मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृतीचा ऱ्हास — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ संस्कृतीचा ऱ्हास — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज राखी पौर्णिमा !भाऊ नी बहिणीचे नाते दृढ करण्याचा दिवस !रेशीम धागा बांधूनही वज्राहून कठीण, बंध तुटता तुटणार नाही असे मनाने मनाशी बद्ध होण्याचा क्षण !! भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाते. हातावर रेशीम रेशमी राखी बांधते ••••आणि औक्षण करून भावासाठी दीर्घायु प्रार्थना करते ••••ही पारंपारिकता••• हे संस्कार •••मन मोहरून येते!! किती आनंद वाटतो हे सांगायला नकोच••••

आपले हे संस्कार  पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे ••• हे पण आपल्यावर झालेले संस्कार ! मग विचार आला ••• हे सगळे आपल्या पिढीपर्यंत ठीक होते ••• पण आजच्या युगात एक अपत्य असणार आहे. मग त्यांना बहिण भावाचे नाते कसे कळणार ?

त्यातल्या त्यात  ही पिढी सुद्धा बरीच म्हणावी लागेल. कारण आपल्याला बहिण-भाऊ असल्याने मुलांना  काका, मामा, मावशी, आत्या, ही नाती आहेत; त्यामुळे चुलत, मामे, मावस, आते बहीण किंवा भाऊ पण आहेत. त्यामुळे आताची ही पिढी  याच बहिण-भावां समवेत रक्षाबंधन करू शकत आहे ; पण पुढे काय? या पिढी नंतरची पिढी ••• म्हणजे या एकुलत्या एक अपत्याला, एकुलते एक अपत्य. मग त्यांना तर काका, मामा, मावशी, आत्या असणारच नाही. पर्यायाने असे बहिण-भाऊ पण असणार नाहीत. मग आपली ही गोड पारंपारिकता, आपली इतकी चांगली संस्कृती, पुढे जाणार कशी?

काळाची हीच पावले ओळखून त्या दृष्टीने आपण काही गोष्टी का अनुसरू नयेत  ? स्वतंत्र भारतापासून आपण नेहमी प्रतिज्ञेत म्हणतो ;सारे भारतीय माझे बांधव आहेत••• मग हे वाक्य फक्त प्रतिज्ञा पुरते न मर्यादित ठेवता ;खुल्या मनाने आपणच काही नाती निर्माण केली पाहिजेत. अलीकडे बऱ्याच जणी जवानांना राखी पाठवून सैनिक हे देशाचे, पर्यायाने आपलेही रक्षण करतात; म्हणून ते भाऊ झाले, या भावनेतून त्यांच्याशी बहिण-भावाचे नाते दृढ करू पाहतात. किती उत्तम उदात्त विचार आहे पण यातून खंत वाटते आपण ज्यांना राखी पाठवतो तो भाऊ कोण आहे हेच आपल्याला कळत नाही जीवन भरात एकदा का होईना पण आपण पाठवलेला  राखी भाऊ आपण पहावे हे येथेच ना मनात पण मग जेव्हा कोणी कोणताही जवान दिसेल तोच आपला भाऊ मानायचे आणि उगीच मनाचे समाधान करून घ्यायचे. यातून खरेच हेतू साध्य होतो का ?जरी हेतू साध्य नसेल होत तरी भावनिक बंध निश्चित निर्माण होतात •••

पण मग यातूनच हा क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, जातीयवाद धर्मवाद सगळे बाजूला सारून, अशी नाती आपणच निर्माण करायला पाहिजेत. असे वाटते. आपण आपल्या आजूबाजूची, परिचयाची, वेगळ्या धर्मातील, वेगळ्या जातीतील, व्यक्तीला बहिण भाऊ मानून, त्यांच्याशी असे नाते प्रस्थापित केले पाहिजे. म्हणजे मग हाच आदर्श आपली पुढची पिढी जे एकुलते एक आहेत ते डोळ्यापुढे ठेवतील.

; आणि नकळत त्यांचे एकटेपण दूर होण्यास मदत होईल. रक्ताच्या नात्या पेक्षा ही मानलेली नाती जास्त महत्त्वाची असतात.

नुसतेच वेगवेगळ्या जाती-धर्माचे बांधव करणे गरजेचे नाही तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांगगृहे येथील काही जणांना अगदी व्रत घेतल्यासारखे तेथे जाऊन हा दिवस साजरा केला ;तर त्यांना सुद्धा आपले कोणी आहे, हा विश्वास, जो त्यांना मिळणे अत्यंत गरजेचे असते ; तो विश्वास ते नाते आपण दृढ केले पाहिजे.

खरंच असे रक्षाबंधन मनापासून प्रसिद्धीसाठी नव्हे जर आपण सुरू केले तर खऱ्या अर्थाने हा आदर्श आपण नव्या पिढीपुढे स्थापन करू शकू ;आणि एवढी गोड परंपरा, एवढी चांगली संस्कृती हिचा र्‍हाद न  होता ती वेगळ्या प्रगल्भ अर्थाने वृद्धिंगत होईल ••••आणि खरोखरच आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनाच म्हणावे वाटेल••••एक सोडून बाकी साऱ्या बंधू-भगिनींनो••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘रक्षाबंधन…’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

‘रक्षाबंधन…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

“मणीबंधावर जरी हे कंकण।

तरी हृदयातील उजळे कणकण।”

आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीची थोरवी किती वर्णावी ? असे म्हटले जाते की परब्रह्माचे वर्णन करता करता वेद ही निःशब्द झाले. आणि तेही “नेति नेति… ” असे म्हणू लागले. हीच गोष्ट आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मास पूर्णपणे लागू होते असे आवर्जून सांगावेसे वाटते.

भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।२।। अशी प्रार्थना माउलींनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. अखिल विश्वातील प्रत्येक घटकामध्ये नुसते सामंजस्य नव्हे तर ”मैत्र भाव असावा” असे म्हटले आहे. ‘मैत्री’ आणि ‘मैत्र’ यामध्येही मूलभूत फरक आहे. इथे जन्मणाऱ्या प्रत्येक जीवास मैत्र लाभावे आणि त्याचे जीवन उजळून निघावे यापेक्षा उदात्त भावना कोणती असू शकेल ? 

लग्नात भावाच्या खांद्यावरील शेला वहिनीच्या शालीला बांधणारी ताई/बहीण, ‘गृह’ प्रवेशाच्यावेळी ‘मला तुझी मुलगी सून म्हणून दे’ असे मायेच्या हक्काने मागणारी बहीण आज न्यायालयात कमीअधिक प्रमाणात इस्टेटीसाठी भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे…! आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना आपण पहात असू.

याउलट, बालपणी कौतुक करणारा, वाढदिवसाला कॅडबरी आणणारा, स्वतःच्या खिश्याला  कात्री लावून बहिणीला पैसे देणारा भाऊ बहिणीकडे भाऊबीजेसाठी जाताना दिसत आहे असे म्हणता येत नाही…

… तो व्हाटसपप वर शुभेच्छा देऊन आणि एक दोन स्मायली टाकून आपले कर्म उरकताना दिसत आहे…

सध्या भाऊ बहिबहिणीच्या या पवित्र नात्यातील अकृत्रिम स्नेह संपून त्यात अनामिक कृत्रिमता आली आहे की काय ?  असे वाटावे अशी स्थिती आहे…

*द्रौपदी- श्रीकृष्ण’ यासारखे शुद्ध नाते सध्या फक्त पुस्तकात राहिले आहे का ? असे नाते संबंध ज्या भारतात उदयास आले तिथे आज अशी परिस्थिती असावी ? याचा विचार प्रत्येक बहीण भावाने अवश्य करावा…

आज हे सर्व लिहिताना माझ्या मनात लेखक म्हणून, एक भाऊ म्हणून संमिश्र भावनांचे ‘कल्लोळ’ आहेत, कदाचित आपल्या मनातही तसेच असेल…. ! एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली भावंडे मोठी झाल्यावर इतकी का बदलत असातील ? नात्यात तूट येते की मनात फूट पडते ?  नात्यातली अकृत्रिम स्नेहाची भावना जाऊन त्यात कोरडा व्यवहार का यावा?  आणि तो नक्की कधीपासून लागला ? 

शिक्षण वाढलं म्हणून की? खिशात पैसा वाढला म्हणून? अंगावरील वस्त्रे बदलली म्हणून की घरातील सुब्बता वाढली म्हणून ?

सर्व भाऊबहिणींनी याचा शांतपणे विचार करावा, खिशात काही नसताना, घरात काहीही नसताना, माझी भावंडं माझ्या सोबत आहेत, हेच  आनंदी राहण्यासाठी पुरेसे असे…. ! शाळेत घडलेली एखादी  घटना/ गंमत कधी एकदा आपल्या भावंडांना सांगतो आहे असे होत असे…. ! आज तसे पुन्हा व्हावे असे प्रत्येकाला वाटतं असेल, हो ना? मग चांगल्या गोष्टीत आपणच पुढे व्हायला हवे… ! आपण आनंद निर्माण करावा आणि तो सर्वांना मुक्तहस्ते वाटावा हे सर्वात चांगले आणि सर्वांच्या हिताचे….

रक्षाबंधनाच्या शुभदिनी आपण असा प्रयत्न करून पाहू. आपण सर्वांनी ठरविले तर समाजामध्ये काही दिवसांत याचे आशादायक आणि उबदार चित्र दिसू लागेल.

आज सर्व जण आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतील, तिला आपापल्या ऐपतीनुसार भेटवस्तू देतील/घेतील. मनात प्रश्न निर्माण होतो की ज्या देशात अशा उदात्त संकल्पनांचा जन्म झाला, त्यांचे संवर्धन झाले आणि त्याच देशात स्त्रियांवर अनेक प्रकारचे अत्याचार व्हावेत! यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे बंध तो दिवस साजरा करून संपला की जीर्ण होतात की नष्ट होतात?  आपण फक्त सोहळे साजरे करतोय का? नक्की यामागे काय कारण असू शकेल? आपण सर्वांनी ‘समाज’ म्हणून यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

चिंतन करताना असे ही लक्षात आले की आपण फक्त आपल्या मुलांना एकमेकांना राखी बांधण्यास सांगितली, पण त्यामागील विशाल आणि उदात्त दृष्टिकोन, थोडक्यात त्यामागचे ‘मर्म’ समजावून सांगण्यात आणि त्याप्रमाणे आचरण करण्यात आपण समाज म्हणून थिटे पडलो असेच खेदाने म्हणावेसे वाटते. आजची परिस्थिती पहाता ‘पारंपरिक’ पद्धतीने हा सण साजरा करून चालणार नाही. आज प्रत्येकाने एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आपल्याकडे व्यापक अर्थाने सांगितले जाते.

“धर्मो रक्षति रक्षित:।”

आज आपण ना धड शुद्ध मराठीत बोलू शकत ना हिंदीत ना इंग्रजीत. आपण तीनही भाषांची मिसळ करुन एक वेगळीच भाषा निर्माण केली आहे असे दिसते. “जशी भाषा तशी संस्कृती”. त्यामुळे आपल्या संस्कृतीचाही ऱ्हास होत आहे. पाश्चात्यांचे अनेक सण आपण आज ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणून आनंदाने साजरे करतो. पण आपले  जे सण (सर्वच सण!!) खऱ्या अर्थाने वैश्विक जाणीव निर्माण करणारे आहेत त्या सणांचा प्रसार आणि प्रचार आपण जगभर का करू शकलो नाही. आपण त्याचा विचार केला नाही की आपल्याला त्याची जाणीवच झाली नाही ? या सर्व गोष्टींचे चिंतन आपण सर्वांनी आजच्या मंगलदिनी करावे अशी माझी नम्र विनंती आहे. आपण सर्व सुजाण वाचक आहात, त्यामुळे माझ्या विनंतीचा आपण उचित आदर कराल, असा विश्वास वाटतो.

देशावर आज अनेक संकटे आहेत, अनेक समस्या आहेत. या सर्व प्रश्नांचे बिरबलाच्या कथेप्रमाणे एकच उत्तर आहे ते म्हणजे ‘हिंदू’ संघटन!! ( हिंदू म्हणजे तो फक्त जन्मांने हिंदू नव्हे तर या देशाला, भारतमातेला आपली आई मानणारा कोणीही असेल, त्याची उपासना पद्धती कोणतीही असेल ). आपण सर्वांनी त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरे करू. या पवित्र दिनी मी माझ्या भारत मातेसाठी काय करू शकतो, याचा विचार आपण करू. एका गीताने लेखाचा समारोप करतो.

करी बांधु या पवित्र कंकण॥ धृ॥

इतिहासाच्या पानोपानी पुर्व दिव्य ते बसले लपुनी।

रम्य भविष्याची त्यामधुनी भव्य मंदिर पुनश्च उभवुन॥१॥*

*

निजरुधिराची अर्घ्ये अर्पुन ज्यांनी केले स्वराष्ट्रपूजन।

कॄतज्ञतेने तयांस वंदुन कर्तव्याचे करु जागरण॥२॥

*

स्वार्थाचे ओलांडुन कुंपण व्यक्तित्वाचा कोषहि फोडुन।

विसरुन अवघे अपुले मीपण विराट साक्षात्कार जागवुन॥३॥

*

जो ‘हिंदू’ तो अवघा माझा घोष एक हा फिरुन गर्जा।

मुक्तिमार्ग हा एकच समजा अन् सर्वाना द्या समजावुन॥४॥*

*

भारतमाता की जय 🇮🇳

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वनदेवीच्या आश्रमहरिणी…’ ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

अल्प परिचय : 

  • 28 वर्षे डिफेन्स अकाउंट्स मध्ये नोकरी.
  • वृत्तपत्रे नियत कालिके यामधून  नित्य आणि नैमित्तिक लेखन.
  • स्वर-प्रतिभा या संगीत विषयाला समर्पित दिवाळी अंकाचे संपादन.
  • चित्रपटाच्या संगीताच्या सुवर्ण युगाची चाहती, अभ्यासक, , मुलाखतकार, स्तंभ लेखिका..
  • संशोधन, संपादन, शब्दांकन  यात कार्यरत.
  • गेली चार दशके सातत्याने लेखन करत आहे.

🔅 विविधा 🔅

‘वनदेवीच्या आश्रमहरिणी…☆ श्री सुलभा तेरणीकर

या कहाणीतले आटपाटनगर आहे पुणे; पण ही कहाणी मात्र काहीच उणे नसलेल्या पुण्याची नाही. गतवैभवाच्या खुणा लोपल्याबद्दल खंत वाटणाऱ्या मनासाठी शाब्दिक सांत्वन नाही, विस्मृतीचं दु:खरंजन नाही; पण त्यात कालप्रवाहाची मोठी वळणे आहेत. पिढ्यांच्या उदयास्ताच्या पाऊलखुणा आहेत. ‘हिंगण्याच्या माळावर’ या कावेरीबाई कर्वे यांच्या छोटेखानी पुस्तकातून माझ्यासमोर एका शतकाने स्वतःभोवती गिरकी घेतल्याचे दृश्य साकारते. मला तेच सांगायची उताविळी होते. कावेरीबाई कर्वे म्हणजे महर्षी कर्व्यांच्या सूनबाई. भास्करराव कर्व्यांच्या पत्नी. या पुस्तकात त्यांनी स्त्रीशिक्षण संस्थेचा इतिहास अशा काही हृद्य, पण संयमी शब्दांत लिहिला आहे, की हातातून पुस्तक सोडवत नाही. तो इतिहास, भूगोल, संस्कृतीचा आलेख आहेच; त्याशिवाय समाजमनाचे स्फुरण त्यात ठायी-ठायी विखुरलेले आहे. काळाच्या हृदयात जपलेल्या घटनांचा वेध त्यांनी अशा जिवंत भाषेत घेतलेला आहे, की ती आपल्यासमोर घडलेलीच वाटते…

त्यांच्या घरंदाज भाषेच्या शैलीत अण्णांचे जीवनचरित्र, संस्था, विकासाचे टप्पे, दैनंदिन कार्यक्रम, विद्यार्थिनींच्या आठवणी, कार्यकर्त्यांची निरलस सेवा यांची सुंदर गुंफण केलेली आहे. ते सर्वच सांगायचा  मोह होतो; पण त्यातल्या काही गोष्टी सांगायला हव्यातच.

१८९१ मध्ये धोंडो केशव कर्वे हे एक सामान्य माणूस होते, अशा शब्दांत सुरुवात करून शतायुषी, महर्षी, भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे या समर्पित व्यक्तीच्या जीवनाची, कार्याची, कर्तव्याची, कर्तृत्वाची सावली होऊन राहिलेल्या दीर्घायुषी संस्थेच्या इतिहासाची पाने त्यात उलगडतात.

हिंगण्याच्या रस्त्याबद्दल लिहितात- हिंगण्याचा रस्ता चालून येणं मोठं दिव्य असं. मृत्युंजय महादेवाच्या देवळापर्यंत कसाबसा रस्ता होता. त्यानंतर कालव्यावरून हिंगण्यास जावं लागे. बैलगाड्या जाऊन झालेल्या चाकोऱ्या व त्यात मिसळलेल्या पायवाटा हाच काय तो रस्ता. त्यावरून कोथरुडपर्यंत जाता येत असे. १९०९ मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क सपत्नीक आश्रमाच्या भेटीला आले असता, लोकल बोर्डानं वनदेवीपर्यंत कसातरी रस्ता केला; पण तिथून कालव्यावरच्या पुलापर्यंत झालेल्या प्रचंड चिखलावर फळ्या टाकल्या होत्या. त्यावरूनच गव्हर्नरसाहेब व बाईसाहेब चालत आश्रमापर्यंत पोहोचले…

संस्थेच्या लोकांना मात्र या दिव्यातून नेहमीच जावं लागे. म्हणून संस्थेतल्या महादेव केशव उर्फ तात्या गाडगिळांनी १९१९ मध्ये एक मंडळ स्थापन केलं. त्याचं नामकरण ‘वेडपट मंडळ’ असं झालं. त्यात संस्थेच्या मुलीदेखील सहभागी झाल्या. दर रविवारी वनदेवीच्या डोंगरावर आठ वाजता सारे जमत असत. मग वर गेलं, की मोठमोठे दगडधोंडे उचलून उतारावरून खाली लोटले जात. पुढच्या रविवारी पुन्हा हाच उद्योग. मग टेकडीच्या पायथ्याशी जमा झालेल्या दगडगोट्यांना रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकले जाई. त्यावर कुदळफावड्यांनी माती घालून सारखं केलं जाई. वर रणरणणारं ऊन, अणकुचीदार दगड, साप, विंचू याची तमा न करता अनवाणी पायानं ही वेडी माणसं राबत राहिली. पुढे त्याच वर्षी जिल्हा लोकल बोर्डानं रस्ता तयार केला आणि पुढे तर तो हिंगणे-पुण्याचा छानसा रस्ता तयार झाला.

आता पुणे- हिंगणे रस्त्यावरचे दुथडी भरून वाहणारे ते तीन ओढे नाहीत. काटेकुटे, खाचखळगे, अंधार, निर्मनुष्य रस्त्यावरचं भयदेखील नाही. वनदेवीचा डोंगरदेखील कापला गेला आहे. सिमेंटच्या जंगलानं त्याला गिळलं आहे. रस्त्यावरचे पुरातन वटवृक्षही गेले आहेत आणि त्यांनी धरलेल्या सावल्याही नाहीत. त्यावरचे पक्षी उडून गेले आहेत आणि त्या आश्रमहरिणी देखील गेल्या… स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संस्थेत शिकायला आलेल्या मुली शतकापूर्वी येण्याजाण्याच्या रस्त्यावर श्रमदान करीत; पण ते वेडपटांचं मंडळही गेलंच.

अण्णांच्या साठाव्या वर्षीची १९१८ची नोंद कावेरीबाई लिहितात-

वाढदिवसाला अण्णांचे मोठे बंधू भिकाजीपंत कर्वे मुद्दामहून आले होते. प्रथम मुलींची शिस्तबद्ध कवायत झाली. न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांचं बॅण्डपथक होतं. मूळ झोपडीपासून प्रगती होत गेलेल्या कार्यालयाच्या इमारतीपर्यंत स्त्रीशिक्षणाच्या विकासाचे फलक घेऊन मुली अण्णांपाशी येऊन थांबल्या. एका विधवा मुलीकडून व एका विद्यार्थिनींकडून, अशी दोन मानपत्रं अण्णांनी स्वीकारली, तेव्हा अण्णांना आनंदाश्रू अनावर झाले… ‘ 

‘१९३८ मध्ये १८ एप्रिलला अण्णांना ऐंशी पूर्ण झाली. संस्थेतल्या मुलींसाठी पोहण्याचा तलाव करण्याचं ठरलं. पहिली कुदळ अण्णांनी मारली. तलावाचं काम सुरु झालं. तलाव पाण्यानं तुडुंब भरला. पुढच्या वर्षी १८ एप्रिल १९३९ रोजी आंब्यांची पानं, पताका लावून तलाव सुशोभित केला होता. मुली, पाहुणे जमले. डॉ. खोत यांच्या वडिलांचं नाव तलावाला दिलं. ‘कृष्ण तलाव’. उद्घाटन प्रसंगी सर्वांत आधी तलावात अण्णा उतरले… ‘ .. संस्थेतल्या मुलींना पोहता यावे, अशी चालकांची जिद्द होती. वैधव्याने जीवनाच्या आनंदाला वंचित झालेल्या जखमी पक्षिणींना आकाशात भरारी मारता यावी म्हणून तर अण्णांनी हे कार्य आरंभले होते.

कावेरीबाईंनीं शतायुषी अण्णांच्या दीर्घायुषी संस्थेचा आलेख खूप तपशिलाने मांडलेला आहे. तो वाचताना वाटत राहिले- कार्य संपले, की त्याचे प्रयोजनही संपते.

मग आता वेगळे काय आहे तिथे? शतकाच्या कालप्रवाहात स्त्रीशिक्षणाच्या कार्याचा वृक्ष झाल्यावर या अण्णांच्या संस्थेचे -तिथल्या इतिहासाचे- खास महत्त्व काय आहे? सतीची चाल, विधवांचे प्रश्न, परित्यक्ता… एकेक प्रश्न सुटले. शिक्षणाचे मोल तर आम्हाला ठाऊक आहे. सामाजिक प्रश्नांची धार हळूहळू बोथट झालेली आहे…

माझ्या प्रभात फेरीच्या वेळी वनदेवीच्या डोंगरापलीकडच्या वस्तीतून रोज शाळेला जाणाऱ्या मुली चिवचिवताना दिसतात. त्या आमच्या मैत्रिणी सांगतात-‘आईला लांबून पाणी आणावं लागतं. पण आम्ही रोज अंघोळ करतो आणि शाळेला जातो. ‘ मला प्रश्नांची उत्तरे मिळतात. कर्व्यांच्या शाळेत जाणाऱ्या पोरींना शिकून डॉक्टर व्हायचे आहे. उद्या पाणी मिळेल. पक्की घरे मिळतील. पायात घालायला बूट देखील मिळणार आहेत त्यांना. अण्णांनी त्यांना स्वप्ने पाहायचे बळ शंभर वर्षांपूर्वीचे दिले आहे… कावेरीबाईंचे हिंगण्याचे माळरान बहरतेय. आश्रमहरिणी आता येतील- जीवनाच्या आनंदाची वाट शोधत…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रावण मास… एक उत्सव पर्व…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ श्रावण मास… एक उत्सव पर्व…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

सख्या रे श्रावणा…

रुणुझुणु पैंजण वाजे क्षणात

झरझरणारी तुझीच धारा

थरथरणारा अधीर वारा

पडघम वाजती नाद घुमे गगनात

रुणुझुणु पैंजण वाजे क्षणात

माझ्या काव्यातून उतरणारा हा श्रावण आणि याचे सौंदर्य, त्याचबरोबर याचे असलेले सांस्कृतिक महत्त्व, याला असलेले अध्यात्मिक स्थान आपण प्रस्तुत लेखात पाहूयात. पौर्णिमेच्या मागेपुढे श्रवण नक्षत्र येते. म्हणून श्रावण नाव असलेल्या या महिन्याला नभ व सावन ही उपनावे असून नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, पिठोरी अमावस्या या सण व उत्सवांचा आनंद श्रावणात मिळतो.

श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव संपन्न करतात. मुलींचे लग्न झाल्यावर पहिले पाच वर्षे हे व्रत घराघरात संपन्न करतात. त्यानिमित्ताने समाजातील सुवासिनींना आमंत्रित करून त्यांना भोजन घालणे व ओटी भरणे, रात्री मंगळागौर जागविणे हे कार्यक्रम होतात. त्यानिमित्ताने स्त्रिया संघटित होतात. आज-काल तर मंगळागौरीचे खेळ करताना स्त्रिया समाज प्रबोधनही मोठ्या प्रमाणात करत आहेत. उत्सवाचा आनंद घेत समाज प्रबोधन करणारा हा सण आहे.

श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे

बालकवींनी श्रावण मास या कवितेमध्ये ऊन पावसाचा खेळ खेळणाऱ्या या श्रावणात सगळीकडे असलेल्या हिरवळीमुळे मन कसे प्रसन्न होते याचे सुरेख वर्णन केले आहे. मंगळागौरीच्या पूजेची पत्री फुले गोळा करणाऱ्या मुलींचे सुंदर वर्णन केले आहे 

सुंदर परडी घेऊन हाती 

परोपकंठी शुद्धमती 

सुंदर बाला या फुलमाला 

रम्य फुले पत्री खुडती

रात्री मंगळागौरीला सोळा वातींची आरती ओवाळतात, कहाणी वाचतात, खेळ, नृत्य, फुगड्या, झिम्मा आधी प्रकाराने गौरीची आळवणी करून अखंड सौभाग्याचे वरदान मागतात.

श्रावण सोमवारी महादेवाची षोडशोपचार पूजा करतात. एकदा अन्न सेवन करून उपवास करतात. श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांना सुख समाधान लाभावे म्हणून जिवतीची कहाणी सांगतात. मुलांना ओवाळतात. तसेच श्रावणातील शनिवार हा शनि देवाचे स्मरण व्हावे म्हणून मुंजा मुलाला जेवू घालून साजरा केला जातो.

कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे सर्वम खल्विदम् ब्रह्म हा भाव असलेल्या भारतीयांनी पशुपक्षाची ही कृतज्ञ भावाने पूजा करण्याची प्रथा निर्माण केली. दूध देणाऱ्या गाईसाठी वसुबारस. शेतीची कामे करणाऱ्या बैलासाठी बैलपोळा तर शेतीचे उंदरापासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी.

सर्पाणाम् अस्मि वासुकि:॥ अनंतस् चस्मि नागानाम्॥

भगवान श्रीविष्णूच्या तमोगुणातून नागाची निर्मिती झाली. नागाचे मानव जातीवर अनंत उपकार आहेत. श्रीविष्णुला क्षीरसागरात बसण्यासाठी स्वतःच्या अंगाचे आसन करणारा शेषशाही नाग. विष प्राशन केल्यावर अंगाचा दाह नाहीसा व्हावा म्हणून आपल्या थंड शरीराचे वेटोळे घालून भगवान शंकरास आनंद देणारा नाग. गोकुळात यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियाच्या विषामुळे अनेक गाई, गोप मेल्याने भगवान गोपालकृष्णाने कालीयाला शिक्षा करून यमुनेतून हाकलून दिले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा आणि त्याची स्मृती म्हणून नागपंचमीचा सण घराघरात संपन्न केला जातो.

माझ्या माहेरी (मुरुडला) माझ्या बाबांच्या घरी श्रीयाळ षष्ठी म्हणजे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी मोठा उत्सव असतो. सकाळी सात आठ कुंभार घरी येतात काळी माती व राख मिसळून एक छान मातीचा किल्ला तयार करतात. त्याला सजवण्यासाठी करडई लावतात. वेगवेगळ्या फुलांनी त्याला सजवतात मग तो सुरेख चार बुरुजांचा वाडाच जणू दिसतो त्यामध्ये नागोबा ठेवतात व सर्वांच्या दर्शनासाठी तो ठेवला जातो. या दिवशी सासुरवाशीणी मुली आपल्या माहेरी येतात व 

चल ग सखे…. वारुळाला वारुळाला गं…. नागोबाला पूजायाला पूजायाला गं

हे गाणे म्हणत फेर धरतात. फुगड्या, झिम्मा खेळतात झाडाला झोके बांधून झोके घेतात. घरात नागोबाला दूध लाह्या वाहतात. औट घटकेच्या राज्यानंतर गौर सासरी जाणार म्हणून तिला वळवटाची खीर व कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो. हे कशासाठी तर त्या गौरीने वळून वळून परत माहेरी यावे ही सुरेख भावना यामागे आहे. श्रियाळ नावाच्या राजाचे राज्य म्हणजे श्रियाळ षष्ठी ह्या साडेतीन घटकात माझ्या बाबांचे घर माणसांनी गजबजून जाते. पुरुष पान सुपारीला व गौराईच्या दर्शनाला येतात तसेच स्त्रिया भरजरी साड्या दाग दागिने घालून फेर धरतात. गाणी म्हणतात. गौरीच्या विसर्जनाला जाताना खरोखरीच लेक सासरी जात असल्याचा भास होतो व सर्वांचे डोळे भरून येतात. लेकीची पाठवणी करतात तसे बँडबाजा सोबत वाजत गाजत गौरीला निरोप देऊन परत आल्यावर सर्व सुवासिनींची लाह्यांनी ( ज्वारीच्या ) ओटी भरली जाते. व कार्यक्रमाची सांगता होते. ग्रामीण भागात गावोगावी हा नागपंचमीचा सोहळा पहावयास मिळतो. नागपंचमीला राखी पंचमी असेही म्हणतात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे या गावी नागदेवतेची फार मोठी यात्रा भरते.

याच महिन्यात येणारा आपला राष्ट्रीय सण म्हणजे १५ ऑगस्ट ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या मंगल दिनाची स्मृती म्हणून स्वातंत्र्य दिन संपन्न केला जातो. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभा करून देशाचे पंतप्रधान ध्वजवंदन करून राष्ट्राला संबोधित करतात. आपल्या देशाला सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांचे बलिदान आठवण्यासाठी व स्वातंत्र्याचे मोल आपल्या सर्व पिढ्यांना समजावे यासाठी १५ ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो. प्रत्येक भारतीयांच्या मनात हीच भावना असते…. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा।

 येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबल:।

तेन त्वां अनुबंध्नानमि रक्षे मा चल मा चल॥

या मंत्राचा उच्चार करून बहीण भावाच्या हातात, भावाने आपले रक्षण करावे या सद्भावाने राखी बांधते. रक्षाबंधनाचा सण अनादी कालापासून चालत आला आहे. असूरांबरोबर युद्ध करताना आत्मविश्वास गमावलेल्या इंद्राला इंद्राणीने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली त्यामुळे त्याला आत्मविश्वास आला व त्याने असूरांचा पराभव केला. त्या मंगल घटनेची स्मृती म्हणून रक्षाबंधनाचा सण संपन्न केला जातो. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये चक्रव्यूह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यू निघाला तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली असा महाभारतात उल्लेख आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमा असते. त्या दिवशी सागराची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला उचंबळणारा सागर श्रावण पौर्णिमेला शांत होतो अशी कोळ्याची श्रद्धा आहे. आपल्या या सागरबंधूने मासे पकडण्यासाठी सागरात गेलेल्या आपल्या पतीचे रक्षण करावे म्हणून कोळ्यांच्या महिला सागराला राखी सोडतात व कोळी लोक सागर पूजन करून श्रीफळ अर्पण करतात. याच दिवशी यज्ञोपवित (जानवे) बदलण्यासाठी श्रावणी हा विधी संपन्न केला जातो.

कर्षति आकर्षति इति कृष्ण:।

जो सर्वांचे आकर्षण करतो तो कृष्ण. श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभराशीत असताना रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. असा कृष्ण आमचे आराध्य दैवत आहे. जो एक प्रेमळ सखा, भाऊ, प्रियकर, पती ह्या प्रत्येक रूपामध्ये आज आमच्या मनात विराजमान आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.

जन्म कर्म च मे दिव्यम्॥

माझा जन्म व कर्म सर्वच अद्भुत आहे. मी सर्वात असून कोणातही नाही आणि कुणाच्या कर्मात वा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही तर सर्वांना स्वातंत्र्य देतो. मला हाक मारणाऱ्या द्रौपदीसाठी मी वस्त्र घेऊन धावत येतो तर मला न विचारता द्यूत खेळणाऱ्या युद्धिष्ठीराचेच दुःख मी निवारण करण्याच्या भानगडी पडत नाही कारण कर्म करणाऱ्यांनी त्या कर्माचे प्रायश्चित्त भोगले पाहिजे. अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताची मी कधीही उपेक्षा करत नाही. धर्माला ग्लानी आली, सज्जनांना त्रास होऊ लागला तर मी जन्म घेतो.

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥

श्रीकृष्णाचे स्मरण व्हावे. त्यांच्या कार्याची महती पुढच्या पिढीला कळावी यासाठी आपण श्रीकृष्ण अष्टमी साजरी करतो. घरोघरी मातीचे गोप, गोपी, यशोदा इत्यादी सारे गोकुळ तयार केले जातात. मातीच्या पाळण्यामध्ये गोपाळकृष्ण व बलराम यांचा जन्मोत्सव केला जातो. डिंक वडा व सुंठवडा यांचा प्रसाद दिला जातो. श्रीकृष्णाचा पाळणा म्हटला जातो. सारे गोविंदा मिळून दहीहंडी फोडतात. समाजाचे एकत्रीकरण व त्यातून संस्कारक्षम उत्सव संवर्धन गोकुळाष्टमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घडून येते. बासरीचे स्वर, गोपीप्रेम, गीताज्ञान व निरपेक्षवृत्ती असलेले पूर्ण पुरुष भगवान श्रीकृष्ण भारतीयांचा आत्मा आहे.

श्रावण वद्य अमावस्येला बैलपोळा, मातृदिन व पिठोरी अमावस्या या सणांचे आयोजन केले जाते. बलिवर्द या संस्कृत शब्दापासून बैल हा शब्द निर्माण झाला. वृषभ, नंदी, बसव, गोपुत्र, कृषीमित्र, शिव वाहन या नावाने ज्ञात असलेला बैल प्रत्येक गावातील शिव मंदिरात असतो. या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन अंघोळ घालतात. अलंकार घालून मिरवणूक काढतात. घरी आल्यावर पूजा करून बैल व गाईचे लग्न लावून त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात. या दिवशी बैलाकडून काम करून घेतले जात नाही.

बंदीगृहात असलेल्या देवकीने गोकुळात यशोदेकडे राहणाऱ्या गोपालकृष्णासाठी मातृदिनाचे हे व्रत केले. या दिवशी आई आपल्या मुलाला मागे उभे करून, मुलाच्या डोक्यावर अक्षदा टाकून अतीत कोण असे विचारते तेव्हा अतिथ मी आहे असे मुलाने म्हटल्यावर, आई पुरणाच्या पुऱ्या, गव्हल्याची खीर व निरांजनासहित ते वाण आपल्या मुलाला देते. या दिवशी आईला नवीन वस्त्रे देऊन तिचा सन्मान करण्याची प्रथा आहे.

ज्या महिलांना मूल होत नाही व झालेले मूल जिवंत राहत नाही अशा महिला पिठोरी अमावस्येचे हे व्रत करतात. नदीवर जाऊन अप्सरांशी व आपल्या घरातील चौंसष्ठ योगिनींच्या चित्राची पूजा करून खीरपुरीचा नैवेद्य दाखवून हे व्रत संपन्न करतात. याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.

अशाप्रकारे श्रावण मासात पावसाच्या सरींबरोबर सणांच्या व उत्सवांच्या सरी देखील बरसत असतात व त्यात आपण चिंब भिजून जातो.

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हेच ते विसरून जातात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ हेच ते विसरून जातात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आभाळभर चांदण्यातला, एकटाच चंद्र कसा काय डोळ्यात भरतो.

पण तो कधी मोठा, कधी लहान होतो

तर कधी ठराविक मुदतीत गायब होतो.

टिमटिमणा-या चांदण्या तर कायमच असतात रात्रीच्या त्याच्या सोबतीला.

 

आपले अस्तित्व दाखवायला चंद्राला ही कसरत करावीच लागते.

कारण आपण कायमच क्षितीजावर राहिलो तर आवडते लोकही कानाडोळा करतील बघायला.

हे त्याने आपल्या मनात नक्कीच नोंदवून ठेवलेले असणार शहाण्यासारखे.

 

आरडाओरडा करत लोकांचे लक्ष वेधून घेणारे लोक काही कमी नाहीत या जगात,

टिचभर कर्तृत्वाची वावर पावती मागणारेही आहेत.

 

पदरमोड करून, लाचारीने, पाय धरून, ते ती मिळवतातच.

कारण त्या मागे त्यांचा भकास, उदास, कळकटलेला चेहरा उजळलेला फक्त त्यानाच दिसतो.

क्षणिक आत्मसमाधानासाठी, चमकण्यासाठी,

 

त्यांची केविलवाणी धडपड कामी येते काही काळ,

पण तिलाही शेवटी कंटाळून, वैतागून, प्रवाहपतित होवून जलसमाधीच घ्यावी लागते. हेच ते विसरून जातात… सोईस्करपणे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावण महिन्याची कहाणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ श्रावण महिन्याची कहाणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

एक मोठ्या मोठ्या उंच इमारतीचं नगर होतं. लोक खूप श्रीमंत होते. आधुनिक घरात रहात होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत होते. एका क्लिकवर सगळे पुढ्यात येत होते. भाजीपाला, सामान सगळे क्षणात दारात येत होते. हातात पैसाच पैसा होता. खाण्या पिण्याची चंगळ होती. आलिशान गाड्या होत्या. मुलं उत्तमोत्तम शाळेत जात होती. प्रत्येक हातात मोबाईल होता. टेबलवर संगणक होता. जग जवळ आलेले होते. नेटने जाळ्यात पकडलेले होते. सगळीकडे सुबत्ता होती. पण… कुठेतरी उणीव होती. आरोग्य मात्र बिघडलेले होते. डॉ. कडे मोठ्या रांगा होत्या. औषधांची दुकाने जोरात चालत होती. प्रत्येक माणशी काही ना काही आजार होता. मनस्वास्थ्य हरवले होते.

काय करावे कळेना. आरोग्य पैशाने विकत घेता येईना. सगळे होते चिंतेत. आपापल्या व्यथेत. तेवढ्यात एक माणूस आला. जणू देवदूतच भासला. खूप अनुभव त्याच्या गाठीला. एका मोठ्या कार्यक्रमात दाखल झाला. आनंदी राहण्याचा उपाय सांगतो म्हणाला. फक्त एक अट आहे म्हणाला. सगळे आवाज बंद करा. सर्वांनी जमिनीवर आसन धरा. लोकांनी तसेच केले. कारण सगळे होते शांतीचे आणि आनंदाचे भुकेले.

देवदूत म्हणाला “ खरेच मन:शांती व आनंद हवा असेल, तर माझे ऐकावे लागेल. एक व्रत करावे लागेल. सगळ्यांनी होकार भरला. प्रत्येक जण कान टवकारून ऐकू लागला. देवदूत बोलू लागला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला श्रावण महिना आहे चांगला. फरक पडला तर कायम हे व्रत करा. आता फक्त सुरुवात करा……

या व्रतात काय करावे? सांगतो ऐका लक्ष द्यावे. आठवड्यात एक दिवस हे व्रत करावे. सकाळी लवकर उठावे. प्रथम मोबाईल, इंटरनेट बंद करावे. मोकळ्या हवेत फिरून यावे. फिरता फिरता स्वसंवाद करावे. उत्साहात घरी यावे. आई वडील यांच्या जवळ बसावे. छान छान बोलावे. सर्वांनी एकत्र चहा, नाश्ता घ्यावा. घरात मुलांशी खेळावे. गप्पा गोष्टी कराव्यात. थोडे स्वयंपाक घरात डोकवावे, मदतीसाठी विचारावे. जमेल ते काम करावे. दुपारी निवांत वेळी जुने कपाट आवरायला घ्यावे. त्यातील जुने फोटोंचे अल्बम बघावे. आठवणींना जागवावे. कपाट आवरताना मनही आवरावे. वाटले तर दुपारी आळसावून झोपावे. नाहीतर आवडते संगीत ऐकावे. एक दिवस  स्क्रीनचा उपास करावा. आरोग्याचा मार्ग धरावा. आनंदाचा रस्ता शोधावा. रात्री सर्वांनी हसत खेळत, गप्पा मारत सहभोजन करावे. सर्वांनी एक दिवस हॉलमध्ये गाद्या घालून झोपावे. असे व्रत करावे. फायदे अनुभवावे. चांगल्या आरोग्यदायी परिणाम मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा हे व्रत करावे. पुढच्या वेळी येईन तेव्हा अनुभव सांगावे.” … एवढे सांगून देवदूत निघून गेला. व्रत आचरणात आणण्याचा प्रत्येकाने निश्चय केला.

आपणही असे आचरण करावे. हे आपल्या चार्जिंगचे साधन समजावे. एक दिवस सुट्टी मिळाली म्हणून इकडे तिकडे जाऊन टेन्शन घेण्यापेक्षा हे उपाय करून बघावे. आपणच आपला आनंद शोधावा.

व्रत कसे वाटले सांगावे. आवडले  न आवडले जरुर सांगावे. आवडल्यास कृपया नावासहित पुढे पाठवावे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्यांचा पाऊस… आमचा पाऊस… एक वेदना  – लेखक : हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?  विविधा ?

☆ त्यांचा पाऊस… आमचा पाऊस… एक वेदना  – लेखक : हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

पाऊस धुवांधार कोसळतो आहे. सगळी धरणे वेगाने भरत आहेत. पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे. फेसबुकवर या ओल्याचिंब फोटोंचा खच पडलाय. शहरी भागाला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरल्यामुळे शहरी माणसे खुश आहेत.. धरणे भरताना धरणाच्या खालच्या लाभक्षेत्रातील माणसे क्रिकेटचा स्कोर बघावा तसे रोज किती पाणी वाढते ते बघत असतात आणि एकदा धरण भरले की ते सेलिब्रेट करायला धरणाकडे, धबधब्याकडे धाव घेतात… कोसळणारा पाउस, धबधबे आणि हातातील फेसाळती बिअर एकमेकात मिक्स होऊन जाते..

पण ही धरणे अवघ्या पंधरा दिवसात इतकी पटकन भरताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसात तिथे राहणाऱ्या आदिवासी गरिबांच्या जगण्याचे काय होत असेल ? याचा विचार तरी मनात येतो का ? धरणाच्या फेसाळत्या पाण्याबरोबर वाहत आलेले त्यांचे अश्रू धरणाच्या लाभक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात तरी येतात का ?

जवळपास सर्वच धरणाचे पाणलोट क्षेत्र हे दुर्गम भागात असते. तो पहाडी आणि जंगली भाग असतो. त्या परिसरात आदिवासी किंवा शेतकरी कष्टकरी लोक राहत असतात. पाउस जेव्हा नियमित असतो तेव्हा हळूहळू धरण भरते पण जेव्हा एखादे धरण अवघ्या काही दिवसात मुदतीआधी भरते तेव्हा त्या पाणलोट क्षेत्रात किती भयावह स्थिती असते याची कल्पना करता येणार नाही पण तो कधी चर्चेचा विषय होत नाही..

मी ज्या अकोले तालुक्यात राहतो. त्या तालुक्यात भंडारदरा धरण आहे. या धरणाची क्षमता ११ टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण १५ ऑगस्ट ला भरते पण यावर्षी ते १५ दिवस अगोदर भरले आहे.. ज्या आदिवासी पाड्यातून हे पाणी या धरणात येते त्यांची अवस्था आम्ही बघतो, ती स्थिती जास्त पाऊस झाल्याने अधिकच विदारक होते.

त्यांची घरे काही आपल्यासारखी बंगल्याची सिमेंटची नसतात, त्यामुळे पावसात चहा घेत टीव्ही वर राजकारणाच्या बातम्या बघत निवांत ते राहू शकत नाहीत. आधीच त्यांचे घर झोपडीवजा असते. इतक्या वेगवान आक्रमक पावसात ती घरे नीट टिकाव धरत नाहीत. घरे गळत असतात. जनावरेही सततच्या थंडीत काकडून जातात त्यामुळे कधीकधी थंडीत मरतात. इतक्या पावसात चाराही आणता येत नाही त्यामुळे अनेकदा चांगला गोठा नसेल तर जनावरांना घरात आत घ्यावे लागते. एवढ्या छोट्या जागेत माणसे आणि जनावरे एकत्र राहतात. त्या दाटीत ते कसे राहत असतील ..?

पुन्हा पाउस एकदा सुरु झाला की वादळात वीज खंडित होते. अगदी महिना महिना वीज नसते अशी स्थिती अनेक पाड्यांवर असते. वीज नसल्याने जवळच्या गिरणीत धान्य दळून मिळायला अडचण होते. अंधारात महिनाभर ही माणसे राहतात .. मोबाईल चार्ज होणे तर दूरच.

भात लावणी होते पण या तीव्र पावसात इतर रोजगार बंद होतात.. घरात साठवणूक तरी या गरीब माणसांची किती असणार ? घरातून बाहेर निघणे मुश्कील होते. लाकूडफाटा गोळा करायला ही जाता येत नाही अशी बिकट स्थिती ….

पाऊस जर अतितीव्र असेल तर शेतीची मातीही वाहून जाते. ती थांबवणे हे आव्हान असते. आमच्या तालुक्यात एकदा एका शेतात डोंगर कोसळला आणि ती शेतीच करणे मुश्कील झाले.. दु:खाचा डोंगर कोसळतो म्हणजे काय ? याचा प्रत्यय त्या लोकांना आला असेल..

इकडे धरण भरण्याचा जल्लोष सुरु असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील माणसे अशा रोजच्या जगण्याच्या प्रश्नाशी झगडत असतात…

याच माणसांच्या पूर्वजांनी जमिनी या धरणासाठी दिलेल्या असतात, यांचेच पूर्वज मजूर म्हणून या धरणावर मजूर म्हणून राबलेले असतात आणि आज धरण भरताना त्या पावसाची किंमत हीच माणसे चुकवत असतात… या माणसांना धरण काय देते ? पुनर्वसन कायदे आज आले पण फार पूर्वी बांधलेल्या धरणात ज्यांचे सर्वस्व गेले ते सर्वहारा आहेत…. नर्मदा जन आंदोलनात पुनर्वसन कसे होते ते किती फसवे असते आणि सरकार अगदी न्यायालयात सुद्धा किती धडधडीत खोटे बोलते हे आपण बघितले आहे.. मेधा पाटकर सारख्या एका प्रतिभावंत व्यक्तीचे आयुष्य खर्ची पडले तरी अजूनही प्रश्न त्याच गर्तेत फिरताना बघतो आहोत ..

सर्वात विदारक काळा विनोद हा असतो की उन्हाळ्यात यातील अनेक पाड्यावर पाणी टंचाई असते आणि हे लोक पाण्यासाठी वणवण फिरतात.

ही सारी वेदना दया पवार यांच्या कवितेत अगदी तंतोतंत उतरली आहे.. आमच्या तालुक्यात भर पावसात भिजणाऱ्या केविलवाण्या झोपड्या बघितल्या की ही कविता दया यांनी या पाड्यावर लिहिली का ? असे प्रश्न पडतात …

बाई मी धरण धरण बांधते

माझे मरण मरण कांडते

      पुढे दया म्हणतात…

वेल मांडवाला चढे

माझ्या घामाचे गं आळे…

माझ्या अंगणी अंगणी पाचोळा ग पडे….

      

खरेच या माणसांना काय मिळते ?

आज पुणे शहराला १७ टीएमसी पाणी लागते. त्या पाण्यावर ही समृद्धी उभी आहे. त्या पाण्याचा माणसे बेसुमार वापर करतात, स्विमिंग टॅंक पासून सारे काही मनोरंजन उभे राहताना त्या धरणांची आणि पावसाची भयावह किंमत चुकवणाऱ्या माणसांना व्यवस्था म्हणून आपण काय दिले याचा कधीतरी या आनंदात विचार करतो का ? किमान त्याबद्दल आनंद साजरे करताना संवेदना तरी ?

हे दोन जगातील अंतर इतके टोकाचे आहे की या जल्लोषात त्यांचे हुंकार पोहोचत सुद्धा नाहीत.

एकदा मी असाच पावसाळ्यात आमच्या भंडारदरा परिसरात गेलो होतो. पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पाउस थोडावेळ थांबला होता.. एक मुंबईची पर्यटक महिला वाहणाऱ्या छोट्या धबधब्यात पाय टाकून पाउस कधी सुरु होईल म्हणून आकाशाकडे आशेने बघत होती आणि पाउस थांबला म्हणून एक आदिवासी महिला घाईने लाकडे जळण म्हणून गोळा करत होती.. कडेचा हा जल्लोष तिच्या गावीही नव्हता… माझ्या मनात आले दोघीही महिला, पण दोघीचे भावविश्व किती वेगळे… एक पाउस येण्याची वाट बघणारी आणि दुसरी पाउस थांबण्यासाठी वाट बघणारी.

पावसातही भारत – इंडिया असतो तर ….

धरणे यावर्षी लवकर भरली.. कदाचित त्यात या पाणलोट क्षेत्रातील माणसांचे अश्रू असल्याने तर पाणी वाढले नसेल…?         

लेखक :  हेरंब कुलकर्णी

प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे

मो – 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जरा याद उन्हे भी करलो…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “जरा याद उन्हे भी करलो” ☆ सुश्री शीला पतकी 

गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील……  

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक तरुणांनी या यज्ञात उडी घेतली ..सगळी तरुणाई देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे याच भावनेने काम करीत होती. आपले घरदार सोडले.. नातेवाईक सोडले ..खाणे पिणे कशाची पर्वा केली नाही….. 

त्यातलाच एक मुलगा होता चांदोरकर ! मूळचा अलिबागचा पण त्या ठिकाणी केलेल्या कारवायामुळे त्याच्यावर पकड वॉरंट होतं. तेथून तो अनेक ठिकाणी जागा बदलत बदलत सोलापुरात आला. सोलापुरात अशा भूमिगतांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे आमराई.  इथे ही स्वातंत्र्यवेडी मंडळी गावोगावी फिरून येत असत. तेथून संदेशाचे वहन व्हायचे.. निरोप जायचे.. योजना समजायच्या ! सोलापुरात हे ठिकाण अमराई मध्ये होते आणि आमराई ही रेल्वे स्टेशनला लागून होती. अर्थात सोलापूरच्या स्टेशनपासून बरीचशी लांब म्हणजे तीन चार किलोमीटर पुढे असलेलं बाळे स्टेशन जे आहे ते बाळे स्टेशन आणि सोलापूर स्टेशन याच्यामध्ये गाडीतून उडी मारून उतरून आमराईत घुसावे आणि माणूस कुठे गेला पत्ता लागू नये अशी ती घनदाट आमराई होती. या स्वातंत्र्य वीर क्रांतिकारकांना ही जागा म्हणजे मोठी पर्वणीच होती. अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी लपून राहत असत, तसाच हा चांदोरकर तेथे लपून राहिला. 

एके दिवशी त्याच्या एका मित्राने अलिबागवरून संदेश आणला की त्याच्या आईला उंदीर चावला असून ती त्या विषाने अत्यवस्थ आहे आणि अगदी शेवटचे क्षण मोजत आहे. पण आपला हा 20-22 वर्षाचा मुलगा भेटावा ही तिची शेवटची तीव्र इच्छा होती. हा निरोप ऐकल्यावर मात्र मातृभूमीची सेवा करायला निघालेला चांदोरकर माझ्या वडिलांच्या खांद्यावर मान ठेवून ढसाढसा रडला… माझे वडील तरी किती 25/ 26 वर्षाचे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे.. त्याच्या थोरल्या भावाच्या वयाचे.  त्यांनी त्याची समजूत काढली. तो म्हणाला,” पत्की काही झाले तरी मला आईला भेटलेच पाहिजे रे.. मी आईला न भेटता राहिलो तर जन्मभर हे शल्य मला रुतून राहील “..वडील ही भावूक झाले.  ते म्हणाले मित्रा काळजी करू नकोस.  तुझ्यावर पकड वॉरंट आहे, तुला उघड प्रवास करता येणार नाही की. मग आता तू माझ्या घरात आलायस तेथून सुद्धा तुला बाहेर पडणे अवघड आहे, कारण पांजरपोळ चौकात पोलिसांच्या चौक्या बसलेल्या, त्याच्या आधी अलिकडे आमच्या घरापुढे असलेल्या चौकात ही चौक्या..  त्यामुळे तेथून बाहेर पडणे खरोखर अवघड होते ….पण वडील निरनिराळे वेशांतर करून काम करीत असत.  त्यामुळे त्यांनी लगेचच दोघांचे वेशांतर केले. 

स्वतःचे वेशांतर म्हाताऱ्या कानडी माणसात आणि तसेच मुलाचे वेशांतर कानडी मुलात केले म्हणजे लिंगायत मुलांमध्ये, आणि त्याला सांगितले की तू मुका आहेस हे लक्षात ठेव .कारण त्याला कानडी येत नव्हतं त्यामुळे तो मुका आहे हे सांगितले.  वडिलांना खूप छान कानडी येत होते .गळ्यामध्ये लिंग, डोक्याला मुंडासं असून झुपकेदार मिशा आणि किंचित  मेकअप करून ते दोघे संध्याकाळी आमच्या वाड्यातून बाहेर पडले.  संध्याकाळी थोडासा अंधार तो बराच गडद वाटत होता कारण त्या काळात लाईट नव्हते.  तेथून त्यांनी चौकी पार केली तरी पांजरपोळ चौकीत त्यांना एकाने विचारले की कुठे चालला आहात तर त्यांनी सांगितलं पोराला एसटीला बसवतो. त्याला बोलता येत नाही आणि मग त्यांनी खातरजमा करून त्यांना सोडून दिले.  

पुढे त्याच रस्त्याने ते दोघे चालत चालत 14 कमानी पर्यंत आले.  पूर्वी बाळ्याला एक ओढा होता आणि त्याला 14 कमानी होत्या. तिथे गुरांना चरण्याची शेती होती म्हणजे गुरांचा चारा त्या ठिकाणी पिकवला जात असे त्याच्यासाठी लागणारे पाणी आसपास असणाऱ्या मिलमधून सोडण्यात येत असे. पावसाळ्यात त्या 14 कमानीत पाणी आले की बाळ्याचा ओढा दुथडी भरून वाहत असे आणि मग वाहतूक बंद व्हायची.  परंतु तशी फारशी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्या ओढ्यातून दोघांनाही चालत जाता आले. पुढे शेतातून रस्ता काढत काढत बाळे स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीची दहाची पॅसेंजर ती सोलापूरहून निघाली की पहिलं स्टेशन बाळे..  तिथे एक मिनिटभर थांबत असे तेवढ्यात एका वेशांतरीत पोराला चढवणे गरजेचे होते.  पण लक्षात आले की या मुलाने काही खाल्लेच नव्हते दिवसभर आणि पुढे अलिबागपर्यंतचा प्रवास कसा होईल ते सांगता येत नव्हते तो कुठल्या स्टेशनवर उतरणार हे ठरलेलं नव्हते.  पण मग त्याला काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी या दृष्टिकोनातून विचार करता तिथे शेतामध्ये काही बकऱ्या खतासाठी बसवलेल्या होत्या.  त्या गुराख्याला आठ आणे देऊन वडिलांनी एक चरवी दूध विकत घेतले आणि त्याला म्हणाले ,”चांदोरकर एवढे दूध तू पी आणि यानंतर तुला घरी पोहोचेपर्यंत खायला प्यायला मिळणार नाही “..चांदोरकरांनी ती चरवी तोंडाला लावली आणि इतक्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. 

शिट्टी ऐकल्याबरोबर चांदोरकरचे हात थरथरायला लागले त्याच्या हातून चरवी खाली पडली.  दूध शेतात सांडले.  तो म्हणाला “ पतकी ही गाडी गेली आता. आता मी माझ्या आईला भेटू शकणार नाही..” 

वडील म्हणाले “ धीर सोडू नको आपण जाऊ” .. आणि दोघेही पळत पळत बाळे स्टेशनच्या दिशेने गेले. स्टेशनच्या आसपास असतानाच त्यांच्यासमोरून धाड धाड धाड करीत एक गाडी निघून गेली पण सुदैवाने ती मालगाडी होती.  दोघांचाही जीव भांड्यात पडला.  सुमारे दहा मिनिटांनी पॅसेंजर गाडी बाळ्याला आली.  बाळे स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती.  अगदी तुरळ एखादा पॅसेंजर असे. वडिलांनी त्याचे पुण्यापर्यंतचे तिकीट काढले.  मुख्य म्हणजे याच्या नावाचे पोस्टर अनेक ठिकाणी लावल्यामुळे त्याचा चेहराही झाकूनच त्याला जावे लागले. चांदोरकर आपल्या आईला भेटण्यासाठी मार्गस्थ झाला….! 

वडिलांना ते समाधान वाटले.  त्यांनी वेशांतर सगळे पुसून आमराईत नेऊन टाकले आणि तेथून साधे कपडे घालून ते सोलापुरात परत आले. आमराईत कपडे बदलणे पेशांतर करण्याच्या सगळ्या सोयी आधीच करून ठेवलेल्या होत्या कारण अनेकांना  ते प्रयोग करावे लागत असत. वडील घरी पोहोचले त्यानंतर दोन दिवसाने अलिबागवरून संदेश आला …  चांदोरकर घरी पोहोचला.  तो मध्येच कुठल्यातरी स्टेशनवर उतरला आणि रातोरात ट्रकमध्ये बसून अलिबागला पोहोचला होता.  पहाटे घरी गेला .. आईला बघून त्याने हंबरडाच फोडला.  आईला मांडीवर घेतले ..  तिच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून तो हात फिरवत होता आणि आई त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती.  वीस बावीस वर्षाचा तो पोरगा ढसाढसा रडत होता आणि अर्ध्या तासात त्याच्या आईने प्राण सोडला……! वीस बावीस वर्षाचे ते पोर आईची सेवा करता आली नाही या दुःखाने निराश झाले होते, पण त्याने आईला वचनच दिले… की ‘ माते तुझी सेवा करता आली नाही तरी या मातृभूमीची सेवा मी मनापासून करेन.’  

नंतर चांदोरकरला अटक झाली तुरुंगवासही झाला. अशा वीस बावीस वर्षाच्या अनेक चांदोरकरांनी … अनेक तरुणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी गमावल्या होत्या पण त्यांना वेड होते की हा देश स्वतंत्र झाला पाहिजे.  त्यासाठी खूप हाल अपेष्टा सोसल्या, मारपिट सहन केली, निकृष्ट प्रतीचे तुरुंगातील अन्न खाल्ले, चाबकांचे फटके सोसले, तुरुंगात दोन दोन पायलीचे दळण दळले…. या सगळ्या यातना त्यांनी भोगल्या….  स्वातंत्र्याचा किती आस्वाद त्यांनी घेतला?… ठाऊक नाही.  पण एवढ्या कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याची वाटचाल स्वराज्याकडून सुराज्याकडे होईल असे वाटले होते.  आज तसे होताना दिसत नाही ! टिळक आगरकरांचा महाराष्ट्र …  त्याऐवजी जाती-जातीत तेढ निर्माण करण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही घोषणा दिली होती.  

टिळक आगरकर शाहू फुले आंबेडकर या सर्वांचेच कार्य महान आहे .. ते आपल्या सर्वांना अनेक पिढ्या मार्गदर्शन करणारे आहे .. सारेच वंदनीय.  पण हे जाती जातीत तेढ निर्माण करणारे राहील असे कधीच वाटले नव्हते.  राजकारण्याने मात्र त्याचा बरोबर फायदा घेतला.  राजकारणात सध्याचा चाललेला विचका पाहून .. या तरुणांनी का आपले प्राणार्पण केले..? का कष्ट भोगले …?असे प्रश्न निर्माण होतात.  पण तरुणाईचे ते वेड भारतातल्या रक्तारक्तात भिनले होते म्हणून ही भारतमाता आज सर्व शृंखला तोडून स्वतंत्र झाली आहे.  मला वाटतं तिलाही दुःख होत असेल .. ‘ मी स्वतंत्र झाले …पण हा देश मात्र पांगळा झालाय या विचाराने.. जातीयवादाने .. माणसा माणसातील दुराव्याने..’  

हा देश विखुरला जातोय की काय भीती वाटायला लागली.. विविध रंगाच्या फुलांचा जणू गुच्छ असावा तसा आपला देश आहे.  विविध संस्कृती- विविध भाषा- विविध चालीरीती- विविध प्रांत – तरीही ‘आम्ही सगळे भारतीय आहोत’ हा ध्यास मधल्या पिढीला होता..  तो आता लुप्त होताना दिसत आहे याचे वाईट वाटते.  गेल्या  15 ऑगस्टला मी वडिलांच्या फोटोसमोर हार घालताना म्हणाले होते, “ दादा तुम्ही पाहिलेले स्वप्न आमची पिढी सत्यात उतरू शकली नाही म्हणून माझ्या हातातला हा हार आहे की आमची हार आहे हेच मला कळत नाही “…. 

पण वडिलांच्या फोटोतून नकळत मला एक आवाज येत होता की ‘ बाळा हा देश इतका दुबळा नाही की कुणा दोन-चार राजकारण्यांच्या कुरापतीने ढासळून जावा.  लक्षात ठेव रात्रीनंतर रोज एक पहाट उगवत असते आणि ती सुराज्याची असेल अशी आशा आणि कामना कर देव तथास्तु म्हणत असतो ….! ‘ वडिलांच्या या वाक्यावर मी स्वतःलाच विचारले की का नकारात्मक विचार करावा आपण ? माझ्या देशात चांगले काही खूप आहे ते सकारात्मकतेने घेऊयात ना..  मग त्यात काय बिघडलं आणि ती सकारात्मकतेची ऊर्जा नक्कीच आपल्याला प्रगतीपथावर नेईल.  आता त्याची सुरुवात ही झालेली आहे नाही का?…..!

!! वंदे मातरम् !! .. !! जय हिंद !! 🇮🇳

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटत रहायचं. कारण छत्री,रेनकोट, गमबूट हे सगळं दिमतीला असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅंड गाठेपर्यंतही मी चिंब भिजून जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले तरी नृ. वाडीला पोचल्यानंतरही

त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचा.

या सगळ्या कसोट्या पार करत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरू राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ ‘ पासून उभे रहायचे!)

महाबळेश्वरला गेल्यानंतरची जुलै महिन्यातली पहिली पौर्णिमा तशी निर्विघ्नपणे पार पडली. कोल्हापूरलाही घरी दोन-चार दिवस कां होईना रहाता आलं.परतीच्या प्रवासासाठी घराबाहेर पाऊल टाकलं न् ब्रॅंचमधल्या महत्त्वाच्या कामांच्या विचारांनी मनाचा ताबा केव्हा घेतला समजलंच नाही.

त्यानंतरचा एक महिना नेहमीसारखा धावपळीच गेला.

या महिन्याभरात दोन्हीकडच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना पगाराबरोबरच तोवरची जुजबी शिल्लकही संपून गेली होती. आॅगस्टमधल्या पौर्णिमेला दुपारच्या ३ वाजताच्या सांगलीच्या बसचे वेध आदल्या दिवसापासूनच लागले न् त्याचसोबत आर्थिक तरतूदीचं व्यवधानही.आदल्याच दिवशी पगार जमा झाला होता खरा,पण मेसचे पैसे देऊन,घरी देण्यासाठीचे एक हजार रुपये बाजूला काढून ठेवल्यानंतर हातात कशीबशी एक वेळच्या बस भाड्यापुरतीच जुजबी रक्कम शिल्लक रहात होती.सलिलसाठी सोबत थोडा खाऊ नेणं सोडाच,नृ.वाडीला

दर्शनाला जाण्यापूर्वी देवळाच्या वाटेवरील ओळखीच्या ‘अवधूत मिठाई भांडार’ मधून नारळ/कापूर घ्यायसाठीही पैसे उरले नसते.शिवाय परत आल्यानंतर पुढच्या पगारापर्यंतच्या महिनाभरातल्या माझ्या किरकोळ खर्चाचाही प्रश्न होताच.मेसमधे जेवून,महिन्याचं बील भागवून बाहेर पडलो,तेव्हा ब्रॅंचमधे पोहोचेपर्यंत हेच विचार मनात घोळत राहिले.या विचारांमधे हाच प्रश्न फॅमिली शिफ्टींगपर्यंत वर्षभर रहाणाराच होता याचंच दडपण अधिक होतं.कोल्हापूरला गेल्यावर घरी चर्चा करुन कांहीतरी मार्ग काढायला हवा हे ठरवलं खरं पण तिथली इतर व्यवधानं न् धावपळीत बायकोला हे सगळं सांगायची वेळ येऊच नये असंही तीव्रतेने वाटत होतं. बसला अजून तासभर वेळ होता.हेच सगळे विचार सोबत घेऊन मी घाईघाईने ब्रॅंचमधे गेलो.

ब्रॅंचमधे हेडकॅशिअर रांजणे माझीच वाट पहात होते.

“सर,हे सर्क्युलर बघा.गुडन्यूज आहे.”

मी उत्सुकतेने पुढे होत त्यांनी   कॅश विंडोमधून सरकवलेलं ते सर्क्युलर घेतलं. घाईघाईने त्यावरून नजर फिरवली आणि आश्चर्यानंदाने क्षणभर अवाक् होऊन ते सर्क्युलर पुन: एकदा वाचून खात्री करुन घेतली.माझ्यासाठी ती फक्त गूड न्यूजचं नव्हती तर त्या क्षणी माझ्या मनात रुतून बसलेले सगळेच प्रश्न चुटकीसाठी सोडवणारा, चमत्कार वाटावा असा तो एक योगायोग होता..!

राष्ट्रीयकृत बँकिंग स्टाफच्या वेज रिव्हिजन संदर्भातील ‘बायपार्टाईट सेटलमेंटच्या ‘इंडियन बँकज् असोसिएशन’ आणि ‘स्टाफ युनियन्स’ यांच्यामधील चर्चेच्या फेऱ्या बरेच दिवस सुरू होत्या. बोलणी यशस्वीरित्या पूर्ण होऊन पुढील पाच वर्षांसाठीचं ‘वेज रिवीजन ऍग्रीमेंट’ साईन झाल्याचं ते सर्क्युलर होतं. याच एॅग्रीमेंटनुसार ऑफिसर्सपैकी बॅंकांच्या सी.ए.आय.आय.बी च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना एक अॅडिशनल इन्क्रिमेंट नव्याने मंजूर झालं होतं. माझ्यासाठीची खास गुड न्यूज होती ती हीच.

एखादी अनपेक्षित, अप्रिय, नुकसानकारक घटनाही त्यावेळी त्रासदायक ठरलेली असली तरी दीर्घकाळानंतर अचानक त्या घटनेतल्या तत्कालीन त्रासातही भविष्यकाळातील अनुकूलता कशी लपलेली असू शकते याची ही बातमी म्हणजे निदान माझ्यासाठीतरी नक्कीच एक दिलासा देणारी प्रचिती होती!

सी.ए.आय.आय.बी. पार्ट-१ ची परीक्षा मी नोकरीत कन्फर्म झाल्याबरोबर खूप अभ्यास करुन पास झालो होतो. अॅडिशनल इन्क्रीमेंटबरोबरच आॅफिसर प्रमोशनसाठीही मला त्याचा फायदा झाला होताच. पुढे ऑफिसर झाल्यानंतर नवीन जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच पार्ट-२चीही तयारी करून मी ती परीक्षाही जून ७९ मधे उत्तीर्ण झालो होतो. त्यामागे करिअरपेक्षाही तातडीने मिळणाऱ्या अॅडिशनल इन्क्रिमेंटच्या आर्थिक फायद्याचा विचारच प्रामुख्याने माझ्या मनात होता. पण १ जुलै १९७९ पासून अस्तित्वात आलेल्या वेज रिव्हीजनच्या नियमानुसार या परीक्षा नव्याने उत्तीर्ण झालेल्या माझ्यासारख्या ऑफिसर्सना मिळणारे जास्तीचे इन्क्रिमेंट बंद करण्यात आले होते. अर्थातच माझा तेव्हा खूप विरस झाला होता. आपल्या हक्काचं काहीतरी हिरावून घेतलं गेल्याचं  ते दुःख पुढे दीर्घकाळ माझ्या मनात घर करुन राहीलं होतं! तेव्हा हिरावलं गेलेलं सगळं मला अतिशय अनपेक्षितरित्या असं दामदुपटीने आता परत मिळणार होतं. १९७९ सालचा तो अन्यायकारक निर्णय बदलण्यासाठी ऑफिसर्स युनियनकडून तेव्हापासूनच सततचे प्रयत्न सुरू होते पण त्याला यश येत नव्हतं. त्यामुळे पाच वर्षानंतरच्या यावेळच्या व्हेज रिविजन संबंधीच्या मीटिंगमधे युनियनने तो प्रेस्टीज पाॅईंट बनवला होता. त्यामुळे तेव्हा नाकारलं गेलेले ते अॅडिशनल इन्क्रिमेंट पूर्वकालीक फरकासह आता मंजूर करण्यात आलं होतं.

बातमी अनपेक्षित आणि म्हणूनच अधिक आनंददायी होती पण त्या आनंदात मी गुंतून पडून चालणार नव्हतं.अडीच वाजत आले होते.घरी जाऊन बॅग घेऊन थेट स्टॅण्ड गाठायचं तर पाचदहा मिनिटांत मला निघालाच हवं होतं.

“सर,एक मिनिट…”

मी रांजणेंचा निरोप घेऊन जायला निघालो तेवढ्यात त्यांनी थांबवलं.

” सर,मी तुमच्या स्टाफ फाईल मधले सॅलरी डिटेल्स घेऊन तुमचे एरियर्स-कॅल्क्युलेशन करून ठेवलंय. चेक करून दिलंत तर लगेच तुमच्या अकौंटला क्रेडिट करतो.प्रवासाला निघालात म्हणून.हवे तर जास्तीचे थोडे पैसे बरोबर नेता येतील.”

माझी या क्षणीची नेमकी गरज रांजणेनी  न सांगता कशी ओळखली होती ते ‘तो’च जाणे.

मी कृतज्ञतेने रांजणेंकडे पाहिले.त्यांचे मनापासून आभार मानून अॅरीअर्सशीट चेक करायला घेतली. पाहिलं तर अॅरियर्सची   मला जमा होणारी रक्कम होती ५३४०/- रुपये. माझा पगार दरमहा १५००/-रुपये होता त्या काळातले ५३४०/-रुपये!मी थक्कच झालो. डिटेल्स चेक करुन ती फाईल आणि १००/-रुपयांची withdrawal slip रांजणेंकडे देऊन त्यांच्याकडून १००/-रुपये घेतले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

आज सकाळी बॅंकेत येताना आर्थिक नियोजनाचं केवढं प्रचंड दडपण माझ्या मनावर होतं आणि आता प्रवासाला निघण्यापूर्वीच ते ओझं ‘त्या’ने असं क्षणार्धात हलकं केलं होतं..!

ही अचानक मिळालेली एवढी रक्कम फॅमिली शिफ्टींग होईपर्यंतचे वर्षभर माझी जमाखर्चातली तूट भरुन काढायला पुरेशी ठरली.नेमक्या गरजेच्या क्षणी जादूची कांडी फिरावी तसा घडलेला हा योगायोग श्रध्देबरोबरच ‘त्या’च्याबद्दलची कृतज्ञता दृढ करणारा होता आणि

आता यापुढे दर पौर्णिमेच्या दत्त दर्शनाच्या बाबतीत कधीच कसलीच अडचण येणार  नाही असा विश्वास निर्माण करणाराही.पण पुढच्याच पौर्णिमेच्यावेळी एक वेगळंच आक्रित  माझी खऱ्या अर्थाने कसोटी पहायला समोर उभं ठाकणाराय याची मला याक्षणी कल्पना कुठून असायला?…

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढ, मेघदूत, यक्ष आणि यक्षिण ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

आषाढ, मेघदूत, यक्ष आणि यक्षिण ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

आषाढ….घनांचा मास आषाढ….मेघांचा मास आषाढ…मेघांनी मल्हार  गावा,मयूराने पिसारा फुलवावा….मेघांनी आक्रमिलेल्या  नभातून  घन कोसळू लागावेत आणि फत्तरालाही पाझर फुटून निर्झर खळखळा वाहू लागावेत….तो आषाढ ! ज्येष्ठ पाठमोरा होऊन आषाढाचा पहिला दिवस उगवतो आणि मनात अगदी नकळत शब्द  ऐकू येऊ लागतात… *आषाढस्य प्रथम दिवसे*… हो, तोच आषाढ… मेघदूताचा आषाढ… कालिदासाचा आषाढ…..प्रत्येक वेळी नवी अनुभूती देणारा मेघदूताचा आषाढ !

महाकवी कालिदासाचे कल्पनारम्यतेने नटलेले महाकाव्य! मेघदूत या काव्याच्या नावातच त्याचं वेगळेपण जाणवतं.फार मोठं कथानक नसलेल पण तरीही अफाट लोकप्रियता मिळवणारं  हे काव्य जगातल्या काव्यरसिकांना वेड लावून गेलंय.पत्नीच्या विरहात तळमळणारा यक्ष आकाशात मेघाला पाहतो आणि आपल्या प्रिय पत्नीला संदेश पाठवण्यासाठी त्या मेघालाच दूत होण्याची विनंती करतो.कोण हा यक्ष ?  यक्ष हे कुबेराचे सेवक.हिमालयाच्या रांगा हे त्यांचं निवासस्थान.सूर्योदयाचेवेळी देवपूजेसाठी लागणारी हजार कमळे आणून द्यायची जबाबदारी कुबेराने एका यक्षावर सोपवलेली असते.हा यक्ष नवविवाहित असतो.त्यामुळे भल्या पहाटे ,सूर्योदयापूर्वी उठून हे काम करायचं म्हणजे त्याला शिक्षाच वाटत असते.पत्नीचा तेवढा विरहही त्याला सहन होत नसतो.विचार करता,एक गोष्ट त्याच्या लक्षात येते.ती म्हणजे,आपण सूर्योदयापूर्वी फुले,कमळे काढतो.तेव्हा ती उमललेली नसतात.मग ती रात्रीच,कळ्या असताना काढून ठेवली तर कुबेराला कुठे कळणार आहे ? यक्ष आपल्या कल्पनेप्रमाणे रात्री कळ्या खुडून भल्या पहाटे कुबेराकडे  पोहचवतो.पण प्रेमाने अंध झालेल्या यक्षाला पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसते.पूजेच्या शेवटी,शेवटचे कमळ अर्पण करताना,कमळ उमलून त्यातून भुंगा बाहेर पडतो.आधीच्या संध्याकाळी कमळाची पाकळी  मिटताना भुंगा त्यात अडकला आहे व कमळ उमलण्यापूर्वीच म्हणजे रात्री खुडले गेले आहे हे कुबेराच्या लक्षात येते.या चुकीची शिक्षा म्हणून ,ज्या पत्नीच्या मोहामुळे ही चूक घडली,त्या प्रिय पत्नीचा एक वर्ष विरह सोसावा लागेल,असा शाप कुबेर त्या यक्षाला देतो.एव्हढेच  नव्हे तर या वर्षभरासाठी यक्षाच्या सर्व सिद्धीही काढून घेतल्या जातात.त्यामुळे यक्षाला विरह सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो .हा यक्ष मग अलकापुरी पासून खूप दूर असलेल्या रामगिरी पर्वतावर म्हणजे रामटेक येथे येऊन राहतो.या ठिकाणी आठ महिन्यांचा काळ व्यतीत केल्यावर,वर्षा ऋतुतील आषाढमासातील पहिल्या दिवशी,पर्वत शिखरांवर जमलेले,पाण्याने ओथंबलेले मेघ तो पाहतो.वर्षा ऋतुतील निसर्गरम्य वातावरणात त्याच्या मनातील हुरहूर वाढत जाते.एकीकडे पत्नीची आठवण व काळजी तर दुसरीकडे तिला आपली वाटणारी चिंता अशा अवस्थेत तो सापडतो.त्यामुळे आपले क्षेमकुशल पत्नीला कळवावे या हेतूने पर्वत शिखरावरील मेघालाच तो दूत म्हणून अलकापुरीला जाण्याची विनंती करतो.असा हा मेघ  दूत!

या विरही यक्षाच्या मनात कोणते भाव जागृत होत असतील, त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? ते भाव शब्दातून मांडण्याचा हा प्रयत्न:

यक्षगान

*

मनोमंडला मधे मेघ हे पहा स्मृतींचे तुझ्या दाटले

विरह वेदना साहू कशी मी असे कसे ग प्रेम आटले

 *

मृगलोचन ते नजर बोलकी सांग कशी मी विसरु

कस्तुरगंधीत सुवर्णक्षण ते सांग कितीदा स्मरू 

 *

सांगू तुजला कशी इथे ग वाळून जाई काया

अशी कशी ग  क्षणात सारी तुझी आटली माया

 *

जाणशील  का ह्रदयामधल्या कोमल या भावना

विरह गीत हे गात येथ मी,येईल का तव श्रवणा 

 *

भाग्यच माझे म्हणून होते स्वप्नी तव दर्शन 

धडपडते मन तशात द्याया,तुजला आलिंगन 

 *

उत्सुक तुजला भेटाया पण,यावे सांग कसे

विरहव्यथेचे होईल दर्शन, जगात आणि हसे

 *

क्षणाक्षणांची युगे जाहली सरतील कधी हे दिन

तडफडते मन येथ  जसे की जळावाचूनी मीन

 *

सुखदुःखाचा  खेळ असे हा कळते सारे जरी

विरह वेदना मनात सलते उरते जी अंतरी

 *

स्नेहबंध हे तव प्रेमाचे सुखविती माझ्या चित्ता

दुरावाच का आणिल अपुल्या  प्रीतिला गाढता.

हा विरही यक्ष रामगिरी पर्वतावर  काल व्यतीत करत असताना तिकडे अलकानगरीत यक्षिणीची  काय अवस्था झाली असेल ? विरहाच्या अग्नीमध्ये होरपळून निघालेल्या यक्षिणीच्या मनात आलेले भाव असेच असतील ना ? :

 यक्षिणीचा  मानसमेघ

 *

आठ महिने संपले पण  राहिले हे चार मास

आठवांच्या मोहजाली  का तुझे होतात भास

दूर देशी तू तिथे अन् मी इथे सदनी उदास

लोचने पाणावती  मंदावुनी जातात श्वास

 *

बंधनांची भिंत येथे,मी कुठे कशी शोधू तुला

कोणत्या अज्ञातदेशी जाऊनी  तू राहिला

ना सखा साथीस कोणी,संवाद  नाही राहिला

मूक झाले शब्द  आणि हुंदकाही मूक झाला

 नियतीचा खेळ सारा दोष मी देऊ कुणाला

 ना कुणाचा आसरा खंगलेल्या माझ्या मनाला

 मित्र म्हणवती एकही पण  संकटी  ना  धावला 

 वेदना संदेश माझा तुझ्या मनी  ना पोचला

 *

ना तुझा सहवास  येथे काय करू या वैभवा

यक्षभूमी ही नव्हे, की  येऊन पडले रौरवा

रोज मी साहू किती या  विरहाग्नीच्या तांडवा 

बरसू दे आता जरासा स्नेहभरला चांदवा  

प्रेम  देते प्रेम, म्हणती,का असे शासन मला

 घाव वर्मी या जिवाच्या कोणी असे हा घातला 

मी गवाक्षी वाट बघता खुणावती  मेघमाला

मेघ माझिया मानसीचा नित्य नयनी दाटला .

 *

यक्ष आणि यक्षिणीच्या मनाची अवस्था समजून घेऊन शब्दात  मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न  आषाढाच्या पहिल्या दिवशी असणाऱ्या …कालिदास दिनानिमित्त  !

आषाढाला शोभेल असा पाऊस  पडो आणि सर्वांचेच जीवन नवचैतन्याने उजळून जावो,ही सदिच्छा !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares