अर्थातच हे सगळ्या घरांच्या बाबतीत आहे. घरात माझं आणि तुझं असं नसलं तरी आमचं आणि यांचं यातला फरक बऱ्याचदा बोलण्यात जाणवतो……
आमचं आणि यांचं सारखंच असलं तरी सुद्धा बोलतांना यांचं असतं ते विशेष, खास, त्यात विविधता, नाजूकपणा, कलाकुसर, रंग, डिझाईन, कलात्मक असं सगळं असतं. आणि आमचं मात्र असंच असतं…….. साधं……. सरळ…… सहज…
कपडे आणि दागिने या बाबतीत हे फार जाणवतं. म्हणजे आमचे ते कपडे. यातही शर्ट पॅन्ट, झब्बा लेंगा, फारफार तर सुट. पण यांच्या कपड्यांच्या बाबतीत बोलतांना सुध्दा कोणतीही सुट नसते……
यांची नुसती साडी नसते. तर त्यात शालू, पैठणी, कलकत्ता, सिल्क, महेश्वरी, कांजीवरम असं आणि बरंच काही असतं. परत यात सहावारी आणि नऊवारी असतंच. आणि ते तसंच म्हणावं लागतं. ऊतप्याला मसाला डोसा म्हटल्यावर, किंवा पुलाव ला खिचडी म्हटल्यावर जशा प्रतिक्रिया येतील, तशाच प्रतिक्रिया नऊवारी ला नुसती साडी म्हटल्यावर येऊ शकतात. घरात रोज नेसतो ती आणि तीच साडी. अर्थात रोज नेसली तर. आमचं मात्र घरात काय आणि बाहेर काय? शर्ट पॅन्ट च असतं.
मग आमच कापड अगदी रेमंड, विमल, सियाराम, किंवा कोणतही चांगल्या ब्रॅंडच असलं तरीही शर्ट आणि पँट….. किंवा झब्बा आणि लेंगा…….
यांच्या दागिन्यांचं तसंच…. आमची ती फक्त चेन. पण यांच कोल्हापूरी साज, मोहनमाळ, चपलाहार, नुसत्या मोत्यांची असली तरी ती माळ नाही. तर सर….. आणि परत याची सर काही औरच असते….
आम्ही आमच्या गळ्यातल्या चेन कडे चेन म्हणूनच पाहतो. पण यांच गळ्यातलं मंगळसूत्र पाहण्याचं सूत्र काही और असत. ते सुत्र काय? हे एक औरतच सांगू शकेल.
कानाला अडकवणारे आमच्यात कमीच असतात. पण आमची ती फक्त भिकबाळी. कसं वाटतं नं हे. पण यांचे कानातले खड्यांचे, झुंबर, किंवा रिंग.
आम्ही पीटर इंग्लंड, काॅटनकिंग या सारखा चांगलं नांव असलेला शर्ट घातला तरी तो फक्त शर्टच. पण यांनी खड्यांच काही घातलं की ते मात्र अमेरिकन डायमंड. या दागिन्याला खड्यांचं असं म्हटलं तर काही वेळा खडे बोल ऐकावे लागतात.
आमच्या मनगटावर फक्त घड्याळ किंवा ब्रेसलेट. पण यांच्या मनगटावर काही चढवलं तर ते बांगड्या, पाटल्या, तोडे, कंगन असं वैशिष्ठ्य पूर्ण. परत हे मनगटावर चढवण्याचा यांचा क्रम सुध्दा यांनी ठरवलेला असाच……. यात मागे, मधे, पुढे असंच असतं. शाळेत कशी रांग आणि रांगेची शिस्त असते तसंच…….
आमच्या पोटावर पॅन्ट रहावी म्हणून आम्ही घालतो तो पट्टा. चामड्याचा किंवा कापडाचा. त्याकडे निरखून पाहिलं जाईलच असं नाही. बऱ्याचदा पुढे आलेल्या पोटामुळे तो झाकला जातो. पण यांच्या कमरेचा मात्र कंबरपट्टा तोही चांदी किंवा सोन्याचा. आमच्या पॅंटला अडकवलेलं कि चेन. पण यांचा मात्र छल्ला. मग त्यात किल्ली नसली तरी चालतं.
फुल, गजरा, आणि वेणी यात फरक असतो हे पण माझ्या लक्षात आलं आहे. आणि गजरा की वेणी यापैकी काय घ्यावं याचापण विचार होतो.
बरं हे फक्त कपडे आणि दागिने यांच्याच बाबतीत नाही. खास कार्यक्रमाआधी आमचे केस वाढले तर, कटिंग करा जरा. हेच वाक्य असत. वाक्य कितीवेळा म्हटलं यावर सुर वेगळा असू शकतो. पण यांचे केस नुसते व्यवस्थित करायचे तरी यांना पार्लर आणि त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. किंवा ती बाई घरी येणार. आम्ही मात्र कटिंगच्या दुकानाबाहेर टाकलेल्या लाकडी बाकावर हातात मिळेल तो पेपर वाचायचा.
☆ मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने…☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी!
शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी!
संतांनी वाढविला तो वाण मराठी! आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी!
अशी ही मराठी, आपली मायबोली! महाराष्ट्राची राजमान्य भाषा! गेल्या हजार वर्षात त्यात होणारी स्थित्यंतरं आपण पाहत आहोत. ज्ञानदेवांच्या काळात जी मराठी भाषा वापरली जाई, ती आज वाचताना बऱ्याच शब्दांपाशी आपल्याला अडखळायला होते. अशी ही आपली मराठी देवनागरी भाषा बाराव्या तेराव्या शतकात समृद्ध होत होती.
एकनाथांनी एकनाथी भागवत, भारुडे लिहिली, त्यामध्ये मराठी भाषेचा उपयोग झाला होता. त्यापूर्वी 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठी भाषा राजमान्य झाली. 1947 नंतर स्वतंत्र भारतात मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली.
कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी प्रमाणित भाषा म्हणून पुस्तकात आपण वाचतो, वापरतो ती असते.. पण दर पाच मैलागणिक भाषा बदलते असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा देश, कोकण, खानदेश, वर्हाड या सर्व भागात बोलली जाणारी मराठी किती विविधता दाखवते ते आपण पाहतो.
महाराष्ट्रातील विविध भागात म्हणजे रत्नागिरी, सांगली, पुणे, धुळे, नागपूर या सर्व ठिकाणी थोडाफार काळ राहिले आहे, त्यामुळे तेथील मराठी भाषा अनुभवली आहे. मिरज- सांगलीच्या मराठी भाषेवर थोडा कर्नाटकातील कानडी भाषेचा टोन येतो. प्रत्येक वाक्यात ‘होय की’ ‘काय की’ या शब्दाचा उपयोग जास्त होतो.
तर कोकण पुणेरी भाषेत’ ‘होय ना, खरे ना’ असा “ना” या शब्दाचा उपयोग दिसतो. खानदेश जवळ असणाऱ्या गुजरात प्रदेशामुळे तेथील मराठी भाषेत गुजराती शब्दांचा उपयोग होतो तर नागपूरच्या वऱ्हाडी भाषेत मध्य प्रदेशातील हिंदी भाषा मिसळली जाते.. भाषेचा प्रवास हा असा चालतो. व्यवहारात बोली भाषेत मराठी जशी बोलतो तशीच लिहितो. भाषा हे माध्यम असते मानवी भावना व्यक्त करण्याचे!
ज्ञानेश्वराने भगवद्गीता संस्कृत मध्ये होती, ती सर्वसामान्यांना कळावी म्हणून त्याकाळी ती प्राकृत मराठीत लिहिली. पण आता जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करतो, तेव्हा पुष्कळ वेळा त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ कळत नाहीत .त्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात.
काळानुरूप देश, भाषा बदलत असते. भाषा आपल्याला ज्ञानामृत देते. लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच मुख्य माध्यम असल्याने, आई प्रथम जे शब्द उच्चारते तोच त्याच्या भाषेचा मुख्य स्त्रोत असतो. त्यामुळे आपण मातृभाषेला महत्त्व देतो.
मोठे झाल्यावर आपण कितीही भाषा शिकलो, इंग्रजी शिकलो, परदेशातील भाषा शिकलो तरी आपली मातृभाषा आपल्यात इतकी आत पर्यंत रुजलेली असते की, कोणतीही तीव्र भावना प्रकट करताना ओठावर मातृभाषेचे शब्द येतात. सुदैवाने आपली मराठी इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना कुठेच अडखळायला होत नाही. आपोआपच शब्द ओठावर येतात.
ओष्ठव्य, दंतव्य ,तालव्य,कंठस्थ अक्षरांचे उच्चार आहेत ते आपल्या शरीर मनाशी जणू एकरूप होऊनच येतात.. म्हणूनच मराठी मातेसमान आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या अलंकारांचे सुंदर वर्णन केलेले आहे. मराठी भाषा ही लवचिक आहे. तिचा उच्चार जसा करू तसा तिचा अर्थ बदलतो. वाक्य बोलताना त्यातील ज्या शब्दांवर आपण जोर देऊ त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो .मराठी भाषेचे अलंकार तिची शोभा वाढवतात.शार्दुलविक्रिडीत, अनुप्रास,यमक,रूपक यासारखी वृत्तं भाषेचे अलंकार आहेत. त्यांचा उपयोग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी होतो. अशी ही मराठी आपल्याला मातेसमान आहे, त्या मराठीला आपण जतन करू या, हीच आजच्या मराठी दिनासाठी शुभेच्छा!
आपण राहात असलेल्या महाराष्ट्र प्रांतातील आपली मराठी ही प्राचीन प्राकृत भाषा आहे. ती केव्हापासून बोलली जाऊ लागली हे माहित नसले तरी सहाव्या शतकातील राष्ट्रकूटांच्या राजवटीपासून ती बोलली जाऊ लागली असा अंदाज आहे.
श्रवणबेळगोळ येथील नवव्या शतकातील बाहुबलीच्या शिल्पाच्या पायावर “ चाविंडराये करवियले ” हे कोरलेले वाक्य सर्वात जुने व पहिले मराठी लेखन असावे. तेव्हापासून ते बाराव्या शतकापर्यंत अपभ्रंश मराठी बोलली जात होती.
अकराव्या शतकातील महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींवर मुकुंदराजाने लिहिलेला लीळाचरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ होय.
मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आहे. अशा या आपल्या प्रांतातील आपली भाषा ही तितकीच रोखठोक, रांगडी तरीही मृदु मुलायम आहे. तलवारीच्या पात्याच्या तेजाची धार असलेली तरीही माणुसकीचा पाझर दगडा दगडांतून स्त्रवणारी ही मराठी माझी माय जणू दुधावरची साय.
शतकानुशतके शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याने, अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठा योध्यांचे पोवाडे गाणाऱ्या शाहिरांनी, ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या लावणीने, गावगाडा हाकणाऱ्या बारा बलूतेदारांनी ही आपली मायबोली समृद्ध केली आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने मराठी भाषा विठ्ठलाच्या भक्तिरसाने समृद्ध होत गेली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवी , तुकारामांचे अभंग जनमनाच्या ओठी बसले. एकनाथी भागवत, मोरोपंतांची केकावली, केशवसुतांची तुतारी, पठ्ठेबापूरावांपासून ते आजपर्यंतची जगदीश खेबुडकरांची लावणी परंपरा, राम गणेश गडकरीपासूनची नाट्य परंपरा, त्या अगोदरची संगीत नाटके, प्रल्हाद केशव अत्रेंचे कऱ्हेचे पाणी, साने गुरूजींची श्यामची आई, कुसुमाग्रजांची विशाखा, मराठीचे सौंदर्य खुलतच गेले.
खान्देशातील अहिराणी, कोकणातील कोकणी, विदर्भातील वऱ्हाडी प्रांता प्रांतातील वेगवेगळा बाज असलेली मराठी, ई लर्निंगच्या जमान्यातही तितकीच सुंदर, ताजी व टवटवीत आहे. इंग्रजीतही सांगितले की My Marathi तरीही ती माय मराठीच उरते. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे,
1974-75 चा काळ असावा… मी सात वर्षांचा होतो. संक्रांतीचा दिवस… सगळ्या गल्लीतली मुलं मिळून तिळगुळ वाटायला बाहेर पडली होती… प्रत्येकाच्या घरात तिळगुळ द्यायचा… राम मंदिर, महादेव मंदिर, विठोबा मंदिर, अंबाबाई चे मंदिर… सगळी देवळं… सगळीकडे तिळगुळ वाटला.. ठेवला.. आता शेवट ‘ऐतवडे डॉक्टर!’… मग झेंडा चौकाकडे मोर्चा वळला… चौकात एका गल्लीत डॉक्टरांचा दवाखाना…
दवाखाना माडीवर…
एका लायनीत उभं राहून डॉक्टरांना तिळगूळ दिला… डॉक्टरांनी पण आम्हाला तिळगूळ दिला अन वर एक चॉकलेट…
कित्ती मज्जाss!…
रावळगाव चॉकलेट…
त्यानंतर मात्र दरवर्षी संक्रांतीला ऐतवडे डॉक्टरांचा दवाखाना ठरलेला… डॉक्टरही नेमाने प्रत्येक वर्षी मुलांना चॉकलेट वाटत राहिले… आणि प्रत्येक मुलांच्या लक्षात राहिले… कायमचे…
आजही कधी कधी झेंडा चौकातल्या त्यांच्या गल्ली जवळून गेलो तरी डॉक्टरांची आठवण नक्की होते… खरंतर ते काही आमचे फॅमिली डॉक्टर न्हवते… मी कधीच त्यांच्याकडे कुठल्याही उपचाराला गेलो नाही… तरीही ऐतवडे डॉक्टर हा शब्द जरी ऐकला तरी तीळगूळ आणि त्यांचे ते चॉकलेट यांची आठवण नक्कीच होते…
डिसेंबर चे दिवस..
लुधियाना ला गेलो होतो… अमृतसर कडे निघालो तेव्हा लुधियाना मध्ये पहाटे एका गुरुद्वारात गेलो होतो… रात्रभर गुरुवाणी चा कार्यक्रम चालू होता… पहाटेची वेळ… डिसेंबरची थंडी… भव्य गुरुद्वारा सजला होता … रोषणाई केली होती… त्या दिवशी काहीतरी विशेष कार्यक्रम असावा… भजन ऐकत भक्तगण बसलेले… चकचकीत वातावरण… ग्रंथसाहेब…
पंजाबी भजनातील बरेच शब्द ओळखीचे… खिशातील मोबाईल काढून समोर ठेवून एका कडेला बसलो… दहा मिनिटे होती पुढे जाण्यासाठी… एक वयस्क पंजाबी स्त्री , पांढरी सलवार-कमीज पंजाबी परिधान,. चेहऱ्यावरती हास्य… झाडू काढत होती… झाडू काढताना लोक उठत आणि दुसरीकडे बसत… तीही आनंदाने सेवेत मग्न होती… तिची स्वच्छता आमच्यापर्यंत आली आणि मी उठलो… गुरु ग्रंथ साहेबांना प्रणाम करून आमच्या गाडीकडे निघालो… गुरुद्वाराच्या दारात येताच
” भैय्या ss!”
अशी हाक ऐकू आली, पाहिले तर ती मगासची स्त्री.. हसत सामोरे आली ,
हातात मोबाईल..! मला देऊन म्हणाली
“आपका मोबाईल..! भूल गये थे !”
माझ्या आता लक्षात आले मी माझा मोबाइल बसल्या जागीच विसरलो होतो..
मी वाकून नमस्कार केला… त्या हसल्या… स्वेटरच्या खिशात हात घालून त्यांनी काहीतरी काढले … माझ्या हातात ठेवले…
मी पाहिलं तर दोन चॉकलेट !..
मी पण हसलो…
पुन्हा पुन्हा धन्यवाद मानत बाहेर पडलो…
कोण कुठची ती स्त्री, पण आठवणीत कायमची जागा करून गेली…! पुढचा सर्व दिवस असाच मजेत गेला … अमृतसरला पोहोचलो.. सर्व अमृतसर फिरलो … सायंकाळी वाघा बॉर्डर पण पाहिली… सांगण्यासारख आणि लिहिण्यासारखे भरपूर घडले त्या दिवशी … पण सकाळी झालेला तो प्रसंग.. झालेली ती छोटी घटना मात्र आज तेजस्वी झाली आहे…
मागच्या महिन्यातली गोष्ट आम्ही दोघ गाडीवरून मुलीच्या पालक मिटींगच्या निमित्ताने कोल्हापूरला गेलो होतो… सगळा कार्यक्रम आणि कोल्हापुरातले काम व्हायला दुपारी दोन वाजून गेले होते…वाटेत काही तरी खाऊ आणि मग पुढे घरी पोहोचू असा विचार करून निघालो… शिरोली ओलांडले अन एका राजस्थानी ढाब्यावर गाडी थांबवली …
छान स्वच्छ परिसर …
आम्ही बसताच वेटरने पंखा चालू केला.. पाणी आणून दिले… स्वतः मालक उठून आला… आमच्यासमोर मेनू कार्ड ठेवले… त्याला थाळीची ऑर्डर दिली… छान हसून तो आमची खातरदारी करत राहिला… गरमागरम जेवण वाढत राहिला… चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवून… व्यापारी हिशोब, रितरीवाज बाजूला ठेवून… जेवण झाले, पैसे दिले..
“वापस आना जी ss ! “
म्हणून त्याने हसूनच निरोप दिला
ह्या घटना लक्षात राहिल्यात, त्याचे आश्चर्य वाटते.
थोडा शोध घेतला तेव्हा या तिन्ही घटनांमधील प्रत्येकाने काही जी कृती केली होती त्याचा बोध लक्षात आला… या घटनांमध्ये प्रत्येकाने स्वतःहून आनंदाने काहीतरी जास्तीचे दिले होते… जगनियम हा असा आहे
“जेवढ्यास तेवढे”
पण इथे मात्र सर्वजण स्वतःहून जास्तीचे जगाला देत होते.. अपेक्षे पेक्षा थोड जास्तच.. या गोष्टी करता त्यांनी जास्त मेहनत सुद्धा घेतली नाही…
कुठे चॉकलेट मिळाली…
कुठे आपुलकीचे दोन शब्द…
कुठं चेहऱ्यावरचे निर्मळ हास्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांनी सुखासमाधानाने दिले होते.. अपेक्षा नसताना मिळाले होते..
माझी मुंबईची आत्या… अशीच प्रेमळ… मुंबईत एका चाळीत तीच घर… तीनच खोल्या … घरची आठ-दहा माणसे…आणि आला-गेला असायचा. सगळ्यांचे करत राहायची. माणूस निघताना घरातील जे काही असेल ते देत राहायची. तिला सगळे माई म्हणायचे …किती गोड बोलणे !… तिने गोड बोलणं कधीच सोडलं नाही …
आज ती नाही.. पण तिचा सुहास्य चेहरा जसाच्या तसा फोटो काढल्या सारखा मनासमोर दिसत राहतो …एक प्रसन्न शांतता… एक प्रसन्न सोज्वळपणा याशिवाय काहीही आठवत नाही…
प्रत्येक वाक्यानंतर बऱ्याच वेळा ती होss लावायची
जेव होss!
जाऊन ये होss!
पुन्हा ये हो ss!
असे होss! बोलणे पण मी आजकाल कुठेही बघितले नाही.
प्रत्येकजण अशा गोड शब्दांना भूकावला आहे…
शरीरासाठी आपण बरेच काही करतो… पण मनासाठी काय ? गोड शब्द ही मनाची गरज आहे…
सकारात्मक शब्दांना लोक आसुसले आहेत.
ते मिळाले तर.?..
कुसुमाग्रजांची जन्मतिथी आपण नुकतीच साजरी केली… गेल्या पावसाळ्यात आपण सर्वांनीच महापुराचा कहर अनुभवलाय… लोकांना पैशाची , वस्तूची मदत तर सर्वांनी दिली असेल पण उभारी चे दोन शब्द… ते कुठे मिळतात ?
कुसुमाग्रजांकडे असाच एक जण जातो. आपली कहाणी सांगतो. त्यानंतर जे काही घडले ते त्यांच्या कवितेतच वाचा…!
कणा –
‘ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
…
माणूस आपुलकी पासून पारखा झाला आहे, शब्दांना महाग आहे…
सर्व जगच “Extra” चे वेडे आहे. डिस्काउंट, सेल, अमुक % एक्स्ट्रा, असं म्हटलं की डोळे Extra मोठे होतात. दिल्यापेक्षा आले जास्त तर सगळ्यांनाच पाहिजे असते. आपण जर असे Extra दिले तर सगळे तुमचे नक्की ‘फॅन’ होतील.
मदत असे म्हटले…
दान असे म्हटले की आपल्याला फक्त पैसा आठवतो.. . आपण याच्या पुढचा विचारच करत नाही.
तेजगुरु सरश्रींच्या पुस्तकात वाचले त्याप्रमाणे आपणाकडे देण्यासारखे बरेच काही आहे. ते आपण देत नाही…
बाकी सगळे जाऊदे पण आपल्या आसपासचे लोकच असे आहेत…
कदाचित तुम्ही स्वतः आहात… ज्याला सकारात्मक शब्द हवे आहेत…
ज्याला कोणाचा तरी प्रेमाचा स्पर्श पाहिजे आहे…
त्याला कोणीतरी फक्त जवळ बसायला पाहिजे आहे…
ज्याला कुणाला तरी आपल्या मनातील सगळं सांगायचं आहे… त्याला श्रमाची मदत पाहिजे आहे… हात पाहिजे आहेत…
पाठीवर थाप पाहिजे आहे…
आपण शोध घेऊया..
मला स्वतः ला कशाची गरज आहे ?
आणि माझ्या आसपासच्या लोकांनाही कशाची गरज आहे?
कुणाला कान पाहिजे आहेत तर कानदान करा
कुणाला पाठीवरती थाप पाहिजे आहे त्यांना शब्ददान करा
कुणाला थोडी श्रमदानाची गरज आहे त्यांना थोडी श्रमाची मदत करा… कुणाला तुमचा वेळ पाहिजे आहे त्यांना तुमच्यातील थोडासा वेळ द्या
कुणाला फक्त तुमचे जवळ असणे पाहिजे आहे फक्त त्यांच्याजवळ फक्त बसून राहा
आपल्याकडे या सर्वात काय जास्त शिल्लक आहे ?
हे थोडेसे “एक्स्ट्रा” आपण देऊ शकतो का?
यशस्वी होण्याचा मंत्र सांगताना असे म्हणतात कि यशाकडे जाण्यासाठी पहिला तर तुमचे नियोजन करा या नियोजनाचे व्यवस्थित तुकडे करा. आपल्याला रोज थोडे थोडे काम करायचे आहे असे ठरवा. काय करायला पाहिजे आहे त्याप्रमाणे करत जा.
जमलं तर ठरवल्या्पेक्षा थोडं जास्तच करा…
‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही अशीच सकारात्मक म्हण … मोठे काम करायचे असेल तर या म्हणीचा वापर करणे हाच खरा गुरुमंत्र…
आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा फक्त एक पाऊल जास्त पुढे असणे महत्त्वाचे …
रोज आपण आपल्याशी स्पर्धा केली तर?
आपणच आपले प्रतिस्पर्धी झालो तर?…
भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या साधनेच्या काळात अनेक गुरूंचा शोध घेतला. त्यांनी सत्याचा शोध घेण्याच्या मार्गात जे जे काही सांगितले त्याप्रमाणे केलेच, पण त्याच्यापेक्षाही थोडं जास्तच केले… थोडी जास्तच साधना केली … तरीही मनाची तळमळ शांत झाली नाही अखेर स्वतः मार्ग चालू लागले आणि एक दिवस अंतिम लक्ष्या पर्यंत पोहोचले…
थोडा विचार केला अन् प्रामाणिकपणाने स्वतःकडे पाहिले तर हे सर्व जण मान्य करतील की ईश्वराने आपल्याला आपल्या लायकी पेक्षाही अनेक पटीने जास्त आपणास दिले आहे… शिवाय तो देत आहे… त्याला आपण एक बीज दिले तर तो अनेकपटीने वाढवून परत देतो… भरपूर देतो… एक्स्ट्रा देतो…
तो फळ देणारा आहे …
बहुफल देणारा आहे.
माणसाने हाव सोडली तर सर्वच भरपूर आहे प्रेम ,पैसा,आनंद…
अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने?
जेव्हा तो नेईल दो कराने सांभाळीशी किती मग दो कराने?
गदिमांच्या शब्दात आपण मिसळून जाऊया अन् देवाला मागूया… आपल्या मागण्यापेक्षा
अधिकच मिळेल!
देखणे मिळेल!
याची खात्री ठेवूनच मागूया …
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी !
हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा मायमाउली काळी
एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी !
महालमाड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी !
सोसे तितके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा
अपुरेपणही नलगे, नलगे पस्तावाची पाळी !
29 फेब्रुवारी हा असाच “एक्स्ट्रा” दिवस…
आता हा दिवस चार वर्षातून एकदा येतो, सूर्याच्या भोवती पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 365.25 (365•242181) दिवस लागतात तर आपले वर्षाचे 365 दिवस असतात राहिलेला पाव दिवस म्हणजे सहा तास
हे चार वर्षे ×प्रत्येकी सहा तास याप्रमाणे आपण एका दिवसाने वर्ष वाढवतो… त्रुटी पूर्ण करतो या सर्वच गोष्टी आपणास माहिती आहेत पण या 29 फेब्रुवारी च्या निमित्ताने मनन झाले म्हणूनच हा लेखन प्रपंच …
हे मनन आपणास आवडले असेल तर ‘पुढाळायला’ हरकत नाही आणि आपला “एक्स्ट्रा” वेळ खर्च करून प्रतिक्रिया कळवायलाही हरकत नाही… आपल्या प्रतिक्रिया ही ‘लेखकाची’ प्रेरणा आहे.
नुकताच म्हणजे १४ फेब्रुवारीला प्रेम दिवस सगळ्या जगभर साजरा झाला. कोणाची संस्कृती असो किंवा नसो पण त्या दिवसाची संकल्पना आवडली असावी म्हणून प्रत्येक देशात हा दिवस साजरा केला नव्हे साजरा केला जातो.
पण प्रेम ही संकल्पना एवढी संकुचित आहे का हो? फक्त प्रियकर प्रेयसी या मधे असलेले नाते किंवा भावना म्हणजे प्रेम? मग आई, वडील -मुले, आजी, आजोबा -नातवंडे, पाळीव प्राणी – घरातील सदस्य, बहीण – भाऊ, मित्र – मित्र /मैत्रीण, किंवा इतर काही कारणाने निर्माण झालेले नातेसंबंध, उदा. मालक -कामगार, ज्येष्ठ -कनिष्ठ, स्त्री -पुरुष ई….
या सगळ्यांमध्ये असणारी भावना त्याने निर्माण झालेले नाते म्हणजे काय? हे प्रेम नाही?
मग कोणी म्हणेल आई, वडील – मुले म्हणजे मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य
आजी, आजोबा – नातवंड म्हणजे जिव्हाळा,
पाळीव प्राणी – घरातील सदस्य म्हणजे लळा
बहीण – भाऊ म्हणजे बंधुत्व,
मित्र – मित्र /मैत्रीण, म्हणजे मैत्री
मालक – कामगार म्हणजे जबाबदारी
ज्येष्ठ -कनिष्ठ म्हणजे कुठे तरी समानत्व मान्य करून फक्त आधी -नंतर केलेला भेद
इतर कोणीही ओळखीचे अनोळखीचे आपल्याला भेटल्यावर त्यांच्याशी केलेला व्यवहार म्हणजे आपुलकी
स्त्री – पुरुष यामधे असलेल्या भावना म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण? व्याभिचार?
जरा नीट विचार केला तर समजेल की मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य,जिव्हाळा,लळा,बंधुत्व,मैत्री ,जबाबदारी,आपुलकी, दया, उपकार काळजी धाक या सगळ्या नावांच्या इमारती या प्रेमाच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत नावे वेगळी असली तरी हेच प्रेम आहे.
मग या सगळ्यासाठी एक दिवस? नाही नाही या सगळ्या साठी वेगवेगळे दिवस आहेत की असे पटकन सगळे म्हणतील. पण तरी सगळे दिवस जरी साजरे केले तरी फक्त एक एक दिवसच?
दुसरे असे की सगळे म्हणतात ईश्वर एक आहे पण मानवाने त्याच्या सोयीनुसार स्वरूप बदलून अनेक देवांची निर्मिती केली. गम्मत आहे ना ज्या देवाने निर्माण केले त्याच देवांना वेगवेगळे रूप देऊन त्याचे क्रेडिट आपण घेतो. असो तो विषय मोठा आहे.
पण हे जसे घडले ना अगदी तसेच प्रेम ही एकच भावना असताना त्याला वेगवेगळी नावे देऊन त्याला वेगवेगळ्या दिवसात विभागले जात आहे. स्त्री – पुरुष हे विवाहा नंतर दुसऱ्या बरोबर दिसलें तर ते लफडे, व्याभिचर… का ते प्रेम नाही होऊ शकत?
वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या नावाने केले तरी फक्त त्या एका दिवसापुरतेच त्याचे महत्व? बाकी ३६४ दिवसांचे काय? तेव्हा पण या भावना जागृत असल्याच पाहिजेत ना?
प्रेम हे त्रैलोक्यातील त्रिकालाबाधित सत्य आहे. ते सर्वत्र सारखेच आहे त्याला वेगवेगळे नाव देऊन विभागून त्याचा अपमान करू नका. प्रेमाला प्रेमच राहू द्या वेगळे नाव नको. आणि सगळ्याच संतांनी सांगितल्या प्रमाणे फक्त आणि फक्त प्रेमकी गंगा बहाते रहो……
पुर्वीच्या काळी मानव जेव्हापासून समुह करून राहू लागला तेंव्हा आपले विचार ,भावना समोरच्या पर्यंत पोहचविण्याकरिता विशिष्ठ हावभाव , कृती, बोली यांचा वापर करू लागला. यातूनच पुढे भाषेचा उगम झाला. अशीच आर्य समाजाची भाषा म्हणजे आपली मुळ मराठी. संस्कृत भाषेच्या प्रभावातून निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्र या बोलीभाषेतून मराठी भाषेचा उदय झाला. प्रदेशानुसार संस्कृत भाषेचा अपभ्रंश होऊन नविन भाषांनी जन्म घेतला त्यातील एक म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे. तसे पाहता मराठी भाषेचा इतिहास हजारों वर्षापूर्वीचा मानला जातो. संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी मानले जाते. मराठी भाषेतील पहिले वाक्य ‘श्रवणबळ येथील शिलालेखावर ‘ सापडले . तसेच ज्ञानेश्वरांना मराठीतील आद्यकवी मानले जातात. त्यांनी भगवदगीता सर्वसामान्य मराठी माणसाला कळावी यासाठी तिचे मराठीत रूपांतर केले. ती ज्ञानेश्वरी म्हणून हजारों लोक आजही वाचतात.
मराठीचा प्रवास –
आपल्या मराठी भाषेला सुसंस्कृत ,समृद्ध ,आणि श्रीमंत मानले जाते. कितीतरी कोटी लोक आज मराठी भाषा बोलतात. मराठी ही महाराष्ट्रातील संस्कृतीचा जणू मुकूटच आहे. देशाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्तित्वात आलेली ही बोली आज सातपुडा पर्वत ते कावेरी प्रांत आणि दक्षिणेकडील गोवा इथपर्यंत मराठी भाषा बोलली जाते. आणि तिचा विकास झाला आहे. मराठी भाषेत कोकणी मराठी ,ऐराणी मराठी ,घाटी मराठी, पुणेरी मराठी, विदर्भ- मराठवाड्यात बोलली जाणारी मराठी असे बरेच पोटप्रकार आहेत. म्हणतात ‘ मराठी ही अशी बोली आहे ती प्रत्येक दहा मैलावर बदलते.’ संत ज्ञानेश्वर यांना मराठीतील पहिले आद्यकवी मानले जाते. त्यानंतर चक्रधर स्वामींनी लिळाग्रंथ हा पहिला पद्य चरित्रग्रंथ लिहला. तेथून पुढे पद्य लिखाणास सुरुवात झाली. त्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम याच्यापासून ते आतापर्यंतच्या अनेक लेखक आणि कवींनी त्यांचे कितीतरी लिखाण मराठी साहित्याला बहाल केले आहे.संत ज्ञानदेव, संत तुकाराम ,संत एकनाथ त्यानंतर ग.दि.मा.,कुसुमाग्रज ,पु.ल देशपांडे, प्र.के. अत्रे इत्यादि व आताचे सर्व जेष्ठ साहित्यीक यांनी मराठी भाषेलाअलंकारीक करून अधीक समृद्ध केली आहे. मराठी भाषेचा उत्कर्ष आणि विकास होण्यास या सर्वांचे मोलाचे योगदान आहे. संतानी आपल्या माय मराठीचे बीज रूजविले . तिचा वटवृक्ष करण्याचे काम ग.दि.मा. ,कुसुमाग्रज ,पु.ल देशपांडे ,प्र. के. अत्रे
बालकवी,वि.स.खांडेकर इत्यादि नामांकित साहित्यीक व आताचे जेष्ठ आणि नवोदित साहित्यीक यांनी केले आहे. या सर्वांनी आपल्या साहित्याचा ठसा मराठी मनात रूजविला आहे. अनेक ग्रंथ ,कथासंग्रह ,नाट्यसंग्रह ,काव्यसंग्रह यातून ‘माय मराठीचे ‘बीज रूजविले आहे आणि आजही ते कार्य चालूच आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकगीते,कोळी गीते ,लावण्या हे तर आपल्या मराठी संस्कृतीचे खास आकर्षण ठरले आहे. सर्वच साहित्यातून मराठी संस्कृतीचे दर्शन , जडण-घडण ,आणि वारसा अखंडितपणे पुढे चालत आहे. काळाप्रमाणे पाहिले तर मराठीचा उगम ते आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच चांगला चालला आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाचा अभिमान आणि ओळख आहे.
माय मराठीची सद्यस्थिती आणि भविष्य
अनेक साहित्यीकांच्या अमुल्य योगदानातून मराठी भाषेची मुळे खुपच खोलवर गेली आहेत. पण येणाऱ्या मराठी भाषिकांच्या आणि नवोदित साहित्यीकांच्या मराठी बद्दलची भावना व प्रेम यातूनच तिची खोलवर गेलेली मुळे तग धरून राहतील. तसे पाहिले तर आज नवोदितांचे लिखाण पण मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. छोट्या-मोठ्या खेड्यातून सुध्दा ‘ मराठी साहित्य संमेलन ‘आयोजित केली जात आहेत. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा मानली जाते. आज सर्वच शाळांतून सुध्दा मराठी भाषा हा सक्तीचा विषय केला जात आहे आणि तो असावाच. त्यामुळे बालवयापासूनच मुलांच्या मनावर मराठी रूजत आहे . मराठी भाषेला अखंडित आणि माय मराठीची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचे काम हे मराठी साहित्यिक आणि प्रत्येक मराठी माणसाचे आहे. आणि ‘महाराष्ट्राला अखंडित ठेवण्याचे बळ हे माय मराठी बोलीतच आहे ‘ मराठी भाषा ही भारतात तिसर्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. माय मराठी भाषा महान ,अधिक दर्जेदार व्हावी हे प्रत्येक मराठी साहित्यीकाचे आद्यकर्तव्य आहे. मराठी वाचकांनी चांगला प्रतिसाद देऊन मराठी भाषा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आपल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीला मराठी भाषेचे ज्ञान अवगत असावे. आपल्या माय मराठीचा वारसा त्यांनी सहजतेने जपला जावा याकरिता आपण माय मराठीचा जागर सदैव चालू ठेवावा. मराठी भाषेचे मानाचे स्थान सुनिश्चित व चिरकाल टिकून रहावे याकरिता प्रत्येक मराठी माणसाने सदैव प्रयत्नशील रहावे. ‘आपल्या मराठीच्या वटवृक्षावर बांडगुळ म्हणून वाढणाऱ्या परप्रांतीय भाषांना महत्त्व न देता , मी महाराष्ट्राचा आणि मराठी बोलीचा ‘हेच तत्व अंगीकारावे. आज महाराष्ट्रा बाहेर सुध्दा अनेक मराठी साहित्य संमेलन घडून येतात ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्राला अखंडित ठेवण्याकरिता चला मराठी बोलूया ,चला मराठी गावूया ,चला मराठी जगूया आणि चला मराठीला जगवूया.
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषेला गौरवान्वित करणारा सुवर्णदिन! २०१३ पासून हा दिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, ही एकुलती एक बहीण सर्व भावांना जीव की प्राण सर्वांची लाडकी, म्हणून कुसुमचे अग्रज अर्थात ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.समाजाभिमुख लेखन करणाऱ्या मराठी लेखकांमधील हे शिखरस्थ नाव! बहुउद्देशीय आणि बहुरंगी लेखनकलेचे उद्गाते असे कुसुमाग्रज जितक्या ताकदीने समीक्षा करीत इतक्याच हळुवारपणे कविता रचित. रसिकांच्या मनात ज्या नाटकाचे संवाद घर (उदाहरण द्यायचे तर ‘कुणी घर देता का घर) करून आहेत, असे ‘नटसम्राट’ नाटक, ज्याच्या लेखनाने कुसुमाग्रज ज्ञानपीठ विजेते (१९८७) ठरले! शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे केल्या गेले आहे. वि.स. खांडेकर (त्यांना ययाती कादंबरीकरता हा १९७४ मध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला) यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. संतसाहित्यात तर संत ज्ञानेश्वरांनी (१२९०) वरीलप्रमाणे मऱ्हाटी भाषेचे केलेलं हे कौतुक! आपली मराठी भाषासुंदरी म्हणजे ‘सुंदरा मनामधिं भरलि’ अशी रामजोशींच्या स्वप्नातील लावण्यखणीच जणू! अमृताहुनी गोड अशा ईश्वराचे नामःस्मरण करतांना मराठीची अमृतवाणी ऐकायला आणि बोलायला किती गोड, बघा ना: ‘तिन्ही लोक आनंदाने आनंदाने भरुन गाउ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे!’
या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात. या अभिजात साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! म्हणूनच प्रश्न पडतो की मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून सरकारदरबारी मान्यता मिळायला आणखी किती समृद्ध व्हावे लागेल? पैठणीसारखे महावस्त्र नेसल्यावर आणखी कुठले वस्त्र ल्यायचे तिने?
मराठी भाषेचे पोवाडे गायला, तिच्या लावण्याच्या लावण्या गायला आणि तिच्यावरील भक्ती दर्शवण्याकरता अभंग म्हणायला मराठीच हवी. तिचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी करणारे महान साहित्यिकच नाही तर सामान्य माणसे कुठे हरवली? शब्दपुष्पांच्या असंख्य माळा कंठात लेऊन सजलेली आपली अभिजात मायमराठी आज आठशे खिडक्या नऊशे दारं यांतून कुठं बरं बाहेर पडली असावी? ‘मराठी इज अ व्हेरी ब्युटीफुल ल्यांगवेज!’ असे कानावर पडले की संस्कृतीचे माहेरघर अशी मराठी असूनही, तिच्या हृदयाला घरे पडतील अशी मराठी ऐकून! सगळं ‘चालतंय की’ असे म्हणत म्हणत ‘ती मराठी’ शासकीय आदेशांत बंदिस्त झाली.
‘मी मराठी’ चा गजर करणारे आपण मराठी साहित्य विकत घेऊन मुलांना ते वाचण्याकरिता किती प्रवृत्त करतो? मराठी सिनेमे घरीच बघत का आनंद मानतो? मराठी नाटकसुंदरीची खरी रंगशोभा रंगमंचावर! कुठलीही भाषा शिकण्याचा प्रारंभ पाळण्यातून होतो. (गर्भसंस्कार विचारात घेतले तर गर्भावस्थेतच) बाळ जन्माला आल्यावर त्याच्या कणावर जे पडते ते अति महत्वपूर्ण शिक्षण! हे बाळ भाषेचा पहिला उच्चार ‘आई’ म्हणून करते का ‘मम्मी’ म्हणून? थोडा मोठा झाला की ते ‘nursary rhymes’ शिकते की रामरक्षा अथवा शुभंकरोती?
बरे, मराठी माध्यमात आपल्या मुलांना शिकवण्याची उर्मी कुणात आहे? मराठी माध्यमातील शाळेत मुलाने जावे हे बऱ्याच पालकांना पटणार नाही. मात्र एक भाषा म्हणून मराठीची निवड करणे अत्यावश्यक आहे. सरकारी पातळीवर हे कार्य सुरु आहेच. मराठी भाषेची गोडी निर्माण होईल असे मराठी भाषेतील साहित्य, नाटके, सिनेमे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना उपलब्ध करून द्यावेत. मला याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा वाटतो की, पालक, आजी, आजोबा आणि शिक्षकांनी यांनी मुलांशी मराठी भाषेतून संवाद साधावा. प्रत्येक मराठी घराघराने किमान एक तास आपल्या भाषेला समर्पित करावा. त्यात अस्खलित मराठी बोलणे, अभिजात मराठी साहित्य वाचणे, सुंदर मराठीत जे असेल ते श्राव्य साहित्य ऐकणे, हे उपक्रम राबवावेत. यात टी व्ही/ ओ टी टी या माध्यमातील मराठी सिरीयल/ सिनेमे इत्यादींचा समावेश नसावा. रोज रोज ती भाषा कानावर पडल्यावर अथवा नजरेखालून गेल्यावर मुलांना आपोआपच ‘मराठी भाषेतून विचार करण्याची’ सवय लागेल. मराठी शुद्धलेखन शिकायचे तर कुठल्याही (शाळेतील पाठ्यक्रम सोडून) अवांतर विषयावर मुलांनी रोज पानभर मजकूर लिहावा किंवा रोजनिशी लिहिण्यास मराठीचा वापर करणे अत्युत्तम!
मात्र यात पालक कुटुंबातील सदस्य, समाजातील व्यक्ती आणि महाराष्ट्र सरकार, या सर्वांच्या सहकार्याशिवाय मराठी भाषेचे संस्कार मुलांवर होणार नाहीत. यासाठी हृदयातून साद यायला हवी ‘माझी माय मराठी!’
या लेखाची सांगता कविवर्य सुरेश भटांच्या प्रेरणादायी मराठी गौरव गीताने करते.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,
आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी,
आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
सुरेश भट
प्रिय वाचकांनो, मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याला नटवणाऱ्या आणि सजवणाऱ्या काना, मात्रा अन वेलांट्यांची शप्पथ, माझी अमृताहुनी गोड मराठी मला अतिप्रिय आणि तुम्हाला?
प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात. त्या गोष्टी मिळाव्यात अशी गरजही असते. त्याचा क्रम साधारण पुढील प्रमाणे असतो.
अन्न,वस्त्र,निवारा,पैसा,प्रतिष्ठा व मी कोण? याचा शोध.
त्यातील अन्न,वस्त्र,निवारा,पैसा व भौतिक सुख सुविधा याच्या मागे माणूस लागतो.आणि आपण जेवढे त्याच्या मागे लागतो तितकेच ते पुढे पळते.जशी सावली धरता येत नाही तसेच काहीसे होते. मग ही सावली आपल्या मागे कशी येईल याचा विचार केला पाहिजे. आपण सूर्याकडे पाठ करुन चाललो तर सावली आपल्या पुढे असते.पण सूर्याकडे तोंड करुन चाललो म्हणजे सूर्याला सामोरे गेलो तर सावली मागे येईल. मग हा सूर्य कोण? तर आपण स्वतः …..
स्वतः कोण आहोत? स्वतः मधील क्षमता ओळखल्या तर या सगळ्या सावल्या,भौतिक सुखे,लोकप्रियता आपल्या मागे येते. म्हणजेच आपल्या आयुष्याचा उद्देश आपल्याला माहिती असणे महत्वाचे असते. जगात इतकी माणसे असताना माझा जन्म झाला आहे म्हणजे निसर्गाला माझ्या कडून काही काम करुन घ्यायचे आहे.हे लक्षात घ्यावे.
▪️ आपल्या सभोवती जी वैश्विक शक्ती आहे त्याचे आपण शक्तिशाली मानवी रूप आहोत. आणि या वैश्विक शक्तीला आपल्या कडून काही करून घ्यायचे आहे हे कायम लक्षात ठेवावे.
▪️ स्वतः मध्ये कोणते टॅलेंट म्हणजे दैवी शक्ती आहे याचा शोध घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्ती युनिक असते. प्रत्येकाची हुशारी,कौशल्ये वेगळी असतात.
▪️ या वेगळे पणाचा व आपल्यात असलेल्या वैश्विक शक्तीचा उपयोग करुन आपल्या संपर्कात येणाऱ्यांना आपण कशी मदत करु शकतो याचा विचार करायचा आहे.
How can I help? हा विचार प्राधान्याने करायचा आहे.
आपण जे लोकांना देतो ते आपल्याकडे कित्येक पटीने परत येते. म्हणून मला काय मिळणार या पेक्षा माझ्या कडून कोणाला काय मिळणार? माझ्यामुळे किती जण आनंदी होणार? याचा विचार करुन त्या प्रमाणे आचरण केले तर तोच आनंद कित्येक पटीने आपल्या कडे येणार आहे.
या साठी पुढील गोष्टी आचरणात आणाव्यात.
▪️ माझ्यात वैश्विक दैवी शक्ती आहे.माझा जन्म काही कारणा साठी झाला आहे. हे मान्य करावे.
▪️ स्वतः मधील युनिक टॅलेंट म्हणजे वेगळ्या दैवी शक्तीची यादी करावी.
ही यादी करताना काही गोष्टींचे स्मरण केले तर यादी करणे सोपे होईल.
उदा. आई वडील काय केल्यावर शाबासकी देत होते?
माझ्याकडे माणसे कोणत्या गोष्टी मुळे येतात?
माझ्या कोणत्या कृतीने माणसे आनंदी होतात?
माझ्या मधील कोणत्या गोष्टी मुळे मी लोकांना प्रिय आहे?
याचा विचार केला तर आपल्यात कोणते विशेष व इतरांच्या पेक्षा वेगळे गुण म्हणजेच वेगळी दैवी शक्ती आहे ते लक्षात येईल.
▪️ माझ्याकडे अमर्याद पैसा व वेळ असेल तर मी इतरांच्या साठी काय काय करु शकेन याची यादी करणे. जे करावेसे वाटेल ते म्हणजे विशेष गुण आहेत.ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांची एक यादी करणे.
▪️ माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी कशी व कोणती मदत करु शकेन? ज्या मुळे त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल.
हे जर आपण अंमलात आणले तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे.
हे सगळे करण्याचा उद्देश एकच आहे. तो उद्देश म्हणजे स्वतःला ओळखणे.
स्वतः मधील क्षमता,सकारात्मकता व स्वतः मधील वेगळे पण ओळखणे. एकदा आपण स्वतःला ओळखले की बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येणार आहेत.
सध्याचं प्रत्येकाचं जीवनमान हे खूप धकाधकीचे, घाईगडबडीचे झाले आहे.पर्यायाने ते कसल्यातरी तणावाचे पण झाले आहे.आपल्या नित्य दैनंदिन कामकाजात आपण खूप लोकांशी संवाद साधतो.त्या संवादातून, जवळीकेतून कधी मदतीच्या भावनेने आपली कामे इतरांकडून करुन घेतो वा आपण इतरांची कामे करुन देतो.हे सगळं आपण करतो खरं पण अजूनही आपल्याला पूर्णत्वाचा,संतोषाचा, समाधानाचा कळसोध्याय हा पूर्णच झाल्या नसल्याचे उमगते.आणि मग कारणं शोधतांना एक महत्वाचे कारण सापडते तो म्हणजे आपल्या आतील मनाचा आवाज ऐकण्याचा अभाव.आपले अंतर्मन नेहमी आपल्याला ज्या हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी सांगतं त्या खुणावणा-या गोष्टींकडं आपण कधी गरज म्हणून तर कधी संकोच म्हणून, कधी आडमुठेपणा तर कधी संस्कारांचा पगडा म्हणून चक्क कानाडोळा करतो. ह्याचे परिणाम लगेच दिसतं नसले तरी मनावर खोल दूरगामी उमटतं असतात.त्यामुळे सगळं हातातच असून वाळू निसटल्यागतं सारखा गमावल्याचा भास होतो आणि हा भासच आपल्याला आनंदी राहण्यापासून वंचित ठेवत़ो.हा विचार करतांना ह्या मला सुचलेल्या काही ओळी खालीलप्रमाणे………
☆ आनंदाची फुले वाटणारे झाड…☆ श्री विश्वास देशपांडे ☆
आज मी सांगणार आहे महाराष्ट्राच्या त्या लाडक्या व्यक्तिमत्वाबद्दल . ओळखलंच असेल तुम्ही. आपले ते भाई हो. म्हणजेच सर्वांचे लाडके पुलं . तर आज त्यांचे एक दोन किस्से सांगून मी तुमची सकाळ आनंदी करणार आहे. पुलं म्हणजे मोठे साहित्यिक, गायक, वादक, संगीतकार, वक्ता. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पण अशी माणसं माणूस म्हणून सुद्धा किती मोठी असतात, ते दर्शविणारी ही घटना. मधू गानू यांनी पुलंना ‘ माणसांनी मोहरलेलं झाड . असं त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. ते खरंच आहे. कारण पुलंच्या घरी सतत गायक, वादक, कलाकार, साहित्यिक, त्यांचे चाहते इ चा सतत राबता असायचा. पण पुलं आणि सुनीताबाई न कंटाळता त्या सर्वांची सरबराई करत असायचे. जसं रानातलं एखादं चवदार आणि थंड पाण्याचं तळं असावं, आणि त्या तळ्यावर येऊन प्रत्येकानं आपली तहान भागवावी, तसे पुलंकडे येऊन प्रत्येकजण समाधानी आणि आनंदी होऊन जायचा. पण कधी कधी हे तळच तृषार्तांकडे आपण होऊन जायचं. एक प्रसंग घडला तो असा.
पुलं इचलकरंजीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात वारणानगरची काही मुले येऊन आपली कला सादर करणार होती. पण काही कारणाने ती मुले संमेलनात येऊ शकली नाहीत. पुलंना हे कळले तेव्हा त्यांनी संमेलन आटोपल्यानंतर त्या मुलांच्या भेटीसाठी जाण्याचे ठरवले. आणि ते वारणानगरला गेले. जणू पुंडलिका भेटी परब्रह्म आले. त्यांना पाहिल्यावर मुलांचा आनंद गगनात मावेना.
एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, ” आम्हाला साहित्य संमेलनात आमची कला सादर करायला मिळेल असे वाटले होते. पण आम्हाला आमंत्रणच आले नाही. पण आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वतः आम्हाला भेटायला आले आणि आम्हाला खूप आनंद झाला. आता त्यांच्यासमोर आम्ही आपली कला सादर करू. पण आमची एक अट आहे. आमचा कार्यक्रम आवडला तर पुलंनी आम्हाला पेटी वाजवून दाखवावी. पुलंनी अर्थातच त्यांची ही अट मान्य केली.
आणि नंतर घडले ते सगळे अद्भुत ! मुलांच्या कलागुणांवर पुलं अफाट भाळले. त्यांनी मुलांना मग पेटी तर वाजवून दाखवलीच, पण त्यांना जे जे हवे ते सगळे केले. एवढे करून पुलं थांबले नाहीत. त्यांनी त्या मुलांच्या कलागुणांचे कौतुक वर्तमानपत्रात लेख लिहून केले. शिवाय आपल्या पुढाकाराने त्या मुलांचा कार्यक्रम पुण्यात घडवून आणला. मुलं आणि पुलं यांची झकास गट्टी जमली. मुलांचे ते आवडते ‘ भाईकाका ‘ झाले. असे होते पुलं . जेवढे साहित्यिक म्हणून मोठे, तेवढेच माणूस म्हणूनही.
एकदा पुलंच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेला. काही प्रश्न विचारल्यानंतर ‘ तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता’ असे त्याने पुलंना विचारले. काही क्षण पुलं शांत होते. पत्रकाराला वाटले की बहुधा त्यांना काय सांगावे हा प्रश्न पडला असेल. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा क्षण, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा क्षण इ पैकी कोणता सांगावा असा त्यांना प्रश्न पडला असेल. तो काही बोलणार तेवढ्यात पुलं म्हणाले, ‘ एकदा माजी पंतप्रधान इंदिराजी आपल्या मंत्रिमंडळासमवेत चर्चा करीत होत्या. त्या म्हणाल्या की आपल्या देशातले जे महान लोक होऊन गेले , त्यांचा सन्मान तर आपण टपाल तिकीट काढून करतोच, पण एखाद्या परदेशातील व्यक्तीवर तिकीट काढून त्यांचा सन्मान करावा असे वाटते. त्यांचे सहकारी म्हणाले की छान कल्पना आहे. कोणाचे नाव आपल्या डोळ्यांसमोर आहे का ? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या जगाला हसवणाऱ्या आणि काही काळ का होईना पण आपले दुःख विसरायला लावणाऱ्या चार्ली चॅप्लिनवर तिकीट काढावे असे वाटते. ‘ वा. फारच छान कल्पना ! ‘ सहकारी म्हणाले.
तेव्हा एका मंत्र्याने विचारले की कोणाच्या हस्ते हे तिकीट प्रकाशित करावे असे आपल्याला वाटते ? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या, ‘ तो महाराष्ट्रातला पी एल आहे ना, लोकांना आपल्या नर्मविनोदाने हसवणारा, त्याच्या हस्ते हे तिकीट प्रकाशित करावे असे वाटते. ‘
पुलं त्या पत्रकाराला म्हणाले , ‘ तो माझ्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण ! ‘
एकदा पुलंना कोणीतरी तुम्ही आत्मचरित्र कधी लिहिणार असे विचारले होते. तेव्हा पुलं म्हणाले, ‘ मी आत्मचरित्र लिहीन की नाही हे माहिती नाही, पण लिहिलेच तर त्याचे नाव ‘ निघून नरजातीला रमविण्यात गेले वय ‘ असे असेल असे सांगून टाकले. आपल्या साठ वर्षांच्या जगण्याचे मर्म अशा रीतीने पुलंनी एका ओळीत सांगून टाकले होते. असे हे आनंदाची फुले वाटणारे झाड..!