(त्यात परत अजून गोळी चहा,डस्ट,चाॅकलेट, ग्रीन टी ,लेमन टी हे ही उपप्रकार आहेतच)…
काही हाँटेल्समध्ये तर चहाला वेगळे नाव देऊन तो प्रसिद्धीस उतरवलाय.पुण्यामध्ये ‘अम्रुततुल्य चहा ‘ प्रसिद्ध आहे तर सांगलीमध्ये ‘ हरमन चहा ‘म्हणून प्रसिद्ध आहे.याशिवाय ‘ मटक्यातील चहा ‘सुध्दा नावारुपाला येतोय.
चहा कसा प्यायचा यातही खूप गमतीदार प्रकार आहेत.पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी खेड्यामध्ये,झोपडीत चुलीवर साखरेऐवजी गुळ घालून चहा केला जातो.चहा पिण्यासाठी कपाचा वापर केला जातो.कपभर चहा किंवा चहाचा कप ही संकल्पना यामुळेच रुजली असेल.पण व्यक्ती आणि स्थान परत्वे चहा पिण्याच्या साधनात पण बदल होत गेला.पुर्वी किंवा आजही काही लोक चहा पिण्यासाठी कपबशीचा वापर करतात,पण आता मात्र या कपबशीची जागा ‘ मग ‘ ने घेतली आहे.बशी न देता नुसत्या मगमधून चहा देण्याची फँशन आली आणि ती रुढही झाली.वेगवेगळ्या रंगांचे,डिझाईनचे मग बाजारात उपलब्ध आहेत.त्याही पुढे जाऊन आता थर्माकोलचे युज अँड थ्रो वाले मग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.विशेषतः समारंभात, टपरीवर अशा कपांचा वापर केला जातो.
उत्साह वाढविणार पेय म्हणून चहाकडे पाहिल जात असल तरी या चहाच्या अतिरिक्त सेवनाने त्याचे दुष्परिणाम सुध्दा दिसून येतात. चहा पिण्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो.चहा खरतरं दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो.पण काही जण दिवसातून तीन चार वेळा चहा घेतात.शिवाय घरात कुणी पाहुणा आला तर त्यांना कंपनी म्हणून, आँफिसमध्ये काम करताना उत्साह वाटावा म्हणून चहा घेत रहातात.दिवसातून दहा कप चहा पिणारे सुध्दा काही लोक आहेत.इतका चहा पिण्याने भूक मरते,जेवणावर परिणाम होतो हे लक्षातच घेत नाहीत.शरीरात उष्णता वाढते,पित्त वाढते हे बरेचजण विसरतात. आयुर्वेदात तर चहा पिणे वर्ज्य आहे असे म्हणतात. चहा कधीही नुसता न पिता त्याबरोबर काहीतरी खावे म्हणजे त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही.
चहाबद्धल कितीही चांगल्या वाईट समजूती असल्या तरी ते एक उत्साह वाढविणारे तसेच मैत्री वाढविणारे पेय आहे हे नक्कीच.
“काय बाई तरी, त्या मालतीबाईंच्या घरी गेले, तर साधा चहासुध्दा विचारला नाही “, ” चहाला या बरं का घरी, ” ” पावणं चला जरा च्या घेऊ”, ” झालं का चहापाणी?”, मालक, जरा च्या-पान्याच बघा की ” मंडळी या सगळ्या बोलण्यातून एकच शब्द वारंवार येतोय आणि तो म्हणजे ‘ चहा’. या सगळ्यामध्ये महत्वाचे जाणवते ते म्हणजे आपुलकीची जाणीव. एकमेकांच्या मैत्रीतला दुवाच जणू या चहाने जपलाय. या चहामुळे अनेक नाती जोडली जातात, शिवाय अनेक कार्यक्रम, मिटींग यांची सांगता चहापानाने होते.
भारत आणि आता काही प्रमाणात परदेशात सुध्दा ‘चहा’ एक अनमोल पेयच बनून राहिले आहे. कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वेळी चहा प्यायला चालतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्ती, स्त्री-पुरुष, देशविदेशातील व्यक्ती यातील कुणालाही चहा पिणं वर्ज्य नाही. झोपून उठल्यावर, कामाचा शीण जावा म्हणून, मित्रांनी आग्रह केला म्हणून, अभ्यास करताना, ड्रायव्हिंग करतान झोप येऊ नये म्हणून, खूप थंडी आहे म्हणून, डोक दुखतयं म्हणून, टाईमपास, पाहुणचार म्हणून यातील कोणतेही कारण चहा पिण्यास पुरेसे आहे.
पूर्वी चहा पावडरची एक जाहीरात रेडिओ वर लागायची ” अवं सुवासिनीनं कुकवाला आन् मर्दानं चहाला नगं म्हणू नये”. म्हणजे इथेसुध्दा चहाला एक मानाचं पेय म्हणून प्रसिध्दी, दर्जा मिळवून दिला गेलाय हे लक्षात येत. तस अगदी साध वाटणारं चहा नावाच हे पेय म्हणजे पाणी, दूध, साखर आणि चहापावडर भांड्यात एकत्र करुन गँसवर उकळलेल एक पेय आणि ते गरम पिण्याचीच मजा. यामध्ये मग काहीजण आलं, वेलची, गवती चहा, चाँकलेट पावडर, चहाचा मसाला असे आपल्या आवडीनुसार चहात घालतात, तर काहीजण कच्चे दूध घालतात, काहीजण पाणी न घालता नुसते दूध वापरतात. दुधाऐवजी लिंबू टाकून काहीजण पितात. अशा कितीतरी प्रकारे चहा प्याला जातो. काही हाँटेल्स किंवा टपऱ्या, गाडे या निव्वळ चहासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे तर चहाचे अजून वेगळे प्रकार पहायला मिळतात. विशेषतः टक्कर चहा, कटिंग चहा, स्पेशल चहा, साधा चहा, गुळाचा चहा इत्यादी.
प्रत्येकाच्या चहा पिण्याच्या पध्दती पण वेगवेगळ्या. कुणाला जास्त साखरेचा गोड चहा लागतो तर कुणाला चहापावडर जास्त टाकलेला, कुणाला एकदम फिक्का तर कुणाला बिन दुधाचा, कुणाला फक्त दुधाचा तर कुणाला मसाल्याचा. प्रत्येकाची चहा पिण्याची पध्दत वेगळी काहींना एकदम गरम चहा लागतो, काहींना थोडा थंड आवडतो, काहींना चहात दुधाची साय घातलेली आवडते. अर्थात चहा पिण्याच्या कितीही वेगळ्या पध्दती असल्या तरी चहा पिण्याची एक तल्लफ असते आणि तो त्याचवेळी प्याला तर त्याची लज्जतही वाढते हे खरचं.
चहा बनविण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चहा पावडरमध्येसुध्दा खूप प्रकार आहेत. त्यामध्ये सध्या प्रसिद्ध असलेले म्हणजे जी. एस् चहा, रेड लेबल, ब्रुकबाँड, सोसायटी, ताजमहल, गिरनार, वाघ बकरी, सरस्वती, अग्नी, लाँयन, मगदूम चहा, फँमिली मिक्श्चर चहा असे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. त्यात परत अजून गोळी चहा, डस्ट, चाँकलेट, ग्रीनटी, लेमनटी हेही उप प्रकार आहेतच.
बालपण ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बालपणीचा काळ हा जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संस्कार करण्याचा महत्वाचा काळ. ‘बालपण’ जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. ही साधने म्हणजेच खेळणी, त्या त्या युगाची संस्कृती सांगतात. या खेळण्यांतून लोकजीवन कळते.
विटी-दांडू, सागरगोटे, गोट्यां, ठीक-या, लगोरी आणि भातुकली हे आपले पारंपारिक खेळ. लहान मुलींची बाहुली त्यात आलीच. ‘बाहुली’ हे जगभरातलं समान खेळणं. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या होत्या. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लागण्यापुर्वी ती भांडी हाताळावीत, अनुभवावीत.म्हणजे भविष्य काळात किचन कसे हाताळायचे याची ही रिहर्सल असायची. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची असते कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्या नुसताच एक खेळ नसून या बाहुल्यांवरून त्या त्या प्रांताची परंपरा, पोषाख, संस्कृती यांचा इतिहास कळतो.
दिल्ली येथे ४,नेहरू हाउस, बहादूरशहा जफरमार्ग,दिल्ली,११०००२. (वेळ-स.१०ते सायं ६) येथील शंकर्स इंटरन्याशनल डॉल्स म्युझिअम मध्ये जगातल्या सुमारे ८५ देशातल्या ६५०० बाहुल्या पाहायला मिळतात. भारतीय पोशाखातील १५० प्रकारच्या बाहुल्या, भारतीय नृत्यप्रकार कथ्थकलीच्या संपूर्ण कोस्च्युम्ससहित बाहुल्या. जपान मध्ये मुले आणि मुलींसाठी वापरणा-या बाहुल्या, इंग्लंडच्या राणीच्या संग्रहातील रेप्लीका डॉल, हंगेरीच्या मेपोल, जपानच्या सामुराई डॉल, थायलंडचा वूमेन ऑर्केस्ट्रा अशी जगाच्या कानाकोप-यातून आणलेल्या आणि भेट म्हणून मिळालेल्या बाहुल्यांची विविध रूपे आहेत.
१९६५ मध्ये राजकीय व्यंगचित्रकार के.शंकर पिल्लई(१९०२-१९८९) यांच्या कलेक्शन मधून भारतातले हे खूप मोठे प्रदर्शन उभे राहिले आहे.यात हाताने बनवलेल्या विविध पेहरावातल्या असंख्य प्रकारच्या बाहुल्या लहान मुलांचे बालपण तर दाखवितातच परंतु विविध देशांमधील विविध काळातील संस्कृती, डिझाईनचे नमुने, दाग-दागिने, अशी अभ्यासपूर्ण कलाकुसर पाहायला मिळते. युरोपिअन देश, एशियन देश, मध्य पूर्व देश, अफ्रिका आणि भारत या प्रांतातल्या सुंदर बाहुल्या इथे पहायला मिळतात. अशा प्रकारची प्रदर्शने खूप माहिती देत असतात. असंच दुसरं महाराष्ट्रातील भातुकलीच फिरतं प्रदर्शन आपल्या मागील पिढ्यांचा वारसा सांगतं.
भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबपद्धती, परंपरा चालीरीती इत्यादी होत, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम. ‘भातुकली’ या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. भातुकलीचा खेळ बाजारात कुठेही मिळतो. पण, आज भातुकली खेळायला मित्रांची, भावंडांची कंपनीच नाही आणि मुलांना व पालकांना वेळही नाही. काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचा जमाना. युज अॅंड थ्रो पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत आज वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे ,संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात. पुण्याच्या विलास करंदीकर यांचा भातुकलीच्या संग्रहाचा खटाटोप आहे.
ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. ‘भातुकली म्हणजे करंदीकरच’ हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं ‘भातुकली’ प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय. परंतु मुख्य फरक आहे ‘भातुकली’ हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना “आमच्यावेळी हे असं होतं” हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.
करंदीकर यांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.या संग्रहात वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे, तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं कपाट, चुली व शेगड्यांचे, भांड्याचे अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या, वेड्भांडे, शकुंतला भांडे, रुबवटा, ठेचणी या घरातून हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट, गंजीफा, सारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक खेळही आहेत. तसेच देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. या प्रदर्शनात भर पडली ती चांदीच्या भातुकलीची.
१९९० मध्ये जुन्या वाड्याच्या नूतनी करणा पासून हा संग्रह सुरु झाला.हळू हळू २६८ भांडी झाली.त्याचं पाहिलं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात मे १९९८ मध्ये भरलं.आता पर्यंत महाराष्ट्रात व बाहेर १५० च्या वर प्रदर्शने झाली.प्रत्येक वेळी त्यांच्या संग्रहात नवी भर पडत आहे. प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चार पिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं बालपण आठवतं ,तर पणतीला पणजीच्या वेळच्या भांड्यांच कौतुक वाटतं.
अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते.
लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व. या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. अशी संग्रहालये आणि प्रदर्शने मनोरंजना बरोबरच ज्ञान देतात. पालकांनी आणि शिक्षकांनी अशांची दखल घेतली पाहिजे. ती मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत. कित्येकदा आपल्याच शहरातलं एखादं संग्रहालय सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते महत्वाचही वाटत नसतं. पालकांच्याच मानसिकतेवर मुलांची मानसिकता अवलंबून असते. तेव्हा ही दोन्ही प्रदर्शने मुलांना जमेल तशी, जमेल तेंव्हा अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला गेलात तर तिथल्या म्युझियमला नक्की भेट द्या.
☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!!☆ सुश्री शीला पतकी☆
वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या बाई माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता तो दोन महिन्यापूर्वी वारला मला जरा धक्काच बसला कारण मुलगा अगदी तरुण होता 23 24 वर्षांचा त्यावर त्या बाई म्हणाल्या त्याची बायको वीस वर्षाची आहे तिचे काय करावे मला समजत नाही मी म्हटलं किती शिकली आहे ?त्या म्हणाल्या आठवी नापास झालीय… कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास होता त्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले पोरगी देखणी आहे वयाने लहान आहे मी कामाला जाते घरात माझा तरूण मुलगा आहे म्हणजे तिचा दीरआहे मला काही सुचत नाही मी काय करू मी म्हणाले बाई शिकवा मुलीला शिक्षण द्या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही धुणेभांडे करत ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात… मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग बोलके डोळे लांब केस छान उंची बांधा हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते .मी म्हणाले हिला शिकवा त्या म्हणाल्या आता कुठे शाळेत पाठवणार …मी म्हणाले माझ्या शाळेत पाठवा..
नापास मुलांच्या ..तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकू….. त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती मी त्यांना सांगितले 8000 रुपये फी भरावी लागेल त्या म्हणाल्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी म्हणाले फुकट शिक्षणाची किंमत नसते मी तुम्हाला एक मार्ग सुचवते… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती मी त्यांना एक मार्ग सांगितला की सकाळी 8 ते 11 बालवाडीला सेविका म्हणून तीने काम करावे साडेअकराला शाळेत बसावे साडेपाचला शाळा सुटते जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे मी महिना तिला पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून ते कट केले जातील याप्रमाणे तिची काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची ही भरेन फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावी लागेल त्यांना ते पटलं पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या मी त्यांना दिलासा दिला ही माझी जबाबदारी आहे तुम्ही काळजी करू नका त्या म्हणाल्या.. तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे तुम्ही सांभाळा मी म्हणाले हरकत नाही आता ती माझी जबाबदारी आहे याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली मुलगी हुशार होती कामाला चपळ होती एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं त्यामुळे शाळेला सुट्टी नाही काम उत्तम व नेटके करत होती अभ्यासाची गोडी वाढली अनेक शिक्षकांनी आमच्या तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले तिचा उत्साह वाढला मुलगी खरंच हुशार होती पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दर महा मासिक घातलं जाते त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी आणि ते कार्य दुपारी बाराला असते याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची.. तिला काहीच कळत नव्हते संसार म्हणजे काय कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती म्हणाली बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय.. मी म्हणाले बोला त्या म्हणाल्या माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती ती हिच्या नावावर केलेले आहेत पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला तर अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरीयेईल काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो म्हणून ..अगदी खरे आहे मग काय विचार केलात त्या म्हणाल्या माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते …खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते पण तरीही आईच्या सावध पणाने मी त्यांना म्हटलं का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमचा थोडासा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का त्या म्हणाल्या नाही हो बाई पोरीला सावत्र आई आहे बाप कुठवर बघणार माझ्या घरात तरी काय वेगळं आहे माझा नवरा आजारी पोरगा अपंग तिचा तो मुलगा झाडावरून पडून त्याचा हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडास अपंगत्व आलं होतं बाकी मुलगा चांगला होता निर्व्यसनी होता एका दुकानात काम करत होता बाईच स्वतःचा घर अगदी भर पेठेत होतं जुन्या चाळीत राहत असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते त्यामुळे दोन खोल्यांच छप्पर डोक्यावर होतं बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता या सर्व दृष्टीने विचार करता अन्न वस्त्र निवारा आणि सुरक्षितता या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच मी म्हणलं मुलीच्या वडिलांना बोलवून घ्या आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले बरोबर त्यांच्या नात्यातले चार माणसही आली बोला चाली झाल्या लग्न ठरले पण मी त्यांना एकचअट घातली की लग्न रविवारी करायचं मुलगी शाळा बुडवणार नाही एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले त्यांच्या गावाकडे म्हणजे त्यांचा जो देव होता तिथे जाऊन लग्न करायचे ठरले मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या अर्थात हे सगळे तिला एकटीला घेऊन समजून सांगितले तिला विचारले हे तुला चालणार आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस तुझी आणि नवऱ्याची बेडरूम जी होती तिथेच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे त्याच घरात तुला वावरावयाचे आहे हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? तिची मानसिक तयारी चांगली झाली होती ती म्हणाली हो मी हे करेन तो दीर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याचा आहे आणि ती माझी आई पण आहे तरीही आई आणि बाई या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याचं मी तिला सांगितले तुझा पहिला नवरा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस पुरुषांना हे आवडत नसते त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे पण त्याचा अहंभाव दुखावेल असे पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस आठवणी सांगू नकोस हे पथ्यपाळ म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल हे खरंतर खूप अवघड होते पण तिला निभावणे भाग होते झाले मग काय लग्न झाले सोमवारी नवी नवरी जावई पाया पडायला आले शाळा सुरू झाली जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला त्यानंतर आमची अभ्यासिका परीक्षा सराव परीक्षा हे सगळं पार पडलं आणि मुलगी 75 टक्के गुणांनी पास झाली ….मग पुढचा विचार सुरू झाला तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलवून घेतले आणि सांगितल की आता हिच्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षणाला दिले पाहिजे ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते लगेचच मी आमच्या इथे असलेल्या मुळे हॉस्पिटल मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षाच्या नर्सिंग कोर्स प्रवेश मिळाला आता या तिन्ही वर्षात मुल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या इतके मी त्यांना सांगितले खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या पण काय करणार इलाज नव्हता आणि त्यांनी हे सगळं वेळोवेळी ऐकल…अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली आणि लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्याच डॉक्टर महिलेने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती आज ती तिथे उत्तम काम करीत आहे दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे दोन गोंडस मुले झाली आहेत संसार सुखाचा चालला आहे स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…! मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख समाधान हे मला वाचता येते आणि लक्षात येतं की हे केवळ शिक्षणाने घडले आहे दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल अशा गोष्टी तुम्हाला सापडतात लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नसतो न शिकलेली मोठी झालेली माणसंही आहेतच पण ते वेगळे शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही तर सुखी होतो म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे शिका आपल्या आसपास असणार्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या जमलं तर एखाद्याला लिहायला वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…! मग काय करा सुरुवात जून मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा शिक्षणापासून वंचित असणाराना शिक्षणाची गोडी लावा त्याला प्रवाहात आणा इतके तरी आपण करू शकतो ना…….!
बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही.सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला *बीज* असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.
आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी *”उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी”* असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.
कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.
मधल्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.
ह्या सर्व गोंधळात आपण *बीज* टिकविण्याचे सोयीस्कररित्या विसरलो. जिथे *बीजच* खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? *”शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।”* असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. *खराब* झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते. समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. *शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.*
संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. *”बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।”* म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.
*मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.*
विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’). आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.
एक छान वाक्य आहे. *”लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”*. ‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त *’सुख’* घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य *’संस्कार’* सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.
हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात *’आधी केले मग सांगितले’* या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.
*या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.*
☆ आंबामेव जयते… लेखक – श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
अलीकडे ‘पहिला आंबा खाणं’ हा एक इव्हेण्ट झालाय. सुरुवातीला आंब्याचा भाव (अर्थात हापूस) हा डझनाला बाराशे रुपये असतो. मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा बाराशे रुपये पगार हा ‘वलयांकित’ पगार होता. ‘‘मला फोर फिगर पगार आहे,’ हे थाटात सांगितलं जायचं. आता त्या भावात बारा आंबे मिळतात.
दर मोसमात आंब्याचा भाव वाढतो आणि दर मोसमात त्याचं कारण दिलं जातं की, ‘यंदा फळ जास्त आलं नाही’. पुढेपुढे ‘किती आंबे खाल्ले’ ही इन्कम टॅक्सकडे जाहीर करण्याची गोष्ट ठरू शकते आणि आयकर विभागाच्या धाडीत दहा पेट्या आंबा सापडला ही बातमी ठरू शकते. पण तरीही आंबा हा मराठी माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक कायम राहणार.
मी जिभेने सारस्वत असल्यामुळे सांगतो, मला बांगड्याएवढाच आंबा आवडतो. तुम्ही मला पेचात टाकणारा प्रश्न विचाराल की, ‘बांगडा की आंबा?’ तर उत्तर, दोन्ही, आंबा आणि बांगड्याबद्दल असेल. तळलेला बांगडा आणि आमरस हे एकाच वेळी जेवणात असणं यालाच मी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं म्हणतो.
माझ्या लहानपणीसुद्धा हापूस आंबा महाग असावा. कारण तो खास पाहुणे आले की खाल्ला जायचा. आमरस करण्यासाठी पायरी आंबा वापरला जायचा आणि ऊठसूट खायला चोखायचे आंबे असत. बरं, पाहुण्याला हापूस देताना आंब्याचा बाठा खायला देणं अप्रशस्त मानलं जाई. त्यामुळे बाठा माझ्या वाट्याला येत असे. मला बाठा खायला किंवा चोखायला अजिबात लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. दोन मध्यमवर्गीय संस्कार माझ्यात आजही अस्तित्वात आहेत. एक, आंब्याचा बाठा खाणे आणि दुसरा, दुधाचं भांडं रिकामं झाल्यावर जी मलई किंवा तत्सम गोष्ट भांड्याला चिकटते, ती खाणे. कसले भिकारडे संस्कार, असा घरचा अहेर (माहेरहून आलेला) मला मिळायचा! पण ज्यांनी तो आनंद घेतलाय त्यांनाच माझा आनंद कळू शकेल. एवढंच काय की, घरचं दूध नासलं की मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यात साखर घालून आई ते आटवायची आणि त्यातून जे निर्माण व्हायचं त्यालाच ‘अमृत’ म्हणत असावेत, अशी लहानपणी माझी समजूत होती. आता हा आनंद दुष्ट वैद्यकीय विज्ञानामुळे धुळीला मिळालाय. देवाने माणसाला कोलेस्टेरॉल का द्यावं? आणि त्यात पुन्हा वाईट आणि चांगलं असे दोन प्रकार असताना वाईट कोलेस्टेरॉल का द्यावं? बरं ते कोलेस्टेरॉल जर निर्माण करायचं, तर ते मलईत वगैरे टाकण्यापेक्षा कारलं, गवार किंवा सुरणात टाकलं असतं तर बिघडलं असतं का? आंबाही फार नको, असं सुचविताना डॉक्टर त्यात पोटॅशियम असतं ते चांगलं, असा उःशाप देतो ते बरं असतं.
आंबा हा फळांचा खऱ्या अर्थाने राजा! तो मला जेवणाच्या ताटात किंवा बशीत कुठल्याही रूपात आवडतो. आमच्या घरी आंबा खास पाहुण्यांना (बायकोची आवडती माणसं) हा सालंबिलं कापून, छोटे तुकडे करून एका ‘बोल’मध्ये छोट्या फोर्कसह पेश केला जातो. असं साहेबी आंबा खाणं मला बिलकूल आवडत नाही. आंबा खाताना हात बरबटले पाहिजेत, सालंसुद्धा चोखलीच पाहिजेत आणि जमलं तर शर्टावर तो सांडला पाहिजे. तरच तो आंबा खाल्ल्यासारखा वाटतो. आंबा ताटात असताना मासे सोडून इतर पदार्थ मला नगण्य वाटतात. विव्ह रिचर्डस् बॅटिंग करताना मैदानावरच्या इतर सर्व गोष्टी नगण्य वाटायच्या तशा! आंबा खाण्यासाठी चपाती, परोठ्यापासून सुकी भाकरही मला चालते.
फक्त एकच गोष्ट मला जमलेली नाही. आमरस भातात कालवून भात ओरपणे! माझ्या एका मित्राला ते करताना पाहिलं आणि मला त्या मित्रापेक्षा आंब्याची कीव आली. आंब्याची गाठ भाताशी मारणं हे मला एखाद्या गायिकेने औरंगजेबाशी विवाह लावण्यासारखं वाटलं.
आंब्याच्या मोसमात पूर्वी मला लग्नाला जायला आवडे. म्हणजे मी अशा काळाबद्दल म्हणतोय जेव्हा जेवणाच्या पंगती असत, बुफे नसे आणि जेवण हे मुंबईएवढं कॉस्मॉपॉलिटन नव्हतं. त्या वेळी सारस्वत लग्नातली कोरडी वडी, (जी ओली असून तिला कोरडी का म्हणत ते सारस्वत जाणे) पंचामृत आणि अनसा-फणसाची भाजी! ही भाजी त्या वेळी फक्त श्रीमंत सारस्वत लग्नात असे. कारण त्या भाजीत आंबा, अननस आणि फणस असे त्रिदेव असत. त्यामुळे तिला ग्रेट चव येई. त्या काळी सारस्वत लग्नात अनसा-फणसाची भाजी ठेवणं हा स्टेटस सिम्बॉल होता.
आंब्याचा उल्लेख रामायण, महाभारतातही आहे. तसंच पतंजलीचं महाभाष्य आणि पाणिनीची अष्टाध्यायी या ग्रंथांतसुद्धा आहे. जवळपास सर्वच धार्मिक विधी आंब्याच्या पानाशिवाय होत नाहीत. कोणत्याही कलशावर आम्रपल्लव ठेवून मग त्यावर नारळ किंवा पूर्णपात्र ठेवतात.
हापूसपासून राजापुरी, तोतापुरी, बाटली आंबा वगैरे कुठलाही आंबा मला आवडतो आणि मी तो खातो. शाळा-कॉलेजात असताना एप्रिल-मे महिन्यात आंबा आणि सुट्टी या एवढ्याच दोन गुड न्यूज असायच्या. बाकी सर्वच बॅड न्यूज!
कुठल्याही रूपातला आंबा मला आवडतो. उदा. कैरी, कैरीचं पन्हं, लोणचं, मोरांबा, आंबटगोड लोणचे, आंबापोळी वगैरे वगैरे! फक्त आंब्याच्या कोल्ड ड्रिंक्सच्या वाटेला मी जात नाही. अवाजवी आणि फालतू साखरेला शरीरात यायचं आमंत्रण का द्या?
चला, आता दीड-दोन महिने आमच्या घरी मासळी, आयपीएलपेक्षा आंब्याची चर्चा जास्त असणार. पलीकडच्या कर्वेबाईंनी हापूस स्वस्तात मिळविल्याचा टेंभा मिरविल्यावर माझ्या बायकोचा चेहरा ख्रिस गेलचा कॅच सुटल्यासारखा होणार. पण पुढे आजचा मेनू काय, हा प्रश्न नवरा विचारणार नाही, याचं समाधान असणार. कारण बाजारातला हापूसच काय, बाजारातला शेवटचा बाटली आंबा संपेपर्यंत नवरा शांत असणार.
☆ आम्हीं तो चिरंतनाचें पाईक… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“सर, तुमच्या शिबिरात आल्यावर आमच्या मुलाला सकाळी लवकर उठायची सवय लागेल ना?”
“सर, आमची मुलगी झोपेतून उठल्यावर अंथरुणाची घडी सुध्दा घालत नाही. तिला ती सवय लागेल ना?”
“सर, हा आमचा मुलगा भाज्याच खात नाही. हॉटेल मधलं सगळं बरोब्बर खातो. पण घरचं जेवणच नको असतं त्याला. भाज्या नकोत, फळं नकोत, आणि उपदेशही नकोत असं आहे त्याचं. तुमच्या सोबत आला तर तो भात-वरण-पोळी-भाजी खाईल ना?”
“सर, धांदरटपणा अन् विसराळूपणा कमी व्हावा म्हणून आमच्या मुलाला तुमच्या कॅम्पला पाठवायचंय बघा. “
‘अनुभूती’चे वारे वाहायला लागले आणि नोंदणी सुरु झाली की, असे कितीतरी फोन रोज सुरु होतात.
उन्हाळी शिबिरं, छंद वर्ग आणि सहली यांचा खरा उद्देश कोणता, अन् पालकवर्ग त्याकडं कोणत्या दृष्टीनं पाहतो आहे, यातलं अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललंय असं वाटतं. आपल्या मुलांना आपण नेमकं काय द्यावं आणि आपल्या मुलांनी नेमकं काय शिकावं, याची खरोखरंच नेमकी जाणीव पालकवर्गाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नदीचं मूळ शोधण्याइतकं कठीण होऊन बसलं आहे. घरचं जेवण करण्याची अन् बटाटा सोडून बाकीच्या भाज्या खाण्याची सवय लागावी यासाठी उन्हाळी शिबिर लागतं? कमाल वाटते मला.
“मोबाईल फोन नसेल तर मी जाणार नाही त्या सहलीला. ” इति वय वर्षे १५..
“आई, तुला माहितीये ना, मला एसी लागतो. एसी असेल तरच जाईन मी ट्रेकला. “असं एका मुलानं घरी ठणकावून सांगितलं. (आता महाराजांच्या गडकोटांवर एसी कुठून आणायचा?)
“त्याला नं कालवलेला भात लागतो पानात. रोज पनीर लागतं. सकाळी एक डबल ऑम्लेट आणि एक बॉईल्ड एग लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमोडची आणी गरम पाण्याची आंघोळीची सोय हवी. तुमच्या कॅम्पमध्ये या गोष्टी मिळतील ना?” असाही एका आईचा फोन होता.
काही जण तर इतके धन्य असतात की, त्यांचा शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर जाहीर नागरी सत्कारच केला पाहिजे. एका पालकांचा चौकशीसाठी फोन आला. “मुलं रोज कुठं कुठं राहणार आहेत, काय खाणार आहेत, किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी आहेत याचं जीपीएस लोकेशन तुम्ही पालकांना दर तासातासाला पाठवलं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला कळणार कसं?” हे ऐकताच मी धन्य झालो.. पण समोरुन सुलतानढवा चालूच राहिला.
“गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या माणसांच्या हातचं जेवायचं म्हणताय. पण ते ऑईल कुठलं वापरतात, धान्य कुठलं वापरतात हे तुम्ही माहिती करुन घेता का ? ते लोक सॅनिटायझर तरी वापरत असतील का? स्वयंपाकाला कुठलं पाणी वापरत असतील? आणि अल्युमिनियम च्या भांड्यातच अन्न शिजवत असतील. म्हणजे ते अजूनच अनहेल्दी.. कशी पाठवायची आमची मुलं?” मी शांतपणे हा तोफखाना अंगावर घेत राहिलो. समोरचा दारूगोळा संपल्यावर फोन ठेवून दिला.
पिझ्झा हट अन् मॅकडॉनाल्ड्स संस्कृतीत वाढलेल्या अन् मिसळ खाताना बोटांना तर्रीचं तेल लागतं म्हणून टिश्यू पेपरचं डबडं शेजारी घेऊन बसणाऱ्यांना सह्याद्रीची मुलुखगिरी स्वतः करणं फार अवघड आहे.
“तुम्ही रोज रात्री पुण्यात मुक्कामी येणार ना?” हा प्रश्न तर माझ्यासाठी “गिटार वाजवून झाल्यावर रोज तारा काढून ठेवायच्या ना?” असा होता. यावर मला नेमकं काय उत्तर द्यावं हेच सुचेना. असे शेकडो फोन अन् चित्रविचित्र प्रश्न.. ! डोकं चक्रावून जातं..
या माणसांच्या जगण्याच्या कल्पना तरी काय आहेत, अन् रोजचं आयुष्य ही माणसं कशी जगत असतील, या विचारानं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आज नुकतीच वयात येऊ घातलेली यांची मुलं पुढं जगतील कशी? जगाशी जुळवून घेतील कशी? यांना माणसं जोडता येतील का? दुर्दैवानं करिअर मध्ये बॅडपॅच आला तर काय करतील? असे प्रश्न पडायला लागतात. अशा कितीतरी जणांना “अनुभूती तुमच्या मुलांसाठी योग्य नाही. त्याला दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमाला पाठवा. ” असं सांगून नकार द्यावा लागला. कारण, “अनुभूती” हा आम्हीं आखलेला कार्यक्रमच वेगळा आहे. त्याचा बाजच वेगळा आहे. त्यात इतिहास आहे, शौर्य आहे, धाडस आहे, संस्कृती आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जिव्हाळा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीयत्व आहे.. !
प्रभाव ही फार विलक्षण गोष्ट आहे. ती विकतही मिळत नाही आणि कुणाकडून उसनीही घेता येत नाही. आपल्याला आयुष्यात उत्तम यश मिळवायचं असेल, चांगलं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर, त्यासाठी उत्तम प्रेरणा हवी. आणि उत्तम प्रेरणेचा मार्ग प्रभावाच्या पोटातूनच जातो. तो प्रभाव निर्माण करणारा कार्यक्रम म्हणजेच ‘ अनुभूती’… !
खेडोपाडी राहणाऱ्या, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या माणसांचं आर्थिक स्थैर्य भक्कम नसेलही. पण, त्यांचं त्यांच्या परंपरेशी आणि सांस्कृतिक पूर्वपीठिकेशी असलेलं नातं अजूनही कणखर आणि मजबूत आहे. चार-चार शतकांपासून ही माणसं गडांवर नांदलेली.. यांच्या पूर्वजांनी कदाचित महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं असेल. एखाद्या मोहिमेत हाती समशेर धरली असेल. शत्रूच्या आक्रमणांना अन् तोफगोळ्यांना तोंड देत यांनी गड झुंजवला असेल. कुणास ठाऊक.. पिंपळाचं झाड शेकडो वर्षं जुनं असलं तरी त्याच्या प्रत्येक पानाची वंशावळ, कारकीर्द अन् चरित्र कुणी लिहीत बसत नाही. ह्या माणसांच्या पूर्वजांचंही असंच आहे.
ब्रिटिश राजवटीत गड किल्ल्यांच्या अस्तित्वावरच जी संक्रांत येऊन बसली, ती काही केल्या हटायलाच तयार नाही. त्यामुळं, पिढ्या न् पिढ्या गडावर जगलेल्या या परिवारांना देशाच्या स्वातंत्र्यानंतरच खरी दृष्ट लागली. गडाच्या वस्तीकऱ्यांनाच गड सोडावे लागले. ऐतिहासिक वास्तू संरक्षित म्हणून घोषित व्हायला लागल्या. पण आज पन्नास वर्षांहून जास्त काळ उलटून गेला तरीही महाराजांच्या गडांवरची दैवतं उन्हा-पावसाचे तडाखे खात उघड्यावरच आहेत. मग त्यात कितीतरी मारुतीराय आहेत, गणपती आहेत, शिवलिंगं आहेत.
शिवाजी महाराजांच्या काळात रोजच्या रोज पुजली जाणारी देवालयं आज भग्न अवस्थेत पडली आहेत. कितीतरी गडांवर भग्नावस्थेतले नंदी आहेत. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावायलासुध्दा माणसं राहिली नाहीत, सणावारांना नैवेद्य नाही. आज त्यांच्याबद्दल कुणाच्या काय भावना आहेत?
अशाच एका गडावर मुलांना घेऊन गेलो होतो. शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला. गडाच्या घेऱ्याशी आम्ही उभे होतो. मी गडाच्या बांधणीविषयी मुलांशी गप्पा मारत होतो. मागून पाच सात जणांचं एक टोळकं आलं. आमच्यापाशी थांबलं. त्यांना मागचा पुढचा संदर्भ काहीच ठाऊक नव्हता. सहावीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलानं “पण महाराजांनी इथंच का बरं किल्ला बांधला असेल?” असा प्रश्न विचारला. मी काही उत्तर देणार तेवढ्यात “महाराज नाही, छत्रपति शिवाजी महाराज असं म्हणायचं. समजलं का?” असं त्यांच्यातल्या एकानं दरडावलं अन् खिदळत पुढं गेले. थोड्या वेळानं आम्ही चढणीच्या एका टप्प्यावरच्या मारुतीपाशी थांबलो. (हजारो माणसं गडावर येतात. सेल्फी काढून निघून जातात. पण हे मारुतीराय मात्र अजूनही उपेक्षितच राहिले आहेत. ) बघतो तर, ही मंडळी मारुतीपाशीच जेवायला बसलेली. मोबाईल फोनवर “पाटलांच्या बैलगाड्यानं घाटात केलेला राडा” सुरु होता. गौतमी पाटील बाई कशा नाचतात, याच्या सुरस कथा सुरु होत्या. अन् जेवणाच्या डब्यात अंड्यांची भुर्जी होती… ! हे सगळं मारुतीपाशी.. !
कितीतरी किल्ल्यांवर प्लॅस्टिकच्या बाटल्यांची अन् पिशव्यांची रानं माजली आहेत. कागदी प्लेट्स, कागदी कप, वेफर्सची पाकीटं पडलेली असतात. “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. ” असं आज्ञापत्रात म्हटलंय, ते कितीजणांनी वाचलंय ? गडकिल्ले हे प्रेरणास्थान आहे की पर्यटन स्थळ आहे ? याचा निर्णय व्हायला हवा. “आम्ही गडांवर जातो” हे सांगणं सोपं आहे. पण तिथं जाऊन आम्ही काय केलं, कसे वागलो हेही सांगितलं पाहिजे. महाराजांची दौलत राखायची म्हणजे नेमकं काय करायचं ? हे समाजाला सांगायला हवं.
“हर हर महादेव” या गर्जनेचा अर्थ समजून घेताना उगवत्या पिढीला त्यांची जबाबदारी शिकवण्याचं सुध्दा दायित्व आहेच ना. म्हणूनच, “अनुभूती” येणाऱ्या एकाही मुलाकडं प्लॅस्टिकचं काहीही सापडणार नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद गडांवर न्यायचेच नाहीत, हा नियम गेली १८ वर्षं ‘अनुभूती’ नं कटाक्षाने पाळला आहे. उलट, गड किल्ल्यांवर असा कचरा दिसला तर, तो गोळा करुन पायथ्याला आणण्याचं काम सुध्दा मुलांनी केलं आहे.
“महाबळेश्वर, खंडाळा, पाचगणी आलो होतो म्हणून सहज फिरता फिरता प्रतापगडावर आलो. कांद्याची गरमागरम भजी खाल्ली, चहा घेतला आणि आता निघालो परत. ” अशी कितीतरी माणसं तिथं रोज भेटतील. पण तिथं राजांनी अफजलखानाशी युद्ध करताना जी योजना केली होती, त्याचा नकाशा लावलेला आहे, तो कुणी पाहत नाहीत. किंबहुना त्यांच्या ते गावीही नसतं. ढालकाठीपाशी जाऊन फोटो काढणं एवढंच डोक्यात असतं. कुल्फी खात खात तटावरून फिरायचं अन् नंतर कुल्फीची काडी तिथंच फेकून द्यायची, ही लोकांची स्वाभाविक सवय आहे. बुरुजांच्या जंग्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या खुपसणं, हे तर कॉमन आहे.
पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होता येईल. पण आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व जतन करण्याच्या साक्षरतेचं काय? तिथल्या निसर्गाच्या जोपासनेचं काय ? तिथल्या लोकजीवनाचं काय ? याचा विचार आणि भान घडत्या पिढीच्या मनात रुजवलं पाहिजे.
एखाद्या गडाच्या पायथ्याच्या वस्तीतल्या अंगणात रात्री जा. तिथली भाकरी-भाजी अन् वाफाळत्या भाताचं जेवण करा, आणि आकाशाकडं बघत बघत तिथंच अंगणात पथारी पसरून ताणून द्या. पडल्या पडल्या जी झोप तिथं लागते ना, तिला ‘सुखाची झोप’ म्हणतात. दुपारच्या सुमारास बांधावरच्या एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसून तर बघा. सूर्य उतरणीला लागला की, त्याच्या केशरी प्रकाशात एखाद्या ओढ्यात मनसोक्त डुंबून बघा. ऑनलाईन गेम्स खेळण्यापेक्षा एखाद्या वाडीतल्या मुलांसोबत कोंबड्या पकडून डालग्यात कोंबण्याचा खेळ खेळून बघा. रात्री मारुतीच्या देवळात भजनाला जा. तुम्हाला असं काहीतरी नक्की गवसेल, जे कदाचित शब्दांत व्यक्त करता यायचं नाही. पण जो आनंद आणि समाधान तिथल्या वास्तव्यात मिळेल, तो कुठल्याही मॉलमध्ये नाही मिळणार, हे नक्की.
असा आनंद, उत्साह घरबसल्या मिळणार नाही. त्यासाठी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडायला हवं अन् मोकळेपणानं स्वतःला निसर्गाशी जोडता यायला हवं. आपलं शहरी शहाणपण सोडून देऊन प्राणी, पक्षी, झाडं, वेली, जंगलं, लेणी, मंदिरं यांच्या सानिध्यात रहायला हवं. आपल्या मुलांना मुक्त करुन पहा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहराची जी नवी पालवी फुटेल ना, ती शब्दातीत असेल…!
(चित्र साभार फेसबुक वाल – श्री मयुरेश उमाकांत डंके)
माणसाचं मन किती विचित्र असतं ! मृत्यू अटळ आहे हे समजायला लागल्यापासूनच माणसाला अमरत्वाची सुद्धा स्वप्नं पडू लागली. अमरत्त्व ही अशक्य गोष्ट आहे हे माहीत असूनही मानव अमरत्वाच्या संकल्पनेकडे सरकण्याचा प्रयत्न करतोच आहे. अगदी हजारो वर्षापासून ! या प्रयत्नाचा एक महत्वाचा टप्पा मानवानं या शतकात मात्र गाठला आहे असे म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे अवयव प्रत्यारोपण.
१९०५ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझे नेत्र दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील‘
१९५४ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझी मूत्रपिंडे दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील ‘
असं करता करता तो आज म्हणू शकतोय कि ‘ मी मरेन पण माझे हृदय, फुफ्फुसे, हाडं, कुर्च्या, मगज, यकृत, स्वादुपिंड, आतडी, प्लिहा हे सर्व अवयव कुणाच्या ना कुणाच्या शरीरात जिवंत राहू शकतील, मी मरेन पण अवयव रूपी उरेन !’
मानवाचा अमरत्वाच्या वाटेवरून चाललेला हा प्रवास, वैद्यकशास्त्राच्या संशोधनातूनच या टप्प्यावर पोहोचला आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या जेवढ्या जास्तीत जास्त शस्त्रक्रिया होतील तेवढे हे संशोधन पुढे पुढे जाईल. तसेच वरील अवयवांच्या यादीत अधिकाधिक भर पडत जाईल आणि प्रत्यारोपणाच्या यशस्वितेची टक्केवारी वाढत जाईल हे नक्की.
पण हे सगळं घडण्यासाठी मुख्य गरज आहे ती हा विषय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि हे शिवधनुष्य पेलण्याची.
२०१५ मध्ये जे जे हॉस्पिटल मध्ये अवयवदान कार्यकर्त्यांची एक सभा वसईच्या देहमुक्ती मिशनचे प्रमुख श्री पुरुषोत्तम पवार यांच्या प्रयत्नाने आयोजित केली गेली होती. त्यावेळी श्री पवार यांनी असा प्रस्ताव मांडला की आपण सर्वच आपापल्या भागात उत्तम काम करत आहोत. परंतु आपण सगळे एक होऊन जर कामाला लागलो तर खूप मोठ्या प्रमाणावर हे कार्य राज्यभर उभे राहू शकेल.
आणि
सर्वांच्या संमतीने एका मोठ्या महासंघाची स्थापना करण्याचा संकल्प झाला. त्यानुसार श्री पुरुषोत्तम पवार यांच्या बरोबर दधिची देहदान समिती, मानव ज्योत, जीवन ज्योत, सुमती ग्रुप अशा प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या श्री सुधीर बागाईतकर, श्री विनोद हरिया, श्री. कुलीनकांत लुठीया, श्री. विनायक जोशी या कार्यकर्त्यांनी देखील या महासंघासाठी चंग बांधला.
या सर्वांच्या प्रयत्नातून २०१६ मध्ये महाराष्ट्रातील अवयवदान क्षेत्रातील अनेक सदस्यांशी संपर्क करून एक राज्यव्यापी कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबई मुलुंड येथे, महाराष्ट्र सेवा संघ यांच्या सहकार्याने आयोजित केले. या अधिवेशनात डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिनगारे, नागपूरचे चंद्रकांत मेहेर इत्यादी मान्यवर मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतात ज्यांच्यावर २००३ मध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले होते, असे नाशिक येथील डॉ. भाऊसाहेब मोरे यांना पाचारण करण्यात आले होते.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील संस्था व कार्यकर्ते महासंघाशी जोडले गेले. सतत दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकालानंतर दिनांक १७ मे २०१७ रोजी महासंघाची सरकार दरबारी नोंद होऊन नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत झालेला हा महासंघ म्हणजे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.
त्याच दरम्यान नाशिक येथून पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पालथा घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले आणि पहिली नाशिक ते आनंदवन अशी ११०० किलोमीटरची पदयात्रा आयोजित करणारे श्री सुनील देशपांडे यांच्याशी श्री पुरुषोत्तम पवार यांनी संपर्क साधला. श्री देशपांडे यांच्या उपक्रमाला फेडरेशनचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्या पदयात्रेच्या यशस्वीतेनंतर त्यांना फेडरेशनमध्ये सामील करून घेऊन ही पदयात्रां ची संकल्पना पुढे महासंघामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली गेली. चार पदयात्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जवळपास सर्व जिल्हे पादाक्रांत केले गेले.
महासंघाचे विविध कार्यकर्ते संलग्न संस्थांचे कार्यकर्ते आणि पदयात्रांच्या माध्यमातून हजारो कार्यक्रमांच्या आयोजनातून लाखो लोकांपर्यंत अवयवदानाचा विषय महासंघाने नेऊन पोहोचवला.
आज १७ मे २०२४ रोजी या संस्थेला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
(अर्थात संस्थेचे कार्य नोंदणीपूर्वीच चालू झाले होते त्या दृष्टीने नऊ वर्षे म्हणता येतील. परंतु कोरोनाची दोन वर्षे सोडून देऊ. ) परंतु या सात वर्षात संस्थेने खूप मोठा पल्ला गाठला आहे.
वैद्यकीय संशोधनातून माणसाला मृत्यूच्या पाशातून सोडवण्यासाठी संशोधक झटत असले तरी त्याचा उपयोग व उपभोग माणसाला घेता यावा यासाठी समाज प्रबोधन व जनजागृतीची फार मोठ्या प्रमाणावर गरज असते. सामाजिक संस्था, रुग्णालये व प्रसिद्धी माध्यमांनाच यासाठी झटले पाहिजे.
ही गोष्ट वेळीच जाणून घेऊन दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन
ही संस्था या जनप्रबोधनाच्या कामामध्ये कार्यरत होऊन राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आठ वर्षे समाज प्रबोधन करत आहे.
प्रसिद्धी हे समाज प्रबोधनाचे अविभाज्य अंग आहे. यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याचीही फेडरेशन ला गरज आहे. अनेक प्रसिद्धी माध्यमांनी हे सहकार्य दिले सुद्धा आहे.
महाराष्ट्र राज्या मध्ये अवयवदानाला समर्पित आणि अवयवदानाच्या समाज जागृती व प्रबोधन कार्याची मुहूर्तमेढ रोवणारी राज्यस्तरीय संस्था म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई. ही संस्था आज प्रामुख्याने ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यभर पसरलेल्या आपल्या विविध जिल्हा शाखांमार्फत ही संस्था कार्यरत आहे. अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकारांनी सुद्धा या विषयात विशेष लक्ष घालण्याचे ठरवले असून तशा सूचना संबंधित कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. तरीही राज्यभर फेडरेशन मार्फत या सर्व सरकारी संस्थांच्या समन्वयातून चालू असलेल्या कार्याला तोड नाही हे कबूल करावेच लागेल.
अनेक वर्षांपूर्वी तामिळनाडू सरकारमध्ये ना. सुश्री (कै) जयललिताजी मुख्यमंत्री असताना या चळवळीला तेथे सरकारी पाठबळ मिळालं आणि या चळवळीने तामिळनाडू राज्यात चांगलेच मूळ धरले.
भारत सरकारने सन १९९४ मध्ये अवयवदानाचा कायदा संमत केला. त्या नंतर आजपर्यंत सरकारी पातळीवर काही यंत्रणाही निर्माण करण्यात आल्या आहेत.
अशा सर्व सरकारी यंत्रणांच्या समन्वयाने आणि त्यांना पूरक म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही राज्यस्तरीय संस्था आता राज्याबाहेर सुद्धा भरारी घेण्याच्या तयारीत आहेच, परंतु सध्या संपूर्ण भारत देशामध्ये विविध संस्थांच्या संपर्कात राहून फेडरेशन कार्याच्या कक्षा रुंदावत आहे.
कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यासाठी अधिकधिक प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून फेडरेशन सध्या भारतभर प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी संपर्क साधून आहे. स्वतःच्या अनुभवांच्या फायद्याची देवाण-घेवाण इतर संस्थांशी आणि कार्यकर्त्यांशी करण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षणाचे एक प्रारूप संस्थेने बनवले आहे. तीनस्तरीय महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान इत्यादी सर्व शारीरिक दाने) प्रशिक्षणक्रमाचे हे प्रारूप संस्था राबवित आहे.
असे असले तरी जनजागृतीच्या बाबतीत आपण सगळेच अजून खूपच मागे आहोत हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येईल. देशात प्रत्यारोपणासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे दोन लक्ष मूत्रपिंडांची गरज असते त्यापैकी सध्या ६००० पेक्षा जास्त मूत्रपिंडे उपलब्ध होऊ शकत नाहीत. ३०००० पेक्षा जास्त यकृतांची गरज आहे पण फक्त १५०० च्या जवळपास यकृतेच उपलब्ध होऊ शकतात. साधारण ५०००० हृदयांची गरज आहे पण फक्त १०० च्या जवळपास हृदयेच उपलब्ध होऊ शकतात. १ लक्ष डोळ्यांच्या गरजे पैकी २५००० पेक्षा जास्त नेत्र उपलब्ध होऊ शकत नाहीत. सध्याची परिस्थिती पहाता व दिवसेंदिवस अवयवांच्या गरजेची वाढती संख्या पहाता दर वर्षी आवश्यकता व उपलब्धता या मधील दरी वाढतच आहे. ही वाढती दरी भरून काढायची असेल तर अवयवदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे. या सर्व परिस्थितीवर एकच उपाय म्हणजे जनजागृती ! आता ही जबाबदारी प्रामुख्याने सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व प्रसिद्धी माध्यमांवरच येऊन पडते. म्हणूनच दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे समन्वयाने प्रबोधन करण्याचे कार्य आज सर्वांच्या डोळ्यात भरते आहे.
फेडरेशनला आज अनेकांच्या सक्रिय सहकार्याची आणि बरोबरीने वाटचाल करण्याची गरज आहे.
जनजागृती कार्यक्रमांना प्रसिद्धी माध्यमांकडून अधिक सहकार्य मिळावे. या संबंधीच्या मजकुराला प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा महत्वाचे स्थान मिळावे असे वाटते. पण त्याच बरोबर प्रसिद्धी माध्यमांनी आणि विविध कंपन्या आणि व्यापारी संस्था यांनी सुद्धा स्वतःहून कांही उपक्रमांचे आयोजन करणे ही आज काळाची गरज आहे.
असे काही आयोजन कोणी करणार असल्यास फेडरेशन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. फेडरेशनला सामाजिक दायित्व उपक्रम ( सी. एस. आर. ) यासाठी मंजूरी असून ज्या कंपन्यांकडे सीएसआर साठी निधी उपलब्ध असेल त्यांचे बरोबर समन्वय करून चांगले प्रकल्प राबवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे.
फेडरेशन ला मिळणाऱ्या देणग्यांसाठी ८०जी कलमाखाली आयकराची सवलत प्राप्त आहे.
विविध खाजगी व सरकारी यंत्रणा, रुग्णालये, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व प्रसिध्दी माध्यमे यांनी एकमेकांना सहकार्य करून विविध उपक्रमांनी अवयवदानासाठी लोक जागरणाची व्यापक मोहीम आखणे जरूर आहे. पण त्या नंतर सुद्धा सतत वरचेवर हा विषय व या विषयावरील चर्चा जागती ठेवली पाहिजे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रके (पोस्टर) स्पर्धा, पदयात्रा, सायकल रॅली, मोटारसायकल रॅली. चित्ररथ, घोषणा व फलकबाजी, पत्रके वाटप, पथनाट्ये, या विषयावरील कविता-गाणी, नाट्यछटा, एकांकिका, लेख, व्याख्याने वगैरे जे जे करता येईल त्या सर्व मार्गानी लोकांच्या पर्यंत या विषयाचे महत्व पोहोचवण्याची धडपड आज फेडरेशन करत आहे. हा विषय लोकांच्या डोक्यातून, कानातून मनात पोहोचला पाहिजे आणि मनामनात रुजला पाहिजे.
त्याही पुढे जाऊन मी म्हणतो, चांगले काम करायला औचित्य हवेच का ? हवेच असेल तर
१७ मे हा महासंघाचा म्हणजेच फेडरेशनचा वर्धापन दिन आहे, हे औचित्य काय कमी आहे ?
चला आपण जे कोणी सुजाण नागरिक आहोत, विचारवंत, समाज सुधारक जे कोणी आहोत त्या सर्वानी नक्की ठरवूया की काळाचे हे आव्हान पेलण्यासाठी आपण अवयवांची उपलब्धता व गरज या मधील दरी कमी करण्या साठी झटून प्रयत्न करूया !
त्यासाठी आपण फेडरेशनशी संपर्क साधावा.
फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन
६०१, कैलाशधाम , जी. व्ही. स्कीम रोड नंबर ४ मुलुंड, मुंबई ४०००८१
(पूर्वसूत्र – बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिध्दीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय!)
दत्तमहाराजांवरील बाबांची श्रद्धा उत्कट होती हे खरं पण रोजची पूजाअर्चा, जपजाप्य यासाठी फारसा वेळ ते देऊच शकायचे नाहीत.हे त्यांनी जरी मनोमन स्विकारलेलं असलं तरी गुरुचरित्राचं पारायण करायचं त्यांच्या बरेच दिवस मनात असूनही ते शक्य झालं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे घरी ती पोथी नव्हती, कुणाकडून तरी मागून घेऊन ती वाचणं बाबांना रुचणं शक्य नव्हतं आणि स्वतः पोथी विकत घेण्याइतकी सवड आर्थिक ओढग्रस्तीत त्यांना मिळालेली नव्हती.या गोष्टीची रुखरुख मात्र बरेच दिवस त्यांच्या मनात होतीच.ती अधिक तीव्र झाली त्याला निमित्त ठरलं वर्तमानपत्रात आलेल्या ‘ढवळे प्रकाशन, पुणे’ या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेच्या एका जाहिरातीचं! ती जाहिरात अनेक दिवस रोज ठळकपणे प्रसिद्ध होऊ लागली. गुरुचरित्राची कापडी आणि रेशमी बांधणी अशा दोन प्रकारची नवी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याची ती जाहिरात होती.त्यासाठी प्रकाशनपूर्व सवलतही जाहीर झालेली होती. शिवाय दहा प्रतींची ऑर्डर देणाऱ्यास एक प्रत मोफत मिळणार होती.ही सवलत अर्थातच पुस्तक विक्रेत्यांसाठी असल्याचे गृहित धरुन बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. एरवीही रेशमी बांधणीपेक्षा कापडी बांधणीच्या प्रतीची किंमत कमी असूनही ती प्रत विकत घेणंही बाबांच्या आटोक्यात नव्हतंच.या पार्श्वभूमीवर अचानक एक दिवस गुरुचरित्राच्या रेशमी बांधणीची एकेक प्रत विकत घेणारे अनेक इच्छुक बाबांना येऊन भेटले व त्यांनी बाबांना सहकार्य करण्याची विनंती केली. ‘आमच्या प्रत्येकी एकेक अशा प्रतींची एकत्रित नोंदणी करणे, त्या व्हीपीने येतील तेव्हा ती व्हीपी सोडवून घेणे हे व्याप दहाजणांनी आपापले करण्यापेक्षा आम्हा दहा जणांचे पैसे आधीच गोळा करून ते आम्ही तुमच्याकडे देऊ.तुम्ही एकत्रित दहा प्रतींची ऑर्डर बुक करा म्हणजे आमचे काम खूप सोपे होईल.त्या बदल्यात दहा प्रतींवर मिळणारी रेशमी बांधणीची एक मोफत प्रत तुम्ही तुमच्यासाठी ठेवून घ्या’ असा त्यांचा प्रस्ताव होता. यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. बाबांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि घरबसल्या त्या सर्वांचं काम तर झालंच आणि कांहीही पैसे खर्च न करता गुरुचरित्राची एक प्रत आणि तीही रेशमी बांधणीची बाबांना घरपोच मिळाली. त्याक्षणीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरणार नाही.मी माझ्या त्या बालवयात अंत:प्रेरणेनेच त्या पोथीतला रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली होती.ते माझं दत्तसेवेच्या वाटेवरचं पहिलं पाऊल होतं! पुढे कालांतराने आम्ही सर्व भावंडे स्थिरस्थावर झाल्यावर नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेलो तरी पुढे अनेक वर्षे ती गुरुचरित्राची पोथी माझ्या देवघरात मी बाबांकडून मिळालेला प्रसाद या भावनेनेच जपली होती.ती पोथी हाताळताही न येण्याइतकी जीर्ण होईपर्यंतच्या प्रदीर्घकाळांत गुरुचरित्राचे नित्य वाचन, पारायण हे सगळं माझ्या आनंदाचाच एक भाग होत वर्षानुवर्षे माझ्या अंगवळणीच पडून गेलं होतं!
माझ्या हातून यथाशक्ती सुरू असणाऱ्या दत्तसेवेचं समाधान आणि आम्हा भावंडांच्या पाठी असणारी आई बाबांची पुण्याई माझ्यादृष्टीने अतिशय मोलाची होती हे खरे, पण म्हणून त्यामुळे माझ्या पुढील जीवनवाटेवर खाचखळगे आलेच
नाहीत असं नाही.किंबहुना मिळेल त्या दिशांचा परस्पर वेगळ्या वाटांवरचा आम्हा सर्वच भावंडांचा प्रवास क्षणोक्षणी आमची कसोटी पहाणाराच होता.
माझ्या आयुष्यातल्या अशा अस्थिर प्रवासाला सुरुवात झाली तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्या नेमक्या क्षणी स्वतः पूर्णतः परावलंबी होऊन अंथरुण धरलेल्या माझ्या बाबांनी त्यांच्या अंत:प्रेरणेने मला दिलेली अमूल्य भेट मी आजही जपून ठेवलेली आहे. तो सगळाच प्रसंग आत्ता या क्षणी पुन्हा घडत असल्यासारखा मला स्पष्ट दिसतो आहे!
अर्थात या आधी सांगितलेल्या कांही मोजक्या आठवणींच्या तुलनेत खूप वर्षांनंतरची ही गोष्ट आहे.बाबा निवृत्त होईपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झालेली होती. आई, बाबा न् आम्ही दोन भाऊ किर्लोस्करवाडी सोडून माझं कॉलेजशिक्षण सोयीचं व्हावं म्हणून मिरजेत रहायला आलो होतो. लहान मोठी नोकरी करत राहिलेल्या माझ्या मोठ्या भावाला माझं काॅलेज शिक्षण संपण्याच्या दरम्यान नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळून त्याचं पोस्टिंग इस्लामपूरला झालं होतं. आम्ही सर्वजण मग मिरज सोडून तिकडे शिफ्ट झालो.
तिथे गेल्यानंतर काही दिवसातच बाबांनी अंथरूण धरलं ते अखेरपर्यंत त्यातून उठलेच नाहीत. त्याच दरम्यान मला मुंबईत एक जेमतेम पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी आली, तेव्हा ती स्वीकारून चांगल्या नोकरीच्या शोधात रहायचं असं ठरलं आणि मी माझी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. तोवर घर सोडून मी कुठे बाहेर गेलेलो नव्हतो. मुंबई तर पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. त्यामुळे जायचं ठरलं त्या क्षणापासून मनावर एक विचित्र असं दडपण होतं आणि अनामिक अशी भीतीही. निघायच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना देवघरातल्या पादुकांवर मी फुलं वाहू लागलो आणि माझे डोळे भरून आले. गुरुचरित्राच्या पोथीलाही मी फुलं वाहून नमस्कार केला तेव्हा ‘माझं तिथं सगऴं व्यवस्थित मार्गी लागू दे’ हा विचार मनात नव्हताच. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या पादुकांच्या नित्यपूजेत मात्र आता प्रदीर्घ काळ खंड पडणार आणि गुरुचरित्र नित्यवाचनही जमणार नाही या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालो होतो. ‘मला अंतर देऊ नका..’ अशी कळवळून मी केलेली प्रार्थना आजही मला आठवतेय.आश्चर्य म्हणजे माझ्या मनातली ती कळकळ दत्तगुरुपर्यंत पोचल्याची प्रचिती मला घर सोडण्यापूर्वीच मिळाली आणि तीही अंथरुणावर निपचित पडून असलेल्या बाबांच्यामार्फत! हे सगळं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं तर होतंच पण आजही तितकंच अनाकलनीय!
निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला गेलो, तेव्हा बाबा थोडे अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं.
“जपून जा.” अंथरुणावर पडल्यापडल्याच ते म्हणाले. मी नमस्कारासाठी वाकणार तेवढ्यात आपला थरथरता हात कसाबसा वर करीत त्यांनी माझा आधार घेतला आणि ते महत्प्रयासाने उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.
” तुला काय देऊ?” त्यांनी विचारलं
खरंतर पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी माझी अपेक्षा नव्हतीच आणि तसं कांही देण्यासारखं त्यांचं स्वतःचं असं लौकीकार्थानं त्यांच्याजवळ काही नव्हतंही. पण अलौकिक असं खूप मोलाचं कांही देण्याचा ते विचार करत असतील असं माझ्या मनातही आलं नव्हतं.उलट ‘तुला काय देऊ?’ या त्यांच्या प्रश्नात मला काय हवंय यापेक्षा आपण याला काही देऊ शकत नाहीय हीच खंत त्यांच्या मनात होती असंच मला वाटून गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून तत्परतेने मी म्हणालो,
“बाबा, खरंच कांही नको. आशीर्वाद द्या फक्त”
ते स्वतःशीच हसले. त्या स्मितहास्यात एक गूढ अशी लहर तरंगत असल्याचा मला भास झाला. त्यांनी मला स्वतःजवळ बसवून घेतलं. थोपटलं. आपला थरथरता हात अलगद माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाले,
“बाळा, आशीर्वाद तर आहेतच रे. आणि ते नेहमीच रहातील. एवढ्या मोठ्या कामासाठी जातो आहेस, मग कांहीतरी द्यायला हवंच ना रे?..” बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला.तिथली त्यांची डायरी उचलली.त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढला आणि तो माझ्यापुढे धरला..
“घे.हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत असं समज. नीट जपून ठेव.रोज याचे नित्य दर्शन घेत जा.तीच तुझी नित्य सेवा .तोच नित्यनेम.सेवेत अंतर पडेल ही मनातली भावना काढून टाक.या फोटोच्या रुपात महाराज तुझी सोबत करतील. सगळं सुरळीत होईल.काळजी नको.”
मी भारावलेल्या अवस्थेत त्यांचा शब्द न् शब्द मनात कोरुन ठेवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.कृतज्ञतेनं बाबाकडे पाहिलं. सकाळी पूजा झाल्यानंतर मी पादुकांसमोर, पोथीसमोर डोकं टेकवलं तेव्हाची माझ्या मनातली कातरता मला आठवली आणि आताची बाबांच्या नजरेतली चमक आणि त्यांच्या शब्दात भरून राहिलेला, मला स्वस्थ करणारा गाभाऱ्यातूनच उमटल्यासारखा त्यांचा अलौकिक स्वर …मी अक्षरशः अंतर्बाह्य शहारलो. त्याच मनोवस्थेत त्यांच्या हातातला तो फोटो घेतला आणि त्यांना नमस्कार केला.
तो एक अतिशय छोट्या आकाराचा दत्ताचा फोटो होता! छोटा आकार म्हणजे किती तर आपल्या बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा न् फार तर एका पेराएवढ्या रुंदीचा. पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं!
या दत्तरूपानं मला पुढं खूप कांही दिलंय. पण प्रकर्षाने कृतज्ञ रहावं असं काही दिलं असेल तर ते म्हणजे बाबांच्या वाचासिद्धीची थक्क करणारी प्रचिती! ती कशी हे सगळंच सांगायचं तर तो एक वेगळाच प्रदीर्घ लेखनाचा विषय होईल. पण माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अवेळेला, माझी कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांच्या वेळी किंवा अगदी उध्वस्त करू पहाणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा दिलीय ती या दत्तरूपानेच!
आज इतक्या वर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय! आजही त्याचे नित्य दर्शन मी घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडीत असणारी माझ्या बाबांची आठवणसुध्दा!