मराठी साहित्य – विविधा ☆ ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला !‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला !‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी !!! सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभ राशीला असताना रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. तेव्हापासून संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात येतो.

‘कर्षति आकर्षति इति कृष्ण:’ ( जो सर्वांना आकर्षून घेतो तो कृष्ण). असे कृष्णाचे वर्णन करता येईल.

आपल्याकडे जरी तेहतीस ‘कोटी’ देव असले तरी त्यातील राम-कृष्ण या प्रमुख अवतारी देवांनी भारतीय जनमानसाला भुरळ पाडली आहे. प्रत्येक मनात रामकृष्णांनी ‘घर’ केले आहे. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा म्हणून त्या दिवशी उपवास करण्याची तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ’काला’ करण्याची परंपरा आहे. आज सुद्धा ती परंपरा तितक्याच श्रद्धेनी सर्व ठिकाणी पाळली जाते. फक्त आता काही ठिकाणी गोपाळकाल्याचे रुपांतर ‘दहीहंडी’त झाले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. दुर्दैवाने आज दहीहंडी ‘पैसाहंडीत’ रुपांतरीत झालेली नाही असे म्हणायचे धाडस कोणी करु शकेल असे वाटत नाही.

‘गोपाळकाला’ ह्या शब्दाचा अर्थ आज पुन्हा एकदा नव्याने समजावून घेण्याची आणि समजावून देण्याची गरज आहे असे वाटते. किती साधा शब्द आहे ‘गोपाळकाला’. ‘गो’ ‘पाळ’ आणि ‘काला’ असे तीनच शब्द आहेत. जसे गो म्हणजे गाय तसे ‘गो’ चा दुसरा अर्थ इंद्रिय असाही आहे. गायींचे पालन करणारा कृष्ण !! इंद्रियांचे पालन करणारा कृष्ण !! इंद्रियांवर जो अंकुश ठेवू शकतो तो कृष्ण!! तसेच त्याचा असाही अर्थ घेता येऊ शकतो जो इंद्रियांवर विजय प्राप्त करतो तो कृष्ण !! कृष्ण म्हणजे काळा. काळ्या रंगात सर्व रंग सामावले जातात. काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा आहे. ज्याची ‘स्वीकार्यता’ (Acceptance) पराकोटीची आहे तो कृष्ण !! सर्वात कुशल व्यवस्थापक कोण असेल तर कृष्ण !! किंवा आपण त्याला ‘आद्य व्यवस्थापन कौशल्य तज्ञ’ असेही म्हणू शकतो. भगवंताने रणांगणात सांगितलेली ‘गीता’ ही व्यवस्थापन कौशल्याचा विश्वकोश म्हटला पाहिजे.

ज्या कृष्णाला जन्माला येण्याच्या आधीपासून त्याचाच मामा मारायला टपला होता, जन्म झाल्याझाल्या ज्याला आपल्या सख्ख्या आईचा वियोग सहन करावा लागला, पुढे ‘पुतना मावशी’ जीव घेण्यास तयारच होती. नंतर ‘कालियामर्दन’ असो की ‘गोवर्धन’ पूजा असो ), कृष्णाने प्रत्येक गोष्ट सामाजिक बांधिलकी ध्यानात ठेऊन आणि मनाची प्रगल्भता दाखवत केली आहे, त्यामुळे आपण त्याला आद्य समाजसुधारक म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सामान्य मनुष्याचे जीवन सुकर होण्यासाठी वेळ पडल्यास जीव सुद्धा धोक्यात घालायचा असतो तसेच प्रत्येक गोष्ट भगवंत अवतार घेऊन करेल असे न म्हणता आपणही आपल्या काठीला झेपेल इतकी सामाजिक जबाबदारी घेऊन आपले समाजाप्रती, देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडायचे असते ही शिकवण कृष्णाने वरील दोन घटनांतून दाखवून दिली आहे असे म्हणता येईल. कृष्णाचे अवघे जीवन समाजाला समर्पित असेच आहे. अख्ख्या आयुष्यात श्रीकृष्णाने एकही गोष्ट स्वतःसाठी केलेली नाही.

आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट निस्वार्थपणे करणारा कृष्ण !! आपल्या भक्तासाठी आपण दिलेले वचन मोडणारा कृष्ण !! आपल्या गरीब मित्राचाही (सुदामा) सन्मान करणारा कृष्ण !! पीडित मुलींशी विवाह करुन त्यांना प्रतिष्ठा देऊन सन्मानाने जगायला शिकविणारा कृष्णच !! महाभारतातील युद्ध टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा कृष्ण !! युद्धात अर्जुनाला ‘कर्मयोग’ समजावून सांगणारा आणि त्यास युद्धास तयार करणारा कृष्णच !! स्वतःला बाण मारणाऱ्या व्याधास अभय देऊन कर्मसमाप्ती करणारा कृष्णच !!

श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे सदैव सत्वपरीक्षा आणि कायम अस्थिरता !! किती प्रसंग सांगावेत ? सर्वच गोड !! कृष्णाचा प्रेम गोड! कृष्णाचे भांडण गोड!, कृष्णाचे मित्रत्व गोड!, कृष्णाचे शत्रुत्व गोड! कृष्णाचे वक्तृत्व गोड! कृष्णाचे कर्तृत्व गोड! कृष्णाचे पलायन गोड! कृष्णाचा पराक्रम गोड! कृष्णाची चोरी गोड! कृष्णाचे शिरजोरी गोड! अवघा कृष्णच गोड! मधुर !!!

कृष्णाचा जन्म हा रात्रीचा म्हणजे स्वाभाविक अंधारातील आहे. आईच्या गर्भात देखील अंधारच असतो. सामान्य मनुष्याला पुढील क्षणी काय घडणार आहे याचे किंचित कल्पना देखील नसते. एका अर्थाने त्याच्या समोर कायम अंधार असतो. या अंधारातून मार्ग कसा काढायचा? हा मनुष्यापुढील मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर आपल्याला भगवान कृष्ण आपल्या चरित्रातून देतात. कृष्णचरित्र म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला / घटनेला ‘प्रतिसाद’ देत ‘आनंदात’ कसे जगायचे ह्याचा वस्तुपाठच ! आज सुद्धा कृष्णासारखे आचरण करुन सामान्य मनुष्य ‘कृष्ण’ होऊ शकतो. कृष्णाला यासाठीच ‘पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.

राम-कृष्ण यांना ‘अवतारी’ पुरुष ठरवून, त्यांचे उत्सव साजरे करुन आपले ‘कर्तव्य’ संपणार नाही. मग तो रामाचा जन्म असो की कृष्णाचा. येथील प्रत्येकाने महापुरुषाने मनुष्य म्हणूनच या भरतभूमीत जन्म घेतला आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांनी ‘याची देही याची डोळा’ ‘सामान्य मनुष्य’ ते ‘भगवान रामकृष्ण’ असा दिग्विजयी प्रवास केला असे इतिहास सांगतो. आपला ‘इतिहास’ खरा रामकृष्णांपासून सुरु होतो पण दुर्दैवानेआपण त्याला ‘मिथक’ मानतो. हीच खरी आपली शोकांतिका आहे. ( भारतीय ‘मानचित्रा’तील

(सांस्कृतिक नकाशा) ‘श्रीकृष्णमार्ग’ आणि ‘श्रीराममार्ग’ बघितला तर हे दोन्ही नरोत्तम आपल्या सांस्कृतिक एकतेचे प्रतिक आहेत हे आपल्या सहज लक्षात येईल. ‘द्वारका ते प्रागज्योतिषपूर’ आणि ‘अयोध्या ते रामेश्वरम्’ असे हे भारताच्या चारी कोपऱ्यांना जोडणारे आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारे पुरातन मार्ग आहेत.

सध्या असे मानले जाते की देवांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांचे उत्सव धुमधडाक्यात साजरे केले म्हणजे आमची त्यांच्याप्रति असलेली इतिकर्तव्यता संपली. सध्या सर्व देवतांचे उत्सव आपण ‘समारंभ’ (इव्हेंट) म्हणून साजरे करीत आहोत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सर्व उत्सवातील ‘पावित्र्य’ आणि उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागील ‘मर्म’ आपण सध्या विसरुन गेलो आहोत की काय? असे वाटावे अशी आजची परिस्थिती आहे. ‘गोपाळकाल्या’ तील कोणत्याच शब्दाला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही असे वाटते. आधुनिककाळानुसार गोपाळकाला साजरा करताना त्यात योग्य ते बदल नक्कीच करायला हवेत पण त्यातील ‘मर्म’ मात्र विसरता कामा नये. सध्याच्या उत्सवात ना ‘गो’ (गायींचे ना इंद्रियांचे) चे रक्षण होते ना कसला ‘काला’ होतो. सर्वांचे सुखदुःख वाटून घेणे किंवा सर्वांच्या सुखदुःखात नुसते सहभागी न होता समरस होणे म्हणजे ‘काला’. ज्याला ‘श्रीकृष्णाचा काला’ समजला त्याला वेगळा ‘साम्यवाद’ (मार्क्सवाद नव्हे!) शिकायची गरज नाही.

श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला हे खरेच आहे. ‘गोकुळ’ म्हणजे आपले शरीर ! श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की मन म्हणजे मीच आहे. ‘त्या’ गोकुळात झालेला श्रीकृष्णाचा जन्म आपण सगळे अनेक वर्षे साजरे करीत आहोत. श्री सदगुरु गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा प्रत्येकाच्या मनात श्रीकृष्णाचा जन्म होईल तोच खरा सुदिन !!!

राम कृष्ण हरी ।।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रैन बसेरा…! ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ रैन बसेरा…! ☆ श्री सुलभा तेरणीकर

ज्यासाठी यात्रा आरंभिली होती, तो क्षण आला आणि प्रवासाला निघाल्यापासून मनावर आलेला ताण सैल झाला. आईच्या काशीयात्रेची सांगता व्हायची होती. काशीची गंगा घेऊन रामेश्वराला अभिषेक केला होता आणि तिथली वाळू म्हणजे, सेतू घेऊन ती गंगेत अर्पण करायचा संकल्प होता. बनारसच्या गंगेच्या पात्रात नौकेत बसून तो पार पडला आणि यात्रेचा एक चरण तिच्या कृतार्थ भावनेच्या साथीनं संपला. तिच्या दृष्टीनं ही केवळ पारंपरिक धर्मयात्रा नव्हती, की भौगोलिक आनंदपर्यटन… ती एक भावनिक यात्रा होती. काळाच्या ओघात हरवून गेलेल्या आधीच्या पिढ्यांच्या स्त्रियांना कदाचित डोळा भरुन गंगा पाहण्याचं भाग्य लाभलं नसेल म्हणून तिनं ध्यास घेऊन ही प्रतीकात्मक यात्रा केलेली होती. गंगा न पाहिलेल्या अज्ञात स्त्रियांसाठी मीदेखील या यात्रेत नकळत सहभागी झाले होते ती एक सहप्रवासिनी म्हणून…

पण प्रवासात निघाल्यापासून विरोधाभासाचा जो विलक्षण अनुभव येतो, त्याची आवर्तनं मात्र सुरु होतीच. घरातून बाहेर खेचून नेणारी अन् पुन्हा कोटरात परतायची ओढ लावणारी अदृश्य शक्ती मला दमवीत होती. नमवीत होती. माझ्यासमोर भरतीचा-रितं होण्याचा खेळ सुरू होता.

माळव्यातून जाताना पाहिलेली सरसोची पिवळी शेतं, त्रिवेणी संगमावर सैबेरियातून आलेले शुभ्र पक्ष्यांचे लक्ष थवे, एकाकी देवळात शरपंजरी पडलेली गंगापुत्र भीष्मांची महाकाय मूर्ती, भारद्वाजांच्या तपोभूमीत थाटलेले गरिबांचे संसार, अस्वच्छता, घाणीचं साम्राज्य, फाटक्या अंगाचा सायकलरिक्षावाला, खपाटीला पोट गेलेला गंगेवरचा म्हातारा नावाडी अन रात्रीचा निवारा देणारा गरीब यात्रेकरूंचा बिनभिंतींचा रैन-बसेरा… नोंदी संपेनात.

बनारसचे घाट संधीप्रकाशात न्हाऊन निघालेले होते. पंचगंगेच्या संगमाजवळच्या घाटावर नावाड्यानं सांगितलं -“इथंच कबीरांना गुरु रामानंद भेटले.. ” मी विचारलं, “कबीरांचा मठ कुठं आहे?” उत्तर आलं-“मालूम नहीं.. “

मग दुपारी सारे जण विश्राम करीत असताना कसल्याशा तिरीमिरीत बाहेर पडले. कबीर चौराहा परिसरात विचारत, चौकशी करत एका अरुंद गल्लीच्या तोंडापाशी पोहोचले. तिथून म्हशींचे गोठे, व्यावसायिकांची दुकानं, गॅरेजं, घरं पार करता-करता क्षणभर थांबले. वाटलं, परत फिरावं. कबीरांच्या ढाई अक्षर प्रेमाच्या ओढीनं आपण आलो खरं; पण… फसलोच पुरतं. बाह्य आडंबराच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या, ‘आपण कुठलंही मत मांडलं नाही अगर कोणत्या मताचं खंडन केलं नाही’, असं स्पष्ट सुनावणाऱ्या कबीरांचं देऊळ शोधणं; मोठा विरोधाभास तर नाही ना… या विचारानं थोडी गोंधळले. पण समोरच तटबंदीसारख्या भिंतीत प्रवेशद्वार दिसलं. त्या कमालीच्या साध्या वास्तूनं खुणावलं. आत एका ऐसपैस वाड्याला सामावून घेतलं होतं. माणसांची वर्दळ तुरळक होती. ओवऱ्यात, छोट्या अभ्यासिकांतून साधक बसले होते. मी चबुतऱ्यावरच्या मंडपात पोहोचले. स्मृतिकक्ष होता तिथं. गोरखपंथी साधूंचा त्रिशूल, जीर्ण खडावा, रामानंदांनी दिलेली जपमाळ, एक काष्ठपात्र, कबीर वापरीत तो चरखा… अन अंधाराचं अस्तित्व सांगणारा समाधीपाशी तेवणारा क्षीण दिवा..

कबीरांनी देह ठेवल्यावर मागे राहिलेल्या फुलांवर त्यांच्या शिष्यानं- श्रुतिगोपालनं -त्यावर बांधलेली समाधी… फुलांची समाधी… म्हणूनच त्यावर फूल अर्पण करण्याच्या संकेतापासून मुक्त असावी.. युवा कबीराचं छायाचित्र पाहत असताना बावीस-तेवीस वर्षांचा देवेन्द्र… शुभ्रवेष धारण केलेला तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी माझ्या मदतीस आला.

कबीरांचं साधनास्थळ, जिथं सत्संग करायचे, ती जागा दाखवीत म्हणाला, ” आपने नीरू टीला नहीं देखा?” मग मंदिराच्या जवळच्या जागेत आम्ही पोहोचलो. बाहेरच्या दृश्यांशी पूर्ण विसंगत असं ठिकाण होतं. शेताचा तुकडा, वृक्षांची सळसळ, संगमरवरात विसावलेले नीरू व निमा. लहरतारा तलावात ज्येष्ठ पौर्णिमेला या दाम्पत्याला कमळात एक दिव्य बालक सापडलं होतं… नरहरपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या वेळच्या जंगलात, कसाई वस्तीत त्यांनी त्या बाळाला आणलं. वाढवलं. विणकराचा चरखा त्याच्या हाती दिला. कबीरांचं बालपण जिथं गेलं, त्या ठिकाणीच त्यांनी साधना केली आणि दलित, उपेक्षित, वंचित, दुःखी जनांना ईश्वराच्या भक्तीचा राजरस्ता दाखवून दिला. मुल्ला मौलवी, पंडित यांच्या माणसांना देवापासून दूर नेण्याच्या परंपरेवर आघात केले… निर्भयपणे, स्पष्टपणे अन अत्यंत प्रवाही भाषेत सामान्यांना समजावलं… बाह्य उपचारांचा अस्वीकार केला. धर्माच्या नावाखाली चाललेल्या विकृतीचा धिक्कार केला. मनुष्यात भेद करणाऱ्या कृतींचा निषेध केला. हृदयस्थ परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी प्रेरित केलं… देवेन्द्रशी बोलताना इतिहास आठवत होते. ऐकत होते.

१९३५ मध्ये हरिजन चळवळीची सुरुवात गांधीजींनी त्याच साधनास्थळापासून आरंभिली होती. राष्ट्रीय नेते, अभ्यासक, विचारवंत इथवर येऊन गेले होते. कबीरांच्या भाषावैभवापाशी गुरुदेव रवीन्द्रनाथ नतमस्तक झाले होते… या आणि अशा कितीतरी गोष्टी ऐकल्या. सहाशे वर्षांपूर्वी या इथे नांदलेलं चैतन्य पांघरून 

नीरू टीला पुन्हा ध्यानस्थ झाला..

कबीर साहित्याचे निस्सीम चाहते व गाढे अभ्यासक डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी कबीरांबद्दल सांगितलेल्या ओळी पुन्हा आठवायलाच हव्यात. “ऐसे थे कबीर… सिरसे पैर तक मस्त मौला, स्वभावसे फक्कड, आदतसे अक्कड, भक्त के सामने निरीह, भेषधारी के आगे प्रचंड, दिल के साफ, दिमाग के दुरुस्त, भीतरसे कोमल, बाहरसे कठोर, जन्मसे अस्पृश्य, कर्म से वंदनीय… ” 

आमच्या यात्रेच्या परतीचा प्रवास सुरू व्हायचा होता. चार रात्रीचा रैन-बसेरा सुटायचा होता. घरी परतायचं होतं. माघ पौर्णिमेचा चंद्र गंगेत उतरला होता. सृष्टीत वसंतागमनाची वार्ता होती. नीरू टीलामधला निःशब्द काळोख मात्र माझं मन उजळून टाकीत होता…

चल हंसा वा देस जहॅं पिया बसे चितचोर…. ज्या देशात नित्य पौर्णिमा असते अन् एकच नव्हे, तर करोडो सूर्य प्रकाशतात.. जिथं कधीही अंधार होत नाही, अशा देशी जायची वाट शोधायची, तर… थोडा अंधारही सोबत बांधून घ्यावा… नाही का? 

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकल है भाई ! इधरकेही है !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ लोकल हैं भाई ! इधरकेही हैं ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

लोकल हैं भाई ! इधरकेही हैं !

अंधेरी रातों में.. सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले… पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी ! (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर… ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार? 

लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो… पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने, विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.

श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल.. म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल…. रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो… दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.

कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी, हलकी वाहने(कार, रिक्षा इ. ) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.

कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत… आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे… आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात… कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार.. तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य… थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो… या स्तंभ शब्दावरून आठवले…. कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे.. साधन नव्हे! 

सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे… अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन. जी. सी. , डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे, प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली… (बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!) 

वाघ, सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत, हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं.. हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते… नाहीतर आपले सरकारी फलक… वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.

दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात, अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी, मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत… यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो… आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो.. शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.

आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत… आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी, कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात.. आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते… ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत.. उलट मागून येणा-या दुस-या वाहनांच्या मागावर… नव्हे वासावर राहतात… त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही! 

पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री… तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.

एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती, गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे… काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत….. अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत… दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत… लोकल ही भाई… इधर के ही हैं…. (आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत… !) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही… असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो.. पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो… शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम !

(या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-२ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-२ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

(पिठोरीची पूजा होऊन  श्रावण संपायचा.) — इथून पुढे — 

तोपर्यंत गौरी गणपतीची चाहूल लागलेली असायची.

पार्वतीला जसा शंकर मिळाला तसा चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिकेचा उपवास मुलींना करायला त्यांच्या आया सांगायच्या. मुलींच्या उपवासाचे घरात कौतुक असायचं. खजूर, केळी, सफरचंद आणले जायचे. खास बदामाची खीर केली जायची.

गणपतीची  तयारी तर जोरदार असायची. गणपतीची आरास करायचं काम मुलांचं असायच. पुठ्ठे रंगवून, चित्रं काढून… दरवर्षी नविन काहीतरी करायचे.

गणपतीच्या नेवैध्याला उकडीचे मोदक असायचे. वडिलांना आवडतात म्हणून गुळाच्या सारणाचे तळलेले मोदक केले जायचे.

रोज संध्याकाळी आरतीला वेगवेगळा प्रसाद असायचा.

ऋषिपंचमीला बैलाच्या कष्टाचे काही खायचे नाही असा संकेत असायचा. गंमत म्हणजे ती स्पेशल भाजी त्या दिवशी विकायला यायची. महाग असली तरी ती आणली जायची. ऋषीपंचमीचं म्हणून असं खास काळं मीठ मिळायचं. ते आई, आजीसाठी आणलं जायचं.

गणपतीच्या मागोमाग  गौरी यायच्या. यायच्या दिवशी तिला मेथीची भाजी आणि भाकरी असा नेवैध असायचा. दुसऱ्या दिवशी गौरीचा थाट काय विचारता? पंचपक्वांन्न, सोळा भाज्या, पाच कोशिंबिरी, कढी, पंचामृत असा साग्रसंगीत बेत  असायचा.  डाळिंबाच्या दाण्यांची कोशिंबीर पाच फळं घालून   वर्षातून एकदा त्या दिवशी होत असे.

शिवाय गौरीपुढे ठेवायला करंजी, अनारसे, बेसनाचे लाडू केले जायचे. गौरी विर्सजनाला मुरडीचा कानवला आणि दहीभात  असायचा.

अनंत चतुर्दशीला कोरडी वाटली डाळं आणि दही पोहे केले जायचे. गणपती बरोबर शिदोरी म्हणून दही पोहे दिले जायचे. तेही पातेलेभर केले जायचे. त्या दिवशी रात्री जेवायची भूक नसायची.

गणपती झाल्यावर थोडे दिवस सुनेसुने जायचे. की नंतर नवरात्रीचा सण यायचा. नवरात्रात काही बायकांचे नऊ दिवस उपास असायचे. तिला “उपवासाची सवाष्ण ” म्हणून खास आमंत्रण देऊन बोलावले जायचे. तिच्यासाठी स्पेशल पदार्थ केले जायचे.

 भगरीचे धिरडे, शिंगाड्याच्या पुऱ्या, श्रीखंड असा बेत करायचा. बटाट्याची गोड, तिखट कचोरी व्हायची. एकीपेक्षा दुसरी काहीतरी वेगळं करायची. आईने एकदा उपवासाचे दहीवडे केले होते त्याचे खूप कौतुक झाले होते.

तेव्हा नवरात्रात  घरोघरी भोंडला व्हायचा. पाटावर  रांगोळीने हत्ती काढायचा. ऐलोमा पैलोमा  गणेश देवा, अक्कण माती चिक्कण माती, अतुल्यामतुल्या, कृष्णाचं अंगड बाई कृष्णाचं टोपडं, एक लिंबू झेलुबाई…. अशी गाणी म्हणत फेर धरायचा.

खिरापतीला काय केले? हे ओळखायला लागायचं. त्यासाठी आया वेगवेगळे पदार्थ करायच्या. बीट गाजराच्या वड्या, चुरम्याचे लाडू, तिखट दाणे, नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा असे आईचे  पदार्थ आजही आठवतात.

आपली खिरापत मुलींना ओळखता आली नाही की आयांना आनंद व्हायचा.

दसऱ्याला श्रीखंडासाठी आधी एक दिवस दूध घेऊन त्याचे दही लावले जायचे. पंचात बांधून ते टांगून ठेवायचे. सकाळी छान घट्ट चक्का तयार व्हायचा. वेलदोडे घालून चांगले पातेले भर श्रीखंड केले जायचे. वडील श्रीखंड नको म्हणाले तर बासुंदी केली जायची.

पण  खरा दुधाचा मान  कोजागिरी पौर्णिमेला असायचा. गच्चीवरच्या गार हवेत चारोळी घातलेलं गरम दूध प्यायला घरातले जमायचे. ते दूध गच्चीत उघड्यावर ठेवायचं. त्यात चंद्राचा प्रतिबिंब पडलं की त्याची चव बदलते अशी समजूत होती.

काही दिवस गेले की दिवाळीच्या तयारीला लागलं पाहिजे अस आई घोकायची… कारण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ लागायचे. चकली, कडबोळीची भाजणी भाजायची, अनारश्याच पीठ दळायचं, करंजीचं सारण करायचं, लाडूसाठी साखर दळून आणायची… एक ना दोन किती तरी कामं तिला दिसत असायची.

फराळाच्या जिन्नसांनी डबे  भरून झाले की मग तिला हुश्श वाटायचं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वडील सकाळी सायकल वरून निघायचे. आत्या, मावशी, काकू कडे डबे द्यायचे. त्यांच्याकडून येताना डबे भरून यायचे. प्रत्येकाची चव निराळी असायची. आवडीने, चवीने ते पदार्थ खाल्ले जायचे.

ते दिवस कसे रमणीय  होते. साध्या साध्या गोष्टीतही आनंद होता.

त्या आठवणीत विचारांच्या तंद्रीत  मी हरवून गेले…..

यांच्या एका प्रश्नाने मनाने थोडी मागे जाऊन भटकून आले.

आज हे सगळं करणं  शक्य होत नाही. तितकं खायला घरात माणसंही नाहीत. निवांत वेळ नाही. आयुष्य कसं बिझी बिझी, फास्ट होऊन गेले  आहे.

नवीन पदार्थ बाजारात आले आहेत. खायच्या सवयी पण वेगळ्या आहेत.

पण मध्येच कधीतरी घारगे, शिंगोळे, गुळपापडीचे लाडू करावेसे वाटतात. सोडायचं म्हटलं तरी जुनं सोडवत नाही. नव्याशी अजून आमचा तितकासा मेळ बसत नाही.

कधीतरी वाटतं ह्या प्रथा बंद होतील का ? हे पदार्थ  विस्मरणात जातील का?

 पण एक मन सांगत असं होणार नाही. चातुर्मास आम्ही पाळत नाही पण इतर जमेल तसं आम्ही अजूनही करतो.

कितीही आधुनिक पुढारलेले झालो असलो तरी आमच्या रक्तातून वाहणारा तो स्त्रोत बदललेला नाही. आमची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे.

… कारण हे नुसते खाण्याचे पदार्थ नाहीत तर त्यांच्या मागे आमची संस्कृती आहे परंपरा आहे. त्या त्या पदार्थाची आठवण त्याच्याशी  निगडित अनेक   नाती पण  आहेत. ती आयुष्यभर तशीच राहणार आहेत…

– समाप्त –

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-१ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-१ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

त्यादिवशी जेवायला थालपीठ, भरीत, कांद्याची चटणी असा बेत होता.

हे म्हणाले ” आज काय कांदेनवमी आहे का ?”

मी नुसतीच हसले. कांदेनवमी करायला हल्ली चातुर्मास कुठे पाळला जातो?  पूर्वी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाल्यावर जेवणात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य  असे.  त्याच्या आधी कांदेनवमी  साजरी केली जायची. भाकरी, भरलं वांग, कांदा भजी, लसणाची चटणी असा बेत केला जायचा.

आषाढी एकादशीचा उपवास घरातल्या सगळ्यांना असायचा. पंढरपूरच्या पांडुरंगाची आठवण असो – नसो पण उपवास  आवडीने केला जायचा.

सकाळच्या फराळाला भगर, दाण्याची आमटी, रताळ्याचे गोड काप, बटाटा भाजी आणि तळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या असायच्या. आई आधीच बटाटा चिवडा करून ठेवायची. रात्री खिचडी, दही,  थालपीठ, साबुदाण्याच्या पिठाचा लाडू असा बेत केला जायचा. अक्षरशः एकादशी आणि दुप्पट खाशी असं होत असे. आदल्या दिवशी एवढं खाऊनही उपवास सुटायचा म्हणून दुसऱ्या दिवशी गोडधोडं केलं जाई.

आषाढ महिन्यात एकदा तरी  “आखाड तळणे ” हा प्रकार व्हायचा.  पाण्यात गुळ  विरघळून घ्यायचा त्यात  कणीक भिजवून त्याच्या जरा मोठा आकाराच्या शंकरपाळ्या केल्या जायच्या. त्या वरून कडक पण आतून नरम असायच्या. तीळ, ओवा घालून कडबोळी तळली जायची. कणकेत गुळ घालून गोड धीरडी केली जायची.

आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा असायची. घरातले एकूण एक दिवे घासून पुसून लखलखीत केले जायचे. पितळी दिवे चिंच लावून घासायचं काम मुलींचे असायचं. मग ते दिवे  पाटावर मांडून त्यांची हळदी कुंकु वाहून, हार फुलं, घालून  पुजा केली जायची. त्या प्रकाशाकडे बघताना खूप प्रसन्न  वाटायचं.

आषाढ संपायच्या आधीच घरोघरी श्रावणाचे वेध लागलेले असायचे. नागपंचमीला नागाची पूजा होत असे. दुध लाह्याचा नेवैध असायचा. त्याला थोड्याशा लाह्या लागायच्या. पण आई चांगला मोठा डबा भरून लाह्या फोडायची. पुढे बरेच दिवस त्याचा चिवडा, दहीकाला, लाडू केले जायचे. खालचे  “गडंग “थालपीठाच्या भाजणीत घातले जायचे.

नागपंचमीच्या दिवशी काही तळायचे नाही, भाजायचे नाही असा संकेत असायचा. पुरण न वाटता नुसते घोटून घ्यायचे. ते कणकेच्या लाटीत  भरून त्याचे उंडे केले जायचे. वाफेवर ते उकडायचे आणि साजूक तुपाबरोबर गरम खायचे.

श्रावणात खायची प्यायची चंगळ असायची. आई आजीचे दर एक-दोन दिवसांनी उपवास असायचे. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ केले जायचे. रताळ्याचा कीस, शेंगदाण्याचे लाडू, शिंगाड्याची खीर असे प्रकार व्हायचे.  राजगिरा घरीच फोडायचा. त्याच्या वड्या, लाडू करायचे. साबुदाण्याची जायफळ वेलदोडे लावून मोठं पातेलं भरून खीर केली जायची. ती गरम गरम वाट्या वाट्या प्यायली जायची.

श्रावणातल्या सोमवारच्या जेवणाची तर फार गंमत वाटायची. तो उपवास  संध्याकाळी  सोडायचा असायचा.  त्यामुळे शाळा लवकर सुटायची. दुपारीच आई  स्वयंपाकाला लागायची. खीर, शिरा, सांज्याची पोळी असा एखादा गोडाचा पदार्थ केलेला असायचा.

शंकराचं मोठं देऊळ असेल तिथे जत्रा भरायची. जेवण झालं की तिथे जायचं. दर्शनाला खूप मोठी रांग असायची. दर्शन केव्हा होतंय असं वाटायचं. कारण खरी ओढ जत्रेची असायची. टिणंटिणं, प्लास्टिकची दुर्बिण, रिबिनी, शिट्टी, भिरभिरं असं काही काही विकायला आलेल असायच. ते बघायला गंमत वाटायची.

त्यातल एखाद आई घेऊन द्यायची.

श्रावणात नात्यात, ओळखीच्या कुणाची तरी मंगळागौर दरवर्षी असायची. आदल्या दिवशी फुलं, पत्री गोळा करत हिंडायचं. ती ओल्या फडक्यात घालून ठेवायची. दुसऱ्या दिवशी पूजा, आरती धामधूम.. . चालायची.

झिम्मा, खुर्ची का मिरची, आगोटं पागोटं, नाच ग घुमा असे खेळ खेळायचे. म्हाताऱ्या बायकाही त्यात उत्साहाने सामील व्हायच्या.

एकमेकींना नाव घ्यायचा आग्रह व्हायचा. प्रसंगला साजेसे, मनाने रचलेले उखाणे लाजत लाजत घेतले जायचे. तो दिवस खास बायकांचा असायचा.

रात्रीच्या जेवणात मटकीची उसळ, नारळाच्या करंज्या, मुगाची खिचडी केली जायची.

श्रावणातल्या शुक्रवारला फार महत्त्व. त्या दिवशी माहेरवाशीण सवाष्ण म्हणून बोलवायची. गजरा, फुलं माळून, जरीची साडी, एखादा दागिना घालून ती यायची.

वरण, भात, कटाची आमटी, कुरडई पापड तळले  जायचे. तव्यावरची पुरणाची पोळी पानात पडायची. वर तुपाची धार.. खणा नारळाने तिची ओटी भरली जायची. तिचं मन आनंदुन जायचं. ही प्रथा किती छान आहे  ना. त्यामुळे स्त्रीकडून स्त्रीचा सन्मान केला जातो.

सकाळीच “शुक्रवारचे गरम फुटाणे” असे ओरडत फुटाणेवाला यायचा. संध्याकाळी बायका हळदी कुंकवाला यायच्या. त्यांना गरम दूध, फुटाणे दिले जायचे. पावसाळी हवेत फुटाणे खाल्ले की सर्दी होत नाही अस आजी सांगायची.

रविवारी आईचं सूर्यनारायणाचं व्रत असायचं. पहाटे कुणाशी न बोलता मुक्याने ते व्रत करायचं असायचं. सूर्यनारायण यायच्या आधी आई उठून  पूजेला लागायची. पाटावर रक्त चंदनाने सूर्यनारायण काढलेले असायचे. पूजा झाली की आई कहाणी वाचायला बसायची. ती ऐकल्यावर आम्हाला दूध मिळायचे. तशी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर पाटावर बसून त्या त्या वाराची कहाणी वाचली जायची.

श्रावणातल्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा येते. नारळी भात वर्षातून एकदा म्हणजे त्यादिवशी व्हायचा. बदाम, काजू, लवंग, वेलदोडे, ओलं खोबरं   घातलेला तो सोनेरी भात आवडीने खाल्ला जायचा.  रक्षाबंधनात देण्या घेण्याची पद्धत त्याकाळी फार  नव्हती. भावाला राखी बांधायची याचं महत्त्व असायचं.

श्रावणात घरोघरी सत्यनारायण असायचे. त्याचा दुधातला, केळी घातलेला  प्रसादाच्या  शिऱ्याची चव अफलातुन असायची. त्यात एक वेगळा गोडवा असायचा.

त्या दिवसात नारळ स्वस्त असायचे. आई त्याच्या वड्या  करायची. खोबरं घालून दडपे पोहे व्हायचे. खोबऱ्यात खवा आणि रंग घालुन वड्या केल्या  की आई त्याला बर्फी म्हणायची.

बैलपोळ्याचा सण ठराविक लोक साजरा करायचे. दरवर्षी आईला तिच्या माहेरच्या बैलांची आठवण यायची. त्यांचं कौतुक ती आम्हाला सांगायची. मातीचे बैल आणून पाटावर मांडून ती त्यांची पूजा करायची. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायची. दिवसभर आईला शेत, विहीर, मोट, पीकं, पाणी यांची आठवण येत असायची.

पिठोरीची पूजा होऊन  श्रावण संपायचा.

– क्रमशः भाग पहिला.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ही अचानक मिळालेली एवढी रक्कम फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचे वर्षभर माझी जमाखर्चातली तूट भरून काढायला पुरेशी ठरणार होती. नेमक्या गरजेच्या क्षणी जादूची कांडी फिरावी तसा घडलेला हा योगायोग श्रद्धेबरोबरच ‘त्या’च्याबद्दलची कृतज्ञता दृढ करणारा जसा होता तसाच यापुढे दर पौर्णिमेला

दत्तदर्शनाच्या बाबतीत कधीच कसलीच अडचण येणार नाही असा विश्वास निर्माण करणाराही! पण पुढच्याच पौर्णिमेच्यावेळी एक वेगळंच आक्रित माझी खऱ्या अर्थाने कसोटी पहायला समोर उभं ठाकणाराय याची मला या क्षणी कल्पना कुठून असायला?)

पुढची पौर्णिमा मंगळवारी होती. यावेळी ब्रॅंचमधील कांही महत्त्वाच्या कमिटमेंट्समुळे रजा न घेता मला नृ. वाडीला देवदर्शन घेऊन परस्पर महाबळेश्वरला परत यावं लागणार होतं. कोल्हापूरला घरी आधीच तशी कल्पना देऊन ठेवली तेव्हा ‘ रात्री उशीर झाला तर सांगलीला मुक्काम करून सकाळच्या पहिल्या बसने महाबळेश्वरला जा’ असं मिसेसने मला आवर्जून सुचवलं. सांगलीला म्हणजे तिच्या माहेरघरी. ‘तुम्ही पौर्णिमेला नृ. वाडीहून उशीरा तिथे घरी पोचाल असं मी आईबाबांना कळवून ठेवतेय’ असंही ती म्हणाली होती. पुरेशा विश्रांतीसाठी मलाही तेच सोयीचं होणार होतं.

एरवी निघायच्या दिवशी नेहमी या ना त्या कारणाने शेवटच्या क्षणापर्यंत माझी खूप धावपळ होत असे. प्रत्येकवेळी घाईघाईत बस पकडायची म्हणजे एक दिव्यच असायचं. पण यावेळी कसं कुणास ठाऊक पण बाहेरचा धुवांधार पाऊस सोडला तर बाकी सगळं रुटीन अनपेक्षितरित्या खूपच सुरळीत सुरु होतं. त्या दिवशी ब्रॅंचमधेही कामाची फारशी दडपणं नव्हती. दिवसभरातली माझी सगळी कामं व्यवस्थित आवरून, कॅश क्लोज करुन दुपारच्या सव्वातीनच्या सांगली बससाठी मी स्टॅण्डवर पोचलो तेव्हा बस नुकतीच लागत होती. घाईगडबड न करताही बसायला चांगली जागा मिळाली. इथवर सगळं सुरळीत झालं तरी घाटरस्त्यातून मात्र प्रचंड पावसामुळे बस मुंगीच्या गतीनेच पुढे जात होती. त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा बस सातारा स्टॅंडला थोडी उशीराच पोचली. सांगलीला बस बदलून नृ. वाडीला पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजून गेले होते. बसमधून उतरलो तेव्हा नृ. वाडी स्टॅण्डवर शुकशुकाट होता. पौर्णिमेच्या रात्री एरवी स्टॅण्डवर बऱ्यापैकी गर्दी असे. त्यामुळे आजची ही सामसूम अनाकलनीयच वाटत राहिली. मंदिरात पोहोचेपर्यंत पालखी संपून शेजारतीची तयारीही सुरु झालेली होती. तरीही देवासमोर फारशी गर्दीच नव्हती. खूप वर्षांनंतर इतकं छान, व्यवस्थित दर्शन झाल्याचं समाधान मिळालं खरं पण पौर्णिमा असूनही देवासमोर भाविकांची कांहीच गर्दी नसण्यामागचं कारण मात्र उमगलं नव्हतं. सांगलीला सासुरवाडीच्या घरी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. तोवर सकाळपासून क्षणभरही विश्रांती नसल्याने आणि सलगच्या दीर्घ प्रवासामुळे कांहीसा थकवाही जाणवत होताच. आतले लाईट बंद असल्याचे जाणवले. कदाचित मी येणार असल्याचा निरोप त्यांना मिळालेल्या नसायची शक्यता पुसटशी जाणवताच मला संकोचल्यसारखं वाटत राहिलं. त्याच अनिश्चिततेत दारावरची बेल वाजवली. पण अपेक्षित असणारा तात्काळ प्रतिसाद मिळालाच नाही. क्षणभर वाट पाहून मी पुन्हा बेल वाजवली. एकदा. दोनदा. आत कुजबूज झाल्याचं न् मग लाईट लागल्याचं अंधुक जाणवलं. दार उघडण्याआधी सासऱ्यांचा ‘कोण आहे?’ हा प्रश्न आणि पाठोपाठ त्यांनी दाराऐवजी जवळची खिडकी उघडल्याचा आवाज या दोन्ही गोष्टी मला बुचकळ्यात टाकून गेल्या. खिडकीतून मला पहाताच सासऱ्यांनी घाईघाईनी दार उघडलं. ते कांहीसे ओशाळवाणे झाले. तरीही “या.. या.. ” म्हणत त्यांनी हसतमुखाने स्वागत केले

“फार उशीर झाला ना मला?” मी विचारलं.

“छे छे… उशीर कसला?पण रात्री दहापर्यंत सगळं आवरतं ना, मग उगीच जागरण करत करायला बसायचं, म्हणून रोज लवकर झोपतो एवढंच. पौर्णिमा उद्या आहे, म्हणून तुम्ही उद्या रात्री येणार असंच आम्ही गृहीत धरलं होतं. पण हरकत नाही. या”

त्यांचं बोलणं ऐकून मी विचारात पडलो. हे असं कां म्हणाले कळेनाच. पौर्णिमा आजच तर आहे. उद्या कशी?’ मला प्रश्न पडला. तोवर सासुबाईही बाहेर आल्या. “हातपाय धुऊन धुवून कपडे बदला न् या लगेच. तोवर मी पान वाढते” त्या अगत्याने म्हणाल्या.

मी जेवायला बसलो पण मन मात्र कांहीतरी चुकल्यासारखं अस्वस्थच होतं. शिळोप्याच्या गप्पात जेवण आवरलं. हात धुवून समोरचा नॅपकीन घेत असतानाच भिंतीवर लटकणाऱ्या ‘कालनिर्णय’नं माझं लक्ष वेधून घेतलं. जवळ जाऊन मी कॅलेंडरचं पान लक्षपूर्वक पाहिलं. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला गाढ झोपेतून कुणीतरी हलवून जागं करावं तसा मी भानावर आलो. नृ. वाडी स्टॅंडवर आणि देवळात देवासमोरही भाविकांची गर्दी नसण्यामागचं कारण आज पौर्णिमा नसणं हेच होतं हे ‘कालनिर्णय’ मला स्पष्टपणे सांगत होतंच. पण… असं होईलच कसं? आमच्याकडे घरी कालनिर्णयच तर होतं. आपण नेहमीसारखं व्यवस्थित कॅलेंडर बघूनच सगळं प्लॅनिंग केलं होतं मग असं कसं शक्य आहे हे क्षणभर मला समजेचना. मी सहज म्हणून पुढचं पान पाहिलं न् मनातली साशंकता नाहिशी झाली.

का, कसं माहित नाही पण तिकडं घरी कॅलेंडर बघताना माझीच चूक झाली होती!यावेळची पौर्णिमा आज नव्हतीच. उद्याच होती!! सकाळपासूनची माझी धावपळ आठवून मला स्वतःचाच राग आला आणि कींवही वाटत राहिली. वरवर शांत रहात मी स्वत:ला सावरलं.

“खरंच. कॅलेंडर बघताना माझीच गफलत झालीय. तुमची मात्र विनाकारण झोपमोड”

“अहो असू दे. झोपमोड कसली?आज काय न् उद्या काय तुम्ही आलात याचाच आनंद आहे” सासरे मनापासून म्हणाले.

“तर काय?वाईटातून चांगलं शोधायचं बघा” सासुबाई म्हणाल्या. “या महिन्यात तुम्हाला दोनदा दत्तदर्शनाचा योग आलाय. चांगलंच आहे की. “

“म्हणजे.. ?” मी न समजून विचारलं.

 ” आता आलात तसं उद्याचा दिवस रहा सकाळी आंघोळ, नाश्ता सगळं आवरुन मग वाडीला पौर्णिमेचं दर्शन घेऊन या. जेवण करुन दिवसभर आराम करा. मग दुसऱ्या दिवशी पहाटे जा हवंतर. एरवी तुमचं येणं रहाणं होतंय कुठं?” त्या आग्रहाने म्हणाल्या.

मी कसनुसा हसलो. रहाणं तर मला शक्य नव्हतंच. कारण कॅशची दुसरी किल्ली माझ्याजवळ होती. आणि तसंही इतर महत्त्वाच्या कमिटमेंटस् होत्याच. त्यात तडजोड करणं मला शक्यही नव्हतंच आणि योग्यही. कोणत्याही परिस्थितीत कॅशअवर्स सुरू होण्यापूर्वी ब्रॅंचला पोचण्यासाठी मला उद्या पहाटेच्या बसने महाबळेश्वरसाठी निघणं आवश्यकच होतं. हे सगळं त्या दोघांना मी मोकळेपणानं समजून सांगितलं आणि तेवढ्यापुरता विषय तिथंच थांबवला.

या महिन्यात आपला पौर्णिमेचा नेम आपल्याच चुकीमुळे अंतरणार असल्याची खंत मनात घेऊन मी अंथरुणाला पाठ टेकवली. दिवसभराची धावपळ, दगदग, थकवा सगळं क्षणात विरुन जात मनातली ती खंतच मला त्रास देत राहिली. शांत झोप लागलीच नाही. पहाटे उठून सगळं आवरलं. निघताना दोघांना वाकून नमस्कार केला. बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात सासऱ्यांनी थांबवलं.

“जपून जा. तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देताय हेच योग्य आहे. देवधर्म, सेवा, श्रद्धा हेही महत्त्वाचं आहेच. पण त्यासाठी विनाकारण ओढ करुन घेऊ नका. तब्येत सांभाळून रहा. “

ते बोलले त्यात वावगं काहीच नव्हतं. त्या बोलण्या-सांगण्यात वयाच्या अधिकाराचा तर लवलेशही नव्हता. माझ्यावरील प्रेमापोटीच ते मायेने, आपुलकीनेच हे सगळं सांगत होते. मी मनापासून ‘हो’ म्हणालो.

“आणखी एक. मनात आलंय ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांना पोचल्यात आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन, दिवसभर काम करुन, तुम्ही पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. उगीच दगदग नका करु. “

मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत घडलेल्या का होईना पण आपल्याच चुकीमुळे आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. अशा मन:स्थितीत सासऱ्यांच्या मार्फत दत्त महाराजांनीच मला दिलेला माझ्या संकल्पपूर्तीस पूरक ठरणारा संकेत मात्र मला त्याक्षणी जाणवलाच नव्हता.. !हातातून कांहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झालं होतं. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरु झाला !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘निसर्ग‘ वादळ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘निसर्ग‘ वादळ…  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कोकणाने आजपर्यंत अनेक नैसर्गिक आणि अनैसर्गिक वादळे बघीतली, कधी ती खरीखुरी नैसर्गिक होती तर कधी अनैसर्गिक, कधी ती राजकीय होती तर कधी अराजकीय…. ! या सर्वांचा जनजीवनावर कमीअधिक प्रमाणात प्रभाव देखील पडला, परंतु चार दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग वादळ मात्र ‘न भूतो….. ‘ असेच होते हे कबूल करावे लागेल.

निसर्ग वादळ येणार अशी सूचना आधी एकदोन दिवस विविध पातळ्यांवर मिळतं होती. शासन, प्रशासन, प्रसारमाध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुरेशी खबरदारी घेतली होती. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उत्तम नियोजन आणि कार्यवाही केली होती, यासाठी ते सर्वअभिनंदनास पात्र आहेत. स्थानिक पातळीवर मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. सरपंच, मा. तलाठी आणि इतर कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यांच्या कार्यास माझ्या सादर प्रणाम!!

खास करून अलिबाग, थळ, नागाव, रेवदंडा आदी भागात दरवर्षी वृक्ष उन्मळून पडतात, नारळ-सुपाऱ्या पडतात, पण हे वादळ मात्र अफाट असेच होते, वाऱ्याचा वेग बेफाट होता, असे वादळ या आधी बघितलेला एकही मनुष्य गावात सापडला नाही. रायगड जिल्ह्यात १९८९, २००५ साली मोठे पूर येऊन गेले, परंतु त्यावेळेसही इतके वृक्ष पडले नव्हते. यावेळची हानी प्रचंड आहे, काही भागात तर ५०% लागवड जमीनदोस्त झाली आहे, ‘पुनश्च हरी ओम… ‘ करण्याची वेळ आली आहे…. !

