. इट्स नाईस यू कम हिअर पर्सनली टू मीट मी. सो नाऊ मॅटर इज ओव्हर फॉर मी. सो प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह करू नका. माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर आदर. “

यात न पटण्यासारखं काही नसलं तरी मला ते स्वीकारता येईना “मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गॉड ऑलसो वुईल स्क्वेअर अप माय लॉस इन हीज ओन वे. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज फॉर माय सेक”)

त्या हसल्या. अव्हेर न करता त्यांनी ते पैसे स्वीकारले. तरीही ८५०/- रुपये गेले कुठे ही रुखरुख मनात होतीच. पण ती फार काळ टिकली नाही. कारण मी परत येताच सुहास गर्दे सुजाताला घेऊन माझ्या पाठोपाठ माझ्या केबिनमधे आले. जे घडलं त्यात चूक सुजाताचीच होती आणि तिला ती कन्फेस करायची होती.

“समोरची गर्दी कमी झाल्यावर त्या दिवशी सुजाताने ‘लिटिल् फ्लॉवर’ची कॅश मोजायला घेतली होती. ” सुहास गर्दे सांगू लागले. ” पन्नास रुपयांच्या नोटा मोजायला तिने सुरुवात केली तेवढ्यात पेट्रोल पंपाचा माणूस पेट्रोल खरेदीच्या अॅडव्हान्स पेमेंटच्या डी. डी. साठी कॅश भरायला धावत पळत येऊन तिच्या काउंटर समोर उभा राहीला. नेहमीप्रमाणे त्याला डी. डी ताबडतोब हवा होता. कॅश मोजून घेतल्याशिवाय डीडी देता येत नव्हता. कॅश-अवर्स संपत आलेले. त्यात सुजाताला रुटीन मेडिकल चेकअपसाठीची अपॉइंटमेंट असल्याने काम आवरून जायची घाई होती. त्यामुळे ‘लिटिल् फ्लॉवर’ची नुकतीच मोजायला सुरुवात केलेली कॅश नंतर मोजायची म्हणून तिने तशीच काउंटरवर बाजूला सरकवून ठेवली आणि पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली. त्यात नेहमीप्रमाणे एक रुपयापासून शंभर रुपयापर्यंतच्या नोटांचा खच होता आणि त्याही सगळ्या जुन्या नोटा! ती कॅश गडबडीने मोजून झाली तेव्हा तिच्या लक्षात आले की त्यात आठशे पन्नास रुपये जास्त आहेत. नाईलाजाने पुन्हा सगळी कॅश मोजून तिने खात्री करून घेतली आणि मग शिक्का मारलेल्या रिसिटबरैबर जास्ती आलेले ८५०/- रुपयेही पेट्रोल पंपाच्या माणसाला तिने परत केले आणि ‘लिटिल् फ्लावर’ची कॅश मोजायला घेतली. ती कॅश मोजून झाल्यावर त्यात ८५०/- रुपये कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. आधी अर्धवट मोजून बाजूला सरकवून ठेवलेल्या त्या कॅशमधल्या पन्नास रुपयांच्या १७ नोटा पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली तेव्हा त्यात अनवधानाने मिसळून गेल्याने त्यात ८५०/- रुपये जास्त येत होते. हा घोळ लक्षात येताच सुजाता घाबरली. कारण तोवर पेट्रोल पंपाचा ड्राफ्ट काढायला आलेला माणूस ड्राफ्ट घेऊन परत गेला होता. “

“तो माणूस रोज बँकेत येणार आहे ना? “

“नाही सर. रोज त्यांचे दिवाणजी येतात. शनिवारी ते रजेवर असल्याने दुसऱ्या नोकराला पाठवलं होतं. “

” ठीक आहे, पण पेट्रोल पंपाचे मालक तुमच्या ओळखीचे आहेत ना? त्यांना भेटून त्याच दिवशी हे सांगायला हवं होतं ना लगेच. “

“हो सर.. पण.. ” बोलता बोलता सुहास गर्दे कांही क्षण मान खाली घालून गप्प बसले.

” मी इतर दोन-तीन स्टाफ मेंबर्सना घेऊन शनिवारी लगेच तिथे गेलो होतो सर. पण… “

“पण काय? “

“त्या नोकराने सरळसरळ हात वर केले. ८५०/- रुपये मला परत दिलेच नव्हते म्हणाला. मालकाने त्याला दमात घेतलं तेव्हा पॅंटचे खिसे उलटे करून दाखवत त्याने रडतभेकत कांगावा सुरू केलान्. “

“म्हणून मग तुम्ही मिस्. डिसोझाना फोन केलात? ही चूक कॅश काऊंटिंगमधे झालेल्या चुकीपेक्षा जास्त गंभीर होती सुहास. ” ती कशी हे मी त्यांना समजून सांगितलं. मी त्यांना त्यांचे पैसे परत करायला गेलो तेव्हा तिथं जे जे घडलं त्या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. ते सगळं ऐकताना सुजाताची मान शरमेनं खाली गेली होती. तिचे डोळे भरून आले होते. ती असहायपणे उठली. न बोलता जड पावलांनी बाहेर गेली.

त्यानंतर पगार झाला त्यादिवशी मनाशी कांही ठरवून सुजाता केबिनचे दार ढकलून बाहेर उभी राहिली.

” मी आत येऊ सर? ” तिने विचारलं. ती बरीचशी सावरलेली होती.

“ये.. बैस. काय हवंय? रजा? ” ती कसनुसं हसली. मानेनंच ‘नाही’ म्हणाली. मुठीत घट्ट धरुन धरलेली शंभर रुपयांची नोट तिने माझ्यापुढे धरुन ती कशीबशी उभी होती.

“हे काय? “

” सर.. ” तिचा आवाज भरुन आला. “तुम्ही होतात म्हणून त्यावेळी मला सांभाळून घेतलंत सर. माझ्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे भरलेत. त्यावेळेस खरं तर ते मी स्वतः भरायला हवे होते पण तेव्हा तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. आता दर महिन्याला थोडे थोडे करून ते मी परत करणाराय सर… ” ती म्हणाली.

ऐकलं आणि मी मनातून थोडासा हाललो. याच सुजाताबद्दल क्षणभर कां होईना पण माझ्या मनात संशय निर्माण झालेला होता. नशीब रागाच्या भरात मी तो बोलून दाखवला नव्हता. नाहीतर….? नुसत्या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागलं. नकळत कां होईना योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याचं समाधान त्या अस्वस्थतेइतकंच मोलाचं होतं! घडून गेलेल्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या प्रसंगांच्या मालिकेचा हा समाधानकारक समारोप आहे असं मला वाटलं खरं, पण ते तसं नव्हतं. मी सुजाताची समजूत घातली. पैसे परत करायची आवश्यकता नाहीये हे तिच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला. पण तिला ते पटेना. अखेर मिस् डिसुझांना जे उत्स्फूर्तपणे सांगितलं होतं तेच सुजाताला सांगावंसं वाटलं. म्हटलं, “सुजाता, तुला माझे पैसे परत करावेसे वाटले हेच मला खूप महत्त्वाचं वाटतं. पण अशी ओढाताण करून तू ते पैसे परत करायची खरंच काही गरज नाहीये. तुला माझं नुकसान होऊ नये असं वाटतंय ना? मग झालं तर. मिस्. डिसोझांना सांगितलं तेच तुला पुन्हा सांगतो, तू खरंच काळजी करू नकोस. माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे ऑर अदर. माझं म्हणणं नाराजीने स्वीकारल्यासारखी ती उठली. मला वाटलं, या सर्वच प्रकरणाला मी योग्य पद्धतीने पूर्णविराम दिलाय. परंतु ते तसं नव्हतं. तो पूर्णविराम नव्हे तर अर्धविराम होता, हे मला कुठं ठाऊक होतं? प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगांचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी कुणालाच ज्ञात नव्हतं, पण पुढे घडू पहाणारं, माझ्या मनावर आनंदाचा अमीट ठसा उमटवणारं ते अतर्क्य योग्य वेळेची वाट पहात होतं हे पुढं सगळं घडून गेल्यानंतर मला समजलं तेव्हा मी अंतर्बाह्य थरारून गेलो होतो! ! इतक्या वर्षानंतर आज ते सगळं असं आठवणंसुद्धा माझ्यासाठी खूप आनंददायी आहे!

सुजाताला तिची समजूत घालून मी परत पाठवलं आणि कामाचा ढीग उपसायला सुरुवात केली. तो दिवस मावळला. पुढचे कांही दिवस रोज नवे नवे प्रश्न सोबत घेऊन येणारे नेहमीचे रुटीन पुन्हा सुरू झाले. तो प्रसंग पूर्णतः विस्मरणांत जाणं शक्य नव्हतंच. पण तरीही वाढत्या कामांच्या ओघात तो प्रसंग, त्याची जाणीव आणि आठवण सगळंच थोडं मागं पडलं. पुढे बरेच दिवस मधे उलटले आणि त्या प्रसंगाची पुन्हा आठवण व्हायला माझ्या आईचं अचानक माझ्याकडे रहायला येणं निमित्त झालं.

मी सोलापूरला फॅमिली शिफ्ट केलेली नव्हती. पण बऱ्यापैकी मोठी आणि सोयीची जागा भाड्याने घेतलेली होती. कधी शाळेला सुट्ट्या लागल्या की आरती/सलिल, तर कधी शक्य असेल तेव्हा आई तिकडे येऊन रहात. आई आली तोवर ‘लिटिल फ्लाॅवर’च्या घटनेला तीन आठवडे उलटून गेले होते. पण आई येणार म्हटलं तेव्हा त्या घटनेची हटकून आठवण झाली त्याला कारण म्हणजे माझ्या बचत खात्यात शिल्लक असलेले ते फक्त पाच रुपये! त्याशिवाय खिशात होती ती जेमतेम दीड दोनशे रुपये एवढीच रोख शिल्लक. आई आल्यावर आमचा दोन्ही वेळचा स्वैपाक ती घरीच करणार म्हणजे आवश्यक ते सगळं सामान आणणं आलंच. हा विचारच त्या घटनेची आठवण ठळक करून गेला. ‘पण आता ते विसरायला हवं. निदान ते सगळं आईला सांगत बसायला तर नकोच. ‘असा विचार करून पाच-सहा दिवसांनी पगार होणार असल्याने तोवर पुरेल एवढ्याच आवश्यक वस्तू मी आणून दिल्या. त्यानंतर खिशात शिल्लक राहिली फक्त शंभर रुपयांची एक नोट!

त्या शंभर रुपयांच्या नोटेतच पुढे घडू पहाणाऱ्या आक्रिताचे धागेदोरे लपलेले होते हे त्याक्षणी मात्र मला माहित असायचा प्रश्नच नव्हता!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठीचे भवितव्यः आपली जबाबदारी… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ मराठीचे भवितव्यः आपली जबाबदारी… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

“मराठी” शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभा रहातो तो महाराष्ट्र ! कारण महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे. या मायबोलीचे भवितव्य आणि आपली जबाबदारी या विषयावर आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने, डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम यांना अभिवादन करून आपण विचार करूया.

भारतात फक्त तमिळ, तेलगू, संस्कृत, ओडिया, मल्याळम्, कन्नड या सहा भाषांना शासनाच्या निकषांवर आधारित अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण मराठीला “अभिजात भाषेचा दर्जा अ‌द्याप मिळाला नाही याचा खेद अनेक मराठी भाषिकांना वाटतो. मराठीला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी गुजरात, पंजाब, तमिळनाडू, बंगाल, कर्नाटक इ. राज्यांमध्ये मराठी भाषा संतानी पोहोचवली. महाराष्ट्रातील संत साहित्याला आजही जगभरात स्थान आहे. म्हाइंभटांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरांची “माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके||” असे म्हणणारी भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी, संत एकनाथांचे, चोखामेळ्याचे अभंग, तुकारामांची गाथा, दासबोध, पतंजली साहित्यावरील ग्रंथ, गोमंतकीय साहित्य, कोकणी साहित्य यांचे मराठी भाषेतील योगदान महत्त्वपूर्ण व दर्जेदार आहे. या सर्वांनी भाषाप्रसारणाबरोबरच समाज प्रबोधनही केले.

एवढा भरीव इतिहास असलेल्या मराठी भाषेला “भवितव्य नाही असे म्हणावे तरी कसे?” अभिजात नाही म्हणून आर्थिक, सांस्कृतिक, गौरवात्मक तोटे असतीलही पण तिचा ऱ्हास कधीच होणार नाही. आपण सर्वानी भाषा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया.

कवी सुरेश भट म्हणतात, “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी”! यांच कवितेत त्यांनी म्हणले आहे, “शेवटी मदांध तख्त फोडते मराठी”. सह्याद्रीच्या सिंहाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचे तख्त फोडण्याबरोबरच “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदित॥ साहसुनोः शिवस्यैषा मुद्राभद्रायराजते॥” या शिलालेखाची मुद्रा निर्मिती केली आणि “मराठी भाषा शब्दकोश” तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी भाषेतील शब्दांना कितीतरी मराठी प्रतिशब्द दिले. अशी ही महाराष्ट्राची “मराठी मायबोली” उज्ज्वल भवितव्याकडेच वाटचाल करणार हे नक्की.

या उज्ज्वल भवितव्यासाठी शासन, मंत्रीमंडळे, मान्यवर साहित्यिक यांनी पुढील कार्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

१. देशभरात महावि‌द्यालये, वि‌द्यापिठे यांमधून विविध सांस्कृतिक केंद्रे उभारता येतील.

२. मराठी जागतिक स्तरावर नेण्यासाठी भारताबाहेरील वि‌द्यापीठात, शाळांमधून ऐच्छिक विषय म्हणून मराठी शिकवले गेले पाहिजे. उदा. लंडन येथील वि‌द्यापीठात संस्कृतचे केंद्र आहे.

३. सर्व देशांमधून आज महाराष्ट्रीयन्स आहेत. त्यांच्या मुलांना मराठी शिकण्यासाठी ऑनलाईन सोयीची कार्यवाही झाली पाहिजे. मराठी भाषेसाठी प्रमाणपत्र परीक्षा ठेवायला हव्यात.

४. एकत्र कुटुंब पद्धती मराठी भाषेसाठी अत्यावश्यक आहे. घरात आजी आजोबांनी मुलांवर मराठी भाषेचे संस्कार केले पाहिजेत. यासाठी कथाकथन, भेंड्या खेळणे, ओव्या, उखाणे, म्हणी, हादगा, गणपती गौरी, कवी संमेलन, वाचन कट्टा, ग्रंथालये, भजनी मंडळे, नाटक, सिनेमा यांचा प्रभावी वापर केला पाहिजे.

५. सध्या इंग्रजीला जागतिक भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे मुलांना इतर राज्यांत, परदेशात पाठविण्याचा दृष्टीने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे कल अधिक आहे. पण “ज्ञानरचनावाद” स्वभाषेतूनच होतो. म्हणून मराठीतून संकल्पनानिर्मिती, आकलन, संकलन इ. गोष्टीवर भर देण्यासाठी पुस्तक निर्मिती आवश्यक आहे.

६. मराठी शाळांमधील वि‌द्यार्थी संख्या घटते आहे पण घरात अद्याप तरी मराठी बोललं जातं. मराठी विषय म्हणून शाळेत अभ्यास केला जातो या पार्श्वभूमीवर मुलांना मराठी पुस्तके, ग्रंथालये, कार्यक्रम उपलब्ध करून द्यावेत.

७. सर्वच ठिकाणी माध्यमांच्या नको त्या घुसखोरी मुळे योग्य संस्कार मुलांवर होत नाहीत पण याच माध्यमांच्या योग्य वापरातून, मराठी साहित्य प्रसारणातून मुलांमध्ये गोडी वाढविता येईल.

८. शाळांमधून “मराठी भाषा प्रयोगशाळा” निर्मिती करता येईल. मराठीतील उच्चार, पाठांतर, नवनिर्मिती यांवर भर देता येईल. यासाठी शासन अनुदान उपलब्ध झाले पाहिजे.

९. मराठीची गोडी वाढविल्यास विद्यार्थी कविता लेखन, कथालेखन, ललित लेखन, विचार संकलन, संमेलन सहभाग इ. गोष्टी शिकतील.

आणि….

मराठी पुढील पिढीकडे जशी आहे तशी हस्तांतरित होईल. . . मग भवितव्य उज्ज्वलच असेल, नाही का?

 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मी जन्माने ब्राह्मण असलो तरी कोणत्याही जातीचा कधीही द्वेष केल्याचे मला स्मरत नाही. तसेच परिस्थिती गरिबीची असूनही कधीही सरकारने आरक्षण देऊन माझी उन्नती करावी असे मला वाटले नाही. मध्यंतरी सरकारने खुल्या वर्गातील लोकांसाठी काही सवलती देऊ केल्या होत्या, त्याचाही लाभ मी घेतला नाही.

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, तसेच मी कोणत्याही जातीच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या विरोधात नाही. ज्यांना कोणाला आरक्षण हवे आहे असे वाटते त्यांनी आरक्षण मागावे आणि सनदशीर मार्गाने मिळवावे. पण त्यासाठी अमुक एका जातीच्या व्यक्तीला किंवा समाजाला शिव्या द्याव्यात याच्या मी विरोधात आहे. किंबहुना अशा अनेक घटना घडल्याचे विविध वृत्तपत्रातून वाचनात आले आहे. यातून अशा लोकांची विकृत मानसिकता कळून येते.

अमुक एका जातीच्या लोकांना होलपटण्याचा प्रयत्न म्हणा किंवा कृती म्हणा, अनेक वेळा झालेली आहे. विविध राजकीय पक्षांनी याचा उपयोग आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेला आढळतो.

समाजाने आता जागृत व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

या देशाच्या जडणघडणीत प्रत्येक जातीचा मोलाचा सहभाग आहे. ब्रिटिशांनी आपली जातीत विभागणी केली आणि आम्ही आज सुध्दा तसेच भांडत आहोत, आणि स्वतःचे नुकसान करीत आहोत, हे ज्या दिवशी हिंदू समाजाच्या लक्षात येईल, त्यादिवशी आपल्या प्रगतीला खरी सुरुवात होईल असे वाटते.

राजकीय पक्षाचे नेते भांडतात, वैर धरतात आणि नंतर एकमेकांच्या राजकीय फायद्यासाठी युती आणि आघाडी करतात आणि सामान्य माणसे राजकीय अभिनिवेष बाळगून आपल्या जवळच्या माणसांत वैर धरतात. मागील पाच वर्षात खास करून महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय भूमिका, त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कशा बदलल्या हे आपण पाहीले आहे. त्यामुळे आता जनतेने सूज्ञ होऊन (कोणत्याही अफवा, सामाजिक माध्यमे किंवा प्रलोभनांना बळी न पडता) उचित पर्याय निवडला पाहिजे. आपल्याकडे काही लोकं प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचे नुकसान होत असते. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये एकच उपाय आहे – – तो म्हणजे १००% मतदान.

आपण सर्वांनी तसा प्रयत्न करू म्हणजे महाराष्ट्र खऱ्या महा राष्ट्र होईल.

 १००% मतदान करून बहुमताचे सरकार आणू.. म्हणजे पक्षीय फोडाफोडी होणार नाही.

— —बघा, पटतंय का ?

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धूळभेट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ धूळभेट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

शुभंकरोती, रामरक्षा, पाढे म्हणून झाल्यानंतर गोष्ट ऐकत आमची निवांत संध्याकाळ हलकेच, निःशब्द अशा रात्रीत विरघळून जात असे. रस्ते निर्मनुष्य होत. त्या काळातली ही आठवण आहे. हिरण्यकश्यपू, प्रल्हाद आणि नरसिंहाची गोष्ट आजी इतकी तपशिलातून रंगवून सांगत असे, की वाटे- हिने हे सारे प्रत्यक्ष घडत असताना पाहिले असले पाहिजे. मोठेपणी ही गोष्ट जाऊन त्यातून तिचे माहेर नीरा-नृसिंहपूर उदित होऊ लागले. कथेचे संदर्भ जुळले. नीरा-भीमेचा संगम, नरसिंहाचे हेमाडपंथी देऊळ, त्याची वालुकामय मूर्ती, तिचा भला मोठा वाडा, नदीकाठची शेती, दूधदुभते, नोकर, आईवडील, भावंडं, त्यांच्या मालकीची भली मोठी नाव….. हे सारे तपशील येऊ लागले. काही काळानंतर तिचे सर्व आयुष्य तुकड्या-तुकड्यांतून समजू लागले…..

वयाच्या बाराव्या वर्षीच हे तिचे गाव, घर तिने सोडले होते- लग्न होऊन ती कामाच्या रहाटगाडग्याला जुंपलेली होती. तेव्हापासून नीरा-नृसिंहपूरचे सूक्ष्म रेखाचित्र माझ्यासमोर असे. त्यातली तिची तानूमावशी म्हणे, एकदा पहाट झाली म्हणून मध्यरात्रीच उठून नदीवर अंघोळीला गेली. परतताना घाटावर एक माणूस उंचावर बसलेला पाहिला. त्याचा पाय एवढामोठा लांबलचक होता… थेट नदीत बुडलेला. मग घाबरलेल्या तानूमावशीने दोन महिने अंथरूण धरले होते. भीमेच्या बाजूच्या घाटावर तिचे भले मोठे घर होते. पूर आल्यावर कोळ्यांच्या कुटुंबांना वाड्यात थारा मिळे. तिची आई, मावशी त्यांना जेवण रांधून घालीत. त्या वाड्यात गुप्तधन होते. झोपाळ्याच्या कड्या करकरत, बिजागऱ्या सुटत, असे भास त्यांना होत. मग तिच्या वडिलांनी प्रार्थना करून आपल्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबद्दल विनवले होते. या रेखाचित्रात ती मला अस्पष्ट असे. हे तपशील मात्र ठळक होते. आम्हाला तिचे गाव पाहायची ओढ लागली; पण ती मात्र फारशी उत्सुक नसे. तिच्या लग्नानंतर लवकरच वडील गेले. भावाच्या राज्यात तिचे माहेरपण हरवले. या अशा घटनाक्रमाचा मालिकेतली साखळी तीच तटकन तोडून टाकत असे; पण नरसिंहाचे नाव मात्र ओठी असे. त्याचे देऊळ तिच्या स्मरणात नित्य असे. पुढे मलादेखील त्या हेमाडपंथी देवळाची ओढ लागली; पण जायचा योग मात्र आला नाही. ज्या शतकात ती जन्मली आणि गेली, तेही संपले, तेव्हा पंच्याहत्तर ते साठ वयोगटातील तिच्या मुलांनाच घेऊन जायचे ठरवले. — – नीरा- नरसिंहपूरच्या त्यांच्या स्मृती अंधुक होत्या. अस्पष्ट होत्या. आता साठ-पासष्ट वर्षांनंतर त्या गावी जायचे झाले, तर काय आठवणार म्हणा !

आम्ही पुण्याच्या आग्नेय दिशेस एकशे पासष्ट किलोमीटरचे अंतर पार करून आलो होतो. नीरेचे विशाल पात्र डोळ्यांत मावत नव्हते. उंच बेलाग डोंगरकडे भयचकित करीत होते. पलीकडच्या तीरावरचे एखाद्या किल्ल्यासारखी तटबंदी असलेले नरसिंहाचे मंदिर, मंदिराचे उंच शिखर, नीरेचा विस्तीर्ण घाट पाहून मन निवले. प्रथेप्रमाणे धूळभेट घ्यायची होती. वेशीतून आत आल्यावर विंचूरकरांच्या वाड्यासमोर पश्चिम दरवाजा उभा ठाकला. उंच, चिरेबंदी तेहतीस पायऱ्या चढता-चढता दमछाक झाली. प्रवेशद्वारात सोंड वर करून दगडी हत्तींनी स्वागत केले, तेव्हा माझ्या पंच्याहत्तर वर्षे वयाच्या मामाला आपल्या वयोमानाचा विसर पडला… सहा-सात दशके गळून पडली. बालपणीचा मित्रच जणू त्याला भेटला…

मुख्य देवालयाचा गाभारा, सभामंडप, छतावरच्या मूर्ती, वेलबुट्टी, नक्षीकाम पाहताना मी हरवून गेले. भक्त प्रल्हादाच्या उपासनेतील वीरासनातली वाळूची मूर्ती पाहताच आठवण झाली ती त्याचे नाव सदैव घेणाऱ्या या गावच्या माहेरवाशिणीची.

अरगडे व अत्रे या लेखकद्वयींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधाराने मी सर्वांना क्षेत्रमाहात्म्य सांगून चांगलेच चकवले होते.. जणू मी इथे नेहमी येत असल्यासारखी…

इतिहासातल्या पुराणांच्या कथा सांगून साऱ्यांची भरपूर करमणूक केली. दर्शन आणि प्रसाद घ्यायचे आणि परतायचे…

त्यापूर्वी नीरा-भीमा संगमात सारे उतरले. त्यांच्या पाण्याला भिणाऱ्या आईची आठवण निघालीच. ‘पाणी म्हणजे ओली आग’ असे म्हणायची ती.

त्यानंतर तिचा वाडा पाहायचा होता. ग्रामस्थांना विचारीत सारे जण पोहोचलो. वाडा जागेवर नव्हताच. दगड, विटा, लाकडे यांचा खच पडलेला. नांदत्या घराची एवढीसुद्धा खूण नव्हती. गुप्तधनासारखे सर्वच भूमिगत झाले काय? झोपाळा, माजघर, ओटी, गोठा… तिच्या लवकर हरवून गेलेल्या बालपणासारखे हरवून गेले होते… शेराची-निवडुंगांची झाडे, शेणाचा दर्प, गावातला दारिद्र्याचा सूक्ष्मपणे जाणवणारा गंध, भणाणणारा वारा, डोक्यावर तापलेले ऊन, उजाड आजोळघरात तिची प्रौढ लेकरे गप्प होऊन उभी होती. असे कसे झाले… असे काहीसे म्हणत होती. परतताना पाय जड झाले होते. देवालयात पुन्हा आल्यावर गाभाऱ्यातल्या काळोखाने मन निवल्यासारखे झाले. राक्षसासाठी उग्र रूप धारण केलेल्या नरसिंहाचे डोळे कनवाळू झाले ते भक्तांसाठी. देवापाशी काय मागावे ते आठवेना, सुचेना. मागायचे नव्हते-सांगायचे होते; तेही साधेना… प्रसादाचे जेवण घशाखाली उतरेना.

महर्षी नारदाची तपोभूमी असलेले नीरा-नरसिंहपूर, एकेकाळी वैभवशाली नगर होते. वेदपाठशाळा, पुष्पवाटिका यांनी गजबजलेले होते. नगर म्हणून उदयाला आले होते. समर्थ रामदासांनी, तुकारामांनी गौरविले होते. साधक, योद्धे, राज्यकर्ते यांना प्रिय होते. कालचक्राच्या आवर्तनात, महापुराच्या तडाख्यात, दुष्काळाच्या वणव्यात, कलहाच्या भोवऱ्यात, उदासीनतेच्या अंधारात ते हेलपाटले; हरवले; उध्वस्त झाले. हा वाचलेला इतिहास सर्वांना सांगितला, तरी आजोळघराची भूक डोळ्यांत काचत होती, खुपत होती…

उग्र वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् 

नृसिंह भीषणं भद्रं मृत्युमृत्यूं नमाम्यहम्।।

… या गावची ती माहेरवाशीण असे काही म्हणायची… त्याला संकटात हाक मारायची… कडक दैवत म्हणून भ्यायचीसुद्धा…

आता मात्र सारे निमाले होते. तिच्या घरातला झोपाळा थांबला होता. नावही उरली नव्हती. नीरा-भीमेची गळामिठी मात्र तशीच होती. खीर-खिचडीचा नैवेद्य रोजचा; आजही चुकला नव्हता. इतिहासावर धूळ होती आणि या धुळीचाही इतिहास होता. उग्रमूर्ती नरसिंहाचे डोळे गाभाऱ्यातल्या अंधाराला भेदून तिच्या लेकरांसाठी निरोपाचे पाणी लेऊन सांगत होते- पुन्हा या… धूळभेटीला पुन्हा या…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे 

अनंत फंदींचा एक फटका आठवतो-……

बिकट वाट वहिवाट नसावी,

धोपट मार्गा सोडु नको,

संसारामध्ये ऐस आपल्या 

उगाच भटकत फिरू नको.

… पण एकदा समाजकार्यात शिरायचं म्हटल्यावर आपल्याला हा फटका वेगळ्या पद्धतीने म्हणावा लागेल 

बिकट वाट वहिवाट असूदे,

धोपट मार्गे जाऊ नको,

संसारामध्ये कशास नुसता,

समाजकार्या सोडू नको.

एकदा समाजकार्यामध्ये रममाण व्हायचं ठरवलं की ती वाट बिकट असणार हे नक्कीच. आपण बघतोच की समाज प्रबोधन ही अत्यंत बिकट आणि खडतर वाट आहे. तरी त्यातून कसा मार्ग काढायचा याचे वेगवेगळे पैलू आपण पाहत आहोत. अवयवदानाच्या क्षेत्रात चुकीच्या धार्मिक संकल्पनांमुळे ज्या काही अडचणी उभ्या राहतात तसेच चुकीच्या सामाजिक कल्पना आणि सोशल मीडियावर अथवा सांगोपांगी ज्या काही चुकीच्या घटना वा संकल्पना लोकांच्या मनावर ठसवल्या जातात त्याबाबत आपण पाहू.

ग्रामीण भागातील एका डॉक्टरशी चर्चा करताना तो असं म्हणाला “आपण देहदान करून टाकायचं. एकदा देह घेतल्यानंतर ते, त्यातलं जे काय पाहिजे ते काढून घेतील. पण लोकांना अशी भीती वाटते की देहदान केल्यानंतर त्यातले वेगवेगळे अवयव काढून त्याचा धंदा करतील. त्यामुळे देहदानासाठी माणसे तयार होत नाहीत. ” हे आता एका डॉक्टरने म्हणावे हे आश्चर्यकारक आहे. आता डॉक्टरांना सुद्धा अवयवदाना बद्दलची फारशी माहिती नसते हे बर्‍याच वेळेला लक्षात आलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये जे डॉक्टर झाले आहेत त्यांना थोडीफार माहिती आहे. पण तरी सविस्तर व योग्य ज्ञान नाही. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सुद्धा कांही डॉक्टर लोकांशी चर्चा करताना लक्षात येते की डॉक्टर मंडळींना सुद्धा या विषयाचे योग्य ते व सखोल ज्ञान नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे सुद्धा प्रबोधन होणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या सांगण्यावर लोक तज्ञ म्हणून विश्वास ठेवतात. तर डॉक्टर्स नर्सेस आणि अर्धवट माहितीच्या आधारे जनजागृती करण्याच्या फंदात पडणारे काही कार्यकर्ते या सर्वांचे पहिल्यांदा प्रबोधन केले पाहिजे. म्हणजे या तथाकथित तज्ञ मंडळींकडून समाजामध्ये चुकीचे संदेश जाणार नाहीत. सरकारकडे आम्ही बरीच वर्षे आग्रह धरला आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अवयवदानाचा समावेश असावा. परंतु अजूनही त्याला म्हणावे तसे यश आले नाही. तरीसुद्धा सध्या दहावीच्या सायन्स-२ पुस्तकात एक परिच्छेद अवयवदान या विषयावर आहे. त्यामुळे थोडी उत्सुकता म्हणून का होईना त्याबाबत विद्यार्थी माहिती मिळवतील. निदान ज्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे जायचे आहे ते या बाबतीत जागृत होतील. अभ्यासक्रमाचा जरी भाग नसला तरी जनरल नॉलेज म्हणून या विषयाची तोंड ओळख अनेक डॉक्टरांना नक्की आहे.

वास्तविक पाहता हृदयक्रिया बंद पडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की तीन मिनिटात त्याचं रक्ताभिसरण थांबतं आणि शरीरातील अंतर्गत अवयव निष्क्रिय होतात. निरुपयोगी होतात. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी कोणताही अवयव उपयोगाला येत नाही. किमान एवढे ज्ञान तर्कदृष्ट्या तरी डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. एकंदर याबाबतीत जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या बाबतीत ही अवस्था आहे तर नर्सिंग विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असणे अवघड आहे. म्हणून वैद्यकीय अभ्यासक्रमाबरोबर नर्सिंग अभ्यासक्रमामध्येही या विषयाचा समावेश होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आमच्या पदयात्रेच्या दरम्यान काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशा वर्कर्सबरोबर आम्हाला या विषयासंबंधीची चर्चा करण्याची संधी मिळाली. तेंव्हा असे लक्षात आले की जर अशा वर्करना या विषयाची माहिती करून दिल्यास समाजाच्या तळागाळापर्यंत या विषयाची ओळख लोकांना नक्की होईल आणि ती योग्य पद्धतीने होईल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाला आम्ही सूचना दिलेली होती की अशा वर्करच्या प्रशिक्षणामध्ये या विषयाचा समावेश व्हावा.

हृदयक्रिया बंद पडून म्हणजेच सर्वसाधारण ज्या पद्धतीने मृत्यू होतो या पद्धतीने मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरातला कोणताही अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नाही. तो प्रत्यारोपणासाठी निरुपयोगी असतो. त्यामुळे देहदान केल्यास त्यातील अवयवांचा व्यापार होण्याची शक्यता शून्य आहे. हे समजावून सांगणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांचा याबाबतीतला गैरसमज दूर करण्यासाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे.

व्हाट्सअप अथवा इतर सोशल मीडियावर विकृत माहिती प्रसृत करणाऱ्या मनोवृत्तीचे लोक अनेक वेळा गैरसमज पसरवणारे मेसेज टाकत असतात. त्यामुळे लोकांना या चुकीच्या संदेशापासून सावध करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही मृत व्यक्तीचे अवयवदान करायचे असेल तर ती व्यक्ती मेंदू-मृत असलीच पाहिजे. मेंदू-मृत म्हणून निश्चित केलेली व्यक्ती ही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग (आय. सी. यू. ) मध्येच असू शकते. ती व्हेंटिलेटरवरच असू शकते. ज्यावेळेला वेंटिलेटरच्या सहाय्याने श्वासोच्छवास कृत्रिम पद्धतीने चालू ठेवला जातो तेव्हा, जरी व्यक्ती मृत असली तरीही या कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेमुळे मृतदेहामध्ये रक्ताभिसरण चालू असते. त्यामुळे सगळे अवयव जिवंत अथवा कार्यरत म्हणजेच वर्किंग कंडिशनमध्ये असतात. असे जिवंत-कार्यरत अवयवच दुसऱ्या जिवंत व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रत्यारोपणासाठी बसविण्यास योग्य असतात. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट समाजामध्ये आपल्याला परत परत आणि ठासून सांगितली पाहिजे.

या सोशल मीडियाची चुकीचे मेसेज देण्याची अजून एक पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. कधीतरी आपल्याला व्हाट्सअप वर एखादा मेसेज येतो की … ” एक माणूस मृत्यूशय्येवर आहे आणि त्याला आपल्या किडन्या दान करायच्या आहेत. ज्या कुणाला गरज असेल त्यांनी त्वरित दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. हा संदेश त्वरित आपल्या सर्व संबंधितांना फोरवर्ड करा ज्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो ” 

अशा किंवा थोड्याबहुत याच्यासारखा संदेश असलेल्या पोस्ट व्हाट्सअपवर अनेक वेळेला येत असतात. आपण त्याची शहानिशा न करता खऱ्याखोट्याचा विचार न करता सद्भावनेपोटी आपल्या बऱ्याच मित्रांना तो मेसेज फॉरवर्ड करतो. असे चुकीचे मेसेज अनेक व्यक्तींना बऱ्याच वेळेला येत असतात. तोच मेसेज काही महिन्यांनी पुन्हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. असे मेसेज सतत फिरत असतात. ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचत असतात. अशा प्रकारच्या मेसेजबाबत एक सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. प्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे मेसेजेस हे सन १९९४ मध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या ‘मानवी अवयव प्रत्यारोपण आणि ऊती प्रत्यारोपण कायद्या’ च्या विरोधात आहेत. एखाद्याला अवयव दान करायचे असले तरी जाहिराती देऊन असे अवयवदान करता येत नाही. हे बेकायदेशीर आहे. दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीने की ज्याला या कायद्याचे ज्ञान नाही अशा व्यक्तीने चुकून असा संदेश पाठवण्याची शक्यता गृहीत धरली तरी आपण, प्रथम दिलेल्या क्रमांकावर फोन करून या घटनेबद्दलची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. जर खरोखरच कोणी फोनवर उपलब्ध असेल तर त्याला हे समजावून सांगितले पाहिजे की अशा तऱ्हेने संदेश प्रसृत करणे हे बेकायदेशीर आहे. अवयवदान हे ज्या रुग्णालयास अवयव प्रत्यारोपणचा परवाना असेल अशा रुग्णालयामार्फतच (झेड टी सी सी) ‘विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र’ या सरकारमान्य यंत्रणेशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच अवयवदान करायचे असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या पद्धतीचे मेसेज चुकीचेच असतात. हा फोन आपण फिरवला आणि जर तो लागला नाही किंवा नो रिप्लाय मिळाला तर शंभर टक्के समजायचं कि हा मेसेज खोटा आहे आणि तो पुढे पाठवायचा नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत असा मेसेज आपल्याला आला तर तो बेकायदेशीर असतो आणि आपण पुढे पाठवायचा नसतो. एक तर शहानिशा करून घ्या किंवा सरळ तो काढून टाका आणि ज्या व्यक्तीकडून आपल्याला हा मेसेज आलेला आहे त्या व्यक्तीला हा मेसेज ताबडतोब डिलीट करून टाकायला सांगावा तसेच ज्या व्यक्तींना तू हा मेसेज पाठवला असशील त्यांना सुद्धा हा मेसेज खोटा आहे हे कळवण्याची खबरदारी घ्यावी असे सांगावे. ही सर्व माहिती वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांचेकडून आलेली माहिती ही तज्ञ व्यक्तीकडून आलेली माहिती असे समाज समजतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या माहितीचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मला आणि कित्येकांना अनेक डॉक्टरांकडून सुद्धा असे मेसेज फॉरवर्ड झालेले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एका गोष्टीबद्दल आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आत्तापर्यंत अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मी व्याख्याने दिली आहेत. त्या प्रत्येक वेळी मी एक प्रश्न नेहमी विचारत असतो. ” इथे बसलेल्या व्यक्तींपैकी ज्या कुणी देहदानाचा संकल्प केला आहे त्यांनी हात वर करावेत “. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दहा टक्के व्यक्तीसुद्धा हात वर करत नाहीत. याचा अर्थ असा की वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे किंवा जे उद्या डॉक्टर होणार आहेत त्यांनासुद्धा देहदानाचे महत्व समजून सांगणे खरंच आवश्यक आहे. याबाबतीत त्यांचेमध्ये अनास्था आहे. कुणाच्यातरी देहदानाच्या कृतीमुळे या डॉक्टरांना शिक्षण मिळते आणि समाजामध्ये डॉक्टरीसारखा प्रतिष्ठेचा व्यवसाय करण्याची संधी मिळते. ते देहदान डॉक्टरांनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे करण्याचा संकल्प का करू नये ? याबाबत एक उदाहरण आवर्जून सांगावेसे वाटते. अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला माझे व्याख्यान झाले त्यावेळेला मी हा प्रश्न विचारला असता 100% विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे सुद्धा हात वर झाले होते. त्यावेळी डॉ. कार्यकर्ते हे प्रभारी डीन म्हणून तेथे कार्यरत होते. त्यांनी व्याख्यानानंतर असेही सांगितले की विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून आम्ही स्वेच्छेने फॉर्म भरून घेतच असतो. परंतु त्यांना आम्ही हे सुद्धा आवाहन करतो की आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळी पैकी किमान पाच जणांचे याबाबत प्रबोथन करून त्यांचे फॉर्म भरून आपले वैद्यकीय शिक्षण संपायच्या पूर्वी सादर करावे. अशा प्रकारची कल्पना व कृती प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांनी राबविल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. बऱ्याच वेळेला प्रत्येकामध्ये ही अनास्था असतेच असे नाही, परंतु त्यांना याबाबत आवाहन करणे आणि प्रवृत्त करणे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता मात्र नक्की आहे. सर्वच वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांनी तसे केल्यास या क्षेत्रातील ही अनास्था दूर होऊ शकेल हे नक्की.

देहदानाबाबत लोकांची अजून एक गैरसमजूत असते. ती म्हणजे देहदान केल्यानंतर मृतदेहाची विटंबना होते. देहदान करतानाच हे दान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे हे माहिती असलं पाहिजे. या मृतदेहांचं डिसेक्शन म्हणजेच शवविच्छेदन करण्यासाठीच हे मृतदेह देण्यात आलेले आहेत याची जाणीव देहदान करणाराला असली पाहिजे. मृतदेहाचं डिसेक्शन करणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गरजेचे असल्याने त्याची विटंबना होण्यासारखे काही नाही.

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆

सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले

? विविधा ?

☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले  

स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना ‘स्वयंशिस्त’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात स्वयंशिस्तीची अनेक उदाहरणे आपण बघतो. आपण स्वयंशिस्त किंवा अनुशासन असेही म्हणू शकतो. जवळचे उदाहरण मुंग्यांचे सांगता येईल. मुंग्या नेहमी एक रांगेत चालतात, एखादी मुंगी चुकून रांगेच्या बाहेर गेली तरी बाकीच्या मुंग्या कधीच रांग सोडत नाहीत आणि रांग चुकलेल्या मुंगीला परत रांगेत सामावून घेतात.

आपण घडून गेलेल्या काही घटना पाहू……

  • परवा मला सुट्टी होती, मामाच्या गावाला जायचे म्हणून मी अलिबागच्या एस टी आगारात गेले होते. सहज दोनतीन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. एक एस. टी. बस फलाटाला लागत होती. पण बरीच लोकं ती बस फलाटाला लागण्याआधीच, त्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. बसच्या दरवाजाचे आकारमान लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की एकाच वेळी एकच माणूस आत शिरू शकतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच बसच्या बाबतीत सारखीच होती.
  • आणिक एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिले आहे. अलिबागला नुकतीच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण संरचना कार्यान्वित झाली होती. पोलिस त्या रचनेची कार्यवाही सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्नशील होते आणि काही लोकं बिनदिक्कतपणे नियम मोडून वाहने चालवीत होते. माझ्यासमोर एक अपघात होता होता राहिला.
  • सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा बळी गेला.
  • अगदी अलीकडील घटना म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन कार्यक्रम काही लोकं रेल्वे रुळावर उभे राहून पहात होती. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि जवळजवळ पन्नास लोकांना जीव गमवावा लागला.

वरील सर्व घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, प्रत्येक घटना जरी वेगळी असली, प्रत्येक घटनेचा आर्थिक/ सामाजिक परिणाम जरी भिन्न असला तरी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे या सर्वाला एकच मूलभूत कारण आहे. आपली उत्सुकता न ताणता मी ते कारण सांगतो, ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.

बिरबलाची एक गोष्ट आहे. भाकरी का करपली? घोडा का अडला ? आणि पाने का नासली ? असे तीन प्रश्न आहेत. या सर्वांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे फिरवले नाही म्हणून. आज आपल्या देशात असलेल्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे किंवा असेल ते म्हणजे 

‘‘स्वयंशिस्तीचा अभाव’’

आपण स्वयंशिस्तीच्या दुष्परिणामांची काही उदाहरणे बघितली. त्यामुळे स्वयंशिस्त का पाळावी हे आपल्या लक्षात आले असेल. स्वयंशिस्त अंगिकारल्यामुळे मोठी झालेली अनेक राष्ट्रे आपल्याला सांगता येतील. यातील अग्रक्रमाने ज्यांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले ते ब्रिटिश आणि अणुस्फोटाचे विदारक दुष्परिणाम भोगून, चटके खाऊन स्वयंशिस्त पाळून, अथक मेहनत करून आणि प्रखर राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगातील प्रमुख झालेले एक राष्ट्र म्हणजे जपान. ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत असे मला वाटते.

आज आम्ही शालेय विद्यार्थी आहोत. बरीच मोठी माणसे असे म्हणतात की आम्ही उद्याचे नागरिक आहोत, पण मला उद्याचे नागरिक म्हटलेले आवडतही नाही पटतही नाही. आदर्श नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये आम्ही आजपासून च पार पाडायला सुरुवात केली तर ती आमच्या अंगवळणी पडतील, आमच्या अंगात मुरतील आणि आयुष्यभर आम्ही ती आचरणात आणू शकू. यात खासकरून स्वयंशिस्त अंगी बाणली गेली तर आमचे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल असे मला वाटते.

आता बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रास्ताविक पुरेसे झाले. स्वयंशिस्त म्हणजे काय ते आम्हाला कळले, स्वयंशिस्तीचे दुष्परिणाम कळले आणि फायदेही कळले. पण आम्ही नक्की काय करायचे हे कधी सांगणार.

आपण त्याची घरापासून सुरुवात करूया. आपण सकाळी झोपून उठलो की किमान आपल्या पांघरुणाची घडी आपली आपण घालूया. काल पर्यंत आपण काय करीत होतो ते सोडून देऊ, पण आजपासून मात्र आपण या गोष्टी पाळूया. हात धुतल्याशिवाय आपण कोणताही पदार्थ खाणार नाही. हात पुसायला आपल्याकडे रुमाल असेल. सकाळी उठण्याची आपली वेळ पक्की असेल, ती आपण काटेकोरपणे पाळू. शाळेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा आपले एक वेळापत्रक असेल. घरी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा असेल. शाळेतून घरी गेल्यावर आपण आपले दप्तर योग्य ठिकाणी ठेऊ, त्यातील डबा, पाण्याची बाटली धुऊन ठेऊ. संध्याकाळी शुभंकरोती, काही देवांची स्तोत्रे म्हणू, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवू. शाळेतून दिलेला गृहपाठ आपला नेहमी पूर्ण झालेला असेल. शाळेत आपण वेळेत पोहचू. शाळेतील सर्व सूचनांचे, नियमाचे आपण पूर्णपणे पालन करू. रस्त्याने चालताना, प्रवास करताना आपण वाहतुकीचे नियम समजून घेऊ नी त्यांचे पालन करू. अयोग्य ठिकाणी थुंकणार नाही. लोकांनी अयोग्य ठिकाणी थुंकायाचे पन्नास टक्के कमी केले तर आपले सामाजिक आरोग्य पन्नास टक्के तरी नक्कीच सुधारेल. आपल्याला रांगेचे महत्व जरी कळले तरी आपली प्रगती किमान १०% नी वाढेल असा विश्वास वाटतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण सर्व सूज्ञ श्रोते आहात, आपापल्या अभ्यासाने यात अनेक गोष्टींची भर घालू शकाल.

एका मोठ्या वक्त्याने आपल्या भाषणांत सांगितले होते की आपल्या देशातील सर्वांनी दिलेली वेळ पाळली तर आपला GDP किमान चार टक्क्यांनी वाढेल. आपण सर्वांनी यावर चिंतन आणि त्यानुरूप कृती करण्याची गरज आहे, आपण प्रयत्न करू. देशाने, आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, याची आपल्याला नित्य जाणीव असण्याची गरज आहे, आपण सर्व तसा प्रयत्न करीत असालच, पण समजा त्यात काही त्रुटी रहात असेल तर आजचे माझे मनोगत ऐकून आपण त्यात योग्य ती सुधारणा नक्कीच कराल या विश्वासाने माझे मनोगतास पूर्णविराम देते.

देश हमे देता है सबकुछ।

हम भी तो कुछ देना सीखे ।।

भारत माता की जय।

© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

थळ, अलिबाग.

मो 9028438769

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सुजाता असं काही करणं शक्यच नाही. मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन जाळत राहिला. ) 

“आता प्रॉब्लेम मिटलाय सर. पैसेही वसूल झालेत”

सुहास गर्देनी सांगितलं आणि मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत? कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लॉवर’ ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. त्यांनी लगेच पैसे पाठवले. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं मला समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसीव्हर ठेवून दिला. माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देनं बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलंय असंच वाटू लागलं. माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयीत नजरेनं माझ्याकडेच पहात आहेत असा मला भास झाला आणि मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो. माझ्या अस्वस्थ मनात अचानक अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार चमकून गेला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो. )

“सुजाता, त्यादिवशी निघताना मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ची कॅश तुला दिली तेव्हाच ‘ती मोजून घे’ असं सांगितलं होतं. हो ना?” तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. ” ते पैसे मी स्वतः मोजून घेतले होते. एखादी नोटही कमी असणं शक्यच नाही. खात्री आहे मला. ती तशी असती तरीही मी एकवेळ समजू शकलो असतो. पण पन्नास रुपयांच्या चक्क १७ नोटा? नाही.. हे शक्यच नाही. कांहीतरी गफलत आहे. “

भेदरलेल्या सुजाताचे डोळे भरून आले. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देंची बसल्या जागी चुळबूळ चालू झाल्याचं मला जाणवलं.

“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या केव्हा लक्षात आलं होतं?”

“टोटल कॅश रिसीट टॅली करताना सुजाताच्याच ते लक्षात आलं होतं सर. ” 

“पण म्हणून फरक ‘लिटिल् फ्लॉवर’च्या कॅशमधेच कसा ? इतर रिसीटस् मधे असणार नाही कशावरून?”

सुजातानं घाबरुन सुहासकडं पाहिलं.

“सर, तिच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती. त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश आणि स्लीपबुक दोन्ही सुजातानं न मोजता बाजूला सरकवून ठेवलं होतं. गर्दी कमी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तिनं ती कॅश मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या १७ नोटा कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. “

“आणि म्हणून तुम्ही लगेच मिस् डिसोझांना फोन केलात. “

“हो सर”

आता यापुढे त्यांच्यासमोर डोकं आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना मी तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केलेला असावा तसं मलाच अपराधी वाटत राहिलं. त्याना फोन करण्यापेक्षा समक्ष जाऊन भेटणंच योग्य होतं. तेही आत्ता, या क्षणीच. पण जाऊन सांगणार तरी काय? रिक्त हस्ताने जाणं पण योग्य वाटेना. त्यासाठीआठशे पन्नास रुपये अक्कलखाती खर्च टाकून स्वत:च ती झळ सोसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याकाळी ८५० रुपये ही कांही फार लहान रक्कम नव्हती. आपल्या खात्यांत तेवढा बॅलन्स तरी असेल का? मला प्रश्न पडला. मी आमचं स्टाफ लेजर खसकन् पुढं ओढलं. माझ्या सेविंग्ज खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५/- रुपये बॅलन्स होता!

त्याकाळी मिनिमम बॅलन्स पाच रुपये ठेवायला लागायचा. मागचा पुढचा विचार न करता मी विथड्राॅल स्लीप भरून ८५०/- रुपये काढले. पैसे घेतले आणि थेट बाहेरचा रस्ता धरला.

“मे आय कम इन मॅडम?”

मिस् डिसोझांनी मान वर करून पाहिलं. त्यांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी दिसली. चेहऱ्यावरचं नेहमीचं स्मितहास्य विरुन गेलं. एरवीची शांत नजर गढूळ झाली.

त्यांनी समोर बसण्याची खूण केली.

“येस.. ?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.

“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटे आलो. सकाळी ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय एॅम रिअली सॉरी फॉर दॅट”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

“सोs? व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट नाऊ फ्रॉम अस?”त्यांनी चिडून विचारलं.

मी कांही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.

“व्हाॅट इज धिस?”

“त्यांनी तुम्हाला फोन करून तुमच्याकडून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. आय नो. बट दे वेअर इनोसंट. प्लीज फरगीव्ह देम. त्यांची चूक रेक्टिफाय करण्यासाठीच मी आलोय. तुमच्याकडून पैसे मोजून मी माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच आपल्यातला व्यवहार पूर्ण झालेला होता. त्यामुळे पुढची जबाबदारी अर्थातच माझी होती. ती मीच स्वीकारला हवी. सोs.. प्लिज एक्सेप्ट इट‌. “

“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समबडी मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ. “

“नाॅट नेसिसरीली. ती एखादी साधीशी चूकही असू शकेल कदाचित. आय डोन्ट नो. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”

“दॅट मीन्स यू आर पेईंग धिस अमाऊंट आऊट ऑफ युवर ओन पॉकेट. इजण्ट इट?”

“येस. आय हॅव टू. “

त्या नि:शब्दपणे क्षणभर माझ्याकडे पहात राहिल्या. त्याच्या कपाळावरच्या आठ्या अलगद विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानानं उठलो. त्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी वळणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.

“सी मिस्टर लिमये. फॉर मी, हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् फ्रॉम अॅब्राॅड रेगुलरली. सो एट फिफ्टी रुपीज इज अ व्हेरी मिगर अकाऊंट फाॅर अस. पण प्रश्न प्रिन्सिपलचा होता. ते इंम्पाॅर्टंट होतं. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटीस्फॅक्शन त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या मागणीनुसार ८५० रुपये पाठवून दिले. कारण त्याक्षणी आय डिडन्ट वाॅन्ट टू मेक इट अॅन बिग इश्यू. इट्स नाईस यू केम हिअर परसनली टू मीट मी. सो नाऊ द मॅटर इज ओव्हर फाॅर मी. आय रिक्वेस्ट यू… प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह नका करू. तुम्ही ते मला ऑफर केलेत तेव्हाच ते माझ्यापर्यंत पोचले असं समजा आणि पैसे परत घ्या. यू डोन्ट वरी फॉर माय लॉस. आय ॲम शुअर माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर अदर”

त्या अगदी मनापासून बोलल्या. त्यात मला न पटण्यासारखं कांही नव्हतंच. पण पटलं तरी मला ते स्वीकारता मात्र येईना.

“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गाॅड ऑल्सो वील स्क्वेअर अप माय लाॅस इन हिज ओन वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्यभावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज. फाॅर माय सेक. “

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares