गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा नुकताच वाचनात आला. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील एका सभागृहात किशोरीताईंचे गाणे सुरु होते. कार्यक्रम नुकताच सुरु झाला होता आणि साऊंड सिस्टीम बिघडली. संयोजकांनी बरेच प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. ताई स्टेजवरून उठून गेल्या. श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली. आता काय होईल ? दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. कोणी म्हणाले ताईंचा स्वभाव विचित्र आहे. कोणी म्हणाले त्या स्वतःला फार ग्रेट समजतात. ज्याला जे वाटले ते तो बोलू लागला. शेवटी कोणी तरी बराच प्रयत्न करून साऊंड सिस्टीम सुरु केली. ताई आतमध्ये होत्या. कोणीतरी भीतभीतच त्यांना सांगितले की साऊंड सिस्टीम सुरु झाली आहे.
ताई आल्या. त्यांनी गायला सुरुवात केली. हळूहळू मैफलीत रंग भरू लागला. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक गहिरी होत गेली. ताईंचा स्वर सप्तकातून सहज विहार करू लागला. जणू आपल्या गायनातून त्यांनी अनंताचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची गानसमाधी लागली. त्यांच्याबरोबर श्रोते देखील स्वरांच्या पावसात चिंब झाले होते. ताईंच्या सुरात भक्तीभाव होता, बेहोशी होती, माधुर्य होते. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारे आणखी काहीतरी होते. अनंताची आराधना होती. सुरांच्या माध्यमातूनच त्या अनंताचा शोध घेत होत्या. त्यामागे त्यांची खडतर तपश्चर्या होती. आणि अशी खडतर साधना करणाऱ्या साधकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की ज्या क्षणी त्याचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मी आणि तू वेगळे नाहीतच. माझ्यातच तू आहेस आणि तुझ्यातच मी आहे असा साक्षात्कार साधकाला होतो. तशी ताईंची गानसमाधी लागली होती. पण आपल्यासवे त्या श्रोत्यांना देखील त्यांनी त्यात सामील करून घेतले होते. त्यांचा ‘ स्व ‘ विश्वव्यापक झाला होता. हळूहळू त्या समेवर आल्या. श्रोते सुरसागरात डुंबत होते. पाच मिनिटांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.
अशी ही गानसरस्वतीची गानसमाधी. मला त्यांचा हेवा वाटला. आणि माझेही मन नकळत त्यांच्या तपश्चर्येपुढे लीन झाले. मी त्यांना मनोमन प्रणाम केला. आपण जो काही जीवनमार्ग निवडला आहे त्याच्याप्रती केवढे हे उच्च प्रतीचे समर्पण ! पुन्हा त्यामध्ये स्वार्थाची भावना नाही, हाव नाही, कुठलीही अपेक्षा नाही. ताई कोणासाठी गात होत्या ? म्हटले तर सर्वांसाठी आणि म्हटले तर कोणासाठीच नाही ! त्या गात होत्या आनंदासाठी. आणि हा आनंद श्रोत्यांनाही त्यांनी भरभरून वाटला. त्या आनंदाचे झाड झाल्या. सुरांच्या कल्पवृक्षाला आनंदाची फळे लागली. वृक्ष फळभाराने झुकला. सप्तसुरांची मधुर फळे त्या वृक्षाला लागली. ज्याला हवे त्याने यावे आणि मधुर फळांची गोडी चाखावी.
गीतरामायणातले ग.दि.मांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर नकळत कानात घुमू लागले.
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी
यज्ञ मंडपी आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती.
असेच नाही का ताईंच्या मैफलीबद्दल म्हणता येणार ?
आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात असेच समर्पण आपल्याला करता आले तर …! आपले जीवन ही सुद्धा एक साधना होईल, एक तपश्चर्या होईल. आपल्या कामाचे समाधान, आपल्या कामाचा आनंद आपल्याला तर मिळेलच पण दुसऱ्यांनाही हा आनंदाचा ठेवा आपल्याला वाटता येईल.
सध्याच्या युगात परदेशी प्रवास ही एक सहजासहजी शक्यप्राय गोष्ट झाली आहे.पूर्वी दळणवळणाच्या साधनांची कमतरता आणि आर्थिक दुर्बलता ह्यामुळे पंचक्रोशी ओलांडणे सुध्दा जिकीरीचे होते.हल्ली मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या उन्नतीसाठी विदेशी शिक्षणाची गरज भासू लागली.सरकारी नोक-यांमध्ये मिळणारे एल.टी.सी. आणि सेवानिवृत्ती नंतर हाती आलेल्या एकरकमी पैशामुळे विदेशात हौशीखातर फिरणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली.
9 जानेवारी,”प्रवासी भारतीय दिन”.
ह्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या देशात परत आलेत. ह्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी 2003 सालापासून हा दिवस “प्रवासी भारतीय दिन”म्हणून साजरा करायला सुरवात केली.पहिला प्रवासी दिन भारताची राजधानी दिल्ली ला साजरा केल्या गेला.
आपली जिवाभावाची, जवळची व्यक्ती तिच्या उन्नतीसाठी परदेशात गेली तरी ती व्यक्ती परत कायम आपल्याजवळ येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतो.आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षाकरिता आपण तिचा विरह ही सहन करतो.पण ती व्यक्ती कायमची आपल्याकडे परत येण्याचा दिवस हा आपल्यासाठी “सोनियाचा दिवस”असतो.बस ह्याच सोनियाच्या दिवसाचे औचित्य साधून साजरा करण्यासाठी मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या कडून ह्याचा श्रीगणेशा झाला.
2019 मध्ये हा सोहळा वाराणशीला तीन दिवसाच्या समारंभात साजरा झाला.मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय संबंधित व्यक्ती ह्या सोहळ्यास आवर्जून हजर होते.ह्या सोहळ्यामुळे आपले जवळपास 110 देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतात ही दूरदृष्टी मा.अटलजींची होती.देशाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी असे उपक्रम राबवून घेणे हे सच्च्या देशप्रेमीचेच लक्षण होय.
प्रवासावरून वीणा वर्ल्ड वाल्या वीणाताई आठवल्या. परवाच त्यांचा सिंप्लीफाय ॲप्लीफाय हा खुप छान लेख वाचनात आला. आइनस्टाइन कायम एकाच रंगाचा आणि त्याच प्रकारचा ड्रेस परिधान करायचे. दुसऱ्या वेशात त्यांना कधी कुणी बघितले नाही असं म्हणतात. त्याचं म्हणणं हया अशा गोष्टींवर आपला वेळ, पैसा आणि मेंदूला होणारा शिण हे टाळून आपण आपला फायदा, प्रगती करू शकतो. अर्थात अगदीं साधी राहणी, साधं जीवन जगणं, संग्रह न करणं ह्या गोष्टी आचरणात आणण्यास खूपच कठीण पण कायम लक्षात ठेवल्या तर कधीतरी अमलात आणण्याची पण शक्यता वाढते.
तर अशा ह्या प्रवासी जागतिक दिनाच्या आपल्या भारतवासियांना शुभेच्छा,.
नुकतीच नववर्षाची सुरवात झाली. नवीन वर्ष तसं काळजीत,संकटाच्या भितीखाली, निराशेचं, गेलं.नवीन वर्ष आले तसे सगळेजणं मनावरील मळभं झटकून नवी आव्हाने स्विकारायला सज्ज झालेत. नवीन योजलेल्या संकल्पांना सुरवात केल्या गेली. मोठ्या हुरुपाने योजलेले संकल्प निदान काही दिवस तरी सुरळीत बिनबोभाट पार पडावेत ही मनोमन ईच्छा बाळगून त्या नुसार आपल्या ईच्छित कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक जण आखायला लागले.
माझा ह्या वर्षीचा संकल्प म्हणजे पहाटेची भटकंती .प्रभातफेरी मारायचा अगदी ठाम निश्चय झाला होता.पहाटे फिरण्याचे फायदे डाँक्टरांनी तसेच नियमीत फिरायला जाणा-यांनी वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगितले होते.त्यामुळे रात्रीच व्यवस्थित दोनदोनदा गजर लावलेला तपासून घेतला.पुलंनी रोजनिशीत लिहील्या प्रमाणे झोपेतच गजर बंद करुन परत झोपणे,उशिरा जागे झाल्यावर लौकर जाग आली नाही ह्या सबबीखाली परत झोपणे असे काहीही करायचे नाही,असे मनाला वारंवार झोपतांना बजावले.रात्रीच फिरायला जायचे शूज,स्वेटर,शाल स्कार्फ काढून ठेवले .
गजर गजरात वाजला आणि आजपासून रात्र खूपच लहान झाली की काय असा प्रश्न पडला.झोप नीट मनासारखी न झाल्याचं फील आलं.तरीही मनाचा हिय्या करुन उठले.भराभर आपलं आवरून फिरायला जायला बाहेर पडले.
नियमीत फिरायला येणा-या बायका तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या नजरेने बघताहेत असं उगाचच वाटून गेलं.फिरायला येणाऱ्या मंडळींची बरीच गर्दी रस्त्याने होती.तेव्हा नियमित फिरायला येणाऱ्या काकूंनी ,ही गर्दी पंधरा जानेवारी नंतर आपोआप कमी होईल ही दाव्याने खात्री दिली.ज्या रस्त्याने फिरायला जायचे त्या रस्त्याने रागात,लाडात येणारी कुत्री नाहीत नं ह्याची आधीच खातरजमा करुन घेतली होती.
पहाटेपहाटे मस्त फिरतांना फुललेली फुले,हवेने डोलणारी झाडे,निवांत रवंथ करणारे प्राणी, मंजुळ कलरव करणारे पक्षी बघत बघत सैर करण्यात खूप जम्मत असते हे फक्त ऐकून होते. ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी ख-या नसतात ह्याची परत एकदा खात्री पटली.माणसांइतकीच कुत्र्यांनाही माणसांच्या संगतीत प्रभातफेरीची गरज असते हे नव्यानेच उमगले.
फिरुन आल्यावर खूप उत्साह वाटतो हे त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे ठोकून सांगितलेला ऐकीव दाव्याचा अनुभव तसा आला नाही हे पण नक्की. मग हळूहळू सवय झाल्यानंतर ते फील येत हे नव्याने कळलं.
फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या हिरव्या रंगाची द्रव्ये बाटल्यांमध्ये भरलेली दिसली.उगीचच कडक चहाची आठवण आली आणि त्या रसांकडे बघून ढवळायला लागलं.
अशात-हेने वेगळे अनुभव घेत का होईना प्रभातफेरी सुरू तर केली.काही कालांतराने आवडायला लागेल ह्या अनुभवी महिलांच्या सांगण्यावर विश्वास असल्याने सध्यातरी साखरझोप आठवत आठवतं प्रभातफेरी सुरू ठेवलीय. पण जोक अपार्ट साखरझोेतप कितीही चांगली वाटतं असली तरी पहाटे फिरणं हेच तंदुरुस्त तब्येतीसाठी अत्यावश्यक बिनखर्चिक औषधं आहे हेच खरे.
कुठल्याही व्यक्तीचे जीवन यशस्वी, सफल,कृतार्थ झालं असं वाटत तेव्हा त्यामागे काही कारणं असतात. त्या कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या पुढील पिढीतील वारसदारांना, अपत्यांना आपण स्वतः, लोकांनी चांगला घडलायं असं म्हणणं. काही वेळेस अपत्य आपल्या पालकांशी खूप चांगले वागतात. परंतू त्यांची बाहेरील जगाशी वागणूक कोणी चांगलं नाव घेणारी नसते तर कधी मुलं बाहेरील जगाशी खूप चांगले वर्तन करतात पण प्रत्यक्ष आपल्या पालकांच्या प्रेमाचे ऋण जाणत नाही. परंतू माझ्या वाचनात, बघण्यात काही पालक,आईवडील असे आहेत की ज्यांना आपल्या अपत्यांमुळे आपलं जीवन धन्य झालं असं वाटतं. माझ्या माहितीत असलेल्या मातापित्यांमधील सगळ्यात धन्य पावलेले, कृतार्थ झालेले,समाधान संतोष पावलेले व सुख उपभोगलेले मातापिता म्हणजे शहाजीराजे आणि जिजाबाई,छत्रपती शिवाजीमहाराजांचे मातापिता.
दिनांक 6 जानेवारी 1665 ह्या दिनी जिजाऊंच्या शिवबाने त्यांची सुवर्णतुला केली. शिवाजीराजे छत्रपती जरी असले तरी आधी ते जिजाऊंचे शिवबा होते.
शिवाजीराजे एके दिवशी मातेच्या दालनात बसले असता बोलता-बोलता जिजाऊसाहेबांनी आपली एक इच्छा शिवबांजवळ व्यक्त केली होती. ‘येत्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने ग्रहण काळात मनसोक्त दानधर्म करण्याची आमची इच्छा आहे.’ यावर स्मितहास्य करत शिवबा जिजाऊंना म्हणाले, ‘आऊसाहेब आमचीदेखील एक इच्छा आहे. आऊसाहेब, तुम्ही आमच्या माताच नव्हे, तर प्रथम गुरू, निःस्पृह सहकारी व समयोचित सल्लागार देखील आहात. आजपर्यंत प्रत्येक प्रसंगात आपली साथ आणि आपला सल्ला आमच्यासाठी बहुमोल ठरलेला आहे. आपल्या प्रेरणेमुळेच आम्ही इथवर मजल मारु शकलो. लहानपणापासून आपण आमच्यावर स्वराज्याचेच संस्कार केलेत. आज आम्ही फक्त तुमच्यामुळेच घडलो व सर्व काही करू शकलो. तुमची शिकवण आणि मार्गदर्शन यामुळेच आम्ही इथवर आलो. आऊसाहेब हे स्वराज्य आहे ते फक्त आपल्यामुळेच. म्हणूनच या ग्रहणात आम्ही आपली सुवर्णतुला करण्याचे ठरवले आहे.’
ह्या शब्दांनी ती माता धन्य झाली. त्या आईला सुवर्णतुला होतेयं म्हणून आनंद झाला कारण हे मौल्यवान सोनं गोरगरीबांच्या तसचं अडल्यानडल्यांच्या कामी येऊन त्यांची गरज भागणार होती.हे उचित सत्पात्री दान ठरेल ह्याची जिजाऊंना खात्री होती.
तुला विधीसाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वरला आले होते. त्यांच्यासोबत सोनोपंत डबीरही आले होते. आईसाहेबांच्या तुलेसाठी विपुल सोने महाबळेश्वरी रवाना झाले होते. महाबळेश्वराचे मंदिर माणसांनी भरून गेले होते. ग्रहणकाळ सुरू झाला होता. पुरोहितांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. शिवरायांनी पहाटेच्या मुहूर्तावर तुलेच्या रुपेरी पारड्यांची पूजा बांधली आणि शिवरायांनी आऊसाहेबांना पारड्यात बैठक घेण्याची विनंती केली.
महाराजांचा आधार घेत आऊसाहेब पारड्या जवळ आल्या. हळदी-कुंकवाची चिमूट सोडून नेहमीसारखे ‘जगदंब जगदंब’ म्हणीत आऊसाहेबांनी पारड्यात आपले भाग्यवान उजवे पाऊल ठेवले. जनता मोठ्या प्रेमाने
उत्सुकतेने हा मातृपूजनाचा सोहळा बघण्यास जमली होती. कित्येक जण तर केवळ आऊसाहेबांचे दर्शन घेण्याच्या अभिलाषेने आले होते.
नजर टाकाल तिकडे गर्द हिरवी वनश्री, मंदिरातील मंगल वातावरण, मंत्रघोष चालू आहे. पंचगंगा खळाळत वाहत आहेत आणि ह्या साऱ्यांच्या मधोमध एक मुलगा आपल्या आईला सोन्याने तोलून धरीत आहे. खरेच कल्पनेतसुद्धा ह्या विहमंग दृश्यांने डोळे पाणवतात. जिजाऊंना एका पारड्यात बसवले होते. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा टाकल्या जात होत्या. तुला दानाबरोबर विधीवत मंत्रोच्चार होऊ लागले होते. तुला होताना जिजाऊंना खूपच समाधान वाटत होते.
तुलादानानंतर हे सर्व सोने गरीब रयतेला वाटून टाकले होते. दृष्ट लागेल असा सोहळा महाबळेश्वरी पूर्ण करण्यात आला होता. आपल्या मातेची दानधर्माची इच्छा अभिनव पद्धतीने शिवरायांनी पूर्ण केली होती. शिवरायांच्या अतुलनीय मातृप्रेमाची महती साऱ्या महाराष्ट्राने डोळे भरून पाहिली होती.
आपल्या पुत्राचे अलौकिक प्रेम पाहून जिजाऊ धन्य धन्य झाल्या होत्या. माय-लेकरांचे हे प्रेम पाहून सारी रयत धन्य धन्य झाली होती. राजमातेने भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकराला आशीर्वाद दिला होता. महाराजांच्या भावविश्वातील एक सोहळा पार पडला होता. आईसाहेब शिवबाला प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, आशीर्वाद कायमच देत आल्या होत्या. तुला झाल्यानंतर जिजाऊंनी आपल्या लेकरासाठी उदंड आयुष्य मागितले होते.
मातेच्या बरोबरच राजांनी सोनोपंत डबीर म्हणजे अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न,ह्यांचीपण तुला करण्याचे मनावर घेतले. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात .ही तुला पार पडली.
खरोखरच धन्य त्या जिजाऊ, धन्य ते शिवराय आणि जिवाला जीव देणारी ती माणंस
काही गोष्टींचे वेध लागले असं आपण म्हणतो. ग्रहणाचे, निवडणूकांचे वेध लागतात, तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही ठरवण्याचे वेध लागतात. आणि काही काळ ते असतात.
आपण काही तरी ठरवू या ना……
हे मागच्या वर्षांपासून म्हणजे काल पासून आमच्या घरात सुरू होतं……. काय दिवस पटापट जातात नं………. फक्त ठरवताना आकड्यांमुळे नवीन वर्ष सुरू झालं…… आणि करेपर्यंत कदाचित संपेल सुध्दा……
काहीतरी काय ठरवायचं?……. काही चांगल ठरवू या ना…….. त्यावेळी सुध्दा माझा विनोद करायचा प्रयत्न…….
पण विनोदाला दाद मिळालीच नाही. हसतांना दिसणाऱ्या दातांऐवजी मोठ्ठे झालेले डोळेच दिसले. मग माझ्या लक्षात आलं, की हे वातावरण विनोद करायचं नाही……. आणि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये. असं खोटं सांगत मी खरं लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
बरं.. कशाबद्दल आणि काय ठरवायचं?….. मी शक्य तितक्या गंभीरपणे विचारलं…
… नवीन वर्षात प्रत्येक जण काही तरी ठरवत असतात…… आपणही काही तरी ठरवू या…
ठरवूया की…… पण काय? कसं? आणि कशाबद्दल ठरवायचं?…… माझे प्रश्न……
तू आपल्या अनुभवाने, विचाराने चांगल तेच ठरवते आणि माझ्या कडून करून घेतेस. तेव्हा तुझा अनुभव, संयम, दूरदृष्टी, निश्चय, नेतृत्व कौशल्य, नियोजन असे सगळे गुण लक्षात येतात….. तुझा निर्णय ठाम असतो….. मग आपण काय ठरवायचं…… तू ठरवायचंस आणि माझ्या कडून करून घ्यायच हा साधा, सोपा, आणि धोपट मार्ग आहे की……. मी शक्य तितके चांगले शब्द आठवून आठवून एका दमात वापरले.
खाण्यापिण्याच्या बाबतीत तुच ठरवतेस. कपडे आणि दागिने यांच्या बद्दल तू ठरवलेलं मला मान्य करावं लागतं. घरातल्या वस्तूंच्या खरेदीसाठी तू सांगते ते गरजेचं नसलं तरीही गरजेच आहे हे तू मला पटवून देतेस.
फिरायला जायचं का?…. आणि कुठे?….. हा प्रश्न पडल्यावर कुठे? कधी? कसं? कोणासोबत? यावर आपण विचार करुन तू घेतलेल्या निर्णयाला मी हो म्हणतो….. मुलं मोठी झाली आहेत. त्यांच तेच ठरवतात. आणि ठरलेलं आपल्याला सांगतात. आता अजून काय ठरवायचं…….
सकाळी लवकर उठणं, फिरायला जाणं, जमेल तसा, जमेल तिथे, आणि जमेल तेवढाच व्यायाम करणं हे आपण बऱ्याचदा ठरवलं आहे. आणि हे ठरवलेलं आपल्या चांगलं लक्षात आहे. पण ते जमतंच असं नाही……. त्याला आपण काय करणार…… पण आपण ठरवतो हे सुध्दा काही कमी नाही…… तसं आपण कमीच ठरवतो असंही नाही….. आणि आपलं वजन अजून सुध्दा दोन आकड्यांच्या पुढे सरकत नाही….. त्यामुळे ते कमी करायचं हे ठरवण्याची सध्या गरज नाही……
जाऊ देत….. तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही…… नाराजीचा सूर…….
मीच काही ठरवते. आणि तुम्हाला सांगते. बघा पटतंय का? नाही आवडलं तर आपण परत दुसरं काही ठरवू…… चालेल…
मी पण चालेल असं म्हणत विषय संपवला. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही या वाक्यात सध्यातरी अर्थाचा म्हणजे पैशांचा संबंध नाही हा अर्थ माझ्या लक्षात आला…
यांच ठरवणं आणि हाॅटेल मधील मेनू कार्ड यात काही साम्य असतं. म्हणजे हाॅटेल मध्ये ते काय देणार हे त्यांनी ठरवलेलं असतं. आणि तेच त्यांनी लिहिलेलं असतं. त्यातूनच आपण काय घ्यायचं ते ठरवायचं असतं. घरातही तस्संच असत. त्यांनी जे काही ठरवलेलं असत त्यातूनच आपल्याला निवडायचं असतं.
हाॅटेल मध्ये खाण्याचे पदार्थ किंमतीसह लिहिलेल्या असतात. यांच्या ठरवण्यात बऱ्याचदा किमती वस्तूच असतात.
आता घरात जे ठरवलं जाईल ते नवीन वर्षात करायचा प्रयत्न करायचा हे आमचं ठरलं आहे……..
घडी शब्द किती छोटासा. पण त्याच्या हिंदी व मराठी भाषेतील अर्थाच्या छटा मात्र विविध आहेत. या घडी शब्दाने माझ्या तर बऱ्याच आठवणी उलगडल्या. विशेषत: लहान पणीच्या घड्या जरा जास्तच मनात बसतात.
लहानपणी वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाऊन खूप आठवणी मनाच्या कप्प्यात जमा झाल्या आहेत. एक काका होते त्यांच्याकडे गेल्यावर भीतीच वाटायची.ते होते फार कडक शिस्तीचे. त्यांच्या घरात गेल्यावर चप्पल कुठे काढायची इथ पासून प्रश्न पडायचे. आपण चप्पल दारा बाहेर काढली तर ते म्हणणार हरवायची आहे का? घरात काढली की म्हणणार इथे काढतात का? काढून चप्पल स्टँड वर ठेवायची. स्टँड वर ठेवली की म्हणणार अशी ठेवतात का? मग ते स्वतःच्या हाताने नीट ठेवायचे. आणि माझ्या व त्यांच्या ठेवण्यात काय फरक आहे हेच मी शोधत रहायची. घरात गेले की कुठे बसावे हा प्रश्न! पूर्वी सोफे वगैरे नसायचे. लोखंडी कॉट किंवा लाकडी पलंग असायचा. त्यावर बसावे तर त्यांच्या बेडशीटची घडी विस्कटेल याची भीती. आपण बसल्यावर ते आपल्या शेजारचे बेडशीट नीट करायचे. वस्तू तर अगदी जागेवरच असाव्यात असे त्यांचे म्हणणे असायचे. आणि माझ्या डोक्यात खूप गोंधळ व्हायचा. वस्तूंनी आपली जागाच सोडली नाही तर आपण जेवणार कसे? स्वयंपाक कसा करणार? आमच्या कडे पण शिस्त असायची पण वेळ प्रसंगी वस्तू जागा पण सोडायच्या आणि हिंडून फिरून शेजारच्याही घरात जाऊन परत यायच्या. रात्री मात्र सगळ्या वस्तू,माणसे आपल्या जागी येऊन स्थानापन्न व्हायची.
असेच अजून एक घर की तिथे शिस्तीला पर्यायी शब्द बावळट असतो असा माझ्या बाल मनाचा समज झाला होता. अंथरुण काढणे, अंथरुण पांघरुण यांच्या विशिष्ट पद्धतीने घड्या घालणे हा एक सोहळा असायचा. आणि बावळट हे विशेषण ऐकून घेण्या पेक्षा तो सोहळा मी हनुवटीवर हात ठेवून अचंबित नजरेने व थक्क चेहेऱ्याने बघत रहाणे पसंत करायची. सगळ्या घड्या विशिष्ठ पद्धतीने घालून झाल्या की त्या त्यांच्या आकारमानाने एकावर एक बसायच्या आणि सर्वात वर सुंदर चादर घालून त्यावर फ्लॉवर पॉट ठेवला जायचा. आणि तो ठेवला गेला की मी टाळ्या वाजवून उड्या मारायची. मग त्या काकांच्या कडून कौतुक मिळायचे आणि ते म्हणायचे “माझ्या कामाचे कौतुक फक्त या बाळाला आहे.”
त्या फ्लॉवर पॉट खाली रात्रीची झोपायची सोय आहे हे सांगूनही खरे वाटायचे नाही.
हीच कथा पिण्याचे पाणी घेताना असायची.
आपण पाण्याच्या भांड्यात तांब्या ( हो तेव्हा पितळी तांबे असायचे.जग ग्लास ही मंडळी नंतर आली.) बुडवून खाली ठेवला की ठेवणाऱ्या माणसाचा बावळट म्हणून उद्धार व्हायचा. का तर तो खालून न पुसता ठेवल्याने फरशीवर पाण्याचा गोल उमटणार.तो गोल ज्याच्या हाताने उमटेल त्याला पुढचे जेवण कसे आणि किती गोड लागणार? हीच परिस्थिती झाडून काढताना. त्या वेळी लंबे झाडू ( कुंचे ) नवीनच प्रविष्ट झाले होते. मग आपल्या उंचीचा झाडू बघून मला तर मोठीच गंमत वाटायची. आणि त्या घरातील कर्ता पुरुष खाली बसून तो लांब कुंचा आडवा धरून त्याच्या निम्म्या भागात पकडून पुढच्या शेंड्याने कसे झाडावे याचे प्रात्यक्षिक दाखवायचा. आणि ज्याला ते जमणार नाही त्याला बावळट ऐकावे लागायचे. नंतर त्यांचीच माझ्या वयाची मुलगी म्हणायची, “तुम्हीच खूप छान झाडता तर तुम्हीच झाडून घ्या.”
या शिस्तीच्या घडीच्या छोट्या छोट्या आठवणी आहेत. अजून कपाट तर आवरायचेच राहिले आहे. ते नंतर असेच कधीतरी आवरु.
अतिशिस्त आणि बेशिस्त यांच्यातील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. गोष्टी व्यवस्थित करता येणे आवश्यकच मात्र अति सर्वत्र वर्ज्यते हे लक्षात ठेवले पाहिजे.
काल सांगाती समुहावर रिव्ह्यु मधे श्री.महेश पेंढारकर ह्यांची जुनी पण खूप मस्त पोस्ट परत एकदा वाचनात आली.ह्या पोस्ट मुळे कित्येक दिवसातील माझ्या वागणूकीची अटकळ येऊन डोक्यात लख्ख प्रकाशच पडला. हल्ली मला औषधे आणि खाण्यापिण्यासाठी लागणा-या आवश्यक गोष्टींच्या दुकानात सोडून दुसऱ्या कुठल्याही दुकानाची अक्षरशः पायरी सुद्धा चढायची भिती वाटू लागलीयं.
खरोखर ह्या जवळपास तीस वर्षांच्या संसारात आवश्यक आवश्यक करीत कितीतरी वस्तू, गोष्टी ह्या आवश्यकतेपेक्षाही कितीतरी पटीने जास्त जमवून ठेवण्याचा, कित्येक वस्तूंचा संग्रह करून कवटाळून ठेवण्याचा माझा हव्यास आता माझ्याच डोळ्यात खुपायला लागला आहे.
जेव्हा स्वतःमधील दोष हे आपण स्वतःशीच मनोमन मान्य करायला लागलो की समजून जावं पाणी खूप जास्त डोक्यावरून वहायला लागलं आहे.कारण आपली सहज सरसकट प्रवृत्ती असते की दुसऱ्यांचे दोष,चुका अवगुण चटकन दिसतात, जाणवतात परंतु एकतर आपले स्वतःचे दोष,चुका, अवगुण मुळी चटकन दिसतच नाहीत, दिसले तरी कानाडोळा करण्याकडे कल असतो आणि अगदीच दिसले तरी आपलं मनं,आपला मेंदू ते मान्य करायला राजीच नसतो मुळी.त्यामुळे मी ज्याअर्थी माझे दोष वा माझ्या चुका मान्य करतेयं त्याअर्थी मला ताबडतोब माझा विचारांचा, वागणूकींचा ट्रँक बदलायला हवा आहे हे नक्की.
सर्वप्रथम घरातील भांडी बघून जीव दडपायला लागला आहे.ति. आईंची आधीची भांडी,माझ्या लग्नातील आणि लग्नानंतरची जमवलेली भांडी बघून मला माझीच स्वतःची जणू खवलेमांजर झाल्यागतं वाटतयं.काय ते डब्बे,काय ती क्राँकरी,जपता जपता वेड लागायचं फक्त बाकी आहे. स्वतःच्या वेड्या मनाची समजूत काढतांना खरच मी मलाच सांगतेयं,” कोणी आलंगेलं तर लागतील की”, पण खरं सांगा हल्ली हळुहळू एकमेकांच्या भेटीच मुळी उंबराच्या फुलागत होऊ लागल्यात आणि त्यातून ह्या अशा संकटांच्या काळात असे कितीसे माणसं एकमेकांकडे येणीजाणी करणार आहेत ?.
आता माझा मोर्चा वळला कपड्यांच्या ढीगांकडे.खरचं अती झालं आणि हसू आलं च्या ऐवजी अती झालं आणि रडू आलं ही परिस्थिती आलीयं.पंचवीस वर्षांपासून च्या माझ्या साड्या अजूनही जैसे थे असतांना ह्या साड्यांची थप्पी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अर्थात ही साड्यांची कृपादृष्टी माझ्या आणि अहोंच्या दोघांच्याही बहिणींची.व्यक्ती म्हणजे मी प्रेमळ,शहाणी, चांगली आणि गुणी असल्याने माझी आई,बहिण आणि नणंद ह्या तिघीही स्वतःपेक्षा जास्त साड्या मला घेऊन माझे लाड पुरवितात. भरीसभर कुठून दुर्बुद्धी सुचली अन् मध्यंतरी पंजाबी ड्रेस घालायला लागले होते. बाकी काही नाही पण ह्यामुळे अजून काही नाही पण पंधरा वीस ड्रेस ची कपड्यांच्या इस्टेटीत भरच पडली. असो.
नाही म्हणायला माझ्या डोळ्यात अजून तरी पुस्तकांनी खचाखच भरलेली कपाटं मात्र डोळ्यात सलत नाहीत हे खरे.देवाने एक कृपा मात्र केली मला आँनलाईन शाँपींगच्या आवडीचा तसूभरही वारा माझ्या अंगाला लागू दिला नाही. अजून पर्यंत एक रुपयाचे देखील आँनलाईन शाँपींग केलेले नाही आणि आतातर ही उपरती झाल्याने ते करायची सूतराम शक्यताही नाही.
त्यामुळे अतिशय अल्प गरजा, कमीत कमी सामान बाळगणा-या व्यक्तींचा मी प्रचंड आदर करते. आणि जर हा मोह,हव्यास आवरून कमीतकमी गरजांमध्ये,अल्प सामानांमध्ये जगणं शिकायचा कुठे क्लास असेल तर मी करावा म्हणतेयं.
काही दिवसांपूर्वी मी पुण्यात होतो. माझे चाळीसगावचे एक अतिशय जवळचे सहकारी सुद्धा पुण्यातच त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते. परवाच्या दिवशी सकाळी मला अचानक त्यांचा फोन आला. त्यांचा आवाज अगदी खोल गेला होता. मला म्हणाले, ‘ सर, माझे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. मला एकदा भेटायला येऊन जा. ‘ त्यांचे आणि माझे नाते जरी मैत्रीचे असले तरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आम्ही सगळेच त्यांना अण्णा म्हणतो. अशा या अण्णांचा फोन आला आणि आम्ही दोघं तातडीनं त्यांना भेटायला गेलो. आम्ही आल्याचा अण्णांना कोण आनंद ! तशाही अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. काय सांगू, किती सांगू आणि कसं सांगू अशी त्यांची अवस्था झाली होती. शेवटी त्यांचा मुलगा म्हणाला, ‘ अण्णा, तुम्ही बोलू नका. मी सगळं सांगतो. ‘
गंमत म्हणजे आदल्या दिवशीच अण्णांना हॉस्पिटलमधून घरी सोडले होते. अण्णांना जास्त बोलायला डॉक्टरांनी मनाई केली होती. अण्णांनी पूर्ण विश्रांतीच घ्यावी, त्यांना कोणाच्याही फोनचा त्रास होऊ नये या हेतूने मुलांनी त्यांचा फोन काढून घेतला होता. पण तशाही परिस्थितीत अण्णांनी कुठून तरी फोन शोधला आणि पहिला फोन मला केला. त्यांना का वाटलं असेल की मला फोन करावा ? कुठून येते ही ओढ ? मी तर काही अण्णांचा जवळचा नातेवाईक नव्हतो. पण माणुसकीच्या आणि प्रेमाच्या नात्याने मी त्यांचा सगळ्यात जवळचा नातेवाईक होतो. आणि ते नातं होतं मैत्रीचं ! हे नातं रक्तापलीकडचं असतं. या नात्यात कोणी कोणाकडून काही घेत नाही आणि कोणी कोणाला काही देत नाही. देवघेव असते ती निखळ प्रेमाची. कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारं हे नातं म्हणजे मनुष्य जीवनातील एक सुंदर मुक्कामाचं ठिकाण. हा मैत्रीचा गाव प्रत्येकाचं जीवन आनंदानं उजळून टाकतो. अण्णांची भेट घेऊन आम्ही निघालो. अण्णा अगदी खुश होते. डॉक्टरांनी दिलेली औषधे तर त्यांच्याजवळ होतीच पण हा मैत्रीच्या औषधाचा डोस पोटात जाताच अण्णांचे दुखणे कुठल्या कुठे पळाले. लवकर बरे होण्यासाठी त्यांना आणखी ऊर्जा मिळाली.
अलीकडे सगळ्या गोष्टींसाठी काही अटी असतात. कोणतीही जाहिरात पहा. तिथे कुठेतरी स्टारमार्क करून अगदी छोट्या अक्षरात का होईन पण ‘ अटी लागू ‘ असे लिहिलेलं असतं. मैत्रीच्या या नात्याला मात्र कुठल्याच अटी लागू नसतात. किंबहुना अटी असतील तर ती मैत्री कसली ? तो तर व्यवहार ! मैत्री काही मागत नाही. ना वय, ना जातपात, ना धर्म, ना लिंग. कशाकशाचीही आवश्यकता नसते. मैत्री या सगळ्यांच्या पलीकडे असते. रक्ताच्या नात्यात निवडीला चॉईस नसतो. मैत्रीत मात्र तो मुबलक असतो. आवडणाऱ्या मित्रांशी मैत्री होते असे म्हणण्यापेक्षा ती त्यांच्यासोबत जुळते, फुलते आणि खुलते. तिचे रेशमी बंध घट्ट होत जातात.
मैत्रीचं लावलेलं रोपटं बहरावं म्हणून काही काळजी जरूर घ्यावी लागते. मैत्रीत काही मिळण्याची अपेक्षा तर नसतेच ( म्हणजे ती नसावीच ! ) पण द्यायचं मात्र असतं आणि तेही परतीच्या अपेक्षेनं नाहीच. त्यात व्यवहार नसतोच ! मित्रानं विश्वासानं एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तर ती प्राणापलीकडे जपायची असते. उद्या चुकून मैत्रीत अंतर पडलं तरी ती गोष्ट फक्त तुमच्यापाशीच ठेवायची असते. आणि सच्चे दिलदार मित्र या गोष्टी पाळतातच.
खूप वर्षांपूर्वी अमिताभचा ‘ जंजीर ‘ हा चित्रपट आला होता. त्यात अमिताभ आणि प्राण यांच्या फार सुरेख भूमिका होत्या. प्राण आणि अमिताभ असतात सुरुवातीला एकमेकांचे वैरी. पण नंतर त्यांची मैत्री होते आणि मग या मैत्रीच्या अनोख्या नात्याचे प्रेक्षक साक्षीदार होतात. या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायीलेलं गाणं फार सुदर आणि अर्थपूर्ण आहे. ते प्राणच्या तोंडी आहे. ‘ यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी ‘ हे ते गाणं ! या गाण्यातल्या पुढील ओळी फार सुंदर आहेत…
छुपा ना हमसे हाल-ए-दिल सुना दे तू
तेरे हंसी की किमत क्या हैं ये बता दे तू
आपला मित्र उदास आहे, हसत नाही हे पाहिल्यावर सच्च्या मित्राला दुःख होते. त्याच्या फक्त एका हसण्यासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो.
कहे तो आसमांसे चाँदतारे ले आऊं
हंसी जवां और दिलकश नजारे ले आऊं
असे असतात खरे मित्र. अनेक चित्रपटातून ही दोस्तीची अजरामर कथा चित्रित झाली आहे. शोले मधील ‘ ये दोस्ती हम नही तोडेंगे..’ किंवा याराना मधील ‘तेरे जैसा यार कहाँ ‘ किंवा ‘ बने चाहे दुश्मन जमाना हमारा… हे दोस्ताना चित्रपटातील गीत असो. अशी गाणी ही हृदयाला हात घालतात.
श्रीकृष्ण आणि सुदामा, श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीच्या कथा तर प्रसिद्धच आहेत. दुर्योधन आणि कर्णाची मैत्रीही प्रसिद्ध आहे. पण त्या मैत्रीत थोड्या नकारात्मक छटा आहेत. दुर्योधन कर्णाकडे अर्जुनाचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो तर कर्ण हा दुर्योधनाच्या मैत्रीच्या ओझ्याखाली दबलेला असतो. आपण दुर्योधनाची बाजू घेतो हे योग्य आणि न्याय्य नाही हे त्याला माहिती असते पण तो काही करू शकत नाही. सगळ्यात भावणारी मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामा यांची आहे. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे पण त्याला भेटायला जाताना गरीब सुदामा फक्त पोहे घेऊन जातो आणि श्रीकृष्णही अत्यंत आवडीने ते भक्षण करतो. जेव्हा द्वारपाल सुदाम्याला अडवतात हे श्रीकृष्णाला कळते, तेव्हा तो स्वतः त्याच्या स्वागताला जातो. त्याची नगरी सोन्याची करतो. या सगळ्यात केवळ निखळ मैत्री आणि प्रेम आहे. खरं तर श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत कमालीचा विरोधाभास आहे. पण ती परिस्थिती त्या दोघांच्या मैत्रीत कुठेही आड येत नाही. श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची मैत्रीही अशीच मनभावन आहे.
हे वर्ष आता संपत आले आहे. हे वर्ष आणि गेल्या अनेक वर्षांनी मैत्रीची संजीवनी देत मला जगवलं आहे. गेल्या काही वर्षात खूप जिवलग मित्र मैत्रिणी मिळाल्या. त्यातील काही तर माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि मानाने मोठे आहेत पण कुठल्याही अपेक्षेशिवाय ही मैत्री पुढे जाते आहे. मैत्रीच्या बिया छान रुजल्या आहेत. त्या जोपासतो आहे. मैत्रीबद्दल बोलताना पु ल देशपांडे म्हणतात
रोज आठवण व्हावी असे काही नाही
रोज भेट व्हावी असेही काही नाही
रोज बोलणं व्हावं असंही काही नाही
पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री
आणि
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.
मैत्रीबद्दल लिहिताना मला सुचलेल्या काही ओळी
प्रत्येकाच्या हृदयात मैत्रीचा एक गाव असावा
त्या गावात असावेत हक्काने राहणारे मित्र मैत्रिणी
कधी वाटले काही सांगावेसे तर
वे खुशाल हक्काने त्यांच्याकडे
कराव्या मोकळ्या आपल्या भावना
मैत्रीत वाटून घेता येते सारे
उणावते दुःख आणि दुणावतो आनंद
अशा मित्रांकडे काही काळ जावे
सुखदुःख सारे वाटून घ्यावे
असावा असा मैत्रीचा गाव
मित्र मित्र म्हणता म्हणता वाढत जावा
मैत्रीचा परीघ
वाढता वाढता तो विश्वव्यापी व्हावा.
माझ्या वाचन आणि लेखनाच्या छंदामुळे मला अनेक नवे मित्र मिळाले आहे. माझे अनेक वाचक सुद्धा माझ्या जिवाभावाचे मित्र बनले आहेत. काहींना प्रत्यक्ष भेटलो आहे तर काहींची अजून भेट नाही. पण त्या सगळ्यांची या निमित्ताने आठवण करतो आणि पुढील येणाऱ्या अनेक वर्षात ही मैत्री अशीच ‘ अभंग ‘ राहील असे वचन देऊन थांबतो. हा लेख माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित !
☆ निघाले आज स्मृतींच्या घरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
खूप दिवसांनी रेडिओ लावला आणि रेडिओवर गाणे लागले होते निघाले आज तिकडच्या घरी…
लगेच डोळ्यासमोर निरोप घेणारी मुलगी तिला निरोप देणारे आई-वडील लग्न सोहळा एकाला निरोप देणे दुसऱ्याचे स्वागत करणे हे सगळे सगळे डोळ्यापुढे उभे राहिले…
दुसरे स्टेशन लावले तर ते इथे कोणाच्यातरी वाढदिवसाच्या कार्यक्रम चालू होता प्रत्येक जण गाण्यातून शुभेच्छा देत होता बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू… पुन्हा विचार आला एक वर्ष संपून दुसऱ्या वर्षात पदार्पण केले म्हणून वाढदिवसाचे हे क्षण आनंदी उत्साही करून हा उत्सव साजरा करणे म्हणजे वाढदिवस…
पुन्हा स्टेशन बदलले आणि तेथे गाणे लागले होते आनेवाला पल जानेवाला है |हो सके तो इसमें जिंदगी बितादो पल ये भी जानेवाला है ||खरच सगळेच जाणारे असते ना?
तसेच आज ३१ डिसेंबर… २०२३ संपून २०२४ घेऊन येणारे काही भारीत क्षण. सरत्याला निरोप येणाऱ्याचे स्वागत. सासरी चाललेल्या मुलीला निरोप द्यायच्या वेळे सारखेच. किंवा वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण झालेल्या वर्षांना धन्यवाद देऊन नवे वर्ष सुख शांती समृद्धीचे जावो म्हणून केलेले अभिष्टचिंतन हे आदर्श क्षण जसे आपण जगतो ना अगदी तसेच नव्या वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी जल्लोष हर्ष उल्हास यांनी सरत्या वर्षाला दिलेला निरोप आणि नव्याचे केलेले स्वागत यांचा एकत्र मिलाप.
किती भान हरपून मनात कुठलाच विचार न ठेवता सगळ्यांच्याच भावना साजरा करण्याच्या आंनदी असल्याने साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी आनंदाने भारलेले हे क्षण असतात.
मग मनात विचार आला फक्त ३१ डिसेंबरचे नव्हे तर रोजचा येणारा दिवस दिवसातील प्रत्येक सेकंद हा जाणारच असतो. हा क्षण आपल्याला आनेवाला पल जानेवाला है याचा संकेत देत असतो आणि ती वेळ निघाले आज स्मृतीच्या घरी असे सांगत असते. येणारा प्रत्येक क्षण आठवण होऊन मनात साठवायचा असेल तर फक्त ३१ डिसेंबरच नाही तर प्रत्येक क्षण साजरा करता यायला हवा.
वर्षातले सगळेच महिने, आठवडे दिवस, तास, मिनिटे, क्षण हे जाणारेच असतात तो प्रत्येक क्षण जाणार म्हणून दुःख आणि नवा येणार म्हणून आनंद अशा संमिश्र भावना असायला हव्यात फक्त ३१डिसेंबरलाच नको.
जेव्हा तुमच्या प्रत्येक क्षणात सकारात्मकता भरलेली असेल तेव्हा आता असणारा क्षण हा जाणारच असल्याने तोच क्षण जगून घ्यायची वृत्ती ठेवली तर जाणारे वर्षच फक्त निघाले आज स्मृतीच्या घरी असे न होता प्रत्येक क्षण तसा होईल.
मग जीवनातील प्रत्येक क्षण उत्सव होऊन राहील. तेव्हा नव्या वर्षाच्या प्रत्येक क्षणाचा उत्सव व्हावा या नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांची वृत्ती अशी सदा हर्ष उल्हासाने भरलेली रहावी ही प्रार्थना 🙏
एखादे वेळेस काय होतं, एखादी व्यक्ती बोलताना काहीतरी बोलून जाते आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्या व्यक्तीच्या बोलण्याचा निराळाच अर्थ उमटतो. जो चांगला नसतो, नकारात्मक असतो, दुखावणारा असतो. नात्यांमध्ये अंतर निर्माण करणारा असतो.
वास्तविक बोलणारी व्यक्ती सहज बोलून जाते. कदाचित तिच्या मनात कुणाला दुखवावं असा हेतूही नसतो किंवा यातून असा काही अर्थ निघेल याचे भान तिला नसते. पण तरीही तडा जातो, जोडलेलं तुटतं, जखम वाहत राहते, केवळ गैर समजामुळे. असा गैरसमज मनात राहिला तर त्याचे स्वरूप वाढत राहते, प्रबळ होते आणि ते नातेसंबंधात अतिशय घातक ठरते.
दारात शेजारचे आप्पा मुळगुंद होते. मी पटकन त्यांना विचारले,” काय काम आहे आता तुमचे आप्पा? मी जरा घाईत आहे.”
आप्पांचा चेहरा कसनुसा झाला आणि ते आल्या पावली परत गेले.
त्यानंतरचा माझा सर्व दिवस व्यस्त गेला. आप्पांचे येणे मी विसरूनही गेले. मी काहीतरी गैर बोलले, गैर वागले हे मला तेव्हां कळले जेव्हां रात्री आप्पांच्या सुनेचा मला फोन आला.
“ काकू !तुम्ही आप्पांना असं काय बोललात? त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा? ते फक्त चावी द्यायला आले होते तुमच्याकडे. पण तुमच्या फटकन् विचारलेल्या प्रश्नामुळे ते खूप दुखावले आहेत. ठीक आहे मी त्यांना समजावले आहे. पण इथून पुढे तुम्हाला त्रास होईल असे सहकार्य तुमच्याकडून आम्ही घेणार नाही.”
तिने फोन ठेवला आणि मी डोक्यावरच हात मारला.
किती साधी गोष्ट इतकी भरकटली? आप्पा अनेक वेळा माझ्याकडे त्यांच्या घराची चावी द्यायचे मग आजच इतका पराचा कावळा त्याने का करावा? परिणामी मलाही खूप राग आला. “नाही तर नाही” अशा मोडमध्ये मीही गेले. पुन्हा आप्पा कधीही आले नाही आणि मी त्यांना “का आला नाहीत?” म्हणून विचारलेही नाही.
“शेजारी” हे नातं मात्र तुटलं.
कोण बरोबर,कोण चुक हा प्रश्नच नव्हता. होता तो फक्त गैरसमज.
तसे या गैरसमजाचे तोटे आयुष्यात अनेकदा अनुभवले. काही गैरसमज काळाच्या ओघात वाहून गेले. तुटलेले पुन्हा जुळले. काही मात्र मनात अढी करून कायमचे वास्तव्यात राहिले.
बहिणीकडे नवरात्रीतले अष्टमीचे सवाष्णी पूजन होते. मीही गेले होते. दहा माहेरवाशींणी सवाष्णींची यादी आधीच झालेली होती. बहिणीने मला त्या सवाष्णं पूजनात समाविष्ट केलेच नाही. तशी मी काही संकेतांना मानणारी नाही. पण कधी कधी मन मऊ होतंच की!शिवाय विवाहानंतर आची जात, कुटुंब बदलले. बहिण उच्च जातीतली. बहिणीच्या या मला डावलण्याच्या कृतीमुळे माझ्या सौभाग्याचा, सवाष्णीपणाचा अपमान तर झालाच शिवाय एका जातीभेदाचं भूतही डोक्यात शिरलं.तिच्या स्टेटस मधले आपण नसू असेच मला त्यावेळी वाटले. आणि तिने असे का करावे याचा मला आजही प्रश्न आहे. मी तिला याविषयी कधीच बोलले नाही. तिनेही कधी विचारले नाही कारण मुळातच तिला कल्पनाच आली नाही की एका लहानशा कृतीने तिने मला दुखावले. असो. शेवटी सारे गैरसमजच.
पण आता विचार करताना वाटतं गैरसमज एक अशी शक्तिशाली गोष्ट आहे जी जगाले सर्वात सुंदर नातं एका क्षणात मोडते. गैरसमज हे एक अत्यंत जहाल विष आहे. हे विष शंभर आनंदांच्या क्षणांना विसरायला लावते. व्यक्ती मधलं अंतर वाढवते. यासाठी एकच करावे मनातली अढी बोलून, चर्चेद्वारे दूर करावी. प्रश्न चर्चेने सुटू शकतो. झालं गेलं विसरून जा” म्हणून नात्यातला गोडवा टिकवावा. तारतम्याचा विचार करून,अहंकार सोडून, सह अनुभूतीने एकमेकांना समजून घेऊन, झालेले गैरसमज दूर करणे हेच योग्य आहे. कधी क्षमा मागावी कधी क्षमा मागण्यारांना क्षमा करावी आणि जीवनाच्या प्रवाहात आनंदाने उतरावे. सगळ्यांना सोबत घेऊन. अत्यंत समंजसपणे.