ही भगवान परशुरामाची भूमी असल्याने हार न।मानणं हा इथला स्थायी भाव आहे. परमेश्वराच्या कृपेने ‘निसर्गा’ने इतके थैमान घातले असतानाही जीवित हानी बिल्कुल झाली नाही. याबद्दल परमेश्वराचे आभार मानावेच लागतील.

साधारण सकाळी ११ वाजता ‘वादळ’ घोंघावू लागले…. ! सुरुवातीला वेग कमी होता, मनात सारखे येत होते की हे चक्रीवादळ आहे, त्यामुळे काहीतरी चमत्कार होईल आणि हे वादळ उलट फिरून परत समुद्रात जाईल, परंतु विधात्याची इच्छा रायगड किनारपट्टीची स्वच्छता करावी अशी होती. त्यामुळे पुढचे पाच तास ते वादळं आमच्या भागात सातत्याने आदळत राहिल….. घोंघावणारा वाऱ्याचे वर्णन पुस्तकातील वर्णन आणि प्रत्यक्ष अनुभूती यात जमीन अस्मानाचा फरक आढळला. ‘कवी’ला कितीही विशाल दृष्टि असली तरी निसर्ग चे वर्णन करण्यात ते कमीच पडला, असे म्हणावे लागेल. नारळाची झाडे बाहुबली चित्रपटातील ताडांप्रमाणे खाली व वाकत होती आणि पुन्हा वरती जात होती. वारे चहुबाजूंनी फिरत होते, झाडे, पाने, फुले, वारा एका विशिष्ट लयीत नर्तन करीत होता, ‘निसर्गा’चे आणि निसर्गाचे ‘भेसूर’ (बेसूर नव्हे!) संगीत ऐकायला मिळत होते.

वादळाच्या आदल्या रात्री झोपताना नेहमीप्रमाणे सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना केली. त्यादिवशी ची प्रार्थना थोडी वेगळी होती. त्यांना म्हटलं, ‘इथे तुमच्या घरात रहातो, तिथेही तुमच्या घरी रहायचं आहे, तुम्हाला योग्य वाटतं त्या घरात ठेवा. ‘ मग निश्चिन्त मनाने झोपी गेलो. त्या प्रार्थनेने मात्र मला खूप बळ दिले. सद्गुरुंची कृपा झाली त्यामुळेच मी या ‘निसर्गा’चा आनंद घेऊ शकलो. सोसाट्याचा वारा कसा असतो ते बघता आले, मोठमोठाले वृक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पडू शकतात, याचे प्रात्यक्षिक बघता आले, हे सर्व अनुभवत असताना सद्गुरुंच्या कृपेने मनात भितीचा लवलेश ही नव्हता. अनेकांचे फोन येत होते, त्यांची काळजी स्वाभाविक होती, परंतु संकट काळात नामासारखे सोबती नाही याची प्रचिती वादळाच्या दिवशी पुन्हा एकदा आली. सद्गुरुंना शरण गेले की ते सांभाळतात हेच खरे!!!

वादळाने केलेलं नुकसान भरून काढायला अनेक वर्षे जातील, पण आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा लागवड करू आणि पुन्हा लोकांना आंबा, फणस, नारळ सुपारीचा पुरवठा करू. सरकारी मदत मिळेल, ती किती असेल याचा अंदाज सर्वांना असेलच. पण या संकटाच्या काळात ज्यांनी ज्यांनी अकृत्रिम स्नेहाने, अतीव आपुलकीने चौकशी केली, काळजी घेतली, यथाशक्ती मदत केली, आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, या सर्वांच्या जोरावर आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि परत उभारी घेऊ असा विश्वास आहे.

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

*

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

*

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

*

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

*

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

*

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,

*

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !

– कुसुमाग्रज

वादळाचा फटका जसा झाडांना बसला, घरांना बसला तसा तो ‘जनमानसा’ला ही बसला आहे. यावर ‘काळ’ हेच उत्तम औषध आहे.

वादळाने एक गोष्ट नक्की शिकवली ती म्हणजे * ‘ यह कभी भी बदलेगा ‘ !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढस्य प्रथम दिवसे… – लेखक – कै. आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ आषाढस्य प्रथम दिवसे… – लेखक – कै. आचार्य अत्रे ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. त्याची आठवण झाली की कविकुलगुरू कालिदासाच्या ‘मेघदूता’मधल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्र्लिष्टसानु। वप्रक्रिडापरिणतगज: प्रेक्षणीयं ददर्श’ या अमर पंक्ती ओठावर खेळू लागतात आणि आकाशातल्या मेघाकडे सहज डोळे वळून कारण नसतानाही मेघदूतातल्या यक्षाप्रमाणे आपले हृदय एकदम व्याकूळ होते. (‘आनंदी ही विकल हृदयी पाहता मेघ दूर, तो कैसा हो प्रियजन मिठी ज्यास देण्या अधीर?’) भारतीय मनावर कालिदासाचे इतके सूक्ष्म संस्कार उमटलेले आहेत की, मानवी जीवनात अशी कोणतीही भावना किंवा अनुभव नसेल की, जिच्या उत्कट अवस्थेत रसिक आणि सुसंस्कृत माणसाच्या मुखातून कालिदासाची एखादी अन्वर्थक ओळ आपोआप उचंबळणार नाही. सौंदर्याच्या दर्शनाने आणि संगीताच्या श्रवणाने चांगला सुखी माणूससुद्धा अस्वस्थ होतो. त्याच्या मनाला एकदम कसली तरी हुरहुर वाटू लागते. त्याबरोबर ‘रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्। प्र्युत्सुकी भवति यत्सुखिनोऽपि जन्तु:।।’  या ओळीचे एकदम स्मरण होते. अगदी फाटक्यातुटक्या कपडय़ांत एखादी सुंदर तरुणी चाललेली बघून ‘सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यम्। मलिनपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति। इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी। किमिवहि मधुराणां मण्डन नाकृतीनाम्?’ (‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते!’) या पंक्ती कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाहीत? लाखात एक अशी एखादी लावण्यवती बालिका पाहिली म्हणजे ‘हे न हुंगलेले फूल, हे न हात लावलेले कोवळे पान आणि हा न आस्वाद घेतलेला मधु, परमेश्वरानं कोणासाठी निर्माण केला आहे?’  ‘न जाने भोक्तारं कमिह समुपस्थास्यति विधि: !’ हाच विचार कालिदासाप्रमाणे आपल्या मनात येत नाही काय? मनुष्याच्या भोवती ऋतुचक्राचे भ्रमण तर एकसारखे चाललेले असते. पण त्यामुळे निसर्गाच्या आणि भावनेच्या सृष्टीत जे आंदोलन होते, त्याचे मनोज्ञ स्पंदन कालिदासाच्या काव्याखेरीज इतरत्र कुठे प्रतीत होणार?

सांसारिकांच्या मन्मथाला उपशांत करणारा ‘प्रचंडसूर्य: स्पृहणीयचंद्रमा:’ असा तो निदाघकाल, कामीजनांना प्रिय असणारा ध्यानगम, ‘प्रकामकामं, प्रमदाजनप्रियं’ असा शिशिर आणि हातात भ्रमराचे धनुष्य नि आम्रमंजिरीचे बाण घेऊन प्रेमीजनांची शिकार करण्यास येणारा वसंत योद्धा यांचे अद्भुतरम्य वर्णन कालिदासाखेरीज जगात दुसऱ्या कोणत्या कवीने केले आहे? कालिदास हा श्रृंगाराचा तर सम्राट आहेच. स्त्री-पुरुषांच्या अंत:करणाचे सूक्ष्म व्यापार कोमल कौशल्याने चित्रित करण्याची त्याने कमाल केली आहे! तथापि पुरुषांपेक्षाही स्त्रीहृदयातील प्रणयाच्या लपंडावाचे त्याला जेवढे आकलन आहे, तेवढे शेक्सपिअरलादेखील नसेल. स्त्रिया प्रेम कशा करतात? कालिदास सांगतो, ‘स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु’ (स्त्रीची कांताजवळी पहिली प्रेमभाषा विलास।) आपल्या प्रियकराला बघण्याची त्यांची इच्छा असते. पण लाजेने वर डोळे उचलवत नाहीत. ‘कुतूहलवानपि निसर्गशालिन: स्त्रीजन:’; तथापि, विनय आणि लज्जामुग्ध अशा भारतीय स्त्रीच्या कोमल श्रृंगाराचे जे अपूर्व सुंदर चित्र ‘शाकुंतल’मध्ये कालिदासाने रेखाटले आहे, त्याला जागतिक वाङ्मयात तुलना नाही. पाहा. ‘वाचं न मिश्रयति यद्यपि मद्ववोभि:। र्कण ददात्यभिमुखं मयि भाषमाणे’- पण मराठीतच त्याचा भावार्थ सांगितलेला बरा. तो राजा दुष्यंत म्हणतो, ‘मी बोलत असताना ती मधेच बोलत नाही. मी काय बोलतो ते ती एकते. ती माझ्याकडे बघत नाही. पण माझ्याखेरीज दुसरीकडेही बघत नाही. ती आपले प्रेम प्रकटही करीत नाही किंवा लपवीतही नाही. पायाला दर्भाकुर रुतला म्हणून ती थांबते आणि हळूच चोरून माझ्याकडे पाहते. काटय़ाला पदर अडकला म्हणून तो सोडवण्याचे निमित्त करून ती थांबते. अन् पुन्हा मला नीट न्याहाळून बघते!’ वाहवा! जगातले सारे प्रेमाचे वाङ्मय एवढय़ा वर्णनावरून ओवाळून टाकावे असे वाटते. आणि गंमत ही की, श्रृंगाराच्या गगनात एवढय़ा उत्तुंग भराऱ्या मारूनही कालिदासाने भारतीय संस्कृतीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत! किंबहुना कन्या, पत्नी आणि माता या तीन उदात्त अवस्थेतच स्त्री-जीवनाचे साफल्य आहे हे दाखविण्यासाठी त्याने ‘अभिज्ञानशाकुंतल’ हे अमर नाटय़ लिहिले. कन्या ही आपली नव्हे. ‘अर्थोहि कन्या परकीय एव।’ पत्नीचे कर्तव्य काय? तर- ‘गृहिणी सचिव: सखीमिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ।’ विवाहित स्त्रीचे एवढे वास्तववादी आणि काव्यमय वर्णन जगात कोणत्या कवीने केले आहे? एवढेच नव्हे तर पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रीने आपल्या पतीबरोबर सतीच गेले पाहिजे. कारण अचेतन निसर्गाचा तोच कायदा आहे. ‘शशिना सह याति कौमुदी। सहमेघेन तडित्प्रलीयते’( चंद्राच्या मागे कौमुदी जाते, मेघाच्या मागे वीज जाते. ) असा ‘सतीचा उदात्त आदर्श’ त्याने ‘कुमारसंभवा’त चितारलेला आहे. सारांश- राजाच्या अंत:पुरापासून तो पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून तो अरण्यातील ऋषींच्या आश्रमापर्यंत कालिदासाच्या प्रतिभेने मोठय़ा विश्वासाने आणि विलासाने संचार केलेला आहे. संस्कृत भाषा ही तर देवांची भाषा आहे! इतकी समृद्ध आणि सुंदर भाषा जगात दुसरी कोणतीही नसेल. पण या देवभाषेचे ‘नंदनवन’ या पृथ्वीतलावर जर साक्षात कोणी निर्माण केले असेल तर ते कालिदासाने! कालिदास हा भारताचा एकमेव सर्वश्रेष्ठ महाकवी समजला जातो. त्याच्यानंतर म्हणूनच नाव घेण्यासारखा दुसरा कवीच सापडत नाही.

‘पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव।।’

एकदा कवींची गणना करताना कालिदासाच्या नावाने करांगुली मोडल्यानंतर अंगठीच्या बोटासाठी त्याच्या तोडीच्या दुसऱ्या कवीचे नाव काही सापडेना. म्हणून  ‘अनामिका’ हे त्याचे नाव सार्थ ठरले. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नाही, की जिच्या वाङ्मयाला कालिदासाच्या शेकडो सुभाषितांनी भूषविले नाही. ‘मरणं प्रकृति: शरीराणाम्।  विकृतिर्जीवितमुच्यते बुधै:’, ‘भिन्नरुचीर्हि लोका:’, ‘एकोहि दोषो गुणसंनिपाते’, ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’, ‘विषमप्यमृतं क्वचित् भवेत्’, ‘निसर्ग फलानुमेय: प्रारंभा:’, ‘शरीरनिपुणा: स्त्रिय:’, ‘परदु:खं शीतलं’, ‘कामी स्वतां पश्यति’, ‘अति स्नेह: पापशंकी’, ‘भवितव्यता खलु बलवती’, ‘नीचैर्गच्छत्युपरि च दशां चक्रनेमिकमेण’.. अशी किती म्हणून सांगायची?

जवळजवळ दोन हजार वर्षे झाली तरी महाकवी कालिदासाचे काव्य आणि नाटय़ काश्मीरातल्या एखाद्या रमणीय सरोवरात उमललेल्या मनोहर कमलाप्रमाणे उन्मादक आणि आल्हाददायक वाटते. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे, त्या त्या सर्वाचा अद्भुतरम्य समन्वय कालिदासाच्या वाङ्मयात झाला आहे. म्हणून वाल्मीकी आणि व्यास यांच्या बरोबरीने कालिदासाचे नाव घेतले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीची तीन विविध स्वरूपे या तीन महाकवींनी प्रकट केली आहेत. भारताचे नैतिक सामर्थ्य ‘रामायणा’त आढळते, तर ‘महाभारता’त भारताच्या बौद्धिक बलाचा परमोत्कर्ष दृष्टीस पडतो. अन् कालिदासाच्या वाङ्मयात भारतीय जीवनातील सौंदर्याच्या विविध विलासांचा देदीप्यमान साक्षात्कार घडतो. म्हणून श्री अरविंद म्हणतात की, वाल्मीकी, व्यास आणि कालिदास यांच्या व्यतिरिक्त भारतामधले सारे वाङ्मय नष्ट झाले तरी भारतीय संस्कृतीची काहीही हानी होणार नाही. हिमालय, गंगा, काश्मीर किंवा अजिंठा यांचे दर्शन ज्यांनी घेतले नाही, त्यांचे भारतीयत्व ज्याप्रमाणे अपूर्ण मानले जाते, त्याप्रमाणे कालिदासाचे ‘मेघदूत’ किंवा ‘शाकुंतल’ ज्याने वाचले नसेल, त्याच्या भारतीयत्वात फार मोठा उणेपणा राहिला आहे असे समजावयाला हरकत नाही. भारतीय जीवनात कालिदासाचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. कारण वाङ्मयाचा अमर सिद्धांत त्याने सांगून ठेवला आहे की, ‘भाषेची पार्वती नि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्यावाचून चिरंतन साहित्य मुळी निर्माणच होत नाही!’  म्हणून त्या पार्वती-परमेश्वरालय कालिदासाच्या काव्यात वंदन करून हे त्याचे स्मरण संपवू.

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।

जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ॥

लेखक : कै. आचार्य अत्रे 

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृतीचा ऱ्हास — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ संस्कृतीचा ऱ्हास — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज राखी पौर्णिमा !भाऊ नी बहिणीचे नाते दृढ करण्याचा दिवस !रेशीम धागा बांधूनही वज्राहून कठीण, बंध तुटता तुटणार नाही असे मनाने मनाशी बद्ध होण्याचा क्षण !! भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाते. हातावर रेशीम रेशमी राखी बांधते ••••आणि औक्षण करून भावासाठी दीर्घायु प्रार्थना करते ••••ही पारंपारिकता••• हे संस्कार •••मन मोहरून येते!! किती आनंद वाटतो हे सांगायला नकोच••••

आपले हे संस्कार  पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे ••• हे पण आपल्यावर झालेले संस्कार ! मग विचार आला ••• हे सगळे आपल्या पिढीपर्यंत ठीक होते ••• पण आजच्या युगात एक अपत्य असणार आहे. मग त्यांना बहिण भावाचे नाते कसे कळणार ?

त्यातल्या त्यात  ही पिढी सुद्धा बरीच म्हणावी लागेल. कारण आपल्याला बहिण-भाऊ असल्याने मुलांना  काका, मामा, मावशी, आत्या, ही नाती आहेत; त्यामुळे चुलत, मामे, मावस, आते बहीण किंवा भाऊ पण आहेत. त्यामुळे आताची ही पिढी  याच बहिण-भावां समवेत रक्षाबंधन करू शकत आहे ; पण पुढे काय? या पिढी नंतरची पिढी ••• म्हणजे या एकुलत्या एक अपत्याला, एकुलते एक अपत्य. मग त्यांना तर काका, मामा, मावशी, आत्या असणारच नाही. पर्यायाने असे बहिण-भाऊ पण असणार नाहीत. मग आपली ही गोड पारंपारिकता, आपली इतकी चांगली संस्कृती, पुढे जाणार कशी?

काळाची हीच पावले ओळखून त्या दृष्टीने आपण काही गोष्टी का अनुसरू नयेत  ? स्वतंत्र भारतापासून आपण नेहमी प्रतिज्ञेत म्हणतो ;सारे भारतीय माझे बांधव आहेत••• मग हे वाक्य फक्त प्रतिज्ञा पुरते न मर्यादित ठेवता ;खुल्या मनाने आपणच काही नाती निर्माण केली पाहिजेत. अलीकडे बऱ्याच जणी जवानांना राखी पाठवून सैनिक हे देशाचे, पर्यायाने आपलेही रक्षण करतात; म्हणून ते भाऊ झाले, या भावनेतून त्यांच्याशी बहिण-भावाचे नाते दृढ करू पाहतात. किती उत्तम उदात्त विचार आहे पण यातून खंत वाटते आपण ज्यांना राखी पाठवतो तो भाऊ कोण आहे हेच आपल्याला कळत नाही जीवन भरात एकदा का होईना पण आपण पाठवलेला  राखी भाऊ आपण पहावे हे येथेच ना मनात पण मग जेव्हा कोणी कोणताही जवान दिसेल तोच आपला भाऊ मानायचे आणि उगीच मनाचे समाधान करून घ्यायचे. यातून खरेच हेतू साध्य होतो का ?जरी हेतू साध्य नसेल होत तरी भावनिक बंध निश्चित निर्माण होतात •••

पण मग यातूनच हा क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, जातीयवाद धर्मवाद सगळे बाजूला सारून, अशी नाती आपणच निर्माण करायला पाहिजेत. असे वाटते. आपण आपल्या आजूबाजूची, परिचयाची, वेगळ्या धर्मातील, वेगळ्या जातीतील, व्यक्तीला बहिण भाऊ मानून, त्यांच्याशी असे नाते प्रस्थापित केले पाहिजे. म्हणजे मग हाच आदर्श आपली पुढची पिढी जे एकुलते एक आहेत ते डोळ्यापुढे ठेवतील.

; आणि नकळत त्यांचे एकटेपण दूर होण्यास मदत होईल. रक्ताच्या नात्या पेक्षा ही मानलेली नाती जास्त महत्त्वाची असतात.

नुसतेच वेगवेगळ्या जाती-धर्माचे बांधव करणे गरजेचे नाही तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांगगृहे येथील काही जणांना अगदी व्रत घेतल्यासारखे तेथे जाऊन हा दिवस साजरा केला ;तर त्यांना सुद्धा आपले कोणी आहे, हा विश्वास, जो त्यांना मिळणे अत्यंत गरजेचे असते ; तो विश्वास ते नाते आपण दृढ केले पाहिजे.

खरंच असे रक्षाबंधन मनापासून प्रसिद्धीसाठी नव्हे जर आपण सुरू केले तर खऱ्या अर्थाने हा आदर्श आपण नव्या पिढीपुढे स्थापन करू शकू ;आणि एवढी गोड परंपरा, एवढी चांगली संस्कृती हिचा र्‍हाद न  होता ती वेगळ्या प्रगल्भ अर्थाने वृद्धिंगत होईल ••••आणि खरोखरच आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनाच म्हणावे वाटेल••••एक सोडून बाकी साऱ्या बंधू-भगिनींनो••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘रक्षाबंधन…’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

‘रक्षाबंधन…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

“मणीबंधावर जरी हे कंकण।

तरी हृदयातील उजळे कणकण।”

आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीची थोरवी किती वर्णावी ? असे म्हटले जाते की परब्रह्माचे वर्णन करता करता वेद ही निःशब्द झाले. आणि तेही “नेति नेति… ” असे म्हणू लागले. हीच गोष्ट आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मास पूर्णपणे लागू होते असे आवर्जून सांगावेसे वाटते.

भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।२।। अशी प्रार्थना माउलींनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. अखिल विश्वातील प्रत्येक घटकामध्ये नुसते सामंजस्य नव्हे तर ”मैत्र भाव असावा” असे म्हटले आहे. ‘मैत्री’ आणि ‘मैत्र’ यामध्येही मूलभूत फरक आहे. इथे जन्मणाऱ्या प्रत्येक जीवास मैत्र लाभावे आणि त्याचे जीवन उजळून निघावे यापेक्षा उदात्त भावना कोणती असू शकेल ? 

लग्नात भावाच्या खांद्यावरील शेला वहिनीच्या शालीला बांधणारी ताई/बहीण, ‘गृह’ प्रवेशाच्यावेळी ‘मला तुझी मुलगी सून म्हणून दे’ असे मायेच्या हक्काने मागणारी बहीण आज न्यायालयात कमीअधिक प्रमाणात इस्टेटीसाठी भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे…! आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना आपण पहात असू.

याउलट, बालपणी कौतुक करणारा, वाढदिवसाला कॅडबरी आणणारा, स्वतःच्या खिश्याला  कात्री लावून बहिणीला पैसे देणारा भाऊ बहिणीकडे भाऊबीजेसाठी जाताना दिसत आहे असे म्हणता येत नाही…

… तो व्हाटसपप वर शुभेच्छा देऊन आणि एक दोन स्मायली टाकून आपले कर्म उरकताना दिसत आहे…

सध्या भाऊ बहिबहिणीच्या या पवित्र नात्यातील अकृत्रिम स्नेह संपून त्यात अनामिक कृत्रिमता आली आहे की काय ?  असे वाटावे अशी स्थिती आहे…

*द्रौपदी- श्रीकृष्ण’ यासारखे शुद्ध नाते सध्या फक्त पुस्तकात राहिले आहे का ? असे नाते संबंध ज्या भारतात उदयास आले तिथे आज अशी परिस्थिती असावी ? याचा विचार प्रत्येक बहीण भावाने अवश्य करावा…

आज हे सर्व लिहिताना माझ्या मनात लेखक म्हणून, एक भाऊ म्हणून संमिश्र भावनांचे ‘कल्लोळ’ आहेत, कदाचित आपल्या मनातही तसेच असेल…. ! एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली भावंडे मोठी झाल्यावर इतकी का बदलत असातील ? नात्यात तूट येते की मनात फूट पडते ?  नात्यातली अकृत्रिम स्नेहाची भावना जाऊन त्यात कोरडा व्यवहार का यावा?  आणि तो नक्की कधीपासून लागला ? 

शिक्षण वाढलं म्हणून की? खिशात पैसा वाढला म्हणून? अंगावरील वस्त्रे बदलली म्हणून की घरातील सुब्बता वाढली म्हणून ?

सर्व भाऊबहिणींनी याचा शांतपणे विचार करावा, खिशात काही नसताना, घरात काहीही नसताना, माझी भावंडं माझ्या सोबत आहेत, हेच  आनंदी राहण्यासाठी पुरेसे असे…. ! शाळेत घडलेली एखादी  घटना/ गंमत कधी एकदा आपल्या भावंडांना सांगतो आहे असे होत असे…. ! आज तसे पुन्हा व्हावे असे प्रत्येकाला वाटतं असेल, हो ना? मग चांगल्या गोष्टीत आपणच पुढे व्हायला हवे… ! आपण आनंद निर्माण करावा आणि तो सर्वांना मुक्तहस्ते वाटावा हे सर्वात चांगले आणि सर्वांच्या हिताचे….

रक्षाबंधनाच्या शुभदिनी आपण असा प्रयत्न करून पाहू. आपण सर्वांनी ठरविले तर समाजामध्ये काही दिवसांत याचे आशादायक आणि उबदार चित्र दिसू लागेल.

आज सर्व जण आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतील, तिला आपापल्या ऐपतीनुसार भेटवस्तू देतील/घेतील. मनात प्रश्न निर्माण होतो की ज्या देशात अशा उदात्त संकल्पनांचा जन्म झाला, त्यांचे संवर्धन झाले आणि त्याच देशात स्त्रियांवर अनेक प्रकारचे अत्याचार व्हावेत! यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे बंध तो दिवस साजरा करून संपला की जीर्ण होतात की नष्ट होतात?  आपण फक्त सोहळे साजरे करतोय का? नक्की यामागे काय कारण असू शकेल? आपण सर्वांनी ‘समाज’ म्हणून यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

चिंतन करताना असे ही लक्षात आले की आपण फक्त आपल्या मुलांना एकमेकांना राखी बांधण्यास सांगितली, पण त्यामागील विशाल आणि उदात्त दृष्टिकोन, थोडक्यात त्यामागचे ‘मर्म’ समजावून सांगण्यात आणि त्याप्रमाणे आचरण करण्यात आपण समाज म्हणून थिटे पडलो असेच खेदाने म्हणावेसे वाटते. आजची परिस्थिती पहाता ‘पारंपरिक’ पद्धतीने हा सण साजरा करून चालणार नाही. आज प्रत्येकाने एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आपल्याकडे व्यापक अर्थाने सांगितले जाते.

“धर्मो रक्षति रक्षित:।”

आज आपण ना धड शुद्ध मराठीत बोलू शकत ना हिंदीत ना इंग्रजीत. आपण तीनही भाषांची मिसळ करुन एक वेगळीच भाषा निर्माण केली आहे असे दिसते. “जशी भाषा तशी संस्कृती”. त्यामुळे आपल्या संस्कृतीचाही ऱ्हास होत आहे. पाश्चात्यांचे अनेक सण आपण आज ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणून आनंदाने साजरे करतो. पण आपले  जे सण (सर्वच सण!!) खऱ्या अर्थाने वैश्विक जाणीव निर्माण करणारे आहेत त्या सणांचा प्रसार आणि प्रचार आपण जगभर का करू शकलो नाही. आपण त्याचा विचार केला नाही की आपल्याला त्याची जाणीवच झाली नाही ? या सर्व गोष्टींचे चिंतन आपण सर्वांनी आजच्या मंगलदिनी करावे अशी माझी नम्र विनंती आहे. आपण सर्व सुजाण वाचक आहात, त्यामुळे माझ्या विनंतीचा आपण उचित आदर कराल, असा विश्वास वाटतो.

देशावर आज अनेक संकटे आहेत, अनेक समस्या आहेत. या सर्व प्रश्नांचे बिरबलाच्या कथेप्रमाणे एकच उत्तर आहे ते म्हणजे ‘हिंदू’ संघटन!! ( हिंदू म्हणजे तो फक्त जन्मांने हिंदू नव्हे तर या देशाला, भारतमातेला आपली आई मानणारा कोणीही असेल, त्याची उपासना पद्धती कोणतीही असेल ). आपण सर्वांनी त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरे करू. या पवित्र दिनी मी माझ्या भारत मातेसाठी काय करू शकतो, याचा विचार आपण करू. एका गीताने लेखाचा समारोप करतो.

करी बांधु या पवित्र कंकण॥ धृ॥

इतिहासाच्या पानोपानी पुर्व दिव्य ते बसले लपुनी।

रम्य भविष्याची त्यामधुनी भव्य मंदिर पुनश्च उभवुन॥१॥*

*

निजरुधिराची अर्घ्ये अर्पुन ज्यांनी केले स्वराष्ट्रपूजन।

कॄतज्ञतेने तयांस वंदुन कर्तव्याचे करु जागरण॥२॥

*

स्वार्थाचे ओलांडुन कुंपण व्यक्तित्वाचा कोषहि फोडुन।

विसरुन अवघे अपुले मीपण विराट साक्षात्कार जागवुन॥३॥

*

जो ‘हिंदू’ तो अवघा माझा घोष एक हा फिरुन गर्जा।

मुक्तिमार्ग हा एकच समजा अन् सर्वाना द्या समजावुन॥४॥*

*

भारतमाता की जय 🇮🇳

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares