मराठी साहित्य – विविधा ☆ म्हण बदलायची वेळ आली ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🌧️ म्हण बदलायची वेळ आली ? 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे !  या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण, म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !

हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी.  त्यामुळे होत काय, खराखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !

मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का !  सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी परत एकदा कांद्या भज्या बरोबर आल्याच्या चहाचा घोट घेतला आणि भरून पावलो !

© प्रमोद वामन वर्तक

०७-०७-२०२४

ताजा कलम-  कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत, कारण हा निसर्गकोप नक्कीच नाही !

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? विविधा ?

☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

रविवारची सकाळ. उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खरं म्हणजे धाक कसला, धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.

अगदी बालपणापासून, नंतर सासरी आल्यावर देखील, घरात आई-बाबांचे छत्र होतेच. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता. सकाळी सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून  शिस्तीत जगण्याचा, एक संस्कार मनावर पक्का झाला होता.

त्यावेळी त्या शिस्तीचा खरंतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे, व्यवस्थित वस्तू आवरणे, वस्तू जागेवर ठेवणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. …आता असं वाटतं आमच्या आई-बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला, पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं.

हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.

हळूहळू आई-मुले, वडील-मुले, सासू-सून, सासरे-सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता असं अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला.

पूर्वी आई-वडील म्हणायचे, “वळण नसेल तर सासरी गेल्यावर जड जाईल. आत्ताच शिका सगळे”. आता आई वडील म्हणतात, “जाऊदे, लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर, तेंव्हा राहूदे थोडे मोकळे.”

पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे, “तुम्ही नीट तर पुढची पिढी नीट.” आणि आताचे सासू- सासरे म्हणतात “कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना”, आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला.

आता आपण, म्हणजे आमची पिढी नकळतपणे आपल्याच मुलांना, मुलींना व्यवस्थितपणा नाही, टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते असं नाही, आई देखील मुलीच्या या बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल नं?

आता असं वाटतं, घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध, आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना, मुलींना, सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगतांना, मुलांना काय वाटेल, सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.

आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली, मुले, सूना यांना वळण लावत नाही, संस्कार करत नाही असे नाही, पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार, शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी, ‘आपल्याला झेपतेय नं काम, मग सारखे मुलांना बोलून ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे आणि मोकळे व्हायचे’. सुनेला, मुलांना, मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे. गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचा. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने, असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.

मला असं वाटतं, म्हंटल तर प्रॉब्लेम, म्हंटल तर ‘सध्या सगळीकडे असेच चालते’ म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग! ‘बोलू का नको? सांगू का नको?’

मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा मुलगी) दोघेही जर व्यसने, स्वैराचार, याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे.

सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते. कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. नवी पिढी, नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष, नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.

घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे. चारित्र्य, व्यसने, पार्ट्या, कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल सांगू कशी तुला मी?’ या परकेपणातून, संकोचातुन, भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.

मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल, विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक  चुकीची गोष्ट थंडपणे पहाणे हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे.

ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता, त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची मुलगी समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे, न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून परकेपणाच आहे असं समजायला हरकत नाही.

संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो, दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे, पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा’

खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे, समंजस आहे, कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते.

केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, आजी-आजोबा या सगळ्यांनीच ‘सांगु कशी तुला मी ?’ या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी गरज आहे.

आजचा हा लेख श्री. उदय मोडक, धारवाड, कर्नाटक यांच्या सौजन्याने.

लेखक : डॉ. शमा देशपांडे

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चंदू चॅम्पियन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ चंदू चॅम्पियन ☆ सौ कल्याणी केळकर बापट

प्रत्येक दिवशी सूर्य एकाच दिशेला आणि साधारण सकाळीं त्याचं वेळेला उगवतो तरीही गंमत बघा प्रत्येक दिवस हा रोज अगदीं निराळाच असतो. कधी खूप आशा एकवटल्या असताना हवे तसे मनासारखे घडत नाही आणि कित्येकदा ध्यानीमनी नसताना परमेश्वराने लीला केल्यागत खूप काही आपल्या कल्पनेपेक्षाही आपल्या पदरात घालतो की आपली ओंजळ भरगच्च भरते.

मागील सोमवार असाच माझ्यासाठी  काहीही कल्पना नसतांना खूप काही देणारा असा उजाडला. अमरावतीला मनापासुन तळमळीने समाजासाठी  भरघोस काम करणारे सुप्रसिद्ध गोविंद काका कासट आणि सुदर्शनजी गांग ह्यांनी भरीव प्रेरणा मिळवून देणारा “चंदू चॅम्पियन” ह्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन सरोज टॉकीज मधे केले होते. त्या चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठीच्या निमंत्रक यादीत माझे नाव असल्याने मला एक सुखद धक्का दिला. आणि त्यामुळेच मी एक खूप जास्त सकारात्मक आणि शब्दात वर्णन करता येणार नाही असा सुंदर चित्रपट बघण्याचे भाग्य मला लाभले. आता ह्या चित्रपटाविषयी माझ्या शब्दात.

त्यासाठी आधी आपल्याला हे मुरलीधर पेटकर कोण, त्यांचे कार्य काय हे जाणून घ्यावे लागेल.  मुरलीकांत पेटकर हे स्वतः एक अत्यंत विलक्षण जीवन जगले आहेत. पेटकर म्हणजे एक नम्र , अत्यंत  प्रामाणिक, आणि समर्पित जीवन जगणार अफलातून व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. त्यांनी  कठोर परिश्रमाने विलक्षण सिद्धी प्राप्त केली.

त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1944 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथील पेठ इस्लामपूर भागात झाला. त्यांनी भारतीय सैन्यात कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) मध्ये जवान म्हणून काम केले.  सिकंदराबादमध्ये असताना त्यांनी बॉक्सर म्हणून लढा दिला. १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात नऊ गोळ्या लागल्याने पेटकर अपंग झाले होते. त्याच्या दुखापती बऱ्या झाल्यावर त्यानी हार न मानण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा पोहणे आणि इतर खेळांमध्ये भाग घेऊ लागले.

अखेरीस, त्यांनी भारताला पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. पेटकरांनी 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा जिंकून 37.33 सेकंदाचा नवा विश्वविक्रम केला. फक्त पोहणेच नाही तर स्लॅलम, भालाफेक आणि अचूक भालाफेक यातही ते निपुण होते.

चंदू चॅम्पियन हा बायोपिक भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे.  “मुरलीकांत पेटकर यांची कथा ही मुक्त भारताची कथा आहे”, ट्रेलरमध्ये म्हटले आहे. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, मुरलीचा प्रवास देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रतिबिंबित करतो, कारण तो निर्धाराने महानता मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात करतो. 

1965 च्या भारत-पाक युद्धात नऊ गोळ्या लागल्याने मुरलीकांत पेटकर ऑलिम्पिक मेडल च्या ध्यासाने  पोहण्याकडे वळले. मूलतः भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र आणि सेवा शाखेतील बॉक्सर, त्याने इतर खेळांमध्येही प्रावीण्य मिळवले, 1968 पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक स्लॅलममध्ये अंतिम फेरी गाठली, चार वर्षांनंतर (1972, जर्मनी गेम्स) पोहण्यात सुवर्णपदक मिळवण्याआधी.  

त्याच्या नावावर ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा विश्वविक्रम आहे. त्यांच्या कामगिरीच्या 46 वर्षांनंतर भारताने 2018 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्याच्या जिद्द आणि कर्तृत्वामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने खास अपंग खेळाडूंवरील पुस्तकात पेटकरचा उल्लेख करण्यास प्रवृत्त केले.

सुशांत सिंग राजपूतचा एमएस धोनी, फरहान अख्तरचा भाग मिल्खा भाग आणि विनीत कुमार सिंगचा मुक्काबाज यांसारख्या चित्रपटांची आठवण हा चित्रपट बघताना होते. खुप दिवसांनी टॉकीज मधे बघितलेला अतिशय चांगला सिनेमा खुप काही शिकवून कायम आठवणीत राहील.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

अल्प परिचय

शिक्षण – MSc, MA, B.Ed (English literature).

मूळअमरावती. पुण्यात स्थायिक.

English मध्ये 50च्या वर कविता व short philosophical write ups लिहिल्यानंतर Divine Meet नावाचे booklet प्रकाशित झाले.

मराठीत पण कविता, ललित, चारोळ्या व निवडक दासबोध निरूपण असे अमृतकण नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

🌳 विविधा 🌳

☆ ✍️सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सहजता म्हणजे नैसर्गिकता..

म्हणजेच कृत्रिमतेच्या विरुद्ध…

साधा सरळ विचार व आचार. काहीही मनात आले, येऊ द्यावे शांतपणे विचार करत करत कोणतीही कृती न करता विचारांना निघून जाऊ द्यावे. त्याची जागा दुसर्याने घेतली तरीही हाच प्रकार चालू ठेवावा.

काही दिवस असे केले की कोणत्याही विचारांकडे तटस्थपणे पहाणे जमते. काहीही विशेष परिणाम दिसत नाहीत व मग जी कृती केली जाते ती अतिशय संयमाने विचारपूर्वक घडते. परिणाम काहीही असोत, सध्याच समाधान मिळते कारण सहजता येते. कोणताच व कशाचाच अट्टाहास त्यात नसतो. म्हणून जे व जसे घडत जाते त्याकडे विवेकाने पहाण्याची दृष्टी मिळते व कृतीत साहजिकच आनंद मिळतो.

समाधान हे नेहमी अपूर्णतेतच असते हे निश्चित मानावे.

मोठे ध्येय ठरवण्यापेक्षा छोटे काहीतरी निश्चित करावे, ते करत असतानाच जर समाधान मिळाले तर पुढे ठरवलेले पूर्ण होईलच त्याचबरोबर आताचा वेळ सत्कारणी लागेल. क्षणाक्षणाचा आनंद मिळेल.

एखादा चांगला लेख video वाचनात आला की त्याचा त्याच क्षणी आनंद घ्यावा याचा लेखक कोण, त्यांचे इतर लेख कोणते वगैरे नी पाठपुरावा करत बसले तर कदाचित त्यांचे सगळेच साहित्य आवडेल असे नाही, उलट वेळ वाया जाऊ शकतो. एकाचेच एककल्ली वाचन, श्रवण करण्यापेक्षा विविध प्रकार हाताळावेत म्हणजे तो motto टिकून रहातो व जे हवंय, रुचतंय तेच मिळत जातं. तसंही सत्य एकच असतं, ते कोणी कसंही मांडू देत. यात स्वत: चीच आवड जपली जाते व अट्टाहासाचा त्रागा वाचतो.

आताचा आनंद‌ उद्यावर किंवा इतर कुठे कसा असेल? हे उमगले की शांतता येते. हे लिहिणे सुध्दा कोणताही कशाचाही जोर नाही. जे जे जसे असेल ते तसे तसे मनापासून स्वीकारणे‌ हा साधा सरळ योग आहे.

तुलना, अपेक्षा, मोठमोठी स्वप्ने आपले आताचे आयुष्य बिघडवत असतील तर ते पूर्ण झाले तरी काय उपयोग?

पूजा हा ध्यानाचा सगळ्यात मोठा राजमार्ग!!! पण तिथेही हेच, असेच, ह्यानेच, त्यानेच, हा देव तोच देव, ही उपासना ती उपासना मग मन भरकटते व पूजा फळत नाही. एक श्लोक भगवंताकडे बघत आनंदाश्रूसकट म्हंटल्या गेला व कृतज्ञता जाणवली की झाली पूजा!!!

इतकं साधं सरळ असताना नको त्या उपचारात अडकणे म्हणजे कृत्रिमताच.

आईवर निबंध लिहून, तिला भारी भेटवस्तू देण्यापेक्षा “आई” ही “कृतज्ञ हाक” तिला गहिवरून टाकणार नाही का?  देवाचेही अगदी तसेच आहे.

तो आपल्या आतच असल्यामुळे सगळे जाणतो व अनैसर्गिक जे आहे ते तो‌ ओळखतो सुध्दा!! हेच सत्य आहे.

आपणच आपले खूष रहायचे तर तो‌ आतील परमात्मा मनापासून प्रेम करतो व त्याच्यासारखा सतत आनंदी रहाण्याचा आशिर्वाद देतो.

आनंद ही आत्मवस्तू आहे, ती इतरांवर अवलंबून कशी असेल?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे देवा… ☆ सुश्री मंजुषा सु. आफळे ☆

सौ.मंजुषा सु. आफळे

🌳 विविधा 🌳

☆ हे देवा… ☆ सुश्री मंजुषा सु. आफळे  ☆

हे देवा.

शि.सा.न.वि वी.🙏

खरे तर,पत्र लिहिण्याचा अट्टाहास नकोच आहे. कारण आपण तर सतत एकमेकांच्या जवळच असतो.त्यामुळे माझ्या आत काय खळबळ उडाली आहे ते तू जाणतो आहेस.तूच माझा सखा सोबती आहेस.

पण कधी कधी वाटतं तू मला एकटीला चालायला यावं म्हणून मध्येच थोडावेळ हात सोडतोस की काय…कारण मग मला एकटे पण जाणवत,..आणखी मग लहान मुलांसारखे गांगरून जायला होतं..

मी एखादी गोष्ट बरोबर करते आहे ना? तुला ते आवडेल का? अश्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी पडते.

देवा,तू सर्व मानवाला चांगल्या गोष्टी दिल्या आहेस.

पण वेळेवर कधी सापडत नाहीत.आता,मला मान्य आहे की ही आमचीच चूक आहे. तरी पण हे देवा, तुझ्या समोर जी आमच्या जीवनात उलथापालथ होते आहे.तेव्हा मात्र गडबडायला होतं.आणी मग तुझ्या शिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे,. बरं

तेव्हा तू नेहमीच आमच्या हृदयात राहा.आत्माराम,जो एक चैतन्य पुरुष आहे. तो जागता पहारा देत आहे याची सतत जाणीव होऊ दे.त्यासाठी चांगली बुध्दी दे.व

आम्हाला सतत तुझ्या सेवेची आठवण येऊ दे.आणी जे रोज काहीतरी आम्ही चुकतो ते तू माफ करशील ना.. बसं बाकी काहीच मागणार नाही.

जीवन सार्थकी लावायचे आहे.त्यासाठी मार्गदर्शन हवं आहे.तुच कर्ता आणि करविता आहेस.त्यामुळे आमच्या साठी जे चांगले आहे.तेच तू देणार ही खात्री आहे. त्यासाठी फक्त तू सोबत राहा. एवढीच इच्छा आहे.. बाकी,तुझी आठवण झाली नाही, असा एकही दिवस नसावा…हिच अपेक्षा..

आता,हे पत्र लिहून घेणार पण तूच आहेस.कोटी कोटी रूपांत असणार्या रोज वेगवेगळ्या घटनां मधून विश्व रुप दर्शन देणार्या

तुला माझे कोटी कोटी प्रणाम.🙏

सर्वांना सुखी ठेवावे.हेच मागणे तुझीया चरणी..🙏

तुझीच,.. सौ. मंजुषा.

© सुश्री मंजुषा सु. आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आरोग्यम् धनसंपदा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ आरोग्यम् धनसंपदा” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

लवकर निजे, लवकर उठे

त्यासी आरोग्य संपदा लाभे

सूर्योदयापूर्वी का उठावे? असा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडतो. याचे उत्तर रात्री झोपल्याने शरीराचे चलनवलन थांबते व शरीरात आमवात निर्माण होतो. आमवातामुळे शरीरात जडत्व (सुस्ती) येऊन उष्णता वाढते. सूर्योदयापूर्वी आपल्या भोवतालचे वातावरण संतुलीत असते. सूर्योदयापूर्वी आपण जर उठलो तर शरीराच्या चलनवलनाने शरीरात निर्माण झालेला आमवात व त्यामुळे आलेले जडत्व, उष्णता नाहीशी होऊन आपण दिवसभर आनंदी व उत्साही राहून कमी वेळात जास्त काम करून प्रगती करू शकतो. परंतु जर आपण सूर्योदयानंतर जागे झालो तर सूर्यकिरणामुळे वातावरणात निर्माण झालेली उष्णता यांच्या संयोगामुळे आपल्या शरीरातील तापमान वाढत जाऊन आपल्या शरीरात दिवसभर आळस व अस्वस्थता राहिल्याने काम करण्यात उत्साह राहत नाही. त्यामुळे होणारे सर्व परिणाम भोगावे लागतात. म्हणून सूर्योदयापूर्वी उठावे तेव्हा आरोग्य संपदा लाभते.

समाधानी जीवनासाठी स्वस्थ शरीर ही प्राथमिक गरज आहे.

शरीर व मन हे दोन्हीही निरोगी असणे जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर आरोग्य संपन्न राहण्यासाठी व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार यांची अत्यंत गरज आहे. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन राहते. बल हे दोघांचेही गमक आहे. म्हणूनच बलसंवर्धन हे सुखाचे आगर आहे. बलाची उपासना हे जीवनाचे सूत्र आयुष्याचा मंत्र आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा त्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी बलभीमाच्या उपासनेची गोडी समाजाला लावली.

लुळ्या, पांगळ्या श्रीमंतीपेक्षा

धट्टी – कट्टी गरिबी चांगली.

उत्तम प्रकृती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. लुळ्या – पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी-कट्टी गरिबी चांगली. कांदा, भाकर खाऊन सुखाने जमिनीवर झोपणारा माणूस गाद्या-गिरद्यांवर लोळणाऱ्या, शारिरीक वेदनेने तडफडणाऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ असतो. प्रकृती स्वास्थ्यासाठी व्यायाम, संयम, योग्य सवयी, व्यसनांपासून अलिप्तता, उत्तम पचनशक्ती त्याचप्रमाणे शांत चित्तवृत्ती, हास्य, विनोद प्रवृत्ती अशी शरीर व मन दोन्ही सुखी करणाऱ्या गोष्टी माणसाने जोपासल्या पाहिजेत.

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।

स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शरीर प्रकृती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. आपले शरीर हे एक अनमोल स्वयंचलित यंत्र आहे. त्याची निगा राखणे, ते सुस्थितीत ठेवणे जमले की जीवन प्रवास सुखाचा होतो. सुंदर शरीराची योग्य ती काळजी घेतली नाही तर रोगरुपी शत्रू त्याच्यावर हल्ला करतात. शरीर निरोगी असेल तरच जगण्यातला आनंद लुटता येतो. युक्त आहार, विहार, व्यायाम यांच्या द्वारा आरोग्य राखले पाहिजे कारण चांगले आरोग्य हा सुखी व समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे.

मर्यादित संतती, पुरेशी संपत्ती, उत्तम संगती, चांगली शरीर प्रकृती व देवाची भक्ती हे सुखी जीवनाचे ‘पंचशील’ आहेत.

आरोग्य हीच संपत्ती होय. रोज फक्त पंधरा मिनिट व्यायाम केला तरी तो आपल्या आयुरारोग्यासाठी पुरेसा ठरतो आणि संजीवक ठरतो. व्यायाम म्हणजे शरीरांतर्गत शक्तींचे जागरण व प्रकटीकरण होय.

आरोग्यासाठी व्यायामाची वाट वहिवाटलीच पाहिजे. व्यायाम हे एक आन्हिक आहे. तो एक आचारधर्म आहे. शरीराच्या रक्षणासाठी ती एक साधनप्रणाली आहे. अंगातील चैतन्य व प्रतिकारशक्ती व्यायामाच्या अभावी लोक पावते. व्यायाम म्हणजे शरीरांतर्गत शक्तीचे जागरण व प्रकटीकरण होय. शरीर हे जीवनाचे, परमार्थाचे व सर्व इंद्रियाचे जणू ते एक सुरेल संगीत आहे. व्यायामात शरीर कष्टवायाचे नसते तर ते कार्यप्रवण करावयाचे असते. अनेक दु:खे केवळ व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात.

योग्य आहार

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।

सहज हवन होते नाम घेता फुकांचे।

जीवन करी जीवित व अन्न हे पूर्णब्रह्म।

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।

असेल आहार योग्य तरच लाभेल आरोग्य जसे खावे अन्न तसे बनते मन आहार चौरस किंवा समतोल असावा. त्यात प्रथिने, जीवनसत्वे, कर्बोदके, क्षार, खनिजे, शर्करा, स्निग्ध व पिष्टमय पदार्थ, कोंडा किंवा चोथा असणारे पदार्थ यांचा समावेश हवा. सात्विक आचार व विचार यासाठी हवा सात्विक मिताहार. वेगाने अनारोग्याकडे नेते ते म्हणजे फास्टफूड. आपण नको त्या गोष्टी, नको त्यावेळी, नको तितक्या प्रमाणात खात असतो. आहार, मनःशांती व आनंद हे तीन सर्वोत्कृष्ट धन्वंतरी आहेत जे जिभेला रूचते ते पोटाला पचेलच असे नाही. निरोगी राहण्यासाठी पोट नरम, पाय गरम व मस्तक थंड असावे. सर्व रोगांचे मूळ चुकिच्या आहारात व त्यामुळे उद्भवणाऱ्या अपचनात असते. शाकाहार, फलाहार, रसाहार, दुग्धाहार वाढवावा. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ याचे स्मरण ठेवावे.

शरीर एक वरदान

या जगात जिचे सर्वात कौतुक वाटावयास हवे अशी एकमेव गोष्ट म्हणजे आपले शरीर. जीवनातून शरीर वगळले तर मागे उरेल ते शून्य. आपल्या अवघ्या अस्तित्वाचे सार म्हणजे आपले शरीर. देहाला नऊ द्वारे आहेत द्वारे म्हणजे इंद्रिय चार कर्मेंद्रिये, चार ज्ञानेन्द्रिये, वाक् व रसना उरली त्यांचे इंद्रिय एकच म्हणून इंद्रिये नऊ. मानवी शरीर हे माणसाला मिळालेले एक उत्कृष्ट वरदान आहे. पंचमहाभूते, पंचप्राण. पंचज्ञानेन्द्रिये,पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिये,स्मरणशक्ती, विचारशक्ती या देणग्यांनी युक्त असे हे शरीर म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. ह्या देणग्यांचा योग्य तो उपयोग केल्यास ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था होते.

सर्व काही अलबेल असलेल्या शरीराला व जीवनाला वाढत्या वयाची घसरगुंडी थांबविता येत नाही. जीवनाच्या अस्ताकडे घेऊन जाणारा हा प्रवास साठी, सत्तरीनंतर अनेकांना एकाकीपणाने करावा लागतो. व्याधी विकार सतावू लागतात. सुहृदांचा वियोग होतो. मुख्य म्हणजे आपण ‘कालबाह्य’ तर होत नाही ना ही भीती मनात घर करू लागते. वृद्धापकाळातही मनुष्याने समतोल आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी प्राशन यांच्या मदतीने आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहार, विहार, व्यवहार, आचार, विचार यात बदल करून निरोगी तन मनाची साथ ठेवल्यास समाधान प्राप्ती झालीच म्हणून समजा.

Physical Well-being is an essential part of human Well – being.

जवळ जवळ ७०% आजार मानसिक तणावामुळे येतात. म्हणजे ते मनोकायिक (Psy-chosomatic) असतात. त्यांचे निर्माते आपणच असतो.

अनेक शारीरिक विकारांच्या उदा: रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, दमा, पोटातील अल्सर इत्यादींच्या मुळाशी मनाची असमाधानी प्रवृत्ती असते. ती जितकी मनावर अवलंबून असते तितकीच शरीरावर अवलंबून असते. स्वस्त शरीरातच स्वस्त मन राहते.

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, “आधी फुटबॉल खेळा मगच भगवद्गीता वाचायला घ्या!खेळाने शरीर स्वस्थ राहते व स्वस्थ शरीरामध्येच मनाची एकाग्रता लाभते.”

ज्याला व्यायामाकरिता

वेळ मिळत नाही,

त्याला आजारपणाकरिता

मोठी सवड काढावी लागते.

शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणतेही कार्य करण्याची क्षमता आणि शारीरिक सक्षमता व्यायामाने, आहाराने, योगासनाने, प्राणायामाने, दीर्घश्वसनाने वाढत असते. विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी बुद्धिबळाचा बादशहा बॉबी फिशर शारीरिक क्षमतेसाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी धावण्याचा व पोहण्याचा सराव करीत असे. एक जुनी म्हण आहे की ज्याला व्यायामाकरिता वेळ मिळत नाही त्याला आजारपणाकरिता मोठी सवड काढावी लागते.आपले शरीर हे सर्व दृष्टीने कार्यक्षम बनले पाहिजे आणि मगच आपण म्हणू शकू आरोग्यम् धनसंपदा!!

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- दारावरची बेल वाजवताच आमचीच वाट पहात असल्यासारखं दार तत्परतेने उघडलं गेलं. निरंजन साठेनी माझी नेमकी अडचण समजून घेतली आणि मोजक्या शब्दात वस्तुस्थितीची कल्पनाही मला दिली.ते म्हणाले,

“युनियन बँकेच्या ‘मेहता चेंबर्स’ मधील ‘रेक्रूटमेंट सेल’ मधे गेल्या आठवड्यापासून रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे. डॉ. विष्णू कर्डक तिथे सुपरिंटेंडेंट आहेत. दोन महिन्यांपूर्वी माझा इंटरव्ह्यूही त्यांनीच घेतला होता. त्यानंतर आमची भेट नाहीय, पण ते बहुतेक मला ओळखतील. आपण त्यांना सांगू सगळं. टेस्टप्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल, एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल.माझं डिपार्टमेंट त्याच कॅम्पसमधील ‘मेहता महल’ मधे आहे.हे माझं कार्ड.तू सोमवारी बरोबर सकाळी दहा वाजता माझ्या केबिनमधे ये. आपण भेटू डाॅ.कर्डकना. बघू काय होतं ते.”

निरंजन साठेंच्या घरून निघालो तेव्हा इतका वेळ मनात भरून राहिलेल्या अंधारात प्रयत्नांची दिशा दाखवणारा आशेचा अंधुक का होईना एक किरण मला दिसू लागला.)

साठे कुटुंबीयांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती.

‘उद्याची सकाळ प्रसन्न प्रकाश घेऊन येईल की हा रात्रीचा काळोख सरलेलाच नसेल?’ या संभ्रमात रात्री उशिरा अंथरुणाला पाठ टेकली खरी,पण स्वस्थ झोप नव्हतीच.

जागरणाचा शीण आणि विचारांचं दडपण घेऊन मी चर्नीरोडला लोकलमधून उतरलो.वेळ गाठायची निकड होती, त्यामुळे घरून थोडंफार कसंबसं खाऊन निघालो होतो पण भूक भागलेली नव्हतीच. त्यामुळेच असेल, हाकेच्या अंतरावरचा ‘मेहता महाल’ मला मैलोन् मैल दूर असल्यासारखा वाटत राहिला.

या कुठल्याच उलाढालींची कल्पना घरी आई-बाबा कुणालाही नव्हतीच. त्यांना दिलासा देणारं यातून कांही चांगलं निष्पन्न झालं तरच मला आनंद वाटणार होता. मग त्यासाठी टेस्ट-इंटरव्यू वगैरे सोपस्कारांमधून बाहेर पडायला कितीही दिवस लागले तरी वाट पहायची माझी तयारी होती. ही कोंडी एकदाची फुटावी,अंधार सरावा, नवी प्रकाशवाट दिसावी एवढंच उत्कटतेनं वाटत होतं.पण आश्चर्य म्हणजे त्यासाठी थांबावं लागलंच नाही! वाट पहायची वेळ आलीच नाही. कारण पुढची पंधरा-वीस मिनिटं असा काही झंझावात घेऊन आली की मन उत्साहानं भरूनच गेलं एकदम.

मी ‘मेहता महल’ च्या लिफ्टपाशी जाऊन थांबलो तेवढ्यात मला निरंजन साठे लगबगीने लिफ्टच्या दिशेनेच येताना दिसले. मी तत्परतेने पुढे होऊन त्यांना ‘विश’ केलं.ते हसले. त्यांनी हातातल्या घड्याळात पाहिलं.

“शार्प टेन. गुड. बरं झालं इथेच भेटलो आपण. चल लगेच. डॉ.कर्डकना आधी भेटू. बघू काय म्हणतात ते.”

डॉ. कर्डकांनी आमचं हसतमुखाने स्वागत केलं.

“येस मि.साठे, हाऊ आर यू?”

” फाईन सर. थँक्यू.व्हेरी बिझी?”

” ऑफ कोर्स…,बट नाॅट फाॅर यू..बोला.”

“याचे एक छोटेसे काम आहे तुमच्याकडे.म्हणून मुद्दाम याला घेऊन आलोय.”बोलता बोलता माझ्याकडून कॉल लेटर घेऊन ते निरंजननी त्यांच्यापुढे केलं. नेमका प्रॉब्लेम त्यांना समजावून सांगितला.

“माय गुडनेस..आज शेवटचा दिवस आहे रिटन-टेस्ट प्रोसेसचा. आताच आलात फार बरं झालं. जस्ट अ मिनिट. मी बघतो काय करता येईल ते. बसा.आलोच.”

माझं कॉल लेटर सोबत घेऊन ते झरकन् उठले. केबिन बाहेर गेले .ते परत येईपर्यंतच्या क्षणात एक प्रकारची निश्चिंतता माझ्या मनात पाझरत राहिलेली होती. डाॅ.कर्डक यांचं व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांचा अॅप्रोचही उत्साहवर्धक होता.

डाॅ.कर्डक हे सायकॉलॉजी घेऊन एम्. ए. झाले होते अन् मग त्यातच डॉक्टरेट! तेही खास रेक्रूटमेंट इन्चार्ज म्हणून नुकतेच रुजू झाले होते. एन.आय.बी.एम च्या मार्गदर्शनाखाली ‘अॅप्टीट्यूड टेस्ट’ च्या माध्यमातून ‘फास्टट्रॅक रेक्रूटमेंट प्रोसेसची राष्ट्रीयकृत बँकांमधली ही सुरुवात होती.

” हे बघ, आता सव्वा दहा वाजलेत. साडेदहाच्या बॅचला किंवा दुपारी अडीचच्या बॅचला तुला रिटन टेस्ट देता येईल. काय करतोस बोल.”

डाॅ. कर्डकनी मला विचारलं. क्षणाचाही विचार न करता मी म्हणालो,” सर,आत्ताची साडेदहाची बॅच चालेल मला”

“चल तर मग.पेन आहे ना जवळ ?”

“हो सर”

“गुड.कम फास्ट…!”

माझी वाट न पहाता ते तातडीने केबिनबाहेर पडले. मी जाऊ लागणार तेवढ्यात निरंजन साठेंनी मला थांबवलं.

“आर यू मेंटली प्रीपेअर्ड?”

“हो”

“पण तू खाल्लेयस कां पुरेसं कांही? नाहीतर व्यवस्थित जेवण वगैरे आवरून दुपारी अडीचच्या बॅचलाच ये सरळ. इट विल बी बेटर आय थिंक”

” नाही.. नको. खरंच नको.” त्या विचाराच्या मोहात पडण्यापूर्वीच मी तो विचारच तत्परतेने झटकून टाकला.

” मी खाऊन आलोय.मला आता भूक नाहीये. खरंच.”

मी चक्क खोटं बोललो होतो. कारण समोर आलेली संधी मला दुपारपर्यंत पुढे ढकलायचीच नव्हती.

टेस्टचं स्वरूपही माहीत नसताना भुकेपोटी, अतिशय उतावीळपणानं असं टेस्ट द्यायला तयार होणं हा चक्क एक जुगार होता आणि माझ्याही नकळत का होईना पण मी तो खेळायला प्रवृत्त झालो होतो.

ही लेखी परीक्षा म्हणजे अॅप्टीट्यूड टेस्ट होती. .इंग्रजी, गणित,सामान्यज्ञान याबरोबरच मुख्यत: बौद्धिक क्षमतेची चाचणी घेणारी एक टेस्ट.शंभर प्रश्न होते. पर्यायी उत्तरांमधल्या अचूक उत्तराला टिक करायची होती. हल्ली सर्रास सुरु झालेल्या प्रोसेसचं ते सुरुवातीचं पहिलं वर्ष होतं.

मघाशी या प्रोसेसचा ‘फास्टट्रॅक’ असा उल्लेख मी केला त्यानुसार खरोखरच पुढचं प्रोसेस विनाविलंब द्रूतगतीनं सुरु झालं.रिटन टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची लिस्ट बँकेतल्या काचफलकांत लगेचच झळकली. त्यात माझा नंबर बराच वरचा होता. तिसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू झाले आणि पाचव्या दिवशी माझ्या हातात नेमणुकीचं पत्रही पडलं.ते खरंच एक आक्रितच होतं. क्षणभर मला मी स्वप्नातच हे सगळं बघतोय,अनुभवतोय असंच वाटत राहिलं. तसं तर हे सगळं योगायोगानंच घडलं होतं असं वाटेल खरं,पण ते तसं नव्हतं.मी मेव्हण्यांच्या सूचनेनुसार त्यादिवशी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे नाव नोंदवलंच नसतं तर?त्यांनीच पुढाकार घेऊन रात्री उशीर झालेला असूनही माझ्यासाठी लगोलग ठाण्याला जायचा निर्णय घेतलाच नसता तर? किंबहुना त्यांच्या मावस बहिणीचा दीर नेमका युनियन बँकेतच असणं आणि त्यानेही अगदी मनापासून माझ्या मदतीला धावून येणं हे सगळे योग्यवेळी योग्य क्रमाने घडत गेलेले केवळ योगायोग असूच कसे शकतील? ते तसे  असतीलच तर ते कुणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणलेले असणार! माझ्या हातात नेमणुकीचं पत्र पडलं त्याक्षणी हे सगळे विचार  मनात आले आणि मला  उत्कटतेने ‘त्या’ची आठवण झाली. माझा कोणताही नित्यनेम सुरू नसताना,मला नकारात्मक विचारांच्या दडपणात या चार-सहा दिवसात ‘त्या’ची पुसटशी आठवणही झालेली नसताना, ‘त्या’ला माझ्या अशा या मन:स्थितीत कसलं साकडं घालायचा विचार मनात येण्याइतपत स्वस्थताही मला लाभलेली नसतानासुध्दा ‘त्या’ने मात्र माझ्यावर रणरणत्या उन्हात अशी सावली धरलेली होती!!

या जाणीवेच्या स्पर्शानेच मला अचानक बाबांची आठवण  झाली. त्यांचा निरोप घेऊन निघतानाचे त्यांचे… ‘सगळं सुरळीत होईल. काळजी नको.’ हे शब्द मला जवळ घेऊन थोपटतायत असं वाटत राहीलं.   

‘त्याच्याकडे कधीच काही मागायचं नाही. आपल्यासाठी आपल्या हिताचं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त समजतं. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आल्यासारखं वाटलं तरी त्यातच आपलं हित होतं हे नंतर जाणवतंच’…कधी काळी बाबांच्या तोंडून ऐकलेल्या या शब्दांचा रोख गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या,माझ्या संपूर्ण आयुष्याला नेमकी आणि वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनांकडेच असावा असा विश्वास

वाटण्याइतका या शब्दांचा नेमका अर्थ या अनुभवांनी मला समजून सांगितला होता. ‘त्या’ला मी इतकी वर्षं मानत आलो होतो. या घटनाक्रमांच्या निमित्ताने ‘त्या’ला जाणण्याची प्रक्रियाही माझ्या मनात नकळत सुरू झाली!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उंबरा… आत्मभान जागृत ठेवणारे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ उंबरा… आत्मभान जागृत ठेवणारे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान…!!! 🙏🏻

अवश्य वाचा

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) उंबराचा वृक्ष.

म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे.

उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली.

औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात.कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते.

काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते. तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण, कसे,काय घेऊन जातेय त्यावर त्याचे ध्यान असते.

उंबरठा ! किती अर्थ होता त्या उंबरठ्याला .उंबरठा म्हणजे, दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी, पण, किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे. सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही.

पूर्वी बायका म्हणायच्या कि आमच्या उंबरठ्याचा गुण आहे, आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली कि तिला आमचे गुण लागलेच म्हणून’ समजा.  हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतिक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का..?

ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो अस म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आला कि उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारावर तोरण बांधले जायचे.  फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय.

आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आडपडदा नको. कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण?

नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा.

उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट..

बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे  लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा.

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे.

उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं.

अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं.

हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.

उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल,वाईट असेल त्या वस्तू असतील,विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आता थारा नाही. मग ते काहीही असु शकते.

भ्रष्टाचाराचा पैसा असेल,कुलक्षणी मित्र असतील,व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल,वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी, गप्पा बाहेरच व्हायच्या.

घरातील गृहलक्ष्मीला  सुद्धा कधी बाहेर जायचे आणी कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर. घरातील संस्कार, जेष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तीमत्व ठरवते.

उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते,सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी,सागर मर्यादा ओलांडतात तेव्ह जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे.

म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल.

एकुणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली,आपण ती ध्यानात ठेऊ, उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेऊ.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मागण्या आणि मागण्या… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

मागण्या आणि मागण्या ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही गोष्टी करायला खूप सहज सोप्या असतात तर काहीं गोष्टी ह्या करण्यासाठी खूप अवघड असतात. ह्या काही गोष्टींमधील एक गोष्ट म्हणजे “मागण्या”. मागण्या करणं खूप सोप्प पण मागण्या पूर्ण करणं हे जरा अवघड काम. खरंतर मागण्या करणं आणि मागण्या पूर्ण करणं ह्या वाक्याममधे फक्त एका शब्दाचा फरक, पण अर्थाने मात्र दोन शेवटची टोकं.

आपलं सगळ्यांचंच लहानपण, हे मोठ्यांनी जे शिकविलं ते  आज्ञाधारक पणे शिकायचं , नुसतचं शिकायचं नाही तर ते आपल्याला आचरणातपण आणावचं लागायचं,ह्यात गेलयं.सरसकट सगळ्या भावंडांमध्ये एखादा अपवाद वगळता बाकी सगळे मुकाट्याने पटो की न पटो पण सांगितलेले निमूटपणे स्विकारायचे.एखाद्यामध्ये मात्र थोडीफार हिंमत,  धमक असायची मग ते भावंड जरा बंडखोरी करुन  हवं ते मिळविण्यासाठी आपली बाजू हिरीरीने मांडायचे .थोडफार फडफडल्याने कधी त्या बंडखोर व्यक्ती च्या मनासारखं व्हायचं तर कधी मात्र नजरेच्या धाकाच्या जोरावर वा चौदाव्या रत्नाचा प्रसाद देऊन मोठी वडील माणसं त्या प्रश्नाचा,त्या समस्येचा निकाल लावतं.

ह्या सगळ्या समस्येच मूळ म्हणजे “मागण्या”हेच असायचं.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या भूमिकेतून अगदी योग्यच असतो.आमच्या लहानपणी आजुबाजूचे,परिसरातील,

नात्यातील,परिचीत आणि मैत्रातील बहुतेक सगळ्या कुटूंबांची एकूणच आर्थिक परिस्थिती,जीवनमान,स्तर हे अगदी थोड्याफार फरकाने पण सारखचं होतं.त्यामुळे एकूणच सर्वांचा राहणीमानाचा दर्जा हा जवळपास सारखाच होता. त्यामुळे परस्परांत दरी,विषमता ह्याची धग कधी फारशी जाणवलीच नाही.

मग अशा वेळी मागण्या वा डिमांड पुरविल्या गेल्या नाहीत तर अचानक आपल्याला डावलल्या गेल्याचं फील यायचं,उगाचच फक्त आपल्यावर अन्याय झालायं असा गैरसमज मनात ठाण मांडून बसायचा.वास्तविक पाहता आईवडील, पालक वा वडीलधारी मंडळी त्यांच्या जागी अगदी योग्यच असायची.तेव्हा आम्ही मागण्या करायचो,बंडखोरी करायचो पण आमच्या अल्लड, अजाणत्या वयातचं बरं का.जसजसं वयं वाढलं,परिपक्वता वाढली तसतसं अडचणीच्या काळात, आणीबाणीच्या काळात किंवा एखादं रोगराई सारखं अचानक अस्मानी संकट अंगावर येऊन पडल्यास मोठ्यांना, पालकांना वेठीस धरू नये एवढी जाण,समज तश्या फारशी पाचपोच नसलेल्या वयातही कोठून आणि कशी आली ते आमचं आम्हालाही कळलं नाही.

महिना अखेरचे दिवस हे पालकांचे सत्वपरीक्षेचे दिवस असतात हे अनुभवाने आम्हांला पाठ झालं होतं.खरचं जेथे घर चालवितांना एवढ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं,परिवारातील सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते तेथे कोणीही सत्तेवर असलं तरी सत्तेवर असलेल्या कोणाही साठी अगदी सत्वपरीक्षेचाच काळ असतो हे पण खरं.

पालकांच्या अडचणीच्या काळात,प्रमुख आलेल्या आपत्तीकडे कानाडोळा करुन त्यांच्या मागे मागण्यांच तुणतुणं वाजवून त्यांना पिडू नये,बेजार करु नये ही जाण,हा शहाणपणा आम्ही लहान असलो तरी सगळ्यांजवळ होता.जी समज लहानवयात येऊ शकते ती समज, ते शहाणपण निव्वळ सत्तेसाठी , एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मोठ्यांजवळ नसावं ह्यांच खरचं वैषम्य वाटतं.

अगदी आपण करीत असलेल्या मागण्या आपल्या दृष्टीने खरोखरच योग्य आहेत हे शंभर टक्के आम्हाला कळलेले असले तरीही आम्ही लहान असूनही

परिस्थितीचा,पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचो,त्या पोशिंद्यांचा विचार करायचो आणि आता परिस्थिती कोणती,संकटाची तीव्रता किती हे सगळं कळूनही निव्वळ दुराग्रह, अट्टाहास ह्याला प्राधान्य देऊन,स्वतःतील”मी”ला खतपाणी घालतं,कुरवाळत बसणं खरोखरच योग्य आहे का, ह्याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

शेवटी काय तर पालक असो वा सरकार त्यांच्याकडे आपल्याला काही मागण्या करायच्या असल्यासं त्या मागण्यांसाठी  आपण वेळकाळ पहाणं खूप गरजेच आहे जरी आपल्या मागण्या अगदी रास्त असतील तरी.सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात पालकांना तसेच जे जगावर अस्मानी महामारीचे संकट आले असतांना ते आरक्षण वगैरे मागणे हे योग्य आहे का हे प्रत्येकाने  आपल्या सदसद्विवेकबुद्धी ला विचारुन बघावे.आपले खरे उत्तर आपल्याला आपले मनचं देईल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

“या,बाई या,या बाई या

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

वेचलेल्या फुलांचा हार करूया

आणि कृष्णाच्या गळ्यात हार घालूया”

लहानपणी बाईंनी शिकवलेल्या या गाण्यावर अधून मधून आम्ही नाच करत असायचो.बकुळीच्या झाडाची प्रथम ओळख अशी झालेली.डोळ्यांपुढं ओट्यात फुलं वेचलेलं चित्र यायचं;पण बकुळ फुले कशी असतील?असं वाटायचं.सर्वसाधारण मोगऱ्याची फुले नजरेसमोर यायची आणि प्राजक्ताचं झाड डोळ्यांपुढं दिसायचं.पण बकुळ कधी दृष्टीस पडलं नाही.कलापथक पाहताना मात्र बकुळ,गुलाब,शेवंता अशी पात्रांची नावे असायची.शालेय पाठयपुस्तकात परत कधी बकुळीचा उल्लेख आला नसल्याने जरासा विस्मरणात गेलेला बकुळ पुन्हा

तारुण्यात

“बकुळीच्या झाडाखाली,निळ्या चांदण्यात,हृदयाची ओळख पटली,सुगंधी क्षणात..”

या ओळीं ऐकल्यावर पुन्हा ताजा झाला.या झाडानं जणू वेडच लावलं.डोळ्यांपुढं ते आकाश व्यापणारं झाड,त्याखाली बसलेले दोन प्रेमी जीव,फुलांचा सडा आणि अपरिचित सुगंध आला;पण ते झाड असं स्वप्नवतच वाटायचं.मोबाईल,नेट असलं काही नसल्याने ते सर्च करून बघण्याचा प्रश्न देखील नव्हता त्यामुळं कुठंही बकुळीचा उल्लेख आला की डोळ्यांपुढं मोठा वृक्ष आणि त्याचा खाली पडलेला सडा असं दृश्य यायचं.पुढं कुठंतरी वाचनात आलं की बकुळ झाड कोकणात असते, मग तर त्याला बघण्याची आशा मावळली.स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत हातनूर गावाची बातमी वाचत असताना बकुळीच्या झाडाचा उल्लेख आला.शाळेच्या कॅम्पेनिंगला गेल्यावर चौफेर,रस्त्याकडेला कुठं बकुळ झाड दिसतेय का बघितलं.पण ते झाड कसलं असतंय माहीतच नव्हतं त्यामुळं ते शोधूनही उपयोग नव्हता.  आता मोबाईल आल्यावर ‘दुर्मिळ झाडे व प्रजाती’ या फेसबुक ग्रुपवर बरीच झाडे,वेली ,फुले पाहण्याचा योग आला त्यातच बकुळीची फुलं न झाड बघायला मिळाले.

परवा अंगणात खारुताईने आकर्षक छोटी छोटी केशरी फळे टाकल्याचे बघितले पण ती कशाची असावीत ?कळले नाही.आमच्या कॉलनीत रस्त्याकडेला एकसारखीच झाडे बघून एकीला विचारलं,’ही एकसारखीच जंगली झाडं का बरी लावली असतील?’त्यावर ती म्हणाली,”अहो यातली दोन जंगली आहेत आणि बाकी बकुळीची आहेत?”काय?मला आश्चर्याचा धक्काच बसला.क्षणभर ‘युरेका!युरेका!करून ओरडावं की काय?असंच वाटलं.मी जवळ गेले.असंख्य कळ्यांनी नि केशरी फळांनी भरलेलं झाड बघून मला अत्यानंद झाला.मनात म्हणलं,”इतके दिवस तुला शोधत होते पण इतक्या जवळ असून देखील तू मला हुलकावणीच देत राहिलास  ते केवळ तुला कधी न पाहिल्यानेच!मस्त धुंद करणारा सुवास  घेतल्यावर वाटलं,देवघरात ही ओंजळभर फुलं ठेवल्यावर कशाला हवी कृत्रिम उदबत्ती?तसेही देवाने इतकी सुगंधित फुले निर्माण केली आहेत की खरेच त्याला उदबत्ती आवडत असेल का?हा प्रश्नही चाटून गेला.मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.किती वर्षे याच्या भेटीसाठी वाट पहावी लागली!

“मधूघट भरले तुझ्या दारी,का वणवण फिरशी बाजारी?”

अशीच काहीशी माझी अवस्था!आता दररोज त्या कळ्या फुलण्याच्या प्रतीक्षेत होते.मन:चक्षुपुढे पुन्हा त्या असंख्य कळ्या फुलून झाडावर चांदण्या सांडल्याचे भासमान दृश्य आले.पण अति उन्हामुळं किंवा कमी पावसामुळं असेल,माझी ही मनीषा पूर्ण झाली नाही,मात्र दररोज सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी झाडाजवळून जाताना मंद धुंद सुगन्ध भरभरून लुटताना मन कसं प्रसन्न,खुश होतेय!

याच जन्मात मला बकुळीचं झाड भेटलं न कविना त्याची भुरळ का पडली असावी याचं इंगितही कळलं.

आता पावसाळ्यात अंगणात बकुळ नक्कीच लावणार आणि कधीतरी ते असंख्य चांदणफुलांनी डवरलेलं झाड पाहण्याचं स्वप्न पुरं करणार.बघू,कृष्ण खरेच ते भाग्य भाळी लिहितोय का?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print